आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं.
हे सांगणं खरंच आवडलं नाही
पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही
तोच तो प्रवाह तोच तो जमाव
आयुष्य नावाचा धावता बनाव
त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती
वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती
'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती
'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती
'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी
'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी
गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची
वाटही साधी कुणी न द्यावी, मला आली चीड त्याची
मी केलेल्या मदतीचं, कौतुक खरंच वाटलं नाही
इतर कुणीच हे न करावं, हे खरं तर पटलं नाही
प्रत्येकाच्या संवेदना वाटल्या झाल्या बंद तिथे
गर्दीमधली अडचण झालो, मीही ठरलो मंद तिथे
'शिकले सवरले असे वागतात, उसंत नसते क्षणाचीही'
ते काका म्हणती हतबलतेने, 'पर्वा नसते कुणाचीही'
'आपण काळजी घेतली नाही तर व्हायचं जे, ते टळत नाही'
'अपंगत्वाचं दु:ख काय ते, धडधाकटांना कळत नाही'
'दोन मिनिटांनी बिघडतं काय, ट्रेन सुटली तर अडतं काय'
'बातम्या वाचून हैराण होतो, कुणी लोटतं काय, कुणी पडतं काय'
'कमीच मिळते मदत अशी, बहुतेक कुणाला जाणही नसते'
'अंगावरती पायही देतील, माणुसकीचे भानही नसते'
थँक यू म्हणत, बसमधल्या गर्दीत काठी ती लपली
समाधान माझे, माणुसकी माझ्यापुरती मी जपली
प्रतिक्रिया
5 Dec 2016 - 6:52 pm | शार्दुल_हातोळकर
मदत करणारे हात आजकाल खरोखरच कमी झाले आहेत !
6 Dec 2016 - 9:12 am | वेल्लाभट
धन्यवाद शार्दुल
6 Dec 2016 - 10:13 am | किसन शिंदे
परवा तलावपाळीला एक कप चायमध्ये चहा पिताना एक आजी आल्या भीक मागण्यासाठी, म्हटलं पैसे देणार नाही खायला घेऊन देईन, तर त्या आजी रागाने बघत तणतणत निघून गेल्या. बायको मागून हसत म्हणाली 'खूप हौस ना तुला माणूसकी दाखवायची, असंच पाहीजे!'. :(
6 Dec 2016 - 10:19 am | वेल्लाभट
हे अनुभव मलाही आलेत. तिथे त्यानुसार उत्तर द्यायचं. अख्या गोदामातच भेसळ झालीय म्हटल्यावर डाळीत खडे असायचेच. पण आमटी आमटीच असते.
6 Dec 2016 - 12:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमटी आमटीच असली तरी तांबडा पांढरा हा तांबडा पांढराच असतो.
बेस्ट.
पैजारबुवा,
6 Dec 2016 - 3:23 pm | किसन शिंदे
=))
6 Dec 2016 - 11:59 pm | अमिता राउत
आपल्याकडे अपंगांसाठी वेगळी व्यवस्थाच करायला हवी, अपंगांचा अजिबातच विचार करत नाहीत त्यांच्या गरज लक्षात ठेवून रस्ते, बसेस मध्ये बदल घडायला हवेत. जो पर्यंत त्यांना वेगळं महत्व मिळत नाही तोवर लोक पण असच वागतील. Everyone should respect them ....
7 Dec 2016 - 10:32 am | रातराणी
कुणीतरी अजूनही असा विचार करत हे वाचून छान वाटलं.
7 Dec 2016 - 11:05 am | वेल्लाभट
सर्वांना धन्यवाद देतो.
आपल्याकडे एकंदरच सुरक्षेबाबत, सुविधांबाबत कमालीची अनास्था आहे त्यामुळे जिथे धडधाकटांना कठीण जातं, तिथे अपंगांचं काय विचारता. साधा पदपथ बनवताना त्याची रस्त्यापासून उंची किती असावी, किंवा इमारतीचा जिना बांधताना कठड्याची उंची, रचना कशी असावी या गोष्टींना शून्य महत्व असतं. आणि भारतातली माणसंही फारच सहिष्णू; सगळं 'हे असंच असतं' म्हणून चालवून घेणारी. त्यामुळे या विचारपद्धतीत गेली अनेक तपं सुधारणा झालेली नाही; कधी होणारही नाही.
हे सगळं नकारात्मक चित्र असताना आपण शक्य तितकी शक्य तिथे मदत करून आपलं कर्तव्य करत रहावं इतकंच.
7 Dec 2016 - 11:14 am | पैसा
हल्ली टीव्हीवर यासंदर्भातल्या जाहिराती दिसत आहेत. प्रत्यक्ष बदल कधी होतो बघू.
लिखाण आवडलं.
7 Dec 2016 - 11:22 am | अजया
लेख आवडला.
7 Dec 2016 - 11:27 am | मंजूताई
कविता आवडली.
हे सगळं नकारात्मक चित्र असताना आपण शक्य तितकी शक्य तिथे मदत करून आपलं कर्तव्य करत रहावं इतकंच.>>>>> मी ही अगदी छोटीशी मदत करत असते. कॉलेजच्या मुलांची अभ्यासाची पुस्तके रेकॉर्ड करुन देते गेल्या चारवर्षांपासून. भाचीनेही कॉलेज सांभाळून ती रायटर म्हणून काम करतेय... नुकतीच बातमी छापून आलीये...
http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Blind-girl-wins-gold-desp...
7 Dec 2016 - 11:39 am | पैसा
तुमचे दोघींचेही अभिनंदन!
7 Dec 2016 - 12:28 pm | वेल्लाभट
अतिशय स्तुत्य काम! :) कौतुक आहे तुम्हा दोघींचं.
वा.
बातमीची लिंक पसरवत आहे.
9 Dec 2016 - 12:28 am | विखि
शेठ, आजकाल मानुसकी लै महाग होउन बसलीत, कुनाचबी काम नाय ते, त्यासाठी दानत लागती लै