कविता

बोली बोली बायका बोली

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
21 Sep 2018 - 9:58 am

आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या !
चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....

लिपीबिपीचे बंधन नाही
व्याकरणबिकरण... हे काय असते?

आम्ही बोलतो अनंत बोलीतून ....
कुजबुज जितकी थरथरणारी
तितके भांडण कडकडणारे
कठोरतेचा शीण आम्हाला
मवाळतेचा शाप तसाही
पण बोली आमची जपून ठेवतो....

अर्थाचा पण अनर्थ करू....
खिल्ली तुमची सहज उडवू
निरर्थाला अर्थ देऊ...
पण तुटका संसार नेटका करू....

अदभूतअनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगाधोरणमांडणीसंस्कृतीइतिहासवाङ्मयकवितामुक्तकभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थसाहित्यिकसमाजजीवनमान

माझ्या नकळत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Sep 2018 - 9:56 pm

मी चालून आलो अशाच वाटा
ज्या माझ्या नकळत
मुक्कामी पोचवून निरोप घेण्याआधी
पुढील प्रवासाच्या धुंदीतच
हरखून गेल्या

मी मोजून आलो अशाच लाटा
ज्या माझ्या नकळत
किनाऱ्यावरी फेनिल होऊन फुटण्याआधी
सागर तळीची अपार शांती
पिऊन आल्या

मी शोधून आलो अशाच ओळी
ज्या माझ्या नकळत
विस्मरणाच्या वादळात पडझडण्याआधी
शब्दभूल पाडीत कुणाच्या
ओठी रुळल्या

मुक्त कविताकविता

वृद्धाश्रम

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
17 Sep 2018 - 3:35 pm

वृद्धाश्रम

आज एका आजीला
मी वृद्धाश्रमात पाहिलं
तीच्या डोळ्यातील दुःख
मी जवळून अनुभवलं

ती निराश होती
हतबल होती
दाराकडे नजर रोखून
वाट बघत होती

काय चुकलं तिचं की
वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय
सार काही मुलाला देऊन
तिला मात्र अस जगावं लागतंय

डोळ्यातले अश्रु ही
तिचे काही वेळाने थांबून गेले
पुण्य केलं की पाप
हे तिला ही कळेनासे झाले

म्हणुनच म्हणते की ……..

नका रे मुलांनो
वागु असे
आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ
ह्या जगात कोणी नसे

अभय-काव्यकविता माझीभावकवितामाझी कवितावृत्तबद्ध कविताकवितासमाज

डिजीटल डिजीटल

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
15 Sep 2018 - 7:31 am

जी माणसे कुठल्याच
डिजीटल प्रोफाईल मध्ये
नसतात,
त्यांचे जगणे कसे असेल,
हा प्रश्न मला
छळू लागला,
आणि मला माझ्या डिजीटल
विचारांची भिती वाटू लागली...

जी माणसे ऑफलाईन असतात
त्यांचे लाईफ कसे असेल
या प्रश्नाने मला परेशान केले
आणि मला माझ्या
डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली...

अदभूतअविश्वसनीयइशाराकविता माझीकालगंगामांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकसमाजजीवनमानतंत्र

चंद्राचे मनोगत

कलम's picture
कलम in जे न देखे रवी...
14 Sep 2018 - 12:44 pm

कशाला हसावे कशाला जगावे
कशासाठी अन्याय हा पार्थवा
असत्यास कवटाळुनी मी जगावे
कुणाला वदू माझी ही वंचना

निशेच्या कुशीतून जन्मास यावे
मला बागडाया तमाचे रण
कधी भेट नाही स्वतःच्या पित्याची
संबोधती सूर्य नारायण

नसावे मला का कधी स्वत्व माझे
पित्याने दिले दान तेजः कण
युगे लोटली आज आहे उभा मी
निशेला करोनि स्व ला अर्पण

सभोवताली अति क्षुद्र तारे
स्व प्रकाशे आनंदात तेजाळती
कधी सर्व एकत्र येऊनि मजला
कटू बोल बोलुनी वेडावती

कविता

भारलेल्या त्या क्षणांचे...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
12 Sep 2018 - 8:31 pm

भग्न शिल्पातून भटकत कोणते हे भूत रात्री
विव्हळले, "आरंभ विसरा, शेवटाची येथ खात्री
भोगुनी उपभोग उरते शून्य केवळ मर्त्य गात्री
क्षणिक येथे तेज, अंती घोर तम प्रत्येक नेत्री"

चांदण्याच्या कवडशाने भग्न मूर्ती उजळली
ध्वस्तता मिरवीत अंगी अंतरीचे बोलली,...
"निर्मितीचा दिव्य प्याला प्राशुनी मज घडविले,
आज जरी मी भंगले अन विजनी ऐसी विखुरले
सर्जनाच्या अमृताने अजूनही मी भारले….

....भारलेल्या त्या क्षणांचे तेज उरते शाश्वत
तेच साऱ्या सर्जनाचे, निर्मितीचे इंगित "

कविता माझीकविता

तुझे नाव

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
12 Sep 2018 - 11:37 am

इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे

काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे

अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने

पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे

नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने

हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे

-- विशाल

gajhalgazalकविता माझीमराठी गझलमाझी कविताकवितागझल

सावरी...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
11 Sep 2018 - 9:46 am

हळुवार सोडवावं
एकेका आठवणीचं पान..
कुठ्ठं फाटू न देता, न चुरगळता...
निगुतीनं घड्या घालून
होड्या कराव्या त्यांच्या..
आणि सोडून द्याव्या अलगद,
वाहत्या आयुष्यावर...
खरंच असं करून बघ.
खरंच..
मग पुन्हा एकदा अनुभवशील
सावरीचं हल्लक मोकळेपण...
अगदी मन भरून...

कविता

ही हाक कुणाची आहे...!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
11 Sep 2018 - 9:15 am

ही हाक कुणाची आहे...!

उमटती शब्द कागदावर
की तरंग खोल पाण्यावर,
अर्थ लावला त्यांना जरी
तरी,
हा डोह कुणाचा आहे?

बरसत्या धारांना पाहून
बरंच काही येतं दाटून,
थेंबांना समुद्र मिळतो जरी
तरी,
हा घन कुणाचा आहे?

साधेसुधे हे आयुष्यही
सोपे नाही जगणेही,
स्पंदते हृदय माझेच जरी
तरी ,
हा श्वास कुणाचा आहे?

मागे राहिल्या पाऊलवाटा
आता प्रवास एकटीचा
नाही कोणी सोबती जरी
तरी,
ही हाक कुणाची आहे?

कविता

पाकोळी

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
10 Sep 2018 - 2:36 pm

निळ्या-जांभळ्या
आभाळाखाली,
हिरव्यागार कुरणाच्या
लुसलुशीत गवतावर
निवांतपणे
पहुडलेला असताना,
पलीकडच्या,
ताटव्यातल्या फुलांवरून
एक नाजूकशी पाकोळी
उडतउडत
माझ्याकडे आली
आणि मला म्हणाली…
"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,
आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"

- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)

कविता माझीशांतरसबालकथाकवितामौजमजा