कविता

रदीफ नाही कधी जुळला ...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Oct 2018 - 8:04 pm

रदीफ नाही कधी जुळला
न कधीही काफिया सुचला
गजल जगण्यातला तरिही
कैफ भरपूर अनुभवला

जिव्हारी लागतिल ऐसे
कितीतरी वार परतविले
तरी एल्गार युध्दाचा
जखम ओली असुन केला

सदैवच लागले होते
ध्यान हे ऐहिकापार
इकडच्या ऊनछायेचा
कधी अफसोस ना केला

माझी कविताकवितामुक्तक

हा सागरी किनारा

केदार गाड्गीळ's picture
केदार गाड्गीळ in जे न देखे रवी...
9 Oct 2018 - 4:59 pm

हा सागरी किनारा । रवि दूर लोटताना
हीरा राजा ची ही जोड़ी । थोडा भार सोसताना

पाणी अथांग मुक्त । पक्षी शोधी निवारा।
वाहे खटयाळ् वारा। हा सागरी किनारा

बघता सखे तुला मी। क्षण होती धूंद धूंद। मग मंद होइ वारा। हा सागरी किनारा। हा सागरी किनारा

रवि जाई सांज होइ ।भासे चंद्र कोंदणात। अन एक शुक्रतारा। हा सागरी किनारा

ऋतू सांजवेळी खुलला। मनि मोगराच फुलला । आकाशी नक्षत्र नजारा। हा सागरी किनारा

मन बावरे असे हे
स्वप्नात ही नजारे
ही कोणति नशा रे
हा कोणता किनारा
मन शोधता किनारा

कविता

यलो ऑकर ची स्वप्ने

हर_हुन्नरी's picture
हर_हुन्नरी in जे न देखे रवी...
8 Oct 2018 - 3:55 pm

यलो ऑकर ची स्वप्ने :

पानगळ सुरु झालीय

नोव्हेंबर मधली

सेकंदागणिक कोसळतायत

हजारो स्वप्नं

गवताच्या अगणित हिरव्या

छटांमध्ये

रानावनांत , जंगलात

शहरातल्या पार्कात

पडीक घरांच्या अवतीभवती

धांदल नुसती

अविरत

एकेक पान पाहावं

अगदी जवळून ,

गाढ , सुगंधी झोपेतल्या

खुशबूदार स्वप्नासारखं

पहिल्या धारेच्या

प्रशियन ब्लू चे शिंतोडे

सूर्याने जाळून टाकलेले

कच्चे खाऊन टाकलेले रंग

व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना

पर्यंत च्या सर्व रंगश्रुती

कविता

एवढंच करा.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in जे न देखे रवी...
6 Oct 2018 - 4:43 pm

कोणाकडे प्रतिभेची कुंडले असतील तर,
तर ती उतरवूनच ठेवावी.
कारण ती मागणारे इंद्र,
रस्तोरस्ती उतरलेत.

तुमची प्रतिकं असतील मारे प्रत्यक्षाहून उत्कट
तुम्हीहून ती जाळा.
कारण प्रत्यक्षांच्या उरावर,
त्यांना थयाथया नाचवणारे,
तुमच्या अंगणात आलेत.

अभ्यासाचं कवच काढूनच टाकावं
रक्तबंबाळ झालात तरी.
कारण, ते देणाऱ्या सूर्याने
त्याचं तेज गहाण टाकलय.

कविता

चित्रातल्या कळ्या...

कलम's picture
कलम in जे न देखे रवी...
4 Oct 2018 - 10:16 am

स्वप्नात रंगलेल्या चित्रातल्या कळ्यांनो

फुलणे तव बघाया मी अधीर झालो

फुलतील फुले तुमची देतील गंध ह्रदया

रंगूनी टाकतील अन माझ्याही जीवनाला

फुलबाग मग कदाचित मनीही फुलेल माझ्या

मन ही म्हणेल गाणे जुळवूनिया सुरांना

पसरेल गंध तुमचा गंधीत होई माती

होईल पूर्ण गाणे जुळुनी नवीन नाती

फाकेल सूर्यबिंब पसरेल दश दिशांना

माझेच नवे जग हे दावीन जीवनाला

पण ह्या मनास वेड्या सांगू कसे तुम्हाला

फुलण्यास वेळ नाही चित्रातल्या कळ्यांना

कविता

मन

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
1 Oct 2018 - 7:46 pm

असे समुद्र अथांग, मन त्याहूनही खोल
हिमालय जो उत्तुंग, मन त्याहूनही थोर

वाहताना होते नदी कधी वाकडी वेल्हाळ
मन जागच्या जागीच आणि तरीही नाठाळ

लहरी वारा आणे पाण्यावरती तरंग
मनी उठता तरंग लहरते अंतरंग

वेगवान प्रकाशाला संथ काळाचीच साथ
संथ जीवनी राहून मन धावते वेगात

तारे टांगले ज्यावर त्यास म्हणती अंबर
मन टिपते विश्वाला, मन विश्र्वाचे झुंबर

मूल पाहताच मन लहानाहून लहान
तेच तन तेच मन खरे तेव्हांच महान

हाव भाव राग लोभ, मनी अगणित मिती
देव धर्म पाप पुण्य, सारी त्याचीच निर्मिती

कविता

पितृ"पक्षी"

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Sep 2018 - 4:44 pm

माझा कावळा अजब
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो

माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो

माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो

पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू

हास्यकविता

"लाल"

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
28 Sep 2018 - 10:06 pm

पहाडावरची लाल माती
एक दिवस खसली
खसत खसत जाऊनस्यानी
सयरामंदी पोचली

वावरावरची लालमाती
माट्यासंग उडली
उडत उडत जाऊनस्यानी
सयरामंदी बसली

सयर झाले लाललाल
सप्पाच्या सप्पा लाल

लाल रंग
परसाच्या फुलाईचा
जंगलाच्या विस्तूचा
लाल रंग
उगोत्या सूर्याचा
जरत्या निव्याचा

खोकलून खोकलून
छाती होते लाल
पायाले काटा गडते
माती होते लाल

लाल रंग
धमनीच्या पान्याचा
जवसाच्या घान्याचा
लाल रंग
तिखट बुकनीचा
कपार कुकवाचा

झाडीबोलीकविता

नको जाऊ रे ...

कलम's picture
कलम in जे न देखे रवी...
24 Sep 2018 - 11:08 am

काय मिळविसी कान्हा मजला सोडूनिया एकटी

यमुना तीरी राधा रडते शोकाकुल बासरी

प्रेम तुझे ते खरे असोनि तू का जवळी नसे

ही मथुरा आज का मला स्मशानापरी भासे

कशी परीक्षा असे मुकुंदा वेड्या प्रितीची

कसले बंधन कसले अंतर कसल्या रीतीची

नको जाऊ रे सोडून कान्हा अश्रू तुला सांगती

नको तुझा तो विरह अन नको श्वास तुझ्यावाचूनि

अमर असे हे प्रेम आपुले अधीर परी आशा

अरे तुला का आज ना कळे या प्रेमाची भाषा

शपथ तुला परी देवू न शकते तव कर्तव्यापरी

वाट पाहील हा प्राण तुझी बघ याच यमुना तीरी

कविता

गीत - गँ गणपतये

कौस्तुभ आपटे's picture
कौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...
23 Sep 2018 - 11:03 am

॥श्री॥
गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण
गँ गण ण ण ण, गँ गणपतये
देवांमाजी, अग्रदेव तू,
त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥

हे शिव-शक्तिच्या संगमा
हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा
त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू
वेदांची रे मंत्रणा !
विद्या-कला
ठायी तुझ्या
तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥

तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती
हे देवांच्या सेनापती
रविचंद्रधिनायक विश्वही तुजला
सुर्याने ओवाळती
सिद्धेश्वरा,
विघ्नेश्वरा,
हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥

गाणेश्रीगणेशसंगीतकवितासाहित्यिक