कविता

मी कळीला फुले वेचताना पाहिले

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
8 Sep 2018 - 1:47 pm

जीवनास पुन्हा जगताना पाहिले
मी कळीला फुले वेचताना पाहिले

सोडून फांद्या फुलेही झेपावली
त्यांनी तुला फुले वेचताना पाहिले

झाले बंद कुपीत दरवळणे जेव्हा
मी अत्तरास गंध वेचताना पाहिले

आकाश विखुरण्याचे दु:ख विसरलो
जेव्हा तिला मी मला वेचताना पाहिले

आकाश......

कविता

तो बोलला खरे

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
8 Sep 2018 - 1:33 pm

मलाही पटले नव्हते, तो बोलला खरे
सुळीवर त्याला दिले, तो बोलला खरे

गणले नाही त्यांनी उगाच मूर्खात त्याला
त्यांच्या सोयीचे नव्हते, तो बोलला खरे

पिऊन अमृतासही बोलणे लटके त्यांचे
प्राशिले मदिरेस त्याने, तो बोलला खरे

घाबरला उगाच जन्मभरी ’आकाश’ तो
त्यालाही कळले नव्हते, तो बोलला खरे

---आकाश

कविता

थांबला नसतास तू

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
8 Sep 2018 - 1:30 pm

जशी थांबले मी तसा थांबला नसतास तू
तुला घाई मरणाची, थांबला नसतास तू

माझे ओथंबणे तुला कधी दिसलेच नाही
ठेवून कोरडी मला का असा भिजलास तू

पाहिले असतेस डोकावूनी जर या अंतरी
असा परक्याप्रमाणे, वागला नसतास तू

तुला शोधणे थांबवले आकाश शेवटी
बदललास अवघा, हरवला नव्हतास तू

आकाश........

कविता

पूर

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
7 Sep 2018 - 8:58 am

इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले

जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता

दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड

अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका

मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ?
चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविता

सारंगिया

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
6 Sep 2018 - 11:28 am

तुझ्यातला सारंगिया
माझ्या मागे सावलीसा
कधी माझ्याहून आर्त
कधी मूक अव्यक्तसा

कधी माझ्याबरोबर
सूर्यसा तू डोक्यावर
कधी माझ्याहून दुणा
जणू माझ्यातून उणा !

तुझ्यातल्या सारंगीचे
रंग, माझा मनःपट,
माझ्या सुरांचे कुंचले
ओथंबून काठोकाठ

विलंबित कधी द्रुत
श्वासनि:श्वासांची लय
मीट डोळे, पहा मन
तुझे माझे चित्रमय !

~ मनमेघ

कवितासारंगिया

कोणीतरी असावे.......

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
6 Sep 2018 - 8:01 am

कोणीतरी असावे.......

ओठात नाव ज्याचे श्वासासमान यावे ।
नात्यामधे असेही कोणीतरी असावे ।।

रेखाटल्या चित्रांचे रंग फिकेच भासावे ।
अधुऱ्या स्वप्नांनी आता कुंपणांतच रहावे ।।

एकरूप या मनांचे, वचन वेगळे नसावे।
जीवघेणे प्रश्न तरी, उत्तराने हसत असावे ।।

आयुष्यांचे नकाशे, दूर देशांत दिसावे ।
भाग्यांमधल्या रेषांनी, क्षितिजांवरी जुळावे ।।

घाव हे जखमांचे, त्याच्या फुंकरीने मिटावे ।
निखारे ओले वाहती, कुणा न ते दिसावे ।।

कविता

द्वादशैतानि नामानि

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Sep 2018 - 4:12 pm

अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे
जनांसी करावे, थोडे सुज्ञ II १ II

अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II

कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II

अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II

अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती
जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II

अगा हे विकटा, साथ नवसाची
करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II

विघ्नराजेंद्रा रे -जल, भूमी, वात
सर्व प्रदूषित, कैसे झाले II ७ II

अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची
जाणीव जनांची, वाढवावी II ८ II

मराठीचे श्लोकश्रीगणेशकविता

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
2 Sep 2018 - 11:20 am

वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!

स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!

माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!

तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!

वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!

- कुमार जावडेकर

gajhalकविताप्रेमकाव्यगझल

अपूर्ण आयुष्याची कविता

Prakashputra's picture
Prakashputra in जे न देखे रवी...
25 Aug 2018 - 12:02 pm

दोन पेग झाल्यानंतर, जेव्हा दोन पेगचे लिमिट म्हणून तिसरा प्यायचा नव्हता, पण ग्लासात काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी नुसताच सोडा ओतला तेव्हा सुचलेली कविता

मी स्वतःला फसवायला खूप प्रयत्न करतो !
आणि दरवेळेला स्वतःच फसतो !!
दरवेळी जिंकायचा प्रयत्न करतो, !
मग मीच जिंकतो आणि मीच हरतो !!

स्पर्धा कुणाशी आहे तेच कळत नाही !
तरी उगाचच लढत बसतो !!
मी शहाणा म्हणून मलाच समजावत बसतो !
मी वेडा म्हणून माझ्याशीच भांडत बसतो !!

कविता

निघताना....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Aug 2018 - 5:02 pm

मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....

आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण

मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे

सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल

कविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुणमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवास