जाणीव
जाणवे मज आज जेव्हा
काहीच नसे इथे आपुले,
सांगू कुणा ही व्यथाच माझी
शोधूनी आता मन हे थकले ||१||
अथांग या दुनियेमधला
जणू उपरा मी भाडेकरू,
स्वकेंद्री अशा अवनीवरती
कुणालाच मी माझे म्हणू? ||२||
मी यावे अथवा जावे
लोचनी न कुणाच्या आसवे,
कुणा न वाटे हृदयामधूनी
मन मोकळे करावे मजसवे ||३||
धावतो मी रोज आहे
काहीतरी मिळवावया,
सिनेमाच तो पडदा नुसता
वेळ लागला मज कळावया ||४||
कशापरी तू धाडीलेस मज
सुटेल का कधी कोडे देवा?
गतजन्मींच्या पापांचा वा
पुण्याईचा म्हणू हा ठेवा? ||५||