कविता

कल्लोळ..!!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
16 Sep 2013 - 12:17 am

कधी काळजाला समेचा दिलासा..
मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला!

तसे बंध कुठले-कधी जाणिवेला
ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला!

नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला..

असे काय होते उरी प्राक्तनाच्या..
अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..!

अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले..
मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!!

राघव

शांतरसकविता

झिम्माड पाउस...

K Sangeeta's picture
K Sangeeta in जे न देखे रवी...
15 Sep 2013 - 9:39 pm

झिम्माड पाउस...

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर
झिम्माड पावसाला झाली सुरुवात ...

भेटण्यासाठी अधीर झाले
समुद्रकिना-यावर धावत गेले...

तुफान सरी बेभान वारा
बेधुंद झाला आसमंत सारा...

अंगाशी झोंबत होता
लडीवाळ वारा...

मस्तीत स्पर्शून जात होत्या
फेसाळणा-या लाटा...

बेधुंद होउन मी
मजेत गात होते...

लाटांच्या संगीतावरही
थिरकत होते...

मनाला चिंब भिजवणा-या पावसात
मनसोक्त भिजावेसे वाटत होते...

कविता

निरोप

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
12 Sep 2013 - 3:50 pm

मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी? माज्याच की!)

कविता

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
12 Sep 2013 - 10:01 am

अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥

कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला ।
मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥
न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥

मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे ।
कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥
न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥

कवितासमाजजीवनमानराहणी

सार्थक

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
10 Sep 2013 - 6:16 pm

आभार…
तिच्या गारस वयाचे
ओळखीच्या समयाचे
आतर्क्य यमनाचे
आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या
अरूप यौवनाचे ……. !!

त्यातूनच
उतारावरचं तारुण्य
नात्याचं लावण्य
शब्दांचा प्रसव
आणि भावनांचा दुर्लभ शृंगार
लाभला आहे मला …

"माझा मी",…
"नसूनही असलेली माझ्यातली ती "
भेटलीय मला असंख्य वेळा …….
अस्तित्वाशिवाय ……!!

या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच
जिवंत ठेवील मला
चंद्र माधवीच्या प्रदेशात
तिची प्रतीक्षा करीत
चिरंतन …. !!

शृंगारकविता

मूक आक्रोश

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जे न देखे रवी...
7 Sep 2013 - 4:20 pm

दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे. तिचा हा भावानुवाद.

http://www.youtube.com/watch?v=fyrj5tMwjic

आई, त्रास खुप सहन करून
मनाला तुझ्या खुप त्रास देवून
सांगून तुला काही, मी जात्ये आहे....

करुणकविता

नवोदित कवींना आवाहन

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
5 Sep 2013 - 3:58 pm

माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या. त्यांनी केलेल्या मुक्तछंदात्मक कवितांमधून ही एक लय, नाद जाणवत राहते.
त्यांच्या काव्यसंग्राहासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत शिरीष पै म्हणतात,

संस्कृतीकवितासद्भावना

पुन्हा अनोळखी होऊ .....!!

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
5 Sep 2013 - 3:19 pm

संधीकाळी सुखावत होता जो
गंध वाऱ्याचा तो विसरू,
दिलासा एकमेकां देऊ....
अन पुन्हा अनोळखी होऊ .... !!

नको आठवण काढू
झंकारणाऱ्या स्वरांची,
वादळात विखुरला जो
मेणा खांद्यावर घेऊ....
सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!!

विसरू ती गुंफण
कुरवाळणाऱ्या हातांची,
नको आवाज झुल्यांचा
मन बंदिशीत ठेऊ......
पुन्हा अनोळखी होऊ .....!!

एकमेकांच्या पाऊलखुणांवर
अंधारून छाया आली,
ते व्रण वाळूतले सखे
चल, आपणच पुसून पाहू......
सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!!

कविता

ध्यासबावळी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 Sep 2013 - 11:28 am

आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती
तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती
फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती
छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती

अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती
गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती
एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती
झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती

…………………. अज्ञात

शृंगारकविता

" दु:खा "

कैलास गायकवाड's picture
कैलास गायकवाड in जे न देखे रवी...
1 Sep 2013 - 11:21 am

कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा
तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा

असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा

तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव
तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा

जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित
जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा

हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया
तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा

---डॉ.कैलास गायकवाड

कविता