चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
12 Sep 2013 - 10:01 am

अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥

कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला ।
मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥
न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥

मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे ।
कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥
न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥

प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया ।
धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥
नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥

तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्त राहिला ।
विकास जाहला कसा, बकाल देश जाहला ॥
तरूण राबता करू, जनांस लावु शिस्त ह्या ॥
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ४ ॥

नरेंद्र गोळे २०१३०९१२

http://srujanashodha.blogspot.in/
ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

कवितासमाजजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

12 Sep 2013 - 12:38 pm | वेल्लाभट

मस्त जमलीय. खूप आवडली कविता.
आणि त्यातील अर्थाचं, आशयाचं म्हणाल, तर गरजच आहे दुष्टवृत्तींना दंडण्याची.
लोकांनी एकत्र येण्याची. मूलभूत संवेदना जोपासण्याची. सत्प्रवृत्त होण्याची.
अगदी सहमत.

पैसा's picture

12 Sep 2013 - 6:13 pm | पैसा

आशावादी अन जमलेली कविता!

आतिवास's picture

13 Sep 2013 - 8:42 am | आतिवास

कविता आवडली.
पण
तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्त राहिला ।
हे प्रत्येक पिढीला पुढच्या पिढीबद्दल (विनाकारण) वाटत असतं - हेही विसरता कामा नये.

वेल्लाभट, पैसा आणि आतिवास;
सगळ्यांना अभिप्रायार्थ मनःपूर्वक धन्यवाद!

आतिवास,
खरंय! कुठलेही सामान्यीकरण वाईटच. केवळ दुष्टप्रवृत्तीलाच धारेवर धरणे उचित ठरेल.

सरसकट सांगायचे तर तरूण सत्प्रवृत्त आहेत. त्यामुळेच तर देश सत्पथावर अग्रेसर आहे!

मुक्त विहारि's picture

14 Sep 2013 - 1:18 pm | मुक्त विहारि

आवडली,,

उद्दाम's picture

14 Sep 2013 - 6:41 pm | उद्दाम

कलिंदनंदिनी वृत्त. एक अक्षर लघू. एक गुरु.

१. पुकारता चला हूं मै गली गली बहार की.

२. अजीब दास्ता है ये कहॉ शुरू कहॉ खतम

पाषाणभेद's picture

14 Sep 2013 - 6:54 pm | पाषाणभेद

एकदम रोमांचित करणारे काव्य आहे. सुंदर.

आता ऐका देशभक्तीरचना. स्पूर्तीगीत लिहीलंय रवींद्र भट यांनी संगीत आणि स्वररचना सुधीर फडके यांची. चित्रपट 'हा माझा मार्ग एकला'

"उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो"

मीनल's picture

14 Sep 2013 - 8:31 pm | मीनल

शब्द छान आहे. कवितेत गेयता आहे.

कवितानागेश's picture

14 Sep 2013 - 10:50 pm | कवितानागेश

छान आहे रचना.

शिवतांडव स्तोत्राची आठवण झाली.

मुक्त विहारि, उद्दाम, पाषाणभेद, मीनल, लीमाऊजेट आणि आबा,
सगळ्यांना अभिप्रायार्थ मनःपूर्वक धन्यवाद!

उद्दाम,
सुंदर भर घातलीत. आता ह्या गाण्यांच्या चालीतही हे म्हणता येईल.
शिवाय शिवतांडव स्तोत्रही, आता ह्या गाण्यांच्या चालीत म्हणता येईल.

आबा,
हो. शिवतांडव स्तोत्राची आठवण होणे साहजिकच आहे.
कारण ते ज्या (संस्कृतातील) पंचचामर छंदात आहे, त्याच (मराठीतील) वृत्तात हेही लिहीले आहे.

पाषाणभेदांची चाल तर आणखीनच भेदक आहे...
सुरेख!