जुनेरलं नातं...
जुनेरल्या नात्यामध्ये
ऊब गोधडीची;
विरलेले धागे तरी
जर ओळखीची..
जुनेरल्या नात्यामध्ये
अबोल पाऊस;
भिजलेले मन तरी
डोळा ना टिप्पूस..
जुनेरल्या नात्यामध्ये
सल ही जुनीच;
गळाभेट नाही परी
सय नेहमीच..
जुनेरल्या नात्यामध्ये
शब्द हरवले..
जुनेरले नाते आता
मुके मुके झाले..
जुनेरले नाते सख्या
नशिबाचा खेळ..
पाय निघता निघेना
आली निरोपाची वेळ
....
आली निरोपाची वेळ.