उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न...
प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही. नोकरीपासून धंद्यापर्यंत हे स्थलांतर आजही होतेय. पुणे, मुंबईतून अल्पसा वर्ग प्रामुख्याने नोकरीच्याच मिषाने इथे आला आहे. ज्याचे वास्तव्य साधारपणे अल्पकालीनच म्हणजे नोकरीपुरतेच असते. पण याशिवाय नागपूर आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात. यात उच्चशिक्षित नोकरीसाठी येतात, तर इतर म्हणजे समाजातल्या खालच्या स्तरातले लोक छोट्या-मोठ्या नोकर्या आणि व्यवसायासाठी इथे येतात. याची कारणे अनेक आहेत. विदर्भातील लोक प्रामुख्याने इंदूर, भोपाळ, जबलपूर आणि छत्तीसगडमधल्या विलासपूर, रायपूर या भागात वरील सर्व कारणांसाठी स्थलांतरीत होतात. म्हणजे मूळ स्थलांतरीत आणि नव स्थलांतरीत असा मोठा वर्ग मध्य प्रदेशातील या शहरांत रहातो आहे. याशिवाय फार वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेली अनेक मराठी मंडळी मध्य प्रदेशातील अनेक गावागावांत रहात आहेत, ती वेगळी.
ही सगळी मंडळी (प्रामुख्याने फार पूर्वी स्थलांतरीत झालेली) इतकी वर्षे राहूनही मराठी राहिली आहेत का? तर मुळात मराठी रहाणे म्हणजे काय हे आधी तपासावे लागेल? भाषा या दृष्टिकोनातून विचार केल्यास महाराष्ट्रात बोलली जाते तशी मराठी इथे नक्कीच बोलली जात नाही. त्यातल्या त्यात एकुणात मध्य प्रदेशात इंदूरमध्ये बरीच बरी मराठी बोलली जाते. बरीच बरी हा शब्द गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही दृष्टीने लागू आहे. पण इंदूरी मराठी म्हणजे हिंदीची पोटबहिण मानायला हरकत नाही, इतकी त्यात सायुज्यता आहे. इंदूरी मराठीचे अनेक नमुने मी यापूर्वीच्या माझ्या लेखात आणि इतरांनी दिलेल्या दुव्यातही सापडतील. पण अनेक कुटुंबात पुढची पिढी प्रामुख्याने हिंदीत बोलते. याचे कारण आदल्या पिढीत किमान (इंदूरचा विचार केला तर) मराठी शाळा होत्या. त्यामुळे त्यांचे काही शिक्षण मराठीत किंवा मराठी विषय घेऊन झाले. तसे या पिढीत झालेले नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर मराठीचा कुठेही संबंध येत नाही. मैत्रिणी मराठी असल्या तरी एकुणात ग्रुप हिंदी असल्याने दोन मराठी मैत्रिणी हिंदीतच बोलतात. त्यांना हिंदीत बोलणेच जास्त कम्फर्टेबल वाटते. अनेकांना मराठी कळते, पण बोलता येत नाही. काहींचे आई-बाबा मराठीत, मुले हिंदीत आणि परस्परांशी बोलताना हिंदीतच बोलतात.
हे सगळं असलं तरीही ही मंडळी 'मराठीच' राहिली आहेत, भलेही ती हिंदी बोलत असली तरी. कशी? पहा. भाषा हा निकष लावला तर नक्कीच त्यांना 'मराठी येत नाही', 'तितके चांगले येत नाही' किंवा 'समजते पण बोलता येत नाही' अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. पण मराठी माणसांची गुणवैशिष्ट्ये मात्र त्यांनी उचलली आहेत. इथला मराठी माणूस व्यवसायात फारसा कुठेही दिसत नाही. इथला संपूर्ण व्यवसाय गुजराती आणि मारवाडी आणि उरलेला हिंदी भाषकांच्याच ताब्यात आहे. मराठी माणूस इथेही नोकरदारच आहे. शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने मराठी मंडळी नावाजलेली आहेत. बाकी इतर नोकर्यातही मराठी माणूस मोठ्या 'टक्क्याने' दिसून येतो. पत्रकारीतेतही मराठी नावे दिसून येतात. नई दुनिया या प्रमुख दैनिकाचे संपादक जयदीप कर्णिक हे तर चक्क मराठी आहेत. मुळात या दैनिकाचे एक गाजलेले संपादक कै. राहूल बारपुते (पुलंचे मित्र) मराठीच होते. याशिवायही अनेक मराठी भाषक हिंदी पत्रकारांची देदिप्यमान परंपरा इथे आहे.
मराठी माणसाची सांस्कृतिक आवड नि गरज इथेही तुटलेली नाही. इंदूरमध्ये तरी भरपूर मराठमोळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यासाठी महाराष्ट्रातून कलावंत तर येतातच, शिवाय इथेही मोठ्या प्रमाणात नाटके, गाण्याचे कार्यक्रम होतात. आधीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी नियमितपणे होतात ही महत्त्वाची बाब आहे. त्याला उपस्थित रहाणारी मंडळी चाळीशीच्या पलीकडे असतात. पण काही चुकार तरूणही दिसून येतात. सानंदसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठीपण हरवू नये यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यात नाट्य व एकांकिका स्पर्धेचा उपक्रम आहे. यात मोठ्या प्रमाणात मराठी तरूण जोडला गेला आहे. हा तरूण एरवी हिंदी बोलतो आणि कार्यक्रम मराठीत सादर करतो. (आश्चर्य वाटेल, पण डिश टिव्ही आल्याचा मोठा फायदा इथल्या मंडळींना झाला कारण समकालीन मराठी काय आहे ते त्यांना कळले. हल्ली इथल्या सर्व मराठी घरांत किमान सायंकाळी तरी मराठीच कार्यक्रम लागलेले असतात.)
पुरोहित परंपरा इथेही जपली गेली आहे. सगळे मराठी सण, समारंभ नियमित व्रतवैकल्ये इथला मराठी माणूस करतो. किंबहूना जास्त निष्ठेने करतो. माझी बायको या सगळ्या व्रतवैकल्यात फारशी सहभागी होत नाही, हे पाहून आमच्या घरमालकिणबाईंना आश्चर्य वाटते. बारशापासून बाराव्यापर्यंत कुठलेही विधी हिंदी पद्धतीने होत नाहीत. हिंदी भाषकांचा सांस्कृतिक व धार्मिक त्यांनी आपल्यावर पडू दिला नाही. म्हणूनच करवा चौथ मराठी भाषक महिला करत नाहीत. हिंदी भाषकांचा श्रावण आपल्याआधी पंधरा दिवस सुरू होतो. पण इथले मराठी भाषक श्रावण आपल्या पद्धतीनेच साजरा करतात. (उज्जैनला श्रावण सोमवारी महाकालाची स्वारी निघते.खास मराठी भाषकांसाठी ती इथल्या श्रावणाच्या पाचव्या आणि मराठी भाषकांच्या पहिल्या श्रावण सोमवारीही काढली जाते.) गणपतीला आलेले महाराष्ट्रातील उत्सवी रूप तसेच इथे दिसत नसेल, पण इतर शहरांपेक्षा इथला उत्सव डोळ्यात भरेल असाच असतो. स्वयंपाकात या भागातल्या पदार्थांनी शिरकाव केला असला तरी मुळचे मराठी पदार्थ सुटलेले नाहीत. इथल्या सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सर्व जातीसमूहात वाटला गेलेला मराठी माणूस सहभागी असतो. धनगर, मराठा समाजही इथे मोठ्या प्रमाणावर आहे ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
या झाल्या सार्वजनिक गोष्टी. वैयक्तिक किंवा खासगी बाबीतही हे मराठीपण तुटलेले नाही. हिंदी भाषक प्रांतात असल्याने आंतरजातीय विवाह हिंदी भाषकांशी होतात, पण हे प्रमाण तसे कमी आहे. प्रामुख्याने आपल्या भाषक जातीगटात विवाह करण्याकडेच इथल्याही बहुतांश पालकांचा कल असतो. त्यातही गंमत आहे. मुलगा किंवा मुलगी शक्यतो मध्य प्रदेशातीलच असावी यासाठी पालक बर्याचदा आग्रही असतात. कारण एकच, वातावरणाची सवय. मध्य प्रदेशातील एक विशिष्ट रहाणीमानाची सवय झालेली असते. महाराष्ट्रात मुलगी दिल्यास सगळेच वेगळे असाही विचार असतो. आता मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी महाराष्ट्रात गेल्यास या अटी गळून पडतात.
मराठी माणसांची याही पलीकडे असलेली गुणवैशिष्ट्ये इथल्या मराठी मंडळींनी जपलीत. 'चळवळेपण' सुटलेले नाही. स्वातंत्र्यसंग्रामापासून ते अगदी आताच्या सहकारी चळवळीपर्यंत आणि राजकारणातही मराठी माणसू एक्टिव दिसून येतो. मराठी माणसाच्या या सगळ्या सांस्कृतिक, सहकारातील, राजकारणातील आणि इतर चळवळीतील योगदानामुळे इंदूरमधल्या अनेक चौकांना, वास्तुंना मराठी माणसांची नावे आहेत. (होळकर विश्वविद्यालय, सरवटे बस स्टॅंड, देवळालीकर कलाविथिका, होळकर रूग्णालय, बापट तिराहा, वाकणकर पुरस्कार इ.अशी अनेक नावे सांगता येतील.) समाजिक कामात इथेही मराठी माणूस आघाडीवर आहे. मध्यंतरी देहदानासंदर्भात एक बातमी होती. त्यात देहदानाचे प्रमाण कमी अशी खंत व्यक्त केली होती. त्यात देहदान करणार्या दहा व्यक्तींची नावे होती. त्यात सहा मराठी होती. बाकीची जैन! इथल्या वृत्तपत्रात सामाजिक सुधारणेसंदर्भातील पत्रे छापून येतात, त्यातली अधिकांश मराठी माणसांनी लिहिलेली असतात. इथे मराठी वाचनालयेही बरीच आहेत, त्यांना सदस्यही बर्यापैकी आहेत. नवीन पुस्तकेही बरीच येतात. इतकेच नव्हे तर येथील लेखकांची मराठी पुस्तके प्रकाशितही होतात. अगदी तीन दिवाळी अंकही निघतात.
मराठी भाषकांच्या मोठ्या गटामुळे त्यांच्याविषयीच्या बातम्या इथे विपुल शब्दांत छापून येतात. त्यांचे सण-समारंभ, कार्यक्रम यांचे वृत्तांतही येतात. त्यांची दखल पेपरवाल्यांना घ्यायलाच लागते. अनेक पेपरवाल्यांनी आतले एक पान मराठीत द्यायला सुरवात केलीये. एवढंच काय आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून उभ्या असलेल्या एका उमेदवाराने या भागातली तेवढी पत्रके मराठीत छापली होती.
भाषा सुटली म्हणून इथल्या मंडळींनी संस्कृती सोडली नाही. उलट ती घट्ट धरून ठेवली. याची कारणे काय याचा मी अनेकदा विचार करतो. भाषा सुटल्याने सामाजिक अस्तित्व संपणार नाही, पण संस्कृती तुटली तर तेच गमावून बसू आणि इथल्या हिंदी भाषकांत इतके मिसळून जाऊ की आपण कोण याची ओळख आपल्यालाच पटू नये, ही जाणीव कदाचित इथल्या मराठी मंडळींमध्ये खोलवर रूजली असावी.भाषा टिकवणे, जपणे खरं तर ही वैयक्तिक आणि नंतर सामूहिक बाब आहे. त्यासाठी आपण किती आग्रही रहातो हे जास्त महत्त्वाचे आहे.
(ता. क. माझ्या इंदूरमधल्या एका परिचितांनी सांगितलं, इथे पूर्वी राजवाड्याच्या भागात किराणा मालाची बरीच दुकानं होती. अर्थातच गुजरात्यांची. त्यांच्याकडे मराठीत यादी घेऊन गेलो तरी ते सामान काढून द्यायचे. इतकच नाही, तर यादीतली एखादी वस्तू क्रमाने नसली तरी सांगायचे.' एवढंच काय माझ्या कॉलनीसमोरची दुकानंही सिंधी आणि गुजराती माणसाची आहे. तिथे कोकणातल्या कोकम सरबतापासून, चितळेंच्या मिठाईपर्यंत सारं काही मिळतं. यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो. जुजबी मराठी बोलायलाही ते शिकलेत. त्याला ही गिर्हाईकं टिकवून ठेवण्याची नि वाढविण्याची गरज असल्याने तो ही भाषा शिकला!)
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 5:05 pm | प्रकाश घाटपांडे
बर्याच वेळा जी गोष्ट आपल्या हातुन निसटत आहे ती धरुन ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. भाषा,तारुण्य. पैसा,सत्ता, सौंदर्य, आरोग्य वगैरे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
28 Jul 2009 - 6:16 pm | स्वाती दिनेश
लेख आणि त्यावरील प्रकाशरावांचा प्रतिसाद आवडला.
स्वाती
29 Jul 2009 - 12:16 am | चकली
लेख आवडला
चकली
http://chakali.blogspot.com
28 Jul 2009 - 7:08 pm | अनामिक
लेख आवडला.
-अनामिक
28 Jul 2009 - 7:10 pm | आनंद घारे
भोचकरावांनी इंदूरमधल्या मराठी समाजामधील वैशिष्ट्यांचे सविस्तर आणि सुंदर वर्णन केले आहे. माझे कांही आप्त इंदूरवासी आहेत. त्यांच्याबद्दल माझी जी संकल्पना आहे त्याच्याशी ते बरेच मिळतेजुळते आहे. भोचकराव हे स्वतः जुने इंदूरवासी आहेत की नवस्थलांतरित आहेत हे त्यांनी लिहिलेले नाही, पण त्यांच्या शुद्ध मराठी वरून त्यांनी मराठी भाषेचे शिक्षण घेतले असावे असे वाटते. त्यांनी इंदूरला इंदौर म्हंटलेले नाही.
भाषा हरवते म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज जी शुध्द मराठी भाषा लिहिली जाते ती घरात कोणीसुध्दा बोलत नाही. 'झाले', 'गेले' या शब्दांचा बोलतांना 'झालं', 'गेलं' असाच उच्चार असतो, पण तोसुध्दा 'झालम्', 'गेलम्' यापेक्षा वेगळा असतो. मालवण पासून गोंदियापर्यंत आणि डहाणूपासून सोलापूरपर्यंत महाराष्ट्राच्या सलग प्रदेशातल्या बोलीभाषेतसुध्दा प्रचंड फरक दिसतो. इतकेच नव्हे तर इंदूर, ग्वाल्हेर, सागर आणि जबलपूरचे मराठी भाषिक त्यांच्या बोलीवरून वेगळे वाटतात. तंजावर आणि मंगलोरला शहाजी महाराजांच्या काळापासून स्थायिक झालेले मराठी लोक आहेत. त्यांची मराठी बोली तर मलासुध्दा अगम्य वाटते. मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या बोलण्यात 'वट्ट', 'हुम्म' यासारखे कानडी शब्द यायचे, मुंबईतल्या गुजराथी लोकांच्या बोलण्यातून 'वांधा', 'सरस' यासारखे शब्द आले तर हिंदीमधून 'सही' (स्वाक्षरी नव्हे), 'मस्त' वगैरे शब्द. आता त्यांचा समावेश मराठीत झाल्यासारखाच आहे. माझ्या लहानपणी कायम तोंडात असलेले 'सदरा', 'विजार' हे शब्द आता कोणाच्या बोलण्यात येतच नाहीत.
थोडक्यात सांगायचे झाले तर भाषा ही स्थळकाळानुसार बदलत असते. इंदूर असो किंवा तंजावूर, मॉरिशस किंवा लॉस एंजेलिस, तिथल्या मराठी माणसाला आपण 'मराठी' आहोत असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो अंशतः का होईना पण आपली एक स्वतंत्र अशी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगदी दुसर्या टोकाला जाऊन पुण्यामुंबईत राहणारे पण संपूर्णपणे इंग्रजाळलेले महाभागसुध्दा क्वचित कधी दिसतात. त्यांना जर आपण 'मराठी' आहोत असे वाटतच
नसेल तर त्यांना मराठी भाषा येते की नाही याला फारसा अर्थ नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
29 Jul 2009 - 12:10 am | नंदन
लेख आवडला. प्रकाशरावांशी सहमत आहे. कुठल्याही ओळखीला (आयडेंटिटी) - सांस्कृतिक, धार्मिक वा अन्य - धोका निर्माण होतो किंवा तशी भावना असते, तेव्हा आपल्या मुळांना धरून ठेवण्याकडे अधिक कल असणे स्वाभाविक आहे. साठच्या दशकात तामिळनाडूत पेरियारांच्या प्रभावाखाली आपली हिंदू ओळख अमान्य करणार्या बहुजन समाजाचेच प्रतिनिधी जेव्हा श्रीलंकेत आपल्या धर्माला दुय्यम दर्जा मिळतो आहे म्हणून ती ओळख हिरीरीने मिरवतात; त्यामागचे कारण हेच असावे.
मद्रासमधल्या मराठी भाषकांचीही अशीच मानसिकता आहे हे मस्त कलन्दर यांनी लिहिलेल्या या लेखातील अनुभवावरून कळून येईल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Jul 2009 - 7:35 am | एकलव्य
हाच मुळात मोठा रोचक प्रश्न आहे. "नेतिनेति"चा नियम लावायचा झाल्यास अस्तित्व म्हणजे निव्वळ मराठी भाषा असे बिलकुल नाही. मराठी भाषेशिवाय मराठी माणूस ही मरणप्राय कल्पना वाटली तरीही निव्वळ भाषा येत नाही म्हणून 'तू मराठी नाय बां' असे म्हणून एनआरएमच्या पुढच्या पिढ्यांना हिणविणे योग्य होणार नाही.
आईवडील मराठीत बोलणार आणि मुले हिंदीत हा प्रकार दिल्लीतील मराठी मंडळीत (किंबहुना तसा तो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्याच ठि़काणी) आढळतो हे पाहण्यात आहे.
लेखातील इंदूर वर्णन आवडले... समाज चित्र आणि लेखकाचे विचार चांगले मांडले आहेत. धन्यवाद!
(इंदूरला जाण्याचा योग लवकरच साधायला हवा या विचारात गढलेला) एकलव्य
29 Jul 2009 - 9:34 am | श्रीयुत संतोष जोशी
परवा कविवर्य महाराष्ट्रभूषण श्री.मंगेश पाडगावकर ठाणे येथे आमच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना जेव्हा मराठी भाषेचे भवितव्य काय ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी छातीठोकपणे सांगितले
"की काही मूठभर लोकांच्या कारवायांमुळे मराठी भाषा मरणार नाही "
आणी हे सांगताना त्यांनी मध्य प्रदेशचेच उदाहरण दिले.
बाकी लेख छानच . मस्त जमलाय.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
29 Jul 2009 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी भाषा अजूनही इतर प्रातांत चांगली बोलल्या जाते, ही एक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट. सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकारणातही मराठी टीकून आहे, त्याचा घेतलेला धावता आढावा, आवडला.
भाषेत बदल हे साहजिक आहेत आणि असे बदल स्वीकारले पाहिजेत. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते.
-दिलीप बिरुटे
प्रतिसादाच्या बॉक्सची लांबी, लैच लांबल्यासारखी वाटते
29 Jul 2009 - 10:51 am | अ-मोल
लेख आवडला.
उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते.
शंभर टक्के सहमत. मराठीने सोवळेपणा सोडला, तरच तिची वाढ होईल.
29 Jul 2009 - 12:04 pm | JAGOMOHANPYARE
यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? मग ती यु पी वाल्याना कळणारच की, त्यात काय विशेष..
29 Jul 2009 - 1:33 pm | भोचक
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..?
जगमोहन प्यारे जी,
देवनागरी ही लिपी आणि या लिपीत मराठी, हिंदी, नेपाळी या भाषा लिहिल्या जातात. आपण संस्कृतही याच भाषेत लिहितो. अरगद म्हणजे काय आपल्याला माहित आहे काय? त्याला मराठीत तूरडाळ म्हणतात ! हा फक्त मासला. वाणसामानात अनेक वस्तू आहेत, ज्यांना हिंदीत 'कम्प्लिट' वेगळी नावं आहेत. वानगीदाखल माझा या विषयावरचा हा लेख वाचावा.
http://www.misalpav.com/node/4037
बाकी प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
29 Jul 2009 - 9:32 pm | धनंजय
छान लिहिले आहेत. पटण्यासारखे विचार सांगितले आहेत.
29 Jul 2009 - 10:23 pm | लिखाळ
लेख एकदम सुंदर.
भाषा आणि संस्कृती या बाबत विचार करता मला नेहमीच आज आसपास शहरी लोकांच्या तोंडी असणारी मराठी आणि त्यांचे वागणे विचारात टाकते. इंग्रजी, हिंदी मिश्रित बोलणे ते सुद्धा इंग्रजी लकबीने हे संस्कृती पासून दुरावणे आहे की वाढदिवसाला केक कापण्यासारख्या प्रथा (हे एक उदाहरण म्हणून) अंगीकारणे हे संस्कृतीपासून दूर जाणे आहे हे मला कळत नाही. आपल्या लेखात वर्णन केलेले लोक बोली वेगळी बोलत असले तरी रीती-रिवाजांना जास्त चिकटून आहेत आणि ते आशादायक आहे असा सूर दिसतो.
-- लिखाळ.
मराठी लँग्वेजचं फ्युचंर मध्ये काय होणार गॉड नोज !