एन्टरप्रेन्युअर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
31 Jul 2016 - 6:50 am

मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता.

पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले. इतके दिवस अर्धपोटी राहिलेल्या पक्षांना ही आयतीच मेजवानी होती. धुवाधार पावसाची मजा चाखल्यानंतर दैनंदिन जीवनाचे झटके-फटके सुरु झाले. जागोजागी उखडलेले रस्ते, त्यात साचलेली तळी, त्यातून वाहने जाताना बाजूच्या माणसांना फुकटात मिळालेले मड-बाथ! सगळी गंमतजंमत गच्चीवरून पहाण्यात वेळ मजेत जाऊ लागला.

अशात एकदा अंगणातली मोरी तुंबली आणि पाणी आजूबाजूला पसरले. आणि मग आठवले! हो “नेमेची येतो मग पावसाळा” मधले वार्षिक नाट्यप्रयोग आता सुरु झालेत!

लहानपणी, म्हणजे साधारण १९६०-६५ च्या सुमाराची गोष्ट. त्यावेळी घरासमोरील गल्ल्यांच्या कडेला उघड्या नाल्या असत. पावसाचे पाणी किंवा इतरही सांडपाणी त्यातून वाहून जायचे. त्या नाल्या तुंबू नये म्हणून साधारण रोज महापालिकेचा नाली-कर्मचारी येऊन साफ करायचा. रस्ते झाडणारा कर्मचारी वेगळा असायचा. त्या दोघांचे रोज एक मजेदार तू-तू मै-मै नाटक चालायचे. रस्ते झाडणारा रस्त्यावरचा कचरा चार-पाच घरांच्या मध्ये एकेका ठिकाणी गोळा करून ठेवायचा. कधी त्याला कंटाळा आला, तर सरळ नालीत ढकलून द्यायचा. त्याने नाही ढकलला, तर वारा किंवा पाउस तो कचरा उघड्या नाल्यांमध्ये सोडायचे काम करीत. मग कुठेना कुठे नाल्या तुंबायच्याच! नाल्या साफ करणारा आला की तो फावड्याने गाळ काढून रस्त्याच्या बाजूने लावून ठेवायचा. हा ओला गाळ आणि कोरडा कचरा ह्यावरून दोन्ही कर्मचारी अक्षरश: ढकलाढकली खेळायचे! नालीतला बाहेर, आणि बाहेरचा पुन्हा नालीत. ज्या दिवशी ओला व कोरडा हे दोन्ही कचरे नालीच्या कडेने रचून ठेवण्याचा मुहूर्त, गोळा करणाऱ्या गाडीच्या आगमनाशी जुळायचा तेव्हाच त्या कचऱ्याला मुक्ती मिळायची! नाहीतर कचरा नाली ते रस्ता ते नाली अश्या योनीमधून भटकत रहायचा!

पण ती जुनी गोष्ट झाली. आतापर्यंत नाल्यांमधून खूप पाणी वाहून गेले आहे. उघड्या नाल्या केव्हाच्याच जमीनदोस्त झाल्यात, आणि त्यांनी खोल कुठेतरी आपले मार्ग स्थापन केले आहेत.

तर काय सांगत होतो? एक दिवस अंगणातली मोरी तुंबली आणि पाणी आजूबाजूला पसरले. आणि मग आठवले! हो “नेमेची येतो मग पावसाळा” मधले वार्षिक नाट्यप्रयोग आता सुरु झालेत!

नाटकाचा रंगमंच असा- रस्ते, गल्ल्यांच्या दोन्हीबाजुनी बंगले, घरे वसलेली. प्रत्येकाच्या अंगणात भूमिगत असलेली सांडपाण्याची एकदोन चेंबर्स, आणि त्यांत घरातील सांडपाणी सोडलेले. चेंबरचे झाकण उघडून आतील गाळ काढून टाकता येईल अशी व्यवस्था. ही घराघरातील चेंबर्स आणखी खोलवर असलेल्या मेन सीवर लाईनला जोडलेली.

रोज अंगण झाडणाऱ्या माणसाला सांगितले, बघ काय झाले ते. मोरी कां तुंबली. मोरीच्या खालचे साफ करायचे असेल तर करून टाक. तो आणखी एका माणसाला घेऊन आला. गणवेशावरून पालिकेचा कर्मचारी असावा असे वाटले. “अरे वा! पालिकेकडून इतकी जलद सेवा!” त्याने मोरीच्या खाली पाहिले देखील नाही. सरळ मागच्या अंगणातले मेनचेंबर उघडून दाखविले की आतली पाण्याची पातळी खूपच वर होती. त्यामुळे मोरीतले पाणी चेंबरमध्ये न जाता अंगणात पसरले होते! मी विचारले, “म्हणजे हे चेंबर साफ करावे लागणार आहे का?”
“पहावे लागेल साहेब. इथे असेल, किंवा खालच्या अंगाला लाईन मध्ये कुठेतरी तुंबले आहे. पैसे तर पडतीलच साहेब.”
“हे पहा, जर आमच्या अंगणातले चेंबर साफ करून काम झाले, तर देईन ना मी. पण मेन लाईन तुंबलेली असेल तर मी कशाला खर्च करू?”
सामान्य तर्क आपल्याला सांगतो, की आपल्या घरातील चेंबर्स साफ ठेवायची आपली जबाबदारी, व मेन लाईनची चेंबर्स साफ ठेवायची महापालिकेची जबाबदारी.

“ते अस नसतं साहेब! इथलं, तिथलं, कुठेही साफ करावं लागलं की पैसे तर द्यावेच लागतील नां! आम्हाला देखील सगळीकडे जाऊन पहावं लागतं. बाहेरची दोन तीन चेंबर्स आहेत. नेमके कुठले उघडायचे, काय झाले ते सगळे पहावे लागते साहेब. काम तर पडतेच नां?”

माझ्या डोक्यात आता हळूहळू प्रकाश पडू लागला होता. Entrepreneurship was at play here! पूर्वी फुकटात तू-तू मै-मै नाटक दाखवणारे कर्मचारी आता एन्टरप्रेन्युअर झाले आहेत. पालिकेत चार आकडी पगाराची नोकरी करून सरकारी वेळेत नुसते फुकट नाटक न दाखविता तो वेळ सत्कारणी लावून स्वत:चा उद्योग धंदा करायला शिकले आहेत!

घरात रिनोव्हेशनचे काम झाले. मलबा बाहेर टाकला होता. रस्ते झाडणाऱ्या माणसाला सांगितले, एखादा ट्रकवाला पाहून त्याच्याकडून उचलून घे. त्यानेही अगदी रक्कम ठरवून म्हटले की ट्रकवाला पाठवतो साहेब. आणि प्रत्यक्षात महापालिकेचे नांव ठळक लिहिलेले पोकलँड़ मशीन तिथे आले, मलबा यांत्रिक हाताने गोळा करून महापालिकेच्याच ट्रकमध्ये भरला. पैसे मी ठरल्याप्रमाणे झाडूवाल्यालाच दिले! म्हणजेच, सरकारी मशीन वापरून एन्टरप्रेन्युअरचा धंदा सुरु होता! सगळ्या क्षेत्रात सरकारी कामगारांची एन्टरप्रेन्युअरशिप जोरात आहे. वर्गात जेमतेम शिकवून खाजगी शिकविण्यात पैसे कमावणारे शिक्षक, RTO मधील कामे अडवून खाजगीत ताबडतोब करणारे कर्मचारी, मालमत्तेची नोंद करण्यात अडवणूक करून बाहेरून ते काम करवून देणारे कर्मचारी, आणि किती उदाहरणे द्यावी? भारतात एन्टरप्रेन्युअरशिप जबरदस्त आहे! सहावे, सातवे, आठवे पे कमिशन ही दुधावरची पातळ साय आहे! घट्ट मलाईदार दुध लोकांकडून पिळून काढले जात आहे. लोक देखील, घरबसल्या खात्रीची सेवा मिळते म्हणून करवून घेतात. ह्यातून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशाविषयी न बोललेलेच बरे!

माझ्याकडे मोरी तुंबल्यावर option काय होता? महापालिकेत तक्रार नेमकी कोठे करायची ते शोधण्यापासून, तर आपण तेथे जाऊ तेव्हा तक्रार घेणारा नेमका बाबू कोणता ते शोधंत, मग त्या विशिष्ट बाबूला पानठेल्यावरून पकडून आणू? आणि तो तरी काय, फारफार तर फक्त तक्रार नोंदवून घेणार, आणि “हां हां, होऊन जाईल साहेब” असे आश्वासन देणार. मग मी पुन्हापुन्हा कार्यालयात जाऊन जाऊन बाबूला हलवू? कां अनेक दिवस अंगणातले सांडपाणी सहन करु? त्या ऐवजी, निदान गणवेशधारी माणसाने मला घरबसल्या समस्येचे निवारण होईल असा विश्वास दिला होता! आणि हो! पुन्हा तुंबणार नाही अशी आठवड्याची warranty देखील देत होता!

मी कोणता option निवडला असेल हे ओळखण्यासाठी काहीच बक्षीस नाही! त्याचे उत्तर वादातीतच आहे!

मात्र त्याने सांगितलेली रक्कम मी मान्य केल्यावर तो आजूबाजूंच्या घराघरात हिंडून घरमालकांशी कसल्या वाटाघाटी करत होता, आणि त्यातून त्याने ह्या नाटकाची किती बिदागी घेतली असेल, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. आणि त्याही पेक्षा जास्त वादग्रस्त म्हणजे, मेन लाईनचे चेंबर तुंबण्याचे नेमके कारण काय असेल? मला मात्र उगाचच १९६० मधला नालीत कचरा ढकलून फुकटात नाटके दाखविणारा तो कर्मचारी आठवला. ५०-६० वर्षात दुसरे काही असेल, नसेल, पण माणसे उत्तम एन्टरप्रेन्युअर बनली आहेत हे नक्की!

धोरणवावरसंस्कृतीनाट्यमुक्तकविडंबनसमाजजीवनमानराहणीऔषधोपचारप्रवासदेशांतरराहती जागाअर्थकारणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

31 Jul 2016 - 6:56 am | मुक्त विहारि

लेख आवडला.

एस's picture

31 Jul 2016 - 7:17 am | एस

अगदी खरे.

शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

संदीप डांगे's picture

31 Jul 2016 - 9:15 am | संदीप डांगे

छान लिहिलंय

स्पा's picture

31 Jul 2016 - 9:42 am | स्पा

सातवा वेतन आयोग मजेत खाणार्यांचे मत जाणून घेण्यास उत्सुक

अमितसांगली's picture

31 Jul 2016 - 9:43 am | अमितसांगली

चांगल लिहिलय...आवडल.....

सामान्यनागरिक's picture

31 Jul 2016 - 10:02 am | सामान्यनागरिक

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

अगदी अगदी आता ते बाईक च्या धाग्याबर अँक्टिव असतील

- स्पाबापु

बोका-ए-आझम's picture

31 Jul 2016 - 6:32 pm | बोका-ए-आझम

सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

नाखु's picture

1 Aug 2016 - 9:24 am | नाखु

म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे.

चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

किसन शिंदे's picture

31 Jul 2016 - 10:25 am | किसन शिंदे

या सगळ्या खाबूगिरीमुळे वैतागलेला आमचा एक मित्र भारत सोडण्यासाठी नुसता घाईवर आलाय. :)

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2016 - 10:51 am | टवाळ कार्टा

वैयक्तिक प्रतिसाद

चंपाबाई's picture

31 Jul 2016 - 6:56 pm | चंपाबाई

जा म्हणावं

अमितदादा's picture

31 Jul 2016 - 7:36 pm | अमितदादा

बरोब्बर...

सर्वसाक्षी's picture

31 Jul 2016 - 11:34 pm | सर्वसाक्षी

वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते

पैसा's picture

1 Aug 2016 - 6:04 pm | पैसा

धन्य! आपण अगतिक आहोत.