गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
12 Apr 2015 - 12:55 am

मागिल भाग..
जिन्याच्या पायर्‍या चढू लागलो..
पुढे चालू...
==================================

अर्थातच हा जिना मी प्रथमदर्शनी जरी एका इमारतीचा चढत असलो,तरी मनामधे जी चढण सुरु झाली होती, ती एका व्यवसायिक वटवृक्षाची होती..याचा मला तेंव्हा अंदाजंही आलेला नव्हता. काय आहे ना? की कुठल्याही नोकरीधंद्यात प्रथम प्रथम माणासाला सशाची कातडी प्राप्त झालेली असते. प्रत्येक नविन गोष्ट करताना तो घाबरतो,चाचपडतो..हे करु की नको? चुकेल की बरोबर येइल? हे असच-असतं का? असले ढीगभर प्रश्न त्याला पडतात. शिवाय सिनियरांचे यावर मत काय असेल?/पडेल? ही पण भिती सारखी मनात वास करून असते. पुढे जरा सरावल्यावर दुसरी कातडी प्राप्त होते..ही इमानदार कुत्र्याची कातडी होय! आपल्या हताखालच्या माणसापासून ते वरच्या बॉस माणसा पर्यंत आणि फुटकळ गिह्राइकापासून ते उपयुक्त ग्राहका पर्यंत प्रत्येकाशी तो इमानानीच वागतो...परिणाम कसेही मिळाले अगर झाले...तरी! पण ही कातडी पहिल्या तीन वर्षांपेक्षा अधिक टिकत नाही..मग तो वृत्तीनी हमाल असो अगर ठेकेदार! मग या इमानाचे परिपूर्ण फल प्राप्त झाल्यावर चिडून जाऊन तो ती कातडी फेकतो..आणि मग तो जी कातडी प्राप्त करवून घेतो,ती असते सिंव्हाची!...हे एक प्रकारचं बेफिकिर बादशाहीपण असतं. मग त्यात प्रत्यक्षातलं राजेपण मिळो अगर न मिळो..दोन्ही पैकी काहिही एक घडत राहिलं, तरी ही कातडी गळून पडे पर्यंत त्याच्या अंतरात्म्याला आपण सिंव्हच असल्याचा आभास, हा सतत होत असतो. (ही तत्वात विजयी आणि व्यवहारात बर्‍याच प्रमाणात अपंयश देणारी कातडी..आणि हे हीचे मूलंभूत वैशिष्ठ्यही!) अर्थात त्याच्या डरकाळीचा आतला आवाज त्याला शौर्याच्या एकंदर परिणामाच्या गोष्टी सांगायला लागला की मग त्याला ही कातडी सुद्धा अत्यंत नाराजीनी सोडून देणे भाग पडतेच. आता यानंतर मात्र जी कातडी प्राप्त होते ती कातडी साधी नाही..अतिशय कष्टानी आणि बलपूर्वक ती पुढे कायमस्वरुपी धारण करून ठेवावीच लागते..,मग तुम्ही या कातडीच्या आधारे आर्थिक यश मिळवा अथवा सोडा..या कातडीला त्याच्याशी काहिही देणेघेणे नसते..ती कातडी असते गेंड्याची!!! ह्या कातडीचा एकमेव प्रमुख गुणंधर्म म्हणजे, हीच्यावर बाह्य घटकांचा यत्किंचितंही परिणाम होत नाही!!! अगदी उन्हा पावसात थंडी वार्‍यातंही ही समुद्रातल्या कठीण पाषाणाप्रमाणे निश्चल...अविचल असते. तर ..सदर वर्णन केलेल्या चारही अवस्थां मधल्या..तेंव्हा आंम्ही प्रथमावस्थेत होतो..हे उघड आहे! अर्थात..आमच्यासारख्याला यातल्या पहिल्या तीनच कातडी प्राप्त होतात..आणि चौथी केवळ बाह्यमनाला लाभते! असो!

तर ..या व्यावसायिक देहधारणेचं रोकड प्रत्यंतर चवथ्याच दिवशी याच शिराळशेटमिशी गुरुजिंकडे मी कामाला गेलेलो होतो...तेंव्हा आलं. तिथे बरोबर गोंद्या असल्यानी फार भय नव्हतं.पण गोंद्या मेला स्वतः एक रन काढून सारखा मला फ्रंटवर पाठवे..त्यामुळे माझं आवसान गळलेलं..आणि तश्यातच त्या गुरुजिंनी मला ...
(प्रसंग रूपरेषा:- नवग्रह शांती'च्या कार्यक्रमात.. माझ्या समोर एक पाट,त्यावर घालायचा पंचा ठेवलेला,बाजुला २किलो तांदुळाची पिशवी,आणि एका भांड्यात ५० सुपार्‍या..असे साहित्य ठेवलेले आहे ..अश्या साहित्यासह नवग्रह ह्याच दिशेनी मांडू की त्या? , या चिंतेत मी भांबावून बसलेला आहे...गोंद्या आणि ते शि.मि.गुरुजी मागे पुण्याहवाचन..नावाची सुरवातीच्या पूजेची मांडणी करत बसलेले आहेत..आणि मी मख्खपणे क्रीयाहीन बसलेलो आहे असं वाटून त्यांनी पहिला बॉडीलाइन चेंडू टाकलेला आहे..............................!)

शि.मि.गुरुजी:- आहो आत्मंभट..काय करायचं ठरवलयत तिथे बसून???

मी:- ....................... (चेंडू वाकून सोडून दिला!)

शि.मि.गुरुजी:- आहो...काय काय केलं....म्हणजे नवग्रह मांडले जातील..असं वाटतं तुम्हाला??? (हा यॉर्कर!)

मी:- ............ (त्रिफळाचीत!)

शि.मि.गुरुजी:- बरं!!! आता असे करा..ते जे आपल्या समोर लाकडाचे आयताकृती फळकूट ठेवलेले आहे..त्यावर तो पंचा घाला...आणि तेथे तांदूळ ओतून त्याच्या अष्टदलात ...बेचाळीस सुपाय्रांचा वापर करून असे काहि तरी चितारा...जेणे करुन त्याचे दर्शन घेणाय्रा प्रत्येकास ते नवग्रह नसल्याची शंका येऊ नये!

मी:- ........................ (सदर वचनांमुळे मेंदूत योग्य जागी चावी बसून..प्याड बांधुन परत खेळायला सुरवात..)

शि.मि.गुरुजी:- व्वाह...व्वाह..कळले की आपणास...खरेच हुश्शार वाटता! छान मांडताय आता..मांडा हो मांडा..चहा पाठवू का?

मी:- .................

वरील ऑपरेशन ब्लू स्टार मधे माझी कोंबडी झालेली पाहून हा गोंद्या मेला हरामी तिकडे बेजान हसत होता. आणि मी मात्र काहिसा धुसफुसून आजुबाजुच्या हसणार्‍या पब्लिकला उत्तमरित्या नवग्रहांची मांडणी करून(दाखवून..) करारा जवाब देण्याच्या बेताला आलेला होतो. शेवटी एकदाचे ते नवग्रह मांडून झाले.. त्याचे आवाहन पूजनंही अगदी बीनचूक पार पाडले. काम संपल्यावर मी मोठ्या खुषीत पदार्पणातच हाफ सेंचुरी मारल्याच्या भावनेनी पायर्‍या उतरत त्या इमारतीतून गोंद्याबरोबर खाली येत होतो..पण तेव्हढ्यात मागून त्या गुरुजींची हाक आली..अरे पोरांनो, जरा वर या..आणि ह्यातल्या दोन पिशव्या-वळा जरा रिक्षापर्यंत. या आज्ञार्थी विनंतीला जागून गोंद्या लगेच वर गेला. मी मात्र तसाच खाली थांबलो. शेवटी ते गुरुजी ,गोंद्या आणि यजमानाचा मुलगा असे तिघे एकेक पिशवी घेऊन खाली आले. आणि रिक्षात बसता बसता शि.मि.गुरुजिंनी एक अखेरचा कडक चेंडू मला टाकलाच! "कोकणातल्या रणजी संपल्या,आता इंटरन्याशनल खेळायला आलायत हो आत्मंभट! लक्षात ठेवा..जमले तर! "

या शि.मि.गुरुजींकडनं आंम्ही सर्वच तरुण पुरोहित अनेक गोष्टी शिकलो. या माणासाची भाषा प्रसंगी अश्लील,फाटकी, बिभत्संही व्हायची. पण असायची मुद्देसूद. त्यांचं पत्ता सांगणं हा ही एक बाकिच्यांसाठी तुफान विनोदी आणि पत्ता घेणार्‍यासाठी एक (खर्‍या)शिक्षेचाच कार्यक्रम असायचा. त्यातंही कामाचा पत्ता घेणारा पुरोहित बिनडोक प्रजातीतला असला,की त्या पत्ता सांगण्याला आणखिनच बहार येइ..म्हणजे शनिपारा जवळचा पत्ता असेल..तर ते लिखित पत्ता देऊन झाला की सदर पुरोहिताला, 'तेथे कसे पोहोचावे? हे कळलेले आहे का नाही?' हे ते विचारत..आणि एकदा तो नाही म्हणाला की मग म्याच सुरु...

ते:- किती वर्ष झाली आपणास पुण्यात येऊन
सहकारी पुरोहित:- नऊ महिने तेरा दिवस
ते:- अरे व्वा! म्हणून आलात होय आमच्याकडे नाळ कापायला..नशिबच म्हणायचं तुमच्या जन्मदात्याचं. बरं! सध्या कुठे रहाता आपण?
स.पु:- कोथरूड..
ते:- बाजीराव पण तिकडेच असे पुण्यात नविन नविन आला तेंव्हा..तर आपण असं करा.. उद्या सकाळी तुमच्याच घरातनं स्नान करून तुमच्या गाडी जवळ या ..आणि ती सुरु करून तिच्यावर बसापण हं!!! तिथून डेक्कन पर्यंत न थांबता या
स.पु:- डेक्कन मंजे कुठे?
ते:- मृत्युंजय मंदिर ठाऊक आहे का आपणास?
स.पु:- हो..
ते:- चला...नशिब त्या शंकराचं..तर मृत्युंजयापाशी आलात..की तिथे सकाळी सकाळी फुटपाथवर पेन्शं'नरं फिरताना दिसतील.........त्यांना विचारु नका...झोप झालेली नसते त्यांची!... त्यांच्या आजुबाजुला पेपरवाला असला ना एखादा..,तर त्याला विचारा..तो बिचारा मुळात समाजसेवकच असल्यानी तुम्हाला डेक्कन-सांगेल..मग डेक्कनच्या चौकात आलात की उजविकडे लकडीपुलावर वळा.. त्यावरुन अलका टॉकिज चौकात याल...
स.पु:- अलका टॉकिज चौक म्हायत्ये!
ते:- हं...........................! डेक्क्न लक्षात नै रहात्,आणि अलका टॉकिज मात्र कळतं!!! लक्षणीय प्रगती झाल्ये हो नऊ महिन्यात.. त्या अलका टॉकिजा समोरच्या रस्त्यानी सरळ या...पुण्यात अनेक वर्ष राहिलेली लोकं त्या रस्त्याला गाढवपणानी कुमठेकर रोड म्हणून ओळखतात..तो रोड संपला...
स.पु:- संपला म्हणजे???
ते:- आपण गाडीवरनं समोर जाऊन धडकतोय ..असं वाटलं..की उजवीकडे वळा..तिथे चितळ्यांचं दुकान आहे..बरीच वर्ष चालू आहे अजुन..मधून मधून बाकरवडी आणि दूध विकतात ते..फावल्या वेळेत गिह्राइकांना दुकानात आत घेतात... त्याच्या पलिकडे एक मध्यभागी देऊळ दिसेल... तोच शनिपार हो!
स.पु:- पण देवळावर नावाची पाटी आहे का तशी?
ते:- नैय्ये हो नैय्ये! पण मी आज घरी जाता जाता लावायला सांगणारे पुणे महानगर पालिकेला..उद्या आपण येणार ना.. तिथे!!!?
स.पु:- (भानावर येऊन..) नै पण मी दगडूशेठ गणपतिची कशी दिसते? किंवा त्यांच्याच दत्त मंदिराची..त्यावरुन तसं विचारलं.. :(
ते:-(बाकिच्यांकडे पाहून!) हां...पहा! ब्रम्हवृंदं हो ..पहा.. दगडूशेठ आणि त्यांचं दत्तमंदिरपण म्हायत्ये..पण शनिपार नै..आहेत कि नै विद्वान? आमच्याच कर्माला येतात ही अशी.. पण काय हो? दत्तमंदिर-नुसतच म्हायत्ये का?
स.पु:- (काहिच न कळल्यामुळे..) .........................
ते:- नै...विशी बाविशीतले दिसता,म्हणून विचारलं!
स.पु.:- (परिपूर्ण अनभिज्ञतेनी..) ..................
ते:-खरच नविन आहात हो पुण्यात..किमान जुन्या पुण्यात तरी! असो! तर... चितळ्यांच्या दुकानापाशी आलात ना? की ते देऊळ दिसल्यावर शनिपार...शनिपार..असं तिनचार वेळा ओरडा! मग तुम्हाला कुणितरी हाताला धरून , त्या शनिपारा समोरच्या लोकंसंपत्ती-समं-कारक समाजसेवकांच्या रांगेत नेऊन बसवेल...
स.पु:- ( यातला , लोकंसंपत्ती-समं-कारक समाजसेवक .. हा चेंडू डोक्यावरून गेल्यामुळे..) .....................
ते:- भिकारी म्हणातात हो त्यांना आपली लोकं...कुस्तित असातात नै का हो? असू देत त्यांना .. तर त्या रांगेत नेऊन बशिवलं..की ज्या देवळाबाहेर तुम्ही असाल तो शनिपार.. बरं का? मग त्या रांगेतून उठून शनिकडे पाठ फिरवलीत..की डाव्या हताच्या चवथ्या इमारतीत छत्तीस पायय्रा चढून वर आलात..की डाविकडे एक निळं दार दिसेल.. तिथेच या!
स.पु.:- हो...येतो बरोबर..
ते:- नुसते बरोबर नका येऊ...सकाळी आठला पण या हं!

आंम्ही आजुबाजुची मंडळी बेजान हसत असायचो..आणि तो गरीब बिचारा नवपुरोहित..थरथरत्या कातडीनी त्यांच्या समोरुन पत्ता घेऊन उठायचा!
..................................................................................

या असल्या सगळ्या वातावरणात ते पहिले पंधरा दिवस संपत आलेही..आणि मला माझ्या मित्रांकरवी व त्या गृहस्थांकरवी अगदी पुण्याच्या त्याकाळी असलेल्या बालेकिल्ल्यात एक दोन भाड्याच्या जागाही दाखविण्यात आल्या. त्यातली एक जागा फायनल करून..मी हतात मिळालेले सगळे पैसे त्यात गुंतविले.. आणि हा श्रावण ते गणपतिचा हंगाम कसा जातो या विचारात आयुष्यात भाड्याच्या का होइ ना? पण स्वतःच्या पहिल्या वहिल्या घरात रहायला लागलो. मग आवश्यक त्या प्राथमिक संसारी वस्तूनी घर भरायला सुरवात झाली.आणि बघता बघता गॅस,कपाट्,कॉट,मांडणी,भांडी ,झाडू,बादल्या,किराणासामान.. अश्या तर्‍हतर्‍हेच्या वस्तू घेतल्या जाऊन त्या दोन खोल्यांचं अगदी गृहमंदिर व्हायच्या बेताला आलं. घरात एका फळीवर कुलदेवतेचा फोटोही आला..त्याच्या शेजारी माझा प्राणसखा एक कॅसेट प्लेअर विथ रेडिओहि आला. पण तरिही काहितरी अपूर्ण अपूर्ण र्‍हायल्या सारखं वाटतच होतं. आणि एक दिवस संध्याकाळी पाचच्या बेताला कामावरून येऊन ,कुलुप काढतो नाहि तोपर्यंत वरून हाक आली.. "अहो गुरुजी...या जरा पाच मिनिटं वरती" . घरमालकिणीची हाक! मी अंदाजानीच जाणलं. त्यात आपण पुण्यात रहायला आलोय हे भय मिसळलं. आणि या शहराबद्दलच्या तरतर्‍हेच्या ऐकिव घटनांचे स्मरण करत मी वरती पायर्‍या चढून त्यांच्या घरात गेलो.. मला टेबल फॅन कडेच्या श्टुलावर स्थानापन्न करत त्या वयस्कर मालकिणीनी पहिल्यांदा माझ्या हतात, पाणि आणि चहाचा कप दिला. मी चाटच पडलो..ज्या शहरा बद्द्लचे अनेक विनोद "चहा सुद्धा विचारूनच देतात.." या वाक्यानी सुरु होतात,त्याच्या एकदम उलट सर्व्हिस आली हो ही!

पण तरिही ही मिळालेली सर्व्हिस म्हणजे, "पुढील दोन महिन्यांनंतर अचानक आलेली भाडेवाढ..अथवा, डिसेंबरात नविन जागा पहा" अश्या भावं-पूर्ण वाक्यांची पूर्व तयारी आहे की काय? असं वाटत राहिलच. पण तसं काहि नव्हतं. मला त्या माऊलिनी 'कुठुन आलात,लग्नबिग्न झालय ना? मग आता बायको केंव्हा येइल इकडे?' असे साधेसेच प्रश्न विचारले. आणि वर पुन्हा मला 'घरात हतानी जेवण तयार करायचा कंटाळा आला,तर हक्कानी येत जा हो जेवायला..माझ्याबरोबर मुठभर तांदुळ तुमचेही टाकिन जास्तीचे!' असं अगदी प्रेमानी सांगितलन. मग बाकिच्या काहि गप्पा मारून मि ही परत खाली उतरलो...आणि घरात शिरल्या शिरल्या उदबत्ती सारखा बारीक रेडिओ लाऊन खाटेवर पहिला आडवा पडलो. एकतर हा सिझन जितका दमवणारा तितकच हे आमचं पौरोहित्याचं कामंही शरिराबरोबर मेंदू खाणारं.त्यामुळे ते जडावलेलं डोकं,त्या रेडिओ वरच्या वृत्तनिवेदका पासून ते गाणी-लावणार्‍या निवेदिके पर्यंत,कोणाच्याही नुसत्या पहिल्या शांतनदीप्रवाहासारख्या आवाजानी देखिल क्षणात हलकं व्हायचं. "संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले आहेत.आपण आकाशवाणीचं पुणे अ केंद्र ऐकत आहात . काहि वेळातच ऐकू या मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम , स्वरंगंगा!" हे कानी पडतानाच पहिली पाच मिनिटं शांत झोप लागल्याचा भास व्हायचा. आणि मग पुढे "दिनं तैसी...ही रजनी.. " असलं एखादं गीत सुरु झालं..की त्या क्षणनिद्रेचं मेंदुला ताजं करणार्‍या ऊर्जेत रुपांतर व्हायचं . आणि मग मी खाटेवरनं ताड्कन उठून कुकर लावायच्या कामाला लागायचो. आणि कुकरच्या योग्य तेव्हढ्या शिट्ट्या उडाल्या, की लगेच ग्यास बंद करून आमच्या भटजी अड्ड्याकडे रवाना व्हायचो. हा रोजचा परिपाठ सुरु झाला.तिथे मात्र रोज हजर असणे ही केवळ कामं मिळण्याचीच नव्हे..तर बाकिच्या लोकांना आपला अ‍ॅटेंडन्स दाखविण्याचिही गोष्ट असायची. त्यामुळे (ब्रम्हवृंद)मंडळात सलग दोन दिवस जरी दिसलो नाही..तरी पुढे ज्यांची कामं स्विकारली आहेत,असे इतर गुरुजि लोक तिसर्‍या दिवशी लगेच (व्यावसायिक) आस्थेनी चौकशी करायचेच. " काय हो आत्माराम...? नै...दिसला नैत दोन दिवस?आंम्हाला वाटलं..सीतेला आणायला गावालाबिवाला गेलात की काय?....(आमची कामं सोडून!)"

पण खरच हो...हा असला प्रश्न कुणी विचारला मला..की मग मात्र मी विलक्षण भावूक व्हायचो. एकतर नवख्या माणसाला ह्या शहरात स्थावर होणे सोपे,परंतू स्थिरं होणे सहज नाही. अशी काहिशी अवस्था! त्यातच त्या रहात्या वाड्यातंही अजुन नविनतमंतेचा भाव मझीया मनातच न संपलेला! त्यामुळे कितिही नाही म्हटलं,तरिही ते एकाकी पण यायचच खायला अंगावर अधुनमधुन. तसाहि मी दर पंधरा दिवसाला रात्री १० नंतर बाहेरच्या एका S.T.D बूथवरुन घरी फोन करत होतोच. पण प्रत्येकाशी मोजून साधारण दोन ते तीनच मिनिटं बोलावं लागे.. ,तेंव्हा कुठे वीस रुपायाच्या ठरलेल्या हिशेबात सगळ्यांशी एकदा बोलुन होई. त्यामुळे हे मोजकं संवादी सलाइन त्या रात्रीपुरतच मनाला काहिसं चैतन्य पुरवित असे. दुसर्‍या दिवशी स्नानानंतर अंग पुसताना एकदा व्यवसायाचे विचार मनात डोकावू लागले,की देहाबरोबर मनंही परत कधी कोरडं होई ते कळत नसे. आणि अश्यातच पहिले चार महिने उलटले..आणि नवरात्रातल्या घरोघर जाऊन सप्तशती एके सप्तशतीवाचनाच्या त्रासदायक माय्राला कंटाळलेल्या मनानी..मी दसर्‍या नंतर दिवाळी पर्यंतसाठि सुट्टी घ्यायचं मनानी निश्चित केलं. तसाही दसरा ते दिवाळी हा आमचा बर्‍यापैकी स्लॅक सीझन . त्यामुळे व्यवसाय बुडवुन जाणे हे त्यात नव्हतच. त्यातच डिपॉझिटचे आणि सहा महिने अगावू भाड्याचे पैसे जाऊनंही घरातल्या सगळ्या वस्तूंचा खर्च सुटूनंही माझ्या हतात चांगले भरपूर पैसेही शिल्लकीला पडलेले होते. ही पण एक जमेची बाजू होती. मग दसर्‍याच्या दुसर्‍याच दिवशी,बाजरपेठेतून काकासाठी एक बिग अमरेला,आईसाठी साडी ,आज्जीला एक बटवा आणि हिच्यासाठी फोनवर शेवटच्या एक मिनिटात हीनी हळुच सांगितलेलं एका ठराविक दुकानातलं,ठराविक रंगाचं आणि अंगाचं ड्रेस मटेरिअल.. असं घेऊन.. मी दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या पहिल्या येश्टीनी गावाकडे निघालो..
==========================================
क्रमशः ...
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७..

समाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Apr 2015 - 1:17 am | यशोधरा

भाग ३९ लौकर येऊदेत हो! :) भेटवस्तू आवडल्या का घरी? आणि ठराविक ड्रेम ठराविक व्यक्तीला आवडलं का ते आधी सांगा!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Apr 2015 - 1:32 am | अत्रुप्त आत्मा

@आणि ठराविक ड्रेम ठराविक व्यक्तीला आवडलं का ते आधी सांगा!>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif सांगतो सांगतो... http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png पुढल्या भागात प्रयत्न करतो. पण ते पात्र अजुन माझ्याशी फारसं बोलतं होतच नैय्ये... http://www.sherv.net/cm/emo/sad/sad.gif

हाहाहा! होईल हो होईल. जरा दम धरा! ड्रेम पसंतीला उतरले की मग गाडी सुरू होईल! :-)

पॉइंट ब्लँक's picture

12 Apr 2015 - 6:48 am | पॉइंट ब्लँक

अगदी अगदी! बाकि लेखन आवडले आहे. :)

स्पा's picture

12 Apr 2015 - 7:22 am | स्पा

=))

पत्ता सांगण्याचा आणि नवग्रहाचा प्रसंग पाहुन भयाण खपल्या गेले आहे

अगागा, मेलोच

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Apr 2015 - 9:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

.तिथे चितळ्यांचं दुकान आहे..बरीच वर्ष चालू आहे अजुन..मधून मधून बाकरवडी आणि दूध विकतात ते..फावल्या वेळेत गिह्राइकांना दुकानात आत घेतात..

सदेह स्वर्गारोहण झालेले आहे ;)

३९ लवकर येउंद्या.

मग पुढे काय झालं? पुभालटा!

प्रियाजी's picture

12 Apr 2015 - 3:54 pm | प्रियाजी

मस्त!मस्त! माझी आवडती लेखमालिका. तुमची स्टाईल लई भारी. पुढ्चा भाग कामातून वेळ काढून लवकर टाका.

प्रचेतस's picture

13 Apr 2015 - 11:38 am | प्रचेतस

तुमच्या भावंविश्व लेखमालेतले संवाद लै भारी असतात. मजा येते वाचायला.

नाखु's picture

13 Apr 2015 - 12:18 pm | नाखु

सांगताना बत्त्या गुल करायची ष्टाईल लै खास म्हणजे लै खास.

सूड's picture

13 Apr 2015 - 3:55 pm | सूड

आमच्या ओळखीचे एक अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून जाणारे भटजी आहेत, त्यांनीही मला एकदा कसबा पेठेतून पुणे स्टेशनकडे जायचा रस्ता याच पद्धतीने सांगितला होता. हे शि मि गुरुजी म्हणजे तेच तर नव्हेत?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

असोच्च असो!

बॅटमॅन's picture

13 Apr 2015 - 4:49 pm | बॅटमॅन

हाण तेजायला. खत्तरनाक पत्ताकथन!!!! पत्ता-कटनच म्हणायला पाहिजे होते खरेतर =))

बाकी हुरहुरीचे कथनही खासच हो!