गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २१

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
16 Jan 2015 - 10:51 am

मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २०
धर्माचं रसायन, मनुष्य जातीकडून काय काय करवून घेऊ शकतं?,त्यातल्या चांगल्या मूल्यांची..माझ्यासमोर त्या किशोर वयात, ही अशी सुरवात झालेली होती!
पुढे चालू...
================================

मग दुसर्‍या दिवसापासून मात्र , माझे भीड..भय इत्यादी विद्यार्थी दशेला मारक असणारे सर्व अवगूण चेपले जायला लागले. कारण माझ्या बरोबर त्या वर्षी पाठशाळेत, माझ्याहून कमी जास्त वयाचे आणखिही ४ विद्यार्थी आलेले होते. ते माझ्या १ आठवडा आधी आलेले असल्यामुळे ते चांगले रुळलेले होते. इतके..की ते माझ्या बरोबर नित्यविधीची पोथी उघडून बसे पर्यंत मला कळलं सुद्धा नाही,कि ते ही नविन आहेत. त्यांच्या पैकी संजय नावाचा एकजण माझ्या शेजारी अगदी येऊन बसला,आणि मला- "ए..तुझं गाव कोनचं रे?" असं विचारू लागला. त्यावेळी मला त्यातला कोनचं हा शब्द (ऐकायला) नविन होता.त्यामुळे मी उत्तर देण्याऐवजी त्याच्याकडेच आश्चर्यानी पाहू लागलो. तेव्हढ्यात गुरुजी आले. आणि सरस्वतीसूक्ताच्या प्रार्थनेनी पाठाला सुरवात झाली. गुर्जी आल्या आल्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांकडे हात करून, इयमददात्... अशी सुरवात करते झाले. आंम्ही ५ जणं नविन असल्यामुळे फक्त हात जोडून बसलो. मला मात्र गुरुजी फक्त मान हलवत आहेत्,आणि ते ज्येष्ठ विद्यार्थी अगदी बरोब्बर गुरुजिंच्या मानेनुसारच हात हलवत मंत्र कसे म्हणत आहेत.?याचं कोडं पडलेलं. अगदी १५ऑगश्ट्च्या (टि.व्हि.वर दिसणार्‍या) परेड मधे ,जसे त्या जवानांचे पाय आणि हात, सगळ्यांचे सगळे एका तालात आणि नखभरंही इकडे तिकडे न होता हलतात तसे! मी याच विचारात गुंग असताना ,एकदम प्रार्थना संपली.आणि गुरुजिंनी आंम्हा पाच जणांना "या इकडे" असा आदेश केला. चौघं पटकन पुढे सरकले.आणि मी मात्र त्याच परेड-विचारत भिंतिला टेकलेला...तसाच! मग गुरुजिंनी त्यांच्या खास श्टाइल मधे मला, "अहो...तंद्रेश्वरआत्मंम् भट...य्या..आता इकडे य्या!" असे दरडावले. मी ही एकदम भानावर येऊन पुढे सरकलो. मग गुरुजिंनी आंम्हाला पोथिची पाने उघडायला लावली. आणि सगळ्यांना , "आता पहिल्यांदा चोविस नावे ते प्राणायाम..इथपर्यंत शिकायचय हां" असं म्हणाले. लगेच मी व काहि विद्यार्थी लग्गेच "आंम्हाला येतं ते!" अस म्हणताच गुरुजिंनी, "ते असू दे हो...तसच..आता इथे पुन्हा" असं म्हणून , हं बघा खाली पोथीत...आता म्हणा:- श्रीगणेशाय नमः ...आंम्ही:- श्रीगणेशाय नमः ... गुरुजी:- ओम केशवाय नमः। आंम्ही:- ओम केशवाय नमः। ..असे म्हणून थांबलो. लग्गेच गुरुजी, "हम्म्म...सात वेळा म्हणायचं हां मोजून...म्हणा..." असं करत करत आमची संथा सुरु झाली. सगळे जण केशव्,नारायण,माधव्,गोविंद पर्यंत सरळ आलो..आणि पुढे विष्णवे नमः ला गोंद्या आणि श्रीधरची गाडी अडली. आंम्ही तिघे म्हणजे...संजय मी आणि सुरेश बरोब्बर चाललो होतो. पण हे दोघे विष्णवे नमः च्या ऐवजी विश्णवे नमः म्हणत होते.
गुरुजी:- हम्म्म..थांबा रे बाकिच्यांनी! अरे..नीट बघा पोथीत...कोणतं अक्षर आहे.? ष..... आहे, श.... नाही.
ते दोघे:- .....
गुरुजी:- हा ष...म्हणताना जीभ तोंडात कुठेही न चिकटता ,मागे...पडजीभेकडे वळली पाहिजे..म्हणजे तो बरोब्बर उमटतो.. म्हणा आता , ष........
ते दोघे:- श..................
गुरुजी:- हम्म्म... आता तुंम्हाला स्पेशल टूल वापरायला हवे,त्याशिवाय उजाडायचं नाही तुमच्या मेंदूत.. नक्षत्र पाठ येतात ना?
ते दोघे:- हो...
गुरुजी:- मग म्हणा बरं... अश्विनी,भरंणी,कृत्तिका,रोहिणी..
ते दोघे:- (गुर्जिं बरोबर..) मृगशिर्ष, आर्द्रा,पुनर्वसू ... (मधेच एकदम गुर्जी...:- आणि....) ते दोघे:- पुष्य...............
गुरुजी:- हांsssss!!! आता सापडला बघा तुमच्या'तला- ष....
ते दोघे:- (आनंदून!) ष......... , ष................,ष......... , ष................
गुरुजि:- (हसत..) अरे हा नको घोकायला ७ वेळा. तुम्हाला लक्षात आला ना कसा-आहे तो! मग झालं.. म्हणा आता ओम विष्णवे नमः...
ते दोघे:- ओम विष्णवे नमः... , ओम विष्णवे नमः... , ओम विष्णवे नमः... , ....
गुरुजि:- बाकिच्यांनी पण म्हणा रे...
सगळे:- ओम विष्णवे नमः... , ओम विष्णवे नमः... , ओम विष्णवे नमः... ... ... ...
यात मी आणि सुर्‍या..दोघेजणं, त्या दोघांच्या "पुष्य..." वर एकदम ख्याक्क्कन हसलो होतो. ते मात्र गुरुजिंच्या नजरेतून सुटलं नव्हतं . आणि मग लगेच आंम्हाला... "हम्म्म.. हसू नका हो वीर आपण! ह्या खेळात कुणाचिही विकेट उडते...याचे भान ठेवा. आपलीही उडेल...क्का....य? आणि पुढे झालंही तसच. मी आणि सुर्‍या पुढे प्रद्युम्नाय नमः असं म्हणायच्या ऐवजी प्रद्युन्माय नमः असं म्हणालो. लग्गेच गुरुजिंनी आमच्याकडे पाहून :- क्काय? अं....(असं म्हणून मिश्किल हसले,आणि आंम्हाला..) ..य्या आता पुढे...असं म्हणाले. आंम्ही भीत भीत पुढे सरकलो.
गुरुजि:- (आधी बाकिच्या तिघांना..) आता तुंम्म्ही हसू नका रे ..नायतर धावाल लगेच वासरे मारायला...क्का..य? (आंम्हाला) :- माझ्याकडे बघू नका ,खाली पोथित बघा .. काय आहेत अक्षरे???
आंम्ही:- प्रद्द्द्द्द्द...द्यू.... , प्रद्द्द्द्द्द...द्यू...., प्रद्द्द्द्द्द...द्यू....न्म...
गुर्जि:- पुरे..कळली हो आपली नजर..आता परत पहा. अरे,जोडाक्षर आहे ना ते!??? म..ग?
आंम्ही:- ...............
गुरुजि:- आधी म आहे की न....???
आंम्ही:- म......
गुरुजि:- मग जो आधी आहे,तोच म्हणा पाहू आधी.
आंम्ही:- प्रद्यून...म..प्रद्यू...न्म...
गुरुजि:- अरे मेल्यांनो.. तांदूळ निवडावयास दिले,तर आपण म्हणतो निवडायचे तांदूळ,पण निवडून काय काढतो??? सांगा?
आंम्ही:- खडा...............!
गुरुजि:- हांsssss . मग आता तांदूळ सोडून खडा पाहा बरं!
आंम्ही:- (शत्रूवर विजय मिळवल्यासारखे..) प्रद्युम...नं..........,प्रद्युम...नं..........,प्रद्युम...नं..........,
गुरुजि:- हम्म्म्म..आता पूर्ण करा ते..अर्ध्यात उड्या नका मारू खोंडासारखे!
आंम्ही:- (तरिही आनंदूनच..) प्रद्युम..नं.....,प्रद्युम्ना..य नमः ..,प्रद्युम्ना..य नमः ..,प्रद्युम्ना..य नमः ..,
गुरुजि:- (बाकिच्यांना..) उचला रे पाट्या तुंम्हीपण!
सगळे:- (हसत..हसत..) ओम प्रद्युम्नाय नमः.............,ओम प्रद्युम्नाय नमः.............,ओम प्रद्युम्नाय नमः.............,

आमचे गुरुजि म्हणजे साक्षात विद्येची देवता होते. आगदी आईच्या मायेनी शिकवायचे. अगदी ते मांजरी/पिल्लांचं रुपक - मांजरी पिलाना तोंडानी उचलते,पण तिचे दात कध्धिही त्यांना लागतं नाहीत. हे आमच्या गुरुजिंकडे पाहिल्यावर पूर्ण कळावं,असं ते त्यांचं मायेनी शिकवणं होतं. कधिही कुठल्याही विद्यार्थ्याला त्यांनी काठी घेऊन मारलं नाही. शिकवता/समजावताना खरोखर आतडी आणि मेंदुला पीळ देऊन शिकवायचे. आधी स्वतःच्या आणि नंतर विद्यार्थ्याच्या! अगदीच एखादा दगड असला,तर त्याचा पुढे सरकून कान धरायचे,पण तो मात्र त्याचा मेंदूतला योग्य चॅनल-ऑन होईपर्यंत! नाही म्हणायला अध्ययनात-कोणी कुणाच्या खोड्या वगैरे काढताना दिसला,तर त्याला तिथेच न बोलता एकदम कडेनी हळूच आंगठा आणि तर्जनीनी मांडीच्या कातडीला एकदम मुंगी उचलून चुरडावी तसा पिळा मारायचे.. तो मात्र टोचलेल्या इंजेक्शन सारखा नंतर अर्धा मिनिट दुखायचा. पण या पलिकडे त्यांचं शिक्षा करणं कधिच नव्हतं. बोलताना तोंडाला आवश्यक एव्हढी धार होती,पण (कोकणी)शिव्या वगैरे कध्धिही नाही! नायतर कोकणातला माणूस आणि बिनशिव्यांचा,म्हणजे वाडीत नारळ पोफळी आहेत,आणि एकही केळ-नाही अश्याच अवस्थेतला असायचा! आणि त्यातूनंही, एखादा विद्यार्थी व्रात्य किंवा गैरवर्तनीच निघाला,तर सुरवातीच्या दोनच महिन्यात..त्याच्या पालकांना बोलावून घेऊन एकदम घरीच-पाठवून द्यायचे. एकदा हाकलला की हाकलला,मग खरोखर ब्रम्हदेवाचा बापच काय? आजा पणजा आला तरी ऐकणार नाहीत. याच्या उलट ज्याला आपला म्हटला त्याला आपलाच म्हणायचे. मग त्याचेही आईवडिल जुजबी शिक्षण झाल्यावर न्यायला वगैरे आले..तर त्यांनाही नम्र शब्दात समज द्यायला कमी करायचे नाहीत. आणि विद्यार्थिही असे गुरुजिंना (मनातून..)चिकटलेले असतं,की बळजबरीनी जरी आईवडिलांनी त्यांना शाळेतून नेले,किंवा सुट्टी'नंतर परत पाठवले नाही..तर खरोखर घरादाराची तमा न बाळगता ते पळून येत. त्याला कारणंही तसच होतं. गुरुजिंनी एकदा पालकांना सांभाळायचा शब्द दिला. की ते त्याबाबतीत पालकंच्याही पुढे शंभर पावलं असायचे. कुणी अजारी पडलं ,तर काकूपेक्षा गुरुजिंना त्याची काळजी अधिक!..अगदी सकाळी उठल्यानंतर काकूला, " तो राम्या खोकतोय रात्रीपासून मरणाचा...! ऐकलास नाही का? त्याच्यासाठी काढा लाव आधी! चहा कसला टाकत्येस? आणि नाहि प्यायला तो नीट,तर सरळ सदाशिवला सांग.तो बरोब्बर नाक धरेल त्याचं! ...क्का...य?" असं बजावायचे.

त्यांच्या या साध्या आणि अगदी सोप्प्या सरळ शिकवणी-मुळे कोणत्याही विद्यार्थ्याला ,आमच्या पाठशाळेतलं वातावरण कध्धिही जड वाटलं नाही. उलट गोंद्या आणि सुर्‍या तर दिवाळीचे पंधरा दिवसंही घरी जायला तयार नसायचे. शेवटी काकू चिडून त्यांना पिशव्या भरायला लावायची. मग ते दोघं रडत रडत पिशव्या भरायला लागले. की गुरुजि त्यांना जवळ येऊन.."अरे पोरांनो ,तुंम्हाला घरी जायला नको वाटलं..तरी आयशीबापसांना हवं वाटतं? ...बरोबर ना?" .. पोरं तशीच रडत मान हलवत..'हो' म्हणायची. मग गुरुजि पुन्हा "मग तुम्ही अत्ता नाही गेलात आणि मे महिन्याच्या सुट्टीत त्यांनी तुम्हाला 'रहा त्या शाळेतच' असं म्हटलं तर चालेल का? " पुन्हा मुलं त्याच अ‍ॅक्शन मधे.. "म्हणून जायचं हो अत्ता. अरे मेल्यांनो आईवडिल पहिले,आंम्ही काय? आहोतच पुन्हा." असं म्हणून बोळवण करायचे. मग सदाशिव (दादा..) बरोबर आंम्ही सगळे पंचे,धोत्र वाले बालवीर..आपल्या शेंड्याना झाकणार्‍या टोप्यांसह पिशव्या नाचवत नाचवत घरी जाण्याच्या आनंदात येश्टीश्ट्यांडं कडे जायचो.

यातला सदाशिव हा आमच्यातला प्रमुख विद्यार्थी असला ,तरी तो विद्यार्थी प्रमुख कधीच नव्हता.यातलं पहिलं कारण म्हणजे,तो गुरुजिंचा एकुलता एक मुलगा. त्यामुळे गुरुजिंनी त्याला आंम्हाच्यावर (पालकांचा गैरसमज नको..म्हणून) कधिच नेमला-नाही. पण कामं मात्र करायची..सगळी नेमून दिली.शिवाय एरवी तो शांत असला ,तरी चिडला की एकदम जमदग्निच! बैलाला मारायची काठी वेळेवर सापडली नाही,तर काठीवरच बैल उलटा आपटून मारायला निघणारा! त्यामुळे तिकडूनंही घातकच. त्यामुळे गुरुजि त्याला, तसाही कुठे नेमायच्या विरोधावरच. शिवाय गुरुजिंच मुख्य धोरण म्हणजे जो ज्या कामाला लायक , तीच त्याची पात्रता! मग ते.. वाडित पाणि लावायच्या कामावर नेमणं असो,अथवा गुरुजिंच्या गैर हजेरीत पाठशाळेत ज्युनिअर विद्यार्थ्यांना संथा सांगायचं काम असो. जो लायक ,तो ते काम करण्याला पात्र! असा सरळ आणि सीधा मामला होता. त्यातही त्याच त्याच माणसाला तेच ते काम देण्याच्या ,ते विरोधी! पाठशाळेतलं संथा सांगण्याचं काम इतर विद्यार्थ्यांवर सोपविताना,कुणालाही दोन पेक्षा आधिक वेळा त्याची जबाबदारी मिळावयाची नाही. कारण्,कुणालाही उत्तराधिकार्‍याच्या मोड'मधे जाऊ देण्यापेक्षा, त्याला (सध्या आहे तो!)आधिकार बजावून-उत्तर द्यायलाच भाग पाडण्याकडे त्यांचा कल असे. म्हणूनच आमच्या गुरुजिंची पाठशाळा ही नेहमी-सर्व विद्यार्थ्यांच्या हातामधे राहिली... त्यांची स्वतःच्या मालकिची..अशी ती कधी नव्हतीच. वयोमाना नुसार पुढे ते जसे थकत गेले,तसे ते सदाशिवला कायम बजावत राहिले... " अरे ..आपण या जागेचे फक्त धनी,खरी मालकी असते ती तो वर बसलेला देव,आणि खाली त्यानी आपल्यावर सोपवलेलं जे कार्य आहे ना...त्याची! "
==============================
क्रमशः

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

आज पासून वाचायला सुरवात केली आहे. आता मागे मागे जात वाचत राहेन.
छान लिहीता आहात आत्मुस.

राजाभाउ's picture

16 Jan 2015 - 11:15 am | राजाभाउ

तुम्हाला इतके उत्तम गुरु मिळाले भाग्यवान आहात. बाकी हा भागही नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर. !!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2015 - 12:02 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला इतके उत्तम गुरु मिळालेभाग्यवान आहात. >> ही माझ्या गुरुजींचीमाझ्या पाठशाळेचि कहाणि किंवा आत्मकथन नाही. :) ही सर्व लेखमाला म्हणजे -(सामान्यत:) आम्हा पुरोहितांचे सामुहिक आत्मकथन आहे. :)

प्रमोद देर्देकर's picture

16 Jan 2015 - 11:25 am | प्रमोद देर्देकर

खुप छान. पण जरा मोठे भाग टाकाना ओ गुरुजी.

(तुमचा शिष्य)

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 11:26 am | सुबोध खरे

गुरुजी
उत्तम लिखाण
हाच फरक आहे 'गुरुजी' आणि "शिक्षक". गुरुजी म्हणजे विद्यार्थी घडवणारा आणि शिक्षक म्हणजे पाट्या टाकणारा( कोचिंग क्लासात असणारा) किंवा (संगीत विशारद सारखी) परीक्षा पास करून देणारा.गाणे येते कि नाही याच्याशी घेणे देणे नाही.

गुंतवुन ठेवते तुमचे लिखाण गुरुजी! पुढला भाग मोठा आणि लवकर टाका!

नाखु's picture

16 Jan 2015 - 12:05 pm | नाखु

आत्मुदा तुमचे गुरुजींनी साक्षर आणि "सु"शिक्षीत यातला नेमका फरक सोप्या आणि सुंदर रित्या सांगीतला आहे.
विना विलंब पुढचा भाग टाका ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे

खर्‍याखुर्‍या गुरुकुलात शिक्षण झाले की हो तुमचे ! आणि ते आमच्यापर्यंत तुमच्या शैलीत पोचलेही !!

पुभाप्र.

खटपट्या's picture

16 Jan 2015 - 12:02 pm | खटपट्या

परत एकदा अप्रतीम !!

जरा ते १)ब्रम्हदेवाचा बाप २)ब्राह्मणाचे घरी ३)ताम्हणी घाट ४)पळी पंचपात्र ताह्मण ५)फलम्पुष्पम फलम्त्यक्त्वा / फलन्त्यक्त्वा ६)अब्रम्हण्यम् अब्रह्मण्यम यांचे शुद्ध सांगाल का ?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2015 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा

ते शब्दात सांगुन भागायचे नाही.. भेटू तेंव्हाच सांगेन

चला त्यानिमित्ताने कट्टे होतील अणि मिसळपाव माझ्या डेबिटला टाकून ठेवा वल्लीसह भाजेलेणीला भेटूच.कशेळीला वेळ मिळेल की नाही शंकाच आहे.

ये बात आत्मूदा. याचे लवकरात लवकर पुस्तक होवो, आणि त्या पुस्तकाच्या संपादकाला आत्मू-पेशल शैली "दुरुस्त" करायची बुद्धी न होवो ही सदिच्छा.

शैली दुरुस्ती -प्रथमच लेखन प्रकाशित करू इच्छिणारे लेखक प्रकाशकास एकरकमी लेखनहक्क विकतात त्यावेळेस हे मुरलेले प्रकाशक काही सनसनाटी घटना घुसडण्याची लेखकांस विनंती करतात(=गळ घालतात).

रेवती's picture

16 Jan 2015 - 2:37 pm | रेवती

छान लिहिताय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 2:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हल्ली

गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः!
गुरु: साक्षात्परब्रम्ह तस्मै श्री गुरुवेनमः!!

असे म्हणायच्या योग्यतेचे गुरु फार कमी वेळा लाभतात. तसे तुम्हाला लाभले. नशिबवान आहात. _/\_

बॅटमॅन's picture

16 Jan 2015 - 3:59 pm | बॅटमॅन

इतरही लेख चांगले आहेत. पण गुरुकुलाचे वर्णन केलेले लेख सर्वांत जास्ती आवडले.

गुरुकुलात शिकलेल्या एकाशी मध्ये बोलणे झाले. त्याचीही त्या वातावरणाबद्दलची एकूण प्रतिक्रिया तुमच्यासारखीच होती.

दोस्त's picture

16 Jan 2015 - 8:31 pm | दोस्त

मस्त...

मुक्त विहारि's picture

17 Jan 2015 - 4:22 am | मुक्त विहारि

वाचत आहे....

कोमल's picture

21 Jan 2015 - 12:08 pm | कोमल

भारी.. :)
वाचत आहे..