मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१
म्हणूनच आमच्या गुरुजिंची पाठशाळा ही नेहमी-सर्व विद्यार्थ्यांच्या हातामधे राहिली... त्यांची स्वतःच्या मालकिची..अशी ती कधी नव्हतीच. वयोमाना नुसार पुढे ते जसे थकत गेले,तसे ते सदाशिवला कायम बजावत राहिले... " अरे ..आपण या जागेचे फक्त धनी,खरी मालकी असते, ती तो वर बसलेला देव,आणि खाली त्यानी आपल्यावर सोपवलेलं जे कार्य आहे ना...त्याची! "
==============================
आमचे गुरुजि, एरवी कित्तीही गुरुजि असले,तरी त्या गुरुपणाची त्यांची मर्यादा होती..पाठशाळा आणि अध्ययन करविणे..एव्हढ्यापुरतीच! अनाध्यायाच्या दिवशी आंम्हीही विद्यार्थी नसायचो आणि ते ही गुरुजि नसायचे. पन्नाशीचं वय असताना..चक्क आमच्याबरोबर मधेच-एक ओव्हर क्रिकेट खेळायला यायचे ,आणि आल्या आल्या 'मी काहि तुमच्या इतका तयार नाही हं..' असं मिष्किलपणे म्हणून एका ओव्हर मधे कमीत कमी ३ विकेट काढायचे! ..तसच पावसाच्या दिवसात विहिरी तुडूंब भरल्यावर आमची (एकेकाची..) पोहाणी - काढायलाही तेच पहिले हजर असायचे. पाण्याला घाबरतो वगैरे कुणी म्हटला..कि आधी बोया वगैरे न बांधू देता त्याला आत टाकणार आणि मागून तात्काळ स्वतः उडी मारणार! आमच्या गावा नजिकच्या सगुणा नदीत, आमच्या बरोबर पोहायच्या स्पर्धेतंही येणार.आणि सदाशिवदादानी किंवा किश्यानी त्यांना हरवलं, की खरच हरवलं असेल तर ते मान्य करण्यापासून...ते कुणी काहि चिटिंग केलेलं असलं..तर त्याला ''मेल्या ..म्हैस बुडली!..असं ओरडून माझं लक्ष वळवून जिंकलेलं..ते काहि खरं नव्हे हंsssssssssss!' म्हणून.. वादावादिवर येणार. आणि, " दम असेल तर मार बरं परत उडी! मग बघूया कोण कुठे आणि कसा पहिला येतो तो.....??? क्का......य?" असं म्हणून (काकूच्या म्हणण्यानुसार..) नस्ती च्यॅलेंज! ही तेच त्यांना देणार.
पाठशाळेतले पहिले पाच सहा महिने कसे गेले?, ते कळलं देखिल नाहि. दरम्यान..सखाराम काकानी पुढच्या पौर्णिमेला यायचं बोललेलं देखिल मी सहज विसरून गेलेलो होतो. मला पाठशाळेतील नेमून दिलेली कामं वगैरेही नीट जमायला लागली होती.आणि त्यांचा कधिही जाचंही वाटत नव्हता. कारण गुरुजि आमचा कशात आणि किती कल आहे? हे जोखूनच असली कामे आंम्हाला देत. एकदा दुपारी त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून आंम्हाला आदल्या दिवशी दिलेल्या संथेवर त्यांनी आमच्यातल्याच एकाला(सुर्याला..) "तू लक्ष ठेव!" असं सांगितलं होतं. मला तेंव्हा कळेना कि सुर्यालाच का निवडलं? वास्तविक या कामासाठी "मी" स्वतःला योग्य समजत होतो. पण शेवटी आमचे गुरुजीच ते! त्यांनी लक्ष्य न हेरता बाण मारलाय,असं कधि झालेलंहि नव्हतं आणि होणारंही नव्हतं. गुरुजि जरी आतल्या खोलित निजलेले असले,तरी तिथून ते आमच्या नुसत्या आवाजावरून, "काय चाललय?" हे हेरत असत. आणि मग मधूनच तिकडनं, "सुर्याsssss मेल्या इतरांवरच नाही,स्वतःवर पण लक्ष-ठेवावं हो मधुन मधुन!" असा एखादा बाण मारायचे! आंम्ही बाकिची (काकूच्या भाषेत..) "कार्टी!" खि खि खि करायचो. पण गुरुजि नेहमी लगेच आंम्हाला(हि) 'धरायचे' नाहित. कुणाला बाण-बसू द्यायचा? कुणाला नुसताच-लागू द्यायचा? कुणाला रुतवायचा? याची त्यांची काहि स्वतंत्र गणितं होती.
आणि मग सुर्याला असा आमच्यावर एकदोन वेळा-नेमल्यावर त्यांची खात्री झाली. आणि त्यांनी एकेदिवशी सुर्याला दररोज संध्याकाळी रानातून गुरं आणायच्या कामाला जुंपलं. (तेंव्हा आंम्ही हसलो होतो,पण नंतर पुढे या पौरोहित्यात सुर्या आंम्हाला ज्या 'जागी' आणि 'जसा' दिसला,तेंव्हा त्याचा अर्थ कळला.) आणि एकंदर हे ही काम त्याला उत्तम जमतं हे लक्षात आल्यावर त्यांनी, "हा मुलगा वेदाध्ययनातल्या शाखाध्ययन..या (पाठांतरात अव्वल तयार असणार्यांच्या..)प्रांतात टाकण्याचा नसून..त्याला याज्ञिकातले कर्मकांडांचे मोजके प्रयोग( सिलेक्टिव्ह सबजेक्ट..) शिकवावे.." असा निर्णय घेतला. आणि मला एक दिवस , "आत्मू ... आज काकू आणि सदाशिव बरोबर जा." असं नुसतं सांगितलं. आणि त्या पंचे,धोतरं,उपरणी,सतरंज्या..अश्या वस्तू मिळणार्या दुकानात गेल्यावर ,काकूला-"वस्तू निवडताना .. सुरवात मला करू द्यायची! (अगदी रेट सह!)" अश्या सोडलेल्या फर्मानाची, त्यांनी सदाशिवदादा कडून अंमलबजावणीही करवून घेतली. आणि त्यानंतर अगदी वाडितल्या शिंपणं-काढायच्या फावड्या पासून ते शाळेच्या वार्षिक अनुष्ठानाच्या सगळ्या प्रकारच्या खरेदीपर्यंत..सगळीकडे हे सुरवात-करण्याचं आणि अर्थातच शेवटालाहि नेण्याचं-काम, हा माझा नेहमीचा जॉब होऊन बसला होता. (जो करायला मला प्रचंड आनंद येत असे.) मग याचं बीज नक्की होतं कशात बरं?
तर...एखाद्या (नव्या) विषयाची, गुरुजिंनी पहिली संथा दिली, की नंतरच्या संथेपासून संथा-काढण्याचं जे अवघड काम असतं,ते काम गुरुजि विश्वासानी मलाच देत असत. (आणि यावर सुर्या-माझ्यावर जळायचा! :-/ ) ही म्हणजे क्रिकेटच्या डावातली ओपनर बॅट्समनची जागा. मला त्या कामातली येणारी मजा,आणि माझा त्यातला आत्मविश्वास.हे त्यांनी हेरल होतं. त्यामुळे नविन काहि करायचं असलं. की त्यात ठामपणे-खेळणारा पहिला प्लेअर नेहमी, मी असायचो. अगदी काहि काहि वेळेस माझी पहिल्या ओव्हरला विकेट-गेली.......तरी!!! तसे..मी आणि सुर्या (काकूच्या म्हणण्यानुसार...) एकाच टैपातले! पण गुरुजिंनी निवड प्रक्रीयेवरून..- मला, सुर्याला आणि श्रीधरला..केवळ याज्ञिकातले सगळे प्रयोग(याज्ञिकी) शिकण्याकरिता-वेगळं काढलं. आता सुर्याला जरी ठराविकच शिकवायचे असले,तरी गुरुजिंच्या म्हणण्या प्रमाणे-"मेथीत आलेली,दुसर्या भाजिची पानं वेगळी काढायचीही नसतात.." (आणि चिरायचीही असतात एकत्रच..हो!-इति काकू...) तसा त्यालाही तेव्हढ्यापुरता बसवायचे आमच्यातच.आणि इतरवेळी काहि इतर कामं द्यायचे. आणि संजय व गोंद्याला घेतला ,संहिता/ब्राम्हण/अरण्यक शिकण्यासाठी.(वैदिकी) (आणि याही विभागणीचा आंम्हाला अर्थ कळला,तो आंम्ही पौरोहित्य करायला लागल्यावरच!) हे सगळं घडलं,ते आमचा नित्यविधी आणि पवमानासह काहि सूक्त शिकून होण्याच्या कालावधीत. म्हणजे सामान्यतः पहिल्या वर्षभरात. गुरुजिंची ही पद्धत अजब वाटत असली,तरी अत्यंत चपखल होती. नाहितर हल्लीची ही विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे इंटर-व्ह्यू घ्या..आणि "ते" आपल्या-शाळांनुसार "आहेत की नाहित?" हे तपासा.मगच प्रवेश द्या... असल्या दाखवायला विद्यार्थी-हितैषी आणि असायला स्वयंहितैषी (सेल्फस्टॅटॅजी ओरिएंटेड) शाळांची अवस्था बघितली की मला आजही आमच्या गुरुजिंचीच पद्धती श्रेष्ठ आणि योग्य वाटते. किंबहुना शिक्षणाच्या विषयात "हेतूला न्याय देणारी पद्धत,ही अशीच असायला हवी" हे माझं तेंव्हापासून बनलेलं मत आजंही ठाम आहे.
तशिही कमी अधिक फरकानी ,तेंव्हा सगळ्याच (वेद)पाठशाळांमधे ही पद्धती वापरली जायची. पण अगदी आमच्या गावापासून ते पंचक्रोशित आणि त्याबाहेरही कदाचित..गुरुजि त्यांच्या या निवड प्रक्रीयेतल्या माणूस जोखायच्या पद्धतिमुळे प्रसिद्ध झालेले होते. मग इतरत्र कुणी नवि पाठशाळाच काय? व्यायामशाळा जरी काढायला धावला, तरी त्याच्याच घरातली वडिलधारी माणसं त्याला सांगायची " हे बघ..फार पुढे गेला नाहिस,तरी आहे त्यात ठाम-व्हायचं असेल..तर बंडुगुरुजिंच्या वेदशाळेत महिनाभर नुसती हामाली कर पाहू आधी..! आणि मग काढ तुझी व्यायामशाळा!" गुरुजिंच्या या गोष्टीचा आंम्हाला अतिशय अभिमान वाटायचा.त्याच बरोबर (पुढे..नंतर) बाहेरच्या अनुष्ठानांवर वर्णी लागली,की आपल्याकडून दिलेलं काम अगदी दोनशे ट्क्के व्हायला पाहिजे याची मनात घट्ट जाणिव असायची. कारण बंडूगुरुजिंच्या पाठशाळेतला विद्यार्थी म्हणजे रणांगणंही गाजविणार आणि वादळही! ही लोकांना खात्री.
नाही म्हणायला गुरुजिंच्या या गुणाचा कधी कधी काकूला राग यायचा...आणि मग "अहो..तुमच्या या पद्धतीनी, जरा हेरा ना चार पोरे..माझ्या स्वयं-पाकाला..! तिथे मेलं कसं उपयोगी पडत नाही हे बुद्धि-बळ??? नैतर अजुन दोन कामकरणी तरी वाढवा!" म्हणून वैतागायची. काकूच्या या अवतारावर आंम्ही हसायचो,पण काकूला त्याचाही राग यायचा!...(दुष्ष्ष्ट..दुष्ष्ष्ट!!! :-/ )आणि मग पुढे अजुन.... "म्हैशी धुणं,दुधं काढणं,भाज्या आणणं..एव्हढच का काम व्हायचं विद्यार्थ्यांकडून? त्यांना स्वयंपाकाची संथा द्यायला मला चान्स देत नाहीत तोsssss???" अशी आणखि रागात यायची. आंम्हालाही त्यात मदत करावी ,असं मनापासून वाटत असायचं.पण गुरुजिंचा "पाठशाळा चालवायची,म्हणजे त्यातले कष्ट आपल्यालाच उपसायला हवे!" ह्या तत्वाचा आग्रह, ते स्वतःला आणि घराला कित्तीही त्रास झाला,तरी बदलायला राजी नसायचे. एकदा मग सदाशिवदादानी चिडून, "किमान अनाध्यायांच्या दिवशी तरी स्वयंपाकघर विद्यार्थ्यांच्या ताब्यात सोडायला हवं!" असं गुरुजिंना चक्क वाद करून मान्य करायला लावलं. त्याला आमचाही छुपा पाठिंबा होताच. एकतर काकूला होणारा त्रास आंम्हालाही बघवायचा नाही. पण गुरुजिंना च्यायलेंज कोण करणार ? हे भय असायचं. सदाशिवदादामुळे ते दूर झालं... आणि मग सुरुवात झाली.., ती आमच्या (पाठ-शालीन जीवनातल्या ;) ) स्वयंपाकातल्या रंगी चढा ओढीच्या कुस्त्यांची! अध्ययनपाठातल्या हेव्यादाव्यांचा राग काढायचा जंगी आखाडाच तो! ( :D )
==============================
क्रमशः .....
प्रतिक्रिया
20 Jan 2015 - 10:42 pm | टवाळ कार्टा
वाचतोय :)
पु.भा.प्र.
20 Jan 2015 - 10:47 pm | हाडक्या
मस्त हो गुर्जी.. :)
20 Jan 2015 - 10:53 pm | आदूबाळ
गुर्जी - एक खुस्पटः
सुर्याचं नक्की काय ते कळलं नाही.
यावरून वाटलं की सुर्याला मोजके प्रयोग शिकवले. आणि...
मोजके प्रयोग की सगळे प्रयोग? सुर्या ऑलराऊंडर की स्पेशालिस्ट बॅट्समन?
21 Jan 2015 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा
@एक खुस्पटः >>> खुस्पट नाही. बरोब्बर आहे तुंम्ही दर्शविलेलं.. फक्त अश्या प्रकारच्या लेखनात अशी स्पष्टीकरणे देणे लेखनाच्या ओघात विसरते.आणि ते ही नुसतं (आर्ष..)लिहुन चालत नाही..तर त्यातला फरकंही स्पष्ट करावा लागतो. मला ते रिचेकिंगमधे जाणवत होतं. पणा भागाच्या शेवटाची मोट-बांधायच्या नादात ते मी विसरलो. (हुश्श्श्श्श्श.... ;) )
आता सांगतो त्यात काय गेम आहे ती! तर ज्याला ..असं मोजकच शिकवायचं असेल..त्याला सगळं-शिकवणार्यांमधेच बसवितात..आणि त्याचे न शिकण्याचे विषय आले,की त्याला इतर ठिकाणी गुंतवितात. कारण..., एकट्यासाठी किंवा स्वतंत्र एकाचे वेदातले कुठलेच अध्ययन करवू नये असा नियम आहे. कारण अध्ययनात एक जी चुक करतो..ती दुसरा ऐकतो.आणि ती सुधारली जाते..पण एकटा बसला...कि त्याला चुका सांगणार कोण? म्हणून मोजके शिकायचे अस्ले,तरी सगळ्यां'च्यात वर्णी लावावी लागते. :)
21 Jan 2015 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा
पण गुरुजिंनी निवड प्रक्रीयेवरून..- मला, सुर्याला आणि श्रीधरला..केवळ याज्ञिकातले सगळे प्रयोग(याज्ञिकी) शिकण्याकरिता-वेगळं काढलं. आता सुर्याला जरी ठराविकच शिकवायचे असले,तरी गुरुजिंच्या म्हणण्या प्रमाणे-"मेथीत आलेली,दुसर्या भाजिची पानं वेगळी काढायचीही नसतात.." (आणि चिरायचीही असतात एकत्रच..हो!-इति काकू...) तसा त्यालाही तेव्हढ्यापुरता बसवायचे आमच्यातच.आणि इतरवेळी काहि इतर कामं द्यायचे. आणि संजय व गोंद्याला घेतला ,संहिता/ब्राम्हण/अरण्यक शिकण्यासाठी.(वैदिकी)
====================================
संपादक, बदला हो प्लीज! :)
20 Jan 2015 - 11:10 pm | प्रचेतस
खूप छान लिहिताय बुवा.
20 Jan 2015 - 11:43 pm | खटपट्या
खूप छान !! स्वयंपाकातल्या गमतीजमती वाचण्यास आतूर.
21 Jan 2015 - 12:20 am | रेवती
वाचतिये. छान चाललय.
21 Jan 2015 - 1:25 am | प्रसाद गोडबोले
सुंदर लिहिता आहात बुवा
आम्ही लहानपणी संस्कृत शिकायला उमाशंकर वेदांत विद्यापिठात जायचो , तिथले सारे वैदिकी / याज्ञिकि शिकणारे विद्यार्थी एकदम डोळ्या समोर आले .
आजही अधुन मधुन येणं जाणं होतं विद्यापिठात ...फार सुंदर दिवस होते ते !!
21 Jan 2015 - 9:21 am | निनाद
खुप छान आहे तुमचे लेखन.
आवडते आहे. काही तरल भावना आणि व्यक्तिचित्रे अगदी सरस उतरली आहेत.
वेदपाठशाळेचे अंतरंग दाखवताय त्या बद्दल खास धन्यवाद. हे विश्व सहसा दिसत नाही.
पुढील भागाची उत्सुकता आहेच.
21 Jan 2015 - 9:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
झॅक हो गुर्जी. लौकर टाका पुढचा भाग!!!
21 Jan 2015 - 9:40 am | प्रमोद देर्देकर
वाचतोय आवडले. अता खरी रंगत येणार.
21 Jan 2015 - 10:01 am | मुक्त विहारि
पुभाप्र
21 Jan 2015 - 10:21 am | कंजूस
गुंतवून टाकताय. डॉक्युमेंट्री (मराठीत ?) म्हणतात ती हीच ती .तुम्ही गुरुजींकडे, काकूंकडे हक्काने मागणार अन आम्ही तुमच्याकडे. मागच्या भागातले याचे उत्तर राहिलेच. इथे नाहितर कट्टयाला द्या.
21 Jan 2015 - 1:46 pm | राजाभाउ
नेहमी प्रमाणेच सुंदर !!!.
ते पानावरील स्क्रोलबार (काय म्हणतात हो मराठीत त्याला ?) शेवटा कडे आला कि लेख संपत आला म्हणुन उदास वाटतय बघा. येउत्यात पुढचे भाग वाट बघतोय.