मागिल भाग..
आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे..
पुढे चालू...
=======================================
पहिले सहा महिने संपले..दिवाळीची सुट्टीही झाली. आणि आंम्ही सर्व मुलं पळत पळत पाठशाळेत परत आलो. अगदी ठरल्या दिवशी! माझ्या घरून निघायच्या एक दोन दिवस अलिकडे तर.. आज्जीला, माझ्यावर शाळेतून कुणी चेटूक केलय की काय??? असा खरोखर संशय मनी आला! आणि ती सखाराम काकाला , " अरे हा आत्मू आल्यापासून सारखा तिकडच्या आठवणी काय सांगतोय. तिकडे ती शाळा आणि इकडे ही आईस आणि तू!...एव्हढं सोडलं..तर दुसरं कुणी उरलय का याच्या जगाssssत!??? " इकडे सखाराम काका झोपाळ्याला धरुन मनमुराद हसत होता,आणि आज्जी आणखि चिडून काकाला, " हसतोस काय मेल्या ढेरी हलवत? अरे सख्या...हलकटा...खरच विचारत्ये हो मी...तिकडे त्याच्यावर चेटूकबिटूक नै ना केलन कुणीsssss????? एरवी हि पोरं शाळात जायलाही तयार नै होत,आणि हा तिकडे जायला एव्हढा रे कसा उतावळाssss?" तरिही काका हसायचा थांबला नाही. आणि आई...आज्जी आता आपल्यावर चिडेल,म्हणून तशीच हसत आत निघून गेली.
शेवटी काकानीच आज्जीला समजावलं " आगो आये... ही सगळी कमाल त्या बंडुगुरुजी आणि ह्या आत्मूच्या त्या काकूची हो! पोटच्या पोरांसारखं वाढवतात गो तिथे..! नुसतीच शिकवीत नैत कै!"
आज्जी - " पण असं आहे का खरंच!???" ..... " असलं तर असूच दे..पण मग खायला प्यायला (तरी)नीट घालतात का त्यांना??? की पाठवतात रोज भिक्षेला? लावलेली-मुंज...खरी-करायला!?"
काका- "अगं आई..वाटेल ते काय बोलत्येस? आता ते दिवस राहिलेत का कुठे? बंडुगुरुजिंची स्वतःची बर्यापैकी शेती आहे,कलमं आहेत. शिवाय त्याकडे बघायला नोकर चाकर आहेत."
आज्जी:- व्वा! मंजे श्रीमंत दिसत्ये वेदशाळा!"
काका:- "अगो नाय गो नाय..तसली श्रीमंती नाय हो! बंडुगुरुजी माणूस म्हणून किती मोठा आहे , तुला माहित नाहि. मागे कुठच्याश्या धार्मिक संस्थेनी का मठानी शाळा दत्तक घेतो..फक्त आमचे नाव लावा म्हटले..तर त्यांना आंगण्यातनच बोळवलन.. आणि वर त्यांना बजावलन...म्हणाला- आंम्हाला पोरे वाढवायची आहेत पाठशाळेमधे..विद्यार्थी आणि त्यांची संख्या नव्हे!"
आज्जी:-"अस होय..मला मेलीला काय माहिती तुझ्या इतकं?आणि तू म्हणतोस तर असेल तसं"
मग पाठशाळेत जायच्या दिवशी, मला आज्जीनीच काकूसाठी एका पिशवीत प्या.....क केलेली कसली तरी भेट वस्तू दिली. आणि वर मला " आत्मू.. ही अशीच डायरेक काकूला दे हो !" आणि मी - "होsss!" ..म्हटल्यावर्,परत मला -"नायतर निम्या येश्टीत उघडून बघशील..तिकडे जाइ परेंत अशीच-प्या...क - र्हायला हवी. लक्षात ठेव. असं म्हणुन माझ्या हातात ती वस्तू दिलिन. मी मात्र ती भेटवस्तू जातानाच्या पिशवीत ठेवेपर्यंत सारखा तोंडानी आज्जीचं ते प्या...क,प्या...क म्हणत होतो. आणि आई ,सखारामकाका हसत होते. त्यावर आज्जी पुन्हा "हा ह्याचीही पाठांतरं करतो की ...काय?" म्हणून सखारामकाकाला बोलायला लागली. पण यावर्,आज्जीला काहिच न बोलता.. काकानी दुष्ट्पणानी मलाच - "काय रे आत्मू..एव्हढ्यात तुझ्यात सवय मुरली की काय ती?" असा दगड मारलन. ( :-/ ) आणि वरनं , "बरच सोप्पं दिसतय प्रकरण!" म्हणून मला छेडलनंही! मग मी ही चिडून काकाला आणि आज्जीला हाताला धरत... "बस..बस..हिते!...तू तिकडे आणि तू इकडे" असं करून जमिनीवर बसवलं आणि..., "आता दाखवतोच ह्यांना काय सोप्पं असतं ते!" असं मनाशी म्हणत..,
मी:- "म्हणा माझ्याबरोबर.... ओम सहस्रशीर्षा पुरुषः"
ते दोघं:- (हात जोडून..पण हसत हसत..) ओम सहस्रशीर्षा पुरुषः"
मी:- ऊंssss... असं नुस्तं नै कै! स्वर पण म्हणायचे माझ्यासारखे...मान हलवत..
काका:- (अजूनंही हसतच!..) " ते कसे!?"
मी:- स ला मान खाली गेली पायजे..
ती दोघं:- ( मान खाली-पाडत... ) स .. हस्र
मी:- आं..... , अशी येश्टीत झोपताना पडल्यासारखी नै!
ती दोघं:- मगं?????
मी:- आपल्याला आं...क्छी! करून शिंक आल्यावर त्यातल्या छी - ला जशी हिस्डा बसून गपकन खाली जाते ना...तशी!!! ...आणि सहस्र-तल्या स्र ला ही तशीच्च वर गेली पाहिजे. आणि र्षा ला परत खाली! आणि रु ला वर!
आज्जी:- "हत मेल्या...तुझं ते शिक्षण! माझी मान, त्या वर-खालीच्या झटक्यानी तशीच उडून जायची माडीवर,नायतर नारळा सारखी आपटायची जमिनीत! कसलं ते स-हस्र???...काहिही हसरं नै त्याच्यात!" (असं म्हणून उठून गेली.)
काका:- स_ हस्र^ शीर्षा_ पुरु^षः ...
मी:- "हां.... काकाला जमलं, आज्जेला नाही! आज्जी भित्री....!!!"
काका:- (पुन्हा हसत..) बरं..मग आता जाऊ मी?
मी:- आं.... अस्सं नै... ओळ पुर्ण करायची असते.
काका:- बरं! सांगा हो गुर्जी..
मी:- सहस्रा_क्षः स_हस्र^पात्
काका:- सह्_स्राक्षः ..स_हस्र^पात् ...
मी:- ऊं........., तू ह ला कशाला मुंडी खाली नेलीस...? त्यामुळे ह ला गेला ना..स्वर! स्रा ला घालव खाली..
काका:- (परत हसत..) सहस्रा_क्षः ..स_हस्र^पात् ...
मी:- हां..... आता जमलं... जमलं... पण आता परत मला जर का 'सोप्पं सोप्पं' म्हणून चिडवलन कुणी,तर आख्खं पुरुषसूक्त असच पाठ करायला बशविन.. हो कि नै गं आई? अशीच शिक्षा करायची कि नै गं ह्यांना?
असं म्हणत आईपाशी नाचत नाचत गेलो... काकाही उठून आनंदानी डोळे पुसत आत गेला. इतका वेळ आनंदानी हसणारा काका, आता रडत का गेला? ते मला काहि कळे ना! माझा अचंबित चेहेरा पाहून आई म्हणाली "अरे आत्मू... तुला काय वाटलं? काकाला काय तू शिकवल्यामुळे लगेच आलं???.. तुझा काका आहे ना..तो तुझ्या गुरुजिंचा नुसताच मित्र नाहिये.त्यांच्या बरोबर शिकायलाही होता हो! " मग मी "काकानी(च) मला शिकवायचं,सोडून तिकडे का टाकलन?" असं आईला विचारताच आईनी, "अरे ..तो तितका नै कै शिकलेला.पण तुमच्यातलं बरचसं येतं हो त्याला." असं सांगितलन..
आणि मग मात्र माझी पार म्हणजे पार विकेट उडाली...काकानी, सहस्राक्षः -मधला तो स्वर, मुद्दाम चुकिचा म्हणून माझीच परिक्षा घेतली होती. तसच..,त्याचं ते माझ्या शिकवणीच्या वेळेसचं.. ते हसणं, हे कुणालाहि न दिसणारे आनंदाश्रू होते..आणि उठताना तो जो रडत उठला..तो कुणालाही न दिसणारा आनंद होता. हा सखाराम काका,माझ्यासाठी आयुष्यभराकरिता एक अशी खाण होता,ज्यात रत्नं कोणती कोणती आणि किती आहेत? हे आधी कधिच कळायचं नाही...आणि शोधायला गेल्यावर सापडायची मात्र भरपूर!
ती आज्जीनी दिलेली प्या...क बंद पिशवी मी पाठशाळेत गेल्या गेल्या काकूला दिली. आणि सखाराम काकानी दिलेलं कसलंसं पाकिट गुरुजिंना. आज्जिच्या पिशवीतून पाठशाळेविषयीच्या (वाटलेल्या) चुकिच्या धारणांचा परतावा आलेला होता. आणि काकाच्या पाकिटातून.. मला पाठशाळेत ठेवत असतानाच गुरुजिंकडून (गुरुजिंना कित्तीही मान्य नसलं तरीही..) मान्य-करवून घेतलेल्या-'पैसे घेण्याच्या' अटीबरहुकुम टाकलेले काहि पैसे होते.कारण काका आणि गुरुजि कित्तीही झालं तरी (पहिले)घनिष्ट मित्र होते..आणि काकाचा त्यांच्यावर तसा हक्कच चालायचा. त्यामुळे आमची पाठशाळा चालत होती,ती..गुरुजिंना त्या शेती/कलमाच्या निमित्तानी मिळणार्या काहि पैश्यांवर आणि त्यांच्या काकासारख्याच काहि मित्रांनी त्यांना अत्यंतिक गाढ ममत्व बुद्धिनी..केलेल्या अश्या काहि स्वरुपाच्या मदतीवरच! कारण गुरुजिंनी विद्यार्थ्यांचे पालक तर सोडाच्,पण सदाशिवदादा पंचक्रोशित जे पौरोहित्याचं काम करायला जायचा,त्यातून मिळणार्या एका छदामाचा देखिल मनातूनंही हक्क कधी सांगितला नव्हता. सदाशिवदादा देखिल ते पैसे घरीच देत असला,तरी गुरुजि त्यालाही- "हे तू तुझ्या मर्जीनीच देतोयस ना?" असं विचारायला कमी करित नसत. शिवाय वैदिक शिक्षण घेणार्यातली मुलं, कुणाच्या विनंती वरून कुठे संहिता पारायणाला वगैरे जरी गेली..तरी त्यांना त्याचा मिळणारा मोबदला गुरुजि परस्पर पोश्टातल्या एका खात्यावर ठेवित असत. आणि (सर्व..)अध्ययन संपून तो घरी जायला निघाला,की तो त्याच्या पालकांकडे सूपूर्त करित.
हा काहि गुरुजिंचा एक प्रकारचा हेकटपणा नव्हता.आणि त्या मागे कुठचा अहंकारंही उभा नव्हता. गुरुजिंचं म्हणणं एकच होतं.."कुठचिही पाठशाळा आणि त्यातून तयार होणारे विद्यार्थी.. हे (आपल्या..सर्वप्रकारच्या) त्यागातून घडले पाहिजेत.आणि एकदा का तो त्याग हवा..म्हटल्यानंतर ,आपण स्वार्थी असलो/नसलो तरी.. ते कर्तव्यबुद्धीनी करायचं एक मोsssठ्ठं सामाजिक कार्य आहे..हे सतत ध्यानी ठेऊन..ते केलं पाहिजे.आणि हे घडण्याच्या मार्गातला पहिला नियम म्हणजे परिपूर्ण नि:स्वार्थाची आपल्या आचरणातून घडणारी उपासना करणे!!!
गुरुजिंचा हा परिपूर्ण निस्वार्थाचा कार्यक्रम म्हणजे त्यांचा स्वतःचा स्थायीभाव जितका होता..तितकाच त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे अश्या कार्यांचा खरा परमेश्वर होता. "तो आपल्यात नसला..तरीहि त्याला जर ओढून आणला..,तर तो अशी कार्ये निम्म्याहून अधिक पूर्णत्वास नेतो." असं त्यांचं म्हणणं! मग इथे तर गुरुजि स्वतःच मूर्तीमंत त्याग होते. कधी कुणा महान व्यक्तिंकडून मानसन्मान घेणे नाही. वैदिक परिषदांकडून आणि मठामंदिरांकडून सत्कार नाही. इतकच काय स्वत:चा वाढदिवसंही साजरा करायच्या ते विरोधात.. विद्यार्थ्यांनी प्रेमापोटी करायच्या - त्यांच्या आयुर्वधापनाच्या विधी पासून ते काकूच्या नुसत्या ओवाळण्यापर्यंत सगळ्यावर त्यांनी कायमचं पाणि सोडलेलं. अगदी कधी कुणा आंम्हा विद्यार्थ्यांच्या लग्नात जरी आले,तरी विवाहमंत्र म्हणून झाले,की क्षणार्धात मांडवा बाहेर! त्यादिवशीहि...जेवायला सुद्धा त्यांना त्यांची केलेली स्पेशल(वेगळी..) व्यवस्था वगैरे चालायची नाही. वास्तविक शैक्षणिक विद्वत्तत्ता म्हणून बघायचं झालं,तर गुरुजि अखिल भारतात मोठ्यांहूनी मोठ्ठे म्हणावे ..इतके! पण एकदा कसलाही स्वार्थ ,जो या पाठशाळा चालवण्याच्या आड येइल..तो नाही अंगाला लागू द्यायचा की नाहिच लागू द्यायचा..ही प्रतिज्ञा!
गुरुजिंच्या या वागण्याचा पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर असा काहि जबरदस्त परिणाम घडलेला असायचा. कि तो विद्यार्थी कित्त्तीहि स्वच्छंदि वगैरे असला,तरीही...जर पड्लच काहि चुकिचं पाऊल,तर ते पडण्याआधी गुरुजिंचा चेहेरा त्याच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नसे!
==============================
क्रमश......
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३
===========================================================
प्रतिक्रिया
23 Jan 2015 - 12:35 am | मुक्त विहारि
मस्त लेख...
सखाराम काका, जोरदार...
23 Jan 2015 - 12:50 pm | अत्रुप्त आत्मा
ठांकु मु वि काका! :)
24 Jan 2015 - 4:07 am | मुक्त विहारि
आमच्या पेक्षा तुझा सखाराम काकाच मस्त आहे...
हे असे काका-लोक असतील तर, पुतणे जोरदारच निघणार.
24 Jan 2015 - 5:12 am | अत्रुप्त आत्मा
ब्वार! तसं तर तसं!
23 Jan 2015 - 1:47 am | रेवती
:)
23 Jan 2015 - 3:57 am | मधुरा देशपांडे
मस्त चालली आहे लेखमाला.
23 Jan 2015 - 1:07 pm | एस
भारी हां आत्मुस! :-)
23 Jan 2015 - 1:11 pm | बॅटमॅन
एकच नंबर. या काळातले वर्णन वाटतच नाही.
23 Jan 2015 - 1:40 pm | टवाळ कार्टा
दू...दू...दू...
अप्रत्यक्षरित्या गुर्जींचे वय काढतोस
23 Jan 2015 - 4:08 pm | स्वामी संकेतानंद
गुर्जी, आता 'वेताळ पंचविशी' नंतर तुम्ही आमच्या मानगुटीवरनं उतरणार काय? ;)
23 Jan 2015 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा
@तुम्ही आमच्या मानगुटीवरनं उतरणार काय? Wink>>> =))
पहिले उत्तर:- बघू जमलं-तर! ;)
दुसरे उत्तरः- मी कुटं बस्लो? =)) तुम्मिच खांद्यावर घेतलत!- स्वामिज्जी! :p
तिसरे उत्तरः- तुम्मीच सरका बाजूला!
============================
पळा आता... स्वामिज्ज्जी येतय म्होट्टी कुबडी घिऊन! =))))))
23 Jan 2015 - 7:08 pm | स्वामी संकेतानंद
तुमच्यावर जारणमारण करावंच लागणार अखेर!!!
23 Jan 2015 - 4:30 pm | प्रमोद देर्देकर
अवडलं. धन्य ते गुरुजी आणि धन्य ते तुमचे सखाकाका.
23 Jan 2015 - 5:48 pm | प्रचेतस
खूप छान लिहिताय आत्मूबुवा.
24 Jan 2015 - 2:09 am | वाचक
ही पाठशाळा अजून चालू आहे का? कारण आता अशा नैतिक घडणीचे लोक कुठून मिळणार?
27 Jan 2015 - 10:11 am | अत्रुप्त आत्मा
!@ही पाठशाळा अजून चालू आहे का? >> सदर पाठशाळा - काल्पनिक आहे. परंतू अगदी अश्याच नसल्या, तरी बहुतांश पाठशाळा याच मार्गानी-चालतात.
.
.
.
फक्त,अपवाद...- संस्था आणि मठांतर्फे चालविल्या जाणार्या पाठशाळांचा!
27 Jan 2015 - 4:30 pm | बॅटमॅन
अपवाद म्हणजे कशा बाबतीत? फंडिंगसाठी विद्यार्थ्यांवर अवलंबून नसणे या बाबतीत की शिकवायच्या पद्धतीतही?
24 Jan 2015 - 3:17 am | मयुरा गुप्ते
बुवा, वेदपाठ शाळेसारख्या वेगळ्याच शाळेचं आणि एका वेगळ्या विश्वाचे दर्शन आवडलं.
पुढील भागांस शुभेच्छा.
--मयुरा.
24 Jan 2015 - 9:50 am | सुबोध खरे
सुंदर लेखन
25 Jan 2015 - 9:01 pm | स्वाती दिनेश
खूप छान!
वाचत आहे,लेखमाला रंगतदार होते आहे.
स्वाती
27 Jan 2015 - 12:31 pm | अनन्न्या
आता एक वर्ष झालं बंद झाली! गावातून सगळ्या घरातून तांदूळ एकत्र करून रोज सकाळी या मुलांना मऊभात दिला जायचा. घरोघरी रहायची सोय असायची. आता विद्यार्थी संख्याही कमी झाली, आणि शिकवणारे गुरूजी राहिले नाहीत.
27 Jan 2015 - 4:16 pm | स्पा
केवळ जबराट