गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
10 Jun 2014 - 11:58 am

मागिल सर्व भागः-
http://misalpav.com/node/25298
http://misalpav.com/node/25318
http://misalpav.com/node/25527
http://misalpav.com/node/25626
http://misalpav.com/node/26585
http://misalpav.com/node/26703
http://misalpav.com/node/26846
http://misalpav.com/node/26933
http://misalpav.com/node/27236
http://misalpav.com/node/27525
http://misalpav.com/node/27831
म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! :)
======================
हम्म्म्म..
मग एकदाचं ते कसंबसं कन्यादान अवरतं.आणि परत आमची आपली पुढल्या गोष्टिंकडे नजर वळते. कंकणबंधनाच्या..सूत्रवेष्टणा'साठी मग तांब्यात सुतगुंडी टाकुन आंम्ही मुलामुलिच्या सजलेल्या करवल्या आणि अश्याच अजून दोन हौशी युवतींना यजमान संघातर्फे पाचारण करतो.आणि त्याही ड्रेस सावरत..मेकअप बरे-आहेत की नाहीत ते पहात स्टेज-धरतात. मग एक नेहमीचा प्रसंग येतो.आंम्ही या चौघींना सूत्रवेष्टणाचा तांब्या त्यातलं सूत्र जास्ती वेष्टं न होइल अश्या रितीनी,वेष्ट्वायला(समजावून) सांगून उभं करतो,आणि फोटुवाल्यांचं नेमकं तिथेच बिनसत!.. त्यांचं ते गुर्जी...ज...............रा,या बाजुनी या बाजुनी हे चालु झालं की आपलं टाळकं बंद पडायच्या बेताला येतं. एरवी आंम्ही मंगळसूत्र/लाजाहोम/सप्तपदीला फोटोकक्षेच्या जवळ जवळ बाहेरनच 'खेळत' असतो. पण इथे बाहेर पडायचं(फोटोवाल्यांसाठी) म्हणजे अंपायरनी स्टेडियम सोडण्यापैकीच! एकतर या पोरी/महिला/मुली..ज्या कोणी तो सूत्रवेष्टणाचा तांब्या फिरवायला येतात,त्या पहिली काहि मिनिटं..मूळ कामापेक्षा - आपला ड्रेस...त्यावरची ती ओढणी...चेहेर्‍यावरचा 'हलू' पहाणारा मेकप..(आणि..काहि प्रमाणात बटा!!!),हतात केवळ दृष्यमान होण्यासाठीच घेतलेलं रुमाल नामक,फक्त हतात नाचवायच फडकं! यात इतक्या गुंतलेल्या असतात..की वधूवरांच्या माने/कंबरेभोवती फिरवायच्या दोर्‍याचा गुंता'ची होइल.मग त्यांना आधी तयार करावं लागतं. कुणि कुठे आणि तिथेच्च का उभं रहायचं याची (नसलेली) शास्त्र सांगावी लागतात.
आणि मग विधिला सुरवात होते.वधूवरांना आमने-सामने बसवुन मानेभोवती/कंबरेभोवती वेढे मारणेत येतात.आणि त्याच सूत्रात हळकुंड बांधुन कंकण परस्पर हाती (एकदाचं) चढवून होतं.यातही त्या कंकणाची गाठ बसते ना बसते तोच कडेनी कुणितरी बसक्या अवाजाची म्हातारी नेहमीचा(ठरलेला) चेंडू टाकतेच-" उद्या...एका हतानी सोडायचं असतं हो...कंकण! ह्हॅ ह्हॅ ह्हॅ ह्हॅ!"

हे आज्जीबाईंच 'ह्हॅ ह्हॅ ह्हॅ ह्हॅ' अवरतं नं अवरतं तोच,फोटुवाला आंम्हाला मंगळसूत्रासाठीचं ताटं किंवा चौरंग मस्त "बनवा!" असं सुचवतो. ही फोटोवाल्यांची खास चलाखि असते. मग,"काहि विशेष विधि हे फोटोंसाठी अतीविशेष झालेले असतात,हेच खरं!" अशी आंम्हि(ही) आमच्या मनाची समजूत करवून घेऊन ते ताट अगर चौरंग घेऊन विड्याच्या पानांचं पंचदल किंवा तांदुळाचं अष्टदल अशी वेळेला खेळ(पुढे) मारून नेणारी इनस्टंट कलाकुसर करतो. आणि मग वेळ येते ती मंगळसूत्र वरानी वधूच्या गळ्यात घालण्याची. विवाह संस्कारातला हा सगळ्यात भारी शीन बरं का! आधी आजुबाजुच्या पब्लिक मधनं (हल्ली) काहि हौशी टाळ्या/शिट्ट्या येतात..मग वराला उद्देशून अडकला रे अडकला!!! अशी अरोळी पडते. किंवा मग- बकरं कटलं...!(त्यात मागून कुणितरी) कायमच! असाही अवाज येतो.आणि ह्या हल कल्लोळात आंम्ही आपली त्या मुलाला - "अता हे बघ हां,असा हात तिच्या डोक्यामागून घे आणि चेहेर्‍या समोर मंगळसूत्र धर बरं!" ........... "हां....छान.अता आधी फोटोग्राफर सांगतिल ते मंत्र ऐकायचे,आणि नंतर मी सांगेन ते म्हणायचे! आणि मंगळसूत्र गळ्यात घालायचं...काय???" वरः-" हो..............!" मग फोटोवाले , "जरा हात इकडे/तिकडे/वर/खाली...हां राइट राइट...नाऊ स्माइल..स्माइल.." असं करत तो वधूच्या चेहेर्‍यासमोर मंगळसूत्र धरण्याचा खास फोटो घेतात.आणि मग आंम्ही वराकडून ..म्हणा अता, "मांगल्यं तंतू... म्हणवत ते एकदाचं तिच्या गळ्यात घालवून नवर्‍या मुलासच समज देतो. "आपला जीव जपायची डबल जवाबदारी आपल्यावर बरं का अता!" तेव्हढ्यात ती मग्गाचची अज्जीबाई जवळ येते आणि आंम्हाला, "काय हो गुर्जी? फोटोवाल्यांना एव्हढा वेळ देता...थोडा आंम्हाला सगळ्यांना(???) बोलवायला द्यायचा..की....! कित्ती जणांचा हा विधी बघायचा मिस्स्स्स झाला..असे कसे तुंम्ही?..आं??" म्हणून उगाचच आमच्यावर तोंडसुख घेते. मग तिलाही आंम्ही.."अहो आजी...आजकाल विधिंना वेळ कमी आणि फोटोंना जास्त असच असतं...कुणितरी म्हटलच आहे-हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!... काय?" यावर म्हातारी खौटपणे मग-"अस्सं होय..भारीच म्हणतात..म्हणणारे!" असा उलट दगड हाणून गर्दीत नाहिशी होते.

एव्हढं होता होता..मग गर्दितून कुठून तरी स्टेजच्या जवळ काहि आवाजी डायलॉग ऐकायला येऊ लागतात "अगं.... ती मंगळसूत्राची ओटी अत्ताच ना..???"..."हो नै तर काय उद्या?...जा...जाऊन आण लवकर!"..."आणते...आधी त्या गुर्जिंना सासुकडनं सुनबैच्या पायात ह्या जोडव्या विरोल्या घालायला सांग...चहा पिउन पिऊन विसरलेत..बहुतेक!" असा दुष्श्ष्टपणानी ( :-/ ) तिला आणि आंम्हाला संयुक्त दगड हाणते.आणि आंम्ही सा-वध होण्यापूर्वी मंगळसूत्राचे फोटो चाल्लेले असताना फोटोग्राफरनी ही चर्चा ऐकून सासूबैंसाठी तिथे पाट टाकलेला असतो. मग 'आपण विसरलेलो नसून काळजीपूर्वक अधिच तिथे "व्यवस्था" केलेली होती.' असा अभिनय चेहेर्‍यावर बाळगत..आंम्ही सासुबाईंना तिथे सूनबाईंना दागिने चढवण्यासाठी स्थानापन्न करून स्टेज खाली सटकतो... ते विवाहहोमाच्या तयारीला.............

आणि मग इथे, गुर्जी आणि यजमान पार्टी,यांच्यातला एक महत्वाचा दुवा (दुवाच तो!) अवतरतो...त्याचं सार्वनाम स्टेज'चं बघणारा पोर्‍या..गुर्जींचा हेल्पर असं काहिही ठेवलं तरी (कार्यालयातल्या) गुर्जी लोकांना ज्याचं खरं नाव ठाउक असतं...असा तो हा एकच! (हे रत्न...कोकणातलं असेल,तर विशेष तयार असतं.असा आमचा प्र'दीर्घ अनुभव आहे!) याचे आणि गुर्जीलोकांचे काहि खास बंध असतात..मग तो सुरु होतो.

तो:- काकानू....
मी:-(स्टेज'वर वैतागल्या मुळे..) काय रे!!!!!!!!!?

तो:-कुंड आनू???????????
मी:- नको!!!!!!!!!!!!!!!!!

तो:- असां कांय तों.........
मी:- विश्वास..अचरटपणा करू नकोस हां..बिडी मारायला पैसे नाय देणार नायतर

तो:- आं...चिडायचां नाय काकानू,मंग आमी मज्जा कोनाची करनार?
मी:-(भलताच संशय येऊन..) कोनाची करनार? मंजे??????????....मी चिडून ब्लडप्रेशर वाढवून अजिबात मरणार नाहीय्ये...काय समजलास??? होमकुंडं नी बाकिची तयारी घेऊन ये आधी...! अचरट माणूस..ज्जा..........

तो:- जल्ला कांय कल्ला नाय बग काका..का येवडा चिंडतस तें!!!
मी:-(रागानी..) मॅनेजरला हाक मारीन हां..........

तो:- (नीचपणानी...!) ह्ह्या...ह्या..ह्या... अरे काका हतच ठेवलाय ना श्टेजमागं... तुजा कुंड(????)
मी:-श्शी.............. विश्व्या....,अरे किती वेळा सांगितलय तुला? हा एक(तरी) शब्द पूर्ण उच्चारत जा म्हणून! कुंड काय??? आजुबाजुला कुणि ऐकलं तर काय वाटेल? कुंडं म्हणत जा नायतर होमकुंड म्हण.मंजे उच्चार चुकला तरी अर्थ बदलायचा नाही.

तो:- ब्वर..हा घे तुजा होमकुंड..आनी हा लायांचा ताट
मी:-आणि कुंडासमोर वधूवराचे पाट/पुजेचं ताट कोण लावणार??? आज काय विड्याखाली...नकोयत का?..हा अर्थपूर्ण बाण मात्र मग अचूक बसतो...आणि तो कुंडाभोवती रांगोळी कडेला सप्तपदी इत्यादी तयारीला लागल्यावर,मग आंम्ही वधूवरांस एकदाचे पाटावर घेतो...आणि शेला/उपरण्याची गाठ मारायला मुलिची (उखाण्यासह!)सवाष्ण बहीण/लाजाहोमातला हेल्पर कम कानपिळ्या..असा तो-मुलिचा भाऊ/त्याला मुलाच्याकडनं द्यायचा कानपिळीचा मान..असे अनेक पुढचे बाण हताशी घेऊन,,पुढील महत्वाच्या युद्धास तयार होतो...

ते

विवाहहोमाच्या..........

विवाहहोम हे एक युद्धच असतं.अनेक बालशत्रू त्या पटांगणात उतरू पहात असतात. हे बालशत्रू मंजे लहान मुलं हे अगदी उघड आहे. ह्यांच्या आया सुद्धा नेमक्या याच वेळी मुलांना नाष्टा वगैरे करवून देऊन कार्यालयाच्या रणभूमीवर हल्ला करायला सोडून देतात. आणि स्वतः..."हिची साडी फक्त इकडच्याच लग्नात 'कशी(काय)' दिसते!?" वगैरे कालातीत चर्चांमधे गुंततात! मग त्यातली काहि मुलं,कुठून तरी अक्षतां मिळवून, त्याचा मारा दिसेल त्याच्यावर करायला सुरवात करतात. तर काहि कार्टी नेमकी आमच्या लाह्यांच्या ताटाकडेही सरकतात. मारामारीच्या प्रांतातलं लाह्या..,हे अत्यंत हार्मलेस साधन असल्याचं त्यांच्या बालबुद्धीला नेमकं लक्षात येतं.या सगळ्या हल्ल्यांमधून कसंबसं नवरामुलगा/मुलिला पाटावर बसवून,आंम्ही मुलिच्या बहिणिला गाठ मारायला बोलवतो. मग तिला आयत्या वेळेस गाठ मारताना घ्यायचा ठरवलेला उखाणा,अत्ता आपल्या गाठिशी नाही...हे अठवतं.आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला.." अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही
............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ
गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!!
असा टाइम'बॉम्ब उडवतो...
मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो!
==============
क्रमशः .......

संस्कृतीसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

धमाल ! *lol*

गुर्जी, तुमच्या हाती परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय ;) :)

बॅटमॅन's picture

10 Jun 2014 - 12:58 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =))

(तूर्त आमची संमती पूर्वार्धालाच आहे हेवेसांनल ;) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 5:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुर्वार्धात पहिलं लग्न होऊन जाऊ द्या त्वरेने ! :) नंतर पुढचा विचार करता येईल. ;)

प्यारे१'s picture

10 Jun 2014 - 1:02 pm | प्यारे१

मस्त हो गुरुजी!

प्रचेतस's picture

10 Jun 2014 - 1:53 pm | प्रचेतस

फुल्टू धमाल.............!!!!!!!!!!!!!!

मृत्युन्जय's picture

10 Jun 2014 - 1:55 pm | मृत्युन्जय

मस्तच हो गुर्जी. वाचतोय. अजुन येउ द्यात

मस्त!! आणखी एकदोन 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

इस्पीकचा एक्का
@परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय >>> अर्र्रे... लै वेळा लावणार! =))

मृत्युन्जय
@अजुन येउ द्यात>>> जी सर!

सूड
@ 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! >>>या सामन्याच्या शेवटच्या १५ ओव्हर बाकि आहेत अजून! ;)

प्यारे१'s picture

10 Jun 2014 - 4:37 pm | प्यारे१

>>>> अर्र्रे... लै वेळा लावणार!

इ. ए. साहेबांची फुल्ल मज्जाय मग ;) ;) ;)

स्पा's picture

10 Jun 2014 - 4:45 pm | स्पा

हाहा , बुव्या पेटलाय

आतिवास's picture

10 Jun 2014 - 4:51 pm | आतिवास

वाचतेय.

इशा१२३'s picture

10 Jun 2014 - 5:13 pm | इशा१२३

हा भागही धमाल..हसतेय...

पेट थेरपी's picture

10 Jun 2014 - 5:44 pm | पेट थेरपी

मला ही सर्व मालिका कैच्याकै आवडलेली आहे. फारच मस्त आणि मिस्किल लिहिता तुम्ही. मायबोलीवरची अन्न वै प्राणा ही मालिका जेवण म्हटले तर हे चटपटीत मस्त मधल्यावेळचे खाणे आहे. परत परत वाचणार. :)

माझा एक परश्न आहे. मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? मला ते लग्न समारंभात कारुण्या फारुण्य नकोय. दणक्यात लगिन झाले पाहिजे.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा

@मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? >>> मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो.
१) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन.
२) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!

सूड's picture

10 Jun 2014 - 6:56 pm | सूड

आई नसल्यास??

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा

@आई नसल्यास??>>> एकट्या वडिलांकडून..किंवा त्यांची एकट्यानी विधी करायची इच्छा नसल्यास..ज्याला ह्यात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे..अश्या दुसर्‍या कुणाकडुनही..!

प्यारे१'s picture

10 Jun 2014 - 7:40 pm | प्यारे१

___/\___ मस्त हो गुरुजी!

असेच विचार समाजाला पुढे नेतील.

बहुतेकदा विधवा स्त्रीला तिचा नवरा नसणं हा तिचा स्वतःचा काही गुन्हा असल्यागत मागे थांबावं लागतं. आयुष्यभर राबून, कधीतरी एकटीनं खस्ता खाऊन मुलामुलीच्या कार्यात बिचारीला काहीही करता येत नाही. त्या मंगल प्रसंगी पूर्वी ह्या स्त्रीला नि मुलांना दारात उभं न केलेले काका कन्यादान करतात नि मिरवतात. अगदी सगळं केलेलं असलं तरी तो अधिकार आईपासून हिरावून घेतला का जातो हे समजत नाही. विधुरांची परिस्थिती आपल्या पुरुषप्रधान समाजाकडून तितकीशी वाईट झालेली नाही असं वाटतंय.

यशोधरा's picture

10 Jun 2014 - 7:19 pm | यशोधरा

१) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. >> हे शाब्बास!

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2014 - 8:01 pm | टवाळ कार्टा

मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो.
१) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन.
२) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!

अप्रतिम :)

एस's picture

10 Jun 2014 - 8:45 pm | एस

असेच म्हणतो. अप्रतीम लेख. आमच्या लग्नाची आठवण आली. त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. Smile>>> अतिशय कौतुकास्पद! आपण यजमान लोकांनीच आंम्हाला अश्या गोष्टी करायला सांगितल्या तर धर्म काळाबरोबर रहायला मदत होइल.

या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-

मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो.

१) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे.

अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते
इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ

२) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो.
देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी
विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे
(हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!)
*मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे!

३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!

मागे तुम्ही एका प्रतिसादात तुमच्या मित्राचे लग्न तुमच्या घरीच कसे फक्त प्रतिज्ञा म्हणायची एवढाच विधी करवून लावले होते त्याची आठवण झाली. तुम्हांला आमच्याकडून जोरदार पाठींबा.

हौसेच्या नावाखाली हे सगळं करवून घेतलं जातं. लग्नात नवरा-नवरीचं कुणीच काही ऐकत नसतं. ज्यालात्याला आपला अजेंडा पुढे दामटायचा असतो. आमच्या लग्नात आमचं फक्त त्या काकांनी ऐकलं आणि 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्या तरी का? अपत्यप्राप्त्यर्थ असे म्हणूया.' असे केलं. तरी आम्ही 'कन्याप्राप्त्यर्थ' असेच म्हणायला लावले. :-) म्हणालो, कन्याच झाली पाहिजे. नाही झाली तर दत्तक घेणार. :-)

रच्याकने - हे सगळं काय करायचे आहे? कशाला हवी ती औपचारिकता, गडबडगोंधळ, निरर्थक विधींचा गुंता, श्रेष्ठ-कनिष्ठपणा... मियाँबीबी राजी तो क्यूँ कुछ करे काझी? दोघांनी एकमेकांना पसंत केलं, शपथपूर्वक परस्परांचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला की बास. झालं लग्न. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. :-)

खरच. आपल्याला सगळे नाही तरी थोडेफार आपल्या मनात आहे त्या पद्धतिने लग्न करता आले तर किती मजा येईल पण तसे होत नाही. उदा. उग्गीच तासन् तास डोळ्यातून पाणी काढत होमकुंडासमोर बसणे, नको तेवढे मानपान, शेकडो लोकांच्या जेवणावळी वगैरे. मुलीला सासरी पाठवताना गडगडाटी गर्जना करत रडायलाच पाहिजे का? मी अज्याबात रडले नव्हते म्हणून सगळ्यांची पंचाईत झाली होती. बाबा तर म्हणाले की बाई गं, निदान शास्त्रापुरते दोन अश्रू डोळ्यातून काढ! ;) नंतर बरेचजण चिडवत होते की तुझ्या लग्नात आमचा रडायचा चान्स गेला म्हणून! ;) पण काही लग्नांमध्ये लोक धाय मोकलून रडताना पाहिलेत आणि मुलगी पलिकडच्या बिल्डींगमध्ये सासरी चालली होती. एका केसमध्ये तर ती वरील मजल्यावरून खालच्या जमल्यावर रहायला जाणार होती पण (म्हणूनच की काय) सासरचेही रडत होते.

बॅटमॅन's picture

12 Jun 2014 - 5:00 pm | बॅटमॅन

'धाय मोकलणे' ची व्युत्पत्ती मिपावरील तन्नामधारी काव्यरत्नाशी निगडित असावीसे वाटते.

एस's picture

12 Jun 2014 - 6:37 pm | एस

'धायी दिशांतून' पनि व्हू ल्गलेकि. कुंतुन कुंतुन अतव्न कदता तुम्हि लोक्स. तम्बा, ब्लगंध्र्वलाच संग्तो. *ROFL*

बॅटमॅन's picture

12 Jun 2014 - 6:47 pm | बॅटमॅन

कुंतुन कुंतुन अथव्न =))

तम्बू न्का, बल्गन्ध्र्वला लौक्क्रत लौक्क्र संग.

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2014 - 7:31 pm | टवाळ कार्टा

अच्रत बव्लत =))

सूड's picture

12 Jun 2014 - 7:51 pm | सूड

ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jun 2014 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.>>> नाsssssssssssही! :-/ चुचू बिचू जुनी लोकं झाली. :-/ नव्या काळात ते हक्क आहेत फक्त आमच्या किच्चू तै कडे! *biggrin* तिच्या सारखं टायपो-बोब्लं लेकन कुनीच करु शकत नै!!! *lol*
.
.
.
.
पण किच्चू तै पण अता गायब झाली...येतच नै मिपावर! :-/

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2014 - 10:24 am | टवाळ कार्टा

अत बल्गम्दल्व येतत =)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर विचार आणि उपाय !

खटपट्या's picture

11 Jun 2014 - 10:37 pm | खटपट्या

मस्त !!!

हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!

हे तर जबरीच

किसन शिंदे's picture

12 Jun 2014 - 12:05 am | किसन शिंदे

जबराट लिहिलंय! बुवांचा मिश्किलपणा त्यांच्या लेखनात पुरेपूर उतरतो. :-) येऊद्या अजून धम्माल भाग बुवेश्वर भटजी. :-D

रेवती's picture

12 Jun 2014 - 12:19 am | रेवती

बुवेश्वर भटजी.
हा हा हा, मस्त!

वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म डोळ्यासमोरून सरकतीये. माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून. आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! ;) तुमच्या मालिकेचा निमित्तानं सगळ्यांना आपापल्या लग्नातलं काहीबाही आठवत राहतं.

फॅन आपण तुमचे. हा ऑप्शन लक्षात आला नव्हता. धन्यवाद. मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे. सध्यातरी मराठी पद्धतीने लग्न आणि मग एक मोठी पार्टी असा अंधुक प्लॅन आहे. नवरदेवही कुठेतरी दहावी बारावी करत असणार.

एस's picture

12 Jun 2014 - 6:40 pm | एस

अवांतर :

सन्माननीय संमं -
मिपावर किमान वयोमर्यादा कितीय वो?

अहो त्या त्यांच्या मुलीसाठी आधीच बुकिंग करून ठेवीत असाव्यात.

एस's picture

12 Jun 2014 - 7:13 pm | एस

अच्छा असं आहे होय? S-O-R-E स्वॉरी.

आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच

अहो ते गुरुजीच आहेत. हो की नाही ओ आत्मूगुर्जी? *wink*

मधुरा देशपांडे's picture

12 Jun 2014 - 7:06 pm | मधुरा देशपांडे

मस्त चाललीये लेखमाला.
वर आलेले काही प्रतिसाद देखील आवडले, जसे की आईने लग्नात विधी करणे आणि कन्या/अपत्य
प्राप्त्यर्थम आणि इतर. या निमित्ताने अजून एक, पौरोहित्य करणाऱ्या दोन महिला देखील ओळखीच्या आहेत. माझे लग्न लावणाऱ्या त्यांच्यापैकीच एक होत्या. इतरही धार्मिक कार्यात या काकू पौरोहित्य करतात आणि त्यांच्या मते देखील स्त्रिया इच्छा असल्यास ही कार्ये करू शकतात. ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल. तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?

मुक्त विहारि's picture

12 Jun 2014 - 11:43 pm | मुक्त विहारि

हा भाग पण आवडला.

झकासराव's picture

13 Jun 2014 - 12:29 pm | झकासराव

गुर्जी लै तयारीचे हैत. :)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2014 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा

१)रेवती
@माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर
तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून.>>> नक्कीच! आत्मूगुर्जी हाजिर है। :)
@आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! >>> *biggrin* नाही म्हणलेत,तर मी म्हणवेन..अहो,कढीत आलं हवच हो!!! *biggrin*

२)पेट थेरपी
@मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच.
बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे.>>> नोंद घेतल्या गेली आहे! :)
=================
मि.पा.करां-कडची लावितो लग्ने।आत्मूगुर्जी आत्ममग्ने॥ - अशी सही घ्यायला लागणार..आता! =))

३)स्वॅप्स
@अहो ते गुरुजीच आहेत.>>> =))
हो की नाही ओ आत्मूगुर्जी?>>> व्हय..व्हय! *biggrin*

४)मधुरा देशपांडे

@ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल.तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?>>> आहेत.>>>महिला पुरोहितांच्या बाबतीत माझे मत असे,की पौरोहित्याचे काम त्या त्या धर्म समाजातल्या कुणालाही करता आलं पाहिजे..करू दिलं पाहिजे.अता फक्त,हे होतं असं,की मक्तेदारी मोडून काढताना,जुनं मोडतं आणि नवं जुन्याहून जुनं होऊन अंगावर येतं.मग मोडलं काय? आणि मांडलं काय? असा प्रश्न येतो. दुर्दैवानी सध्या महिला पुरोहितांच्या बाबतीत असच काहिसं होत आहे. त्यांना आपण नविन क्षेत्रात मुसंडी मारली,याच्या आनंद होण्यापेक्षा उन्माद येतो आहे...की काय अशी शंका येते.ज्या लग्न कार्यात त्या समोरुन/दुसर्‍या बाजूकडून येतात..त्यात काहि ठिकाणी-"तुमचं जुनं कसं चुकिचं होतं,आणि आमचं नवं(?) कसं जास्ती बरोब्बर आहे"..असा भाव असतो.ज्या संयमी असतात..त्या कामाशी काम म्हणून रहातात.त्यांच वेगळं..पण काहि महिला पुरोहित मी म्हटल्या सारखा व्यवहार करताना मला अढळल्या आहेत.पुण्यात ज्ञानप्रबोधिनी नावाची जी नवी वैदिकधर्मीय महिला पुरोहित शाखा आहे. त्यांच्यात हा प्रकार विशेष अढळतो. त्या करातात ,ते पौरोहित्य आमचं परंपरागतच आहे.फक्त त्याला लोकांना भावेल असा नवा टच दिलाय. (एखाद्या जुन्या पदार्थात थोडी फेरफार करून नविन नाव द्यावं..तसा!) (शिवाय,ज्ञानप्रबोधिनी वाल्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र हे स्वर-रहित का शिकविले आहेत???-याचंही मला कोडं आहे,आणि त्याबद्दल शंकाही आहे!)
त्यांच्यातली चांगली गोष्ट म्हणजे धर्मविधितल्या काही लोकपरिणामकारक गोष्टींचं त्यांनी केलेलं मराठीकरण, आणि काहि ठिकाणी ,आलेल्या आप्तेष्टांचापरिणामकारक लोकसहभाग! (ह्या दोन्ही गोष्टी मलाही अवडल्या/योग्य वाटल्यामुळे मी त्या त्यांच्याकडून उचलल्या आहेत.)
मला चांगल्या वाटलेल्या गोष्टी मी वर नोंदवलेल्या आहेतच.पण आक्षेप आहे..तो समाजमनामधे, नविन पेरणी करताना काहिच नविन न आणल्याबद्द्ल!...काहि विधी/क्रीया तर जुन्याहूनी जुने म्हणावे अश्याही दिसून येतात. धर्मातल्या विषम आणि चुकिच्या मुल्यांचं गोग्गोड समर्थनही केलं जातं(हा प्रकार आमच्याकडेही होतो)... माझं म्हणणं असं आहे,की जुन्या/चुकिच्या गोष्टी सोडताना..(पुरोहित/यजमान-दोघांनिही)त्या आपल्याच चुका आहेत,अशी जाहिर कबुली देऊन सोडल्या पाहिजेत.किमान...उल्लेख तरी आला पाहिजे.आणि मग त्या जागी नवमुल्यांची/विधिंची प्रतिष्ठापना केली पाहिजे...आणि नेमकं हेच होत नाही,कारण या नव्यांनाही जुन्याचच कौतुक अधिक आहे.
मी कन्यादानाचा विधी ज्यांना नको असतो,त्यांना त्या विधीची निर्मिती..त्याची योग्या.योग्यता सांगून त्या जागी वधु/वर-स्विकाराचा नविन विधी करवून घेतो...( या उप्पर..एके ठिकाणी वादविवादामधे पैज मारून,मी घट्स्फोटाचाही विधी ,,,एकांना रुपकामधे सांगितला होता..आणि करवून घेण्याची तयारीही दर्शविली होती..पण बेगडी/दिखाऊ पुरोगामित्वा-सारखे..ते ही,बरोब्बर वेळेला मागे हटले..असो!) या सगळ्या चर्वितचर्वणाचा मतितार्थ नवापंथ किंवा नवमत आणताना..ते खरच नव आणि आधुनिक असलं पाहिजे,जुन्या भांड्याला गुपचुप केलेलं पॉलिश नको...!!! :)

या शिवाय,-महिलांना आमच्यातल्याच काहि गुरु-जनांनी,जसे धर्मविधी शिकवले..ती परंपरा समाजानी उचलुन धरून,पुढे चालु ठेवायला सहाय्य केलं पाहिजे,ब्राम्हण मुलं ज्या लहान वयात वेदपाठशाळेत दाखल होतात,त्याच वयात मुली दाखल करवून त्यांना संपूर्ण वेदोक्त (दशग्रंथी) शिक्षणाचा आग्रह आणि कृती केली पाहिजे.(म्हणजे खर्‍या महिला पुरोहित तयार होतील,आणि धर्मातली स्त्रीविषयक विषमता मिटायला..खरी मदत होइल)..तसेच.. हिंदुसमाजातील सगळ्यांनी,ब्राम्हणेतर-मुला/मुलिंना(ही) वेदपाठशाळांमधे वेदोक्त शिक्षणासाठी प्रवेश देण्याची इच्छा/प्रयत्न केले पाहिजेत.(यामुळे धर्मातली सगळीच विषमता मिटायला एक फार मोठ्ठी सुरवात होऊ शकते,फक्त त्या दृष्टीनी सकारात्मक आणि खरेखुरे नवे दृष्टीकोन बाळगून..योग्य कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.) हे मी सगळं हिंदूसमजाच्या अंगावर ढकलून मोकळा होत नाहीये,तर.आज जसा मी,माझ्या मतिनी तयार झालेलो आहे,तसे हजार तयार व्हावे,ही इच्छा अहे म्हणून हे मत मांडतो आहे..आणि या इच्छेस्तव,प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल..असं(आज तरी) वाटतं..म्हणून!

मधुरा देशपांडे's picture

13 Jun 2014 - 11:43 pm | मधुरा देशपांडे

प्रतिसाद आवडला!!!
ज्ञानप्रबोधिनी विषयी फारशी माहिती नाही. तुम्ही म्हणताय तसा अनुभव असेलही. असे व्हायला नको हेही खरे. मी ज्यांना ओळखते त्या ज्ञानप्रबोधिनी किंवा पुण्यातल्याही नाहीत. त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2014 - 10:09 am | अत्रुप्त आत्मा

@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच>>> ते बायका स्कूलव्हॅन/रिक्षा चालवायला लागल्या,तेंव्हाही दिसले होते.पण ते केवळ आपल्या नजरेला सवय होइपर्यंतच असतं
@ पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.>>> +१

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2014 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल. "समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !

पैसा's picture

13 Jun 2014 - 10:16 pm | पैसा

लेख आणि त्या निमित्ताने आलेल्या प्रतिक्रिया फार आवडल्या.