गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २०

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
14 Jan 2015 - 9:07 pm

मागिल भाग..

मी मात्र आता अत्यंत दाटलेल्या गळ्यानी, "काका...येताना क्याटबरी नक्को..गाण्याची पुस्तकंsssss!!!!" असं उंबर्‍यातून ओरडलो, आणि टच्च भरलेल्या डोळ्यांनी ..काका दिसेनासा झाल्यावर गप्प चेहेरा करून ..गुरुजिं समोर त्या लालमातिच्या ग्गार भिंतीला पाठ टेकवून बसलो!
पुढे चालू...
=======================

माझा चेहेरा पाहून काहि विद्यार्थी गालातल्या गालात हसत,तर काहि जणं चेहेर्‍यानीच माझ्याशी सहमत होत होते. पहिलाच दिवस असल्यामुळे गुरुजिंनी मला लगेच शिकवायला घेतले नाही. आणि बाकिच्या विद्यार्थ्यांचा 'पाठ' घेता घेता फक्त माझी हलकिशी तोंडी परिक्षा घेतली.

गुरुजि:- ह्म्म्म्म्म... काय काय पाठ येतं तुला?

मी:- ..................

गुरुजि:- (हसत..) अरे पाठ म्हणजे ,हे आमच्यात'लं नव्हे! तुमच्या त्या शाळेतलं..,असं म्हणतोय हो मी!

मी:- कविता .. आणि अफझलखान शिवाजी भेट'चं - नाटक

गुरुजि:-(बाकिच्या हसणार्‍या विद्यार्थ्यांकडे पहात..) अस्सं होय! बरं बरं ..मग म्हण पाहू कोणची ती कविता! आणि शिवाजी अफझलखान भेटं ,असं सांगत जां हं यापुढे..क्का...य? हं..म्हण आता.

मी:- आवडतो मज अफाट सागर,अथांsssगं पाणी निळे. निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळेsss ए...ए...ए...ए...आवडतो मज...!

गुरुजि:- (पुन्हा हसत..कौतुकपूर्ण मुद्रेनी..) व्वा वा वा वा...! आवाज आणि गायनी चांगली आहे हो तुझी! आमच्या किश्याला मात देणार हो..तु बाकि! आता कविता कुणाची ते सांग?

मी:- जोशी मास्तरांची.

गुरुजि:- (इथे गुरुजिंसह सगळे विद्यार्थी आणि आतून डोकावणार्‍या काकू ..अफाट हसले) रामा रामा परमेश्वरा..अरे आत्मू ,कुणाची? म्हणजे ती-शिकवलेल्या मास्तराचं नाव नकोय..तीचा कवि कोण? असे विचारले हो मी तुला..ते सांग...........!

मी:- (रडव्या चेहेर्‍यातून हसर्‍यात जात..) क्क्ल्ल्ल्क.... मला नै म्हैत!

गुरुजि:- हे आमच्या गण्या सारखं झालं.मंत्राचा छंद (माहिती) आहे...पण ऋषिंचा पत्त्याच नाही! क्का..य?

मी:- ..............

गुरुजि:- बरं.. असू दे हो असू दे.. पण इकडे असे अर्धवट काहिच चालत नै हो..हाच पहिल्या दिवसाचा पाठ समज...क्का..य?

मी:- .......

या पहिल्याच परिक्षेत मी अगदी ६० ट्क्क्यांच्यावर मार्क मिळाल्यामुळे मनातून काहिसा आनंदून गेलेलो असलो..तरी घरापासून दूर गेल्यावर माझी अवस्था खरच ,आज्जिनी वर्णन केलेल्या ,त्या रानातल्या वासरू-गाय..ताटातूट प्रसंगातल्या वासरा सारखी झालेली होती! सकाळचे दहा वाजलेले..उन्हं ओटीवरच्या लाकडी गजांना ओलांडून आत शिरलेली.. आणि ते गाव आमच्या गावासारखच बंद्रावरचच असल्यामुळे कोकणातला (अंब्याइतकाच सुप्र-सिद्ध!) गरमा ..तिथे वाढत होताच. आणि मला १० ते ११ हा उरलेला एक तास गुरुजिंच्या हस्तलिखितातलं ,एक संस्कृत अंकलिपि'चं पान-पुढ्यात घेऊन बसण्यात घालवायचा होता..आणि आता मनाला कित्तीही नको नको म्हटलं,तरी सारखा आईचा तो चेहेरा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला होता. सारखं पोटातून रडू येत होतं. सखाराम काकानी आपल्याला बहुतेक फसवलं..म्हणून अज्जून रडू येत होतं. आणि गुरुजि आपले विद्यार्थ्यांना शिकवतायत..आपल्याकडे कुण्णिच लक्ष देत नाही..या भावनेनी डोळ्यातून तप्ताश्रू गळत होते. शेवटी माजघरातून बाहेर आणि बाहेरून माजघरात येता जाता,एकदा काकूंचं माझ्याकडे लक्ष गेलं.आणि एकदम हतातला आळवाचा गठ्ठा तिथेच बाजुला ठेवित,त्या माझ्यापाशी बसल्या. माझी एकंदर झालेली अवस्था पाहिल्यावर त्यांच्या जे यायचं ते लक्षात आलं आणि
मला एकदम चेहेर्‍यावरून हात फिरवित " अरे पहिला दिवस आहे ना..म्हणुन होतं असं..बाकिचे बघ कसे अभ्यास करतायत तसा तू ही करशील उद्या पर्वा पासनं"
मी:- पण मला आईची आठवण आली ती जात नै..!
काकू:- (हसत हसत...) नको घालवूस मग,मंजे जाइल आपोआप.
मी:- आणि नै गेली तर?
काकू:- नै गेली.., तर माझी आठवण काढ..मी येइन की नै लग्गेच!?
मी:- पण तू माझ्या आईसारखी गोल साडी कुठे नेसतेस? तुझी तर नौव्वारी!
काकू:-(हसत..) आय्या...हो का? " असं म्हणून आमच्या गुरुजिंकडे लट्क्या रागानी पहात.. म्हणाल्या, " ते तुमच्या गुरुजिंना सांग.म्हणजे होइल हो तसेही!"
यावर मी आणि तिथले काहि विद्यार्थी, या गुरुजि विरोधी आघाडीमुळे हळूच हसलो..आणि पलिकडून गुरुजिंनी ह्या दृष्याचा " अगो...नविन पोरं आलं की व्हायचेच असें.तू कसली समजावण्या काढीत बसतेस?तुझ्या कामाला जा तू!..क्क्या..य?" असा (त्यांच्या...त्या-'क्का..य' सह..) समाचार घेतला.

तो पर्यंत ११ वाजलेही! आणि गुरुजिही त्यांच्या नेहमीच्या सवईप्रमाणे पळीभांडं वाजवून.."चला उठा"...असं म्हणाले. मला एकदम तो पळीभांड्याचा आवाज माझ्या शाळेच्या घंटेजवळ घेऊन गेला.आणि मगाचच्या काकूच्या समजावणीमुळे आणि या समजाणिवेमुळे एकदम मन हलकं झालं. मग सगळ्या विद्यार्थ्यांच्यासह मी उठलो..आणि पहिल्यांदा आंगणात पळालो. हा आधिच्या जाणिवेचा परिणाम कि काय? माहित नाही. पण माझी ती उंबरठ्यावरून आंगणातली दण्ण...दिशी मारलेली उडी पाहून, जाता जाता गुरुजिंनी किशोर'ला डोळ्यांनीच काहितरी खूण केली. त्या किशोरनी मला मग एका हाताला धरून.."तुझं कालचं पंचा उपरणं घे,आणि चल माझ्याबरोबर" .असं म्हणत,खांद्यावर पंचा/उपरणं असं घेऊन मागे..विहिरीकडे नेलं. मला पोहायला आधीच येत असल्यामुळे त्याचं भय नव्हतं.पण आता तिकडे नेऊन माझी रहाट ओढण्यावर नियुक्ती होते की काय? असं मात्र वाटलच. पण हा किशोर उर्फ (नंतरचा..किश्या) माझ्याच वयाचा असल्यामुळे मी त्याच्याबरोबर सहज गेलो..

आणि माझी पाठं शाळा - या जगतातल्या नियमांशी ओळख सुरु झाली . पैकी... "स्वतःचे कपडे स्वतःच धुणे!(पहिल्या दिवसापसून..)" या नियमाशी,माझी कृतीशील ओळख घालून देण्यात आली. विहिरीवर गेल्यानंतर.. ''मला नै ना माहित, कसे धुवायचे कपडे?" असा केलेला माझा चेहेरा,किश्याला कळला..आणि त्यानी मला फक्त "तिकडे बघ!" असं मानेनीच खुणावलं. पाहतो...,तर पलिकडच्या कपडे धुवायच्या दगडावर दोन अगदी एकाच सारखी दिसणारी मुलं,आळिपाळिनी पंचे-आपटत होती. मी...'पाठाशाळेत कालपासून न दिसलेली ही कोण दोघं?" असं किश्याला विचारायला वळणार ,तेव्ह्ढ्यात त्यातल्याच एकानी मला तिकडूनच.. "ए...नविन दादा..इकडे ये" अशी हाक मारली. माझ्यापेक्षा तीन्/चार वर्षानी लहान असलेले हे दोन एकमुखी बालगण माझ्या आधी इथे-असलेले पाहून, माझं ते (सकाळपासूनचं) रडूबिडू एकदम दूर गेलं.आणि - "कपडे कसे धुवावे?" याचं प्र'शिक्षण,त्या जुळ्यांनी-मला दिलं. घरी मी शाळेतून दररोज मळवून आणलेला रुमाल...सखाराम काकाच्या "प्रत्येकानी दररोज,स्वतःचा एकतरी कपडा धुवायचा" या शिस्तीमुळे कसाबसा दगडावर रगडायचो.पण इथे त्याच्या दसपट घाम निघाला. हे दोघे बालवीर...(गुरुजि त्यांना शुंभ्/निशुंभ म्हणायचे! ) जेमतेम आठ/नऊ वर्षाचे असतील नसतील्,पण माझ्या आधी कपडे धुवून पिळ्यामारून खांद्यावर घेऊन वाडितून भरभर जायला निघालेही! नंतर मला कळलं की हे जुळे (श्रीराम आणि जयंराम) वयाच्या पाचव्यावर्षी.. अगदी मुंज झाल्याच्या दुसर्‍या महिन्यात..पाठशाळेत आणले गेले होते! आणि ते ही कुठून?????? तर आमच्या रायगड जिल्ह्यापासून दू......................र - मध्यप्रदेशातून. मग मात्र मला "मी कैच लांब आलो नै!" असं जे वाटायला लागलं ते अगदी पाठशाळेतून संपूर्ण अध्ययन संपवून पाठशाळा सोडे-पर्यंत!

हे दोघेही मुळचे आपले मराठीच. पण शिव किंवा पेशवेकाळी त्यांचे खापरपणजोबा याच रायगड जिल्ह्यातून तिकडे-हलविले गेले होते. आणि या दोन मुलांना शिकविन तर वेदज्ञानच!आणि ते ही आपल्याच प्रदेशात! अशी प्रतिज्ञा करून त्यांच्या वडिलांनी इकडे आणले होते. हे दोघेही खरोखर श्रीराम आणि जय-राम.. असेच होते. तीक्ष्ण आणि कुशाग्र बुद्धीमत्तेचे! त्यातला पाच मिनिटानी लहान असलेला जयंराम जरा उखडेल प्रवृतीचा आणि चंचल स्वभावाचा होता.पण पांठांतरात मेला भलताच ते........ज होता हो! बाकिच्यांना जो विषय पाठ व्हायला (आमच्या अभ्यास पद्धतीमधल्या) सामान्यतः १६ संथा-घालाव्या लागतात. तिथे हा पोर्‍या तोच अध्याय नवव्या किंवा दहाव्या संथेत तयार करून -आवृतीला मोकळा! आणि तो ही नुसता पाठ नाही,तर...आधून/मधून/पाठून/पुढून..कुठूनही कस्साही विचारा.., अगदी आमच्या परिक्षेला जसा लागतो,तसा चौफेर तैय्यार! मोठा भाऊ श्रीरामही १६ च्या ऐवजी १२ संथेत पाठ म्हणणारा..पण त्याला याच्या इतकं चौफेर पाठांतर नसायचं.. पण हाच जयराम, एकदा विसरला की विसरायचाही तेव्हढ्याच फाश्टं! पण श्रीराम म्हणजे नावाप्रमाणेच...काळ्या दगडा वरची पांढरी रेघ! .म्हणजे , एकदा पाठ झालं,की काहि (वर्षांच्या ) आवृत्यांनंतर - वज्रलेप! मग मला कळलं की या दोघांनी ऋग्वेदाची संहिता -हा दिवसाचे,(पाठांतराच्या)अभ्यासाचे १० तास धरता साधारण ५ वर्षात होणारा अभ्यासक्रम पहिल्या साडेतीन वर्षात संपविला..तो उगीच नव्हे! .. होतेच मेले ते रेटून-तैय्यारीचे! यांची संहितेची (शेवटची) परिक्षा पुण्याला झाली,तेंव्हाही ह्या जयरामामुळे, आलेल्या ५ परिक्षकांनी-याची परिक्षा घेण्यासाठी खास तयारी केलेली होती! . ..
नंतर एकदा किश्या मला बोललाही! "अरे....वाइट फिल्डिंग लावलेली तेंव्हा म्हायत्यै!!!!!? आपले गुरुजिही चिंतेत होते. पण या निशुंभ्यानी अशी तोडून ब्याटिंगं केलीन,की पाचही जणं एकामागून एक चेंडू टाकत असतानाही...ह्यानी पिचवरुन इतरत्र पाहिलं सुद्धा नाही...आला कि टोलवं,घुसला की हाण्ण... असं बेतोड मैदान मारत होता. परिक्षेची वेळ सुद्धा निम्मिच पुरली! .... बोल? "
....
मला मात्र तो पहिला दिवस, सकाळच्या प्रसंगांपेक्षा या दोन मुलांच्या-त्या साध्या शिकवणीमुळे अगदी सहज गेला. त्यांच्या वयाच्या हिशोबात मी..- म्हणजे (आईच्या भाषेत..) उंडगा व्हायला-आलेला..असा असूनंही,मीच त्यांच्या पेक्षा जास्त हळवा(झालेला) आहे की काय? असं मला त्यावेळी काहि क्षण तरी नक्की वाटून गेलेलं(असणार). कारण...पाठशाळेच्या पहिल्याच दिवशी गैरहजर असणारी ही मुलं..गेली कुठे होती? तर..आमच्याच पाठशाळेपासून दोन डोंगर पलिकडे असलेल्या रानातल्या विरेश्वराच्या देवळात! .. कशाला????? तर... तिथे त्यांच्या पूर्वजांपैकी कुणीतरी देवाला दिलेल्या शब्दाखातर अतापर्यंत शिकलेली(संहितेची) वेदसेवा अर्पण करून यायला! आणि "जायचं-होतं"ते ही.. एकट्यानीच!. इकडे.."एकट्यानी जायचं नाही!"...,म्हणून गुरुजि आणि काकूनी (आधी) भरपूर दटावलेलंही होतं..पण तरिही सुट्टी संपवून गावात येता येता या दोघांन्नी वडिलांचा (आणि पूर्वजांचा) शब्द! या एका गोष्टीखातर.. ते लहान असलं तरी,-जंगल पार केलेलं होतं! एकट्यानीच! (संहिता-पाठांतराच्या महाकाय जंगलासारखच!) तेंव्हा हे बळ कुठून आलेलं असेल बंरं??? त्या देवावरच्या श्रद्धेपेक्षा,हे 'वडिलांनी' सांगितलेलं,आपण करायचयच! हा श्रद्धेनी निर्माण झालेला,जो देव आहे ना? ,,, तो..ही असली अवघड कामे करून घेत असतो! हे सगळं (तेंव्हा) समजून उमजून येण्याचं/करण्याचं वय त्यांचं तर नव्हतच. माझंही असण्याचा फारसा संबंध नव्हता! पण हे सगळं माझ्या समोर घडत-होतं! आणि एखाद्या औषधानी सहज परिणाम घडवावा,तसा माझ्यात बदलंही घडवत होतं!
धर्माचं रसायन, मनुष्य जातीकडून काय काय करवून घेऊ शकतं?,त्यातल्या चांगल्या मूल्यांची..माझ्यासमोर त्या किशोर वयात, ही अशी सुरवात झालेली होती!
================================
क्रमशः .....

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Jan 2015 - 9:13 pm | प्रचेतस

हा भाग पण भारी जमलाय.
पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 9:22 pm | टवाळ कार्टा

आवडेश

आदूबाळ's picture

14 Jan 2015 - 9:25 pm | आदूबाळ

है शब्बास! जबर आवडतं आहे.

संथा म्हणजे काय? पाठ करण्याचं एक आवर्तन का? [माझा गैरसमज होता की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा शिकवण्याला संथा देणे म्हणतात, आणि पुढची उजळणी/अभ्यास याला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची संथा एकदाच दिली जाते.]

परीक्षा कोणती? कोण घेतं? कोणती डिग्री मिळते? आमच्याकडे येणार्‍या गुर्जींना "तुमच्याकडे ही डिग्री आहे का?" असं विचारलं तर वो बुरा मानेंगे क्या?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2015 - 9:34 pm | अत्रुप्त आत्मा

@संथा म्हणजे काय? पाठ करण्याचं एक आवर्तन का? [माझा गैरसमज होता की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा शिकवण्याला संथा देणे म्हणतात, आणि पुढची उजळणी/अभ्यास याला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची संथा एकदाच दिली जाते.]

परीक्षा कोणती? कोण घेतं? कोणती डिग्री मिळते? आमच्याकडे येणार्‍या गुर्जींना "तुमच्याकडे ही डिग्री आहे का?" असं विचारलं तर वो बुरा मानेंगे क्या?>>>> हे...सर्व काहि सविस्तर सांगण्यातले आहे!
( आता जरा चरून येतो..आणि सांगतो मग सगळ! :) )

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 4:12 am | अत्रुप्त आत्मा

@ संथा म्हणजे काय? पाठ करण्याचं एक आवर्तन का? [माझा गैरसमज होता की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा शिकवण्याला संथा देणे म्हणतात, आणि पुढची उजळणी/अभ्यास याला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची संथा एकदाच दिली जाते.]>>>> इकडे स्वतंत्र लिहिले आहे.

@परीक्षा कोणती? कोण घेतं? कोणती डिग्री मिळते? >> अनेक वेदपाठशाळा/मठ/संस्था या परिक्षा घेतात..परिक्षा घ्यायला... त्या त्या आवश्यकतेनुसार विद्वान वेदमूर्ती ब्राम्हण असतात. शाखाध्यायी/दशग्रंथी/क्रमांती/घनांती/याज्ञिक कोविद्/याज्ञिक चुडामणी..अश्या पदव्याही असतात...

@आमच्याकडे येणार्‍या गुर्जींना "तुमच्याकडे ही डिग्री आहे का?" असं विचारलं तर वो बुरा मानेंगे क्या?>>> त्यांनी काहिही मानलं नाही मानलं..तरी जोपर्यंत ते तुम्हाला हवं तसं काम - देऊ शकत आहेत..तोपर्यंत असलं कहिही विचारायच्या भानगडीत पडू नका.. कारण तुमचं काम शास्त्रशुद्ध होण्याशी या - किती अध्ययन झालय? या प्रश्नाचा आणि उत्तराचा काहिही संबंध (येत) नाही. याची खात्री बाळगा.

सौंदाळा's picture

15 Jan 2015 - 11:21 am | सौंदाळा

हा भागही मस्तच
या सगळ्या डीग्र्यांमधे किरवंत कुठे येतात? त्यांनापण वेदपाठशाळेतच यावे लागते का काही वेगळी पध्दत असते?
त्यांना शुभकार्याचे आणि तुम्हाला श्राध्द, शांती आदी विधींचे नॉलेज (डीट्टेल / बेसिक) असते का?

मधुरा देशपांडे's picture

14 Jan 2015 - 9:41 pm | मधुरा देशपांडे

सुरेख.

अजया's picture

14 Jan 2015 - 10:16 pm | अजया

वाचतेय.पुभालटा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं!!!

मुक्त विहारि's picture

14 Jan 2015 - 10:41 pm | मुक्त विहारि

एका वेगळ्या विश्र्वाची सफर...

पैसा's picture

14 Jan 2015 - 11:11 pm | पैसा

खूप छान लिहिताय! असंच तब्बेतीत लिहा!

रेवती's picture

14 Jan 2015 - 11:36 pm | रेवती

छान चाललय वेदाध्ययन!

खटपट्या's picture

15 Jan 2015 - 4:37 am | खटपट्या

खूप सुंदर ! असे काही पहील्यांदाच वाचतो आहे.

अत्रन्गि पाउस's picture

15 Jan 2015 - 8:47 am | अत्रन्गि पाउस

फारच प्रत्ययकरी .....घरापासून दूर राहातान्नाचे स्वानुभव नाही आणि म्हणून वरची वर्णने लैच टचिंग हैत ....
पुढचा भाग लौकर टाका ...

पुभाभावे, श्रीजजोशी यांची आठवण करून देताय. एक संपूर्ण पुस्तक होईल याची खात्री आहे. हे थोडे भाग लिहलेले घेऊन दोन तीन प्रकाशकाकडे जाऊन या सत्वर.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 10:48 am | अत्रुप्त आत्मा

@ हे थोडे भाग लिहलेले घेऊन दोन तीन प्रकाशकाकडे जाऊन या सत्वर.>>> येस्स! आजच सुरवात करतो. ही पावती गेल्या काहि लेखांपासून मिळतच आहे. मीच लक्ष द्यायला उशीर केलेला आहे. मनःपूर्वक धन्यवाद. :)

सौंदाळा's picture

15 Jan 2015 - 11:18 am | सौंदाळा

+१०० तो कंजुसकाका, उत्तम कल्पना
अशा स्वरुपाचे लिखाण पुर्वी कधी वाचले नाही

नाखु's picture

15 Jan 2015 - 11:33 am | नाखु

वरील सर्वांशी बाडिस.
बुवा तुमची निरिक्षण शक्ती-स्मरण शक्ती-कल्पना शक्ती तिन्हींना सलाम्.अनुभवात सामिल करून घेतना कुठेही कटुता/अढी नाही हे मला जास्त आवडले.

कंजूसरावांशी प्रचंडच सहमत. खूप उमदे आणि तितकेच दुर्मिळ लिखाण.

प्रमोद देर्देकर's picture

15 Jan 2015 - 10:50 am | प्रमोद देर्देकर

+१११११११११११११११ कंजुष काकांना अनुमोदन.
अहो आत्मुदा तुमची लिहण्याची शैली खुप छान आहे. एखादे पुस्तक सहज छापता येईल.

राजाभाउ's picture

15 Jan 2015 - 10:53 am | राजाभाउ

+१११११
अगदी अगदी

राजाभाउ's picture

15 Jan 2015 - 10:52 am | राजाभाउ

वा वा वा ! अप्र्रतिम. आगदी डोळ्यासमोर उभं केलत सगळ,

स्पा's picture

15 Jan 2015 - 11:28 am | स्पा

सुपर एकदम
नवीन सिरीज का नाही सुरु केली
हा स्वतंत्र विषय झाला असता

गणेशा's picture

15 Jan 2015 - 12:18 pm | गणेशा

गुरुजी, मी मध्ये येथे नसल्याने आधीचे भाग वाचले नाहीत.. संपुर्ण वाचुन काठेन.. जमल्यास सगळ्या भागाच्या लिंका द्या की. शोधत बसावे लागेल खुप

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा

@जमल्यास सगळ्या भागाच्या लिंका द्या की. शोधत बसावे लागेल खुप.. >>
हे घ्या:- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९

अभ्या..'s picture

15 Jan 2015 - 7:47 pm | अभ्या..

गुरुजी, गुरुजी...
भारी जमलय सगळं. मस्त अनुभवसंपन्न अन आशयाने भरलेले सफाईदार लिखाण येत आहे तुमच्याकडून.
प्रचंड आवडतेय हि लेखमाला. जिओ. :)
.
.
बाकी त्या तसल्या पिवल्या पिवल्या जिल्ब्या पडेनात आजकाल. (संपादकीय) बूच बसलेय काय. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा

@(संपादकीय) बूच बसलेय काय. >> नाही. मीच तसलं लेखन करायच नाही ,असा निर्णय घेतलाय. आणि आजंहि त्यावर ठाम आहे. :)

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 10:13 pm | टवाळ कार्टा

आनी आम्च गुर्जी नाय तर आमी शिश्यगन पन नाय लिवनार :)

शैलेन्द्र's picture

15 Jan 2015 - 8:49 pm | शैलेन्द्र

मस्त चाल्लय गुरुजी..

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2015 - 9:27 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे, आवडत आहे हे वे सां न ल..
स्वाती

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2015 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद ! :)