मागिल भाग..
आणि मग मी,गुरुजी आणि बाकिचे सर्व विद्यार्थी, तो परिक्षे आधीचा महिना-फुल्ल तयारी करून..परिक्षा द्यायला निघालो- ते महाराष्ट्राच्या एका महान शहरात...म्हणजे कुठे???? तर
................."
पुढे चालू...
==============================
म्हणजे कुठे???? तर
होय हो!..तुमचेच पुणे - "ते विद्येचे माहेरघर-पुणे !ते मंडईचे पुणे..ते गणपति मारुतिंचे पुणे!.. ते शनिवारवाडा आणि लालमहालाचे पुणे!" काय आहे ना? आमचा काका नेहमी म्हणायचा, "या पुण्याची तारिफ नाहि केली ना? तर, आपल्याला घुसखोरां सारखं वागवतात हो ,ही लोकं! आलेले आहेत सगळे कोकणातून आणि घाटावरच्याच इतर भागातून. पण आपणच मूळचे पुणेकर असल्याचा अस्सा काहि अभिमान असतो ना......,की जणू काहि स्वतः दुसरी पिढी म्हणून इथे नांदत असलो,तरी मानव उत्क्रांतिच्या आद्य ट्प्प्यातले पहिले आपणच-इथले!... अस्सा तोरा असतो यांचा. ह्यात जातींप्रमाणे असलच तर फक्त भाषाभिन्नत्व असतं बाकि सगळ सेम! काय समजलास आत्म्या??? मंजे कसबा पेठेतला एखादा खानदानी देशस्थ, नविन इमारतीत झालेल्या आपल्या फ्लॅट कडे बघताना "अहो...आमच्या खापर पणजोबांनी पेशवाईच्या शेवटी बांधलेल्या वाड्याच्याच जागी उभी केलीये आमची नवी बिल्डिंग! आणि बिल्डरला फक्त हमालीला घेतला हामालीला..हातात जागा नाहि दिली त्याच्या. ह्हे!!! शेवटी आंम्ही मल्ल्हारीरायच्या वंशातले अस्सल कुलकर्णी आहोत. आपलं ते आपलं! काय वाटलं काय तुम्हाला???" असा आपल्यावर उगीच जागा-दाखवताना राग काढून आपलं जुनेपण दाखवित असतो. आणि तोच जुन्या पोलिस लैन जवळचा भवानी अगर नाना पेठेतला एखादा असेल तर तो, "काका...जरा हिकडं नजर टाका! ह्यो बंगला बगितला का बंगला . आपुन बांदला ग्येला वर्षी. पार ह्या पक्षापासून त्या पक्षापरेंत वळख काडली,या आडलेल्या जागेसाटी.. आन जो मदी आला काडी घालायला..त्याची &%$# घा&^%$# त्याच्या तर ................ एकेक्काच्या! हा......!!! मंssssग?????,वाटलं काय तुम्माला? आमी शिवाजीच्या काळातले घोरपडे ए...शिवाजीच्या काळातले. कवा बी गाजवनारच! नादच करायचा नाय आपला...!" असं प्राचिनत्वात नेऊनच आपल्याला दमात घेत असतो. तेंव्हा गेलास पुण्याला तर ह्या असल्या-सगळ्या दिंडी दरवाज्यांना नमन करूनच शिर हो त्या शहरात. "
नाहि म्हणायला माझं मत काका इतकं टोकाचं नसलं...तरी ,मी (ल्हान असताना..) वडिलांबरोबर एकदा, सूमी आत्याच्या मुलिच्या लग्नात.आणि सखारामकाका बरोबर दोनदा कुणाच्या तरी मुंजित..याच पुण्यपत्तनात आलेलो होतो. पण तेंव्हाच्या स्मृतीहि फारश्या काहि वेगळ्या नव्हत्या. म्हणजे स्वारगेटला उतरण्या आधी (लांबुन.. ) दिसलेलं न्हेरु श्टेडियम्,आणि नंतर आमच्या कोणातरी नातेवैकांकडे (चालत..)जाताना दिसलेली सारसबाग आणि पर्वती! आणि त्याच दोन्ही ठिकाणी , नोकरीला असल्यासारखी-जाणारी काहि पुणेरी मंडळी. तुंम्ही म्हणाल , "काय हो आत्माराम ? तुंम्हाला (आणि खास करून तुमच्या त्या खड्डूस काकाला! ) कोण्या पुणेकरानी..आंघोळीला आर्धं बादली कोमट पाणी देऊन्, (जुन्या वाडा-सिश्टीम मधल्या)ग्यालरीत अगर गच्चीत बसवल होतन का?.....(आडोसा करून देऊन!) " तर मी म्हणेन..बादली आणि पाण्याचा उल्लेख बरोबर आहे,फक्त घरातल्यांच्या आंघोळी झाल्यावर(च) बाथरुमात-सोडलं होतं..! एव्हढं स्थानभिन्नत्व त्यात-बदला,म्हणजे मग बरोबर. नंतर सकाळचा नाश्टा बरोब्बर वेळेवर आलावता ,पण दुपारच्या जेवणाची चौकशी माझ्या काकाकडे, "नै...आत्ता बाहेर गेलात..तर येणार केंव्हा? दुपारी का संध्याकाळी???" अशी केलि होती. (हल्लीचे पुणेकर म्हणे,पाहुणे आले की एकदातरी बाहेर-जेवायला नेतात्,असं ऐकून आहे..खरे खोटे तो तळ्यातला गणपतिच जाणे!)
तर...आंम्ही सगळेजणं गुरुजिंबरोबर परिक्षेला पुण्यात आलो. मला तर येश्टीतनं उतरल्यापासूनच ग्राऊंड कसं असेल? आणि हंपायरं कशी असतील? याची चिंता लागली होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे गुरुजिंनी येश्टीश्ट्यांड बाहेर रिक्षा पहायला सुरवात केली. पण कुणीच तयार होइ ना! ( :-/ ) शेवटी एका धर्मपरायण ट्येंपोवाल्याला आमच्या त्या प्राचीन पंडित वेशधारी समुहाकडे बघून दया आली,आणि त्यानी गुरुजिंना , "बसा हो द्येवा...ही ब्येनं न्हाई सोडायची तुम्माला..मी सोडतो!" असं आदेश वजा आमंत्रणच दिलं. मग आंम्ही सगळेजणं त्या ट्येंपोत बसतो. खटार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. असा एक ऐतिहासिक आवाज काढून तो ट्येंपो सुरु झाला,आणि सुमारे अर्ध्या तासानंतर त्या ट्येंपोनी इष्ट स्थळी पोचिवलन एकदाचं. ट्येंपो पोलिसच्या बं..............द गाडी सारखाच असल्यामुळे आंम्हाला बाहेरचं विशेष काहिच दिसलं नाही. पण जेंव्हा एका बोळातून आंम्ही एका भल्या मोठ्ठ्या प्राचीन वाड्यासमोर आलो..तेंव्हा पुण्याच्या बालेकिल्यात आपण पोहोचलोय्,हे माझ्या बालमनानी तेंव्हा सुद्धा ओळखलं.
ही इमारत म्हणजे पुण्यातल्या काहि अतीप्राचीन पाठशाळांपैकी एक होती. आणि दुसर्या दिवशी आमची परिक्षाही तिथेच होती. आंम्ही आत गेलो,आणि त्या पाठशाळेतल्या काहि ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी गुरुजिंना तिथे जिन्या समोरच साष्टांग नमन केलं. त्यातल्या 'संदेश' नामक एका विद्यार्थ्यानी गुरुजिंना, "प्रवास बरा झाला ना? विद्यार्थ्यांना काहि त्रास बगैरे झाला नाही ना?" इत्यादी चौकशी आपुलकिनी केली ,आणि आमची त्या वाड्यातल्या एका खोलित व्यवस्था केली. गेल्या गेल्या सगळीजणं आधी (राहिलेली..) सायंसंध्या करून जेवणाची वाट बघू लागली..पण तोपर्यंत एक दोन ज्येष्ठ विद्यार्थी गुरुजिंपाशी आलेच. आणि आगदी भावपूर्ण भाषेत त्यांच्याशी बराच वेळ कसलीतरी चर्चा करत राहिले. मी आणि सुर्या (कंटाळून..)त्या पाठशाळेच्या गच्चीवर गेलो. तर तिथून पलिकडच्या इमारतीच्या गच्चीवर एक कॉलेज कुमार आणि कुमारी ,एका छोट्या ट्येपरेकॉर्डरीतून गाणी ऐकत गुलुगुलु गुलुगुलू करत असलेली दिसली..(पहिल्यांदा)मला जरा विचित्र वाटलं,पण सुर्या मात्र कोंबडीसारखी..मान वर-वर करून निरखित होता. त्याच्या निरखण्यामुळे माझीही उत्सुकता वाढली आणि मी ही बघायला लागलो. पण.... तेव्हढ्यात त्या शाळेचा तोच ज्येष्ठ विद्यार्थी आमच्याकडे रागानी बघत ( दुष्ट कुठचा! :-/ ) आंम्हाला घेऊन जेवणाच्या हॉलकडे गेला.आणि जाता जाता..."नानांना सांगितलं पाहिजे,यांची तक्रार करायला" असं काहिसं पुटपुटला. यातल्या ''नाना" आणि "यांची-तक्रार" या शब्दांनी आंम्ही मात्र उगाचच घाबरलो. मग रितसर जेवणं वगैरे झाली..आणि उगवली मग आमची त्या परिक्षा हॉलमधली - सकाळ!
इकडे मी आणि सुर्या सकाळी उठल्यापासून सावध अवस्थेत आमच्या पिशव्यांजवळून फिरत होतो. पण गुरुजि असे काहि तिथे बसले होते..कि आंम्हाला पाठांतर विषयातलं..काहि म्हणजे काहिही परत-पाहाता येऊ नये. कारण, "ज्या दिवशी परिक्षा,त्या दिवशी पोथ्या पाहायच्या नाहीत..हिच दिक्षा" असा गुरुजिंचा दंडकच होता. शेवटी आंम्ही पाच जण आत गेलो,आणि तिथे आलेल्या आणखि आठ मुलांसह आमची परिक्षा सुरु झाली.
आणि अचानक मला- "हम्म्म..काय रे नाव काय तुझं"
मी:- "आत्माराम".
ते:-(माझा चेहेरा न्याहाळत..) " हम्म..म्हणा ओम त्रिपाद उर्ध्व उदैत..."
मी:-" पुरूषः पादोस्येहा भवत् पुनः................"
ते:- "व्वा! आवाज आणि म्हणणी छान आहे हो तुझी. अगदी वैदिकासारखा म्हणतोस
मला ही अशी प्रशस्ती-मिळालेली सुर्याला पाहावली नाही. आणि त्यानी त्याला विचारलेल्या प्रश्नावर उगीचच उं..................................च आवाजात सुरवात केली.त्यावर त्या परिक्षक गुरुजिंनी - " अहो शास्त्री..??? तुंम्ही संध्याकाळी-सकाळचा आवाज काढता काय?" असा सुर्याला अस्सल पुणेरी दगड हाणला. ( =)) ) मग सुर्यानी पुढे सगळी परिक्षा जवळ जवळ खर्जात दिलीन. तरी एकदा ते गुरुजि परत त्याला , "आता पहाट टळली,दुपार होत आली. तेंव्हा मध्यम स्वरेण पठे..त्। ....काय ? " अशी तंबी दिली. यामुळे मी खुश्श होऊन माझ्या साइडनी चौकारावर चौकार लावले ..बाकिच्या तिघांपैकी एकाचा अपवाद वगळता आंम्ही सगळेच त्या परिक्षेत पंच्याऐंशी टक्क्यानी पास झालो. गुरुजिंना खात्री होतीच. पण त्यांनी आमचं कौतुक करण जसं टाळलं होतं ..तसं जो कमी मार्क मिळवलेला,त्याला-बोलणंही टाळल होतं. दुपारी एक पर्यंत परिक्षा संपली आणि आंम्ही जेवणं करून लग्गेच दुपारच्याच गाडीनी गावी परतलो. परतीच्या प्रवासामधे परिक्षा जिंकल्याचा आनंद जेव्हढा होता..त्यापेक्षा आमच्यातलं कुणिही सपशेल हरलं नाही ,हा ही आनंद होता. कारण ,आंम्हा विद्यार्थ्यांमधे परस्पर चढाओढ कित्तीही असली,तरी ती चढाओढच होती.त्याचं कधिही द्वेषबुद्धीत किंवा मत्सरात रुपांतर झालेलं नव्हतं. अगदी सुर्या आणि मी शिक्षणात कित्तीही एकमेकाच्या खोड्या करत असलो,तरी काकूकडून मला "आज लाडू-मिळण्याची शक्यता आहे!" ही बातमी तोच मला सक्काळी सक्काळी द्यायचा. आणि गोठ्यामागे लावलेल्या आडित आंबे तयार व्हायला आलेत..ही टीप-मी त्याला!
पाठशाळेत असो,अथवा बाहेर..ती जी पहिल्या वर्षी परिक्षा झाली..त्यानंतर पुण्यातल्या तिन, मराठवाड्यातल्या दोन्,आणि काशीला झालेली याज्ञिक-कोविद'ची अखेरची परिक्षा ..इथपर्यंत आंम्हाला परिक्षा या विषयानी कधी म्हणजे कधिही छळलं अगर घाबरवलं नाही. याला कारणंही अर्थातच , गुरुजि! मला तर ते नेहमी म्हणत असत, "अरे आत्मू... परिक्षा म्हणजे काय रे शेवटी? आपण जे काहि शिकलो,त्यात आपण किती तयार आहोत? हे जाणायचा आखाडाच ना तो! मग त्याला मेलं भ्यायचं कशाला? तयार असलो..तर सरकू पुढे.आणि नसलो..तर मागे यायलाही संधी मिळालीच कि पुन्हा!" साध्या भषेतलं सोप्पं तत्वज्ञान. याउलट काहि पाठशाळांचे गुरुजि..विद्यार्थी नापास झाला,तर तो शाळेला लागलेला कलंक मानीत असत. पण आमचे गुरुजि मात्र त्या ही बाबतीत वेगळे, कुणी नापास झाला तर ती चूक ते आपली मानीत.आणि त्या विद्यार्थ्यालाही , "हे बघं,नारज व्हायचं नाही...अरे,असं होतं कधिकधी. त्यात बावरून जाण्यासारखं काहिही नाही. आणि मी तुझी आता खास वेगळी तयारी करून घेइन... तुझी तिथल्या आधी हितेच एक आणखि पूर्वपरिक्षा घेइन..फक्त एकट्याची! म्हणजे मग गाडं नक्की आडतय तरी कशात? हे ही कळेल. काहि नाराज होऊ नको...जा पाठाला बस.. जा" असं खरंखुरं आश्वस्त करित असत.
मग पुढे पहिलं वर्ष संपलं आणि दुसर्या वर्षीपासून आम्ही विद्यार्थी,अध्ययना बरोबरच पाठशाळेतल्या घरकामापासून ते वाडितल्या नारळ सुपार्यांच्या बाजारकामात सगळीकडे मदत करू लागलो. अभ्यासाच्या सर्व वेळा पाळून हे करत असल्यामुळे गुरुजिंनी आक्षेप कधीच घेतला नाही. पण फक्त अनाध्यायाच्या दिवशी स्वयंपाक करण्यापासून ते दररोज पाठशाळेत काम करण्यापर्यंत ही आमची गाडी आली ती एका प्रतिवार्षिक कार्यक्रमाचं निमित्तं घडून.. तो कार्यक्रम म्हणजे पाठशाळेचं वार्षिक अनुष्ठान.. कधी हे संहिता स्वाहाकारचं असायचं..तर कधी आठ्वड्याभर नुस्ता रुद्रःस्वाहाकार..तर कधी पंचायतन याग. हे वार्षिक अनुष्ठान म्हणजे आंम्हा मुलांना एक पर्वणीच असायची. सगळा गाव जरी लोटला नाही,तरी गुरुजिंवर निस्सिम श्रद्धा असलेली कुटुंबच्या कुटुंब ,अगदी बाहेर गावाहून(संपूर्ण सेवेला) पाठशाळेत यायची..घरी बूट पुसायला जरी नोकरचाकर मंडळी असली,तरी इथे आमच्या आंगणात तीच साहेब मंडळी स्वेच्छेनी हातात खराटा घेताना मी पाहिली आहेत. त्यांच्या बायका देखिल 'सारवायचं कसं?' असला आविर्भावंही मनात न आणता बिनदिक्कत शेणात हात घालीत असत. अगदी सुरवातीच्या दिवसाआधी, एक दोन दिवसापासून या लोकांचा आमच्या इथे खराखुरा-राबता असे. यज्ञमंडपातली तयारी, केळीचे खांब लावणे.. इथपासून ते पहिल्या दिवशीच्या अग्नि-काढण्याला सोवळी नेसून सक्रीय सहभागा पर्यंत सर्व काहि हे लोक करित असत.
माजि विद्यार्थीही असायचेच या अनुष्ठानात. शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे.
=======================
क्रमशः.....
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५
प्रतिक्रिया
29 Jan 2015 - 9:51 pm | दोस्त
छान लेख...
29 Jan 2015 - 10:37 pm | मुक्त विहारि
मस्त लेखमाला...
बरीच वाक्ये आवडली...
"आंम्हा विद्यार्थ्यांमधे परस्पर चढाओढ कित्तीही असली,तरी ती चढाओढच होती.त्याचं कधिही द्वेषबुद्धीत किंवा मत्सरात रुपांतर झालेलं नव्हतं."
"आमचे गुरुजि मात्र त्या ही बाबतीत वेगळे, कुणी नापास झाला तर ती चूक ते आपली मानीत.आणि त्या विद्यार्थ्यालाही , "हे बघं,नारज व्हायचं नाही...अरे,असं होतं कधिकधी. त्यात बावरून जाण्यासारखं काहिही नाही. आणि मी तुझी आता खास वेगळी तयारी करून घेइन... तुझी तिथल्या आधी हितेच एक आणखि पूर्वपरिक्षा घेइन..फक्त एकट्याची! म्हणजे मग गाडं नक्की आडतय तरी कशात? हे ही कळेल. काहि नाराज होऊ नको...जा पाठाला बस.. जा" असं खरंखुरं आश्वस्त करित असत."
"ते नेहमी म्हणत असत, "अरे आत्मू... परिक्षा म्हणजे काय रे शेवटी? आपण जे काहि शिकलो,त्यात आपण किती तयार आहोत? हे जाणायचा आखाडाच ना तो! मग त्याला मेलं भ्यायचं कशाला? तयार असलो..तर सरकू पुढे.आणि नसलो..तर मागे यायलाही संधी मिळालीच कि पुन्हा!" साध्या भषेतलं सोप्पं तत्वज्ञान."
ही मात्र खासच.
29 Jan 2015 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं!!! :)
30 Jan 2015 - 6:02 am | खटपट्या
खूप छान !!
30 Jan 2015 - 7:52 am | यशोधरा
मस्त सुरु आहे लिखाण. वाचत आहे.
30 Jan 2015 - 9:19 am | प्रमोद देर्देकर
वाचतोय.
30 Jan 2015 - 10:57 am | उगा काहितरीच
एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताय गुरूजी ! मस्त मजा येतेय वाचायला . धन्यवाद !
30 Jan 2015 - 12:14 pm | पदम
मस्तच
30 Jan 2015 - 2:24 pm | प्रियाजी
फार छान लेखमाला.आवडिने वाचते.
30 Jan 2015 - 3:43 pm | एस
छान!
30 Jan 2015 - 4:29 pm | सूड
वाचतोय.
30 Jan 2015 - 4:40 pm | बॅटमॅन
एकच नंबर बुवा. या सिलॅबसातील सर्वोच्च परीक्षा अजूनही काशीलाच घेतल्या जातात का ओ?
30 Jan 2015 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
@या सिलॅबसातील सर्वोच्च परीक्षा अजूनही काशीलाच घेतल्या जातात का ओ?>> नाहि रे बाबा. सगळ्या परिक्षा सर्वत्र घेतल्या जातात. पण काशिची शाल-मिळवणं आजंही मानाचं समजलं जातं.
30 Jan 2015 - 5:44 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, धन्यवाद.
तदुपरि या सर्व परीक्षांबद्दल थोडी थोडी माहिती येऊद्या. म्हणजे पयल्या वर्षीची अन शेवटची यांत कसा फरक, परीक्षा किती पद्धतीने घेतल्या जाते इ.इ. तेवढीच नवी माहिती.
30 Jan 2015 - 7:31 pm | प्रचेतस
मस्तच ओ गुर्जी.
30 Jan 2015 - 7:55 pm | निमिष ध.
गुरुजी अतिशय सुंदर ओळख करून देत आहात. बॅटॅनी विचारल्यानुसार परिक्षांमधला फरक पण येऊ द्या. काशीयात्रा आम्हालाही घडवा. तेवढेच पुण्य :biggrin:
30 Jan 2015 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्हा ह्हा =))
अहो,प्रत्यक्ष पाहाण्याचा विषय आहे तो..मी इथे लिहुन काय सांगणार नुस्त? काहि परिक्षांमधे १ परिक्षक आणि दहा विद्यार्थी,तर काहि परिक्षांमधे दहा परिक्षक आणि एकच विद्यार्थी..., इतका सामना वेगवेगळ्या पातळी वरचा असतो. ते लिहुन सांगून समजावता येणारं प्रकरणच नाही.
31 Jan 2015 - 1:36 pm | बॅटमॅन
लिहून तर पहा की. जर नाय लिहिलं तर लोकांना ही गोष्ट अस्तित्वात आहे हेच कळणार नाही हे ध्यानात असूदे म्हणजे झालं.