"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.
मित्रवर्य उद्गारलेच "गाढवाला गुळाची चव काय?" .
"यात गुळ घातला होता?" मी अविश्वासाने विचारले.
"हेच. हेच. दुनिया चंद्रावर जाउन आली आणि अजुन तुमचे पुणे - ३० चे गचाळ विनोद जात नाहित"
वास्तविक तो विनोद नव्हता. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती प्रश्न विचारण्याची. बुद्धी गहाण न ठेवलेल्या कुठल्याही माणसाला कळाले असते की त्या लस्सीत गोडवा निर्माण करणारा कुठलाही पदार्थ नव्हता. गूळ नाही, साखर नाही. बॅगोन असावे अशी दाट शंका आली पण तसे बोलुन दाखवले असते तर मित्र वस्सकान अंगावर आला असता. घरी बायकोचा मार खातो त्यामुळे आधीच दुर्मुखलेला असतो त्यामुळे काही झाले की असा वस्सकन समोरच्याच्या अंगावर येतो. पुणेकर म्हटला की याला गेस्टापोंना ज्यु दिसल्यावर व्हायचा तसा आनंद होतो. त्यामुळे लस्सीला बॅगोनचा वास आला म्हटल्यावर मी बॅगोन पितो असा सोयिस्कर निष्कर्ष काढुन तो गावभर बोंबलायला मोकळा झाला असता. वर पुण्यात हॉटेलमध्ये बॅगोन मिळते म्हणुन पण ओकला असता.
पुण्यातल्या गणेशची लस्सी चांगली असते या निष्पाप विधानाचा तो सूड होता. लस्सी म्हटल्यावर ती दह्याची हवी, त्यावर मलईचा गोळा हवा आणि ती गोड (किंवा खारट. खारट हा प्रकार एरवी मला मानवत नाही. खारट लस्सी प्यायच्या ऐवजी ताक प्याले तर काय वाईट?) हवी. तर मी परदेशात (पुणे सोडुन बाकी दुसरे कुठलेही गाव आमच्यासाठी परदेश असते. मुळात नदीपल्याडच्या वस्तीला आम्ही पुणे म्हणत नाही तर पुण्यापल्याडच्या वस्तीला तर आम्ही ओळखही द्यायला नको. पण असो. तो वेगळा विषय) जाउन प्यालेली ती लस्सी चक्क कडु होती आणि त्यात आईसक्रीम होते. आईस्क्रीम लस्सीत? अर्रे आमच्याक्डे ते मस्तानीत टाकतात (मस्तानी म्हणजे थिकशेक. मस्तानी मस्तानी काय करता? आमच्या हाज्जीअली ला याहुन भारी थिकशेक मिळते ही पण एक नेहमी मिळणारी प्रतिक्रिया. तर असो. ) .
"लस्सीत आइस्क्रीम टाकता तर तुम्ही मटकीच्या उसळीत फरसाण टाकुन त्याला मिसळ म्हणाल रे" मी कळवळुन करवादलो.
"मग मिसळ अजुन कशाला म्हणतात?"
अर्रे मिसळ म्हटल्यावर त्यात पोहे येतात, बटाट्याची भाजी येते, मटकीचे दाणे येतात, फरसाण येते तशी थोडी शेवही वेगळी येते, त्यात आम्ही चिवडा घालतो, दुसर्या दिवशी मुक्काम ठोकायचा नसेल तर् म्ह्णुन एक गोडसर आणि लाल पाट वाहु द्यायची तयारी असेल तर एक तिखट झणझणीत रस्सा तयार ठेवतो. त्यावर मस्त कांदा भुरुभुरतो, कोथिंबिर टाकतो. मग आमची साग्रसंगीत मिसळ तयार होते. झालेच तर भजीचे तुकडे टाकुन आम्ही त्याला अजुन थोडी रंगत आणतो. मिसळ म्ह्णजे असा चटकन उरकुन टाकायचा पदार्थ नव्हे आमच्यासाठी. मिसळ आमच्यासाठी पूजा आहे. बेदी, बत्रा किंवा भटांची नाही. देवळात करतो तशी. अर्रे आमच्याकडे आरतीला पण फक्त साखर देउन बोळवण होत नाही. खायचे म्हटले की तिथे आमच्याकडे कलाकुसर आलीच.
एवढे बोलुन झाल्यावर "गोड मिसळ खाणारे पुचाट लोकं तुम्ही.तुम्हाला लस्सी कडुच लागणार" असे फुत्कार टाकुन महोदय निघुन गेले. वास्तविक दोन गोष्टींचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तसा माणुस चंद्रावर जाउन आल्याचा आणि पुणॅरी विनोदाचा पण काही सम्बंध नाही म्हणा. माझ्या त्या मित्राचा आणि विनोदाचा पण नाही (आणि त्याचा आणि गुळाचापण नाही).
पण दोष त्याचा नाही. काय आहे पुणॅ म्हटल्यावर उगाचच शिव्या घालायच्या आणि आपल्याला पण कुजकटपणा करता येतो असे दाखवायची एक फ्याशन आहे. पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते.
अर्रे तुम्हाला नकोय ना गोड मिसळ? मग तर्री मागा. देतात ते. तेही नको असेल तर रामनाथला जा. पार्श्वभागातुन जाळ निघेपर्यंत तिखट नरड्यात ओता. तेही नको असेल तर टिंबर मार्केटला जा महेश भुवन मध्ये मिसळ ओरपा. अगदीच नाहितर कर्वे रोड वर आयकर गल्लीत जाउन उभे रहा. वाडगा घेउन नाही. प्लेट घेउन., हे बाहेरच्यांना समजावुन सांगायला लागते. सपच्य अमागे जा, सिष्टर षिटीत नेवाळे, दे धक्का ला जा. पण मरायला तुम्हाला मित्राच्या *गणाला ढुं** लावुन यत्ता नववीत तुमच्या शहरात खाल्लेलीच मिसळ हवी असेल तर तशीच कशी मिळेल? (इथे *गणाचा आणि मिसळीच्या चवीचा संबंध नाही. त्याचा संबंध वातावरणनिर्मितीशी आहे हे लक्षात घ्या). ढेकण्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या आज्जीच्या हातच्या पदार्थांची चव तरी एकसारखी आहे का रे? चवी बदलतात ना?
कसे असते प्रत्येक शहराची एक संस्कृती असते आणि ती तिथल्या खाद्यसंस्कृतीतुन परावर्तित होते. आता गोव्याला जाउन पाटवड्या आमच्या गावसारख्या नाही मिळत म्हणुन गळे काढण्यात काय अर्थ आहे? तिथे गेलात तर मासे खा, काजु करी खा, फेणी प्या, समुद्राचा वारा प्या. पाटवड्या तुला परसदारात मिळतात ना रे भावड्या? तुझ्या गावात मिसळीबरोबर लादीपाव देतात, ब्रेड स्लाइस देतात. पिझ्झा बेस देतात की ढेकळे देतात याच्याशी कोणाला घेणेदेणे आहे? पुणेरी मिसळीबरोबर ठिकानानुरुप यापैकी काहिही देउ शकतात (ढेकळे आणि पिझ्झा बेस सोडुन). मग? पुढे काय? पण लोकांचे हे असे असते त्यांची दुनिया स्वतःपाशी संपते. स्वतःला नाही आवडले आणि न आवडणारे आपण एकटे असलो तर हे लोक आख्ख्या समाजाच्या नावाने गळे काढणार. तुला नाही ना आवडले तु नको ना खाऊ. तिथे रांगा लावुन खाणारे मुर्ख म्हणुन कशाला केकाटतोस बाबा?
बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे. अर्रे खाण्यात राज्ये बुडवली आम्ही (याला किमान २ आयडी अनुमोदन देतील याबाबत शंका नाही). इतिहासाची पुस्तके उघडुन बघा. साले लग्नसमारंभात पानावर केवळ चटण्या ८ प्रकारच्या वाढायचो आम्ही. लोणच्याच्या जागी कोशिंबीर आणि कोशिंबीरिच्या जागी अळुचे फदफदे असले नतद्रष्ट प्रकार करत नाही आम्ही. प्रत्य्के चौथे दुकान इथे एक हॉटेल असेल आणि पाचही खंडातल्या व्यंजनांची चव चाखायला मिळेल या शहरात (पेंन्ग्विन आणी कांगारु कुठे मिळतात हे विचारु नये. अपमान करण्यात येइल). जाओ अपने गिरेबान मे जाकर ढुंढो तुमच्या शहरात जो खाद्यपदार्थ बरा मिळतो त्याचे नाव सांगा पुण्यात खायला घालतो तुम्हाला. (पैसे तुमचे. पुणेकराने वाद जिंकण्यासाठी सुद्धा स्वतःचा पैसा खर्च करावा ही अपेक्षाच फोल आहे). अर्रे आम्ही नाणे वाजवुन घेतो तिथे खायचे पदार्थ असेच कुठलेही उचलु होय? हॅट. हुडत. अर्रे केशराची कांडी आणि तिचा स्वाद आणि रंग दिसला नाही तर आम्ही चितळेच्या श्रीखंडालाही दहीसाखर म्हणुनच खाउ. पण चितळे देतो उत्कृष्ट श्रीखंड तर मग कसला आलाय दु:स्वास?
पण पण. पुणेकराचे एक आहे. "अर्रे आमच्या नागपुरची संत्री बघा एक एक काय रसाळ असतात (पुलं). नाहितर तुमच्या पुण्याच्या संत्री ..... " असली वाक्ये आमच्या तोंडुन निघायची नाहित. आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत. तुमची रसरंग, मामलेदार, गोखले, फडतरे, खासबाग, बावडा जी काही चांगली असेल ती तुम्हाला लखलाभ. आम्हीही खाउन बघु. आवडली तर आम्हालाही लखलाभ. आम्ही उगा नसतीकडे वाकड्यात शिरत नाही. अर्रे अन्न ते पुर्णब्र्हम. त्यात कसली आलीय इर्ष्या, तिरस्कार, स्पर्धा, मानापमान आणि तुच्छता (आम्ही परगावचा आख्खा माणुसच तुच्छ लेखु ती गोष्ट वेगळी). आमच्या श्रद्धास्थानांवर गरळ ओकाल तर मात्र फणा काढुन उभे राहु ही गोष्ट वेगळी.
सुदैवाने मी १० गावात राहिलो आहे. नंदुरबारचा पात्रा ज्या सुखाने चाखला त्याच आनंदाने सातारी कंदी पेढा खाल्ला, रंकाळ्यावर भेळ खाल्ली, इंदौरला कचोरी हाणली, ठाण्याला राजमाताचा वडापाव कोंबला, कुंजविहारचा वडापाव रिचवला, मामलेदारची झणझणीत ( अहाहा. आत्ताही लाळ सुटली) मिसळ, संगमनेरला सुदाम्याची पावभाजी आणि नढेची भेळ हे स्वर्गसुख अनुभवले. त्याच भक्तीभावाने मी आता कल्याणला जाउन भेळ, मनिषात पाणीपुरी, जेजे गार्डनला (आणि विट्ठल मंदिरा च्या बाहेर आणि शिवदीपमध्ये आणि भोलाकडे) वडापाव, सुप्रीमची पावभाजी, बेडेकरची मिसळ, गणेशची लस्सी आणि सुजाताची मस्तानी खाउ शकतो. देवाच्या दयेने मी खाण्याच्या बाबतीत भेदभाव करत नाही. त्याबाबतीत आकस ठेवत नाही. चांगले आहे हे कळत असुनही केवळ नावे ठेवण्याच्या लालसेपायी माझ्या जिव्हेवर अन्याय करत नाही. जे जे उत्तम उदात असेल ते ते खावे हा नियम भक्तिभावाने जोपासतो. जीभ (बोलुन आणि खाउन) संस्कृती घडवते हे माहिती असलेल्या गावात राहुन मी इतके तरी शिकु शकतोच ना?
प्रतिक्रिया
19 Nov 2013 - 6:39 pm | रेवती
मीही नगरच्या लस्सीबद्दल बरेच ऐकले होते. ट्राय केली दोन तीन ठिकाणी. एक पेय म्हणून चांगले असेल वगैरे पण ती खरी लस्सी नव्हे. खरी लस्सी पंजाबात किंवा मग दिल्लीतही बर्याच ठिकाणी मिळते. अगदी अस्सल मटक्यातली लस्सी म्हणतात तशी 'मलाई मार के' प्यायल्यास जेवण करायला नको असे वाटते. फारच पोटभरीची असते.
19 Nov 2013 - 7:40 pm | यशोधरा
हो, दिल्लीला मी प्यायले आहे मटक्यातली लस्सी. एकदम मस्त आणि पोटभरीची.
18 Nov 2013 - 2:31 pm | चावटमेला
स्टेशन जवळचे कैलास माझे फेवरिट आहे. मिसळीबाबत बोलायचे तर बेडेकर आणि श्रीकृष्ण अजूनही दर्जा टिकवून आहेत. (श्रीकृष्णमध्ये शेवटचं खाऊन सुध्दा २ वर्षे होवून गेली आता), रामनाथ कधीच आवडली नव्हती, नुसतंच तिखट जाळ पाणी, चव म्हणून नाही. रिलॅक्स ची पावभाजी खायचा योग आला नाही,तसंही मला व्यक्तिशः पाव भाजी आवडत नाही. नॉन व्हेज मध्ये मला आवारे आवडते. पण मस्तानी मध्ये मात्र सुजाताची पूर्वीची क्वालिटी नाही राहिली राव.खत्रींची पॉट मस्तानी ट्राय केली होती, चांगली वाटली.
18 Nov 2013 - 3:30 pm | शैलेन्द्र
सुजातापेक्षा खत्री चांगली..
बारामतीची दिलशाद(?) ट्राय केलीय कधी?
18 Nov 2013 - 3:40 pm | सूड
मस्तानीचं माहीत नाही. पण खत्री मध्ये आईसक्रीमचा लै वाईट अनुभव आलाय. शहाळ्याचं आईस्क्रीम म्हणून घेतलं तर ते त्यात चक्क ओलं खोबरं किसून घातलेलं असावं असं लागत होतं. शहाळ्याच्या चवीच्या अगदी जवळपासही नव्हती ती चव.
18 Nov 2013 - 4:18 pm | संजय क्षीरसागर
कधी आणि कुठेही ट्राय करा. आवडलं नाही तर व्य. नि.तून बँक डिटेल्स कळवा, पैसे परत!
18 Nov 2013 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा
@पण मस्तानी मध्ये मात्र सुजाताची पूर्वीची क्वालिटी नाही राहिली राव.>>> येकदम बराबर.मस्तानी/आईस्क्रीम खाताना डालडा तूपासारखा राप येतो तोंडात.
@खत्रींची पॉट मस्तानी ट्राय केली होती, चांगली वाटली.>>> येस येस.. खत्री इज व्हेरी खत्री! फणसाचं आईस्क्रीम पण भारी एकदम! पण वरती सुडक्या म्हणतो तसं को को ... नट'च आहे नुस्ता! ते नॅचरल्स'लाच बेस्ट मिळतं... गार/कडक शाहाळं खाल्ल्याच फील येतो. :)
आणखिन म्हणजे गुजर मस्तानी हाऊस कुठे गायबलय हल्ली..कळत नाही..मस्तानी'चे जनक ते!
आमच्या सिंहगडरोडवरची शाखा चालू होऊन बंद कधी झाली ते कळलं सुद्धा नाही.सिटीप्राईड-सातारा रोड,जवळची शाखापण कधीच उडाली. त्यांच्याकडची बाजीरावमस्तानी/दही आईस्क्रीम..आणी पायनॅपल संडे लै मंजे लैच भारी होतं. :)
18 Nov 2013 - 4:50 pm | संजय क्षीरसागर
कर्वेरोडला कर्वेपुतळ्यापाशी शीतल म्हणून हॉटेल आहे तिथे ट्रिपल संडे घेतलं की मग जेवलं नाही तरी चालतं!
18 Nov 2013 - 5:49 pm | विटेकर
आमच्या पोरांच फेवरीट.. अनेक वाटाघाटी या एका डिशवर झाल्या आहेत . शीतल चे वडई सांबार पण लै खास !
19 Nov 2013 - 4:12 am | पक्या
बरयाच आइसक्रीम मध्ये Hydrogenated oil असते शेल्फ लाईफ दीर्घकाळ राहावे म्हणून. डालडा हा त्याचाच प्रकार. कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर असे आइसक्रीम न खाल्लेलेच बरे किंवा कधीतरी कमी प्रमाणात खावे. त्यापेक्षा घरगुती पध्दतीने बनवलेले खव्याचे आइसक्रीम चांगले. त्यातही फॅट नसते असे नाही पण Trans-Fat नक्कीच नसते.
19 Nov 2013 - 10:52 am | तुषार काळभोर
वैभव थेटरच्या बिड्लिंग मध्ये
19 Nov 2013 - 6:41 pm | रेवती
सुजातामध्ये एकदाच मस्तानी दहा बारा वर्षांपूर्वी खाल्ली. हा पदार्थ काहीतरी चुकांमधून तयार झाला असावा असे वाटले. नंतर पुन्हा खाण्याचा योग आणला नाही. ;)
19 Nov 2013 - 6:49 pm | प्रचेतस
सहमत.
सुजाता मस्तानी म्हणजे पातळसर श्रीखंडच जणू. अजिबात मजा येत नाही.
कावरेकडची मस्तानी जाम भारी लागते. तिथली पेशवाई मस्तानी तर जबरीच.
21 Nov 2013 - 2:18 pm | आनंदी गोपाळ
३० वर्षांनंतरही तितकेच सुंदर आहे.
18 Nov 2013 - 2:59 pm | एम.जी.
मथुरा [ जे.एम. रोड ] इथे सिमला मिर्ची मसाला आणि तवा पराठा घ्यावा... हे कॉम्बिनेशन जालीम आहे.
पाणीपुरीसाठी टिळकरस्त्यावरील गिरिजाच्या कोपर्यात गाडी लावणार्या मावशींकडे जावे.
बेडेकर रस्श्याचे एक्स्ट्रॉ पैशे घ्यायला लागला असेल तर त्याला कुणी काही बोलो शकत नाही... तो उपकारकर्ता असल्याने त्याने उद्या मिसळीतील दाण्यांवर चार्ज लावला तरी कुरुकुर न करता जाणारे आहेत..
18 Nov 2013 - 3:51 pm | विटेकर
बेडेकर रस्श्याचे एक्स्ट्रॉ पैशे घ्यायला लागला असेल तर त्याला कुणी काही बोलो शकत नाही... तो उपकारकर्ता असल्याने त्याने उद्या मिसळीतील दाण्यांवर चार्ज लावला तरी कुरुकुर न करता जाणारे आहेत..
सहमत ! नाविलाज आहे !
18 Nov 2013 - 5:13 pm | आंबट चिंच
पुन्हा पुन्हा तेच तेच लेख मिसळपाव वर लिहिणारे बरेच झालेत या मि.पा. साइटवर.
कृपया आधीचे लेख जरा वाचाल काय? बराच काथ्याकुट झालाय या विषयावर आणि आपण महाराष्ट्रात राहून कसले हो तुम्ही नगरकर, तुम्ही पुणेकर , मुंबईकर असे भांडता?
दुसरे असे कि ठाण्याची मामलेदाराची मिसळ खाणारे लोक हो सावधान आम्हाला शालेय जीवनात तिथे एक सुचना केली गेली होती खुद्द मालकांकडून कि याला तिखट्पणा आणण्यासाठी आम्ही चुन्याची निवळिचे पाणी वापरतो आता बोला.
18 Nov 2013 - 5:34 pm | बॅटमॅन
अहो असे भांडल्याने युनिटी कमी होत नै उलट वाढते.
18 Nov 2013 - 5:59 pm | सूड
>>गेली होती खुद्द मालकांकडून कि याला तिखट्पणा आणण्यासाठी आम्ही चुन्याची निवळिचे पाणी वापरतो आता बोला.
हो का? बरं.
18 Nov 2013 - 11:18 pm | अधिराज
पुणेकर आणि पुणे परीपूर्ण आहेत, त्यांना काय गरज पडली आहे भांडायची?
18 Nov 2013 - 11:23 pm | विद्युत् बालक
चुन्याची निवळी चे पाणी परवडले एक वेळ . पण पाणी पुरीचे पाणी कशापासून बनवतात माहित आहे न?
18 Nov 2013 - 11:41 pm | अधिराज
ते तिकडे ठाणे मुबंईत! पुण्यात डिस्टिल्ड वॉटर वापरतात.
18 Nov 2013 - 11:59 pm | विद्युत् बालक
किती पुणेरी तुच्छ भाव आहे ह्या वाक्यात !
मनसे ने पुण्यात अजून हात पाय पसरलेले दिसत नाही आहेत बहुदा
19 Nov 2013 - 6:56 pm | सूड
>>किती पुणेरी तुच्छ भाव आहे ह्या वाक्यात !
आता तुम्हाला तुच्छ भावच बघायचा असेल तर तोच दिसणार. आम्हाला नै बुवा कै तुच्छ वैगरे वाटलं.
19 Nov 2013 - 9:35 pm | अधिराज
18 Nov 2013 - 6:43 pm | विजुभाऊ
काय रे लेको नगर आणि पुणे करत बसलाय.
आमच्या सातार्यात या. मोतीचौकात बामणेकडे झक्कास सातारी मिसळ खाऊन बघा. चिवड्याचेच चारपाच प्रकार असतात मिसळीत्.उगाच पुणेरी कंजूशपणा नसतो तिथे.
पोवई नाक्यावर भारत भुवन ची पुरीभाजी खाल तर बेट्ट लावून सांगतो अॅडिक्ट व्हाल.
18 Nov 2013 - 10:48 pm | मृत्युन्जय
सातारी मिसळीबद्दल मान्य. एकदम फर्मास. एकेकाळी पोवई नाक्यावर ४ ते ६ अश्या लिमिटेड पुणेरी वेळेत झक्कास मिसळ आणि भेळ मिळायची एका टपरीवर. आधी मिसळ संपणार की भेळ अशी स्पर्धा साधारण ५ वाजताच असायची. नाव विसरलो. रजताद्री पासुन थोडे पुढे चढावर होती. ही साधारण २४-२५ वर्षा पुर्वीची गोष्ट. अजुन मिळते का? शिवाय पालेकरांचे खारी पॅटीस अजुनही तितकेच कातिल असते का? आणि सध्या पेढे कोणाचे जास्त खमंग लाटकर की मोदी?
18 Nov 2013 - 11:26 pm | अधिराज
सातार्यात राजवाडा चौपाटीला मिळणारे सुपनेकरांचे पॅटिसहि प्रसिद्ध आहेत. मस्तच असतात.
18 Nov 2013 - 11:32 pm | मृत्युन्जय
मोती चौकात पुरोहित कडे सुंदर समोसा कचोरी मिळायची. अजुन मिळते का?
18 Nov 2013 - 11:57 pm | मैत्र
पालेकरांचे पॅटीस पुण्यात मिळायला लागले आहेत
त्यांनी पुण्यात तीन ठिकाणी आपली उत्पादने स्वतंत्र दुकानात आणली आहेत.
त्यापैकी भिकारदास मारुती जवळ - पुणे विद्यार्थी गृहाच्या मागच्या बाजूला एक दुकान आहे तिथे आता पालेकरांचे ताजे पॅटिस मिळतात. आणि इतर जास्त टिकणारे पदार्थ - नानकटाई, खारी वगैरे पण मिळतात.
20 Nov 2013 - 11:27 am | झकासराव
आणि सध्या पेढे कोणाचे जास्त खमंग लाटकर की मोदी? >> ह्या लाटकरांचे मावसभाउ की कोणी कोल्हापुरात आहेत.
खत्री स्वीट नावाचं दुकान.
बरच जुनं आहे..
कुंदा घ्यायला गेलो तेव्हा थोडीशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी मग गप्पांच्या ओघात सांगितलं.
लाटकर आमचे मावसभाउच पण सातार्यात मोदींचा पेढा खाउन बघा. ब्येष्ट आहे. :)
तसे तर लाटकर आणि मोदी पण पाहुणेच लागतात. त्यानी काहितरी एक रिलेशन सांगितलं होते ते विसरलो.
19 Nov 2013 - 9:23 am | लॉरी टांगटूंगकर
सातारचा फक्त केबीपीजवळचा माधवराव मिसळवाला माहीती आहे,
बामणेचा पत्ता देणे. आणि सातार्यातली अजून काही ठीकाणे माहीती असल्यास सांगणे..
19 Nov 2013 - 9:40 pm | निवेदिता-ताई
विजुभाऊ -- झकास....मी खाल्लीय सातारी मिसळ...........एकदम खास...
आणी संतोषमधील पॅटीस खाल्ले असेलच तुम्ही.....माझे फार आवडते...सातारला आले की संतोषमधे जाऊन पॅटीस चापतोच आम्ही.
20 Nov 2013 - 12:42 pm | विटेकर
ऑ .. अहो पुण्यात देखील संतोष बेकरीचे पॅटीस प्रसिद्ध आहे .. घोले रोड च्या बाजूला. म्हणजे डेक्कनच्या चितळे वरून सरळ पुढे गेल्यावर रस्ता जिथे संपतो तिथे डाव्या हाताल.
पॅटीस तर आहेच सुंदर पण तिथे अन्य बेकरी पदार्थ ही चांगले मिळतात. आणि "नोंद घेण्याजोगी" गर्दीही तिथे असते !
आम्ही कॉलेजचे बोअर पिरियड येथेच घालवले आहेत ....श्श्या.. गेले ते दिवस ! एक हातात सायकल घेऊन तो रस्ता पूर्ण तुडवायचा.. काय मजा होती!
26 Nov 2013 - 5:30 pm | विजुभाऊ
ऑ .. अहो पुण्यात देखील संतोष बेकरीचे पॅटीस प्रसिद्ध आहे ..
ओ विटेकर काका
संतोष ।हॉटेलच्या पॅटीसची संतोष बेकरीच्या पॅतीससोबत गल्लत करू नका. संतोष हॉटेलचे पॅटीस बटाटा आणि खोबर्याची चटणी या पासून बनतो. त्यात बेकरीपदार्थाचा लवलेष सुद्धा नसतो. ही पॅतीस उपवासाला चालतात.
त्यांची चव अवर्णनीय. ज्याने खाल्ली त्यालाच माहीत अशी आहे.
18 Nov 2013 - 7:06 pm | धन्या
मस्त खुसखुशीत लेख !!!
जाता जाता, आमच्यासारखे बाहेरुन येऊन नदीपल्याड स्थायिक झालेले उपरे स्वतःला पुणेकर म्हणवून घेउ शकतात का? ;)
अजून एक जाता जाता, याना सिझलर्सचे वेड लावल्याबद्दल मा. वल्लीशेठ लेण्याद्री आणि कॅफे चॉकोलेटच्या अक्रोडमिश्रीत कॅडबीची चटक आमच्या जीभेला लावल्याबद्दल मा. सुड मांडवकर यांचा तीव्र निषेध.
18 Nov 2013 - 7:57 pm | मालोजीराव
नाही ;)
आम्हीच ३५० वर्षे झाली प्रयत्न करतोय तरीसुद्धा हे लोक आम्हाला घाटावरचेच म्हणतात…ह.घ्या. :)
18 Nov 2013 - 8:02 pm | बॅटमॅन
हा हा हा, अहो मुळात सदाशिव पेठच पुण्यात नवीन आहे =)) इतके असून त्या पेठवाल्यांनी पुण्याच्या व्याप्तीबद्दल प्रवचने देणे म्हणजे काय म्हणावे त्याला विशेषण शोधतो आहे =))
18 Nov 2013 - 10:50 pm | मृत्युन्जय
एकदा दर्शन मध्येही सिझलर्स खाउन बघ. मस्त असतात. आणि तिथेच कटलेट आणि छोले भटुरे सुद्धा.
अतिशय उत्तम छोले भटुरे खायचे असतील तर मात्र मुंबैच्या (काला घोडा) बॉम्बे ब्ल्युज ला पर्याय नाही.
18 Nov 2013 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा
@मा. वल्लीशेठ लेण्याद्री
>>>>>>>>>>>>>>>>>
@मा. सुड मांडवकर
18 Nov 2013 - 9:54 pm | विद्युत् बालक
संपादकांना नम्र विनंती कि हा धाग्याला "फक्त पुणेकरांसाठी" म्हणून टयाग करावा . परत परत तेच आणि तेच !
ज्या लोकांना पुणे सोडून दुसरी कडे काही विशेष असूच शकत नाही त्यांना पुणेकर असे म्हणतात ह्या व्याख्येची प्रचीती आली !
भेंडी! मिसळपाव म्हणजे पुणेकरांचे राखीव कुरण झाले आहे :P
18 Nov 2013 - 10:45 pm | मृत्युन्जय
मिसळपाव वर प्रत्येक धागा उघडुन बघण्याचे कंपल्शन नाही हो. तुम्ही इग्नोर डिलिट मारा की. असल्या धाग्यांना अनुल्लेखानेच मारावे. फक्त ते परत परत तेच आणि तेच म्हणजे काय ते सांगा म्हणजे झाले. नाही म्हणजे हा लेख आधी कुठे वाचलाय का?
19 Nov 2013 - 3:24 am | प्यारे१
पुणेकरानं लेखकावर मात केली की...!
फसलास लेका. ;)
असला अभिमान म्हणजे जाज्ज्वल्ल्य वगैरे का?
-नर्व्हस नायन्टीज साठी मदतगार प्यारे१. ;)
18 Nov 2013 - 10:52 pm | विद्युत् बालक
एक गुणिले शुन्य पण शून्यच आणि शंभर गुणिले शुन्य पण शून्यच !
18 Nov 2013 - 10:53 pm | मृत्युन्जय
भागाकार करुन बघा मग.
18 Nov 2013 - 10:57 pm | विद्युत् बालक
आपल्या मायबोली भाषेत त्या उत्तरला "अव्याख्येय " म्हणतात हो :P
(तुमचे भाज्याचे गृहीतक चुकले )
19 Nov 2013 - 12:07 am | मृत्युन्जय
काही का म्हणेनात. उत्तर काय येते ते महत्वाचे. त्याला बटाटा किंवा हमीद म्हटले तरी फरक काय पडणार आहे ?
18 Nov 2013 - 11:01 pm | आरोही
फारच सुन्दर लेख ...
18 Nov 2013 - 11:01 pm | आरोही
फारच सुन्दर लेख ...
19 Nov 2013 - 4:36 am | पक्या
छान लेख.
जाता जाता : दिल्लीची लस्सी एकदम मस्त. आणि मिसळीचे म्हणाल तर कोल्हापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ वेगळी. खवैय्यांनी त्यात गफलत करू नये. माझी आवडती पुणेरी मिसळ कारण त्यात मटकी बरोबरच पोहे, उकडलेला बटाटा, शेव फरसाण, वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिम्बीर, खोवलेला ओला नारळ, लिंबाची फोड असते आणि झणझणीत पणासाठी तर्री वेगळी देतात. कोल्हापुरी मिसळ आवडत नाही कारण ती नुसतीच तिखट जाळ असते. पसंद अपनी अपनी.
19 Nov 2013 - 8:23 am | किसन शिंदे
छान लिहीलंयस रे एमजे!
19 Nov 2013 - 9:19 am | लॉरी टांगटूंगकर
वा.खू.सा.आ!!
19 Nov 2013 - 10:08 am | शोधा म्हन्जे सापडेल
वरती एका प्रतिसादात खिचडीवाले आप्पा गेल्याचं वाचलं. ही बातमी कधीची आहे? कारण मी दीड महिन्यापूर्वी गेलो होतो तेव्हा तो होता. छान होता. वयोमानाप्रमाणे उत्साह कमी झाला आहे. आवाजसुद्धा कमी आहे. पण आहे. अजून गेलेला नाही.
19 Nov 2013 - 12:30 pm | स्पंदना
वयाचा उल्लेख करता आणि "तो" म्हणता?
निदान त्यांनी पोटभर ताजं, सकस खायला घातल म्हणुन तरी आदर असावा. :(
19 Nov 2013 - 10:26 am | देवांग
मी सिस्टर सिटीत राहतो … कोनात दम असेल तर "नेवाळे" मिसळ फक्त २ पावामध्ये खावून दाखवा …. शरीरात जितकी भोके आहेत ना सगळीकडून धूर निघेल
19 Nov 2013 - 11:19 am | गवि
प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला असला तरी उद्देशून मात्र अन्य अनेक तिखटमिसळवर्णनांना आहे.
मी काय म्हणतो, म्हणजे आपण शांतपणे विचार करुन पाहू.. एकदम डोक्यात राख किंवा अन्य शरीरछिद्रांत धूर असं नको..
कोणताही पदार्थ (बी इट मिसळ ऑर अदरवाईज) ही एक आनंदाने आस्वाद घेण्याची गोष्ट असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. अधिकाधिक तिखट किंवा मामलेदारपेक्षा तिखट वगैरे म्हणजे टेस्टीच असं नव्हे. आपल्याला काही मरणोत्तर आपल्या आतड्यांची बॅडमिंटनला लागणारी नेट्स बनवायची नाहीयेत.
तेव्हा खाऊन दाखवा.. नाही धूर / जाळ / राख / आग / रॉकेट / ज्वालामुखी वगैरे झाला तर...हां...हाही टेसदारपणा वर्णिण्याचा एक अतिशयोक्ती अलंकार आहे हे मान्य.. पण खरंच काही मिसळी इतक्या जास्त तिखट बनवल्या जातात की त्यात चटकदारपणापेक्षा जिभेचा अॅब्युस जास्त होतो. पहिले दोन घास झाले की घासाघासाला अधिकाधिक आग आग करणार्या या तिखटाची जात वेगळी असते आणि ते मजा वाटेल असं नक्कीच नसतं. अशा मिसळीला मी तरी उत्कृष्ट म्हणत नाही.
अशा आव्हानात्मक प्रकारे दर्शविण्यासारख्या पदार्थापेक्षा चवींचा एकूण मेळ कोणीही यावे आणि खाऊन पहावे, निश्चित आवडेल अशा स्वरुपाचा असलेला पदार्थ अधिक उत्तम असं मला वाटतं..
याचा अर्थ तुम्ही वर्णिलेली मिसळ वाईटच असेलच असंच नाहीच.. त्या निमित्ताने जे लक्षात आलं ते लिहिलं.. कारण धाग्यात यापूर्वीही गोड मिसळ / तिखट मिसळ असे (टायगर कडक पत्ती चहा- वाघासारख्या मर्दांसाठी) उल्लेख आलेले दिसले.. :)
19 Nov 2013 - 11:25 am | देवांग
खरे सांगायचे तर मी ती वर्षातून दोनवेळा खातो …. आणि कोणी फुकट दिली तर :P पण खाताना मज मात्र येते हे मान्य करायला पाहिजे :)
19 Nov 2013 - 11:51 am | संजय क्षीरसागर
करेक्ट!
खाण्यासारख्या जीवलग गोष्टींवर लोक अस्मितेच्या चर्चा कशा छेडतात याचं नवल आहे. आणि त्याही पुढे जाऊन मग वाचू नयेत अशी वर्णनं येतात, ते तर फार दुर्दैवी आहे.
19 Nov 2013 - 12:07 pm | बॅटमॅन
नेमके अन मार्मिक!!! धुराची एखादी शिट्टी आली तर हरकत नाही पण स्टीम इंजिन काही बनवायचे नाहीये हे एकदम पटलं.
19 Nov 2013 - 12:23 pm | प्यारे१
डोळ्यासमोर आलेलं चित्र.
गविशेठ असे टपरीवर बसलेत. आता ते बसलेत म्हणजे एकटेच. काळ्या कडप्पाच्या टेबल टॉपवर अशा मस्त पाच सात प्लेट्स आहेत. त्यातल्या दोन-तीन मिसळ प्लेट्स संपलेल्या असल्यानं उगा तिथंच वाकड्ञा तिकड्या पसरल्यात. मिसळी च्या रश्श्यासाठी मोठ्या चमच्याबरोबर आलेला रश्श्याचा मग....
पाच सात पाव संपलेत. चार समोर आहेत. एका हातात पाव, दुसर्या हातात चमचा, मांडीवर मोठ्ठा नॅपकीन नि थोडा घाम आलेल्या चेहरा अशा पोझिशनमध्ये गवि शेठ म्हणतात...
>>>मी काय म्हणतो, म्हणजे आपण शांतपणे विचार करुन पाहू..
19 Nov 2013 - 1:35 pm | प्रचेतस
गविंशी सहमत.
नेवाळे मिसळ घरापासून तशी जवळच आहे. पण कधीच खात नाही. कारण एकच. महाप्रचंड तिखटपणा. काही वेळा तर मला वाटते आपली मिसळ जास्तीत जास्त तिखटच हवी अशी ओसीडी आहे की काय त्याला.
बाकी चिवडा, फरसाण घरी असलं की मात्र मटकीची उसळ घरी बनवायची आणि त्याच्याकडून मस्तपैकी रस्सा-तर्री पार्सल आणायची आणि मिसळीवर थोडीशी टाकायची मग अफलातून चव येते आणि आग आग पण होत नाही.
बाकी पुण्यातल्या श्री मिसळ, बेडेकर मिसळीकडून भ्रमनिरासच झालाय. पौडातली हॉटेल दिपक मधली मिसळ सर्वोत्तम असे वैयक्तिक मत.
19 Nov 2013 - 3:36 pm | देवांग
वल्ली तुम्ही नेवालेच्या समोर असलेली शशीची मिसळ खाल्ली का ? ती पण मस्त असते …मल तीच आवडते
19 Nov 2013 - 4:53 pm | प्रचेतस
ती नाय खाल्ली अजून. पण नेवाळेची बटाटा भजी आणि लाल तिखटाची चटणी जाम भारी आहे.
19 Nov 2013 - 5:04 pm | देवांग
भजी भारी नाय काय … चटणीच भारी हाय :P ती कुठल्याही भजी बरोबर चांगली लागते
19 Nov 2013 - 7:45 pm | मी-सौरभ
बुवांची आवडती करंट मिसळ पण जोरदार आहे बरं का आणी पिं.चिं. मधली 'दे धक्का' मिसळ पण भारी आहे...
बेडेकर रामनाथ मला पण नाही आवड्त
19 Nov 2013 - 8:06 pm | प्रचेतस
दे धक्का तर आमच्या बिल्डींगच्या खालीच.
पण त्याच्याकडे नुसता कांदा लसूण मसाल्याचा रस्सा असतो. मटकी वैग्रे बिलकुल नै. पण चव आहे.
19 Nov 2013 - 1:40 pm | नितीन पाठक
"मिपा" वर मिसळीबद्दल एकदम जोशात चर्चा चालू आहे. मिसळ साधी / तिखटजाळ / फिकी कशी का असेना मिसळ ती मिसळ ! या चर्चेमुळे कुठे काय खायला मिळते याची योग्य माहिती मिळ्त आहे. वेगवेगळ्या शहरात कोणता पदार्थ कुठे मिळतो याची छान माहिती मिळते. असो. अजून माहिती येउ द्या, मी जरा मिसळ चापून येतो.
20 Nov 2013 - 11:25 am | झकासराव
पण खरंच काही मिसळी इतक्या जास्त तिखट बनवल्या जातात की त्यात चटकदारपणापेक्षा जिभेचा अॅब्युस जास्त होतो. पहिले दोन घास झाले की घासाघासाला अधिकाधिक आग आग करणार्या या तिखटाची जात वेगळी असते आणि ते मजा वाटेल असं नक्कीच नसतं. अशा मिसळीला मी तरी उत्कृष्ट म्हणत नाही>> अगदी नेमकं.
:)
20 Nov 2013 - 12:29 pm | विटेकर
आपल्याला काही मरणोत्तर आपल्या आतड्यांची बॅडमिंटनला लागणारी नेट्स बनवायची नाहीयेत.
खो खो हसलो .. खरे आहे तुमचे म्हणणे आणि म्हणूनच ठाण्याच्या मामलेदार वर आमची फुली !
गड्या आपली बेडेकर बरी , अधिक चवीसाठी ते तिखट नाही तर तिखट जीभ वापरतात.. आणि तुम्हाला घाम फोडतात!
19 Nov 2013 - 5:41 pm | सस्नेह
लेखन आवडले. पण खाद्यसंस्कृतीत प्रांतवाद घुसडायलाच हवा का ?
खादी म्हणजे निर्मळ खादी ! खोबरे तिकडे चांगभले...
19 Nov 2013 - 8:09 pm | प्रचेतस
बाकी निगडीच्या बाबा रामदेव मधला मसाला खिंचिया पापड, साधा भात आणि दाल लसूणी अफ़लातून काम्बो आहे.
19 Nov 2013 - 9:45 pm | शैलेन्द्र
पिंपरीच्या सिंधी मार्केटमधला सामोसा आणि दाल पक्वान खाल्लयेस का?
19 Nov 2013 - 11:10 pm | प्रचेतस
हो. सामोसा काही ख़ास नाही. सोडा लैच मारलेला असतो. दाल पकवान मात्र बरेच वेळा खात असतो. भन्नाट प्रकार आहे.
23 Nov 2013 - 8:46 pm | चाणक्य
पिंपरीतलं पॅटीसही अफलातून असतं. पूर्वी बजाज ऑटो समोर जयश्री ची मिसळ मिळायची. कवि, नेवाळे पेक्षा ती मला आवडायची. रोड वाईडनिंग मधे गेलं ते. आतल्या बाजूला ब्रम्हा रिजेन्सी च्या बाजूला आहे आता बहुतेक ते. टेल्को भोसरी रोड वर हॉटेल मयूर च्या मिसळीबद्दल ऐकलंय. कुठे आहे माहिती आहे का? बाकी बाबा रामदेव ची दाल बाटी, चुरमा, मसाला खिंचीयां मस्त.
24 Nov 2013 - 9:17 am | प्रचेतस
हो. टिपिकल सिंधी पद्धतीचे पॅटीस.
जयश्रीची मिसळ खाल्ली होती. फारशी आवडली नाही. ब्रह्मा शेजारीच आहे ती. मयूर मिसळ अजून खायचा योग आला नाही.
एच ए कॉलनीमधल्या नाशिककरचा वडा अफलातून असतो.
24 Nov 2013 - 10:17 am | चाणक्य
चापेकर चौकातली वराडेची भुर्जी. तिथल्या पाट्या हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होउ शकेल.
24 Nov 2013 - 10:40 am | प्रचेतस
हाहा.
याबाबत आपला पास.
अंडीसुद्धा खात नसल्याने कधी भुर्जीच्या गाडीवर जायची वेळच आली नाही. :)
24 Nov 2013 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर
मग, पनीर भुर्जी करून खा. मस्तं लागते.
24 Nov 2013 - 1:13 pm | प्रचेतस
अगदी.
कधीमधी हाटेलात पनीर भुर्जी खाल्ली जाते.
घरी करायचा कधी प्रयत्न केला नाही.
24 Nov 2013 - 1:46 pm | माझीही शॅम्पेन
पनीर भुर्जी सारखा भिकार पदार्थ अजिबात आवडत नाही ,इतका छान तो पनीर त्याचा भुसा करायचा पटत नाही विशेता: पनीरचे इतर चांगले उपयोग असताना , हे माझ मत आहे कोणीही उगाच उचकू नका !!! :)
24 Nov 2013 - 1:57 pm | प्यारे१
नका ओ नका.
आमच्यासारख्या शाकाहारी 'बनलेल्यां'ना तोच एक सहारा आहे.
उगाच बुर्जी खाल्ल्याची मौज करुन घेता येते.
24 Nov 2013 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर
तुम्हाला आवडते नं? मग मजेत खात जा.
तसेही, आंबे, पेढे, सुकामेवा न आवडणारी माणसेही असतात, भुर्जी क्या चिझ है?
26 Nov 2013 - 2:59 pm | बॅटमॅन
अगदी अगदी.
बरेच लहान असताना आंब्याऐवजी पेरू अधिक प्रिय होता ते दिवस आठवून अं.ह. झालो. अर्थात त्यामागे गोडाचा अंमळ तिटकारा आणि आंबे खाताना हात बरबटून घेण्याचा तिटकारा हे फॅक्टर जास्त होते.
20 Nov 2013 - 8:11 pm | शिद
वाचनखुण साठवत आहे...पुढेमागे कधीतरी उपयोग होईल.
21 Nov 2013 - 2:18 pm | पैसा
खास मृत्युंजय श्टायल!
21 Nov 2013 - 2:53 pm | अवतार
ही बातमी तशी अवांतर आहे पण खाण्याशी संबंध आहे म्हणून..
राजेश कुमारचे वजन सध्या १५२ किलोग्रॅम इतके आहे. राजेशला त्याच्या रोजच्या आहाराबद्दल विचारले असता मिळालेली माहिती नक्कीच डोळे विस्फारणारी आहे.
राजेश कुमार दररोज तब्बल ४० अंडी खातो, सोबत ५-६ किलो चिकन, सात लिटर दूध, ६-७ किलो फळे आणि ३० पेक्षा जास्त चपात्या. याबद्दल राजेश स्मितहास्यात प्रतिक्रीया देतो की, हा सगळा माझा आहार मोठा असल्याने मी दिवसातून ७ ते ८ वेळा जेवतो.
लवकरच भारताकडून 'डब्यूडब्यूई'मध्ये दिसणार 'नवा खली'!
21 Nov 2013 - 4:02 pm | आर्य
सांगलीला रामविश्वासचे श्रीखंड/आम्रखंड केवळ अप्रतीम.......
( पुण्याच्या चितळ्यांना /दारच्या पणशीकरांना यांच्याकडे काही वर्ष म्हशी धुवायला / पाणी भरायला पाठावायला पाहीजे)
महाराष्ट्र बँकेचा-वडा, सांभाची पाणी-पुरी व गणेशचे पोहे खाल्यावर आत्मा तृप्त होतो, हे सांगली-पुणे-बेंगलोर-मुंबई इथे प्रत्येकी ३ते४ वर्ष खव्वयेगीरी केल्यावरचे माझे ठाम मत आहे.
(वर्षातुन एखाद्या वेळीच जरी सांगलीला गेलो तरी हे चुकवत नाही)
वि.सु. वडा बँकेत मिळत नसुन, लागुन असलेल्या बोळात मिळतो पण नाव महाराष्ट्र बँकेचा-वडा असेच रुढ झाले आहे. सांगलीत कुणालही पत्ता विचारावा
21 Nov 2013 - 6:33 pm | रेवती
यांच्याकडे काही वर्ष म्हशी धुवायला / पाणी भरायला पाठावायला पाहीजे
का बुवा? त्यामुळे काय फरक पडणारे? जर ती चव चांगली असेल तर आणि चवीचं शिक्रेट ते शेअर करणार असतील तर (जी शक्यता कमीच) उपयोग आहे. म्हशी धुवून जर श्रीखंडाला ती चव येणार असेल तर आम्हाला तसे नकोच! आणि तुम्ही म्हणताय तिथले श्रीखंड चांगले असेल तरी ठीकच आहे. शेवटी घराच्या जवळ जे उपलब्ध असेल ती चव आपली बनत जाते. तसेही घरी श्रीखंड केल्यावर प्रत्येकाच्या घरच्या पदार्थाची चव निराळी आणि चांगलीच असते.
22 Nov 2013 - 12:25 pm | विटेकर
अप्रतिम वगैरे नाही पण चांगले असते . चितळे हेच अस्सल ! बाकी चालू द्या .
रच्याकने मिरजेच्या 'विटा डेअरी" च्या चक्क्याचे श्रीखंड खाल्ले आहे का ? मी त्यांचे तयार श्रीखंड ही खाल्ले आहे पण जायफळाची मात्रा थोडी अधिक उगाळतात, च्यायला पाटावर आडवे ! तसे आमच्या विट्याच्या राजहंस डेअरीचे श्रीखंड ही तोडीस तोड असते !
आणि तो सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानाजवळील कढी-वडा? हल्ली पुण्यात ही मिळतो म्हणे .
आणि भड्ंग विसरलात काय ?
21 Nov 2013 - 4:51 pm | प्रसाद१९७१
शनिपाराच्या जवळच्या "श्री" मिसळ चे नाव कोणी घेतले नाही ह्याचे आश्चर्य वाटले. मला तरी फार आवडायची ती. तिथले बटाटेवडे पण.
बादशाही चे ( न्यू पुना रेफ्रेशमेंट ) चे बटाटेवडे पण मस्त असतात.