http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १
*************************************************************
श्रीनगरचा विमानतळ तिरुपतीच्या बस स्टॅण्ड पेक्षा फारसा वेगळा नाही. तसाच गोंधळ तसाच अस्ताव्यस्तपणा. बाहेर पडल्यावर मागे लागणारे तसेच रिक्षावाले / टॅक्सीवाले. हा दोन फरक आहेत. तिरुपतीसारखी डुकरे दिसली नाहीत. तशी ते पुर्ण काश्मीर मध्ये कुठेच दिसली नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान गाडीच्या टपावर टाकण्याचे तिरुपतीला कोणी ३० रुपये घेत नाही. ते सुद्धा तुम्ही कुठलीही मदत मागितली नसताना स्वतः मदत करुन. म्हणजे स्वतः होउन तुमच्या हातातुन सामान काढुन घ्यायचे. ते तुम्हीच टॅक्सीपर्यंत नेलेले असते. ते फक्त टपावर चढवायचे आणि मग खुषी मागायची. १० रुपयात कोणी खुष होतच नाही मग तुम्ही अजुन १० रुपये टेकवता तरी खुषी झालेली नसते. मग अजुन १० रुपये. तरी खुष नाही. मग तुम्ही नाद सोडुन देता. अजुन जास्त पैसे दिले असते तर त्या किमतीत एक बॅगच विकत घेता आली असती.
अखेर एकदाचे श्रीनगर शहराकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही १ मे ला गेलो होतो. त्या दिवशी श्रीनगर मध्ये चोर येतात असे आमचा टॅक्सी ड्रायवर म्हणाला. चोर म्हणजे आमदार / मंत्री गण. काश्मीरी लोकांच्या मते काश्मीर मध्ये ३ प्रकारचे चोर आहेत. काश्मिरी पोलिस. हे सगळ्यात साधे चोर कारण ते काश्मीरचे असतात. मग कश्मीर राजकारणी कारण ते हिंदुस्तानच्या इशार्यावर चालतात आणि सगळ्यात मोठे चोर मिलिटरीवाले कारण ते आम भोळ्या भाबड्या काश्मिरी जनतेवर अत्याचार करतात. तर आम्ही गेलो त्या दिवसापासुन या मधल्या फळीतल्या चोरांच्या कचेर्या श्रीनगरला हलणार होत्या. ६ थंडीचे महिने जम्मु काश्मीरची राजधानी जम्मु ला असते आणि ६ महिने उन्हाळ्यात श्रीनगरला. तसा काश्मीरला उन्हाळा नसतोच. तिथे थंडी असते आणि खुप थंडी असते. उन्हाळा नसतो. उन्हाळा फक्त जम्मुला. जम्मु म्हणजे काश्मीर नव्हे हा नविन शोध सुद्धा श्रीनगर मधलाच. हे म्हणजे विदर्भ/ मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र नाही असे म्हटल्यासारखे वाटेल. पण काश्मीरी माणसाच्या मते हे असेच आहे. काश्मिरी माणसांची अशी बरीच मते असतात जी आपल्याला विचित्र वाटतात पण ती विचित्र आहेत असे म्हणायचे नाही हे दुसरे सुत्र. काश्मिरी माणसाचा आणि दहशतवादाचा काही संबंध नाही हे मनात सारखे घोळवत राहायचे हे तिसरे सुत्र. कश्मिरी जनतेवर सगळ्यात मोठे चोर खुप अत्याचार करत असतात असा समज करुन घेणे हे चौथे सुत्र आणि आपण हिंदुस्तानी आणि ते काश्मिरी हे समजुन घेणे हे पाचवे सुत्र. ही पंचसुत्री लक्षात ठेवली की तुम्हा काश्मिर मध्ये निवांत फिरु शकता. काही त्रास नाही. कारण तुम्ही ही पंचसुत्री लक्षात ठेवलीत तर दहशतवादी 'हिंदुस्तानी पर्यटकांना' काहीही त्रास देत नाहीत.
बॅक टु श्रीनगर. मधल्या फळीतले चोर येत असल्यामुळे मुख्य रस्ते बंद होते त्यामुळे आमच्या गाडीवानाने आम्हाला कच्च्या रस्त्यावरुन नेले. आम्ही जीव मुठीत धरुन बसलो होतो. हा नक्की हाउस बोटीत नेतोय की आपल्याला दहशतवाद्यांच्या हवाली करतोय या भितीने. पण गडी खासा बोलका होता. जाताना रस्त्याने चिनार - देवदाराची झाडी दाखवत होता. काश्मिरचे डुज आणि डोण्ट्स आम्हाला समजावुन सांगत होता. काश्मिरी लोक कसे अमनप्रेमी आहेत हे आम्हाला समजावुन सांगत होता. मध्येच एकदा त्याने आतंकवादी बघायचे का म्हणुन विचारले? आम्ही हो म्हणावे की नाही या संभ्रमात पडलो . आधीच हा आपल्याला आडबाजुने अतिरेक्यांकडे नेतो आहे ही भिती होती. आता तर उघडउघड विचारत होता. आम्ही शांत बसणे पसंत केले. अखेर त्यालाच राहवेना. त्याने आपणहुन रस्त्याच्या कडेने एके ४७ घेउन उभे असलेले २ दहशतवादी दाखवले. दोघे मिलीटरीवाले होते. मिलीटरीवालेच खरे दहशतवादी हे आम्हाला पहिल्याच दिवशी मिळालेले ग्यान. त्यानंतर मिलीटरीने काश्मीरची कशी वाट लावली आहे याबद्दल ५ मिनिटांचे एक आख्यान झाले. ही काश्मीरची एकुणच खासियत. कुठलाही काश्मिरी ड्रायवर दोन गोष्टी नक्की विचारणार / ऐकवणार. पहिला प्रश्न विचारणार की काश्मिर आवडले का? आणि दुसरे भाषण देणार की काश्मीर कसे सेफ आहे, 'हिंदुस्तानी मिडीया' कसा अपप्रचार करते, कश्मिरी माणूस कसा अमनप्रेमी आहे वगैरे. इथे आपण हे फक्त ऐकुन घेणे अपेक्षित असते. यावर प्रश्न विचारणे किंवा प्रत्युत्तर देणे अपेक्षित नाही हे समजुन घ्यावे. हा अनुभव नंतर वेळोवेळी आला. एरवी काही त्रास नाही.
बाकी कश्मिरी माणसाची भाषा समजणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे काम असते. तसे आपल्याला तमिळ, तेलुग, तुळु पण समजत नाही. पण तमिळ, तेलुग, तुळु ऐकताना ही भाषा ओळखीची आहे असेही वाटत नसते. काश्मिरी ऐकताना तसे वाटत राहते. म्हणजे फक्त वाटत राहते. समजत काहीच नाही. कारण काश्मिरी माणसाची भाषा हल्दीरामच्या नवरतन फरसाणासारखी असते. त्यात कश्मिरी , डोगरी, अरबी, पश्तुन, फारसी, हिंदी, उर्दु, पंजाबी अश्या अनेक भाषांचे मिक्स्चर असते आणि त्याला कश्मिरी माणसाच्या अजब हेलाची फोडणी असते. काही कळलेच तर तो केवळ योगायोग समजावा. या भाषांव्यतिरिक्त काही कश्मिरी दुकानदार इंग्रजांपेक्षा फाडफाड शुद्ध इंग्रजी बोलतात. आणि या सगळ्या फरसाणाबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही कधीमधी मराठी आणि गुजराथी शब्दही ऐकु शकता खासकौन मराठी. कश्मीरला भेट देणारे ७०% पर्यटक महाराष्ट्रीयन असतात. त्यामुळे कश्मिरी लोकांनी "थांबा, स्वस्त आहे, कमी नाही, इकडे या, तिकडे नको, छान आहे" वगैरे शब्द शिकुन घेतले आहेत.
कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली. अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली. तेव्हा पर्यटकांच्या गाडीच्या मागे पुढे मिलीटरीच्या गाड्या असायच्या. त्याच सुमारास माझे आज्जी आजोबा अमरनाथच्या यात्रेला गेले होते. दरड कोसळल्यामुळे ते रस्त्यातच अडकले. त्यावेळेस मिलीटरीनेच तंबु ठोकुन त्यांची राहण्याची व्यवस्था करुन दिली. रात्री मध्येच कधीही धडामधूड आवाज यायचे. लोक घाबरुन बाहेर आले की सोल्जर्स शांतपणे त्यांना सांगायचे. चिंता मत करो. कुछ खास नही छोटाही बम था. हम है ना. आप टेंशन मत लो. त्यावेळेस त्या लोकांना खरेखुरे आतंकवादीही दिसले होते. शांतपणे चहा पिउन, एके ४७ लपवत निघुन गेले होते. आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट अॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही (काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.)
दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे. अर्थात तिथल्या हवामानाइतका नाही. श्रीनगर मध्ये हवामान एकदम सुखकारक होते. हाउस बोटीत तर आसपास पाणी असल्यामुळे अजुनच थंड वाटते. हा हाउस बोट एक भन्नाट प्रकार असतो. २५ किमी मध्ये पसरलेल्या दल लेक मध्ये साधारण १२०० हाउसबोटी आहेत आणि जवळच्याच नगिना लेक मध्ये साधारण ८००. दोन्ही मिळुन श्रीनगर मध्ये २००० हाउस बोटी झाल्या. पटत नाही? हे बघा:
हाउसबोटीची अंतर्गत सजावट दृष्ट लागावी इतकी सुंदर असते. मोठी मोठी झुंबरं, उंची गालिचे, भारी लाकडी फर्निचर आपल्याला एकदम राजेशाही वातावरणाची अनुभूती देते.
एक साधारण हाउसबोट बांधण्यासाठी १-२ वर्षे लागतात आणि फार नाही पण साधारण १ खोका खर्ची पडतो. आतल्या सजावटीचा आणि मेंटेनन्सचा खर्च वेगळा. एका हाउसबोट मध्ये २ ते ५ शयनगृहे, छोटेसे स्वयंपाकघर, डायनिंग हॉल आणि दिवाणखाना असतो. पाण्यात उभ्या असणार्या हा महालांच्या आतमध्ये मात्र पाणी वापरायला सक्त मनाई असते. लाकूड खराब होउ नये म्हणुन. त्यामुळे कपडे धुवायचे नाहीत, आंघोळ करायची तर बाथ टब मध्ये बसुन, धुवायचे असेल तर...... जाऊ देत ते तुम्ही तिथे जाल तेव्हा तुम्हाला कळेलच. शिवाय फर्निशिंगला बरेच दिवस पाणी लागत नाही. बाहेर जायचे असेल तर शिकार्यात बसा आणि बाहेर पडा. काश्मिरी माणसासाठी हे सगळे खुपच सोप्पे आहे. तिथे लहान लहान मुले पाठीवर द्प्तर घेउन होडी वल्हवत किनार्यावर पोचुन शाळेत जाताना दिसली. आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळे पाण्यावरच्या महालात आपण १-२ दिवसांपेक्षा जास्त राहु शकत नाही. एरवी ही हाउसबोटींची इकोनोमी मोठी आहे. पाण्यावर तिकडे आख्खा बाजार तरंगतो. संध्याकाळी शिकार्यावर बसवुन एखादा शिकारेवाला तुम्हाला दल लेकची सफर घडवुन आणेल तर दुसर्या दिवशी तोच शिकारेवाला सकाळी होडीतुन तुम्हाला ताजी ताजी फुले आणि बिया विकताना दिसेलः
दल लेक मधला गाळ उपसुन त्याचाच खत म्हणुन वापर करुन त्यावर फुलं आणि भाज्या पिकवुन त्या पण विकताना दिसेलः
माझी खुप इच्छा होती की काश्मीर की कली सारखी एखादी शर्मिला गालावर गोड खळ्या पाडत आपल्याला फुले विकायला येइल, मग मी तिच्याकडुन सगळीच्या सगळी फुले विकत घेइन. मग ती दुसर्या दिवशी परत येइल. पण मी शम्मी कपूर नसल्यामु़ळे, माझ्या मालकीच कश्मीरमध्ये हाउसबोट किंवा बंगलाच काय साधा शिकाराही नसल्यामुळे आणि आख्ख्या शिकार्यामधली फुले घेण्याची माझी ऐपत नसल्यामुळे मला फुले विकणारे केवळ बाप्येच दिसले.
बाकी या दल लेकच्या तरंगत्या बाजारात तुम्हाला पुण्याच्या लक्ष्मी रोडवर मिळणारी हर एक वस्तु मिळु शकेल. किराणा दुकानापासुन, गालिचे आणि शालींपर्यंत सगळे मिळेल. सुकामेव्यापासुन काहवा पर्यंत सगळे मिळेल. न्हाव्यापासुन गॅस सिलेंडरपर्यंत सगळे मिळेल. तुम्हीच बघा म्हणजे झाले:
बाकी हे दल लेक हे सुद्धा एक अजब रसायन आहे. याच्या पाण्याचे स्त्रोतही अनेक आहेत. अंतर्गत झर्यांचे पाणी आहे तसेच झेलमचे पाणीही आहे. पावसाने वाढ होते तशी मुघल गार्डन्स मधले वाहते झरे सुद्धा येथे येउन मिळतात. एकेकाळी हे तळे प्रदुषणमुक्त होते. आज वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रदुषणामुळे दल लेकचे पाणी आपण तोंड धुण्यासाठी किंवा चुळा भरण्यासाठी पण नाही वापरु शकत. दल लेक जगातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक तळ्यांपैकी एक आहे. अर्थात याहुन मोठी बरीच तळी आहेत. आपण भुगोलाच्या पुस्तकात वाचले आहे ते. पण तरीही २५ किमीचा परिसर एका तळ्यासाठी अवाढव्यच म्हणायचा. १२ व्या शतकात तर हे तळे ७५ किमीमध्ये पसरले होते म्हणतात. आजही या तळ्यावर लाखाहुन जास्त लोकांची गुजराण होते. आपल्याकडे जशी जमिनीची मालकी आहे तशी कश्मिरी माणसाची दल लेकवरच्या पाण्यावर मालकी आहे. तो त्या पाण्याचा मालक. तिथे त्याने त्याचा शिकारा बांधावा अथवा हाउसबोट. दल लेक मधल्या हाउसबोटीवर बसुन सकाळच्या उगवत्या सुर्याला वंदन करणे आणि सायंकाळच्या मावळत्या सुर्याला टाटा करणे हे दोन्ही सुखावह आहे हे नक्की.
चला आज जरा जास्तच लिखाण झाले. आता मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर अगेन अजुन १-२ दिवसात.
*************************************************************
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १
प्रतिक्रिया
10 May 2011 - 3:16 pm | मुलूखावेगळी
वाह खुप सुंदर लेखन
प्रत्येक शब्द वाचुन चित्र दिसु लागली. तसेच डकवलेली पिक्चर्स पन छानच.
शिकारा वर राहने खुपच मस्त अनुभव असेल ना.
पंचसुत्री सही
लक्षात ठेविलच कारन १दा तरी जायची इच्छा आहे काश्मिर ला :)
.
ओह्ह. तु तुझ्या शर्मिलाला सोबत नव्हता घेउन गेलास का?
10 May 2011 - 3:24 pm | गवि
लगेचच जायची इच्छा होतेय एकदम.
वर्णनही मस्त खुसखुशीत..
....हाऊसबोट बनवायला एक खोका (म्हणजे एक कोटी ना?!) हे ऐकून मी चाट पडलो आहे..
एक कोटी तर एका आयुष्यात ब्रेक इव्हन व्हायचे नाहीत... विचारच करता येत नाहीये. कोण करेल असा खर्च? नवीन कोणी बनवतच नसेल. मला वाटते पूर्वीच्या हाऊसबोटीच केवळ तग धरून राहिल्या असतील..
10 May 2011 - 3:28 pm | प्रमोद्_पुणे
हा भाग सुद्धा छान. आता काश्मिरमधली परिस्थीती बदलत आहे हे वाचून बरे वाटले. फोटोपण सुंदर आहेत.
10 May 2011 - 3:34 pm | मन१
फक्त एक विचारतोयः-
कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली.
खरय. खरं तर मागील दोन दशके, त्यातही मक्बूल भटला फाशी दिल्यापासुन आणि करणसिंगांना(राजा हरीसिंग ह्यांचे चिरंजीव) राज्यपाल केल्यापासुन काश्मीर प्रश्न भडकतच चाललेला आहे.
अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले.
म्हणजे अखेर पर्यटकांवरचेच हल्ले थांबले.
त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली.
महत्वाचं पाउल.
. आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट अॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही
केवळ सात दिवसावरुन "आता" तसं नाही असं म्हणणं धाडसाचं वाटत.
कुठल्याही दहशतवादी कार्यात, सरकार विरोधी लढ्यात, क्रांतिकार्यात, बंडामध्ये अधुन मधुन एक dormanted phase येतच असते. त्या अवधीत दोन्ही बाजु आपापल्या तयारीला लागुन पुढल्या लढाइला तयार होतात. युद्ध संपलेलं नसतं.
सात दिवसात काहीच झालं नाही म्हणण्यापेक्षा,सात दिवसात तुमच्या पाहण्यात काहीच आलं नाही, असं म्हणणं योग्य ठरेल.
आपण एक अल्पकालीन पर्यटक असल्यानं आख्ख्या राज्याच्या स्थितीचं दर्शन होणं आपणास शक्यही नाही आणि अपेक्षितही नाही. काश्मीर वर इथे मिपावरच शेकडो प्रतिसाद देणारे धागे आणि त्यातले काही दीर्घांकी प्रतिक्रिया वाचल्यात तर बरं होइल. काश्मीरचा घोटाळा पहिल्यापेक्षा कैकपट किचकट झालाय सध्या.
(काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.)
तेच म्हणतोय. ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं.
त्यातही सरकार सोयीस्कररित्या हल्ली प्रसारमाध्यमं काबुत ठेवत असल्यानं, तिथला जाळ्,तिथली धग आता साअमान्य भारतीयापर्यंत पोचत नाही असही म्हटलं जातय. धग आहे तिथच आहे, गुंता तसाच आहे.
दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे.
सहमत नाही.
आपण गेलात हे उत्तम.
लेख मस्त जमलाय.
--मनोबा.
10 May 2011 - 3:58 pm | मृत्युन्जय
आता परिस्थिती बदलली आहे असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा मी पर्यटनाचाच संदर्भ घेतला होता. ९० च्या दशकात पर्यटनासाठीदेखील काश्मीरला जाणे अशक्य होते. ते आता शक्य आहे. नंतर राजा राणी ने पर्यटकांना न्यायला सुरुवात केली तेव्हा मिलीटरीच्या गाड्यांच्या संरक्षणाशिवाय ते शक्य नव्हते. आता पर्यटकांना तेव्हढे भय नाही. म्हणुन परिस्थिती आता बदलली आहे असे मी म्हणालो. ते फक्त त्याच संदर्भात.
काश्मीर थंड झाला आहे असे मी म्हणालो ते ही याच संदर्भात. त्यामानाने थंड झाला आहे. दहशतवादी कारवाया अजुनही चालुच आहेत.
ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं.
मिलीटरीमुळेच आज काश्मीर अजुनही भारताचा भाग आहे नाहितर मधल्या फळीतील चोरांनी आणि देशद्रोह्यांनी आतापावेतो काश्मीर विकुन खाल्ला असता. काश्मीरी माणसाच्या मनात इतके विष भरले आहे की मिलीटरीमुळे २ निवांत क्षण तरी मिळु शकतात हेच त्यांना पटत नाही.
असो. बाकी संदर्भ पुढच्या लेखात येतीलच.
10 May 2011 - 3:44 pm | प्यारे१
सुप्पर लाईक........
तुझ्याबरोबर आम्ही पण भटकतोय.
10 May 2011 - 5:17 pm | रेवती
छानच लेखन आणि फोटू!
माझं धाडस होणार नाही तिथे जाण्याचं..........
हाऊसबोट बांधायचा खर्च जरा जास्तच वाटतो.
सगळ्या बोटमालकांचे व्यवसाय चालतात का?
त्यांचे भाडेही जास्तच असणार.
पाण्यावर तरंगणारा बाजार आवडला.
10 May 2011 - 5:45 pm | मृत्युन्जय
हाउस बोट बांधायचा खर्च जरा जास्त वाटतो खरे. पण तो तेवढा आहे हे २-३ जणांनी सांगितले. आमच्या हाउसबोटचा मालकही म्हणत होता म्हणजे खरेच असेल. अंतर्गत सजावाटीसाठीही बराच खर्च येत असावा.
एका बोटीचे आयुष्य साधारण २५-३० वर्षे असते. त्यानंतर अर्थात पाण्यात राहुन राहुन लाकुड कुजत असणार. म्हणजे अगदीच लाकडाची आहुती नसेल द्यायला लागत. पण डागडुजीची गरज असणार.
हाउसबोटीचे भाडे हॉटेल पेक्षा कमीच होते. साधारण ३ ते ४ हजारात चांगल्या हाउसबोटीत खोली मिळु शकते. काही हाउसबोटीत ८ हजारापर्यंत टॅरिफ आहे. हा उद्योग परवडणारा आहे की नाही ते नाही माहिती. पण ज्या संख्येने हाउसबोटी आहेत ते बघता परवडत असावा. रुम टॅरिफ वगळता हाउस बोटीच्या माध्यमातुन उत्पन्नाचा काही स्त्रोत वाटला नाही. बहुतेक सगळ्या हाउसबोटीतुन केवळ राहण्याची सोय होते. खाण्यापिण्याची नाही. सोय असेल तरी तिथे खाण्याचे लोक टाळतात कारण अन्न जर दल लेकच्या पाण्यात शिजवले असेल तर भगवान मालिक. पाण्याला खुपच वाईट वास असतो.
साधारण विचार करता हाउस बोटीतुन वर्षाला १२ लाखाचे उत्पन्न मिळाले तरच तो फायद्याचा व्यवसाय ठरावा. ३ ते ४ हजार रुपये रोजी भाडे लक्षात घेता आणि साधारण ३ शयनगृहे गृहीत धरुन एका दिवसाचे उत्पन्न ९ ते १२ हजार रुपये होते. म्हणजे महिना किमान १० ते १२ दिवस तरी हाउस बोट पुर्ण ओक्युपाय झाली पाहिजे. हे गणित जुळते की नाही ते माहित नाही. पण बहुधा अशक्यही नसावे. शिवाय ज्या हाउसबोटी जुन्या आहेत त्यांचा ब्रेक एव्हन झाला असेल तर फारसे अवघड नसावे.
10 May 2011 - 5:58 pm | स्मिता.
मिशन काश्मिर एकदम मस्त चाल्लंय. वर्णन आणि फोटो दोन्हीही खासच!
10 May 2011 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार
शब्दचित्रे आवडली.
ते बाजाराचे फटू जरा मोठे करुन टाक ना बे. आणि मुख्य म्हणजे पुढच्या भागात मदिरा आणि हुक्का ह्यावर जरा लिहा ;)
10 May 2011 - 7:54 pm | मृत्युन्जय
आणि मुख्य म्हणजे पुढच्या भागात मदिरा आणि हुक्का ह्यावर जरा लिहा
साहेब मदिराक्षींवर लिहु शकतो. मदिरेवर नाही लिहिता येणार. तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही.
10 May 2011 - 9:45 pm | सुनील
तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही
हे काश्मिरबाबत खरे आहे पण जम्मूत मदिरा मिळते (अगदी वाइन शॉपमध्ये!). तुम्ही जर का खुश्कीच्या मार्गाने गेला असतात तर, जिथे जम्मू प्रांत संपत येतो तिथे बरीच दुकाने आहेत. रस्त्याने जाणारे बहुसंख्य पर्यटक तिथूनच "स्टॉ़क" भरून घेतात!
बाकी, मिशन छान चालले आहे. फोटोही चांगले.
(पुराव्यानिशी) सुनील
24 May 2011 - 10:47 am | विलासराव
>>>>>तिथे मदिरेवर बंदी आहे. संपुर्ण ट्रिपमध्ये एकही दुकान दिसले नाही
हे काश्मिरबाबत खरे आहे पण जम्मूत मदिरा मिळते (अगदी वाइन शॉपमध्ये!).
मी स्वतः श्रीनगरला वाईनशॉपमधुन व्हिस्की खरेदी केली आहे २००४ ला. त्यावेळेस मिळालेल्या माहितीवरुन श्रीनगरमधे २ वाईनशॉप होते. एक दल लेकशेजारी होते. हो पण ती फक्त आम्ही आमच्या लॉजवर जाउन प्यायलो कारण कोठेही रेस्टॉरंटमधे प्यायला परवानगी नाही
24 May 2011 - 10:51 am | मृत्युन्जय
मी शोधक नजरेने बघितले असता कुठे सापडले नाहीत म्हणुन आमच्या वाहनचालकाला विचारले त्यावर त्याने दिलेली माहिती आहे ही. मी मदिराक्षींनीच भारावुन गेलेलो असल्यामुळे आणि मदिरेचे आणि माझे असेही सख्य नसल्यामुळे अजुन खोलात जाउन विचारपूस केली नाही. पण मोठ्या हॉटेलात आणि ब्लॅक मार्केट मधुन पिण्याची व्यवस्था होउ शकते असे टुर ऑपरेटर म्हणाला होता.
10 May 2011 - 7:11 pm | सखी
लेख, माहीती, फोटु आवडले. त्या तळ्याचे पाणी इतके खराब झाल्याचे वाटुन वाईट वाटले. पर्यटनाबाबत तरी परिस्थिती सुधारते आहे, हे चांगलेच आहे. पण मनोबा म्हणतात त्यातही तथ्य वाटते.
10 May 2011 - 8:26 pm | राही
गेल्या वर्षी एप्रिलमधे आम्ही जम्मू,कश्मीर(स्रीनगर,पहलगाम,गुलमर्ग,सोनमर्ग,वैष्नोदेवी आणि अनेक ठिकाणं..) इथे गेलो होतो. जम्मू,कटरा(वैष्नोदेवी यात्रेचं प्रारंभस्थान) त्यामानाने गलिच्छ आहे. पण कश्मीर खोर्याचं निसर्गसौंदर्य मात्र दृष्ट लागेल इतकं सुंदर आहे . दल तलाव,पार्श्वभूमीवर शंकराचार्य टेकडी (जिथे पर्यटकांना जायला मिळते,जाऊ दिले जाते,अशा अगदी तुरळक हिंदू धार्मिक स्थळांपैकी एक),भोवती पसरलेलं धुकं,झेलमचं संथ पाणी,त्यात मिसळलेली आकाशाची निळाई सगळंच स्वर्गीय आहे. छोट्याशा शिकार्यात गादीवर पाय पसरून आरामात पहुडावं,शिकार्यात फक्त वल्हवणारा पोरगेलासा मुलगा,त्याच्या वल्ह्याचा सप सप आवाज,झेलमचं चुळबुळणारं पाणी,कानाला किंचितसा झोंबणारा थंड वारा,अगदी समाधी लागते. नवीन केलेली ट्युलिप्सची बागही बहरली होती. हॉलंड इतकं नाही पण दृश्य खूप सुंदर होतं. जास्त तपशील लिहित नाही . नाही तर 'क्रमशः' मधली खुमारी निघून जाईल.
10 May 2011 - 8:32 pm | प्राजु
मस्तच!!
फोटोही सुंदर आहेत.
10 May 2011 - 10:17 pm | मयुरा गुप्ते
फोटोही सुरेख.
आमच्या काश्मिर सहलीची आठवण झाली. १९८४ च्या ऑक्टोबर मध्ये गेलो होतो. त्या वेळची मुख्य घटना आठवत असेल तर आम्ही श्रीनगरच्या वाटेवर असताना इंदीरा गांधी हत्या बातमी कळली होती,श्रीनगर मध्ये संचारबंदी म्हणुन सहा दिवसांचा मुक्काम करावा लागला होता.मिलिटरीची ये-जा चालु झाली होति पण एवढ टेन्शन नव्हतं. बाकी काश्मीर दर्शन छान झालं होतं.
आपला लेख वाचुन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
-मयुरा.
11 May 2011 - 7:29 am | ५० फक्त
मस्त रे, आमच्या ९९ च्या आठवणी जागा झाल्या, त्यावेळी पुढे अमरनाथ ला पण गेलो होतो, जाम मजा केली होती.
11 May 2011 - 2:19 pm | हरिप्रिया_
काश्मीरच्या वर्णनाने मला खरच पुन्हा एकदा काश्मीर फिरून यावास वाटू लागलंय...खूप छान लिहिल आहे..
पुढचे लवकर लवकर लिहा..पेहेलागामच वर्णन तुमच्या शब्दात ऐकायला आवडेल...
अवांतर : खर तुम्ही म्हणता तस मिलीटरीवाल्याना एक नंबरचे चोर म्हणारे मला कोणी दिसलं नाही, आमच्या ट्रीप मध्ये तरी...
मात्र आम्ही गाडीने काश्मीर फिरत होतो, आणि त्या गाडीवाल्यानी आम्हाला आम्ही ठरवलेल्या काही ठिकाणी (नेहमीच्या पर्यटन ठिकाणांपेक्षा वेगळ्या ठिकाणी) घेऊन जायला मात्र साफ नाकारलं..
आणि एक माणूस भेटला होता गुलमर्ग मध्ये..आम्ही त्याच्या कडून काही विकत घेत नव्हतो तर आम्हाला तत्वज्ञान शिकवायला लागला, "तुम इंडिया के लोग हमे मदत नाही करोगे तो हम क्यु ना पाकिस्तान मे जाये?" असली जाम चिडचिड झाली म्हणुन सांगू..
11 May 2011 - 8:36 pm | स्वाती दिनेश
दोन्ही भाग वाचले. छान! खुमासदार वर्णन, आवडले.
स्वाती
(मिपा सारखं गंडत असल्याने प्रतिक्रिया २/३ दा पुसली गेली..:( )
11 May 2011 - 9:07 pm | गणपा
नाव वाचुन थोडा कचरतच धागा उघडला....
पण उघडल्याच सार्थक झालं. :)
11 May 2011 - 11:00 pm | मृत्युन्जय
नाव वाचुन थोडा कचरतच धागा उघडला
नाव कोणाचे धाग्याचे की लेखकाचे ;)
11 May 2011 - 11:17 pm | गणपा
जवळपास कोणत्याच लेखका/कवीशी/भविष्यवेत्त्याशी माझे वाकडे नाही रे. :)
विकासजींनी नमुद केलेले हे विषय काळजात धडकी भरवतात हल्ली.
11 May 2011 - 11:23 pm | मृत्युन्जय
हाहाहाहा. माहिती आहे रे. इसबार अपुन गंमत कर रहा था.
11 May 2011 - 10:27 pm | शाहरुख
लिखाण आणि फोटो आवडले..वाचतोय !
11 May 2011 - 11:36 pm | शिल्पा ब
छान लेख...फोटो पण मस्त.
काश्मीरी लोकं स्वतःला भारतीय समजत नाहीत हे वाचुन खुप वाईट वाटलं.
13 May 2011 - 9:40 am | किशोरअहिरे
ह्या तथाकथित आतंकवाद्यांना रस्त्यावर ठेवायची गरज सरकारला पडत आहे, ह्यातच सगळं आलं.
>>>>>>
जेंव्हा कश्मिर वेगळे राष्ट्र निर्माण करुन देऊ अशी फितुरी पाकिस्तानने कश्मिर मधल्या मुस्लिम लोकांना दिली आणी
मग ह्याच &*&*(&*(&*(&)(&(&()& कश्मिरी लोकांनी पाकिस्तानातुन धाडण्यात आलेल्या आतंकवाद्याना स्वता:च्या घरात आश्रय दिला ... तेंव्हा कुठे गेले होते ह्यांचे अमनप्रेम नालायक कुठले..
जेंव्हा लाखो कश्मिरी पंडीताना एक एक करुन मारले जाऊ लागले आणी तिथुनच पुढे त्यांना श्रीनगर वरुन जम्मु ला हाकलुन दिले.. आणी कित्येक स्त्रियांचे बलात्कार आणि हत्या ह्याच कश्मीरी लोकांच्या मदतीने केल्या गेल्या तेंव्हा कुठे गेले अमन प्रेम
साले तोंड वर करुन बोलु तरी कसे शकतात तेच कळत नाही...
जेंव्हा पाकिस्तान ने धोरण जाहीर केले की कश्मिर वेगळे राष्ट्र नाही होणार तेंव्हा ह्याच कश्मीरी लोकांची तनतनलि आणी ह्यांच्यात मग फुट पडली..
तेंव्हा दहशतवाद ताब्यात घेण्यासाठी भारतातील आर्मी पुढे एकच पर्याय होता तो म्हणजे दहशवादाला सपोर्ट करणारी कश्मीरी जनता ह्यांच्या मुस्क्या आवळने.. ते अत्यंत आवश्यकच होते असे म्हणेल मी..
आणी मिलीट्री ची पॉलिसी पण बरोबरच होती.. एका कश्मीरी नागरिकाला बंदुकी समोर ठेऊनच त्यांनी घरा घरात जाऊन दहशद वादी पकडवलेत.. अर्थात ह्या मधे मोठे नुकसान तिथल्या नागरिकांचेच झाले नो डाऊट.. पण जैसी करणी वैसी भरणी...
आणी आता अमन प्रेमी म्हनून आणी मिलीट्री ला दहशतवादी म्हणु पाहत आहेत.. कठिण आहे सगळे :(
24 May 2011 - 10:48 am | विलासराव
आहे मिशन तुमचं.
24 May 2011 - 10:52 am | मृत्युन्जय
धन्यवाद
14 May 2015 - 9:31 am | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे! मस्त!
दल लेकचं बॅकवॉटर पाहिलंस की नाही? तिथे कमळांची शेती चालते. शेतंच्या शेतं आणि कमळं पाण्यावर तरंगत असतात, इथून तिथे वहात असतात. मी गेले होते तेहा कमळांचा मौसम संपला होता पण तरीही पाच पन्नास कमळं प्रत्येक शेतात तरंगत होती. समोरच हिरवा, निळा पहाड, रिमझिम पावसातले पहाडभर पसरलेले इंदधनुष्य, रिमझिम पाऊस, संध्याकाळचे मृदूमुलायम उन, दलचे चमकणारे पाणी आणि समोर गुलाबी, पांढरी ,पिवळी कमळं! काश्मीरमधला पहिलाच दिवस आणि संध्याकाळची दलची सफर अशा तर्हेने सार्थकी लागली होती :) नावाडी म्हणाला होता, असे इंद्रधनुष्य आल्या आल्या दिसणे अच्छा शगुन हय, आपका काम हो जायेगा! मला शॉपिंग्मधे रस नाही म्हटल्यावर त्याला फारच आश्चर्य वाटून राहिले होते! =))
आज ह्या लेखामुळे पुन्हा एकदा आठवले सगळे. धन्यवाद.
14 May 2015 - 9:26 am | इशा१२३
दल लेकचे अजुन फोटो हवे होते.....
14 May 2015 - 11:51 am | मृत्युन्जय
मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः
मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957
मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973
मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019
मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061
मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085
मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104
मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162
मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309