पर्बतो के पेडो पर शाम का बसेरा है, सुरमई उजाला है चम्पई अंधेरा है.
पहलगाम मध्ये पर्वत पण आहेत, झाडे पण आहेत आणि सुर्य जेव्हा मेघांशी पाठशिवणीचा खेळ खेळत खेळत अस्तंगत होत असतो तेव्हा काजळीच्या स्पर्षाने मोहरुन उठलेल्या नशील्या नेत्रांमध्ये जो सुरमई भावाविष्कार कुठल्याही प्रियकराला मोहवुन टाकतो तिच आणि अगदी तशीच जादू पहलगाममधला निसर्ग करत असतो. साहिर लुधियानवी ने हे गीत काश्मीरमध्ये लिहिले की काश्मीरवर लिहिले हा प्रश्न पडावा इतक्या वेळा ही अनुभूती पहलगाम मध्ये घेतली.
काश्मीरचे एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही एक ठिकाण अनुभवुन दुसर्या ठिकाणी जायला निघालात की तुमचा पाय हलत नाही. जन्नत अगर कही कै तो यही है असे तुम्हाला वाटत असते आणु नविन ठिकाणी तुम्ही परत त्याच जाणिवेने नव्याने हरखुन जाता. इथल्या प्रत्येक गावाचे वेगळे सौंदर्य आणि कुठल्याही सौंदर्याची तुलना होउ शकत नाही. इथे दल लेकमधले हलते विश्व आहे तसेच सोनमर्ग मधले बर्फाचे आगार आहे. गुलमर्ग मधला बर्फाचा शिडकावा आहे तसाच पहलगाम मधला उनपावसाचा खेळ आहे.
देवाने म्हणे देताना सर्वांना समान वाटणी करुन दिली पण निसर्गसौंदर्याच्या बाबतीत काश्मीर बहुधा देवाचे आवडते लेकरु होते. निसर्गाची पखरण इथे मुक्तहस्ते केली आहे. इथे मानवनिर्मित स्पॉट्स खुप आहेत पण देवाने इतके भरभरुन दिले आहे की मानवाचे प्रयत्न नेहेमीच फिके पडतील. आपल्या सुदैवाने इथे स्पॉट्स शोधावे लागत नाहीत कारण निसर्ग सौंदर्य तिथे संपुर्ण आसमंता, चराचरात भरुन राहिले आहे.
मला अजुनही आठवते आम्ही अश्याच एका पर्यटनस्थळाला भेट दिली होती तेव्हा पिकनिक स्पॉट्स मध्ये आम्हाला आमच्या ड्रायवरने सुसाईड पॉईंट आवर्जुन दाखवला होता. महाबळेश्वरलाही सुसाईड पॉईंट हमखास बघितला जातो. पहलगाम मध्ये किंबहुना एकुणच काश्मीर मध्ये सुसाईड पॉईंट नसावा. तो एक जगण्याचा सोहळा आहे. पहलगाम ला जाउन आत्महत्या करावीशी वाटणारा कपाळकरंटा बहुधा अजुन जन्माला यायचा असावा. पहलगामचा निसर्ग तुमच्या चित्तवृत्ती तेवढ्या प्रफुल्लित करुन सोडतो, मरगळ दूर करतो, निराशेचे मळभ दूरवर भिरकावुन देतो. त्यामुळे आमच्या नशिबाने सगळ्या हिल स्टेशन्स वर सापडंणारा सुसाइड पॉईंट आम्हाला सुदैवाने पहलगाम मध्ये सापडला नाही
कश्यपाच्या या भूमीत निसर्ग चराचराशी, परमात्म्याशी तादात्म्य पावल्यागत भासतो. त्याची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की मोहिनीच्या सौंदर्याने घायाळ झालेला शिवदेखील इथे आपल्या अर्धांगी सोबत तपस्येला बसला. खरे म्हणजे तो सर्वशक्तीमान देव. त्याला कोणाची आळवणी करावीशी वाटली असावी. त्याला कदाचित त्या निसर्गाच्या सौंदर्याची आराधना करायची असावी म्हणुन तो इथे ठाण मांडुन बसला असावा आणि त्या निसर्गदेवतेच्या प्रेमात पडुन शंकराने आपल्याला सोडुन देउ नये या भयाने बहुधा पार्वतीदेखील त्या निसर्गाशी तादात्म्य पावली असावी. पहलगाम मध्ये या अनोख्या तपस्येच्या आठवणीत बांधलेले हे शिवमंदिरः
तांत्रिक दृष्ट्या बघता पहलगाम मध्ये बघण्यासारखे काहीच नाही. एकेकाळी हिंदी चित्रपटांनी प्रसिद्ध केलेल्या दर्याखोर्या सोडल्यास पहलगाम मध्ये पर्यटकांसाठी फारसे काही बघण्यासारखे नाही. अर्थात हे विधान प्रॅक्टिकली १००% चुकीचे आहे. कारण नजर टाकावी तिथे भारुन टाकणारे सौंदर्य आहे आणि त्या निसर्गात अचल, निस्तब्ध करणारी मोहिनी आहे. हिंदु राजांनी इथे मंदिरे आणि मुस्लिम शासनकर्त्यांनी दर्गे, मस्जिदी बांधल्या नसत्या तरच नवल. श्रीनगर - पहलगाम रस्त्यावर बांधलेला हा एक सुंदर निवांत दर्गा:
याच रस्त्यावर एकेकाळच्या समृद्ध अवंतिपुराचे भग्नावशेष उरले आहेत. काश्मीरमधल्या हिंदुंवर केवले धर्मांधांनी अत्याचार नाही केले तर निसर्गानेही त्याचा सूड उगवला आहे. अवंतिपुरातली २ भग्न मंदिरे एका भुकंपात उद्ध्वस्त झाली. एक कृष्णाचे आणि दुसरे शंकराचे. ही दोन्ही मंदिरे राजा अवंतिवर्मनने ८ व्या शतकात झेलमच्या किनार्यावर बांधली. नंतर १४ व्या शतकात एका प्रचंड मोठ्या भुकंपात दोन्ही मंदिरे उद्ध्वस्त झाली. भुकंपाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की झेलमच्या प्रवाहाने १०० फूट अंतरावरुन वाहायला सुरुवात केली. अवंतिवर्मनने या मंदिराच्या आवारात ५ मुख्य आणि १०३ इतर छोटी छोटी मंदिरे बांधली होती. सगळ्या मंदिरांमध्ये एकेकाळी भट ब्राह्मणांच्या मुखातुन स्तवने प्रसवत असावीत. धुपारतीने परिसर मोहरुन निघत असेल. आज पुर्वीच्या ऐश्वर्याची साक्ष पटवण्यासाठी फक्त काही भग्नावशेष उरले आहेत. ते देखील गोर्या साहेबाच्या कृपेने ज्याने या सगळ्या जागेच उत्खनन करुन या मंदिराचे पुनर्जीवन र्जी. अर्थात बक्षीस म्हणुन चांदीची ५ फूट उंचीची करोडो रुपये किमतीची मुर्ती लंडनमधल्या संग्रहालयात हलवली. हिंदुंचा देवात गोर्याच्या भावना गुंतलेल्या नाहीत. त्याच्यालेखी त्याची भौतिक किंमत महत्वाची आहे
एकाबाजुला रुक्मिणी आणि एकाबाजूला सत्यभामेला घेउन शेषनागावर विराजमान झालेला हा कृष्णः
असो उरलेला पहलगाम आणि काश्मीर पुढच्या आणि कदाचित शेवटच्या भागात.
प्रतिक्रिया
23 May 2011 - 3:45 pm | प्रमोद्_पुणे
हा भाग देखील आवडला.
23 May 2011 - 3:55 pm | मुलूखावेगळी
मस्त रे विशेषतः हिरवळीचे फोटु क्लास च हां
23 May 2011 - 4:07 pm | शरभ
खूपच छान फोटोज .....हिंदूंच्या भग्न काहोईना पण भूत अस्तित्वाचा पुरावा बघून बरे वाटले...
23 May 2011 - 4:10 pm | प्रचेतस
निव्वळ अप्रतिम, फोटो आणि वर्णनदेखील.
भग्नावषेश बघून वाईट वाटले.
23 May 2011 - 4:31 pm | प्यारे१
+१००० वेळा वल्लीशी सहमत.
23 May 2011 - 4:43 pm | विलासराव
छान!!!!!!!!!
23 May 2011 - 5:47 pm | मृत्युन्जय
आधीच्या भागांच्या लिंका इथे डकवत आहे:
ttp://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १
http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २
http://misalpav.com/node/18021 - मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर
http://misalpav.com/node/18061 - मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ
**************************************************************
23 May 2011 - 6:19 pm | चित्रा
सुंदर फोटो. धन्यवाद.
लीडर नदी पहलगाममधून रस्त्याच्या कडेने जाते तोही भाग छान आहे. मागे "खामोश" म्हणून एका रहस्यमय चित्रपटात या रस्त्याचे आणि गावाचे चित्रण आले होते. मुख्य रस्त्याकडे उतरत येणार्या लहानलहान गल्ल्यांचा चित्रपटात सुंदर वापर करून घेतला होता असे आठवते.
(लीडर नदीचे मूळ नाव कदाचित वेगळे असावे असे वाटते. )
23 May 2011 - 6:38 pm | मृत्युन्जय
लीडर नदी काही ठिकाणी शेषनाग नावाने ओळखली जाते. त्याचे फोटोही काढले आहेत. पुढच्या भागात डकवेन
23 May 2011 - 6:24 pm | गणेशा
अप्रतिम ..
बाकी बोलायला काही शब्दच नाहित
23 May 2011 - 6:40 pm | मुलूखावेगळी
काय हो तुमचे शब्दअमेघ बरसत नाहीत का आज सार्खेच शब्द नाहीत.
मी देउ का थोडे शब्द उधार ? ???
23 May 2011 - 7:38 pm | प्रभो
मस्त फोटो!!!
23 May 2011 - 8:39 pm | रेवती
छान फोटू!
23 May 2011 - 9:09 pm | पैसा
सगळेच फोटो अप्रतिम अणि डोळ्याना थंडावा देणारे!
23 May 2011 - 9:28 pm | ५० फक्त
मस्त रे अजुन एक मस्त भाग सगले फोटो आवडले.
28 May 2011 - 6:34 am | गोगोल
फार सुरेख फोटोज.
24 May 2011 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर
१९८४ सालात पहेलगामला हनिमूनला गेलो होतो. पण (कदाचित त्यामुळेच ) हॉटेलबाहेर भटकण्याचा, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याचा प्रसंग नाही आला (वेळच नसायचा).
आज ही सर्व छायाचित्रे पाहून जाणवले की, 'अरेच्चा..!पहेलगाम पाहायचे राहूनच गेले'. असो.
अतिशय सुंदर छायाचित्रे आणि शब्दचित्र.
24 May 2011 - 2:02 pm | नगरीनिरंजन
मस्त!
25 May 2011 - 11:27 am | पियुशा
जबरदस्त !
26 May 2011 - 11:35 am | स्पा
सर्वच फोटू कडक.. आणि वर्णन सुद्धा सुरेख
फुकटात काश्मीर ची सहल घडवून आणल्याबद्दल मृत्युंजय काकांना धन्यवाद.... ;)
14 May 2015 - 11:52 am | मृत्युन्जय
मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः
मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957
मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973
मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019
मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061
मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085
मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104
मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162
मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309
14 May 2015 - 12:13 pm | यशोधरा
क्या बात!
सुंदर! किती सुरेख वाक्ये!