"सिंगिंग इन द रेन"

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
16 Feb 2011 - 4:17 pm

आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न!

१९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता. जीन केली आणि स्टॅनली डोनन यांनी दिग्दर्शित केलेला आणि स्वत: जीन केली व बरोबर डेबी रेनॉल्ड्स, जीन हेगन आणि डोनाल्ड ओ'कॉनर याच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हा चित्रपट होता, "Singing In The Rain".

नायक 'डॉन लॉकवूड' (जीन केली) मूक-चित्रपटांतील यशस्वी नायक, 'लीना लेमॉन्ट' (जीन हेगल) यशस्वी नायिका, यांचे मूक-चित्रपट तुफान यशस्वी होत असताना, या जोडीला घेऊन बोलपट निर्मिती करण्याचे ठरवले जाते कारण दरम्यान बोलपटांचे तंत्रज्ञान विकसित झालेले असते. हा बोलपट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी त्यांच्या आधीच्या एका यशस्वी मूकचित्रपटाची कथाच घेण्याचे ठरते. पण वांदा असा असतो की लीना लेमॉन्टचा आवाज चिरका आणि बोलपटासाठी निरुपयोगी असतो. सर्वांचे तिचा आवाज त्यातल्या त्यात बरा करण्याचे निरनिराळे प्रयत्न फसतात आणि चित्रपट-निर्मिती बंद व्हायची वेळ येते.

दरम्यान डॉनला 'कॅथी सेल्डन' (डेबी रेनोल्ड्स) नावाची तरुणी भेटते. ती उत्तम गायिका, नर्तिका आणि होतकरू नटी असते पण तिला कुणी चान्स दिलेला नसतो. डॉनला कॅथीचे गुण आवडतात आणि तो लीनाच्या नकळत तिचे संवाद कॅथीच्या आवाजात डब करू लागतो. अशाप्रकारे एकत्र काम करता करता डॉन आणि कॅथी यांची जवळीक वाढते नि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

जेव्हा दोघांनाही आपल्या एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा प्रचंड पाऊस पडत असतो पण डॉन आपला आनंद व्यक्त न करता राहूच शकत नाही आणि हे गाणं म्हणतो....

http://www.youtube.com/watch?v=D1ZYhVpdXbQ

आर्थर फ्रीडने लिहिलेल्या या गाण्याला नासिओ हर्ब ब्राऊन याने संगीत दिलेलं आहे. यातला जीन केलीचा पर्फोर्मंस वादातीत अप्रतिम आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी केली ४ डिग्री तापात शुटींग करत होता असं सांगतात.

तरीही प्रेमात पडलेल्या आणि आपण जिच्या प्रेमात आहोत ती ही आपल्या प्रेमात तितकीच पडलेली आहे हे जाणणार्‍या प्रेमवीराचा अभिनय त्याने भन्नाटच केला आहे, त्याबद्दल 'जीन केली'ला सलाम....!

"सिंगिंग इन द रेन" या चित्रपटात वर सांगितल्या प्रमाणे मूकपट ते बोलपट अशी कथावस्तू आहे. मूकपटात काम करणार्‍यांना बोली भाषेचे शिक्षण देण्यासाठी शब्दफेक तंत्रज्ञाची मदत घेतली जाते.

मुळातच भाषेवर चांगले प्रभुत्व असलेला डॉन आणि त्याच्यासह कॉस्मो (डोनाल्ड ओ'कॉनर, हा यात मूकपटाला पार्श्वसंगीत देणारा संगीतकार आणि डॉनचा बालमित्र आहे) त्या शिक्षकाचीच शिकवणी घेतात......

या प्रसंगी त्यांनी गायलेलं हे गाणं आणि त्यातले जीन नि डोनाल्डचे नृत्य एकदम झकास झालेले आहे.....

जरूर आनंद घ्या.....

http://www.youtube.com/watch?v=TKlub5vB9z8&feature=related

हे गाणं केवळ 'डोनाल्ड ओ'कॉनर'चंच.....

बोलपटाचे चित्रीकरण बंद पडायच्या शक्यतेने डिप्रेस झालेल्या डॉनला (जीन केली) त्याचा मित्र कॉस्मो (डोनाल्ड ओ'कॉनर) या अवस्थेतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो तेव्हाचं हे गाणं आहे.

हे गाणं ऐकताना आणि विशेषत: बघताना न हसणारा माणूस उगाच मनुष्य शरीरात वावरतोय असं मानायला हरकत नाही.....

खच्चून मजा.....!

http://www.youtube.com/watch?v=2oWk4ZiuSHE&feature=related

आता 'डेबी रेनॉल्ड्स'चं एकही गाणं न देणं हा तिच्यावर अन्याय होईल..... जीन इतकीच ती या चित्रपटाचा प्राण आहे.....

जीन (डॉन), डोनाल्ड (कॉस्मो) यांच्या बरोबर इथे डेबी (कॅथी) कसलं भन्नाट नृत्य करते.... ती कुठेही कमी पडत नाही आणि अख्खं गाणं एका वेगळ्याच उंचीवर येऊन पोहोचतं...

तेव्हा हे केवळ 'डेबी रेनोल्ड्स' साठी..... Enjoy!!!

http://www.youtube.com/watch?v=bU2zoQ8gV-s&feature=related

या चित्रपटात पुढे कॅथीच्या आवाजातल्या संवादाचे नि गाण्यांचे श्रेय लाटण्याचा लीना लेमॉन्ट आपल्या करारपत्राच्या साहाय्याने प्रयत्न करते. मग जीन नि कॉस्मो त्या चित्रपटाच्या प्रॉड्युसरबरोबर तिचा हा डाव उधळून कॅथीचं श्रेय तिच्याच झोळीत टाकतात आणि चित्रपटाचा सुखांत होतो.

हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला आणि या चित्रपटामुळे जीन केलीतील नट, दिग्दर्शक, गायक आणि कोरीओग्राफर यांच्यावर शिक्कामोर्तब झालं. "सिंगिंग इन द रेन" जीनच्या पुढच्या अनेक उत्कृष्ट म्युझिकल्सची नांदी ठरला.

कलानृत्यसंगीतनाट्यमौजमजाचित्रपटछायाचित्रणप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

17 Feb 2011 - 7:11 am | स्पंदना

व्वॉव!
हा पिक्चर अगदी परवा परवा परत एकदा पाहिला. या सार्‍या 'अमेरिका संकटात' असल्या मार धाड पिक्चर मध्ये असले काही काही पिक्चर म्हणजे वाळ्वंटात हिरवळ. प्रास तुमचे प्रयास आम्हाला अतिशय आनंद देउन गेले.!

गणेशा's picture

16 Feb 2011 - 5:14 pm | गणेशा

एकदम मस्त ...

युट्युब आता ऑफिसात पाहता येणार नाही,, पाहिल्यावर मज्जा येइल आनखिनच.

धन्यवाद

गवि's picture

16 Feb 2011 - 5:53 pm | गवि

आता वाटच बघत असतो तुमच्या पोस्टची...

आणखी एक सुंदर ओळख..

आता खास मागणीवरुन (माझ्या) कंट्रीवर लिहाच.. मला वाटते आपल्या शेकोटीच्या गाण्यांसदृश आणि कोणताही लिखित स्कोअर / नोटेशन नसलेला संगीतप्रकार आहे तो..पण (किंवा म्हणूनच) नैसर्गिक मधुर..

तेव्हांही आवडला होता, आणी नंतर जेव्हां पाहीला तेव्हां तेव्हां व्यवस्थीत कळलापण होता :) मस्त चीत्रपट.

इन्द्र्राज पवार's picture

16 Feb 2011 - 11:27 pm | इन्द्र्राज पवार

"....तेव्हा प्रचंड पाऊस पडत असतो पण डॉन आपला आनंद व्यक्त न करता राहूच शकत नाही आणि हे गाणं म्हणतो...."

~ हेच खरे....आणि डॉनच्या चेहर्‍यावरील तो अपरिमित आनंद त्या धो धो कोसळणार्‍या पावसातूनही वाहुन जात नाही; इतकी या गाण्याची जादू आहे. चित्रपटाच्या इतिहासावरील डझनावरी पुस्तके वाचूनही प्रत्यक्ष हा चित्रपट जेव्हा टीएनटीवर लागला त्यावेळीही माझ्या मनी सर्वप्रथम हेच गाणे कधी येईल असे झाले होते. गाण्याच्या शेवटी तो पोलिस येतो आणि 'हा येडा असा का नाचत आहे बुवा...?" असा प्रश्नार्थक चेहरा करून जीन केली कडे पाहतो, आणि मग जीन त्याची नजर चुकवत आपल्या भोळ्याभाबड्या चेहर्‍याने पावसातून सूंबाल्या ठोकतो (आणि ते करतानाही आपली छत्री भिजत चाललेल्या दुसर्‍या एका पादचार्‍याला देतो,) ते प्रत्यक्ष त्या चित्रपटात पाहणे लाजवाब आहे.

शेकडो चॅनेल्सच्या गर्दीत "टीएनटी' ने जुन्या चित्रपटांचा जो अप्रतिम खजिना टीव्हीवर उलगडून दिला आहे त्याबद्दल त्या चॅनेलचे सर्वेसर्वा टर्नर यांचे आपण आभारच मानले पाहिजेत....अगदी १९३० पासूनचे कृष्णधवल असोत वा १९५० मधील वरील जीन केली सारख्यांचे रंगीत चित्रपट असोत...सर्व काही जाहिरातीशिवाय....शिवाय एकही ब्रेक नाही. परवापरवा 'रायन्स डॉटर' आणि "डॉ.झिवागो" पाहायला मिळाले...अखंड...इंटर्व्हलदेखील नाही....कोणत्याही व्यत्ययाशिवाय उलगडणारे असे चित्रपट मनात घर करतातच.

जीन केलीचाच याच पठडीतील १९५१ चा 'अ‍ॅन अमेरिकन इन पॅरीस' इथे पाहायला मिळाला....त्यातील जवळपास १५ मिनिटांचे एक कोरस नृत्य आहे....जो एक चमत्कारच आहे...गाण्यात एकही शब्द नाही, आहे तो फक्त नृत्याविष्कार.....प्रत्यक्ष पाहावे अशी सूचना करीत आहे.

इन्द्रा

प्रास's picture

18 Feb 2011 - 9:47 am | प्रास

इन्द्रा,

अगदी १००% सहमत.

मीही हा चित्रपट सर्वप्रथम 'टी एन् टी' वरच पाहिलेला.

'अ‍ॅन अमेरिकन इन पॅरिस' संदर्भात....

तो शेवटला नृत्याविष्कार १९ मिनिटांचा आहे आणि इतका मोठा डान्स सिक्वेन्स तो पर्यन्त सिनेमाच्या इतिहासात कधीच चित्रित झालेला नव्हता. पूर्ण बॅले नि ओर्केष्ट्रल संगीताने नटलेला हा आविष्कार संपूर्णपणे जीनच्या संकल्पनेवर आधारीत आहे. याला संगीत 'सोल चॅप्लीन'चं आहे आणि यातील जीनची कोरीओग्रफी आणि सर्व नर्तक-नर्तिकांची नृत्ये 'भनाट' आहेत, अगदी एखादा नवा लेख लिहिण्याइतका हा एक छान विषय होइल हे नक्की.....

अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

इन्द्र्राज पवार's picture

18 Feb 2011 - 10:17 am | इन्द्र्राज पवार

"...अभिप्रायाबद्दल आभारी आहे...."

~ माझे तुम्ही आभार मानता, पण प्रास, प्रत्यक्षात आम्हीच तुमचे इतक्या चांगल्या गाण्याबद्दल लिहिले म्हणून आभार मानायला हवेत....जे आता मानतो (च).

'अ‍ॅन अमेरिकन इन पॅरिस' बद्दलदेखील तुम्ही जरूर लिहा. मी एकदाच (परत टीएनटीवरच) हा चित्रपट पाहिला असल्याने सखोल माहिती नाही....पण ते कोरस नृत्य मात्र अगदी या क्षणी हा प्रतिसाद टंकत असतानादेखील नजरेसमोरून हलायला तयार नाही.....गॉश्श्श...! "अप्रतिम सांघिक कौशल्य"..... यातील अप्रतिम शब्दातूनसुद्धा पुरेपूर न्याय त्या १९ मिनिटांच्या आनंदाला मिळत नाही....त्यामुळे केवळ तेवढी १९ मिनिटे दिवसभराच्या कामाचा ताणतणाव नष्ट करण्यास पुरेशी होतात. तुम्ही लिहाच, तुमच्याकडे अशा गाण्यावर भारावून जाऊन लिहिण्याची शैली आहेच.

(काल रात्री याच चित्रपटाबद्दल काही अधिकची माहिती पाहिली....आणि चक्क १९५१ चे 'उत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर' ही याला मिळाले होते...! नो वंडर रीअली !!)

इन्द्रा

इन्द्रा,

पांढर्‍यावर काळं करण्याबद्दलचा माझा हुरुप वाढवताय.....

नक्की प्रयत्न करतो.... धन्यवाद! :)

चिंतामणी's picture

18 Feb 2011 - 1:47 am | चिंतामणी

तुच प्रसाद अकोलकर आहेस का?

कारण आजच हा लेख वाचनात आला.

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=96986936&tid=5574433775715463105

प्रास's picture

20 Feb 2011 - 12:52 pm | प्रास

येस्सर!
मीच तो प्रसाद अकोलकर. तुम्हाला आठवत असेल तर या आधीही तुम्ही मला विचारलेलं असताना तुमच्या व्य.नि. मध्ये मी हाच संदर्भ दिलेला.
बाकी तुमच्या तीक्ष्ण दृष्टीची नि स्मरणशक्तीची दाद द्यायला हवी, तिथे बघताच बरा आठवला हा इथला लेख... ;)