स्वैपाकघरातून पत्रे २

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
25 May 2018 - 10:03 am

प्रिय अन्नपूर्णा,

जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

आमच्या एकेका साच्यात तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे आंबूस पीठ तू हळूहळू चमच्याने घालतेस, तेव्हा आम्ही अक्षरश: नाक बंद करून असतो. सहनच होत नाही आमच्या छोट्या छोट्या जीवांना. पण काय करणार, आमचा जन्मच त्यासाठी झालेला... तुमच्या इडल्या पकवायला! एकदा का आम्ही कुकरच्या उकळत्या पाण्यात जाऊन बसलो कि मग आमची मज्जा चालू होते. आधीतर आमचा उकळी पाण्यातला, उकळी डान्स चालू होतो. पण आम्ही कितीही नाचलो तरी, आमच्या डोईवरचे आंबूस पीठ आम्ही कलंडू देत नाही. पाण्याची वाफ जसजशी वाढत जाते, तसतसा आमचा उकळी डान्स जोर धरतो. आतल्या पिठाच्या इडल्या व्हायला सुरुवात होते. गोलगोल इडल्या. गोऱ्या गोऱ्या इडल्या. आमचा तुदुतुडू डान्स. एकमेकांच्या डोक्यावरचे पीठ वाफवायचे. बहोत मजा आता हैं.... वाफवाफ हो जाते हैं अंदरही अंदर!

आम्ही आपले पाहुणे कलाकार, त्यामुळे आमचे लाडही तितकेच होतात. आणि हो, तुझ्या सासूच्या जमान्या पासून तू आम्हाला काही बदलले नाहीस, त्याबद्दल तुझे साचेपूर्वक आभार. तू कित्ती चांगली आहेस. पण एक बारीक गोष्ट आहे.... खरंतर त्यासाठीच आम्ही सगळे मिळून तुला हे पत्र लिहित आहोत. अगं आमच्या अंगावर जी बारीक बारीक छिद्रं आहेत, ती आताशा जरा बुजून गेल्यासारखी वाटतात. त्यामुळे दम कोंडल्यासारखा वाटतोय. एक काम कर, बारीक सुई घे, आणि आमची छिद्रे मोकळी कर. बरीच वर्षे, हे तुला सांगावे म्हणत होतो, पण उकळी डान्स, गोऱ्या इडल्या आणि नंतरचे कौतुक यात आम्ही इतके दंग असायचो, कि विसरून जायचो.

पण मागच्या वेळी, इडल्या नीट झाल्या नाहीत म्हणून तू वैतागलीस, आणि ‘उडप्याकडून आणा’ असे फर्मान सोडलेस, तेव्हा म्हटले, हिला सांगू. जरा वेळखाऊ काम आहे, पण करच. अगं,उडप्याला स्वैपाकघरात घेणार का? घेऊ नकोस. आम्ही आहोत कि अजून. हो, आणि परवाचा नवा स्टेनलेस स्टीलचा कुकर मस्तच आहे. मऊमऊ, चकचकीत. पहिल्यांदाच बसलो होतो त्याच्यात. आरसेमहालात बसल्यासारखे वाटले. आणि तिथेच लक्षात आले, कि आपला उकळीडान्स मार खातोय म्हणून! वाफ नीट लागतच नाही कुठल्या मजल्याला. पण, आमची छिद्रावली मोकळी कर, बघ तुझ्या इडल्या कशा स्पंजसारख्या करू!

बाकी जोवर आमच्या डोक्यावरचा स्क्रू फिट, तोवर आमचे सगळे मजले शाबूत. तुझ्या सुईदार स्पर्शाची वाट पहात आहोत.

तुझेच,
मजलेदार इडलीपात्र.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीपाकक्रियावाङ्मयविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनआस्वादप्रतिभाआरोग्यविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

25 May 2018 - 12:19 pm | विजुभाऊ

वा. इडली आ गया... आय मीन मजा आ गया.

माहितगार's picture

25 May 2018 - 12:20 pm | माहितगार

छान, पुलेशु

इडली नेमकी कोणत्या फॅक्टरमुळे लुसलुशीत होते आणि कोणत्या फॅक्टरमुळे दगडी होते हेच अद्याप कळलेलं नाही.

बाकी तामिळनाडु (इंटेरियर) येथील इडली सांबार हा एक अद्वितीय खाद्यप्रकार आहे. सर्वत्र मिळणारं उडुपी इडली सांबार हे त्यापुढे "शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख" आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 May 2018 - 1:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईडली साठी उडीद आणि तांदुळ भिजवताना त्यात थोडे (मुठभर) पोहे घाला. बघा फरक पडेल.

दुसरे म्हणजे तांदुळाऐवजी रवा वापरुन बघा.

सविता००१'s picture

27 May 2018 - 9:04 am | सविता००१

त्या खर्‍या इडलीपात्राने वाच्रलं तरी ते हेच म्हणेल.

सविता००१'s picture

27 May 2018 - 9:13 am | सविता००१

४:१ या प्रमाणात चांगल्या प्रतीचाच तांदूळ (उकडा नसला तरी चालेल) आणि उडीद डाळ ८ तास वेगवेगळी भिजवून किंचित रवाळ वाटून त्यात मीठ घालून ७-८ तास आंबवलं पीठ की मग ते सुरेख फुगतं. त्याला अजिबात न हलवता एका कडेने डावाने पीठ इडली पात्रात घातलं तर सोडा, तेल, पोहे असं काहीही न घालता उत्तम आणि अतिशय हलक्या अशा मऊ स्पन्जी इडल्या होतात.
यात चांगल्या प्रतीचाच तांदूळ हे अति महत्त्वाचं आहे.
माझ्या तमिळ मैत्रिणीने दिलेला आणि मी अनुभवत असलेला सल्ला.

मनिमौ's picture

27 May 2018 - 9:14 pm | मनिमौ

छान लिहीलय ग

पद्मावति's picture

27 May 2018 - 10:31 pm | पद्मावति

मस्तच.

लुसलुशीत इडलीसाठी उपाय सांगणाऱ्या लोकांचे आभार.

शिव कन्या's picture

8 Jun 2018 - 11:35 am | शिव कन्या

तमिळ मैत्रिणीचा आणखी एक सल्ला ..

उडीद डाळ बारीक वाटताना त्यात आदल्या दिवशीच्या भाताचा एक गोळाही बारीक करून घालायचा.
मी करून पाहिले, मस्त होते. फारसे कष्ट पडत नाहीत.

स्मिता.'s picture

30 Jun 2018 - 3:30 pm | स्मिता.

उडिद डाळ, तांदूळ, थोडे मेथीदाणे भरपूर वेळ (12 तास) भिजवून मग वाटतांना त्यात शिळा भात घातल्यास इडल्या मऊ लुसलुशीत होतात असा स्वानुभव आहे.

शिव कन्या's picture

8 Jun 2018 - 11:36 am | शिव कन्या

सर्व वाचकांचे मनापासून आभार.