प्रिय अन्नपूर्णा,
तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते.
माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते! पण एकदा, तू गूळ किसत कोणता तरी इंग्रजी सिनेमा TV वर बघत होतीस, तेव्हा गंमतीने म्हणालीस, ‘अरे, नुसती किसाकिसी काय करताय, दुखतील तोंडं!’ तुला हसताना पाहून, मी चटकन मान वळवून टिव्हीत पाहिले, मग मला कळले. खूप गंमत वाटली, आणि काय हे आपले नाव असे वाटून जरा शरम पण वाटली ...... पण तेव्हापासून वरची सगळी मंडळी मला माझी ‘किसकर्ती’ वाटू लागली.
मुळा, गाजर मला नाहीत आवडत. मचूळ असते त्यांची किसाकिसी. रताळी, बटाटे, आणि बाकीची कंदमंडळी....... त्यांची चव चित्रविचित्र कपडे घातलेल्या गर्दीसारखी असते. सगळ्या प्रकारचे भोपळे मात्र हळूबाबा असतात. बीटरूटने तू मला लिपष्टीक लावतेस, तेव्हा मला सत्रांदा आरशात पहावेसे वाटते. हळदीचे कंद किसतेस तेव्हा नव्या नवरीसारखे वाटते. रोज चहासाठी आलं किसतेस, तेव्हा मात्र माझ्या तोंडात झुणझुण होते, आणि दंतमंजन वापरल्याचा फील येतो. दिवस सुरु झाल्याचे कळते.
ती त्या तिथे ठेवलेली कासवाच्या आकाराची छोटीशी किसणी म्हणजे माझी छोटी बहिण. तिच्यावर तू अधून मधून जायफळ तेवढे किसतेस. काय सुगंध पसरतो! पण ते भाग्य माझ्या नशिबी कुठे? माझ्या वाट्याला ही सगळी अशी बेढब मंडळी. हो, पण तू कधी कधी सफरचंद किसायला घेतेस, तेव्हा तो माझ्यासाठी Valentine’s Day असतो. आंबटगोड, मऊ मऊ स्पर्श. फार प्रेमळ.
पण माझी कायमची सोबतीण म्हणजे सुक्या खोबऱ्याची वाटी. चवीला मस्त. माझ्या सर्वांगाला मालिश करून देते. मला हलके हलके वाटते. किसून किसून शेवटी वाटीची चपटी म्हातारी राहते, ती तू आपसूक पटकन तोंडात टाकतेस! एकदा,संकष्टीला मोदकात घालण्यासाठी तू खोबरं किसत होतीस, आणि अशीच शेवटची म्हातारी सवयीने तोंडात घालायला, आणि सासूबाईंनी तुझ्याकडे बघायला एकच गाठ पडली. ‘उष्टं झालं’ एवढं तुला त्यांच्या नजरेवरून कळलं. तेव्हाचा तुझा तिरपीट उडालेला चेहरा मला आजही आठवतो. मग तुझ्यात सावधपणा येत गेला.
तू सुरीला धार लावायला घेऊन जातेस, पण मला कधीच तुला धार लावावी लागली नाही, याचा मला अभिमान वाटतो..... आणि हो, तू मला या भिंतीवर, जरा उंचावर डकवून ठेवतेस, म्हणून तू मला जास्तच आवडतेस. असं जरा उंचावर बसलं कि चावडीवर बसल्यासारखं वाटतं. स्वैपाकघरात काय काय चाललेय ते बरोब्बर कळते. मला अशीच ठेव.
तुझी,
किसणी.
प्रतिक्रिया
30 Jun 2018 - 12:26 pm | विजुभाऊ
वा अस्त आहे . खिसखिशीत.......... आपलं! खुसखुशीत आहे लेख
30 Jun 2018 - 1:22 pm | शाली
वा! मला ही कलेपनाच फार आवडलीए. विळी चे पत्रही आवडले होते.