वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
16 Feb 2017 - 8:51 am

२२ मार्च १९९२
एससीजी, सिडनी

न्यू साऊथ वेल्समधल्या सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात गेल्या वर्ल्डकपमधले उपविजेते इंग्लंड आणि अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर वर्षाभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेली दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची मेलबोर्नच्या मैदानावर फायनलमध्ये गाठ पडणार होती पाकिस्तानशी!

ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघात स्वतः गूच, अनुभवी अ‍ॅलन लॅम्ब, ग्रॅहॅम हिक, नील फेअरब्रदर, अ‍ॅलेक स्ट्युअर्ट असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी फिलिप डिफ्रीटार, ग्लॅडस्टन स्मॉल, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर होता. त्यांच्याखेरीज इंग्लंडच्या संघात तीन ऑलराऊंडर्स होते. डरमॉट रीव्ह, क्रिस लुईस आणि अनुभवी इयन बोथम! १९८७ च्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ न शकल्याने इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देण्याच्या जिद्दीनेच बोथम या वर्ल्डकपमध्ये उतरला होता!

केपलर वेसल्सचा दक्षिण आफ्रीकेचा संघ अननुभवी असला तरी जोरदार फॉर्मात होता. स्वतः वेसल्स १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळला होता. वेसल्सच्या जोडीला अँड्र्यू हडसन, पीटर कर्स्टन, हॅन्सी क्रोनिए, एड्रीयन केपर, विकेटकीपर डेव्हीड रिचर्डसन असे बॅट्समन होते शिवाय नुसत्या फिल्डींगच्या जोरावर किमान २०-२५ रन्स वाचवणारा जाँटी र्‍होड्स होता! ब्रायन मॅकमिलनसारखा अफलातून ऑलराऊंडर दक्षिण आफ्रीकेकडे होता. बॉलिंगची मदार मुख्यतः होती ती अ‍ॅलन डोनाल्डवर. डोनाल्डच्या जोडीला मेरीक प्रिंगल, रिचर्ड स्नेल असे बॉलर्स होते.

मॅच सुरु होण्यापूर्वीच पावसाची सर आल्याने १० मिनीटांचा खेळ वाया गेला होता. डे-नाईट मॅच असल्याने पहिल्या इनिंग्जची वेळ दुपारी २.३० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत होती. पावसामुळे वाया गेलेली १० मिनीटं भरुन काढण्यासाठी ही वेळ पुढे ढकलून ६.१० करण्याचा निर्णय घेणार आला. याचा परिणाम म्हणून दोन इनिंग्जमधली वेळ १० मिनीटांनी कमी होऊन ३५ मिनीटांवर आली.

केपलर वेसल्सने टॉस जिंकल्यावर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये दिवसभरात दहा-पंधरा मिनीटांसाठी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. याची कल्पना असूनही वेसल्सने बॉलिंगचा निर्णय घेतला होता.

टॉसच्या वेळी इयन चॅपलशी बोलताना वेसल्स म्हणाला,
"It is a calculated risk. If it rains while we are bowling its not too bad, but if it comes down while we are batting then its a risk. But we are prepared to take the risk and stick to our basics."

इयन बोथमने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली होती. अ‍ॅलन डोनाल्डच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बोथमला आऊटसाईड एजची बाऊंड्री मिळाली. अर्थात बोथमवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. प्रिंगलच्या पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने ऑन ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. परंतु तिसर्‍याच ओव्हरमध्ये डोनाल्डच्या इनस्विंगरवर रिचर्ड्सनने गूचचा कॅच घेतला. रिप्लेमध्ये मात्रं बॉल बॅटऐवजी त्याच्या पॅडला लागून विकेटकीपरकडे गेल्याचं दिसत होतं. इंग्लंड २० / १!

गूच आऊट झाल्यावर आलेल्या अ‍ॅलेक स्ट्युअर्टने सावध पवित्रा घेत १-२ रन्स काढत बोथमला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. बोथमने प्रिंगलला कटची बाऊंड्री तड्कावली, पण प्रिंगलच्याच बॉलवर पुन्हा कट् मारण्याच्या प्रयत्नात बोथमच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल स्टंपवर गेला. २३ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह बोथमने २१ रन्स फटकावल्या. इंग्लंड ३९ / २!

बोथम परतल्यावर आलेला ग्रॅहॅम हिक पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू होण्यापासून केवळ सुदैवाने वाचला. मेरीक प्रिंगलचा इनस्विंगर मिडलस्टंपसमोर त्याच्या पॅडवर आदळूनही अंपायर ब्रायन ऑल्ड्रीजने हिकविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं अपिल फेटाळून लावलं! पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या केपलर वेसल्सला आपली नाराजी लपवता आली नाही.

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इयन चॅपल म्हणाला,
"Kepler Wessels nearly had a heart attack at first slip."

प्रिंगलच्या पुढच्याच बॉलवर हिकची एज लागली आणि पहिल्या स्लिपमध्ये वेसल्सने त्याचा कॅच घेतला पण हा नोबॉल होता!

इयन चॅपलबरोबर कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला अली बाकर उद्गारला,
"Meyrick Pringle will want to shoot himself here."

एकही रन करण्यापूर्वीच मिळालेल्या हा दोन जीवदानांचा फायदा उठवत हिकने फटकेबाजीला सुरवात केली. रिचर्ड स्नेलला त्याने लागोपाठ दोन वेळा कट्ची बाऊंड्री तडकावली. स्नेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्युअर्टनेही त्याला कट्ची बाऊंड्री मारली. स्ट्युअर्ट आणि हिक यांनी ७१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ब्रायन मॅकमिलनला थर्डमॅनला खेळण्याच्या नादात विकेटकीपर डेव्ह रिचर्ड्सनने डाईव्ह मारत स्ट्युअर्टचा अप्रतिम कॅच घेतला. ५४ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह स्ट्युअर्टने ३३ रन्स फटकावल्या. २२ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर होता ११० / ३!

स्ट्युअर्ट परतल्यावर अनुभवी नील फेअरब्रदरने १-२ रन्स काढत हिकला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचं धोरण अवलंबलं होतं. हिकची फटकेबाजी सुरुच होती. मॅकमिलनला त्याने स्क्वेअरलेगला फ्लिकची बाऊंड्री तडकावली. वेसल्सने डोनाल्डला बॉलिंगला आणलं पण हिकने त्यालाही कटची बाऊंड्री फटकावली! हिक - फेअरब्रदर यांनी ७३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मॅकमिलनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या प्रिंगलने फेअरब्रदरचा लेगस्टंप उडवला. ५० बॉल्समध्ये एकमेव बाऊंड्रीसह फेअरब्रदरने २८ रन्स काढल्या. आणखीन जेमतेम ५ रन्सची भर पडल्यावर स्नेलला कट् मारण्याच्या बॅकवर्ड पॉईंटला जाँटी र्‍होड्सने हिकचा कॅच घेतला. ९० बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह हिकने ८३ रन्स फटकावल्या. हिक परतला तेव्हा ३७ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर होता १८७ / ५!

अ‍ॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईस यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. लुईसने प्रिंगलला ऑनड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर लॅम्बने मॅकमिलनला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. हे दोघं दक्षिण आफ्रीकन बॉलर्सची धुलाई करणार अशी चिन्हं दिसत असतानाच अ‍ॅलन डोनाल्डला कट् मारण्याच्या प्रयत्नात लॅम्बची बॉटम एज लागली आणि रिचर्ड्सनने त्याचा कॅच घेतला. ४२ ओव्हर्समध्ये इंग्लंड २२१ / ६!

लॅम्ब परतल्यावर बॅटींगला आलेला डरमॉट रीव्ह आणि लुईस यांनी पुढच्या २ ओव्हर्समध्ये १३ रन्स जोडल्या. एव्हाना सहा वाजून गेले होते. स्पर्धेच्या नियमानुसार ६.१० वाजेपर्यंतच इंग्लंडला बॅटींगला वेळ मिळणार होता. ४४ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर होता २३४ / ६!

अ‍ॅलन डोनाल्डच्या ४५ व्या ओव्हरमध्ये...

पहिल्याच बॉलवर रीव्हने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली...
दुसरा बॉल रीव्हने स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
बाऊंड्रीवर स्नेलने मारलेल्या डाईव्हनंतरही त्याला बाऊंड्री अडवता आली नाही...
तिसरा बॉल रीव्हने मिडऑनवर उचलला...
सिक्स जाणार असं वाटत असतानाच बाऊंड्रीपासून जेमतेम फूटभर आत टप्पा पडून बाऊंड्रीपार गेला...
डोनाल्डचा चौथा बॉल नेमका नो बॉल होता...
रीव्हने हा बॉल एक्ट्राकव्हरला तडकावला आणि दोन रन्स काढल्या...
वास्तविक नोबॉलची एक रन धरुन रीव्हला तीन रन मिळायला हव्या होत्या पण एक रन शॉर्ट असल्याने त्याला दोनच रन्स मिळाल्या!
पाचव्या बॉलवर रीव्हने पुन्हा मिडविकेटला दोन रन्स काढल्या...
सहावा बॉल यॉर्कर असल्याने रीव्हला एकच रन काढता आली...
शेवटच्या बॉलला लुईसने एक रन काढली...

डोनाल्डच्या या ओव्हरमध्ये १८ रन्स फटकावल्या गेल्या होत्या... त्यापैकी १७ रन्स एकट्या रीव्हच्या होत्या!
४५ ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता २५२ / ६!

डोनाल्डने ही ओव्हर टाकण्यासाठी जवळपास ७ मिनीटं घेतली होती...
प्रत्येक बॉलनंतर आपल्या बॉलिंग मार्ककडे जाताना तो आरामात पावलं टाकत जात होता...
इतकंच नाही तर जवळपास प्रत्येक बॉलनंतर केपलर वेसल्स फ्लिडींगमध्ये बदल करत होता..
वेसल्सचा हेतू सरळ होता...
डोनाल्डची ओव्हर ही इनिंग्जची शेवटची ओव्हर ठरावी...

दक्षिण आफ्रीकेची ही चाल यशस्वी ठरली...
स्कोरबोर्डवरच्या घड्याळात ६.१० झाले होते!

आपल्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपची फायनल गाठण्यासाठी दक्षिण आफ्रीकेला ४५ ओव्हर्समध्ये २५३ रन्सची आवश्यकता होती!

केपलर वेसल्स आणि अँड्र्यू हडसन यांनी सुरवातीला सावध पवित्रा घेत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. तिसर्‍याच ओव्हरमध्ये लुईसच्या थ्रो स्ट्युअर्टला कलेक्ट करता न आल्याने हडसन रनआऊट होण्यापासून वाचला. वेसल्सने बोथमला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली, पण बोथमलाच कट करण्याचा त्याचा प्रयत्नं फसला आणि बॅकवर्ड पॉईंटला लुईसने त्याचा कॅच घेतला. दक्षिण आफ्रीका २६ / १!

वेसल्स आऊट झाला खरा पण तो ड्रेसिंगरुममध्ये परतला मात्रं नाही. इंग्लंडच्या इनिंग्जमध्ये फिल्डींग करताना पीटर कर्स्टनला दुखापत झाली होती. वेसल्स आऊट झाल्यावर बॅटींगला येणार्‍या कर्स्टनसाठी रनर म्हणून वेसल्स मैदानातच थांबला होता. हडसनने लुईसच्या आठव्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या पण बाराव्या ओव्हरमध्ये फिलीप डिफ्रीटासच्या मिडलस्टंपवर पडलेल्या अप्रतिम आऊटस्विंगरने कर्स्टनचा ऑफस्टंप उडवला! वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या कर्स्टनला सेमीफायनलमध्ये जेमतेम ११ रन्स काढता आल्या. १२ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीका ६१ / २!

कर्स्टन परतल्यावरही हडसनची फटकेबाजी सुरुच होती. क्रिस लुईसला त्याने लागोपाठ कट् आणि पूलच्या बाऊंड्री तडकावल्या. कर्स्टनच्या जागी बॅटींगला आलेल्या एड्रीयन केपरनेही डिफ्रीटासला दोन बाऊंड्री तडकावल्या. स्पिन बॉलर्सविरुद्धचा हडसनचा विकनेस लक्षात ठेवून गूचने लुईसच्या जागी रिचर्ड इलिंगवर्थला बॉलिंगला आणलं. ही चाल यशस्वी ठरली. इलिंगवर्थच्या बॉलवर कट मारण्याच्या प्रयत्नात हडसन एलबीडब्ल्यू झाला. ५२ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री तडकावत हडसनने ४६ रन्स फटकावल्या. तो परतला तेव्हा १९ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता ९० / ३!

हडसन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या हॅन्सी क्रोनिएने सावध पवित्रा घेत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. केपरने इलिंगवर्थ आणि डिफ्रीटासच्या जागी बॉलिंगला आलेल्या ग्लॅडस्टन स्मॉलला बाऊंड्री तडकावल्या. गूचने डिफ्रीटासच्या ऐवजी बोथमला बॉलिंगला आणलं, पण केपरने त्यालाही मिडविकेटवरुन बाऊंड्री ठोकली. क्रोनिए - केपर यांनी ४१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर इलिंगवर्थला फटकावण्याचा केपरचा प्रयत्नं साफ फसला आणि तो बोल्ड झाला. ४४ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह केपरने ३६ रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका १३१ / ४!

फायनल गाठण्यासाठी दक्षिण आफ्रीकेला अद्याप १९ ओव्हर्समध्ये १२२ रन्सची आवश्यकता होती!

केपर परतल्यावर बॅटींगला आला जाँटी र्‍होड्स!
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये इंझमाम-उल-हकला रनआऊट करताना बॉलसकट स्टंपवर घेतलेल्या झडपेमुळे र्‍होड्स एकदम प्रकाशझोतात आला होता...
पण बॅट्समन म्हणून आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये त्याच्या हाती फारसं काहीच लागलं नव्हतं!

र्‍होड्सने सुरवातीला चाणाक्षपणे १-२ रन्स काढण्यावर भर दिला. रन्स काढताना तो पळत होता म्हणण्यापेक्षा विकेट्सच्या मध्ये उडत होता असं म्हणणं जास्तं संयुक्तीक ठरावं! रनिंग बिटविन द विकेट्सची कला किती अफाट लेव्हला जाऊ शकते याचं र्‍होड्स म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होतं. हॅन्सी क्रोनिए क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच र्‍होड्सने दुसर्‍या रनसाठी क्रीज सोडल्याचं चित्रं अनेकदा दिसून येत होतं.

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला बिल लॉरी म्हणाला,
"The way Jonty Rhodes is flying between the wickets, England would be better of using fly trapper than fielders!"

अर्थात र्‍होड्सचा केवळ रनिंग बिटविन द विकेट्सवरच भर नव्हता. रिचर्ड इलिंगवर्थला स्वीपची बाऊंड्री तडकावल्यावर र्‍होड्सने बोथमला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री ठोकली. र्‍होड्सची फटकेबाजी सुरु असताना हॅन्सी क्रोनिए मात्रं अडखळतच खेळत होता. र्‍होड्सप्रमाणे १-२ रन्स काढणंही त्याला कठीण जात होतं. र्‍होड्स - क्रोनिए यांनी ४५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ग्लॅडस्टन स्मॉलला फटकवण्याच्या प्रयत्नात मिडविकेट बाऊंड्रीवर हिकने क्रोनिएचा कॅच घेतला. ४६ बॉल्समध्ये एकमेव बाऊंड्रीसह क्रोनिएने २४ रन्स काढल्या. दक्षिण आफ्रीका १७६ / ५!

दक्षिण आफ्रीकेला शेवटच्या १० ओव्हर्समध्ये ७६ रन्सची आवश्यकता होती!

क्रोनिए आऊट झाल्यावरही र्‍होड्सचा रन्स ढापण्याचा कारभार पद्धतशीरपणे सुरु होता. स्मॉलला त्याने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. र्‍होड्स - मॅकमिलन यांनी ४ ओव्हर्समध्ये ३० रन्सची पार्टनरशीप केल्यावर स्मॉलला फटकावण्याच्या नादात पॉईंट बाऊंड्रीवर क्रिस लुईसने र्‍होड्सचा कॅच घेतला. ३८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह र्‍होड्सने ४३ रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका २०६ / ६!

शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ४४ रन्स हव्या होत्या!

र्‍होड्स परतल्यावर बॅटींगला आलेला विकेटकीपर डेव्ह रिचर्ड्सनने आणि मॅकमिलन यांनी फटकेबाजीला सुरवात केली. स्मॉलच्या ४२ व्या ओव्हरमध्ये रिचर्ड्सनने लेग ग्लान्सची बाऊंड्रीही मारली पण...

एव्हाना पावसाला सुरवात झाली होती!

मॅकमिलन - रिचर्ड्सन पावसाची पर्वा न करता बॅटींग करत होते. क्रिस लुईसची ४३ वी ओव्हर सुरु झाली तेव्हा पावसाचा जोर काहीसा वाढलेला होता. अखेर लुईसच्या ओव्हरचा एक बॉल बाकी असताना अंपायर्सनी त्या दोघांशी आणि गूचशी चर्चा केली. मॅकमिलन - रिचर्ड्सन पुढे खेळण्यावर ठाम होते, तर गूचही ड्रेसिंगरुममध्ये परतण्यावर ठाम होता! बॉल ओला झालेला असताना आणि आऊटफिल्ड निसरडं झालेलं असताना पुढे खेळण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. अखेर अंपायर ब्रायन ऑल्ड्रीज आणि स्टीव्ह रँडल यांनी सर्वांना पॅव्हेलियनमध्ये परतण्याची सूचना केली.

दक्षिण आफ्रीकेला अद्याप १३ बॉल्समध्ये २२ रन्सची आवश्यकता होती!

दक्षिण आफ्रीकेचे खेळाडू चिंताग्रस्तं नजरेने पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. पावसामुळे खेळ वाया गेल्यास आणि ओव्हर्स कमी झाल्यास दक्षिण आफ्रीकेला त्याचा फटका बसणार होता हे उघड होतं. इंग्लंडच्या इनिंग्जमध्ये मेरीक प्रिंगलने टाकलेल्या दोन मेडन ओव्हर्स आपल्याला गोत्यात आणू शकतात याची दक्षिण आफ्रीकेच्या खेळाडूंना भीती वाटत होती.

अखेर १२ मिनीटांनी पाऊस थांबला!

.... आणि अभूतपूर्व गोंधळाला सुरवात झाली!

मैदानावर असलेल्या मोठ्या स्कोरबोर्डवर अद्यापही पावसाला सुरवात होण्यापूर्वीचेच आकडे झळकत होते...

२२ रन्स - १३ बॉल्स...
पण....
काही वेळातच हे आकडे बदलले...
२२ रन्स - ७ बॉल्स!

पावसामुळे एक ओव्हर कमी झाल्याचं दिसून येत होतं!

हा प्रकार पाहून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप संपुष्टात आल्यावरही सिडनीच्या मैदानावर हजर असलेल्या ३५,००० प्रेक्षकांपैकी अनेकांचं माथं भडकलं. आयोजकांच्या आणि इंग्लिश खेळाडूंच्या नावाने घोषणा देण्यास त्यांनी सुरवात केली. इतक्यावरच न थांबता बीअरचे रिकामे कॅन्स आणि इतर कचरा मैदानात भिरकावण्यास सुरवात केली!

...पण अद्यापही खर्‍या प्रकाराची कोणालाच कल्पना नव्हती!

हा घोटाळा झाला होता दक्षिण आफ्रीकेचा मॅनेजर अ‍ॅलन जॉर्डन याच्यामुळे. चॅनल नाईनच्या कॉमेंटेटर्सना त्याने एक ओव्हर कमी करण्यात आल्याची बातमी दिली होती आणि त्याप्रमाणे चॅनल नाईनच्या लोकांनी स्कोरबोर्डवरचे आकडे बदलले होते आणि त्याबद्दल घोषणा केली होती! इंग्लंड आणि दक्षिण आफ्रीकेचे खेळाडू मैदानात परतल्यावर काही क्षणात स्कोरबोर्डवरचे आकडे पुन्हा बदलले...

२२ रन्स - १ बॉल!

हा प्रकार पाहून मॅकमिलन आणि रिचर्ड्सन अक्षरशः अवाक् झाले...
एक मिनिटही मैदानावर थांबण्याची त्यांची इच्छा नव्हती...
पण...
शेवटचा बॉल टाकला जाणं आवश्यक होतं!

अखेर लुईसचा बॉल मिडविकेटला खेळत मॅकमिलनने एक रन काढली....

१९ रन्सनी मॅच जिकून इंग्लंडने फायनल गाठली!
दक्षिण आफ्रीकेच्या खेळाडूंना सहानुभूती दाखवताना इंग्लिश खेळाडूंनाही अपराधी वाटत होतं.

शेवटचा बॉल टाकला गेला तेव्हा स्कोरबोर्डवरचं घड्याळ १०.०८ वाजल्याचं दर्शवत होतं!
मॅचची निर्धारीत वेळ १०.१० पर्यंत होती!
याचा अर्थ आणखीन एक ओव्हर सुरु करणं सहज शक्यं होतं!

वास्तविक वर्ल्डकपसारख्या स्पर्धेची सेमीफायनल असल्याने मॅचमध्ये व्यत्यय येण्याची किंवा संपूर्ण मॅच रद्द होण्याची शक्यता ध्यानात घेऊन दुसरा दिवस राखीव ठेवण्यात आला होता. उरलेले १३ बॉल्स दुसर्‍या दिवशी खेळवणं सहज शक्यं होतं पण...

वर्ल्डकपच्या प्रसारणाचे हक्कं असलेल्या चॅनल नाईनच्या अधिकार्‍यांनी याला नकार दिला!
कोणत्याही परिस्थितीत त्याच दिवशी रात्री १०.१० पर्यंत मॅच संपविण्याबद्दल चॅनल नाईनचे अधिकारी ठाम होते!
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या चॅनल नाईनच्या अधिकार्‍यांच्या हट्टापुढे माघार घ्यावी लागली होती!

पावसाच्या विचित्रं नियमामुळे आणि चॅनल नाईनच्या अधिकार्‍यांच्या अट्टाहासामुळे दक्षिण आफ्रीकेच्या पदरी पराभव पडला होता!

केपलर वेसल्सने इंग्लिश खेळाडूंचं अभिनंदन केल्यावर आपल्या सहकार्‍यांसह मैदानाला चक्कर मारत प्रेक्षकांचे आभार मानले. स्टेडीयममध्ये हजर असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दक्षिण आफ्रीकन खेळाडूंचं अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर इंग्लिश खेळाडूंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या!

केपलर वेसल्स म्हणतो,
"If I'd been in Graham's position I'd have done the same thing, We had to bowl through semi-hard rain in their innings and didn't come off but England did. That's the umpires' decision. I can't do anything about this. I don't blame Gooch. It's unfortunate the England players got booed because it was no fault of theirs. It's just the rules."

ग्रॅहॅम गूचने पावसाबद्दलच्या नियमाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेतल्याचं प्रांजळपणे कबूल केलं. तो म्हणतो,
"I'd be lying if I didn't think that maybe we should stay on. The South Africans must feel very dejected to loose like that and my heart goes out to them."

वर्ल्डकपच्या संयोजकांवर आणि खासकरुन पावसाच्या विचित्रं नियमावर अपेक्षेप्रमाणेच टीकेची झोड उठवण्यात आली.

'द क्रिकेटर' मध्ये जॉन वूडकॉकने संयोजकांवर आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर प्रश्नचिन्हं उपस्थित करताना लिहीलं,
"South Africa’s chances of reaching the final floundered on a rule which no-one had bothered to think through. For so important an event to be reduced at times to a lottery must have been a source of great embarrassment to the organizers, though to the best of my knowledge they came nowhere near to admitting it. It is difficult to avoid the impression that the Australian Cricket Board are obliged to defer to television, by which I mean to Mr Packer's Channel Nine and all their delirious ways."

'द इंडीपेंडंट' मध्ये मार्टीन जॉन्सन म्हणाला,
"Had Martians landed at the SCG they would have concluded there was no intelligent life on earth and gone home."

आपल्या लेखात जॉन्सनने दक्षिण आफ्रीकेच्या पाच ओव्हर्स कमी टाकण्यावर आणि शेवटच्या ओव्हरमधल्या वेळकाढूपणावरही अचूक बोट ठेवलं. तो म्हणतो,
"The tears shed by non-South Africans last night would barely have filled an eggcup. Not only did they choose to bat second after winning the toss on a day that had blown in straight from Manchester but they also resorted to tactics that reassured us that the cynical side of South African sport has not disappeared after 22 years in isolation."

पावसाबद्द्लचा नियम बनवणार्‍यांपैकी एकजण होता भूतपूर्व ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि कॉमेंटेटर रिची बेनॉ!
वर्ल्डकपनंतर बेनॉने या प्रकाराबद्दल बोलणं कायम टाळलं होतं!

फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध इमरान खान - जावेद मियांदाद यांची १३९ रन्सची पार्टनरशीप आणि वासिम अक्रम - मुश्ताक अहमद यांच्या अप्रतिम बॉलिंगपुढे इंग्लंडची डाळ शिजली नाही. इंग्लंडला २२ रन्सनी धूळ चारत पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला.

तीन वर्ल्डकप फायनलमध्ये खेळूनही ग्रॅहॅम गूचच्या पदरी तीनही वेळा पराभवच आला!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

16 Feb 2017 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

अजून एक जबरदस्त लेख.

हा सामना बघितल्यावर आणि हा लेख वाचण्यापूर्वी या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर अन्याय झाला असेच वाटत होते. पण आता समजते की दक्षिण आफ्रिकेची बाजूही पूर्ण धुतल्या तांदळासारखी नव्हती. कोणताही संघ पहिल्यांदा खेळायला येताना आपल्याला ५० ओव्हर्स मिळतील या हिशेबाने खेळायला येत असतो. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मुद्दामून वेळकाढूपणा केला असेल तर त्यामुळे इंग्लंडला खेळायला ४५ ओव्हर्सच मिळाल्या तर तो पण इंग्लंडवर अन्यायच झाला. इंग्लंडच्या संघाने जर शेवटी ५ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करायची असा प्लॅन बनवला असेल तर तो पूर्णच चौपट होईल. असे करणे समर्थनीय नाहीच. इतकी वर्षे मला वाटत होते की पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला म्हणून तो ५० ऐवजी ४५ षटकांचा खेळविण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेचा हा प्लॅन मला माहित नव्हता.

पावसाचा तो निर्णय अगदीच विचित्र होता. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मॅचमध्ये फटका बसला होता. तसाच फटका दक्षिण आफ्रिकेलाही सेमीफायनलमध्ये बसला. या निर्णयाचा प्रताप माहित असतानाही केप्लर वेसल्सने टॉस जिंकूनही पहिल्यांदा बॉलिंग का घेतली हा प्रश्नही तेव्हा पडलाच होता.

बबन ताम्बे's picture

16 Feb 2017 - 11:46 am | बबन ताम्बे

द. आफ्रीकेच्या खेळाडुंची चेह-यावर निराशा लपत नव्ह्ती. डकवर्थ-लुइस नियम नंतर बदलला (की बंद केला?) ते बरे झाले.
पण माझ्यासारख्या भारतीय क्रिकेट रसिकांना पण वाईट वाटले. वाईट याच्यासाठी की फायनलला पाकीस्तान इंग्लंडला सहज हरवेल असे वाटत होते. त्याऐवजी द. आफ्रीका फायनलला असती तर पाकीस्तानला जड गेले असते असे त्यावेळी वाटत होते. जावेद मियादादनी मारलेल्या माकडउडया आणि भारतीय खेळाडुंचा केलेला अपमान , यामुळे पाकीस्तानच्या टीमबद्द्ल भारतीयांना खूप चीड होती.
पुढच्या वर्ल्ड कपला पण द. आफ्रिका दुर्दैवीच ठरली.

अभिजीत अवलिया's picture

16 Feb 2017 - 3:36 pm | अभिजीत अवलिया

१९९२ चा विश्वचषक ही दक्षिण आफ्रिकेची सर्वात मोठी हुकलेली संधी होती असे सतत वाटत राहते.

आषाढ_दर्द_गाणे's picture

17 Feb 2017 - 2:56 am | आषाढ_दर्द_गाणे

पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
ह्याच वर्ल्ड कप मध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध केवळ एका धावेने हरला होता.
राजू आणि श्रीनाथ ह्यांनी घोळ घातला आणि शेवटच्या चेंडूवर रनआऊट झाले.
तो सामना (दुर्दैवाने) अजूनही स्मरणात आहे.

प्रसन्न३००१'s picture

17 Feb 2017 - 12:35 pm | प्रसन्न३००१

अजून एक जबरदस्त लेख.. याच १९९२ वर्ल्डकप मधल्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दलसुद्धा लेख येउद्या

एक एकटा एकटाच's picture

19 Feb 2017 - 8:05 am | एक एकटा एकटाच

मस्त लेख