वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - न्यूझीलंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
9 Feb 2017 - 9:53 am

१० ऑक्टोबर १९८७
लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम, हैद्राबाद

हैद्राबादच्या मैदानात न्यूझीलंड आणि झिंबाब्वे यांच्यातली ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती. अद्यापही टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या झिंबाब्वेच्या संघाचा १९८३ नंतर हा दुसराच वर्ल्डकप होता. १९८३ मध्ये झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवून सगळ्यांनाच चकीत केलं होतं. भारताचीही त्यांनी १७ / ५ अशी अवस्था केली होती, पण कपिलदेवच्या अफलातून इनिंग्जने भारताला तारलं होतं. १९८३ च्या वर्ल्डकपबरोबरच कॅप्टन डंकन फ्लेचरचं करीअरही संपुष्टात आलं होतं. फ्लेचरनंतर झिंबाब्वेच्या कॅप्टन म्हणून अनुभवी जॉन ट्रायकॉसची निवड झाली होती.

ट्रायकॉसच्या झिंबाब्वे संघात १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेले रॉबिन ब्राऊन, ग्रँट पॅटरसन, डेव्ह हौटन, अँडी पायक्रॉफ्ट, अली शाह असे बॅट्समन होते. फास्ट बॉलर पीटर रॉसन, इयन बुचार्ट आणि स्वतः ट्रायकॉस यांच्या जोडीला पहिल्याच वन डे मध्ये खेळणार्‍या एडो ब्रँडेसचाही झिंबाब्वे संघात समावेश होता. त्याखेरीज अनुभवी ऑलराऊंडर असलेला केव्हीन करनही होता! परंतु जेफ क्रोच्या न्यूझीलंडपुढे झिंबाब्वेचा कितपत निभाव लागेल याबद्दल सर्वांनाच शंका होती. न्यूझीलंडच्या संघात कॅप्टन जेफ आणि मार्टीन हे क्रो बंधू, जॉन राईट, दीपक पटेल असे बॅट्समन होतेच, शिवाय विकेटकीपर - बॅट्समन इयन स्मिथही होता. रिचर्ड हॅडलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या बॉलिंगचा मुख्य भार होता तो इवान चॅटफिल्डवर. चॅटफिल्डच्या जोडीला अनुभवी मार्टीन स्नेडन, विली वॉटसन, जॉन ब्रेसवेल, स्टीफन बूक असे बॉलर्स होते. अँड्र्यू जोन्सला या मॅचमध्ये वन डे मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली होती.

हैद्राबादमध्ये सकाळी पावसाची सर येऊन गेली होती. पाऊस थांबलेला असला तरीही हैद्राबादचं वातावरण चांगलंच ढगाळ होतं. या परिस्थितीचा फायदा उठवण्याच्या दृष्टीने जॉन ट्रायकॉसने टॉस जिंकल्यावर फिल्डींगचा निर्णय घेतला!

जॉन राईटच्या जोडीला ओपनिंगला आला मार्टीन स्नेडन!

न्यूझीलंडचा कोच ग्लेन टर्नरचा हिशोब अगदी रोकठोक होता. जॉन राईटच्या जोडीला अँड्र्यू जोन्सची ओपनर म्हणून निवड करण्यात आली होती. पण पहिल्याच वन डे मध्ये खेळणारा जोन्स, क्रो बंधू, पटेल, स्मिथ यांच्यापैकी कोणालाही ओपनिंगला पाठवून एखाद्या बॅट्समनची निष्कारण विकेट गमावण्याची टर्नरची तयारी नव्हती. त्यामुळे बळीचा बकरा म्हणून स्नेडनची वर्णी लागली होती.

स्नेडन म्हणतो,
"It was an absolute bolt out of the blue for me. It was quite a wet day to start with. Glenn Turner, came up to me and said, 'Listen, you're going to open the batting today.' The theory was that the conditions were a bit damp and a bit green and Turner was reluctant to expose the regular top order for the first few overs. It was a bit of a sacrificial-lamb situation."

जॉन राईटने सावध पवित्रा घेत सुरवातीच्या काही ओव्हर्समध्ये झिंबाब्वेच्या बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. पीटर रॉसन - केव्हीन करन दोघांचेही बॉल चांगले स्विंग होत होते. रॉसनच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये राईटच्या बॅटची एज लागली, पण स्लिपमध्ये अँडी पायक्रॉफ्टपासून बॉल किंचित पुढे पडला. स्नेडनने मात्रं रॉसनला फटकावून काढण्याचा मार्ग पत्करला होता! एडो ब्रँडेसच्या पहिल्याच ओव्हरमध्ये राईट रनआऊट होण्यापासून थोडक्यात वाचला. अखेर जॉन ट्रायकॉसच्या ऑफस्पिनला ड्राईव्ह मारण्याच्या नादात विकेटकीपर डेव्हीड हौटनने राईटचा कॅच घेतला. न्यूझीलंड ५९ / १!

राईट आऊट झाल्यावर आलेल्या मार्टीन क्रोने आक्रमक पवित्रा घेत झिंबाब्वेच्या बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. एव्हाना आत्मविश्वासाने खेळत असलेल्या स्नेडननेही मार्टीन क्रोच्या पावलावर पाऊल टाकत फटकेबाजीला सुरवात केली. पहिल्या स्पेलमध्ये अचूक बॉलिंग टाकणार्‍या केव्हीन करनला स्नेडनने लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. स्नेडन आणि मार्टीन क्रो यांनी ८४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर पीटर रॉसनला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात कव्हर्समध्ये अँड्र्यू वॉलरने स्नेडनचा कॅच घेला. बळीचा बकरा म्हणून पाठवलेल्या स्नेडनने ९१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ६४ रन्स फटकावल्या! न्यूझीलंड १४३ / २.

स्नेडन परतल्यावर जेमतेम २ रन्सची भर पडते तोच अली शाहच्या बॉलवर मिडविकेट बाऊंड्रीवर ब्रँडेसने अँड्र्यू जोन्सचा कॅच घेतला. पहिल्याच वन डे मध्ये शून्यावर आऊट होण्याची जोन्सवर नामुष्की ओढवली. जेफ आणि मार्टीन क्रो बंधूंनी २१ रन्स जोडल्यावर पीटर रॉसनच्या बंपरवर पूल मारण्याच्या प्रयत्नात मार्टीन क्रोची टॉपएज लागली आणि फॉलो थ्रूमध्ये स्वतः रॉसननेच त्याचा कॅच घेतला. ८८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि अली शाहला मारलेल्या सिक्सच्या जोरावर मार्टीन क्रोने ७२ रन्स फटकावल्या. न्यूझीलंड ११६ / ४!

मार्टीन क्रो आऊट झाल्यावर जेमतेम ३ रन्सची भर पडते तोच अली शाहने दीपक पटेलला शून्यावर एलबीडब्ल्यू केलं. जॉन ब्रेसवेलने चाणाक्षपणे जेफ क्रोला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा मार्ग पत्करला. जेफ क्रो - ब्रेसवेल यांनी न्यूझीलंडचा स्कोर २०५ पर्यंत नेल्यावर करनला फटकावण्याच्या नादात लाँगऑन बाऊंड्रीवर रॉबिन ब्राऊनने जेफ क्रोचा कॅच घेतला. ३५ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह जेफ क्रोने ३१ रन्स फटकावल्या.

जेफ क्रो परतल्यावर बॅटींगला आलेल्या इयन स्मिथने सुरवातीपासूनच झिंबाब्वेच्या बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. रॉसनला त्याने मिडविकेटवर सिक्स ठोकली. पुढच्याच ओव्हरमध्ये स्मिथने करनला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. ब्रेसवेलबरोबरच्या ३५ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये २९ रन्स स्मिथच्या होत्या! अखेर करनलाच फटकावण्याच्या नादात ब्राऊनने स्मिथचा कॅच घेतल्यावर झिंबाब्वेच्या बॉलर्सनी सुटकेचा नि:श्वास टाकला. २० बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि रॉसनला मारलेल्या सिक्सच्या जोरावर स्मिथने २९ रन्स फटकावल्या!

अखेर ५० ओव्हर्स संपल्या तेव्हा न्यूझीलंडचा स्कोर होता २४२ / ७!
जॉन ट्रायकॉसने अचूक ऑफस्पिन बॉलिंगचं प्रात्यक्षिक दाखवत १० ओव्हर्समध्ये फक्तं २८ रन्स दिल्या होत्या!

स्नेडन म्हणतो,
"240 was a pretty good score. We felt that we had enough, and it was just a matter of exerting the pressure that we needed to and they would struggle."

२४३ रन्सचं टार्गेट समोर असलेल्या झिंबाब्वेला इवान चॅटफिल्डने तिसर्‍याच ओव्हरमध्ये हादरवलं. चॅटफिल्डच्या आऊटस्विंगरवर दुसर्‍या स्लिपमध्ये जेफ क्रोने रॉबिन ब्राऊनचा कॅच घेतला. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच स्नेडनने अली शाहला एलबीडब्ल्यू करुन झिंबाब्वेची अवस्था १० / २ अशी केली!

हौटन म्हणतो,
"I was keeping at the time, so I was pretty tired at the end of the first 50 overs. I had decided to come in at first drop, so I was in pretty early."

हौटन आणि अँडी पायक्रॉफ्ट यांनी सावधपणे खेळत ५१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मार्टीन क्रोच्या अचूक थ्रोमुळे पायक्रॉफ्ट रन आऊट झाला. अनुभवी केव्हीन करनकडून झिंबाब्वेला खूप आशा होत्या, पण आणखीन जेमतेम ६ रन्सची भर पडते तोच विली वॉटसनच्या बॉलवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात मिडऑफला स्टीफन बू़कने करनचा कॅच घेतला. झिंबाब्वे ६६ / ४!

करन आऊट झाल्यावर आलेल्या अँडी वॉलरने पहिल्याच वन डे मध्ये खेळताना हौटनला सपोर्ट देण्याचं धोरण अवलंबलं. हौटन - वॉलर यांनी १९ रन्स जोडल्यावर वॉटसनच्या आऊटस्विंगरवर विकेटकीपर इयन स्मिथने वॉलरचा कॅच घेतला. आणखीन ८ रन्सची भर पडते तोच स्टीफन बूकला कट मारण्याच्या नादात ग्रँट पॅटरसनही स्मिथच्या हातात कॅच देऊन परतला. बूकनेच पीटर रॉसनला एलबीडब्ल्यू केल्यावर झिंबाब्वेची अवस्था १०४ / ७ अशी झाली.

झिंबाब्वेला मॅच जिंकण्यासाठी अद्याप १३९ रन्सची आवश्यकता होती!

रॉसन परतल्यावर बॅटींगला आलेल्या इयन बुचार्टने थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करण्यास सुरवात केली. अद्यापही जवळपास ३० ओव्हर्स बाकी असल्याने जास्तीत जास्तं वेळ खेळून काढण्याचा मार्ग दोघांनी पत्करला.

हौटन म्हणतो,
"I don't even remember scoring my first 40 or 50 runs because I was just ticking it over, trying to find a partner to stay with me. When Butchy came in at 9, we had more than 30 overs to play, so all we looked to do was get a partnership going and try and save face: 'Let's not get bowled out for 120 because that looks rubbish.' We started to get things going and soon we had 130 or 140, and gradually both of us expanded our games."

न्यूझीलंडच्या संघात बूक, ब्रेसवेल आणि दीपक पटेल असे तीन स्पिनर्स होते. हौटन स्पिन बॉलिंगवरचा उत्कृष्टं बॅट्समन असल्याने त्याने स्पिनर्सना फटकावून काढण्यास सुरवात केली. खासकरुन रिव्हर्स स्वीपचा मुक्तहस्ताने वापर करुन त्याने स्पिनर्सचा र्‍हिदम पार बिघडवून टाकला.

झिंबाब्वेचा मॅनेजर डेव्ह अर्नॉटला हौटनचा रिव्हर्स स्वीपचा सढळ वापर खटकत होता. अर्नॉटचा मुलगा केव्हीन अर्नॉट झिंबाब्वेच्या स्क्वाडमध्ये होता. जवळपास दर दोन ओव्हर्सनंतर त्याच्यामार्फत हौटनला रिव्हर्स स्वीप मारणं बंद करण्याची डेव्ह अर्नॉट सूचना पाठवत होता.

"Dad says, please stop playing the reverse sweep." सलग चौथ्यांदा केव्हीनने डेव्ह अर्नॉटचा निरोप हौटनला सांगितला.
"Tell your dad to shut up or else I will rip his fucking throat out!" हौटनने खडसावलं!

हौटन खेळत असेपर्यंत पुन्हा केव्हीन अर्नॉट मैदानात आला नाही!

हौटनने आता आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंड बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. बूक, पटेल, ब्रेसवेल यांना त्याने दणदणीत सिक्स ठोकल्या. जेफ क्रोने स्नेडनला बॉलिंगला आणलं, पण हौटनने त्याला सलग तीन बाऊंड्री तडकावल्या! त्यातच चॅटफिल्डच्या १० ओव्हर्स संपलेल्या असल्यामुळे जेफ क्रो चांगलाच पेचात सापडला होता. याचा अचूक फायदा उठवत हौटनची आतषबाजी सुरु होती. वॉटसनचा अपवाद वगळता इतर कोणीही त्याच्यासमोर टिकत नव्हतं. हैद्राबादच्या स्टेडीयममध्ये हजर असलेल्या ३० हजार प्रेक्षकांचा हौटनला जोरदार पाठींबा होता! त्याच्या प्रत्येक शॉटला प्रेक्षकांकडून दाद मिळत होती.

हौटन म्हणतो,
"It was stunning that Zimbabwe v New Zealand match in Hyderabad was sold out. It was hard to believe. When we were batting, thirty thousand fans were absolutely right behind us!"

हैद्राबादच्या तीव्र उन्हा़ळ्याचा एव्हाना हौटनला त्रास जाणवत होता. ५० ओव्हर्स विकेटकीपींग केल्यावर तिसर्‍या ओव्हरपासून तो बॅटींग करत होता. डीहायड्रेशनमुळे त्याच्या अंगार रन्स पळण्याचंही त्राण उरलं नव्हतं. पण न्यूझीलंडच्या बॉलर्सवर निराळीच आपत्ती ओढवली. हौटनने अधिकच आक्रमक पवित्रा घेत केवळ बाऊंड्री आणि सिक्स ठोकण्याचा सपाटा लावला!

हौटन म्हणतो,
"I was starting to lose energy. I was losing water all the time, to the extent that I couldn't drink - it wouldn't go in any more - and I was dehydrated. I just decided with Butchy that we were going to try and win it in boundaries for a while, because I couldn't run any more. So for a couple of overs we both stood there swinging from the hip, and we got quite good at it!"

हौटनची आतषबाजी सुरु असताना बुचार्टने केवळ त्याला जास्तीतजास्त स्ट्राईक देण्याचा पवित्रा घेतला होता. हौटन - बुचार्टच्या या पार्टनरशीपमुळे न्यूझीलंडचे खेळाडू चांगलेच हादरले होते.

स्नेडन म्हणतो,
"It sort of went from a situation where we had the match totally under control to a situation where we thought, "Ah yeah, he's having a bit of fun and we just have to keep our heads", to a situation where we thought, "Whoof, we're not really in control of this." It didn't matter who was bowling. He was taking it to us and he was running us ragged, really. He had us on toast by the end!"

हौटन आणि बुचार्ट झिंबाब्वेला सहजपणे मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच...

मार्टीन स्नेडनचा बॉल हौटनने मिडऑनवरुन उचलला...
हौटनच काय पण स्टेडीयममधल्या तीस हजार प्रेक्षकांची नजर बाऊंड्रीकडे लागली होती...
मिडऑनवर असलेला मार्टीन क्रो मात्रं हौटनने शॉट मारताच बॉलवरची नजर तिळमात्रंही ढळू न देता बाऊंड्रीच्या दिशेने धावत होता...
बाऊंड्रीपासून जेमतेम १० यार्डांवर मार्टीन क्रोने पुढे डाईव्ह मारली...
...आणि बॉल त्याच्या हातात आला!
हौटनची अफलातून इनिंग्ज मार्टीन क्रोच्या तितक्याच अप्रतिम कॅचने संपुष्टात आली!

१३७ बॉल्समध्ये १३ बाऊंड्री आणि ६ सिक्स तडकावत हौटनने १४२ रन्स झोडपून काढल्या होत्या!
झिंबाब्वे २२१ / ८!

स्नेडन म्हणतो,
"It certainly wasn't my bowling that had done it - it was just a moment of brilliance from Martin's fielding that pulled it out of the bag."

हौटन म्हणतो,
"I got a pretty decent piece of it - it probably would have bounced a few yards short of the boundary, but I got too much height, which gave Martin time to turn around and sprint to it, and he took it full tilt looking over his shoulder - it was a brilliant catch."

झिंबाब्वेला मॅच जिंकण्यासाठी अद्याप २२ रन्सची आवश्यकता होती!

हौटनच्या जागी बॅटींगला आलेल्या एडो ब्रँडेसला बुचार्टने एक रनसाठी कॉल दिला, पण रन काढताना ब्रँडेसच्या मांडीचा स्नायू दुखावल्याने तो अर्ध्यातच कोलमडला आणि रनआऊट झाला. ब्रँडेसच्या दुर्दैवाने त्याची दुखापत इतकी गंभीर होती, की वर्ल्डकपच्या पुढच्या एकाही मॅचमध्ये तो खेळू शकला नाही. झिंबाब्वे २२१ / ९!

बुचार्टच्या जोडीला आला शेवटचा बॅट्समन कॅप्टन जॉन ट्रायकॉस! बुचार्टने आता आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. बूकला बाऊंड्री मारल्यावर स्नेडनला त्याने स्टेडीयमच्या बाहेर दणदणीत सिक्स ठोकली!

हौटन म्हणतो,
"Butchy hit one straight out of Hyderabad. I don't know what the next city is but the ball landed quite close to it!"

शेवटची ओव्हर सुरु झाली तेव्हा झिंबाब्वेला जिंकण्यासाठी ६ रन्सची आवश्यकता होती!
ट्रायकॉसच्या मते प्रत्येक बॉलवर एकेक रन घेऊन मॅच जिंकणं शक्यं होतं.
बुचार्टला एका झटक्यात सिक्स ठोकून मॅच संपवणं जास्तं पसंत होतं!
शेवटची ओव्हर टाकणारा बॉलर होता लेफ्ट आर्म स्पिनर स्टीव्हन बूक!

बूकच्या पहिल्या बॉलवर बुचार्टने एक लेगबाय घेतली...
दुसर्‍या बॉलवर ट्रायकॉसने एक रन काढली...
तिसर्‍या बॉलवर बुचार्टला काहीच करता आलं नाही...

झिंबाब्वेला मॅच जिंकण्यासाठी ३ बॉल्समध्ये ४ रन्सची आवश्यकता होती!

बूकचा चौथा बॉल बुचार्टने फटकावण्याचा प्रयत्नं केला..
बॉल त्याच्या पॅडवर लागून ऑफसाईडला घरंगळला..
ट्रायकॉस एक रन काढण्यासाठी धावत सुटला..
बुचार्टचं मात्रं ट्रायकॉसकडे लक्षंच नव्हतं! तो बॉलकडे पाहत होता...
ट्रायकॉस त्याच्या शेजारी येऊन धडकल्यावर बुचार्ट भानावर आला, पण आता उशीर झाला होता...
इयन स्मिथने दहा यार्डांवर घरंगळलेल्या बॉलकडे धाव घेत तो पिकअप केला आणि बूककडे थ्रो केला...
बूकने आरामात बेल्स उडवल्या आणि बुचार्टला रनआऊट केलं!

झिंबाब्वेची इनिंग्ज २३९ रन्समध्ये संपुष्टात आली!
अवघ्या ३ रन्सनी न्यूझीलंडने मॅच जिंकली!

हौटन म्हणतो,
"We ended up losing by three runs, which was very sad."

अँड्र्यू जोन्स म्हणतो,
"We were about as relieved as they were pissed off."

मॅन ऑफ द मॅच म्हणून डेव्हीड हौटनची निवड झाली हे वेगळं सांगायला नकोच!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

9 Feb 2017 - 10:00 am | गॅरी ट्रुमन

आणखी एका अविस्मरणीय सामन्याविषयी आणखी एक अप्रतिम लेख. या सामन्यातील डेव्ह हॉटनची बॅटिंग केवळ लाजबाब होती. सामना न्यू झीलंडने जिंकला खरा पण प्रेक्षकांची मने जिंकली निसंशयपणे हॉटनने. या सामन्यानंतर हॉटन विशेष चमकला नाही पण हा सामना मात्र त्याचाच होता.

स्पार्टाकस's picture

9 Feb 2017 - 11:39 am | स्पार्टाकस

भारताविरुद्ध झिंबाब्वेच्या पहिल्यावहिल्या टेस्टमधे झिंबाब्वेतर्फे डेव्ह हौटननेच पहिली सेंच्युरी मारली होती.

गॅरी ट्रुमन's picture

9 Feb 2017 - 11:50 am | गॅरी ट्रुमन

धन्यवाद. १९९२ ची हरारे टेस्ट का? हे लक्षात नव्हते.

या टेस्टमध्ये झिम्बाब्वेने चांगल्या ४०० पेक्षा जास्त धावा पहिल्या डावात काढल्या होत्या आणि भारताची थोडी दमछाकच झाली होती तेवढ्या धावा करताना. संजय मांजरेकरने आयत्या वेळी चांगली कामगिरी करून शतक झळकावले. नाहीतर खरा तर आपल्याला झिम्बाब्वेसारख्या लिंबूटिंबू संघाकडून फॉलोऑनच मिळायचा. या टेस्टमधील संजय मांजरेकरच्या कामगिरीविषयी ठाण्यातील पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांनी लिहिले होते की संजय मांजरेकर हा फटाका ऑस्ट्रेलियात गरम झाला आणि झिम्बाब्वेमध्ये फुटला (भारतीय संघाने १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता). दुर्दैवाने हा फटाका झिम्बाब्वेमध्ये फुटला त्यानंतर विशेष कधी चमकलाच नाही. १९९६ च्या विश्वचषकातील मुंबईतील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मॅचमधील त्याने चांगली कामगिरी केली तसेच १९९४ च्या वेस्ट इंडिजच्या भारत दौर्‍यातही त्यामानाने चांगली कामगिरी केली होती. पण पाकिस्तानविरूध्द कराचीमध्ये शतक आणि लाहोरमध्ये द्विशतक ठोकणारा आणि वेस्ट इंडीजच्या तोफखान्याला तोंड देत ब्रिजटाऊनमध्ये शतक ठोकणारा संजय मांजरेकर नंतर कधी दिसलाच नाही :(

यशोधरा's picture

9 Feb 2017 - 10:08 am | यशोधरा

मस्त लिहिलंय!

सिरुसेरि's picture

9 Feb 2017 - 6:11 pm | सिरुसेरि

मस्त आठवण . रिलायन्स वर्ल्ड कपमधली एक जबरदस्त मॅच .

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2017 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

एकदम झका.... स!