वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२१ जून १९७५
लॉर्डस्, लंडन
मिडलसेक्स काऊंटीचं आणि इंग्लिश क्रिकेटचं माहेरघर असलेल्या ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात वेस्ट इंडी़ज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगणार होती. पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव मॅचचा अपवाद वगळता सेमी फायनल गाठण्यास वेस्ट इंडीजला फारसे प्रयास पडले नव्हते. सेमी फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला १५८ मध्ये गुंडाळत दिमाखात फायनल गाठली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये आली होती. सेमी फायनलमध्ये गॅरी गिल्मोरने एकहाती इंग्लंडला नामोहरम करुन ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
वेस्ट इंडी़जच्या संघात रॉय फ्रेड्रीक्स, अल्विन कालिचरण, रोहन कन्हाय, कॅप्टन क्लाईव्ह लॉईड असे अनुभवी आणि आक्रमक बॅट्समन होते. गॉर्डन ग्रिनिज, व्हिव्हियन रिचर्डस यांच्या वन डे करीअरची वर्ल्डकपमध्येच नुकतीच सुरवात झाली होती. कीथ बॉईस, बर्नाड ज्युलियन हे ऑलराऊंडर आणि व्हॅनबर्न होल्डर, अँडी रॉबर्टस् यांच्यासारखे फास्ट बॉलर्स होते. या सगळ्यांच्या जोडीला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचा हिरो विकेटकीपर डेरेक मरे होताच!
ऑस्ट्रेलियन संघही वेस्ट इंडीजच्या तोडीस तोड होता. अॅलन टर्नर, रिक मॅक्कॉस्कर, कॅप्टन इयन आणि ग्रेग हे चॅपल बंधू, डग वॉल्टर्स, रॉस एडवर्डस् असे बॅट्समन ऑस्ट्रेलियाकडे होते. रॉडनी मार्शसारखा विकेटकिपर होता. वर्ल्डकप पूर्वीच्या अॅशेस सिरीजमध्ये इंग्लंडचा बँडबाजा वाजवणारे डेनिस लिली, जेफ थॉमसन, मॅक्स वॉकर हे बॉलर्स होते. त्यांच्या जोडीला होता तो सेमीफायनलचा हिरो गॅरी गिल्मोर! इंग्लंडविरुद्ध ६ विकेट्स घेतल्यावर त्याला वगळण्याचा प्रश्नंच उद्भवत नव्हता!
इयन चॅपलने टॉस जिंकल्यावर फिल्डींगचा निर्णय घेतला. सेमी फायनलप्रमाणेच गिल्मोरच्या स्विंगचा फायदा उठवण्याचा त्याचा हेतू होता, परंतु वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला तो डेनिस लिलीने! अर्थात यात नशिबाचाच भाग जास्तं होता....
लिलीचा लेग स्टंपवर पडलेला बंपर रॉय फ्रेड्रीक्सने लाँगलेग बाऊंड्रीपार हूक केला. सर्व ऑस्ट्रेलियन फिल्डर्स आणि नॉनस्ट्रायकर असलेल्या ग्रिनिजचीही नजर बॉलवर होती, परंतु खुद्दं फ्रेड्रीक्सने मात्रं स्वत:वर चरफडत पॅव्हेलियनची वाट धरली होती! लिलीला हूक करण्याच्या नादात फ्रेड्रीक्सचा पाय स्टंपला लागून बेल पडली होती. फ्रेड्रीक्स हिट विकेट झाला होता!
फ्रेड्रीक्सनंतर आजतागायत एकही बॅट्समन वर्ल्डकप फायनलमध्ये हिटविकेट झालेला नाही!
फ्रेड्रीक्सच्या जागी आलेल्या कालिचरणने दोन बाऊंड्री ठोकत आक्रमक सुरवात केली होती, परंतु गिल्मोरचा बॉल कट् करण्याच्या प्रयत्नात रॉडनी मार्शने त्याचा कॅच घेतला. ग्रिनिज आणि कालिचरण आऊट झाल्यावर आलेला रोहन कन्हाय दोघांनाही लिली, गिल्मोर आणि थॉमसनच्या अचूक बॉलिंगमुळे फटकेबाजी करणं अशक्यं झालं होतं. ६१ बॉल्समध्ये १३ रन्स केल्यावर अखेर थॉमसनच्या बॉलवर मार्शने ग्रिनिजचा कॅच घेतला. वेस्ट इंडीज ५० / ३!
लॉईड बॅटींगला आल्यावर इयन चॅपलने चाक्षाणपणे लिलीला बॉलिंगला आणलं. लॉईडवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही, उलट आक्रमक पवित्रा घेत त्याने लिली आणि थॉमसनवर जबरदस्तं प्रतिहल्ला चढवला! वर्ल्डकपपूर्वीच्या अॅशेस सिरीजमध्ये लिली आणि थॉमसननी इंग्लिश बॅट्समनची अक्षरशः वाताहात केली होती, त्यामुळे लिली आणि थॉमसनची धुलाई होत असलेली पाहून लॉर्डसवर हजर असलेल्या ब्रिटीश प्रेक्षकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या तरंच नवल! वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या बरोबरीने जल्लोष करत ते लॉईडला पाठींबा देत होते!
लॉईड २६ वर असताना लिलीला पूल मारण्याचा त्याचा प्रयत्नं फसला, पण मिडविकेटला रॉस एडवर्डसने त्याचा कॅच सोडला. अर्थात लॉईडला कसलीच पर्वा नव्हती. लिली - थॉमसन - वॉकर - गिल्मोर यांची धुलाई करण्याचा त्याचा कारभार व्यवस्थित सुरु होता. दुसर्या बाजूने अनुभवी रोहन कन्हाय थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करत होता. लॉईड - कन्हाय यांच्या पहिल्या ५० रन्सच्या पार्टनरशीपमध्ये कन्हायच्या फक्तं ६ रन्स होत्या! इयन चॅपलने ग्रेग चॅपलला बॉलिंगला आणल्यावर त्याला स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याच्या नादात कन्हायची टॉप एज लागली, पण थर्डमॅन बाऊंड्रीवर असलेल्या एडवर्डसला हा कॅचही घेता आला नाही. त्यापाठोपाठ वॉकरच्या बॉलवर फाईनलेगला लिलीनेही कन्हायचा कॅच टाकला!
बीबीसीवर कॉमेंट्री करणारा जॉन अरलॉट लॉईडच्या मिडविकेटला तडकावलेल्या बाऊंड्रीचं वर्णन करताना म्हणाला,
“The stroke of a man knocking a thistle top off with a walking stick!”
गिल्मोरच्या बॉलवर कव्हरड्राईव्ह मारत लॉईडने ८२ बॉल्समध्ये सेंच्युरी पूर्ण केली!
त्यात १२ बाऊंड्री आणि २ सिक्सचा समावेश होता!
सेंच्युरी पूर्ण केल्यावर गिल्मोरच्या बॉलवर लेग ग्लान्स मारण्याचा लॉईडचा प्रयत्नं फसला आणि मार्शने त्याचा कॅच घेतला. ५० / ३ अशा अवस्थेतून वेस्ट इंडीजची इनिंग्ज सावरत त्याने कन्हायबरोबर १४९ रन्सची पार्टनरशीप रचली होती. त्यात १०२ रन्स एकट्या लॉईडच्या होत्या! लॉईड आऊट झाल्यावर जेमतेम ७ रन्सची भर पडते तोच गिल्मोरने १०५ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह ५५ रन्स फटकावणार्या कन्हायची दांडी उडवली. कन्हायपाठोपाठ रिचर्डसलाही गिल्मोरने बोल्ड केल्यावर १९९/३ वरुन २०९ / ६ अशी वेस्ट इंडीजची अवस्था झाली!
सर्व प्रमुख बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने वेस्ट इंडीजची इनिंग्ज झटपट गुंडाळण्याचा इयन चॅपलचा इरादा होता, परंतु कीथ बॉईस (३४) आणि बर्नाड ज्युलियन (२६*) यांनी ५२ रन्सची पार्टनरशीप करत चॅपलचे मनसुबे उधळून लावले! बॉईस आऊट झाल्यावर विकेटकीपर डेरेक मरेनेही लिलीला सिक्स ठोकत वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले! अखेर वेस्ट इंडीजची इनिंग्ज संपली तेव्हा ६० ओव्हर्समध्ये त्यांनी २९१ रन्स फटकावल्या होत्या! सेमी फायनलमध्ये ६ विकेट्स घेऊन इंग्लंडला हादरवणार्या गॅरी गिल्मोरने फायनलमध्येही ५ विकेट्स उडवल्या होत्या!
वर्ल्डकप जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ६० ओव्हर्समध्ये २९२ रन्सचं टार्गेट होतं!
अॅलन टर्नर आणि रिक मॅक्कॉस्कर यांनी सावध पवित्रा घेत २५ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर कीथ बॉईसला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात दुसर्या स्लिपमध्ये कालिचरणने मॅक्कॉस्करचा कॅच घेतला. टर्नर आणि इयन चॅपल यांनी रॉबर्टसला सावधपणे खेळून काढत होल्डर - बॉईस - ज्युलियन यांना फटकावून काढण्याचं तंत्रं अवलंबलं. हे दोघं आरामात फटकेबाजी करत असतानाच....
लॉईडचा बॉल इयन चॅपलने मिडविकेटला खेळला आणि एक रनसाठी कॉल दिला. टर्नरने चॅपलला अपेक्षित प्रतिसाद दिला खरा पण....
मिडविकेटला असलेल्या रिचर्डसचा त्याला अंदाज आला नसावा..
रिचर्डसने बॉल पिकअप केला आणि दिसत असलेल्या एकमेव स्टंप त्याने अचूक उडवला!
अॅलन टर्नर रन आऊट झाला!
ऑस्ट्रेलिया ८१ / २!
टर्नर आऊट झाल्यावर चॅपलबंधूंनी कोणतीही रिस्क न घेता ऑस्ट्रेलियाला ११५ पर्यंत पोहोचवल्यावर पुन्हा एकदा रिचर्डसने ऑस्ट्रेलियाला आपली करामत दाखवली...
अँडी रॉबर्टसचा बॉल इयन चॅपलने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळला.
रिचर्डस आणि गलीत असलेला बॉईस यांच्यात गोंधळ उडाल्याने दोघांपैकी कोणीच आधी बॉल पिकअप केला नाही!
एक रन पदरात पाडून घेण्यासाठी चॅपल बंधूंनी धाव घेतली पण...
एव्हाना सावरलेल्या रिचर्डसने बॉलवर झडप घालत तो पिकअप केला आणि पुन्हा एकदा स्टंपचा वेध घेतला!
यावेळेस रिचर्डसच्या फिल्डींगची शिकार झाला ग्रेग चॅपल!
ग्रेग चॅपल आऊट झाल्यावरही इयन चॅपल आणि ग्रेगच्या जागी आलेला डग वॉल्टर्स यांनी आक्रमक पवित्रा घेत ४७ रन्सची फटकेबाज पार्टनरशीप करत ऑस्ट्रेलियाचा स्कोर १६२ पर्यंत पोहोचवला. अद्याप २१ ओव्हर्स बाकी होत्या. वर्ल्डकप जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अद्याप १३० रन्सची आवश्यकता होती. चॅपल - वॉल्टर्सची फटकेबाजी सुरु असल्याने आणि एडवर्डस - मार्श - गिल्मोर असे बॅट्समन बाकी असल्याने मॅच ऑस्ट्रेलियाच्या आवाक्यात होती.
पण पुन्हा एकदा रिचर्डसने ऑस्ट्रेलियाला 'हात' दाखवला!
लॉईडचा बॉल इयन चॅपलने मिडविकेटला फ्लिक केला आणि एक रनसाठी वॉल्टर्सला कॉल दिला.
मिडविकेटला रिचर्डसला पाहून दोन पावलांनंतर चॅपल थबकला, पण रिचर्डसच्या हातून बॉल सुटल्यावर त्याने रन पूर्ण करण्यासाठी धाव घेतली..
ही संधी सोडेल तर तो रिचर्डस कसला?
जेमतेम ३ यार्ड मागे गेलेला बॉल पिकअप करुन त्याने लॉईडकडे थ्रो केला.
लॉईडने बेल्स उडवल्या तेव्हा इयन चॅपल क्रीजपासून किमान दोन एक फूट दूर होता!
पुन्हा एकदा रिचर्डसने ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला चकवलं होतं!
९३ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह ६२ रन्स फटकावणार्या इयन चॅपलचा याखेपेस बळी गेला होता!
कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला रिची बेनॉ एखाद्या तत्ववेत्त्याच्या थाटात उद्गारला,
"The old rule of never run on a misfield still holds good."
आणि हे कमी होतं म्हणूनच की काय लॉईडने वॉल्टर्सची दांडी उडवली!
ऑस्ट्रेलिया १७० / ५!
रॉस एडवर्डस आणि रॉडनी मार्श यांनी सावधपणे खेळत २५ रन्स जोडल्या, पण बॉईसला फटकावण्याच्या नादात मार्श बोल्ड झाला. मार्श परतल्यावर एडवर्डस आणि सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सना फटकावणारा गिल्मोर यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर २२१ पर्यंत नेल्यावर बॉईसच्याच बॉलवर गिल्मोरचा हूक मिडविकेट बाऊंड्रीवर कन्हायच्या हातात गेला. एडवर्डसला आता फटकेबाजी करण्यापलिकडे पर्याय नव्हता. पण आणखीन १० रन्सची भर पडल्यावर बॉईसला ड्राईव्ह करण्याचा त्याचा प्रयत्नं पार फसला आणि कव्हर्समध्ये फ्रेड्रीक्सने त्याचा कॅच घेतल्यावर ऑस्ट्रेलियाच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्यात जमा होत्या! त्यातच शॉर्टफाईनलेगवरुन व्हॅनबर्न होल्डरने स्टंप्सचा अचूक वेध घेतल्यामुळे मॅक्स वॉकर रन आऊट झाला. ऑस्ट्रेलिया २३३ / ९!
ऑस्ट्रेलियाला अद्याप ७ ओव्हर्समध्ये ५९ रन्सची आवश्यकता होती.
ऑस्ट्रेलियाचे शेवटचे दोन बॅट्समन क्रीजवर होते.
डेनिस लिली आणि जेफ थॉमसन!
पण हार मानतील तर ते ऑस्ट्रेलियन कसले?
लिली आणि थॉमसननी चाणाक्षपणे १ - २ रन्स ढापण्यास सुरवात केली. रॉबर्टसच्या हाफव्हॉलीवर स्ट्रेट ड्राईव्हची आणि स्क्वेअरलेगला फ्लिकची बाऊंड्री वसूल करण्यात थॉमसनने कोणतीही कुचराई केली नाही! लिलीनेही थॉमसनच्या पावलावर पाऊल टाकत होल्डरला मिडऑनला असलेल्या लॉईड्च्या डोक्यावरुन बाऊंड्री तडकावली! या दोघांच्या फटकेबाजीमुळे लॉईडही गोंधळून गेला होता. लॉर्डसच्या बाल्कनीवर यच्चयावत ऑस्ट्रेलियन खेळाडू श्वास रोखून वेस्ट इंडीजच्या हातातून वर्ल्डकप हिसकावण्याच्या प्रयत्नात लिली आणि थॉमसनला यश यावं अशी मनोमन प्रार्थना करत होते!
शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी २६ रन्सची आवश्यकता होती!
होल्डरचा पहिलाच बॉल थॉमसनने स्क्वेअरलेग आणि फाईनलेगच्या मधल्या गॅपमध्ये ग्लान्स केला..
फाईनलेगला असलेल्या बॉईसच्या हाती बॉल जाण्यापूर्वी थॉमसनने एक रन पूर्ण केली आणि दुसरी रन घेण्यासाठी धूम ठोकली
एव्हाना बॉईसने बॉल पिकअप करुन विकेटकीपर डेरेक मरेकडे थ्रो केला होता.
मरेने बॉल कलेक्ट करुन बेल्स उडवल्या, पण थॉमसनने जिवाच्या आकांताने क्रीजमध्ये झेप घेतली होती!
वेस्ट इंडीजचे पाठीराखे प्रेक्षक मॅच जिंकल्याच्या आनंदात मैदानात धावून आले, पण अंपायर डिकी बर्डने थॉमसनला नॉट आऊट दिल्याचं ध्यानात आल्यावर निरुपायाने पुन्हा बाऊंड्रीपार परतण्यावाचून त्यांना गत्यंतर नव्हतं.
पुढच्या बॉलने या मॅचचा कळसाध्याय गाठला!
१९७५ च्या काळात वन डे मध्ये फिल्डींग रिस्ट्रीक्शन वगैरे भानगडी अस्तित्वात नव्हत्या. होल्डर आणि मरे यांच्याव्यतिरिक्त कव्हर्समध्ये असलेल्या रॉय फ्रेड्रीक्सचा अपवाद वगळता इतर ८ फिल्डर्स बाऊंड्रीवर होते!
अशा परिस्थितीत थॉमसनने होल्डरचा बॉल नेमका फ्रेड्रीक्सच्या हातात ड्राईव्ह केला!
वेस्ट इंडीजने मॅच जिंकल्याच्या आनंदात चारी बाजूंनी प्रेक्षकांनी मैदानात धाव घेतली!
पण अंपायर टॉम स्पेन्सरकडे कोणाचंच लक्षं गेलं नव्हतं!
व्हॅनबर्न होल्डरचा तो बॉल नोबॉल होता!
रॉय फ्रेड्रीक्सने नो बॉलचा कॉल अचूक टिपला होता. लिलीला रनआऊट करण्याच्या इराद्याने त्याने थ्रो केला पण बॉल स्टंपवर न लागता मैदानावर धावून आलेल्या प्रेक्षकांमध्ये लुप्तं झाला!
... आणि एकच गोंधळ उडाला!
फ्रेड्रीक्सप्रमाणेच डेरेक मरेनेही नोबॉलचा कॉल ऐकला होता. प्रेक्षकांपैकी कोणीही स्मृतीचिन्हं म्हणून स्टंप पळवू नयेत यासाठी तो स्टंप्सच्या शेजारी दक्षपणे उभा ठाकला. दरम्यान पॉईंटला असलेल्या अंपायर डिकी बर्डच्या डोक्यावरची हॅट आणि त्याने कंबरेभोवती गुंडाळलेले वेस्ट इंडीयन खेळाडूंचे स्वेटर्स गायब झाले!
प्रेक्षकांपैकी कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले कॉमेंट्रेटर्सही गोंधळले होते. फ्रेड्रीक्सने कॅच घेताच जिम लेकर उद्गारला,
"That's it!"
लिली आणि थॉमसन मात्रं चाणाक्षपणे या गोंधळाचा फायदा घेऊन जास्तीत जास्तं रन्स काढण्यासाठी पीचवर धावत सुटले होते!
अद्याप एकही प्रेक्षक पीचवर पोहोचला नव्हता!
तीन रन्स पळून काढल्यावर थॉमसन थांबला, पण लिलीला मात्रं थांबणं मंजूर नव्हतं!
"Come on Thommo! Let's keep going!" लिली म्हणाला.
"No!" थॉमसन गरजला, "Someone will produce ball from his pocket and run one of us out!"
मैदानातला गोंधळ निस्तरुन सर्व प्रेक्षक बाहेर गेल्यावर थॉमसनने अंपायर स्पेन्सरला विचारलं,
"How many are you giving us for that?"
"Two!" स्पेन्सर उत्तरला!
"Two?" थॉमसनचा भडका उडाला, "Pig's arse ... we've been running up and down here all afternoon."
"How many did you run?" डिकी बर्डने लिलीला विचारलं
"You should be counting," लिलीने सुनावलं, "But I make it about 17!"
अखेर दोघा अंपायर्सनी चर्चा केली आणि लिली - थॉमसनने काढलेल्या तीन आणि नोबॉलची एक मिळून ऑस्ट्रेलियाला ४ रन्स दिल्या!
होल्डरच्या पुढच्या बॉलवर लिलीला काहीच करता आलं नाही, पण तिसर्या बॉलवर त्याने १ रन काढली.
अद्याप ९ बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाला १८ रन्सची आवश्यकता होती!
होल्डरच्या ओव्हरच्या चौथ्याबॉलवर थॉमसनने क्रिजमधून पुढे सरसावत बॅट फिरवली...
बॉल त्याच्या बॅटला स्पर्शही न होता डेरेक मरेच्या ग्लोव्हज् मध्ये गेला...
थॉमसन एक रन काढण्याच्या प्रयत्नात होता पण लिलीने त्याला परत पाठवलं...
थॉमसन मागे वळला आणि त्याने क्रीजमध्ये झेप घेतली...
पण यावेळी मात्रं त्याला उशीर झाला होता...
डेरेक मरेचा अंडरआर्म थ्रो अचूक स्टंपवर बसला होता!
सर्वात महत्वाचं म्हणजे डिकी बर्डचं बोट वर गेलं होतं!
वेस्ट इंडीजने १७ रन्सनी फायनल जिंकून पहिल्यावहिल्या वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं!
वेस्ट इंडीजचे पाठीराखे प्रेक्षक मैदानावर धावून आले. वेस्ट इंडीजचे सर्व खेळाडू, लिली - थॉमसन आणि दोन्ही अंपायर्स पॅव्हेलियनच्या दिशेने धावत सुटले. डेरेक मरेने स्मृतिचिन्हं म्हणून तिन्ही स्टंप्स उचलले होते! प्रेक्षकांच्या गराड्यातून मैदानाबाहेर येईपर्यंत थॉमसनची दोन्ही पॅड्स कोणीतरी काढून घेतली होती! इतरही अनेक खेळाडूंच्या टोप्या प्रेक्षकांनी लांबवल्या होत्या, पण सर्वात वाईट अवस्था होती ती ड्रेसिंगरुमपासून सर्वात दूर - लाँगलेगला असलेल्या कीथ बॉईसची! वेस्ट इंडीजच्या पाठीराख्यांनी त्याला आलिंगन देत जमिनीशी जखडून टाकलं होतं आणि त्याच्या पायातले बूट लांबवले होते! अखेर पोलिसांनी बॉईसची सुटका केली!
सुपरकॅट क्लाईव्ह लॉईडने प्रेक्षकांच्या जल्लोषात झळाळता वर्ल्डकप उंचावला!
अनेक वर्षांनी वर्ल्डकप फायनलमधल्या पराजयाविषयी बोलताना इयन चॅपल म्हणाला,
"You obviously don't want to loose World Cup Final, but If you are going to lose, the man you'd like to see beat you is Clive Lloyd"
सर्वात अफलातून किस्सा झाला तो फायनलनंतर वर्षाभराने...
फायनलमधल्या दोन अंपायर्सपैकी एक डिकी बर्ड लंडनमध्ये बसमधून प्रवास करत असताना बसच्या वेस्ट इंडीयन वंशाच्या कंडक्टरकडे त्याचं लक्षं गेल्यावर तो चमकलाच! त्या कंडक्टरच्या डोक्यावर असलेली हॅट हुबेहूब तो स्वतः वापरत असलेल्या हॅट्ससारखीच होती! डिकी बर्डने सहजच त्या हॅटविषयी चौकशी केल्यावर कंडक्टर दिलखुलास हसत म्हणाला,
"Man, haven't you heard of Mr Dickie Bird? This is one of his hats. I took it off his head at the World Cup final ... we all ran onto the field and I won the race."
प्रतिक्रिया
28 Jan 2017 - 8:55 am | अजया
मस्त.
28 Jan 2017 - 11:12 am | शलभ
मस्त लिहिलंय
29 Jan 2017 - 1:36 pm | यशोधरा
झक्कास लिहीलंय!
31 Jan 2017 - 11:34 am | बापू नारू
मस्त वर्णन
31 Jan 2017 - 12:04 pm | चिनार
मस्त !!!
31 Jan 2017 - 6:16 pm | पैसा
हहपुवा! अजरामर किस्से आहेत! सामन्याचे वर्णन तर तुफानच झाले आहे!
5 Feb 2017 - 5:33 pm | अभिजीत अवलिया
मस्त. त्या काळचे क्रिकेटचे नियम हे बॅट्समन आणी बॉलर दोघांनाही न्याय देणारे होते. पण सध्या बॉलरचा जो कुटाणा चालू असतो (जास्त करून भारतातल्या पाटा विकेटवर) त्यात सध्याच्या बॅट्समन फ्रेंडली नियमांचा देखील खूप मोठा वाटा आहे.