वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ ते २०१५ - जायंट किलर्स

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 10:23 pm

वर्ल्डकपच्या इतिहासात अनेक अविस्मरणीय आणि थरारक मॅचेसबरोबरच काही कमालीच्या कंटाळवाण्या आणि एकतर्फी मॅचेसही अनेकदा झालेल्या आहेत. खासकरुन टेस्ट दर्जा असलेल्या संघांबरोबरच आयसीसीने क्रिकेटचा प्रसार करण्याच्या हेतूने टेस्ट दर्जा नसलेल्या संघांचाही वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यास सुरवात केल्यावर हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं, इतकं की २०१९ चा इंग्लंडमधला वर्ल्डकप हा १० देशांमध्येच खेळवण्याचा आयसीसी ने निर्णय घेतला आहे! हा निर्णय काहीसा वादग्रस्तं असला तरी निरर्थक मॅचेसची संख्या कमी होण्यास हातभार लावणारा आहे हे देखिल तितकंच खरं. अनेकदा निरर्थक वाटल्या जाणार्‍या या मॅचेसकडे प्रस्थापित संघ इतर प्रमुख संघांविरुद्धच्या मॅचेससाठीची प्रॅक्टीस या दृष्टीनेच पाहतात. त्यातूनच या लिंबूटिंबू मानल्या जाणार्‍या संघांना गंभीरपणे न घेता काहीसा बेफीकीरवृत्तीने आणि निष्काळजीपणे खेळण्याची प्रवृत्ती वाढते. नेमक्या अशाच वेळी या संघातील खेळाडू सर्वस्व पणाला लावत जीवावर उदार होऊन खेळतात आणि मग या प्रस्थापित संघांवर पस्तावण्याची वेळ येते. वर्ल्डकपच्या इतिहासात जायंट किलर्स ठरलेल्या अशाच काही मॅचेसविषयी....

कोणत्याही अप्रिय असणार्‍या रेकॉर्डला बळी पडण्याचा पहिला क्रमांक अर्थातच भारताचा!

१९७९ च्या वर्ल्डकपमध्ये बंदुला वर्णपुराच्या श्रीलंकेविरुद्ध जायंट किलींगचा पहिला बळी ठरला तो वेंकटराघवनचा भारतीय संघच! ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरच्या मैदानातसिद्धार्थ वेट्टीमुनी (६७) आणि रॉय डायस (५०) यांनी दुसर्‍या विकेटसाठी ९६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ५७ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत ६४ रन्स फटकावणारा दुलीप मेंडीस आणि वर्ल्डकपमधला सर्वात तरुण खेळाडू असलेला १८ वर्षांचा सुदथ पास्कल यांच्या ५२ रन्सच्या पार्टनरशीपमुळे श्रीलंकेने ६० ओव्हर्समध्ये २३८ रन्सपर्यंत मजल मारली.

श्रीलंकेच्या बॉलिंगविरुद्ध ६० ओव्हर्समध्ये २३९ रन्सचं टार्गेट पार करणं सहजपणे शक्यं होईल अशा कल्पनेत असलेले भारताचे रथी-महारथी बंदुला वर्णपुराच्या बॉलवर रॉय डायसने सुनिल गावस्करचा कॅच घेतल्यावर टोनी ओपाथा (३), लेगस्पिनर सोमचंद्र डिसील्वा आणि स्टॅनली डिसील्वा (२) यांच्यासमोर १९१ रन्समध्ये गडगडले. वर्ल्डकपमधली हीच एक मॅच जिंकण्याची संधी असलेल्या भारताच्या पदरी ४७ रन्सनी पराभव आला आणि वर्ल्डकपच्या इतिहासातले पहिले जायंट किलर्स म्हणून श्रीलंकेची नोंद झाली!

१९८३ च्या वर्ल्डकपमध्ये नॉटींगहॅमशायरच्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये झिंबाब्वे ९४ / ४ अशा कठीण परिस्थितीत असताना कॅप्टन डंकन फ्लेचरने ८४ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह ६९ रन्स फटकावत केव्हीन करन (२७) बरोबर ७० रन्सची पार्टनरशीप केल्यावर इयन बुचार्ट (३४*) बरोबर ७५ रन्सची नॉटआऊट पार्टनरशीप करत झिंबाब्वेचा स्कोर २३९ पर्यंत पोहोचवला.

ग्रॅहॅम वूड आणि केपलर वेसल्स यांनी ६१ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर फ्लेचरने एका ओव्हरमध्ये वूड आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन किम ह्यूज यांना गुंडाळलं. वेसल्स आणि डेव्हीड हूक्स यांनी स्कोर ११४ पर्यंत नेल्यावर पुन्हा एकदा फ्लेचरने हूक्स आणि ग्रॅहॅम यालप यांच्या विकेट्स काढल्यामुळे ऑस्ट्रेलिया १३३ / ४ अशा परिस्थितीत सापडली. हे कमी होतं म्हणून की काय एका बाजूने शांतपणे खेळत असलेला वेसल्स (७६) रन आऊट झाला! त्यानंतर जॉन ट्रायकॉसच्या अचूक ऑफब्रेक्समुळे ऑस्ट्रेलियन बॅट्समनना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळाली नाही. रॉडनी मार्श ४२ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि २ सिक्ससह ५० रन्स फटकावत नॉट आऊट राहीला, पण तो ऑस्ट्रेलियाला विजयपथावर नेण्यात अपयशी ठरला. झिंबाब्वेने १३ रन्सनी ऑस्ट्रेलियाला धक्का दिला!

झिंबाब्वे ऑस्ट्रेलियाला धूळ चारत असतानाच त्याच दिवशी ओल्ड ट्रॅफर्डला भारताने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना वेस्ट इंडीजला हादरा दिला! १२० बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह ८९ रन्स फटकावणार्‍या यशपाल शर्माने रॉजर बिन्नी (२७) सह ७३ रन्सची पार्टनरशीप केल्यामुळे भारताने २६२ रन्सपर्यंत मजल मारल्यावर वेस्ट इंडीजची जबरदस्तं बॅटींग अनपेक्षितपणे कोसळली. बिन्नीने व्हिव्हियन रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईड आणि जेफ्री दुजाँ यांना गुंडाळल्यावर रवी शास्त्रीने माल्कम मार्शल - मायकेल होल्डींग यांच्या विकेट्स घेतल्यावर वेस्ट इंडीजची १५७ / ९ अशी घसरगुंडी उडाली. पण अखेर किती झालं तरीही तो वेस्ट इंडीजचा संघ होता आणि अगदी अँडी रॉबर्ट्स आणि जोएल गार्नर हे बॉलर्स खेळत असतानाही वेस्ट इंडीजच मॅच जिंकतील अशीच बहुतेकांची खात्री होती! रॉबर्ट्स (३७*) आणि गार्नर (३७) यांनीही शेवटच्या विकेटसाठी ७३ रन्सची पार्टनरशीप करत भारताच्या तोंडाला फेस आणला, पण अखेर शास्त्रीला फटकावण्याच्या नादात सय्यद किरमाणीने गार्नरला स्टंप केलं आणि वर्ल्डक्पच्या इतिहासात प्रथमच वेस्ट इंडीजच्या पदरी पराभव आला!

... आणि फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडीजचा केलेला पराभव हा १९८३ च्या वर्ल्डकपमधला सर्वात मोठा जायंट किलींग चमत्कार होता!

१९९२ च्या वर्ल्डकपमध्ये अ‍ॅल्बरीच्या मॅचपूर्वीच ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघाने सेमीफायनलमधला आपला प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आलेल्या झिंबाब्वेविरुद्धची मॅच ही इंग्लंडच्या दृष्टीने प्रॅक्टीस मॅच होती. पण भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पावसाचा फटका बसलेल्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये ३१२ रन्स फटकावूनही पराभव पदरी पडलेल्या झिंबाब्वेला मात्रं ही अखेरची संधी होती!

पण अ‍ॅल्बरीच्या स्लो विकेटवर ग्रॅहॅम गूचने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतल्यावर इयन बोथम (३), रिचर्ड इलिंगवर्थ (३) आणि फिल टफनेल (२) यांच्यापुढे केवळ कॅप्टन डेव्हीड हौटन (२९) आणि अनुभवी इयन बुचार्ट (२४) यांच्याव्यतिरिक्त कोणीच उभं राहू शकलं नाही. 'चिकन फार्मर' म्हणून ओळखल्या जाणार्‍या एडो ब्रँडेसने (१४) बुचार्टबरोबर ३१ रन्सची पार्टनरशीप केल्यामुळे झिंबाब्वेने कशीबशी १३४ पर्यंत मजल मारली!

लंचब्रेकमध्ये जेफ्री बॉयकॉटने हौटनला सुनावलं,
"This is the problem with you amateur sides, you don't know how to just rotate the strike and take singles. You watch the professionals come out of the lunch. They'll just knock the ball into the gaps and run their ones and twos and win this game easily."

एडो ब्रँडेसने पहिल्याच बॉलवर ग्रॅहॅम गूचला एलबीडब्ल्यू केल्यावर इंग्लंडला हादरवलं, पण तरीही इंग्लंडला संभाव्य धोक्याची अजिबात कल्पना आली नव्हती. पण ब्रँडेसने अ‍ॅलन लॅम्ब आणि रॉबिन स्मिथला गुंडाळल्यावर इंग्लंडची अवस्था ४२ / ४ अशी झाली होती.

मूळचा झिंबाब्वेचा असलेला ग्रॅम हिक हा ब्रँडेसचा शाळेपासूनचा जिगरी दोस्तं! मॅचच्या आदल्या दिवशी ब्रँडेस हिकला म्हणाला होता,
"Good luck tomorrow, but I think you'll be my bunny."

बोलल्याप्रमाणे ब्रँडेसने हिकची दांडी उडवून आपले शब्दं खरे करुन दाखवले!

अ‍ॅलेक स्ट्युअर्ट आणि नील फेअरब्रदरने शांत डोक्याने खेळत ५२ रन्सची पार्टनरशीप केली, पण स्ट्युअर्ट आऊट झाल्यावर पुन्हा इंग्लंडची इनिंग्ज गडगडली आणि शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर माल्कम जार्विसच्या बॉलवर अँडी पायक्रॉफ्टने ग्लॅडस्टन स्मॉलचा कॅच घेत इंग्लंडला १२५ रन्समध्ये गुंडाळत झिंबाब्वेने वर्ल्डकपमध्ये जायंट किलरचा किताब मिळवला! इंग्लंडचा पराभव झाल्यावर जेफ्री बॉयकॉटने कॉमेंट्रीबॉक्समधून सूंबाल्या केल्या हे वेगळं सांगायला नकोच!

परंतु सर्वात कहर झाला तो १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये...

पुण्याच्या नेहरु स्टेडीयमवर मॉरीस ओडुंबेच्या केनियाविरुद्ध रिची रिचर्ड्सनने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. कर्टली अँब्रोज, कॉर्टनी वॉल्श, इयन बिशप, रॉजर हार्पर अशा तोफखान्यापुढे केनियाचा फारसा निभाव लागण्याची शक्यता कमीच होती. स्टीव्ह टिकोलो (२९), हितेश मोदी (२६) आणि ऑलराऊंडर थॉमस ओडोयो (२४) यांच्यामुळे केनियाने १६६ रन्सपर्यंत मजल मारली, पण वेस्ट इंडीजच्या बॅट्समनना हे टार्गेट फारसं कठीण जाणार नाही अशी खुद्दं केनियन खेळाडूंचीही खात्री होती!

आसिफ करीम म्हणतो,
"We thought, how many overs would they need to score the runs? Twenty-five or 30 overs, someone said, 40 maybe. We thought that if it finishes early, we can quickly go back to the hotel, shower and do some sightseeing in Pune!"

रजब अलीने रिची रिचर्डसनला बोल्ड करुन वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला, पण ब्रायन लाराला बॅटींगला येताना पाहूनच केनियन खेळाडूंच्या चेहर्‍यावर पराभवाचं सावट दिसून येत होतं. त्यातच विकेटकीपर तारीक इक्बालच्या विनोदी विकेटकिपींगची भर! पण रजब अलीच्या बॉलवर लाराची एज लागली आणि बॉल तारीक इक्बालच्या दोन्ही मांड्यांमध्ये कसातरी अडकला! लारा आऊट झाल्यावर मॉरीस ओडुंबे (३) आणि आसिफ करीम यांच्या अचूक बॉलिंगपुढे वेस्ट इंडीजची इनिंग्ज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली! रजब अलीने कॅमेरून कफीचा ऑफस्टंप उडवत केनियाच्या विजयावर मोहोर उमटवली!

रिची रिचर्ड्सन, ब्रायन लारा, शिवनारायण चँडरपॉल, कीथ आर्थर्टन, जिमी अ‍ॅडम्स अशा बॅट्समनचा समावेश असलेल्या वेस्ट इंडीजच्या संघावर ७३ रन्सनी विजय मिळवत केनियाचा संघ खर्‍या अर्थाने जायंट किलर ठरला होता!

आसिफ करीम म्हणतो,
"As soon as we got Lara's wicket, we were a different side! We had their middle order in a very tight corner, so that put them under a lot of pressure."

१९९९ च्या वर्ल्डकपमध्ये अ‍ॅलिस्टर कँपबेलच्या झिंबाब्वे संघाने भारत आणि दक्षिण आफ्रीकेचा केलेला पराभव हा जायंट किलींग मानणं हे झिंबाब्वेच्या संघावर अन्यायकारक ठरावं. कँपबेलच्या झिंबाब्वे संघात स्वतः कँपबेल, अँडी आणि ग्रँट हे फ्लॉवरबंधू, मरे गुडविन, स्ट्युअर्ट कार्लाईल असे बॅट्समन आणि हीथ स्ट्रीक, हेन्री ओलोंगा, अनुभवी एडो ब्रँडेस, लेगस्पिनर पॉल स्ट्रँग असे बॉलर्स आणि नील जॉन्सन आणि गाय व्हिटलरसारखे ऑलराऊंडर्स होते. झिंबाब्वेच्या संघाची दिवसेदिवस होत असलेली प्रगती पाहता क्रिकेटमधल्या प्रमुख संघांपैकी एक बनण्याकडे त्यांची वाटचाल सुरु होती.

सुपर सिक्समधला प्रवेश निश्चित झाल्यामुळे नॉर्थअ‍ॅम्प्टनच्या मैदानात वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणार्‍या बांग्लादेशविरुद्धची मॅच ही वासिम अक्रमच्या पाकिस्तान संघासाठी प्रॅक्टीस मॅचच होती. अक्रमने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतल्यावर शहरयार हुसेन (३९), अक्रम खान (४२), ऑलराऊंडर खालिद मेहमूद (२७) आणि पाकिस्तानच्या बॉलर्सनी ४० एक्स्ट्रा रन्सची केलेली खैरात यामुळे साकलेन मुश्ताकने ५ विकेट्स घेतल्यानंतरही ५० ओव्हर्समध्ये बांग्लादेशचा स्कोर २२३ पर्यंत पोहोचला.

खालिद मेहमूदने शाहीद आफ्रीदी आणि एजाज अहमदला गुंडाळल्यावर इंझमाम उल हकने नेहमीच्या स्टाईलमध्ये सईद अन्वरला रनआऊट केलं आणि पुढच्या ओव्हरमध्ये तो स्वत:ही खालिद मेहमूदच्या बॉलवर बोल्ड झाला. ४२ / ५ अशा अवस्थेतून अझर मेहमूद (२९) आणि वासिम अक्रम (२९) यांनी ५५ रन्सची पार्टनरशीप करुन पाकिस्तानची इनिंग्ज सावरली पण हे दोघंही आऊट झाल्यावर साकलेन मुश्ताक (२१) चा अपवाद वगळता कोणालाच फारसं काही करता आलं नाही आणि पाकिस्तानची इनिंग्ज १६१ मध्ये आटपली!

मॅचनंतर अक्रम म्हणाला,
"I'm happy we lost to our brothers!"

बांग्लादेशचा कॅप्टन अमिनुल इस्लाम म्हणाला,
"We have made history today. Beating Pakistan, one of the best teams in the world, will help us attain Test status and assist in the development of our younger players."

बांग्लादेशला टेस्ट दर्जा मिळावा यासाठी पाकिस्तानने ही मॅच फिक्स केली आणि मुद्दाम पराभव पत्करला असं उघडपणे बोललं गेलं आणि त्यात निश्चितपणे तथ्यं असावं असं मानण्यास वाव आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानंतर अवघ्या ८ महिन्यांतच बांग्लादेशला टेस्ट्चा दर्जा देण्यात आला खरा पण बांग्लादेशला मिळालेला हा टेस्ट दर्जा किती फसवा आहे हे २००३ च्या वर्ल्डकपमध्ये सिद्धं झालंच!

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये ५ विकेट्स घेणारा पहिला बॉलर कोण?

बहुतेक सर्वांचं उत्तर इंग्लंडविरुद्ध ७ विकेट्स काढणारा अँडी बिकल किंवा ६ विकेट्स घेत इंग्लंडलाच उध्वस्तं करणारा आशिश नेहरा हे असेल! स्मृतीला आणखीन ताण देणार्‍यांना बिकलने इंग्लंडची धूळधाण करण्यापूर्वी ग्लेन मॅकग्राथने लिंबूटिंबू असलेल्या नामिबियाविरुद्ध ७ विकेट्स घेतल्याचंही आठवेल. पण ऑस्टीन कॉडरिंग्टन हे नाव कोणाच्या स्वप्नाततरी येईल असं निदान मला तरी वाटत नाही. पण मूळचा जमेकन असलेल्या या ऑस्टीन कॉटरिंग्टननेच या वर्ल्डकपमध्ये सर्वात प्रथम ५ विकेट्स उडवल्या होत्या त्या बांग्लादेशविरुद्धं!

दर्बनच्या किंग्जमीडच्या मैदानात कॅनडाचा कॅप्टन जो हॅरीसने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला पण ईश्वर मराज (२४), डेस्मंड चुमनी (२८) आणि इयन बिलक्लिफ (४२) यांच्यामुळे कॅनडाचा संघ १८० रन्स पर्यंत पोहोचला. संजयम थुराईसिंघम आणि डेव्हीस जोसेफने पहिल्या ३ विकेट्स घेतल्यावर ऑस्टीन कॉडरिंग्टनसमोर हन्नान सरकार (२५) आणि सन्वर हुसेन (२५) यांचा अपवाद वगळता बांग्लादेशचा एकही बॅट्समन उभा राहू शकला नाही! आलोक कपाली (१९) ने सन्वर हुसेनबरोबर ३२ रन्सची पार्टनरशीप करुन बांग्लादेशची इनिंग्ज सावरण्याचा प्रयत्नं केला पण हुसेन आऊट झाल्यावर कॉडरिंग्टनपुढे बांग्लादेशची इनिंग्ज १२० रन्समध्ये आटपली! टेस्ट दर्जा मिळवलेल्या बांग्लादेशचा नवख्या कॅनडाकडून ६० रन्सनी झालेला पराभव हा लाजिरवाणा आणि बांग्लादेशचा खरा दर्जा दर्शवणारा होता! पण बांग्लादेशच्या पदरी आलेला या वर्ल्डकपमधला हा एकमेव लज्जास्पद पराभव नव्हता...

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये खर्‍या अर्थाने जायंट किलर ठरला तो स्टीव्ह टिकोलोचा केनियन संघ!

नैरोबीच्या मैदानावर सनथ जयसूर्याने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. चामिंडा वासने दुसर्‍याच बॉलवर रविंदु शाहला एलबीडब्ल्यू करत जयसूर्याचा हा निर्णय सार्थ ठरवलाही होता, पण त्यानंतर ८८ बॉल्समध्ये ८ बाऊंड्री आणि २ सिक्ससह ६० रन्स फटकावणारा केनेडी ओटीयानो आणि हितेश मोदी (२६), मॉरीस ओडुंबे (२६) आणि शेवटी पीटर ओन्गोंडो यांच्यामुळे केनियाने ५० ओव्हर्समध्ये २१० रन्सपर्यंत मजल मारली!

स्वतः जयसूर्या, मर्व्हन अट्टापट्टू, अरविंदा डिसील्वा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, हशन तिलकरत्ने, रसेल आरनॉल्ड अशी बॅटींग लाईनअप असताना श्रीलंकेचा संघ सहजपणे २११ रन्सचं माफक टार्गेट पूर्ण करेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती, पण मार्टीन सुजीच्या बॉलवर ब्रिजल पटेलने जयसूर्याचा कॅच घेतल्यावर थॉमस ओडोयोने अट्टापट्टूची (२३) दांडी उडवली आणि त्यानंतर कॉलिन्स ओबुयाच्या लेगस्पिनसमोर अरविंदा डिसील्वा (४१) आणि हशन तिलकरत्ने (२३) वगळता कोणालाच काही करता आलं नाही! ओबुयाने तिलकरत्ने, डिसील्वा, जयवर्धने, संगकारा आणि वास यांना गुंडाळल्यावर स्टीव्ह टिकोलोने श्रीलंकेच्या बॉलर्सना फारशी संधीच दिली नाही! रसेल आरनॉल्ड २५ रन्स करुन नॉटआऊट राहीला पण तो श्रीलंकेचा पराभव टाळू शकला नाही!

श्रीलंकेची शिकार केल्यावर केनियाने जोहान्सबर्गच्या वाँडरर्सच्या मैदानात कॅनडाने हादरवलेल्या बांग्लादेशला दणका दिला...

स्टीव्ह टिकोलोने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यावर केनेडी ओटीयानो पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला पण रविंदू शाह (३७) आणि ब्रिजल पटेल (३२) यांनी ६७ रन्सची पार्टनरशीप करुन केनियाची इनिंग्ज सावरली. हे दोघं परतल्यावर स्टीव्ह टिकोलो (२७) ने हितेश मोदीबरोबर ३६ रन्सची पार्टनरशीप केली पण हे दोघंही आऊट झाल्यावर मॉरीस ओडुंबेने ४६ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ५२ रन्स फटकावत केनियाचा स्कोर २१७ पर्यंत नेला.

मार्टीन सुजीने अल शेहरीयार आणि मोहंमद अश्रफूल यांना १७ रन्समध्ये गुंडाळल्यावर तुषार इमरान (४८) ने खालिद मशूदबरोबर ३६ आणि आलोक कपालीबरोबर ४१ रन्सची पार्टनरशीप करुन बांग्लादेशचा स्कोर ९९ पर्यंत नेला पण मॉरीस ओडुंबेने कपाली, इमरान, सन्वर हुसेन आणि खालिद महमूद यांच्या विकेट्स उडवत बांग्लादेशची बॅटींग उध्वस्तं केली. अक्रम खान (४४) ने बांग्लादेशची इनिंग्ज सावरण्याचा शेवटपर्यंत प्रयत्नं केला, पण तो अपेशीच ठरला. बांग्लादेशच्या पदरी ३२ रन्सनी आणखिन एक लाजिरवाणा पराभव आला तर केनियाने सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवला!

...आणि सुपर सिक्समध्ये केनियाने आणखीन एका टेस्ट दर्जा असलेल्या संघाचा फडशा पाडत जायंट किलर्स हा किताब सार्थ ठरवला!

ब्ल्यूफोंटेनच्या मैदानात झिंबाब्वेचा कॅप्टन हीथ स्ट्रीकने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला खरा, पण १०१ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह ६३ रन्स काढणार्‍या अँडी फ्लॉवर आणि काही प्रमाणात डग्लस मॅरीलियर (२१) यांचा अपवाद वगळता केनियाच्या बॉलर्ससमोर कोणीच उभं राहू शकलं नाही! मार्टीन सुजी (३), कॉलिन्स ओबूया (३) आणि स्टीव्ह टिकोलो (२) यांनी १३३ रन्समध्ये झिंबाब्वेची इनिंग्ज गुंडाळली!

रविंदू शाह रनआऊट झाल्यावर अँडी ब्लिगनटच्या बॉलवर स्ट्रीकने स्टीव्ह टिकोलोचा कॅच घेतल्यावर केनिया ३३ / २ अशा काहीशा बिकट परिस्थितीत सापडली होती, पण थॉमस ओडोयो (४३) आणि अवघ्या २० बॉल्समध्ये ८ बाऊंड्री तडकावत ३८ रन्स फटकावणारा मॉरीस ओडुंबे यांनी आरामात मॅच जिंकली! झिंबाब्वेविरुद्धच्या या मॅचमध्ये मिळवलेला विजय केनियाला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये घेऊन गेला!

एकाच वर्ल्डकपमध्ये ३ टेस्ट संघांना पराभवाची चव चाखायला लावणारा केनियाचा संघ खर्‍या अर्थाने जायंट किलर ठरला!

२००७ च्या वर्ल्डकपमध्ये एकाच दिवशी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना जायंट किलर्सच्या करामतीचा फटका बसला!

पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर राहुल द्रविडने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला खरा पण सौरव गांगुली (६६) आणि युवराज सिंग (४७) यांचा अपवाद वगळता कोणालाच बांग्लादेशी बॉलर्सचा मुकाबला करता आला नाही! मश्रफी मूर्तझा (४), अब्दुर रझाक (३) आणि महंमद रफीक (३) यांच्यामुळे भारताची १५९ / ९ अशी दारूण अवस्था झालेली असताना झहीर खान - मुनाफ पटेल यांनी ३२ रन्सची पार्टनरशीप केल्यामुळे भारताने निदान १९१ पर्यंत मजल मारली!

१८ वर्षांच्या तमिम इक्बालने सुरवातीलाच झहीर खानवर चढवलेल्या हल्ल्यातून भारतीय बॉलर्स शेवटपर्यंत सावरले नाहीत. ५३ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि २ सिक्स ठोकत ५१ रन्स फटकावणारा तमिम आऊट झाल्यावर त्याच्या पाठोपाठ आफताब अहमदही परतल्यामुळे बांग्लादेश ७९ / ३ अशा बिकट परिस्थितीत सापडले होते, पण शाकीब अल हसन (५३) आणि मुश्फिकूर रहीम (५६*) या आणखीन २ टीनएजर्सनी ८४ रन्सची पार्टनरशीप करत भारताला कोणतीही संधीच दिली नाही आणि सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळे अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतावर पहिल्याच राऊंडमध्ये गाशा गुंडाळण्याची वेळ आली!

त्याच दिवशी कोणाच्या ध्यानीमनी नसताना झिंबाब्वेविरुद्धची पहिली मॅच टाय करणार्‍या आयर्लंडने पाकिस्तानला हादरवलं.

जमेकातल्या किंग्स्टनच्या सबाईना पार्कवर आयर्लंडचा कॅप्टन ट्रेंट जॉन्स्टनने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. बॉईड रॅन्कीन (३), काईल मॅक्कॅलन (२) आणि आंद्रे बोथा (२) यांच्या बॉलिंगपुढे इमरान नाझिर (२४) आणि कामरान अकमल (२७) यांच्याशिवाय कोणीच उभं राहू न शकल्याने पाकिस्तानचा संघ १३२ रन्समध्ये कोसळला! पाकिस्तानच्या इनिंग्जमध्ये सर्वात जास्त २९ रन्स होत्या त्या एक्स्ट्राच्या!

अर्थात उमर गुल, महंमद सामी आणि ऑलराऊंडर अझर मेहमूद यांच्यासारखे बॉलर्स असल्यामुळे आयर्लंडचा संघ कितपत टिकाव धरु शकेल याबद्दल सर्वांनाच शंका होती. जेरेमी ब्रे आणि ऑईन मॉर्गन १५ रन्समध्ये परतल्यावर पाकिस्तान १३२ रन्स काढूनही मॅच जिंकण्याची चिन्हं दिसत होती, पण १०७ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि १ सिक्ससह ७२ रन्स काढणार्‍या नियाल ओब्रायनने विल्यम पोर्टरफिल्डबरोबर ४७ तर धाकटा भाऊ केव्हीन ओब्रायनबरोबर ३८ रन्सची पार्टनरशीप करत आयर्लंडचा स्कोर १०८ पर्यंत पोहोचवला. नियाल ओब्रायन आणि त्याच्या पाठोपाठ अँड्र्यू व्हाईट आणि मॅक्कॅलन आऊट झाल्यामुळे आयर्लंडची अवस्था ११३ / ७ अशी झाली होती, पण केव्हीन ओब्रायन आणि कॅप्टन ट्रेंट जॉन्स्टन यांनी शांत डोक्याने उरलेल्या २० रन्स काढल्या आणि भारतापाठोपाठ पाकिस्तानचाही वर्ल्डकप ग्रूपमध्येच आटपला!

पाकिस्तानच्या या पराभवानंतर मॅचफिक्सिंगची चर्चा होणं अपरिहार्यच होतं आणि तशी ती झालीही...

सुपर एटमध्ये गयानाच्या प्रॉव्हीडन्सच्या मैदानात दक्षिण आफ्रीकेचा कॅप्टन ग्रॅम स्मिथने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. तमिम इक्बाल (३८) आणि शाकीब अल हसन आऊट झाल्याने बांग्लादेशची अवस्था ८४ / ४ अशी झाली होती पण ८३ बॉल्समध्ये १२ बाऊंड्रीसह ८७ रन्स फटकावणार्‍या महंमद अश्रफूलने आफताब अहमद (३५) बरोबर ७६ आणि मश्रफी मूर्तझा (२५) बरोबर ५४ रन्सची पार्टनरशीप करत बांग्लादेशचा स्कोर २५१ पर्यंत नेला. आंद्रे नेलने ५ विकेट्स घेतल्या पण तो बांग्लादेशला अडीचशेच्या आत रोखण्यात अपयशी ठरला.

दक्षिण आफ्रीकेला २५२ रन्सचं टार्गेट आणि ते देखिल बांग्लादेशच्या बॉलिंगविरुद्धं कठीण जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण जॅक कॅलीस (३२) आणि ७ व्या क्रमांकावर बॅटींगला आलेला हर्शेल गिब्ज (५६*) यांचा अपवाद वगळता बांग्लादेशच्या बॉलर्ससमोर स्मिथ, एबी डिव्हीलीयर्स, अ‍ॅश्वेल प्रिन्स, जस्टीन केम्प, शॉन पोलॉक, मार्क बाऊचर हे सगळे रथी-महारशी धराशायी झाले आणि १८४ रन्समध्ये दक्षिण आफ्रीकेची इनिंग्ज आटपली! पहिल्या राऊंडमध्ये भारताला वर्ल्डकपमधून बाहेर काढणार्‍या बांग्लादेशने दक्षिण आफ्रीकेला अनपेक्षित दणका दिला होता.

बार्बाडोसमधल्या ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हलमध्ये सुपर एटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांची गाठ पडेल अशी अपेक्षा असताना गाठ पडली ती या दोन्ही संघांना घरची वाट दाखवणार्‍या बांग्लादेश आणि आयर्लंड या जायंट किलर्सची!

ट्रेंट जॉन्स्टनने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. जेरेमी ब्रे (३१) आणि विल्यम पोर्टरफिल्ड (८५) यांनी ९२ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर मॉर्गन आणि नियाल ओब्रायन लवकर आऊट झाल्यानंतरही ४४ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि २ सिक्ससह ४८ रन्स फटकावणारा केव्हीन ओब्रायन आणि २३ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि १ सिक्ससह ३० रन्स फटकावणारा जॉन्स्टन यांच्यामुळे आयर्लंडने २४३ रन्सपर्यंत मजल मारली. आयर्लंडच्या अननुभवी बॅट्समननीही बांग्लादेशच्या बॉलर्सना आरामात खेळत २४० पेक्षा जास्तं रन्स काढल्यामुळे भारतीय खेळाडूंचं अपयश प्रकर्शाने नजरेत भरलं होतं.

भारत आणि दक्षिण आफ्रीकेला हरवल्यामुळे आत्मविश्वासाने फसफसत असलेल्या बांग्लादेशच्या बॅट्समनची आयरीश बॉलर्सपुढे अजिबात डाळ शिजली नाही! तमिम इक्बाल (२९), महंमद अश्रफूल (३५) आणि कॅप्टन हबिबूल बशर (३२) यांच्याव्यतिरिक्त एकही बांग्लादेशी बॅट्समन आयरीश बॉलर्ससमोर उभा राहू शकला नाही. बॉईड रॅन्कीन, डेव्ह लँगफोर्ड-स्मिथ, ट्रेंट जॉन्स्टन आणि काईल मॅक्कॅलन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत बांग्लादेशची इनिंग्ज १६९ मध्येच आटपली आणि ७४ रन्सनी मॅच जिंकून आपणच खरेखुरे जायंट किलर असल्याचं सिद्धं केलं!

परंतु जायंट किलर आयर्लंडने खर्‍या अर्थाने गाजवली ती २०११ च्या वर्ल्डकपमधली इंग्लंडविरुद्धची मॅच!

केव्हीन ओब्रायनची ५० बॉल्समधली आतषबाजी करणारी सेंचुरी आणि त्याने अ‍ॅलेक्स क्युसॅक बरोबर केलेली पार्टनरशीप आणि त्यानंतर जॉन मूनीच्या चाणाक्ष फटकेबाजीने १११ / ५ अशा अवस्थेतून इंग्लंडच्या ३२८ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करत वर्ल्ड्कपमधला सर्वात मोठ्या रनचेसचा रेकॉर्ड आपल्या नावे केला!

याच वर्ल्डकपमध्ये चितगावला इंग्लंडविरुद्ध बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. जोनाथन ट्रॉट (६७) आणि ७२ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह (६३) रन्स फटकावणारा ऑईन मॉर्गन यांच्याव्यतिरिक्तं बांग्लादेशी स्पिनर्सचा कोणालाच नीट मुकाबला करता न आल्याने इंग्लंडचा स्कोर कसातरी रखडत २२५ पर्यंत पोहोचला. तमिम इक्बाल (३८) आणि इमरुल कैस (६०) यांच्यानंतर शाकीब अल हसन (३२) चा अपवाद वगळता कोणीच काही करुन न शकल्याने बांग्लादेशची अवस्था १६९ / ८ अशी झाली, पण इंग्लंडला या शेवटच्या २ विकेट्स घेता आल्या नाहीत! मेहमूदउल्लाह (२१*) आणि शफीउल इस्लाम (२४*) यांनी एक्स्ट्राजच्या मदतीने ५८ रन्सची पार्टनरशीप करत २ विकेट्सनी मॅच जिंकली!

२०१५ च्या वर्ल्डकपध्येही बांग्लादेशने इंग्लंडला १५ रन्सनी हरवल्यावर इंग्लंडचा वर्ल्डकप ग्रूपमध्येच आटपला. परंतु याला जायंट किलींग म्हणणं हे वन डे मध्ये प्रगती करणार्‍या बांग्लादेशवर अन्यायकारक ठरेल. याच वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजच्या ३०८ रन्सचं टार्गेट ४६ व्या ओव्हरमध्ये गाठणार्‍या आयर्लंडलाही जायंट किलर म्हणणं हे वेस्ट इंडीजच्या अधोगतीइतक्याच वेगाने प्रगती करणार्‍या आयरीश संघावरही अन्याय करण्यासारखं आहे!

वर्ल्डकपच्या ४० वर्षांच्या इतिहासातल्या जायंट किलर्सवर हा एक धावता दृष्टीक्षेप. १९७९ साली जायंट किलर ठरलेला श्रीलंकेचा संघ १९९६ मध्ये वर्ल्ड चँपियन ठरला. १९८३ मध्ये फायनलमध्येच जायंट किलर ठरलेला कपिल देवचा भारतीय संघ नंतर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वात पुन्हा वर्ल्ड चँपियन ठरला. १९९९ नंतर झिंबाब्वेकडून असलेल्या अपेक्षांची रॉबर्ट मुगाबे सरकारने माती केली. २००३ मध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या केनियाचं आता नावही ऐकू येत नाही. आता २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये १० संघांचा समावेश असल्याने टेस्ट खेळणारे १० संघच वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवतात का टेस्ट दर्जा नसलेला संघ वर्ल्डकपमध्ये दाखल होऊन जायंट किलर्सचा वारसा पुढे चालवतो हे पाहणं मनोरंजक ठरेल!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

लोनली प्लॅनेट's picture

14 Mar 2017 - 11:17 am | लोनली प्लॅनेट

तुम्हाला जेवढी क्रिकेट ची माहिती आहे तेवढी क्रिकेट क्षेत्रातील रवी शास्त्री ,हर्षा भोगले गावस्कर वगैरे तज्ज्ञांना सुद्धा नसेल

लोनली प्लॅनेट's picture

14 Mar 2017 - 11:24 am | लोनली प्लॅनेट

समलोचकांवर लेख होऊ शकेल का कारण काही समालोचक उदा इयान स्मिथ ,डेविड लॉईड, माईक हेसमन, मायकल स्लेटर, नासिर हुसेन,रवी शास्त्री आपल्या समलोचनाने रटाळ मॅचमध्ये हि जान आणतात आणि संजय मांजरेकर ,इयान चॅपल, टोनी कोझीएर , लक्ष्मण शिवरमकृष्णन यांचा आवाजही ऐकवत नाही

किसन शिंदे's picture

14 Mar 2017 - 2:16 pm | किसन शिंदे

या यादीत टोनी ग्रेगचे नाव नसणे हे खुद्द त्या समालोचक शब्दाचा अपमान केल्यासारखे आहे.

लोनली प्लॅनेट's picture

14 Mar 2017 - 5:56 pm | लोनली प्लॅनेट

होय कि खरं.. टोनी ग्रेग ला मी कसकाय विसरलो
शारजा मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिन ने केलेल्या बॅटिंग चे जबरदस्त वर्णन टोनी ग्रेग ने केले होते
कासप्रोव्हिच ला सरळ मारलेला तो षटकार..
oh this is high... what a six..what a six..way down the ground..

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

डेव्हिड लॉईड, रवी शास्त्री, शिवरामकृष्णन्, रसेल अर्नॉल्ड, इयान चॅपेल हे अत्यंत कंटाळवाणे व रटाळ समालोचक आहेत.

मांजरेकर, नासिर हुसेन तुलनेने बरे आहेत. गावसकर, हर्षा भोगले, शेन वॉर्न इ. चे समालोचन ऐकायला आवडते. पूर्वी बॉयकॉट चांगले समालोचन करायचा. आजारपणामुळे तो आता नसतो.

प्रसाद_१९८२'s picture

14 Mar 2017 - 2:58 pm | प्रसाद_१९८२

नवज्योतसिंग सिद्दुची हिंदी कॉमेंट्री तर ऐकवत देखिल नाही. :))

लोनली प्लॅनेट's picture

14 Mar 2017 - 5:58 pm | लोनली प्लॅनेट

सहमत..
सिद्धू ची कॉमेंट्री म्हणजे वड्याचं तेल वांग्याला लावणं

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2017 - 3:06 pm | श्रीगुरुजी

चांगला लेख.

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये ५ विकेट्स घेणारा पहिला बॉलर कोण?

बहुतेक सर्वांचं उत्तर इंग्लंडविरुद्ध ७ विकेट्स काढणारा अँडी बिकल किंवा ६ विकेट्स घेत इंग्लंडलाच उध्वस्तं करणारा आशिश नेहरा हे असेल! स्मृतीला आणखीन ताण देणार्‍यांना बिकलने इंग्लंडची धूळधाण करण्यापूर्वी ग्लेन मॅकग्राथने लिंबूटिंबू असलेल्या नामिबियाविरुद्ध ७ विकेट्स घेतल्याचंही आठवेल. पण ऑस्टीन कॉडरिंग्टन हे नाव कोणाच्या स्वप्नाततरी येईल असं निदान मला तरी वाटत नाही. पण मूळचा जमेकन असलेल्या या ऑस्टीन कॉटरिंग्टननेच या वर्ल्डकपमध्ये सर्वात प्रथम ५ विकेट्स उडवल्या होत्या त्या बांग्लादेशविरुद्धं!

http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65243.html

२००३ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या चामिंडा वासने बांगलादेशविरूद्ध सामन्याच्या पहिल्याच षटकात पहिल्या ३ चेंडूत हॅटट्रिक घेतली होती. त्याच षटकातल्या ५ व्या चेंडूवर त्याने ४ था बळी घेतला होता. त्या सामन्यात त्याने एकूण ६ बळी घेतले होते.

बांगलाच्या डावाचे पहिलेच षटक असे पडले.

पहिला चेंडू - हन्नन सरकार त्रिफळा वास ० (बांगला १ बाद ०)
दुसरा चेंडू - महंमद अश्रफुल झेल व गोलंदाज वास ० (बांगला २ बाद ०)
तिसरा चेंडू - एहसानुल हक झेल जयवर्धने गोलंदाज वास ० (बांगला ३ बाद ०)
चौथा चेंडू - संवर हुसेनचा चौकार (बांगला ३ बाद ४)
पाचवा चेंडू - वाईड (बांगला ३ बाद ५)
पाचवा चेंडू - संवर हुसेन पायचित वास ४ (बांगला ४ बाद ५)
सहावा चेंडू - अलोक कपालीने नुसताच खेळून काढला.

पहिले षटक संपल्यानंतर बांगला ४ बाद ५, चामिंडा वास १-०-५-४. बांगलाचा ५ वा फलंदाज अल सहरियार ५ व्या षटकात वासच्याच गोलंदाजीवर बाद झाला. एखाद्या सामन्यातले पहिले पाचही बळी एकाच गोलंदाजाने घेण्याची ही बहुदा पहिलीचे वेळ असावी. तसेच डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या ३ चेंडूंवर हॅटट्रिक घेण्याचा हा एकमेव प्रसंग असावा.

या सामन्यात बांगलाने सर्वबाद १२४ धावा केल्यानंतर (वासचे ६ बळी) श्रीलंकेने २१.१ षटकात नाबाद १२६ धावा करून एक जबरदस्त विजय मिळविला होता.