वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सुपर सिक्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 8:58 am

१३ जून १९९९
हेडींग्ली, लीड्स

यॉर्कशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या हेडींग्लीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात सुपर सिक्समधली शेवटची मॅच रंगणार होती. ऑस्ट्रेलियाच्या दॄष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं अत्यावश्यक होतं. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रीका आणि पाकिस्तान यांनी आधीच सेमीफायनलम गाठली होती. पण या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसात वाहून गेल्यामुळे एक पॉईंट मिळालेल्या झिंबाब्वेला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला असता!

हॅन्सी क्रोनिएच्या दक्षिण आफ्रीकन संघात गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्ज, डॅरील कलिनन, स्वतः क्रोनिए, जाँटी र्‍होड्स असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला विकेटकीपर मार्क बाऊचर होता. दक्षिण आफ्रीकेच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अ‍ॅलन डोनाल्ड, स्टीव्ह एलवर्दी आणि शॉन पोलॉक यांच्यावर होता. लान्स क्लूसनरसारखा ऑलराऊंडर दक्षिण आफ्रीकेच्या संघात होता. दक्षिण आफ्रीकेचा प्रमुख आधारस्तंभ असलेला ऑलराऊंडर जॅक कॅलिस मात्रं दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळू शकणार नव्हता. कॅलिसच्या ऐवजी लेफ्ट आर्म स्पिनर निकी बोयेचा दक्षिण आफ्रीकन संघात समावेश करण्यात आला होता.

स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघापुढे मॅच जिंकण्याला पर्याय नव्हता. किमान मॅच टाय होणं तरी आवश्यक होतं. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह आणि मार्क हे वॉ बंधू, रिकी पाँटींम, मायकेल बेव्हन असे बॅट्समन होते आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट होता! डॅरन लिहमनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या ऐवजी डॅमियन मार्टीनचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगची मदार अर्थातच ग्लेन मॅकग्राथ आणि शेन वॉर्न यांच्यावर होती. त्यांच्या जोडीला डॅमियन फ्लेमिंग, पॉल रायफल आणि ऑलराऊंडर टॉम मूडी होते.

हॅन्सी क्रोनिएने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. गॅरी कर्स्टन आणि हर्शेल गिब्ज यांनी सुरवातीला सावधपणे ऑस्ट्रेलियन बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं. ग्लेन मॅकग्राथ आणि डॅमियन फ्लेमिंगचे बॉल चांगले स्विंग होत होते. कर्स्टनने फ्लेमिंगला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर गिब्जने फ्लेमिंगच्या पुढच्या ओव्हरमध्ये दोन बाऊंड्री तडकावल्यावर स्टीव्ह वॉने त्याच्या ऐवजी पॉल रायफलला बॉलिंगला आणलं. कर्स्टनने त्याला मिडऑनमधून बाऊंड्री मारली, पण आणखीन दोन बॉल्सनंतर कव्हरड्राईव्ह मारण्याचा कर्स्टननचा प्रयत्नं फसला आणि बॅकवर्ड पॉईंटला रिकी पाँटींगने त्याचा कॅच घेतला. १३ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीका ४५ / १!

कर्स्टन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या डॅरील कलिननने सुरवातीला कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावर भर दिला. कलिनन बॅटींगला येताच स्टीव्ह वॉने शेन वॉर्नला बॉलिंगला आणलं, पण कलिननने त्याला सावधपणे खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. गिब्जने टॉम मूडीला मिडविकेटवरुन बाऊंड्री तडकावल्यावर कलिननने मूडीला लाँगऑनवर सिक्स ठोकली. त्याच ओव्हरमध्ये गिब्जने मूडीला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावल्यावर स्टीव्ह वॉने त्याच्या ऐवजी मायकेल बेव्हनला बॉलिंगला आणलं, पण कलिननने त्याला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. बेव्हनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मॅकग्राथला गिब्जने कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. कलिनन - गिब्ज यांनी २० ओव्हर्समध्ये ९५ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं ऑस्ट्रेलियाला त्रासदायक ठरणार असं वाटत असतानाच ३३ व्या ओव्हरमध्ये...

वॉर्नचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
कलिननने मिडविकेटच्या दिशेने स्लॉग स्वीप मारण्याचा पवित्रा घेतला पण...
लेगस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल टप्पा पडल्यावर वळला...
कलिननचा ऑफस्टंप उडाला!

६२ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि मूडीला ठोकलेल्या सिक्ससह कलिननने ५० रन्स फटकावल्या.

आणखीन दोन बॉल्स नंतर...
वॉर्नचा बॉल लेगस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
स्लॉग स्वीप मारण्याच्या नादात कलिनन बोल्ड झालेला असूनही त्यापासून धडा न घेता हॅन्सी क्रोनिएने तोच पवित्रा घेतला पण...
बॉल मिडलस्टंपसमोर त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर पीटर विलीचं बोट वर झालं!
३३ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीका १४१ / ३!

क्रोनिए परतल्यावर आलेला जाँटी र्‍होड्स आणि गिब्ज यांनी कोणतीही रिक्स न घेता वॉर्न आणि रायफलच्या पुढच्या ३ ओव्हर्स खेळून काढल्या. वॉर्नच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या डॅमियन फ्लेमिंगने अचूक बॉलिंग करत गिब्ज - र्‍होड्स यांना आक्रमक फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. पण रायफलच्या पुढच्या ओव्हरमध्ये गिब्जने लाँगऑफवरुन दणदणीत सिक्स ठोकली. त्याच ओव्हरमध्ये र्‍होड्सनेही रायफलला पूलची सिक्स ठोकल्यावर स्टीव्ह वॉने त्याच्या ऐवजी मूडीला बॉलिंगला आणलं. पण गिब्जने त्याला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. मूडीच्या पुढच्या ओव्हरमध्ये र्‍होड्सने त्याला लाँगऑफरुन सिक्स ठोकली! गिब्ज - र्‍होड्स यांनी १० ओव्हर्समध्ये ६८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

ग्लेन मॅकग्राथचा तो बॉल मिडलस्टंपवर पडला...
गिब्जने लेगस्टंपच्या बाहेर जात कट् मारण्याचा पवित्रा घेतला पण...
मॅकग्राथच्या स्लो यॉर्करचा गिब्जला अजिबात अंदाच आला नाही...
बॉल मिडल्स्टंपच्या बेसवर आदळला!

१३४ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि रायफलला मारलेल्या सिक्ससह गिब्जने १०१ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका ४४ ओव्हर्समध्ये २१९ / ४!

गिब्ज आउट झाल्यावर फटकेबाजीच्या हेतूने क्लूसनर बॅटींगला आला. बेव्हनला मिडविकेटमधून बाऊंड्री तडकावल्यावर मॅकग्राथच्या पुढच्या ओव्हरमध्ये क्लूसनरने दोन बाऊंड्री तडकावल्या. फ्लेमिंगच्या पुढच्या ओव्हरमध्ये र्‍होड्सने स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली, पण फ्लेमिंगच्या पुढचाच बॉल पूल करण्याचा र्‍होड्सचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेटला मार्क वॉने आरामात त्याचा कॅच घेतला. ३६ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि २ सिक्ससह र्‍होड्सने ३९ रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका २५० / ५!

र्‍होड्स परतल्यावरही क्लूसनरची फटकेबाजी सुरुच होती. दक्षिण आफ्रीकेच्या इनिंग्जच्या शेवटच्या ओव्हरमध्ये क्लूसनरने फ्लेमिंगला लाँगऑफवरुन सिक्स ठोकली. आणखीन २ बॉल्सनंतर क्लूसनरने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. परंतु पुढच्या बॉलवर फ्लेमिंगला पूल करण्याच्या प्रयत्नात क्लूसनरच्या बॅटची टॉप एज लागली आणि पॉईंटवर वॉर्नने डाईव्ह मारत त्याचा कॅच घेतल. २१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि १ सिक्ससह क्लूसनरने ३६ रन्स फटकावल्या. फ्लेमिंगच्या पुढच्याच बॉलवर शॉन पोलॉक बोल्ड झाल्याने स्कोरमध्ये काहीच भर पडली नाही.

५० ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता २७१ / ७!

मार्क वॉ आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी पोलॉकची पहिली ओव्हर सावधपणे खेळून काढली. दुसर्‍या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर गिलख्रिस्टने स्टीव्ह एलवर्दीला कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावली. गिलख्रिस्ट आक्रमक फटकेबाजी करणार असं वाटत असतानाच...

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या एलवर्दीचा चौथा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
गिलख्रिस्टने बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण...
एलवर्दीचा बॉल त्याच्या बॅट आणि पॅडच्या गॅपमधून घुसला...
गिलख्रिस्टचा ऑफस्टंप उडाला!
ऑस्ट्रेलिया ६ / १!

गिलख्रिस्ट आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या रिकी पाँटींगने पोलॉकला पूलची बाऊंड्री तडकावली पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

एलवर्दीचा बॉल पाँटींगने मिडविकेटला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
मार्क वॉने पाँटींगच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
मिडविकेटला निकी बोयेने बॉल पिकअप केला...
बोयेचा थ्रो कलेक्ट करुन विकेटकीपर मार्क बाऊचरने बेल्स उडवल्या तेव्हा मार्क वॉ क्रीजपासून किमान पाच फूट दूर होता...
ऑस्ट्रेलिया २० / २!

एलवर्दीच्या त्याच ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बंपर होता...
पाँटींगने हूक मारण्याचा पवित्रा घेतला, पण...
बॉलचा अजिबात अंदाज न आल्याने त्याच्या बॅटची टॉप एज लागली....
बॉल बाऊचरच्या डोक्यावरुन बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

मार्क वॉ परतल्यावर बॅटींगला आलेल्या डॅमियन मार्टीनला पोलॉक - एलवर्दी यांच्या अचूक बॉलिंगमुळे रन्स काढणं कठीण जात होतं. पाँटींगने बॅकवर्ड स्क्वेअरलेगवरुन एलवर्दीला दुसरी सिक्स ठोकली पण एलवर्दीच्या पुढच्या ओव्हरमध्ये मार्टीनचा हूक करण्याचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑनला निकी बोयेने आरामात कॅच घेतला. १२ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ४८ / ३!

मार्टीन परतल्यावर बॅटींगला आला स्टीव्ह वॉ!
"Let's see how he takes the pressure now." गिब्ज उद्गारला!

स्टीव्ह वॉने सुरवातीला सावध पवित्रा घेत दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढण्याचा पवित्रा घेतला. पोलॉक - एलवर्दी यांच्यानंतर बॉलिंगला आलेल्या अ‍ॅलन डोनाल्ड आणि लान्स क्लूसनर यांच्या अचूक बॉलिंगमुळे पाँटींग आणि स्टीव्ह वॉ यांना फटकेबाजी करणं कठीण जात होतं. पहिल्या २१ बॉल्समध्ये ६ रन्स काढल्यावर अखेर आक्रमक पवित्रा घेत स्टीव्ह वॉने क्लूसनरला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारली. क्लूसनरच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा दोन बाऊंड्री फटकावल्यावर स्टीव्ह वॉने डोनाल्डला कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावली. क्लूसनरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या हॅन्सी क्रोनिएला पाँटींगने दोन बाऊंड्री फटकावल्यावर निकी बोयेच्या बॉलवर स्टीव्ह वॉने त्याच्या टिपीकल स्टाईलमध्ये स्लॉग स्वीपची सिक्स ठोकली! क्रोनिएने स्वतःच्या जागी बॉलिंगला आणलेल्या पोलॉकलाही स्टीव्ह वॉने कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. स्टीव्ह वॉच्या फटकेबाजीमुळे ९ ओव्हर्समध्ये ७८ रन्स फटकावल्या गेल्या होत्या. ३० ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १४९ / २!

३१ व्या ओव्हरमध्ये....

क्लूसनरचा बॉल मिडलस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
स्टीव्ह वॉने मिडऑनच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नं केला...
वॉच्या बॅटची इनसाईड एज लागली आणि बॉल मिडविकेटच्या दिशेने उडाला...
शॉर्टमिडविकेटला असलेल्या हर्शेल गिब्जने बॉल पकडला पण...
कॅच घेतल्याच्या आनंदात बॉल हवेत उडवण्याच्या नादत गिब्जच्या हातातून बॉल सुटला!
कॅच घेतल्यावर बॉल हवेत उडवण्यापूर्वी गिब्जच्या नियंत्रणात नव्हता असं स्पष्टं झाल्यामुळे नियमानुसार स्टीव्ह वॉ नॉटआऊट होता!

क्रिकेटच्या नियमात कॅच घेण्यासंबंधात स्पष्टं पणे म्हटलं आहे -
"The act of making the catch, or of fielding the ball, shall start from the time when the ball first comes into contact with some part of a fielder's person and shall end when a fielder obtains complete control both over the ball and over his own movement."

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला टोनी ग्रेग म्हणाला,
"Thats out! Oh no! He’s dropped it! I don’t believe this!"

स्टीव्ह वॉ हर्शेल गिब्जला नेमकं काय म्हणाला?

"You've just dropped the World Cup!" हे स्टीव्ह वॉचं सुप्रसिद्ध वक्तंव्य, पण...
प्रत्यक्षात स्टीव्ह वॉने हे उद्गार काढलेच नव्हते!
इंडीपेंडंटचा पत्रकार जॉन बेनॉ ( रिची बेनॉचा भाऊ ) याच्या सुपिक डोक्यातून हे वाक्यं बाहेर पडलं होतं!
फायनलच्या आदल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फायनलपर्यंतच्या प्रवासाबद्द्ल लिहीलेल्या लेखात बेनॉने हे लिहीलं होतं.
...आणि अत्यंत समर्पक असल्याने ते जगभरात प्रसिद्धं झालं!
खुद्दं गिब्जनेही आपण स्टीव्ह वॉने हे उद्गार काढल्याचं ऐकलं नव्हतं असं नंतर स्पष्टं केलं.

Out of My Comfort Zone या आपल्या आत्मचरित्रात याचा खुलासा करताना स्टीव्ह वॉ म्हणतो,
"I hope you realize that you have just lost the game for your team!"

हर्शेल गिब्जच्या कॅच पूर्ण करण्यापूर्वीच हवेत उडवण्याची सवय एका ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या चाणाक्ष नजरेने बरोबर हेरली होती.

शेन वॉर्न!

मॅचच्या आदल्या दिवशी शेन वॉर्न आपल्या सहकार्‍यांना म्हणाला होता,
"Don’t walk if you happen to hit a catch to Herschelle Gibbs. He has a tendency to flick the ball away before accepting it properly."

वॉर्नच्या सहकार्‍यांनी त्याचं हे वक्तव्यं हसण्यावारी घालवलं होतं, पण वॉर्नची बत्तिशी अखेर खरी ठरली होती!
स्टीव्ह वॉचा कॅच घेतल्यावर बॉल हवेत उडवण्याच्या नादात गिब्जने कॅच ड्रॉप केला होता!

गिब्जने कॅच ड्रॉप केल्यावरही स्टीव्ह वॉचा आक्रमकपणा यत्कींचितही कमी झाला नाही. क्लूसनर - क्रोनिए दोघांनाही त्याने बाऊंड्री तडकावल्या. स्टीव्ह वॉ - पाँटींग यांनी २३ ओव्हर्समध्ये १२६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर क्लूसनरला मिडविकेटला फ्लिक करण्याचा पाँटींगचा प्रयत्नं फसला आणि मिडऑनला डोनाल्डने त्याचा कॅच घेतला. ११० बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि २ सिक्ससह पाँटींगने ६९ रन्स काढल्या. ऑस्ट्रेलिया १७४ / ४!

शेवटच्या १५ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला ९६ रन्सची आवश्यकता होती!

पाँटींग परतल्यावर बॅटींगला आलेल्या मायकेल बेव्हनने क्रोनिएला कट्ची बाऊंड्री तडकावली. क्लूसनरला स्टीव्ह वॉने मिडविकेटवरुन बाऊंड्री फटकावल्यावर क्रोनिएने त्याच्या ऐवजी डोनाल्डला बॉलिंगला आणलं पण स्टीव्ह वॉने त्याला कव्हर्समध्ये असलेल्या क्रोनिएच्या डोक्यावरुन बाऊंड्री तडकावली! डोनाल्डच्या पुढच्या अचूक ओव्हरनंतर...

एलवर्दीचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
स्टीव्ह वॉ एक गुडघा दुमडून खाली झुकला आणि त्याने ठेवणीतला स्लॉग स्वीप मारला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला...
सिक्स!

सेमीफायनल गाठण्यासाठी ८ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला अद्याप ५० रन्स बाकी होत्या.

दक्षिण आफ्रीकेच्या संघात जाँटी र्‍होड्स, गिब्ज, कलिनन असे एकसे एक फिल्डर्स असतानाही स्टीव्ह वॉ - बेव्हन यांचा १-२ रन्स चोरण्याचा कारभार सुखेनैव सुरु होता. तीन ओव्हर्समध्ये एकही बाऊंड्री न मारता दोघांनी २० रन्स काढल्या! ४६ व्या ओव्हरमध्ये बेव्हनने क्रोनिएला मिडऑफवरुन बाऊंड्री तडकावली, पण आणखीन एक बॉलनंतर क्रोनिएला फ्लिक करण्याच्या नादात मिडऑनला कलिननने बेव्हनचा कॅच घेतला. ३३ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह बेव्हनने २७ रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया २४९ / ५!

बेव्हन परतल्यावर बॅटींगला आलेल्या टॉम मूडीने डोनाल्डला स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली, पण पोलॉकच्या ४८ व्या ओव्हरमध्ये केवळ ३ रन्स निघाल्यामुळे मॅच पुन्हा रंगतदार अवस्थेत आली.

शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ रन्सची आवश्यकता होती!

पोलॉकच्या पहिल्या बॉलवर २ रन्स काढल्यावर दुसर्‍या बॉलवर मूडीने बॅकवर्ड पॉईंटला बाऊंड्री तडकावली!
अखेर स्टीव्ह वॉच्या बॅटची बॉटम एज लागून बॉल थर्डमॅनला गेला...
आणि...
ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित झाला!

११० बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि २ सिक्ससह १२० रन्स फटकावून काढत स्टीव्ह वॉ नॉटआऊट राहीला!
ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने मॅच जिंकली!

हॅन्सी क्रोनिए म्हणाला,
"Steve gave us a chance, but we didn't take it... we asked the umpires if Gibbs had control of the catch, but as per the law he didn’t!"

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच स्टीव्ह वॉची निवड झाली!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 Feb 2017 - 9:35 am | तुषार काळभोर

प्रत्येक वर्ल्डकप मध्ये असा एक क्षण असतो की जो आपल्यासाठी त्या वर्ल्डकपची ओळख असतो.
८३ मध्ये कपिलने पकडलेला तो कॅच
९२मध्ये जॉण्टीने झेप घेत इन्झमामला रनआउट केले तो क्षण
९६ मध्ये कांबळी रडवेला होऊन मैदानातून बाहेर परतत होता, तो क्षण
९९ मध्ये गिब्जच्या हातून सुटलेला कॅच
२००३ मध्ये थर्डमॅनच्या डोक्यावरून शोएब अख्तरला भिरकावला, तो क्षण
२०११ मध्ये स्पर्धेच्या शेवटच्या बॉलवर धोनीने मारलेला तो सिक्स!!

स्पार्टाकस's picture

22 Feb 2017 - 9:43 am | स्पार्टाकस

२०१५ मध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये ग्रँट इलियटने डेल स्टेनला मारलेली सिक्स.

लोनली प्लॅनेट's picture

22 Feb 2017 - 10:03 am | लोनली प्लॅनेट

हेच म्हणणार होतो समालोचक इयान स्मिथ म्हणाला होता
"Elliot hits it in to the crowd stand and new zealand run through the world cup final"
या मॅच मध्ये ब्रेंडन मकल्लूम ने प्रचंड दडपणाखाली दक्षिण आफ्रिकन बोलर्स ची केलेली धुलाई कायम लक्षात राहील

आषाढ_दर्द_गाणे's picture

22 Feb 2017 - 10:28 pm | आषाढ_दर्द_गाणे

सगळ्या आठवणी ताज्या आहेत!
पण २००७ च्या विश्वचषकाचे काय?
मला वाटतं भारत बाहेर पडल्यावर कोणी पहिलाच नाही
मला वाटतं बर्म्युडाच्या Dwayne* लेवेरॉकने पकडलेला रॉबिन उत्तप्पाचा अफलातून झेल सगळ्यांना लक्षात असेल!

*हे मराठीत टंकणे जमले नाही

लोनली प्लॅनेट's picture

22 Feb 2017 - 9:57 am | लोनली प्लॅनेट

वा वा वा ...! सुंदर लिखाण
आता वाट आहे ती सेमी फायनल ची ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट हाच खेळ सर्वोत्कृष्ट का आहे ते सांगणारा सामना
स्पार्टाकस तुम्ही क्रिकेट चे ग्रेटेस्ट फॅन आहात, आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद

अभिजीत अवलिया's picture

22 Feb 2017 - 10:02 am | अभिजीत अवलिया

नेहमीप्रमाणे मस्त लेख.
३० ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १४९ / २! — ईथे १४९/३ हवे.

गॅरी ट्रुमन's picture

22 Feb 2017 - 10:04 am | गॅरी ट्रुमन

मस्त लेख. हा सामना अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला होता.

लेखमाला मस्तच चालू आहे. वाईट इतकेच वाटत आहे की या जबरदस्त लेखमालेत हळूहळू मला फार प्रतिसाद लिहिता येणार नाहीत कारण यापुढील लेखांवर प्रतिसाद लिहिण्यासाठी लागणारी अगदी प्राथमिक माहितीही माझ्याकडे नसेल :( .

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा

आपका जव्वाब नही दादा.. पूरी मॅच दिखाते हो आप!

गामा पैलवान's picture

22 Feb 2017 - 6:53 pm | गामा पैलवान

स्पार्टाकस,

तुमचं लेखन डोळ्यासमोर सामना उभं करतं. फक्त एक विनंती आहे. जिथे जमतील तिथे मराठी शब्द योजावेत. उदा. : सेमीफायनलच्या जागी उपांत्यफेरी वा उपांत्य सामना वाचायला बरं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.