वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - भारत विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
4 Mar 2017 - 9:27 am

२०११ चा वर्ल्डकप हा १९८७ आणि १९९६ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेल्या तिसरा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं यजमानपद भारत - पाकिस्तान - श्रीलंका आणि प्रथमच बांग्लादेशला बहाल करण्यात आलं होतं, पण २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर लाहोरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे यजमान म्हणून पाकिस्तानची हकालपट्टी करण्यात आली आणि पाकिस्तानमध्ये होणार्‍या मॅचेस उरलेल्या ३ देशांत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तानने बराच थयथयाट करुन पाहिला, अगदी आयसीसीला कोर्टाची नोटीसही पाठवली, पण आयसीसीने त्याला अजिबात भीक घातली नाही. पाकिस्तानात होणार्‍या मॅचेस शारजा आणि दुबईला खेळवण्याचा पाकिस्तानचा प्रस्तावही धुडकावण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचीही धमकी देऊन पाहिली, पण काहीही उपयोग झाला नाही.

या वर्ल्डकपमध्ये २००३ प्रमाणे सुपर सिक्स किंवा २००७ प्रमाणे सुपर एट वगैरे भानगडींना फाटा देण्यात आला आणि १९९६ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ग्रूप मॅचेसनंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने मॅचेस खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्ल्डकपचं आणखीन एक वैशिष्ट्यं म्हणजे अंपायरच्या निर्णयावर दाद मागण्याची सोय असलेल्या डीआरएस (डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम) चा या वर्ल्डकपमध्ये प्रथमच वापर करण्यात आला. तसंच फ्रंट फूट नोबॉलला मिळणार्‍या फ्री हिटचाही याच वर्ल्डकपमध्ये प्रथम अंतर्भाव करण्यात आला होता. २००७ च्या तुलनेत वर्ल्डकपमध्ये भाग घेणार्‍या संघांची संख्या १६ वरुन १४ वर आणण्यात आली होती.

*************************************************************************************

२७ फेब्रुवारी २०११
चिन्नास्वामी, बँगलोर

गार्ड्न सिटीच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ग्रूप बी मधली भारत आणि इंग्लंड यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. खरंतर ही मॅच कलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर होणार होती, पण बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यातल्या वादामुळे आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने वेळेवर विकेट तयार करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे मॅच बँगलोरला खेळ्वण्याचा मार्ग काढ्ण्यात आला. भारताच्या वर्ल्डकपला जोरदार सुरवात झाली होती. वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारताने बांग्लादेशला ८७ रन्सनी धूळ चारत २००७ च्या वर्ल्डकपमधल्या पराभवाचा बदला घेतला होता. वर्ल्डकपच्या पहिल्या बॉलवर बाऊंड्री ठोकत वीरेंद्र सेहवागने वर्ल्डकपची धडाक्यात सुरवात केली होती. उलट इंग्लंडला पहिलीच मॅच जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला होता. रायन टेन डेस्काटाच्या अप्रतिम सेंचुरीने पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडची हवा तंग झाली होती!

महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघात आपल्या सहाव्या वर्ल्डकपमध्ये खेळणारा अनुभवी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, विराट कोहली, युसुफ पठाण आणि स्वतः धोणी असे बॅट्समन होते. भारतीय बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो झहीर खान आणि हरभजन सिंग यांच्यावर. त्यांच्या जोडीला लेगस्पिनर पियुष चावला आणि मुनाफ पटेलचाही भारतीय संघात समावेश होता. मात्रं युसुफ पठाणला खेळवण्यात आल्यामुळे सुरेश रैनाला मात्रं बाहेर बसावं लागलं होतं!

अँड्र्यू स्ट्राऊसच्या इंग्लिश संघात स्वतः स्ट्राऊस, केव्हीन पीटरसन, इयन बेल, जोनाथन ट्रॉट असे बॅट्समन होते. यांच्या जोडीला पॉल कॉलिंगवूडसारखा अनुभवी ऑलराऊंडर इंग्लंडकडे होता. इंग्लंडच्या बॉलिंगची मदार प्रामुख्याने जेम्स अँडरसन आणि ग्रॅहॅम स्वान यांच्यावर होती. त्यांच्याव्यतिरिक्तं फास्ट बॉलर अजमल शेहजाद आणि स्पिनर मायकेल यार्डीचाही इंग्लडंच्या संघात समावेश होता. या सर्वांच्या जोडीला मॅट प्रायरसारखा विकेटकीपर बॅट्समन होता. इंग्लंडच्या संघाचा अविभाज्यं भाग असलेल्या मूळच्या दक्षिण आफ्रीकन खेळाडूंचा यावेळीही इंग्लिश संघात भरणा होता. स्ट्राऊस, पीटरसन, ट्रॉट आणि प्रायर हे चौघं मूळचे दक्षिण आफ्रीकन खेळाडूं इंग्लंडच्या संघात होते!

मॅचच्या आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना अँड्र्यू स्ट्राऊस प्रतिस्पर्ध्यांवर मानसिक दडपण आणण्याच्या नेहमीच्या पवित्र्याचा वापर करत म्हणाला,
"We would love to spoil the Indian party in Bangalore!"

मॅच सुरु होण्यापूर्वी जेमतेम तासभर शेन वॉर्नने ट्विटरवर भन्नाट अंदाज वर्तवला,
"Looking forward to the game between India and England - should be a cracker. My prediction - a tie!"

महेंद्र्सिंग धोणीने टॉस जिंकल्यावर अर्थातच बॅटींगचा निर्णय घेतला.

पहिल्याच बॉलवर...
जेम्स अँडरसनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला आऊटस्विंगर होता...
वीरेंद्र सेहवागने फ्रंटफूटवर येत तो डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला...
सेहवागच्या बॅटची एज लागली पण दुसर्‍या स्लिपमध्ये ग्रॅहॅम स्वानला कॅच घेता आला नाही...
बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला...

अँडरसनचा दुसरा बॉल सेहवागने सावधपणे खेळून काढल्यावर...

तिसरा बॉल मिडलस्टंपच्या लाईनवर पडला...
सेहवागने तो मिडविकेटला फ्लिक करण्याचा प्रयत्नं केला पण टप्पा पडल्यावर बॉल सीम झाला आणि सेहवागची लिडींग एज लागली....
एक्स्ट्रा कव्हरला इयन बेलने हवेत जंप मारून कॅच घेण्याचा प्रयत्नं केला पण बॉल त्याच्या हातात आला नाही...
सेहवागला २ रन्स मिळाल्या...

अँडरसनचा पुढ्चा बंपर सेहवागने डक केल्यावर पाचवा बॉल वाईड पडला...

सहावा बॉल पुन्हा मिडलस्टंपवर पडला...
सेहवागने पुन्हा मिडविकेटला फ्लिक करण्याचा पवित्रा घेतला आणि पुन्हा त्याची लिडींग एज लागली...
यावेळी बॉल फॉलो थ्रूमध्ये अँडरसनच्या डोक्यावरुन गेला!

पहिल्या ओव्हरमध्ये सेहवाग ३ वेळा आऊट होताहोता वाचला होता!
.... पण याचा काही परिणाम होईल तर तो सेहवाग कसला?

दुसर्‍याच ओव्हरमध्ये सेहवागने अजमल शेहजादला दोन बाऊंड्री फटकावल्या. अँडरसन - शेहजादच्या पुढच्या दोन ओव्हर्समध्ये जेमतेम ५ रन्स निघाल्या, पण अँडरसनच्या पुढच्या ओव्हरमध्ये सेहवागने बॅकवर्ड पॉईंटला बाऊंड्री तडकावली. सेहवागची फटकेबाजी सुरु असताना सचिन कोणतीही रिस्क न घेता स्ट्राईक रोटेट करत होता. ७ व्या ओव्हरमध्ये सेहवागने अँडरसनला २ बाऊंड्री मारल्या, पण शेहजादच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या टिम ब्रेस्नन कट् मारण्याचा सेहवागचा प्रयत्नं पार फसला आणि विकेटकीपर मॅट प्रायरने त्याचा कॅच घेतला. २६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह सेहवागने ३५ रन्स फटकावल्या. भारत ४६ / १!

सेहवाग परतल्यावर सचिनने आक्रमक पवित्रा घेत अँडरसनच्या ओव्हरमध्ये स्क्वेअरलेगला दोन बाऊंड्री फटकावल्या. सेहवागच्या जागी बॅटींगला आलेल्या गौतम गंभीरनेही सचिनच्या पावलावर पाऊल टाकत टिम ब्रेस्ननला बाऊंड्री मारल्यावर ग्रॅहॅम स्वानला दोन बाऊंड्री तडकावल्या. ब्रेस्ननने सचिनला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतर गंभीरने पुन्हा स्वानला बाऊंड्री फटकावली. स्वानच्या पुढच्या ओव्हरमध्ये बाऊंड्री मारल्यावर ब्रेस्ननच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कॉलिंगवूडच्या २ ओव्हर्समध्ये सचिनने २ दणदणीत सिक्स ठोकल्या! २५ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता १४० / १!

मायकेल यार्डीच्या जागी पुन्हा स्वान बॉलिंगला आल्यावर....

स्वानचा पहिलाच बॉल मिडलस्टंपवर पडला...
सचिनने क्रीजमधून पुढे सरसावत तो लाँगऑन बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!
दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सचिनला काहीच फरक पडला नाही...
त्याने स्टीव्ह वॉच्या स्टाईलमध्ये स्लॉग स्वीप मारला...
यावेळी बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

स्वानच्या एका ओव्हरनंतर त्याच्या ऐवजी अँडरसनला बॉलिंगला आणण्यावाचून स्ट्राऊसला पर्याय उरला नाही. अँडरसनलाही सचिनने लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्याच पण त्याच ओव्हरमध्ये गंभीर मात्रं बोल्ड होण्यापासून थोडक्यात वाचला. पण पुन्हा बॉलिंगला आलेल्या स्वानला थर्डमॅनला लेटकट् मारण्याचा गंभीरचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची दांडी उडाली. ६१ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह ५१ रन्स फटकावणार्‍या गंभीरने सचिनबरोबर १३४ रन्सची पार्टनरशीप केली. भारत १८० / २!

गंभीर आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या युवराज सिंगने सुरवातीला कोणतीही रिस्क न घेता सचिनला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. अँडरसनला फुलटॉसवर त्याने मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्यावर यार्डीच्या पुढच्या ओव्हरमध्ये सचिनने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. स्वानच्या अचूक ओव्हरनंतर यार्डीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या ब्रेस्ननला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारत सचिनने वर्ल्डकपमधली ५ वी सेंचुरी पूर्ण केली!

स्वानच्या पुढच्या ओव्हरमध्ये युवराजने मारलेल्या बाऊंड्रीनंतर सचिनने लाँगऑनवर सिक्स ठोकली. ही त्याची पाचवी सिक्स होती! ब्रेस्ननच्या पुढच्या ओव्हरमध्ये सचिन - युवराज दोघांनी बाऊंड्री फटकावल्या. ब्रेस्ननच्या जागी बॉलिंगला आलेल्या अँडरसनला सचिनने पहिल्याच बॉलवर बाऊंड्री तडकावली, पण पुढच्याच बॉलवर....

अँडरसनचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
सचिनने बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक करण्याचा पवित्रा घेतला पण...
सचिनच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने त्याच्या बॅटची लिडींग एज लागली...
कव्हर्समध्ये यार्डीने आरामात कॅच घेतला.

११५ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि ५ सिक्ससह सचिनने १२० रन्स फटकावल्या.
भारत २३६ / ३!

सचिन परतल्यावर बॅटींगला आलेल्या महेंद्रसिंग धोणीने यार्डीला बाऊंड्री फटकावत आक्रमक सुरवात केली, पण नंतर युवराज - धोणी यांच्य निव्वळ रनिंग बिटवीन द विकेट्समुळे इंग्लंडला हैराण केलं होतं. बॅटींग पॉवरप्लेमध्ये केवळ ३२ रन्स निघाल्या पण त्यानंतर बॉलिंगला आलेल्या शेहजादच्या ओव्हरमध्ये युवराज आणि धोणी यांनी ३ बाऊंड्री तडकावल्या. यार्डीच्या अचूक बॉलिंगमुळे ४५ व्या ओव्हरमध्ये केवळ ४ रन्स निघाल्या पण शेहजादच्या पुढच्या ओव्हरमध्ये युवराजने पुन्हा २ बाऊंड्री वसूल केल्या. पुढच्या ओव्हरमध्ये थोणीने यार्डीला मिडविकेटवर दणदणीत सिक्स ठोकल्यावर युवराजनेही त्याला बाऊंड्री तडकावली, पण पुढच्याच बॉलवर यार्डीला फटकावण्याच्या प्रयत्नात मिडविकेट बाऊंड्रीवर इयन बेलने युवराजचा कॅच घेतला. ५० बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह युवराजने ५६ रन्स फटकावल्या...

... आणि पुढच्याच बॉलवर ब्रेस्ननला फटकावण्याचा धोणीचा प्रयत्नं पार फसला...
मिडविकेट बाऊंड्रीवर ट्रॉटच्या ऐवजी फिल्डींगला आलेल्या ल्यूक राईटने आरामात त्याचा कॅच घेतला..
भारत ३०५ / ५!

युवराज - धोणी लागोपाठच्या बॉलवर परतल्यावर युसुफ पठाणने ब्रेस्ननला बाऊंड्री फटकावली. यार्डीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अँडरसनला पठाणने सिक्स ठोकल्यावर विराट कोहलीने बाऊंड्री तडकावली. पण ब्रेस्ननच्या ४९ व्या ओव्हरमध्ये....

ब्रेस्ननचा पहिलाच बॉल ऑफस्टंपवर पडला...
युसुफ पठाणने तो मिडविकेटवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
पठाणच्या अपेक्षेपेक्षा स्लो आलेल्या बॉलमुळे त्याची टॉप एज लागली...
मिडऑफला स्वानने आरामात कॅच घेतला!
भारत ३२७ / ६!

ब्रेस्ननचा पुढचा बॉल यॉर्कर पडला...
लेगस्टंपच्या बाहेर जात बॉल ऑफला फटकावण्याचा कोहलीचा प्रयत्नं पार फसला आणि त्याचा ऑफस्टंप उडाला...
भारत ३२७ / ७!

तिसर्‍या बॉलवर झहीर खानने १ रन काढल्यामुळे ब्रेस्ननची हॅटट्रीक झाली नाही पण...
ब्रेस्ननचा चौथा बॉल मिडलस्टंपसमोर हरभजनसिंगच्या पॅडवर आदळला!
भारत ३२८ / ८!

शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या ३ बॉल्समध्ये झहीर खान आणि पियुष चावला यांनी ४ रन्स काढल्या. अँडरसनचा चौथा बॉल नो बॉल होता पण विकेटकीपर मॅट प्रायरला तो अडवता न आल्याने भारताला ५ रन्सचा आयताच बोनस मिळाला. पुढचा बॉल अर्थातच फ्री हिट होती, पण चावलाने तो अँडरसनच्या हातात मारुन १ रन काढ्ण्याचा प्रयत्नं केल्यावर अँडरसनने त्याला रनआऊट करण्याची संधी अर्थातच सोडली नाही. पुढच्याच बॉलवर...

झहीर खानने अँडरसनचा बॉल मिडविकेटला पूल केला आणि १ रन पूर्ण केली...
मिडविकेटला इयन बेलने बॉल पिकअप केल्यावरही झहीरने दुसरी रन काढण्याचा प्रयत्नं केला...
बेलचा थ्रो कलेक्ट करुन प्रायरने बेल्स उड्वल्या तेव्हा झहीर अर्ध्या पीचपर्यंतही पोहोचला नव्हता...
सर्वात कहर म्हणजे...
अंपायर मरायस इरॅस्मसने शॉर्ट रनचा सिग्नल दिला!
पहिली रन पूर्ण केल्यावर मुनाफ पटेल बॅट क्रीजमध्ये न टेकवताच परत फिरला होता!

४९.५ ओव्हर्समध्ये भारत ३३८ रन्समध्ये ऑलआऊट झाला होता!
शेवटच्या ८ विकेट्स ३३ रन्समध्ये उडाल्या होत्या!

अँड्र्यू स्ट्राऊस आणि केव्हीन पीटरसन यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतीय बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. झहीर खानच्या पहिल्याच बॉलवर स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारल्यावर त्याच ओव्हरमध्ये त्याने स्क्वेअरकट्ची बाउंड्री फटकावली. मुनाफ पटेलच्या पहिल्याच बॉलवर पीटरसन विरुद्धचंं एलबीडब्ल्यूचं अपिल अंपायर बिली बाऊडेनने फेटाळून लावल्यावर पुढच्याच बॉलवर पीटरसनने मिडविकेटमधून बाऊंड्री फटकावली. मुनाफच्या त्याच ओव्हरमध्ये स्ट्राऊसने पुन्हा कट्ची बाऊंड्री मारल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये...

झहीर खानचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
स्ट्राऊसने क्रीजमधून पुढे सरसावत कव्हर्समधून ड्राईव्ह मारण्याचा पवित्रा घेतला...
टप्पा पडल्यावर बॉल सीम झाला आणि स्ट्राऊसच्या बॅटच्या अगदी जवळून धोणीच्या ग्लोव्हजमध्ये गेला...
भारतीय खेळाडूंनी कॅचसाठी जोरदार अपिल केलं पण अंपायर बाऊडेनचं बोट वर झालं नाही...

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या रवी शास्त्री आणि डेव्हीड लॉईडच्या मते स्ट्राऊसची एज लागली होती. लॉईड म्हणाला,
"Definite sound there… clear edge! Strauss should consider himself very lucky!"

झहीर खानच्या अचूक ओव्हरनंतर मुनाफला फटकावण्याचा स्ट्राऊसचा प्रयत्नं पार फसला पण मिडऑनला हरभजनने त्याचा कॅच ड्रॉप केला! झहीरच्या पुढच्या ओव्हरमध्ये पीटरसनने स्ट्रेट ड्राईव्हच्या २ बाऊंड्री मारल्या. मुनाफच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राऊसला फारसं काही करता आलं नाही, पण पीटरसनने झहीराला पुन्हा २ बाऊंड्री तडकावल्या. पुढच्या ओव्हरमध्ये....

मुनाफचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
पीटरसनने फ्रंटफूटवर येत स्ट्रेट ड्राईव्ह मारला...
बॉल सरळ मुनाफच्या डोक्याच्या दिशेने गेला...
फॉलो थ्रूमध्ये मुनाफने कॅच घेण्यापेक्षा स्वतःला वाचवण्यासाठी हात वर केला....
बॉल मुनाफच्या हाताला लागून हवेत उडाला...
बॉलचा धक्का इतका जबरदस्तं होता की मुनाफ पीचवर कोलमडला...
... आणि त्याच्या हाताला लागून उडालेला बॉल खाली येत असताना अलगद त्याने डाव्या हातात पकडला!
पीटरसन आ SSS वासून पाहात राहीला... स्वतःच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसेना!

२२ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह पीटरसनने ३१ रन्स फटकावल्या!
इंग्लंड ६८ / १!

पीटरसन आऊट झाल्यावरही स्ट्राऊसचा आक्रमकपणा यत्कींचितही कमी झाला नाही. मुनाफला बाऊंड्री फटकावल्यावर झहीरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या पियुष चावलाच्या २ ओव्हर्समध्ये त्याने २ बाऊंड्री तडकावल्या. पीटरसनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या जोनाथन ट्रॉटने हरभजनसिंगला लाँगऑनला बाऊंड्री मारली, पण चावलाच्या गुगलीचा अजिबात अंदाज न आल्याने अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याचा त्याचा प्रयत्नं पार फसला आणि बॉल मिडलस्टंपसमोर त्याच्या पॅडवर आदळला. आपण एलबीडब्ल्यू असल्याची स्वतः ट्रॉटलाच इतकी खात्री होती की अंपायर मरायस इरॅस्मसने बोट वर करण्यापूर्वीच त्याने पॅव्हेलियनची वाट धरली होती. इंग्लंड १११ / २!

ट्रॉट परतल्यावर बॅटींगला आलेल्या इयन बेलने सुरवातीला कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढत स्ट्राऊसला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. स्ट्राऊसची फटकेबाजी सुरुच होती. हरभजनला एक्स्ट्रा कव्हरमधून बाऊंड्री फटकावल्यावर चावलाला त्याने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. चावलाच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या युवराजलाही स्ट्राऊसने २ ओव्हर्समध्ये २ बाऊंड्री तडकावल्या. हरभजनसिंगच्या अचूक स्पेलनंतर त्याच्याऐवजी बॉलिंगला आलेल्या युसुफ पठाणलाही बाऊंड्री मारण्यात स्ट्राऊसने कोणतीही कुचराई केली नाही. युवराजच्या पुढच्या ओव्हरमध्ये बेलने त्याला कट्ची बाऊंड्री मारली, पण पुढच्याच बॉलवर...

युवराजचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
बेलने फ्रंटफूटवर येत स्वीप मारण्याचा केलेला प्रयत्नं पार फसला आणि बॉल त्याच्या पॅडवर लागला...
भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपिल केलं, पण अंपायर बिली बाऊडेनने ते फेटाळून लावलं...
युवराजशी काही सेकंदं चर्चा केल्यावर धोनीने डीआरएसचा वापर करत थर्ड अंपायरकडे दाद मागितली...
मैदानात लावलेल्या स्क्रीनवर रिप्ले दिसण्यास सुरवात झाली...
बॉल मिडलस्टंपवर पडला होता... स्टंपच्या लाईनमध्ये पॅडवर लागला होता... आणि पॅड मध्ये नसल्यास मिडलस्टंपवर गेला असता...
बॉल स्टंपवर लागणार हे स्पष्टं झाल्यावर थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता बेलने पॅव्हेलियनची वाट धरली होती...
पण...
बेल स्टंप्सपासून अडीच मीटरपेक्षा जास्तं अंतरावर असताना बॉल त्याच्या पॅडवर लागला होता...
अडीच मीटरपेक्षा जास्तं अंतरानंतर हॉक-आय बॉल ट्रॅकींग बॉलच्या दिशेचा अचूक अंदाज करण्यास असमर्थ असल्याचं मानलं जात होतं...
थर्ड अंपायर रॉड टकरने बाऊडेनला तशी कल्पना दिली...
नियमाप्रमाणे अंपायर बाऊडेन बॉल ट्रॅकींगचा मान्य करु शकत होता किंवा स्वतःचा निर्णय कायम ठेवू शकत होता!
बाऊडेनने स्वतःचा निर्णय कायम ठेवत बेल नॉटआऊट असल्याचं जाहीर केलं!
बाऊंड्री लाईनपाशी उभ्या असलेल्या फोर्थ अंपायर आलिम दरने बेलला पुन्हा क्रीजकडे जाण्याची खूण केली!

भारतीय खेळाडूंचाच काय एव्हाना पॅव्हेलियनच्या अर्ध्या वाटेवर पोहोचलेला बेलचाही विश्वास बसेना!

स्टेडीयममधल्या प्रेक्षकांना या नियमाची माहीती नसल्याने त्यांनी घोषणा देण्यास सुरवात केली...
"Cheating…. Cheating…"

बेल म्हणतो,
"When I saw it pitch in line and hit the stumps, I thought that was it. I wasn't aware of the rule of how far you had to be down the wicket. I got waved back on by the fourth official and I moved on from there. I wasn't aware that the distance down the wicket was a factor. I didn't even know that rule existed."

२५ ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता १६३ / २!

स्ट्राऊस आणि बेल यांनी आता आक्रमक पवित्रा घेत भारतीय बॉलर्सना फटकावून काढण्यास सुरवात केली. युसुफ पठाणला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर दोन बॉल्सनंतर स्ट्राऊसने आपली सेंचुरी पूर्ण केली. पठाणच्या त्याच ओव्हरमध्ये बेलने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली. युवराज आणि पठाणच्या जागी बॉलिंगला आणलेल्या झहीरच्या जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एकतरी बाऊंड्री मारण्याचा स्ट्राऊस - बेल यांनी सपाट लावला होता. झहीरच्या ३३ व्या ओव्हरमध्ये ड्राईव्ह मारण्याचा स्ट्राऊसचा प्रयत्नं फसला आणि पुन्हा एकदा त्याच्या बॅटची हलकीशी एज लागली, पण भारतीय खेळाडूंनी अपिलच केलं नाही!

युवराजच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राऊसने लाँगऑनवरुन दणदणीत सिक्स ठोकली. धोणीने झहीरच्या ऐवजी चावलाला बॉलिंगला आणलं पण बेलने त्याला स्ट्राऊसप्रमाणेच लाँगऑनवरुन सिक्स ठोकली. चावलाच्या त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर स्ट्राऊसने कट्ची बाऊंड्री मारली. स्ट्राऊस आणि बेल यांना आवरणं हरभजन - मुनाफ पटेल यांनाही अशक्यं झालं होतं. हरभजनच्या ऐवजी बॉलिंगला परतलेल्या चावलाला स्ट्राऊसने पुन्हा बाऊंड्री तड्कावली. हे सगळं कमी होतं म्हणूनच की काय चावलाच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्लिपमध्ये विराट कोहलीने बेलचा कॅच ड्रॉप केला!

शेवटच्या ८ ओव्हर्समध्ये इंग्लंडला ५९ रन्सची आवश्यकता होती!

स्ट्राऊस आणि बेल यांनी आतापर्यंत १६९ रन्सची पार्टनरशीप केली होती. एव्हाना बेलला क्रॅम्प्सचा त्रास जाणवू लागला होता. आक्रमक फटकेबाजीच्या हेतूने स्ट्राऊस - बेल यांनी बॅटींग पॉवरप्ले घेतल्यावर धोणीने झहीर खानला बॉलिंगला आणलं. झहीरच्या पहिल्या ४ बॉल्समध्ये केवळ १ रन निघाल्यावर...

झहीरचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल मिडविकेटला खेचण्याचा बेलने प्रयत्नं केला...
बेलच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने त्याची टॉप एज लागली...
मिडऑफला कोहलीने त्याचा आरामात कॅच घेतला...

७१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि चावलाला ठोकलेल्या सिक्ससह बेलने ६९ रन्स फटकावल्या...
इंग्लंड २८१ / ३!

झहीरचा पुढचा बॉल अचूक पडलेला यॉर्कर होता...
स्ट्राऊसला कोणतीही संधी न देता मिडलस्टंपसमोर बॉल त्याच्या बुटावर आदळला...
अंपायर इरॅस्मसचं बोट वर झालं!

१४५ बॉल्सम्ध्ये १८ बाऊंड्री आणि १ सिक्ससह स्ट्राऊसने १५९ रन्स फटकावल्या!
इंग्लंड २८१ / ४!

मॅट प्रायरने झहीरची हॅटट्रीक होणार नाही याची खबरदारी घेतली, पण स्ट्राऊस आणि बेल हे दोघं दोन बॉलमध्ये आऊट झाल्यावर मॅचचं पारडं पुन्हा भारताच्या बाजूला झुकलं होतं. त्यातच चावलाच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स निघाल्या. झहीरच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्या २ बॉल्सवर प्रायर आणि पॉल कॉलिंगवूड यांनी २ रन्स काढल्या पण पुढच्याच बॉलवर....

झहीरचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
कॉलिंगवूडने क्रीजमधून पुढे सरसावत मिडविकेटला बॉल फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
झहीरच्या चाणाक्षपणे टाकलेल्या स्लो बॉलचा त्याला अजिबात अंदाज आला नाही...
कॉलिंगवूडचा ऑफस्टंप उडाला...
इंग्लंड २८५ / ५!

५ ओव्हर्समध्ये अद्याप इंग्लंडला ५२ रन्स हव्या होत्या!

४६ व्या ओव्हरमध्ये हरभजनसिंगला मिडविकेटवरुन फटकावण्याच्या प्रयत्नात त्याच्या बॅटची टॉप एज लागली आणि मिडविकेट बाऊंड्रीवर युसुफ पठाणच्या ऐवजी फिल्डींगला आलेल्या सुरेश रैनाने त्याचा कॅच घेतला. त्याच ओव्हरमध्ये मायकेल यार्डीने हरभजनला बाऊंड्री फटकावली. पुढच्या ओव्हरमध्ये झहीरला एकही बाऊंड्री न मारता यार्डी आणि टिम ब्रेस्नन यांनी ८ रन्स काढल्या. ४८ व्या ओव्हरमध्ये मुनाफचा बॉल फाईनलेगवरुन स्कूप करण्याचा यार्डीचा प्रयत्नं फसला आणि फाईनलेगला सेहवागने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड ३०७ / ७!

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये इंग्लंडला २९ रन्स बाकी होत्या!

महेंद्रसिंग धोणीच्या समोर ४९ वी ओव्हर कोणाला द्यावी हा प्रश्नं होता. झहीर आणि हरभजनच्या १० ओव्हर्स संपल्या होत्या. मुनाफ पटेलने ४८ ओव्हर टाकल्यामुळे ४९ वी ओव्हर त्याला देणं शक्यंच नव्हतं. युसुफ पठाण ड्रेसिंगरुममध्ये परतल्याने धोणीसमोर युवराज आणि पियुष चावला असे दोनच पर्याय होते. चावलाच्या आधीच्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स गेल्यामुळे धोणीने त्याला बॉलिंगला आणण्याचा निर्णय घेतला.

चावलाचा पहिला बॉल मिडलस्टंपवर पडला...
स्वानने मिडविकेटवरुन स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्नं केला पण बॉल त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही...

चावलाच्या दुसरा बॉलही मिडलस्टंपवरच पडला...
यावेळी मात्रं स्वानचा स्लॉग स्वीप मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

तिसर्‍या बॉलवर स्वानची एज लागली आणि त्याला थर्डमॅयाला १ रन मिळाली...
चौथ्या बॉल टिम ब्रेस्ननने मिडविकेटला फटकावला आणि २ रन्स काढल्या...

चावलाचा पाचवा बॉल लेगस्टंपवर पडला...
यावेळी ब्रेस्ननचा स्लॉग स्वीप मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

शेवटचा बॉल ऑफस्टंपवर पडलेला फ्लिपर होता...
ब्रेस्ननचा मिडविकेटवरुन पुन्हा स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्नं फसला आणि त्याचा मिडलस्टंप उडाला...
इंग्लंड ३२५ / ८!

चावलाच्या ओव्हरमध्ये १५ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!
शेवटच्या बॉलवर ब्रेस्नन आऊट झाला होता, पण पुन्हा एकदा इंग्लंडला विजयाची शक्यता निर्माण झाली होती!

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला १४ रन्सची आवश्यकता होती!

मुनाफचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
स्वानने तो एक्स्ट्रा कव्हर्समधून तडकावला आणि २ रन्स काढल्या...

५ बॉल्स - १२ रन्स!

मुनाफचा पुढचा बॉल चाणाक्षपणे टाकलेला स्लो बॉल होता...
स्वानला त्याचा अजिबात अंदाज आला नाही...
सुदैवाने त्याच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅनला गेला आणि त्याला १ रन मिळाली...

४ बॉल्स - ११ रन्स!

स्वान स्ट्राईकवर नसल्याने मुनाफ पटेलने सुटकेचा नि:श्वास टाकला होता पण...
मुनाफचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल अजमल शेहजादने त्याच्या डोक्यावरुन स्ट्रेट उचलला...
बॉल बाऊंड्रीपार जाऊन स्ट्रेट साईटस्क्रीनवर आदळला... सिक्स!
स्ट्राऊस ताडकन् ड्रेसिंगरुममध्ये उठून उभा राहीला!

३ बॉल्स - ५ रन्स!

मुनाफचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला स्लो बॉल होता...
शेहजादची बॅट हवेतच फिरली आणि बॉल धोणीच्या ग्लोव्हजमध्ये गेला...
पण स्वानने बायची रन काढण्याचा चाणाक्षपणा दाखवला होता...

२ बॉल्स - ४ रन्स!

पाचवा बॉल मिडलस्टंपवर पडला...
स्वानने क्रीजमधून पुढे सरसावत मिडविकेटला बॉल फटकावण्याचा केलेला प्रयत्नं फसला...
त्याच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल स्क्वेअरलेगला गेला...
बाऊंड्रीवरुन आलेल्या चावलाचा थ्रो येईपर्यंत स्वान - शेहजाद यांनी २ रन्स काढल्या...

१ बॉल - २ रन्स!

ऑफस्टंपवर पडलेल्या बॉलवर स्वानने ड्राईव्ह मारला...
मिडऑफला असलेल्या रैनाने मिसफिल्ड होणार नाही याची खबरदारी घेतली पण...
स्वान आणि अजमल यांना १ रन काढण्यापासून तो रोखू शकला नाही...

५० ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता ३३८ / ८!

इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये स्ट्राऊसच्या चेहर्‍यावर निराशेची छाया पसरली होती...
महेंद्रसिंग धोणीच्या चेहर्‍यावर सुटकेचे भाव होते!
१०० ओव्हर्सच्या धामधुमीत आणि ६७६ रन्सच्या आतषबाजीनंतरही दोन्ही संघांमध्ये विजेता कोण हे ठरवता आलंच नाही...

मॅच टाय झाली!

मॅचनंतर बोलताना धोणी म्हणाला,
"The way they started I definitely am happy with a tie. When they were 2 down the way they were going the bowlers were finding it very tough. Zak changed it around for us he is a different bowler if you try and come at him it's very difficult."

अँड्र्यू स्ट्राऊस म्हणाला,
"We were in a great position and then had a shocking Powerplay. After that we were lucky and grateful for Swann and Shahzad to getting us to the tie. We're happy and devastated at the same time but privileged to play in a game like this. It's the best innings I've played."

मॅन ऑफ द मॅच म्हणून स्ट्राऊसचीच निवड झाली.

इयन बेलला नॉटआऊट देण्याच्या अंपायरच्या निर्णयावर धोणी आणि स्ट्राऊस यांची मतं अपेक्षेप्रमाणे वेगळी होती.

अडीच मीटर अंतराच्या रुलवर सडकून टीका करताना धोणी म्हणाला,
"Well, if the Hawkeye says it is going to hit the stump, and it's going to hit the middle stump, then there is no reason why the distance really matters. I was given out in similar situation without the UDRS. If I can be given out, why not other batsmen? So whether it is 2.5m or 2.4 or 2.6, it is pretty difficult for me. What I saw was the ball hitting the stump. After that, the rest of the rule book is rested with the third and the fourth umpire. Whatever they decided, we said, 'Okay, whatever they decide, we get on with the game'. I think the adulteration of technology with human intention was the reason why we didn't get that wicket. Hopefully next time, it will be technology or human intention in the UDRS."

स्ट्राऊस म्हणाला,
"Apparently if you are that far down the pitch it needs to be hitting middle stump to be given out. I didn't know that was part of the rules. Obviously Belly was lucky to get away with it."

भारताच्या इनिंग्जच्या शेवटच्या बॉलवर मुनाफ पटेल बॅट क्रीजमध्ये न टेकवताच परत फिरल्याने १ रन शॉर्ट ठरली होती...
ही एक रन अखेर निर्णायक ठरली होती!

शेन वॉर्नने मॅच सुरु होण्यापूर्वी 'टाय' बद्दल केलेलं भाकीत अचूक ठरलं होतं!

मॅच संपल्यावर वॉर्नने पुन्हा ट्विट केलं,
"Before u think there was something untoward re prediction of a tie, thought it was going to be a cracker - tie was tongue in cheek, but right."

एवढ्यावरच थांबेल तर तो वॉर्न कसला?
"Can't believe my prediction 7/8 hours ago was right - tie !! Classic, didn't think it would happen but hey-not bad !!!! 2011-my year ! Lol! I am taking a lottery ticket out this weekend !!!"

वॉर्नच्या मॅच टाय होण्याच्या ट्विटबद्दल अँड्र्यू स्ट्राऊस म्हणाला,
"I think Warne is a genius to have predicted that way - a tie! What more can I say?"

कोणत्याही वादात उडी मारण्याबाबत किंवा स्वतः वाद निर्माण करण्याबाबत प्रसिद्धं खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा सर्फराज नवाज!
वॉर्नचा मॅच टाय होण्याबद्दलचा अंदाज खरा ठरल्यावर त्याने वॉर्नवर चक्कं मॅचफिक्सींगचा आरोप करुन चौकशी करण्याची मागणी केली!

सर्फराज म्हणाला,
“Something is definitely up when you start predicting a tie instead of talking about who you think is going to win or lose a match. After all, how common are ties in cricket? It is something that the ICC should definitely be investigating. And especially when such a statement comes from someone as controversial as Shane Warne who, apart from his doping scandals and irresponsible statements in the media, has also been in trouble over being accused of taking money from an Indian bookmaker in return for pitch and weather information!”

आमिर सोहेल सर्फराजच्या सुरात सूर मिसळत म्हणाला,
“When Pakistan players are implicated in match-fixing on the smallest of pretext by the authorities of the game, then why has Warne’s prediction about the ‘tie’ not raised any eyebrows in the ICC? To me, these are clear double standards from ICC chief Haroon Lorgat and Co. Everyone knows that India is the hub of bookies and match-fixers, so we can’t just rule Warne’s comments out as ‘casual remarks'. But since this prediction comes from an Australian player it is declared a stroke of genius!"

यापुढे जाऊन पाकिस्तानी पत्रकारांनी आयसीसीच्या अँटी करप्शन टीमकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरावी अशीही सोहेलने सूचना केली!

सर्फराज आणि सोहेलच्या या जावईशोधाचा समाचार घेतला तो रशिद लतीफने. लतीफ म्हणाला,
“Warne may have made his prediction one hour or four hours ahead of the result, but I fail to see who stands to gain from the teams drawing as per international betting rules a tie results in a ‘fog’ or ‘void’ where both betting parties have to be returned their money as a settlement by the bookmakers!”

वर्ल्डकपच्या इतिहासात टाय झालेली ही चौथी मॅच!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

5 Mar 2017 - 5:58 pm | अभिजीत अवलिया

खूप थरारक झाला होता हा सामना. शेवटी तर आपण हरणार असेच वाटत होते. थोडक्यात बचावलो.