वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
2 Feb 2017 - 10:44 am

२० जून १९७९
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात वर्ल्डकपचे यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमी फायनल रंगणार होती. मार्क बर्जेसचा न्यूझीलंड संघ कोणाचीही अपेक्षा नसताना सेमी फायनलला पोहोचला होता. बर्जेसच्या संघात स्वतः बर्जेस, जॉन राईट, ब्रूस एडगर, जेफ हॉवर्थ आणि अनुभवी ग्लेन टर्नर असे बॅट्समन होतेच, शिवाय जेरेमी कोनीसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडरही होता. बॉलिंगची मदार मुख्यतः रिचर्ड हॅडलीवर होती. त्याच्या जोडीला गॅरी ट्रप, ब्रायन मॅकेंझी आणि लान्स केर्न्स असे बॉलर्स होते. परंतु माईक ब्रिअर्लीच्या इंग्लिश संघापुढे न्यूझीलंडचा कितपत निभाव लागेल याबद्दल बहुतेकांना शंका होती. ब्रिअर्लीच्या संघात स्वतः ब्रिअर्ली, जेफ बॉयकॉट, ग्रॅहॅम गूच, डेव्हीड गॉवर, डेरेक रँडल असे बॅट्समन होते. बॉब विलीस, क्रिस ओल्ड, माईक हेंड्रीक हे बॉलर्आ, बॉब टेलरसारखा अनुभवी विकेटकीपर होता आणि या सगळ्यांच्या जोडीला इयन बोथम होता!

मार्क बर्जेसने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. गॅरी ट्रपच्या बॉलवर विकेटकीपर वॉरन लीसने बॉयकॉटचा कॅच सोडल्यावर हा निर्णय न्यूझीलंडला महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण रिचर्ड हॅडलीच्या बॉलवर तिसर्‍या स्लिपमधल्या हॉवर्थने बॉयकॉटचा कॅच घेतला. ब्रिअर्ली आणि बॉयकॉटच्या जागी आलेला आपल्या पहिल्याच वन डे मध्ये खेळणारा वेन लारकिन्स यांनी कोणतीही रिस्क न घेण्याचं धोरण पत्करलं पण हॅडली - ट्रप यांच्या अचूक बॉलिंगपुढे रन्स काढणं दोघांनाही कठीण जात होतं. सुमारे पाऊण तासात ३७ बॉल्समध्ये ७ रन्स केल्यावर मॅकेंझीचा बॉल लारकिन्सने ड्राईव्ह केला तो एक्स्ट्राकव्हरला असलेल्या कोनीच्या हातात. इंग्लंड ३८ / २!

लारकिन्सच्या जागी बॅटींगला आलेल्या ग्रॅहॅम गूचने मात्रं सुरवातीपासून आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. ब्रायन मॅकेंझीला त्याने लाँगऑनला सिक्स आणि पाठोपाठ कव्हर्समधूण बाऊंड्री ठोकली. गूचची फटकेबाजी सुरु असतानाही दुसर्‍या बाजूने ब्रिअर्ली कोणतीही रिस्क न घेता सावधपणे खेळत होता. गूच - ब्रिअर्ली यांनी ६८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर जेरेमी कोनीला कट् करण्याचा ब्रिअर्लीचा प्रयत्न फसला आणि विकेटकीपर लीसने त्याचा कॅच घेतला. ११५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह ब्रिअर्लीने ५३ रन्स फटकावल्या. परंतु इंग्लंडला खरा हादरा बसला तो त्यानंतर....

जेरेमी कोनीचा बॉल गूचने लाँगऑफला ड्राईव्ह केला आणि एक रन आरामात पूर्ण केली. नॉनस्ट्रायकर असलेल्या डेव्हीड गावरने गूचला दुसर्‍या रनसाठी कॉल दिला. एव्हाना लाँगऑफला असलेल्या लान्स केर्न्सने बॉल पिकअप केला पण केर्न्सचा थ्रो नॉनस्ट्रायकर एन्डला असलेल्या स्टंप्सपासून किमान तीन - चार फूट दूर होता. एव्हाना धोक्याची कल्पना आलेल्या गावरने क्रीज गाठण्यासाठी झेप घेतली, परंतु कोनीने बॉल कलेक्ट करुन बेल्स उडवेपर्यंत क्रीज गाठणं त्याला जमलं नाही! दुसरी रन काढण्याचा त्याचा प्रयत्नं आत्मघातकी ठरला. इंग्लंड ९८ / ४!

रन रेट वाढवण्याच्या दृष्टीने ब्रिअर्लीने गूचच्या जोडीला पाठवलं बोथमला. गूच आणि बोथम यांनी १० ओव्हर्समध्ये ४७ रन्स फटकावल्यावर केर्न्सला पूल करण्याचा बोथमचा प्रयत्नं फसला आणि बॉल लो राहिल्याने तो एलबीडब्ल्यू झाला. बोथमच्या जागी रँडल बॅटींगला आल्यावरही गूचचा आक्रमकपणा यत्किंचितही कमी झाला नाही. रँडलनेही आक्रमक पवित्रा घेत मॅकेंझी आणि ट्रप यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. गूच - रँडल यांनी ३२ रन्स फटकावल्यावर मॅकेंझीला ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात गूचच्या बॅटची एज लागून बॉल स्टंपवर गेला. ८४ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि मॅकेंझीलाच मारलेल्या सिक्सच्या जोरावर गूचने ७१ रन्स फटकावल्या. इंग्लंड १७७ / ६!

गूचपाठोपाठ गॅरी ट्रपच्या बॉलवर लीसने क्रिस ओल्डचा कॅच घेतला. रँडलवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ओल्डच्या जागी बॅटींगला आलेला बॉब टेलर थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करत रँडलला जास्तीत जास्तं बॉल खेळायला मिळतील याची काळजी घेत होता. वास्तविक टेलरला रनआऊट करण्याची सुवर्णसंधी न्यूझीलंडला होती, पण फॉलो थ्रूमध्ये बॉल पिकअप करणार्‍या रिचर्ड हॅडलीचा थ्रो नॉनस्ट्रायकर एन्डला स्टंपवर लागला नाहीच, पण मार्क बर्जेसलाही तो कलेक्ट करणं जमलं नाही! शेवटच्या ओव्हरमध्ये टेलर रनआऊट झाला खरा, पण त्यापूर्वी त्याने रँडलबरोबर ४१ रन्सची पार्टनरशीप केली होती. ५० बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि केर्न्सला मारलेल्या सिक्सच्या जोरावर ४२ रन्स फटकावत रँडल नॉट आऊट राहीला.

६० ओव्हर्समध्ये इंग्लंडने २२१ रन्सपर्यंत मजल मारली होती!

सेमीफायनलसारखी महत्वाची मॅच असल्याने राईटच्या जोडीला अनुभवी ग्लेन टर्नर ओपनिंगला येईल असा सर्वांचा अंदाज होता. १९७५ च्या वर्ल्डकपमध्ये वन डे मध्ये १७१ रन्सचं रेकॉर्ड टर्नरच्या नावावर होतं. परंतु टर्नरने मिडल ऑर्डरमध्ये बॅटींगला येण्यासाठी प्राधान्यं दिल्याने राईटच्या जोडीला आला ब्रूस एडगर. राईट - एडगर यांनी सावधपणे बॅटींग करत १६ ओव्हर्समध्ये ४७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर क्रिस ओल्डच्या बॉलवर एडगर एलबीडब्ल्यू झाला. जेफ हॉवर्थने बॉब विलीसला बाऊंड्री ठोकत आक्रमक सुरवात केली, पण फुलटॉसवर अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात हॉवर्थ एलबीडब्ल्यू झाला.

हॉवर्थला एलबीडब्ल्यू करणारा बॉलर होता जेफ बॉयकॉट!
डोक्यावर टोपी घालून मिडीयम पेसने बॉलिंग करताना त्याने हॉवर्थला चकवलं होतं!

Boycott

बॉयकॉटला विकेट मिळाल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला!
कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला पीटर वेस्ट म्हणाला,
"No Yorkshire bowler has a better reaction to his first success here!"

( इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये लॅ़केशायर विरुद्ध यॉर्कशायर ही भारत - पाकिस्तानच्या तोडीची दुष्मनी आहे. अशा परिस्थितीत अस्सल यॉर्कशायरमन असलेल्या बॉयकॉटला मिळालेल्या विकेटला ओल्ड ट्रॅफर्डवरच्या प्रेक्षकांनी दाद द्यावी याचं वेस्टला अप्रूप वाटत होतं! )

हॉवर्थ आऊट झाल्यानंतर राईट आणि हॉवर्थच्या जागी आलेला जेरेमी कोनी यांनी ४६ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघे इंग्लंडला त्रासदायक ठरणार अशी चिन्हं दिसत असतानाच माईक हेंड्रीकने सावधपणे खेळणार्‍या कोनीला एलबीडब्ल्यू केलं. पण न्यूझीलंडला खरा धक्का बसला तो आणखीन ८ रन्सची भर पडल्यावर...

बॉब विलीसचा बॉल राईटने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रन आरामात पूर्ण केली.
दुसर्‍या रनसाठी राईटने धाव घेतली, पण ग्लेन टर्नरच्या अनुभवी नजरेने बॉल पिकअप करणारा फिल्डर टिपला होता.
त्याने राईटला मागे फिरण्याची खूण केली, पण एव्हाना उशीर झाला होता...
बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या डेरेक रँडलचा थ्रो थेट विलीसच्या हातात गेला होता!
विलीसने बेल्स उडवल्या तेव्हा राईट क्रीजपासून किमान ३ फूट अंतरावर होता!

१३७ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह राईटने ६९ रन्स फटकावल्या. न्यूझीलंड ११२ / ४!
वर्ल्डकपची फायनल गाठण्यासाठी न्यूझीलंडला अद्याप ९० रन्सची आवश्यकता होती.

टर्नर आणि कॅप्टन मार्क बर्जेस यांनी सावध पवित्रा घेत रन्स जोडण्यास सुरवात केली. बॉयकॉटच्या बॉलवर टर्नरचा सोपा कॅच लाँगऑगला असलेल्या गूचला घेता आला नाही. टर्नर - बर्जेस यांनी न्यूझीलंडचा स्कोर १३२ पर्यंत नेल्यावर....

बॉयकॉटचा बॉल टर्नरने मिडविकेटला फ्लिक केला आणि तो रन काढण्यासाठी धावत सुटला...
बॉल थेट गेला होता रँडलच्या हातात!
नॉनस्ट्रायकर असलेल्या मार्क बर्जेसने टर्नरला परत जाण्याचा कॉल दिला पण टर्नर थांबायला तयार नव्हता!
रँडलचा थ्रो आरामात कलेक्ट करुन बॉब टेलरने बेल्स उडवल्या
पण त्यापूर्वी टर्नर बर्जेसला क्रॉस करुन पुढे गेला होता!
टर्नरच्या रन काढण्याच्या आत्मघातकी प्रयत्नात बर्जेस फुकटचा बळी गेला होता!

टर्नर आणि बर्जेसच्या जागी आलेला रिचर्ड हॅडली यांनी ३० रन्स जोडल्या पण फटकेबाजी करणं त्यांना जमत नव्हतं. विलीसच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फ्लिक मारण्याचा टर्नरचा प्रयत्नं फसला आणि तो एलबीडब्ल्यू झाला! न्यूझीलंड १६२ / ६!

टर्नर परतल्यावरही हॅडली आणि विकेटकीपर वॉरन लीस यांनी फटकेबाजी करण्यास सुरवात केली. हेन्ड्रीकच्या बॉलवर लाँगऑनला बॉयकॉटने लीसचा कॅच घेतला, पण बाऊंड्रीचा अंदाज न आल्याने त्याचा एक पाय बाहेर पडल्यावर लीसला सिक्स मिळाली! न्यूझीलंडचा स्कोर १८० पर्यंत गेल्यावर बोथमला फटकावण्याच्या नादात हॅडली बोल्ड झाला, पण लान्स केर्न्सने बोथमला मिडविकेटवर दणदणीत सिक्स ठोकल्यावर पुन्हा एकदा मॅचचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूने झुकलं! बोथमपाठोपाठ हेंड्रीकला केर्न्सने मिडविकेटलाच बाऊंड्री ठोकली, पण पुन्हा हेंड्रीकला फटकावण्याच्या नादात ब्रिअर्लीने त्याचा कॅच घेतला. न्यूझीलंड १९५ / ८!

केर्न्स आऊट झाल्यानंतर इंग्लंडने मॅच जिंकल्यात जमा होती, पण लीस हार मानण्यास तयार नव्हता. ब्रायन मॅकेंझीसह रन्स ढापण्याचा त्याने सपाटा लावला होता. अखेर ५९ व्या ओव्हरमध्ये हेंड्रीकने यॉर्करवर त्याला बोल्ड केलं!

शेवटच्या ओव्हरमध्ये १४ रन काढण्याचं अशक्यप्राय आव्हान मॅकेंझी आणि ट्रप यांच्यासमोर होतं!
बोथमच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्तं ४ रन्स निघाल्या!

इंग्लंडनी ९ रन्सनी मॅच जिंकली आणि वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला!
७१ रन्स फटकावणार्‍या गूचची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली.

पुढे बर्‍याच वर्षांनी आपल्या रनआऊटबद्द्ल बोलताना राईट म्हणाला,
"I got run out. My God! What a nightmare it was! I don't like to remember that. I think I was looking for two and I was sent back! 1979 was the closest we got to the World Cup Final!"

क्रीडालेख

प्रतिक्रिया

पक्षी's picture

3 Feb 2017 - 11:11 am | पक्षी

मस्त. खूप छान वर्णन.

पैसा's picture

11 Feb 2017 - 9:59 am | पैसा

खास स्पार्टा स्टाईल!