वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
5 Feb 2017 - 7:58 am

१८ जून १९८३
नेव्हील ग्राऊंड, टनब्रिज वेल्स

केंट काऊंटीतल्या टनब्रिज वेल्सच्या ग्राऊंडवर भारत आणि झिंबाब्वे यांच्यातली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या राऊंडच्या मॅचेसमध्ये डंकन फ्लेचरच्या अननुभवी झिंबाब्वेने किम ह्यूजच्या ऑस्ट्रेलियाला चकवलं होतं! कपिल देवच्या भारतीय संघाने तर पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता! १९७५ पासून वर्ल्डकपमधली एकही मॅच न गमावणार्‍या वेस्ट इंडीजचा हा पहिलाच पराभव होता! पहिल्या राऊंडमध्ये भारताने झिंबाब्वेचा आरामात पराभव केला असला तरी ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली होती. वेस्ट इंडीजनेही दुसर्‍या राऊंडमध्ये भारताला हरवलं असल्याने सेमीफायनल गाठण्याच्या दृष्टीने झिंबाब्वेविरुद्धची ही मॅच जिंकणं भारताच्या दृष्टीने अत्यावश्यंक होतं.

टनब्रिज वेल्सच्या ढगाळ वातावरणातही रन रेट वाढवण्याच्या दृष्टीने टॉस जिंकल्यावर कपिलने बॅटींगचा निर्णय घेतला!
कपिलचा हा निर्णय आत्मघातकी ठरला!
पहिल्याच ओव्हरच्या दुसर्‍या बॉलला पीटर रॉसनने गावस्करला एलबीडब्ल्यू केलं!

रॉसन आणि केविन करनचे बॉल जबरदस्तं स्विंग होत होते. मोहींदर अमरनाथसारख्या बॅट्समनलाही त्यांना खेळणं कठीण जात होतं. रॉसनच्या पहिल्या दोन ओव्हर्स मेडन गेल्यावर अमरनाथने त्याला ड्राईव्हची बाऊंड्री मारली. दुसर्‍या बाजूला श्रीकांतला फटकेबाजीची उर्मी दाबून ठेवावी लागत होती. सहावी ओव्हर सुरु झाली तरीही त्याला एकही रन काढता आली नव्हती! शेवटी हे प्रेशर असह्यं झाल्यावर श्रीकांतने करनचा बंपर पूल केला, पण मिडऑनवर असलेल्या इयन बुचार्टने जवळजवळ ३० यार्ड धावत जात त्याचा कॅच घेतला! रॉसनच्या पुढच्याच ओव्हरमध्ये एक ऑफकटर अमरनाथच्या बॅटची इनसाईड एज घेऊन गेला आणि विकेटकीपर डेव्हीड हौटनने लेगसाईडला झेप घेत त्याचा कॅच घेण्यात कोणतीही कुचराई केली नाही. संदीप पाटील आणि यशपाल शर्मा यांनी रॉसन - करनच्या ३ ओव्हर्स खेळून काढल्या, पण करनच्या आऊटस्विंगरवर पुन्हा एकदा हौटननेच पाटीलचा कॅच घेतला. भारत ९ / ४!

संदीप पाटील आऊट झाल्यावर यशपालच्या जोडीला कपिल बॅटींगला आला. टॉस जिंकून बॅटींग करण्याच्या आपल्या निर्णयाचा हा परिणाम होईल हे त्याला निश्चितच अपेक्षित नसावं. पण कपिल बॅटींगला आल्यावरही भारताची घसरगुंडी थांबली नाहीच! रॉसनच्या आऊटस्विंगरवर यशपालची एज लागली आणि हौटनने त्याचा कॅच घेतला. हौटनचा हा तिसरा कॅच होता. २८ बॉल्स खेळून काढत यशपालने आतापर्यंत सर्वात जास्तं ९ रन्स केल्या. यशपाल आऊट झाला तेव्हा भारताची १७ / ५ अशी दारुण अवस्था झाली होती!

टनब्रिज वेल्सच्या नेव्हील ग्राऊंडवरची ती पहिलीच वन डे मॅच होती. पण भारताची दयनिय अवस्था पाहता ती लंचच्याही आधी आटपेल अशी भिती मॅचच्या संयोजकांना वाटत होती. आपली भिती त्यांनी प्रेक्षकात हजर असलेल्या झिंबाब्वे क्रिकेट युनियनचा अध्यक्ष डेव्ह एल्मन-ब्राऊनला बोलून दाखवली. त्या दिवशी नेमका बीबीसीचा संप असल्याने आणि भारत - झिंबाब्वे मॅचला बीबीसीच्या दृष्टीने फारसं महत्वं नसल्याने एकही कॅमेरामन मैदानात हजर नव्हता. पण संप असूनही बीबीसीच्या अधिकार्‍यांनी भारताची अवस्था पाहिल्यावर एल्मन-ब्राऊनला मॅच लवकर संपणार हे गृहीत धरुन इंटरव्ह्यूसाठी लंडनला येण्याविषयी निरोप पाठवला!

एल्मन-ब्राऊन म्हणाला,
"Things could change. The game isn’t over!”

यशपाल आऊट झाल्यावर कपिलच्या जोडीला बॅटींगला आला रॉजर बिन्नी.

बिन्नी म्हणतो,
“When I went into bat Kapil said, ‘Listen, we have still got about fifty overs to go. Lets go about ones and twos. Lets not try and hit and get out... just hang around.’!”

कपिलने सावध पवित्रा घेत रॉसन आणि करनची बॉलिंग खेळून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या १६ ओव्हर्समध्ये केवळ ४० रन्स निघाल्या. पण भारताची वाताहात काही प्रमाणात थोपवण्यात कपिल - बिन्नी यशस्वी झाले होते. नेमक्या याच वेळेस झिंबाब्वेचा कॅप्टन डंकन फ्लेचरने रॉसन - करन या दोघांच्या सलग ८ ओव्हर्सच्या स्पेल्सनंतर एका बाजूने इयन बुचार्टला बॉलिंगला आणलं आणि दुसर्‍या बाजूने तो स्वतः बॉलिंगला आला. अर्थात रॉसन आणि करनप्रमाणे अचूक बॉलिंग करणं दोघांनाही जमत नसल्याने कपिल आणि बिन्नीला ते एकदम मानवलं!

विकेटकीपर डेव्हीड हौटन आणि ग्रँट पॅटरसनच्या मते फ्लेचरचा हा निर्णय चुकीचा होता.

हौटन म्हणतो,
"Even to this date Duncan ruefully regrets his decision to remove both of them at the same time. It made it easier for the Indians.”

रॉबिन ब्राऊनच्या मते मात्रं फ्लेचरचा निर्णय योग्यं होता. तो म्हणतो,
"Each one of them had bowled eight overs already. It was wise to take them out of attack before they tired and loose their effectiveness!”

कपिल आणि बिन्नी यांनी ६० रन्सची पार्टनरशीप रचल्यावर ऑफस्पिनर जॉन ट्रायकॉसच्या बॉलवर बिन्नी एलबीडब्ल्यू झाला. बिन्नीच्या जागी बॅटींगला आलेल्या रवी शास्त्रीने जेमतेम १ रन काढल्यावर फ्लेचरच्या बॉलवर अँडी पायक्रॉफ्टने त्याचा कॅच घेतला. भारत ७८ / ७!

शास्त्री परतल्यावर कपिलच्या जोडीला बॅटींगला आला मदनलाल. ट्रायकॉस - बुचार्टला तडकावलेल्या बाऊंड्रीजचा अपवाद वगळता कपिलने बिन्नीप्रमाणेच मदनलालबरोबरही १-२ रन्स पळून काढण्यावरच भर दिला होता. मदनलालनेही सावध पवित्रा घेत कपिलला साथ देण्याचंच धोरण पत्करलं होतं. कपिल - मदनलाल यांनी ६१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर डंकन फ्लेचरने पुन्हा करनला बॉलिंगला आणलं. फ्लेचरची ही चाल यशस्वी ठरली. करनच्या आऊटस्विंगरवर विकेटकीपर हौटनने मदनलालचा कॅच घेतला. भारत १४० / ८!

मदनलालच्या जागी बॅटींगला आलेला सय्यद किरमाणी कपिलला म्हणाला,
“You play your natural game!”

"हमको ६० ओव्हर्स खेलना है!" कपिल उत्तरला!

किरमाणीनेही बिन्नी आणि मदनलालप्रमाणेच थंड डोक्याने कपिलला जास्तीतजास्तं स्ट्राईक देण्यावरच भर ठेवला होता. अद्यापही कपिल कोणतीही रिस्क न घेता आणि घाई न करता खेळत होता. नेव्हील ग्राऊंडच्या ज्या विकेटवर ही मॅच खेळवली जात होती, ती विकेट एका मैदानाच्या मधोमध नसून एका टोकाला होती. त्यामुळे एका बाजूची बाऊंड्री अगदीच लहान तर दुसर्‍या बाजूची बाऊंड्री मोठी असा प्रकार झाला होता. या मोठ्या बाऊंड्रीच्या दिशेने बॉल प्लेस करुन ३ रन्सही आरामात काढणं शक्यं होतं. या गोष्टीचा कपिलने चाणाक्षपणे फायदा उठवला नसता तरंच नवल!

४९ व्या ओव्हरमध्ये बुचार्टच्या बॉलवर ड्राईव्ह मारत कपिलने आपली सेंच्युरी पूर्ण केली.
वन डे मधली त्याची ही पहिलीच सेंच्युरी होती!
सेंच्युरी पूर्ण केल्यावर कपिलने ड्रेसिंगरुममधून दुसरी बॅट मागवून घेतली. ही बॅट एखाद्या बेसबॉलच्या बॅटप्रमाणे दिसत होती!

आणि कपिल सुटला!
झिंबाब्वेच्या बॉलर्सची अभूतपूर्व धुलाई सुरु झाली!

जॉन ट्रायकॉसला कपिलने मिडविकेटवरुन सिक्स तडकावली. पाठोपाठ बुचार्ट आणि कॅप्टन फ्लेचरलाही त्याने लाँगऑन बाऊंड्रीपार भिरकावलं. फ्लेचरने मोठ्या अपेक्षेने रॉसन आणि करन दोघांना बॉलिंगला आणलं, पण कपिलने करनच्या बंपरवर बाऊंड्री आणि पाठोपाठ सिक्स ठोकली. रॉसनलाही त्याने लाँगऑनला सिक्स तडकावली. इनिंग्जच्या सुरवातीला भारतीय बॅट्समनना धारेवर धरणार्‍या झिंबाब्वेच्या बॉलर्सवर जणू सूड उगवत असल्याच्या थाटात कपिलची फटकेबाजी सुरु होती. ड्राईव्ह, कट, पूल, हूक.... अक्षरशः मनाला येईल त्या दिशेने तो बॉल फटकारत होता! रॉसन असो किंवा करन, फ्लेचर असो किंवा ट्रायकॉस, कपिलसमोर कोणाचीच मात्रा चालत नव्हती. त्यातल्या त्यात यॉर्करवर नियंत्रण असल्यामुळे या लांडगेतोडीतून थोडाफार वाचला तो बुचार्ट. बाकी सब घोडे बारा टक्के!

अखेर ६० ओव्हर्स संपल्या तेव्हा भारताचा स्कोर होता २६६ / ८!
शेवटच्या ११ ओव्हर्समध्ये कपिलच्या बॅटमधून ७५ रन्सची बरसात झाली होती!
१७ / ५ अशा दारूण आणि दयनिय अवस्थेतून त्याने भारताला २६६ पर्यंत पोहोचवलं होतं!
कपिल आणि किरमाणी यांनी ९ व्या विकेटसाठी रेकॉर्ड १२६ रन्सची पार्टनरशीप केली!
ग्लेन टर्नरचा वन डे क्रिकेटमधला १७१ रन्सचा रेकॉर्ड कपिलने इतिहासजमा केला होता!

१३८ बॉल्समध्ये १६ बाऊंड्री आणि ६ सिक्स तडकावत कपिलने १७५ रन्स झोडपून काढल्या!

ग्रँट पॅटरसन आणि रॉबिन ब्राऊन यांनी कपिल आणि बलविंदर संधू यांना सावधपणे खेळून काढत १४ ओव्हर्समध्ये ४४ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर रॉजर बिन्नीच्या इनस्विंगरवर फ्लिक करण्याच्या नादात पॅटरसन एलबीडब्ल्यू झाला. आणखीन जेमतेम ४ रन्सची भर पडते तोच जॅक हेरनने मदनलालचा बॉल कमी अंतरावर असलेल्या स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरच्या यशपाल शर्माच्या हातात असतानाही दुसरी रन काढण्याच्या आत्मघातकी प्रयत्न केला! यशपालचा थ्रो कलेक्ट करुन किरमाणीने बेल्स उडवल्या तेव्हा हेरन आणि ब्राऊन पीचच्या मध्यावर एकमेकाला जेमतेम क्रॉस झाले होते! संधूच्या आऊटस्विंगरवर ड्राईव्ह मारण्याच्या नादात अँडी पायक्रॉफ्टची एज लागली आणि किरमाणीने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे ६१ / ३!

ओपनर रॉबिन ब्राऊन कमालीच्या थंड डोक्याने खेळत होता. पायक्रॉफ्टच्या जागी आलेल्या डेव्हीड हौटनसह त्याने झिंबाब्वेची इनिंग्ज सावरण्यास सुरवात केली. बिन्नी - मदनलाल - अमरनाथ यांच्या स्विंग होणार्‍या बॉल्सना खेळणं दोघांनाही जड जात होतं. सावधपणे खेळत त्यांनी झिंबाब्वेचा स्कोर ८४ पर्यंत नेला. हे दोघं झिंबाब्वेला सुस्थितीत नेणार असं वाटत असतानाच...

मदनलालचा इनस्विंगर ब्राऊनच्या पॅडला लागला आणि स्क्वेअरलेगच्या दिशेने गेला.
ब्राऊनने लेगबाय घेण्याच्या इराद्याने धाव घेतली...
नॉनस्ट्रायकर असलेल्या हौटनने स्क्वेअरलेगला श्रीकांतने बॉल पिकअप केल्याचं टिपलं होतं, त्यामुळे तो जागचा हालला नाही!
ब्राऊनने मात्रं हौटनच्या मागे फिरण्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्षं केलं...
श्रीकांतचा थ्रो किरमाणीने आरामात कलेक्ट केला तेव्हा ब्राऊन पॅव्हेलियनच्या वाटेवर होता!

कॅप्टन डंकन फ्लेचरने सावध पवित्रा घेत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. फ्लेचर - हौटन यांनी १७ रन्सची भर घातल्यावर मदनलालच्या इनकटरवर हौटन एलबीडब्ल्यू झाला. आणखीन जेमतेम १० रन्सची भर पडते तोच मोहींदर अमरनाथला ड्राईव्ह करण्याचा फ्लेचरचा प्रयत्नं साफ फसला आणि मिडऑफला कपिलने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे ११३ / ६!

मॅच जिंकण्यासाठी झिंबाब्वेला अद्याप १५४ रन्सची आवश्यकता होती!

झिंबाब्वेच्या सर्व आशा एकवटलेल्या होत्या त्या केव्हीन करनवर! करन इंग्लंडच्या कौंटीत ग्लॉस्टरशायरसाठी खेळणारा हरहुन्नरी आणि अनुभवी ऑलराऊंडर होता. इयन बुचार्टच्या साथीने त्याने झिंबाब्वेची घसरलेली गाडी रुळावर आणण्यास सुरवात केली. करन - बुचार्ट यांनी कपिल - मदनलालच्या पार्टनरशीपप्रमाणेच सुरवातीला सावधपणे १-२ रन्सवर भर दिला. बिन्नी - मदनलाल - अमरनाथ यांना बाऊंड्री तडकावण्याची मिळालेली एकही संधी करनने सोडली नाही. या दोघांनी ५५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर बिन्नीच्या बॉलवर कट् मारण्याच्या प्रयत्नात बुचार्टच्या बॅटची एज लागून बॉल स्टंपवर गेला. झिंबाब्वे १६८ / ७!

बुचार्ट परतल्यावर आलेल्या जेराल्ड पेकओव्हरने मात्रं बुचार्ट करनला साथ देण्याचा प्रयत्नं न करता फटकेबाजीला सुरवात केली. पण पेकओव्हरचा हा पवित्रा आत्मघातकी ठरला. १८ बॉल्समध्ये १४ रन्स केल्यावर मदनलालला फटकावण्याच्या नादात यशपाल शर्माने पेकओव्हरचा कॅच घेतला. झिंबाब्वे १८९ / ८!

पीटर रॉसन बॅटींगला आल्यावर करनने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. बिन्नी - मदनलाल - अमरनाथ यांना त्याने बाऊंड्री तडकावल्या. त्याचबरोबर जास्तीत जास्तं स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचीही त्याने दक्षता घेतली होती. पीटर रॉसनबरोबर करनने ४१ रन्सची पार्टनरशीप केली. त्यात रॉसनची अवघी १ रन होती! करन खेळत असेपर्यंत झिंबाब्वेच्या विजयाच्या आशा कायम होत्या, पण अखेर मदनलालच्या एका स्लो बॉलचा ( मदनलालचा बॉल आणखीन स्लो तो काय येणार? असो! ) त्याला अंदाज आला नाही आणि रवी कव्हर्समध्ये रवी शास्त्रीने आरामात त्याचा कॅच घेतला. करन आऊट झाल्यावर भारतीय खेळाडूंनी अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला झिंबाब्वे २३० / ९!

जॉन ट्रायकॉसला कॉट अ‍ॅन्ड बोल्ड करत कपिलने झिंबाब्वेची इनिंग्ज २३५ मध्ये आटपली!
१७ / ५ अशा अवस्थेतून भारताने ३१ रन्सने मॅच जिंकली!

मॅच जिंकल्यावर कपिलने खाली वाकून नेव्हील ग्राऊंडच्या खेळपट्टीचं चुंबन घेतलं!

सुनिल गावस्कर म्हणतो,
“When you had lost half of your side with less than 20 runs on the board, obviously it was not looking good. But Kapil went out and played his innings… the best innings I had seen in limited overs international.”

जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या दुर्दैवाने बीबीसीच्या संपामुळे कपिलच्या या कल्पिताहूनही अद्भुत इनिंग्जची व्हिडीओ टेप उपलब्धं नाही!

मॅचला हजर असलेल्या एका भारतीय प्रेक्षकाने आपल्या व्हिडीओ कॅमेर्‍यावर कपिलची इनिंग्ज टिपली होती आणि कपिलने भरपूर पैसे मोजून ती फिल्म विकत घेतल्याची कथा नंतर प्रसृत झाली तरी ती निव्वळ अफवाच ठरली!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

5 Feb 2017 - 4:25 pm | संजय पाटिल

अत्यंत रोमांचकारी मॅच आणि तितकेच सुंदर वर्णन....
कितीही वेळा वाचलं तरी परत परत वाचावसं वाटणारे..

बबन ताम्बे's picture

5 Feb 2017 - 6:50 pm | बबन ताम्बे

तुमचे सगळे लेख प्रत्यक्ष म्यॅच डोळ्यासमोर उभी करतात . आता उतकंठा आहे ती 1983 फायनलची ☺

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2017 - 8:09 pm | अत्रुप्त आत्मा

+१

बबन ताम्बे's picture

5 Feb 2017 - 6:50 pm | बबन ताम्बे

तुमचे सगळे लेख प्रत्यक्ष म्यॅच डोळ्यासमोर उभी करतात . आता उतकंठा आहे ती 1983 फायनलची ☺

बबन ताम्बे's picture

5 Feb 2017 - 6:50 pm | बबन ताम्बे

तुमचे सगळे लेख प्रत्यक्ष म्यॅच डोळ्यासमोर उभी करतात . आता उतकंठा आहे ती 1983 फायनलची ☺

बबन ताम्बे's picture

5 Feb 2017 - 6:50 pm | बबन ताम्बे

तुमचे सगळे लेख प्रत्यक्ष म्यॅच डोळ्यासमोर उभी करतात . आता उतकंठा आहे ती 1983 फायनलची ☺

चौकटराजा's picture

5 Feb 2017 - 8:38 pm | चौकटराजा

योगायोगाने म्हणा .. काही असो मला अनेक विक्रमी सामने च रेकॉर्ड ब्रेकिंग गोष्टी लाईव्ह पाहायला मिळाल्या पण मरेपर्यन्त ही खंत राहील की याची व्हिडिओ देखील पहायला मिळाली नाही. कपिल देव व धोनी हे माझे आदरणीय खेळाडू अशा साठी आहेत की सामना फिरविण्याची ताकद . ( काही वेळा हा रोल युवराज रैना यानीही पार पाडला आहेच ! ).

फारएन्ड's picture

5 Feb 2017 - 10:00 pm | फारएन्ड

मस्त वर्णन! पुढे १९८७ मधे रिचर्ड्स ने मोडेपर्यंत हा विक्रम (१७५) तसाच होता. आणि तो मोडायला रिचर्ड्स लागला हे ही कपिलचे मोठेपण दाखवते :)

फारएन्ड's picture

5 Feb 2017 - 11:14 pm | फारएन्ड

बाय द वे मोहिंदर चा आवर्जून उल्लेख केला आहेस - मोहिंदर त्या वेळेस १९८२-८३ मधे प्रचंड फॉर्मात होता. पाक व विंडीज मधे हार्ड बाउन्सी फास्ट बोलिंग तो चांगला खेळला. पण त्याला स्विंग बहुधा फारसे खेळता येत नसे (म्हणजे अझर, वेंगसरकर च्या उलटे). मोहिंदर बहुधा या कप च्या सेमी आणि फायनल मधे मॅन ऑफ द मॅच होता. पण तेव्हा ते अचाट पद्धतीने दिले जात. नाहीतर सेमी फायनल चा मॅन ऑफ द मॅच खरा संदीप पाटील हवा होता.

स्पार्टाकस's picture

6 Feb 2017 - 12:57 am | स्पार्टाकस

हो. मोहींदर सेमीफायनल आणि फायनलमध्येही मॅन ऑफ द मॅच होता.

गावस्करच्या खालोखाल आणि सचिन - द्रविडचा उदय होण्यापूर्वी फास्ट बॉलर्सना जर कोणी यशस्वीपणे खेळलं असेल तर तो मोहींदरच. खासकरुन वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानच्या दौर्‍यावर त्याने हूक आणि पूलचा वापर करुन त्यांच्या बॉलर्सना पद्धतशीरपणे फटकावलं होतं.

सेमीफायनलमध्ये मोहींदरला मॅन ऑफ द मॅच देण्याचं कारण म्हणजे त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स होता. १२ ओव्हर्समध्ये २७ रन्स देत त्याने २ विकेट्स काढल्या होत्या आणि गावस्कर - श्रीकांत आऊट झाल्यावर ४६ रन्स काढत यशपालबरोबर ९२ रन्सची पार्टनरशीप केली होती.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2017 - 3:06 pm | श्रीगुरुजी

उपांत्यफेरीतील सामन्याचा मोहिंदरचा खरा सामनावीर होता. भारताचे चार मध्यमगती गोलंदाज (कपिल, बिन्नी, मदनलाल व संधू) हे प्रत्येकी पूर्ण १२ षटके टाकायचे. उर्वरीत १२ षटके कीर्ति आझाद व मोहिंदर मिळून टाकायचे. या सामन्यात या दोघांनी इतकी टिच्चून गोलंदाजी केली की कपिलने दोघांनाही पूर्ण १२ षटकांचा कोटा दिला. त्यात मोहिंदरचे पृथक्करण १२ षटकात २८ धावांत २ बळी असे होते, तर आझादचे पृथक्करण १२ षटकात २९ धावांत १ बळी असे होते. या दोघांनी २४ षटकात फक्त ५७ धावा देऊन ३ बळी घेतले होते व त्यामुळेच इंग्लंडला ६० षटकात ९ बाद २१३ इतक्या कमी धावसंख्येवर रोखले गेले. भारताला विजयासाठी ६० षटकात फक्त २१४ धावा प्रतिषटक ३.५७ धावा या वेगाने करण्याची गरज होती.

भारताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर गावसकरने व श्रीकांतने बर्‍यापैकी सुरूवात करून १३ षटकात ४६ धावांची सलामी दिली. त्यात गावसकरचा वाटा २५ धावांचा होता. या सामन्यात गावसकरने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली. हा सामना वगळता इतर सर्व सामन्या गावसकर फ्लॉप होता. तसा तो स्लीपमध्ये चांगले झेल घेत होता, पण धावा करीत नव्हता. कीर्ती आझादने देखील या सामन्यातील गोलंदाजी वगळता इतर सर्व सामन्यात फारश्या धावा केल्या नव्हत्या व त्याला फारसे बळीही मिळाले नव्हते.

४६ धावांच्या सलामीनंतर गावसकर व श्रीकांत दोघेही पाठोपाठ बाद झाल्यानंतर मोहिंदर व यशपालने संथ फलंदाजी केली. अजून एखादी विकेट न घालविता हळूहळू धावा वाढवायच्या हा त्यांचा उद्देश होता. सामन्याची ३९ षटके संपली तेव्हा भारताची धावसंख्या फक्त १०९ होती, पण दोनच फलंदाज बाद झाले होते. आता उर्वरीत २१ षटकात १०५ धावा हव्या होत्या. त्या काळात प्रतिषटक ५ धावा हे मोठे आव्हान होते. ४० व्या षटकात यशपालने विलीसला स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार मारून गिअर बदलला. पण मोहिंदर लगेच ४६ वर बाद झाला. त्यानंतर आलेल्या संदीप पाटिलने व यशपाल ६० वर बाद झाल्यावर आलेल्या कपिलने इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढून भारताला विजय मिळवून दिला.

स्पार्टाकस's picture

6 Feb 2017 - 7:42 pm | स्पार्टाकस

थोडीशी गडबड आहे गुरुजी

यशपाल - मोहींदर खेळत असताना सेटल झाल्यानंतर व्हिक मार्क्सला सिक्स ठोकत गिअर बदलला तो मोहींदरने. मोहींदरपाठोपाठ यशपालनेही मग अ‍ॅलट आणि विलीसला सिक्स ठोकल्या. तसंच शेवटी कपिल खेळायला आला तेव्हा भारताला फक्तं ९ रन्स बाकी होत्या, त्यामुळे कपिलला फारसं काही करावं लागलंच नाही, केवळ १ रन काढून तो नॉटआऊट राहीला. विलीसला फटकावलं होतं ते संदीप पाटील आणि यशपालनी.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2017 - 2:18 pm | श्रीगुरुजी

जराशी गडबड झालेली दिसते. १९८२ मधील कसोटीत संदीप पाटिलने व कपिलने केलेली विलीसची धुलाई आणि हा सामना यात सरमिसळ झाली. त्या सामन्यात यशपालने विलीसच्या गोलंदाजीवर किंचित ऑफच्या बाजूला सरकून स्क्वेअरलेग बाऊंड्रीला मारलेला षटकार अजून आठवतो.

गामा पैलवान's picture

6 Feb 2017 - 1:09 am | गामा पैलवान

स्पार्टाकस,

मला आठवतंय आम्ही मंडळी दुसऱ्या दिवशी क्षणचित्रं पाहायला आसुसलेले असायचो. पण या बहारदार सामन्याच्या वेळी नेमकी निराशा झाली. वृत्तपत्रातल्या वर्णनावरच समाधान मानावं लागलं. आता लेख वाचून प्रत्यक्ष सामना पहात आहोत असा भास झाला. धन्यवाद! :-)

जाताजाता : केव्हिन करेन नावाचा एक टेनिसपटूही आहे.

आ.न.,
-गा.पै.