वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - सेमीफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
7 Mar 2017 - 9:18 am

३० मार्च २०११
पीसीए, मोहाली

चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात 'Mother of all contests' - भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली दुसरी सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलला भारताने सलग ३ वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तर पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा अक्षरशः खिमा केला होता. या सेमीफायनलमधील विजेत्या संघाची फायनलमध्ये मुंबईला वानखेडेवर श्रीलंकेशी गाठ पडणार होती. क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला धूळ चारणार्‍या न्यूझीलंडचा श्रीलंकेपुढे मात्रं निभाव लागला नव्हता. वर्ल्डकपच्या इतिहासात ६ व्या खेपेला सेमीफायनलमध्ये पराभूत होण्याची न्यूझीलंडवर वेळ आली होती.

महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघात अनुभवी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, सुरेश रैना आणि स्वतः धोणी असे बॅट्समन होते. भारताच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने झहीर खान आणि हरभजन सिंग यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला मुनाफ पटेल आणि आशिश नेहरा हे दोघं होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधल्या संघातून रविचंद्रन अश्विनला वगळून त्याच्या जागी आशिश नेहराची निवड झाल्याबद्द्ल आश्चर्य व्यक्तं करण्यात येत होतं. मोहालीच्या विकेटवर स्पिनर्सना मदत मिळेल असा सर्वांचा अंदाज असताना नेहराला खेळवण्यात आल्यामुळे सर्वजण चकीत झाले होते.

शाहीद आफ्रीदीच्या पाकिस्तानी संघात महंमद हाफीज, असद शफीक, अनुभवी युनुस खान, मिसबाह उल हक, उमर अकमल असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला कामरान अकमलसारखा विकेटकीपर - बॅट्समनही पाकिस्तानच्या संघात होता. पाकिस्तानच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने कॅप्टन आफ्रीदी, उमर गुल, सईद अजमल आणि वहाब रियाझ यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला ऑलराऊंडर अब्दुल रझाकचाही पाकिस्तानच्या संघात समावेश होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये अभूतपूर्व धुलाई झाल्यावर ड्रॉप करण्यात आलेल्या शोएब अख्तरला सेमीफायनलसारख्या महत्वाच्या मॅचमध्येही बाहेरच बसावं लागलं होतं!

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत आणि जगभरात या मॅचबद्दल प्रचंड उत्सुकता होती!

सुप्रसिद्ध ब्रिटीश पत्रकार आणि सॉमरसेटचा माजी कॅप्टन पीटर रोबक म्हणाला,
"It may be only a cricket match, but try telling that to the millions who'll watch India v Pakistan in the World Cup semi-final. The Melbourne Cup might stop a nation. India versus Pakistan in the World Cup stops a subcontinent."

महेंद्रसिंग धोणीने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या आक्रमक शैलीत पहिल्याच ओव्हरमध्ये उमर गुलला कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. अब्दुल रझाकच्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स निघाल्यावर तिसर्‍या ओव्हरमध्ये...

उमर गुलचा पहिला बॉल लेगस्टंपवर पडलेली हाफव्हॉली होती...
सेहवागने आरामात ती लेगसाईडला फ्लिक केली...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला....

गुलचा दुसरा बॉलही लेगस्टंपवर पडला...
सेहवागने पुन्हा मिडविकेटला फ्लिक मारली...
बॉल पुन्हा मिडविकेट बाऊंड्रीपार गेला....

गुलचा तिसरा बॉल सेहवागने स्क्वेअरलेगला डिफेंड केला...

चौथा बॉल पुन्हा लेगस्टंपवर पडला...
सेहवागने यावेळी बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक केला....
स्क्वेअरलेगला असलेल्या मोहम्मद हफीजला कोणतीही संधी न देता बॉल बाऊंड्रीपार गेला...

पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला शॉर्टपीच बॉल होता...
सेहवागने स्लो बॉलचा अचूक अंदाज घेत बॅकफूटवर जात तो कट् केला...
यावेळेस बॉल पॉईंट बाऊंड्रीपार गेला...

सहावा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला नो बॉल होता...
सेहवागने तो कव्हर्समधून तडकावला...
एक्स्ट्राकव्हरला आफ्रीदीला कोणतीही संधी न देता बॉल बाऊंड्रीपार गेला...

पुढच्या बॉलवर फ्री हीट होती...
पण सेहवागच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल पॅडवर लागल्यामुळे पाकिस्तान वाचलं..

गुलच्या ओव्हरमध्ये सेहवागने २१ रन्स झोडपल्या होत्या!

गुलची धुलाई केल्यावर रझाकच्या पुढच्या ओव्हरमध्ये सेहवागने त्याच्या डोक्यावरुन स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. रझाकच्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सचिनने एक्स्ट्रा कव्हरला बाऊंड्री मारण्यात कोणतीही हयगय केली नाही. पुढच्या ओव्हरमध्ये....

गुलचे पहिले ३ बॉल अचूक टप्प्यावर पडले. सेहवागला त्यावर काहीच करता आलं नाही...

चौथा बॉल मिडलस्टंपवर पडलेली हाफव्हॉली होती...
सेहवागने कोणताही अनमान न करता ती लेगसाईडला फ्लिक केली...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला...

पाचवा बॉल बंपर होता. सेहवागने तो डक केला...

सहावा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला शॉर्टपीच बॉल होता...
सेहवागने तो पॉईंटला असलेल्या उमर अकमलच्या डोक्यावरुन कट् केला...
बॉल पॉईंट बाऊंड्रीपार सिक्स जाण्यापासून थोडक्यात वाचला...

३ ओव्हर्समध्ये सेहवागने गुलला मारलेली ही ८ वी बाऊंड्री होती!

६ व्या ओव्हरमध्ये आफ्रीदीने रझाकच्या ऐवजी वहाब रियाझला बॉलिंगला आणलं. रियाझच्या पहिल्याच ओव्हरमध्ये...

रियाझचा बॉल लेगस्टंपवर पडला....
सेहवागने मिडविकेटमधून बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्नं केला...
बॉल मिडलस्टंपसमोर त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर सायमन टॉफेलचं बोट वर झालं....
सेहवागने सचिनशी चर्चा न करताच डीआरएसचा वापर करत थर्ड अंपायर बिली बाऊडेनकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये टॉफेलचा निर्णय अचूक असल्याचं निष्पन्नं झालं!

२५ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह सेहवागने ३८ रन्स फटकावल्या.
भारत ४८ / १!

सेहवाग परतल्यावर सचिनने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानी बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. गुलला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर रियाझच्या पुढच्या ओव्हरमध्ये मिडविकेट आणि कव्हर्समधून २ बाऊंड्री फटकावल्या! अखेर सईद अजमलला बॉलिंगला आणण्यावाचून आफ्रीदीसमोर कोणताही पर्याय उरला नाही! १० ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता ७३ / १!

अजमलच्या ११ व्या ओव्हरमध्ये....

अजमलचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
सचिनने बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला पण बॉल मिडलस्टंप समोर त्याच्या पॅडवर आदळला...
पाकिस्तानी खेळाडूंनी अर्थातच एलबीडब्ल्यूसाठी अपिल केलं...
अंपायर इयन गूल्डचं बोट वर झालं!
पाकिस्तानी खेळाडूंनी आणि मॅच पाहण्यासाठी मुद्दाम पाकिस्तानातून आलेल्या सपोर्टर्सनी जल्लोष केला...
सचिनने गौतम गंभीरशी काही क्षण चर्चा केली आणि डीआरएसचा वापर करत थर्ड अंपायर बिली बाऊडेननकडे दाद मागितली...
जगभरातले सर्व भारतीय क्रिकेटरसिक श्वास रोखून हॉक-आय बॉल ट्रॅकींगकडे पाहत होते...
अजमलचा बॉल ऑफस्टंपवर पडला होता...मिडलस्टंपसमोर सचिनच्या पॅडवर लागला होता... पण लेगस्टंपच्या बाहेर जाताना दिसत होता!
अंपायर इयन गूल्डने आपला निर्णय फिरवला!
मोहालीवरच्या भारतीय प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलं...
अजमलचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!

अजमलचा पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सचिनने फ्रंटफूटवर येत बॉल कव्हर्समधून खेळण्याचा प्रयत्नं केला पण बॉल त्याच्या बॅटवर आला नाही...
कामरान अकमलने बॉल कलेक्ट करुन बेल्स उडवल्या स्टंपिंगचं अपिल केलं...
स्क्वेअरलेग अंपायरने बिली बाऊडेनकडे हा निर्णय सोपवला...
रिप्लेमध्ये सचिनचा उजवा पाय एक-दोन सेकंदांसाठी हवेत उचलला गेलेला दिसला...
पण कामरान अकमलने बेल्स उडवल्या तेव्हा त्याचा पाय पुन्हा खाली टेकलेला होता...
बिली बाऊडेनने सचिनला बेनिफीट ऑफ डाऊट देत स्टंपिंगचं अपिल फेटाळलं...

वहाब रियाझच्या ऐवजी स्वतः शाहीद आफ्रीदी बॉलिंगला आल्यावर सचिन आणि गौतम गंभीर यांनी सावध पवित्रा घेत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. अजमलच्या पुढच्या ओव्हरमध्ये गंभीरने लेटकटची बाऊंड्री मारली. पुढच्या ओव्हरमध्ये...

आफ्रीदीचा शॉर्टपीच बॉल लेगस्टंपवर पडला...
सचिनने बॅकफूटवर जात तो पूल केला पण बॉल हवेत गेला....
मिडविकेटला मिसबाह उल हकने उजव्या बाजूला वळत कॅच घेण्याचा पवित्रा घेतला पण...
बॉल त्याच्या हातातून सुटून खाली पडला...
पुन्हा एकदा सचिन वाचला!

अजमलच्या पुढच्या ओव्हरमध्ये सचिनने स्वीपची बाऊंड्री मारली पण त्याच ओव्हरमध्ये ड्राईव्ह करण्याच्या नादात सचिनची आऊटसाईड एज लागली, पण स्लिप्समध्ये कोणीही फिल्डर नसल्याने बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला. अजमलच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मोहंमद हाफीजला गंभीरने कट्ची बाऊंड्री फटकावल्यावर सचिनने आफ्रीदीला त्याच्या डोक्यावरुन स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारली. सचिन - गंभीर यांनी ६८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

हफीजचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर बाहेर पडला...
गंभीरने क्रीजमधून पुढे सरसावत बॉल फटकावण्याचा केलेला प्रयत्नं साफ फसला...
सर्वात महत्वाचं म्हणजे कामरान अकमलने बॉल कलेक्ट करुन बेल्स उडवण्यात कोणतीही कसूर केली नाही!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला मार्क निकोलस म्हणाला,
"Oh yes! Brilliant! Lovely flight! To win a battle of spin against Gautam Gambhir is a good performance!"

३२ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह गंभीरने २७ रन्स फटकावल्या.
भारत ११६ / २!

पुढच्याच ओव्हरमध्ये....
आफ्रीदीचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल सचिनने ड्राईव्ह केला...
बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तं बाऊंस झाल्याने त्याचा ड्राईव्ह हवेत गेला...
कव्हर्समध्ये युनुस खानने उजव्या बाजूला कॅच घेण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या हातातून सुटला आणि जमिनीवर पडला...
आफ्रीदी दोन्ही हातात डोकं गच्चं धरुन पाहत राहीला...
सचिन चौथ्यांदा वाचला होता!

आफ्रीदीच्या पुढच्या ओव्हरमध्ये सचिनने कव्हर्समध्ये असलेल्या युनुस खानच्या डोक्यावरुन बाऊंड्री मारली! त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर लेटकट्ची बाऊंड्री मारण्यात त्याने कोणतीही कुचराई केली नाही. सचिनचा हा कारभार सुखेनैव सुरु असताना गंभीर परतल्यावर बॅटींगला आलेल्या विराट कोहलीला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. २५ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता १४१ / २!

आफ्रीदीने विकेट्स मिळवण्याच्या दृष्टीने वहाब रियाझला बॉलिंगला आणलं. ही चाल भलतीच यशस्वी ठरली. ऑफस्टंपवर पडलेला रियाझचा बॉल लेगसाईडला खेळण्याचा कोहलीचा प्रयत्नं पार फसला आणि त्याच्या बॅटची लिडींग एज लागली. सर्वात महत्वाचं म्हणजे बॅकवर्ड पॉईंटला उमर अकमलने हा कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही....

रियाझच्या पुढच्याच बॉलवर आलेल्या इनस्विंगींग यॉर्करचा युवराज सिंगला अजिबात अंदाज आला नाही आणि त्याचा मिडलस्टंप उडाला!
भारत १४१ / ४!

महेंद्रसिंग धोणीने रियाझची हॅटट्रीक होणार नाही याची काळजी घेतली. पुढच्याच बॉलला धोणीची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला. पुढच्या ओव्हरमध्ये धोणीने हाफीजला तशीच बाऊंड्री मारल्यावर सचिनने वहाब रियाझला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. रियाझच्या जागी आफ्रीदी बॉलिंगला आल्यावर...

आफ्रीदीचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
सचिनने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला पण बॉल स्पिन झाल्याने त्याच्या बॅटची एज लागली...
पाकिस्तानच्या इतर खेळाडूंमध्ये कॅच सोडण्याची स्पर्धा लागलेली असताना कामरान अकमल मागे कसा राहणार?
त्याचे ग्लोव्हज बॉलच्या लाईनमध्ये आलेच नाहीत...
आफ्रीदी हतबुद्धं झाला! काय करावं हे त्याला समजेना....
सचिनचा हा ड्रॉप केलेला तिसरा कॅच होता!

हाफीज आणि आफ्रीदीच्या ऐवजी बॉलींगला आलेल्या उमर गुलच्या अचूक बॉलिंगमुळे सचिन आणि धोणीला पुढच्या ४ ओव्हर्समध्ये फक्तं १० रन्स काढता आल्या. पण ३५ व्या ओव्हरमध्ये...

मोहंमद हाफीजचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
सचिनने बॅकफूटवर जात बॉल पूल केला पण बाऊंसचा अंदाज न आल्याने बॉल हवेत गेला...
उमर अकमलने मिडविकेटला जंप मारुन कॅच घेण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या हाताला लागून जमिनीवर पडला...
सचिनला आऊट करण्याची ही ६ वी संधी पाकिस्तानने गमावली होती!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला मार्क निकोलस म्हणाला,
"Oh no! You are kidding me! Pakistan cannot hold onto anything tonight!"

अखेर हाफीजच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या सईद अजमलच्या बॉलवर एक्स्ट्राकव्हरला आफ्रीदीने एकदाचा सचिनचा कॅच घेतला!
मैदानात हजर असलेल्या यच्चयावत पाकिस्तानी खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला असावा...

११५ बॉल्समध्ये ११ बाऊंड्रीसह सचिनने ८५ रन्स काढल्या.
भारत १८७ / ५!

सचिन परतल्यावर बॅटींगला आलेल्या सुरेश रैनाने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढ्ण्यावर भर दिला. आफ्रीदीच्या ओव्हरमध्ये धोणीविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं अपिल सायमन टौफेलने फेटाळल्यावर आफ्रीदीने डीआरएसचा आधार घेत बिली बाऊडेनकडे दाद मागितली, पण धोणीच्या बॅटची इनसाईड एज लागल्याचं निष्पन्न झाल्याने आफ्रीदीचा विरस झाला. आफ्रीदीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या वहाब रियाझच्या बॉलवर धोणीची एज लागली, पण कामरान अकमलने त्याचा कॅच ड्रॉप केला! पण रियाझच्या त्याच ओव्हरमध्ये लेगसाईडला फ्लिक मारण्याचा धोणीचा प्रयत्नं फसला आणि सायमन टौफेलने तो एलबीडब्ल्यू असल्याचा निर्णय दिला. धोणीने डीआरएसचा वापर करुन पाहीला पण काही उपयोग झाला नाही. ४२ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह धोणीने २५ रन्स काढल्या. भारत २०५ / ६!

धोणी आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला हरभजनसिंग आणि रैना यांनी ५० ओव्हर्स पूर्ण खेळून काढण्याच्या दृष्टीने कोणतीही रिस्क न घेता रन्स काढण्यावर भर दिला. ४५ व्या ओव्हरमध्ये बॅटींग पॉवरप्ले घेतल्यावर हरभजनसिंगने अजमलला स्वीपची बाऊंड्री मारली. वहाब रियाझच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या उमर गुलला रैनाने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये फुलटॉसवर कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. हरभजनसिंगनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत गुलला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली! पण पुढच्याच ओव्हरमध्ये अजमलला क्रीजमधून पुढे सरसावत फटकावण्याचा हरभजनसिंगचा प्रयत्नं पार फसला आणि कामरान अकमलने त्याला आरामात स्टंप केलं. भारत २३६ / ७!

हरभजनसिंग परतल्यावर आलेल्या झहीर खानने रियाझला लेगसाईडला फ्लिक करण्याचा केलेला प्रयत्नं पार फसला, पण झहीरच्या बॅटची लिडींग एज लागून बॉल पॉईंटला असलेल्या उमर अकमलच्या डोक्यावरुन बाऊंड्रीपार गेला! ४९ व्या ओव्हरमध्ये रैनाने उमर गुलला शॉर्ट फाईनलेगच्या डोक्यावरुन फ्लिक करत बाऊंड्री मारली. गुलच्या बॉलिंगवर फटकावलेली ही १३ वी बाऊंड्री होती! अखेरच्या ओव्हरमध्ये रियाझला फटकावण्याच्या नादात झहीर खानची बॉटम एज लागली आणि कामरान अकमलने त्याचा कॅच घेतला. रैनाला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात आशिश नेहरा रनआऊट झाला. अखेरच्या बॉलवर एक्स्ट्राकव्हर बाऊंड्रीवर अजमलने डाईव्ह मारत बाऊंड्री अडवल्यामुळे रैनाला २ रन्सवर समाधान मानावं लागलं.

३९ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह ३६ रन्स फटकावत रैना नॉटआऊट राहीला.
वहाब रियाझने ४६ रन्समध्ये ५ विकेट्स उडवल्या!

५० ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २६० / ९!

पाकिस्तानी फिल्डींग हा तसा वर्षानुवर्षांपासून टीकेचा लाडका विषय. या सर्वांचा मुकुटमणी अर्थातच कामरान अकमल, पण या मॅचमध्ये पाकिस्तानी फिल्डर्सची गचाळपणात एकमेकांशी जणू स्पर्धा सुरु असावी अशी परिस्थिती होती. पाकिस्तानी फिल्डर्सनी एकूण ६ कॅचेस टाकले होते. कमलीचा सुदैवी ठरलेल्या सचिनच्या ४ कॅचेसचा त्यात समावेश होता. इतकंच नव्हे तर डीआरएसमुळे एलबीडब्ल्यू आणि स्टंपिंगच्या अपिलातूनही सचिन वाचला होता. भारताचा स्कोर २६० पर्यंत जाण्यास पाकिस्तानची ही गचाळ फिल्डींग आणि उमर गुलची झालेली धुलाई कारणीभूत होती. आता २६१ रन्सचं टार्गेट गाठून उरलीसुरली अब्रू वाचवणं हा एकच पर्याय पाकिस्तानकडे होता

झहीर खानच्या पहिल्याच बॉलवर स्क्वेअर ड्राईव्हची बाऊंड्री मारत कामरान अकमलने आक्रमक सुरवात केली. त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अकमलने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर झहीरच्या पुढच्या ओव्हरमध्ये मोहंमद हफीजने मिडविकेटमधून बाऊंड्री फटकावली. हफीजने पुढच्या ओव्हरमध्ये आशिश नेहराला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावल्यावर झहीरला पूल मारण्याचा कामरान अकमलचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची टॉप एज लागलप, पण त्याच्या सुदैवाने मिडऑनला असलेल्या गौतम गंभीरच्या डोक्यावरुन बॉल गेल्याने त्याला २ रन्स मिळाल्या. झहीरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मुनाफला कामरान अकमलने एक्स्ट्रा कव्हरला बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये हफीजने नेहराला मिडऑनला बाऊंड्री तडकावली. कामरान अकमल - हफीज यांची आक्रमक फटकेबाजी सुरु असल्याने धोणीने मुनाफच्या एक ओव्हरनंतर पुन्हा झहीर खानला बॉलिंगला आणलं आणि ही चाल यशस्वी ठरली...

झहीरचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
कामरान अकमलने फ्रंटफूटवर येत त्याचा आवडता स्क्वेअरड्राईव्ह मारला पण...
झहीरने चाणाक्षपणे टाकलेल्या स्लो बॉलचा त्याला अजिबात अंदाज आला नाही...
बॅकवर्ड पॉईंटला युवराज सिंगने आरामात कॅच घेतला.
पाकिस्तान ४४ / १!

कामरान अकमल परतल्यावर बॅटींगला आलेल्या असद शफीकने सुरवातीला सावध पवित्रा घेत हफीजला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. हफीजची फटकेबाजी सुरुच होती. मुनाफ पटेलला मिडऑफला बाऊंड्री फटकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये पटेलच्या बंपरवर (कसं शक्यं आहे?) हफीजने पूल मारला. मिडविकेटला झहीर कॅच घेण्याचा प्रयत्नं करावा का बाऊंड्री अडवावी अशा द्विधा मनस्थितीत सापडला, पण शेवटी त्याला दोन्हीपैकी काहीच करता आलं नाही! झहीरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या हरभजनसिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हफीजची लिडींग एज लागली, पण त्याच्या सुदैवाने बॉल हरभजनसिंगपर्यंत पोहोचला नाही. त्याने हाफव्हॉलीवर बॉल उचलला. पटेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये हफीजने फाईनलेगला बाऊंड्री मारली, पण पटेलने पुढच्या ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करत असद शफीकला मेडन ओव्हर टाकली. शफीकने हरभजनला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली खरी पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

पटेलचा बॉल ऑफस्टंपच्या किमान दोन फूट बाहेर पडला...
हफीजच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक...
त्याने ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल फाईनलेगला स्कूप करण्याचा प्रयत्नं केला...
याचा परिणाम काय होणार हे उघड होतं...
हफीजच्या बॅटची एज लागली आणि धोणीने आरामात त्याचा कॅच घेतला...
मुनाफ पटेलने हफीजला ज्या काही शब्दांत 'सेंड ऑफ' दिला तो मात्रं इथे लिहीणं शक्य नाही....

५९ बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह हफीजने ४३ रन्स फटकावल्या.
पाकिस्तान ७० / २!

हफीज परतल्यावर बॅटींगला आलेल्या युनुस खानने सावध पवित्रा घेत भारतीय बॉलर्सना खेळून काढण्याचा पवित्रा घेतला. शफीकने हरभजनसिंगला बाऊंड्री मारली, पण नंतर मात्रं कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावर त्याने लक्षं केंद्रीत केलं. शफीक आरामात खेळत असताना युनुस खानला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. पटेलच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या नेहराच्या एकमेव ओव्हरनंतर धोणीने झहीर खानला बॉलिंगला आणलं आणि दुसर्‍या बाजूने हरभजनसिंगच्या ऐवजी आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये बॉलर म्हणून यशस्वी ठरलेल्या युवराज सिंगच्या हाती बॉल ठेवला. युवराजने अचूक बॉलिंग करत युनुस खानला पार जखडून टाकलं होतं. त्याच्या तिसर्‍या ओव्हरमध्ये...

अराऊंड द विकेट बॉलिंग टाकणार्‍या युवराजचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
शफीकने बॅकफूटवर जात बॉल कट् करण्याचा प्रयत्नं केला पण...
शफीकच्या अपेक्षेइतका बॉल शॉर्टपीच पडला नव्हता आणि टर्न न होता स्ट्रेट स्टंप्सवर गेला...
शफीकच मिडलस्टंप उडाला!

३९ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह शफी़कने ३० रन्स फटकावल्या.
तो आऊट झाला तेव्हा २४ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा स्कोर होता १०३ / ३!

शफीक परतल्यावर बॅटींगला आलेल्या मिसबाह उल हकने सावध पवित्रा घेत कोणतीही रिस्क न घेता बॅटींग करण्यावर लक्षं केंद्रीत केलं होतं. हरभजनच्या अचूक ओव्हरमध्ये केवळ ३ रन्स निघाल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये...

युवराजचा स्लो बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
युनुस खानने फ्रंटफूटवर येत ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केल...
युनुसच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित बाऊंस झाल्याने त्याचा शॉट हवेत गेला...
कव्हर्समध्ये सुरेश रैनाने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला मार्क निकोलस म्हणाला,
"Yuvraj Singh has got the Punjab going now! May be he's got India on the road to Mumbai!"

१३ रन्स काढण्यासाठी युनुस खानने ३२ बॉल्स खर्ची घातले होते.
पाकिस्तान १०६ / ४!

युनुस खान आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या उमर अकमलने सुरवातीला भारतीय बॉलर्सना खेळून काढत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. धोणीने हरभजनसिंगच्या ऐवजी नेहराला बॉलिंगला आणलं, पण मिसबाह - उमर अकमल यांनी त्याला सावधपणे खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. पण युवराजच्या बॉलवर मात्रं उमर अकमलने आक्रमक पवित्रा घेत क्रीजमधून पुढे सरसावत कव्हर्सवरुन बाऊंड्री ठोकली. आणखीन १ बॉलनंतर युवराजच्या शॉटपीच बॉलवर त्याने मिडविकेटला दणदणीत सिक्स ठोकली! नेहराच्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स निघाल्यावर युवराजच्या पुढच्या ओव्हरमध्ये उमर अकमलने क्रीजमधून पुढे सरसावत पुन्हा स्ट्रेट सिक्स ठोकली!

शेवटच्या १७ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ११९ रन्सची आवश्यकता होती!

उमर अकमलने आक्रमक पवित्रा घेत युवराजची धुलाई केल्यामुळे धोणीने त्याच्याऐवजी हरभजनसिंगला बॉलिंगला आणलं....

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या हरभजनसिंगचा पहिलाच बॉल मिडलस्टंपवर पडला...
उमर अकमलने बॅकफूटवर जात बॉल लेगसाईडला खेळण्याचा प्रयत्नं केला पण...
अकमलच्या अपेक्षेप्रमाणे बॉल टर्न न होता सरळ स्टंप्सवर गेला...
अकमलचा ऑफस्टंप उडाला!
अकमलचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना...

२४ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि युवराजला ठोकलेल्या २ सिक्ससह उमर अकमलने २९ रन्स फटकावल्या.
पाकिस्तान १४२ / ५!

उमर अकमल आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला अब्दुल रझाक आणि मिसबाह यांना रन्स काढणं कठीणच जात होतं. मुनाफ पटेल आणि हरभजनसिंगच्या ऐवजी बॉलिंगला परतलेला युवराज यांच्या २ ओव्हर्समध्ये केवळ ४ रन्स निघाल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये...

पटेलचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
अब्दुल रझाकने बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण...
पटेलचा चाणाक्षपणे टाकलेला लेगकटर टप्पा पडल्यावर सीम झाला...
मिडलस्टंपवर बॉल येईल या अपेक्षेत असलेल्या रझाकला पार फसला...
रझाकचा ऑफस्टंप उडाला...
रझाकला बसलेल्या धक्क्यातून तो सावरलाच नाही...

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला संजय मांजरेकर म्हणाला,
"Bowled him! Dream delivery from Munaf Patel! Razzaq looks shell shocked!"

रझाक आऊट झाल्यावर पाकिस्तानची अवस्था १५० / ६ अशी झाली.
पाकिस्तानच्या सर्व आशा आता मिसबाह उल हक आणि कॅप्टन शाहीद आफ्रिदी यांच्यावर होत्या.

आफ्रीदीने नेहमीप्रमाणे आक्रमक पवित्रा घेत युवराजला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. युवराजच्या पुढच्या ओव्हरमध्ये इतका वेळ सावधपणे खेळणार्‍या मिसबाहने रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री मारली. आणखीन एक बॉलनंतर...

युवराजचा लेगस्टंपवर पडलेला बॉल आफ्रिदीने मिडविकेटला उचलला...
मिडविकेटला आशिश नेहराने धावत येऊन कॅच घेण्यासाठी डाईव्ह मारली!
बॉल नेहराच्या हातात आलेला पाहून भारतीय खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी जल्लोष केला पण...
नेहराने प्रामाणिकपणे आपण कॅच घेतल्याबद्दल खात्री नसल्याचं स्पष्टं केलं...

टीव्ही रिप्लेमध्ये त्याने बॉल हाफव्हॉलीवर उचलल्याचं दिसून आलं पण नेहरा चक्कं डाईव्ह मारतो हे दुर्मिळ दृष्यं मोहालीवरच्या प्रेक्षकांना पाहण्यास मिळालं!

९ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला अद्याप ८० रन्स बाकी होत्या!
आश्चर्याची गोष्टं म्हणजे मिसबाह आणि आफ्रिदी क्रीजवर असतानाही पाकिस्तानने अजूनही बॅटींग पॉवरप्ले घेतलेला नव्हता!

धोणीने युवराजच्या ऐवजी हरभजनसिंगला बॉलिंगला आणलं. हरभजनच्या पहिल्या ४ बॉल्समध्ये ३ रन्स निघाल्यावर...

हरभजनसिंगचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आलेला फुलटॉस होता...
आफ्रीदीने तो मिडविकेटवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला...
आफ्रीदीच्या बॅटची टॉप एज लागून बॉल ऑफसाईडला हवेत उडाला...
कव्हर्समध्ये वीरेंद्र सेहवागने अत्यंत शांतपणे कॅच घेतला!
पाकिस्तान १८४ / ७!

आफ्रीदी आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या वहाब रियाझने नेहराला मिडविकेटला बाऊंड्री मारली. हरभजनच्या पुढच्या ओव्हरमध्ये मिसबाहने पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर करत बाऊंड्री फटकावली. पण मिसबाह - रियाझ यांनी १५ रन्स फटकावल्यावर नेहराचा बॉल लेगसाईडला फटकावण्याच्या नादात रियाझच्या बॅटची एज लागली आणि कव्हर्समध्ये सचिनने त्याचा कॅच घेतला. पाकिस्तान १९९ / ८!

५ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ६१ रन्स हव्या होत्या!

इनिंग्जच्या शेवटच्या ५ ओव्हर्स राहिल्यामुळे पाकिस्तानला बॅटींग पॉवरप्ले घेण्यावाचून पर्याय उरला नाही. हरभजनसिंगच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या झहीर खानच्या पहिल्याच बॉलवर मिसबाहने स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली पण नेहराच्या पुढच्या ओव्हरमध्ये...

नेहराचा फुलटॉस लेगला फ्लिक करण्याचा उमर गुलचा प्रयत्नं फसला आणि बॉल त्याच्या पॅडवर आदळला...
नेहराने एलबीडब्ल्यूचं जोरदार अपिल केलं...
अंपायर सायमन टॉफेलचं बोट वर झालं...
गुलने डीआरएसचा आधार घेत टॉफेलच्या निर्णयाविरुद्ध थर्ड अंपायर बिली बाऊडेनकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये बॉल लेगस्टंपस्मोर गुलच्या पॅडवर लागल्याचं आणि मिडलस्टंपवर जात असल्याचं स्पष्टं झालं...
पाकिस्तान २०८ / ९!

३ ओव्हर्समध्ये अद्याप पाकिस्तानला ५१ रन्सची आवश्यकता होती!

चार वर्षांपूर्वी २००७ मध्ये ट्वेंटी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये साधारण अशाच परिस्थितीतून मिसबाहने पाकिस्तानला विजयाच्या मार्गावर आणलं होतं, पण अगदी शेवटच्या क्षणी तो आऊट झाल्यामुळे पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा तशाच परिस्थितीत मिसबाह काय करु शकणार होता?

४८ व्या ओव्हरमध्ये झहीर खानच्या पहिल्याच बॉलवर पाकिस्तानला ५ वाईड्सचा बोनस मिळाला. त्याच ओव्हरमध्ये मिसबाहने कव्हर्स आणि मिडऑनवरुन दोन बाऊंड्री तडकावल्या, पण पाकिस्तानच्या दृष्टीने आता वेळ टळून गेलेली होती. पुढच्या ओव्हरमध्ये मिसबाहने मुनाफ पटेलला लाँगऑनवरुन दणदणीत सिक्स ठोकली, पण हा अपवाद वगळता उरलेल्या ओव्हरमध्ये त्याला काहीच करता आलं नाही.

शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला ३० रन्स हव्या होत्या!
आता काही चमत्कार झाला तरंच पाकिस्तान मॅच जिंकण्याची शक्यता होती!

झहीरचा पहिला बॉल मिसबाहने लाँगऑफला ड्राईव्ह केला, पण १ रन काढण्यास नकार दिला...

५ बॉल्स - ३० रन्स!

मिसबाहला आता प्रत्येक बॉलवर सिक्स मारण्यावाचून पर्याय नव्हता!
.... पण पुढच्या ३ बॉल्समध्ये त्याला एकही रन काढता आली नाही...

२ बॉल्स - ३० रन्स!

झहीरचा पाचवा बॉल मिडलस्टंपवर पडला...
मिसबाहने सिक्स ठोकण्याच्या हेतूने तो मिडऑनवरुन उचलला पण...
लाँगऑनला विराट कोहलीने त्याचा आरामात कॅच घेतला!
पाकिस्तान २३१ ऑल आऊट!

मिसबाह उल हकने ७६ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि पटेलला मारलेल्या सिक्ससह ५६ रन्स फटकावल्या!
.... पण पाकिस्तानच्या पदरी अखेर पराभवच आला होता!

भारत वर्ल्डकप फायनलमध्ये धडकला!

मॅच संपल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये आफ्रीदीने पराभवाचं खापर बॅटींग आणि फिल्डींगवर फोडलं.
"Wahab bowled well today, but we missed some opportunities. We didn't make partnerships, we played some irresponsible shots, and a partnership was crucial. They played better than us. We missed Sachin about 4 - 5 times but as I said earlier, we didn’t let him get 100th hundred today!"

महेंद्रसिंग धोणी म्हणाला,
"We got off to a fantastic start through Sehwag and Sachin. As the game progressed the wicket got slower, and in the middle overs it was difficult to score. It was turning, we read the wicket wrong and that's why we went with three seamers, but in the end the seamers bowled really well too. We don't have bowlers who can bowl 140 plus, overall we really on what you might call deception - change of length, line and pace. Zaheer did really well, with his experience!"

वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवर हा ५ वा विजय होता!

मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली ती १९९२ मधल्या पहिल्या मॅचपासून पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक मॅचमध्ये खेळलेला एकमेव खेळाडू असलेल्या सचिन तेंडुलकरची!

सचिन म्हणाला,
"When we started I was thinking of 310 to 315, whch was par score for me, but the way the ball started stopping and spinning, something closer to 270 was par. We just had to make sure we got to a decent, fighting total."

पाकिस्तानच्या इनिंग्जमध्ये सुरवातीला अतिसावध पवित्रा घेत खेळल्याबद्दल मिसबाह उल हकवर टीकेची झोड उठवण्यात आली. ही टीका सर्वस्वी चुकीची नसली तरी काही अंशी अनाठायी मात्रं नक्कीच होती. मिसबाह एका बाजूने 'अँकर' म्हणून खेळत असताना दुसर्‍या बाजूने बॅट्समननी आक्रमक फटकेबाजी करणं अपेक्षित होतं. उमर अकमलने काही काळ नेमका हाच पवित्रा घेतला होता, पण तो आणि आफ्रिदी परतल्यावर मिसबाहच्या जोडीला कोणी बॅट्समन उरलाच नाही. सर्वात वादाचा मुद्दा होता तो म्हणजे मिसबाह आणि आफ्रिदी बॅटींग करत असताना त्यांनी बॅटींग पॉवरप्ले का घेतला नाही? परंतु मुळात पाकिस्तानला २६१ रन्सचं टार्गेट देण्यात भारताला यश आलं याचं सर्वस्वी कारण होतं ते म्हणजे पाकिस्तानची अत्यंत गचाळ फिल्डींग! सचिनसारख्या बॅट्समनचे ४ कॅचेस सोडणं केव्हाही अक्षम्यं होतं. सचिन २७ वर असताना मिसबाहने त्याचा कॅच घेतला असता तर कदाचित मॅचचा निकाल वेगळा लागू शकला असता.

सईद अजमलने पाकिस्तानात परतल्यावर सचिनविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं अपिल फेटाळणार्‍या हॉक-आय वरच शंका व्यक्तं केली!

अजमल म्हणाला,
"I don't know how the television replays showed my delivery turning towards the leg side because I had bowled an arm ball and it went straight. I was 110% confident when the referral was made that the batsman was out."

अजमलच्या हा दावा हॉक-आय कंपनीने साफ फेटाळून लावला. Guardian वृत्तपत्राशी बोलताना हॉक-आय इनोव्हेशन्सचा स्टीफन कार्टर म्हणाला,
"The path Hawk-Eye showed was accurate and the Decision Review System was used correctly to overturn the umpire's original decision. The Hawk-Eye track lines up perfectly with the video of the real ball from release to impact point. The commentators said on air that Tendulkar had been 'caught on the crease'. From the front-on angle it does look like Tendulkar has been hit when batting in his crease. However, Tendulkar was almost two metres out of his crease when struck."

सेमीफायनलच्या आदल्या दिवशी ही मॅच फिक्स असल्याचा आणि मॅचमध्ये भारताचा पराभव होणार असल्याचा रिटायर्ड इन्कम टॅक्स कमिशनर विश्वबंधू गुप्ता यानी दावा केला होता. भारताने मॅच जिंकल्यावर तोंडावर आपटलेले हे गुप्ता महाशय हवेत विरुन गेल्याप्रमाणे गायब झाले.

२०११ च्या वर्ल्डकपनंतर ४ वर्षांनी २०१५ मध्ये ब्रिटीश पत्रकार एड हॉकीन्स याने Bookie Gambler Fixer Spy: A journey to the corrupt heart of cricket betting या आपल्या पुस्तकात ही मॅच फिक्स असल्याचा दावा केला. परंतु आयसीसीने याचं खंडन करत हॉकीन्सचा हा दावा साफ फेटाळून लावला.

क्रीडालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

7 Mar 2017 - 1:00 pm | तुषार काळभोर

एकतर त्यात आंतरराष्ट्रीय राजकारण घुसवलेलं!
त्यात मॅच मध्ये 'तो' एक्स फॅक्टर जाणवलाच नाही! सारखं असं वाटत राहिलं की जणू पाकिस्तानचा संघ जिंकण्यासाठी खेळतच नाहीये!

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2017 - 1:00 pm | श्रीगुरुजी

हा सामना म्हणजे सचिनच्या कारकीर्दीवर लागलेला एक बट्टा होता. त्याचे तब्बल ४ झेल सुटले. तो शून्यावर असताना दुसर्‍याच षटकात धावबाद होताहोता थोडक्यात वाचला कारण मिडऑनवरून वहाबने नॉनस्ट्रायकरच्या यष्ट्यांवर मारलेला चेंडू यष्ट्यांवर न लागता यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला तेव्हा सचिन क्रीजपासून किमान १ मीटर मागे होता.

नंतर सईद अजमलच्या लागोपाठ दोन चेंडूंवर तो बाद होताना वाचला. पहिल्यांदा चेंडू पॅडवर आदळल्यानंतर पंचांनी त्याला बाद दिले होते. परंतु सचिनने रिव्ह्यू मागितल्यानंतर चेंडू लेगच्या बाहेर जाताना दिसल्याने सचिनला नाबाद ठरविण्यात आले. खरं तर याआधी सेहवागला बाद दिल्यानंतर सेहवागने रिव्ह्यू मागून तो वाया घालविला होता कारण सेहवाग बाद असल्याचे रिव्ह्यूत स्पष्ट दिसले होते. त्यामुळे एकच रिव्ह्यू शिल्लक राहिला होता. सचिनचा रिव्ह्यू वाया गेला असता तर भारताकडे उर्वरीत डावासाठी रिव्ह्यू शिल्लक राहिले नसते. सेहवागने अंतिम सामन्यातही रिव्ह्यू वाया घालविला होता. भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर डावाचा दुसराच चेंडू मलिंगाने यॉर्कर लेंथचा टाकला. सेहवागने तो सरळ बॅटने खेळण्याऐवजी ऑफला सरकून स्क्वेअरलेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या पायावर आदळला तेव्हा त्याचा पाय अगदी मधल्या यष्टीसमोर होता. पंचांनी सेहवागला बाद दिल्यावर समोर उभा असलेल्या सचिनशी सल्लामसलत न करताच सेहवागने रिव्ह्यू मागून तो वाया घालविला.

अजमलच्या दुसर्‍या चेंडूवर सचिनविरूद्ध यष्टीचितचे अपील झाल्यावर रिव्ह्यूमध्ये चेंडू यष्ट्यांवर मारण्याआधी जेमतेम काही सेकंद त्याचा पाय क्रीजमध्ये टेकल्याचे दिसल्यामुळे पुन्हा एकदा सचिन वाचला.

एकंदरीत त्या सामन्यात सचिन ७ वेळा बाद होताहोता वाचला.

भारताची फलंदाजी विचित्र पद्धतीने झाली. पहिल्या ५ षटकांत भारताची धावगती ९ पेक्षा अधिक होती. १० षटके संपली तेव्हा धावगती ७.३ इतकी खाली आली होती. १५ षटकानंतर ६.६, २० नंतर ५.९५ , २५ नंतर ५.६४, ३० नंतर ५.६०, ३५ नंतर ५.२०, ४० नंतर ५.०० व ४४ षटकांनंतर भारताने ४.८४ धावगतीने फक्त ६ बाद २१३ इतक्याच धावा केल्या होत्या. एकंदरीत पाकिस्तानी गोलंदाजांनी उत्कॄष्ट गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना चांगलीच वेसण घातली होती. विशेषतः षटक क्रमांक ११ ते षटक क्रमांक ४४ या ३४ षटकात भारताने फक्त १४० धावा केल्या होत्या व ५ गडी गमावले होते (धावगती ४.११). दुर्दैवाने पाकिस्तानचे क्षेत्ररक्षं अत्यंत गचाळ झाले व त्यामुळेच त्यांना सामना गमवावा लागला.

४४ षटकांनंतर भारताने पॉवरप्ले घेतल्यानंतर पॉवरप्लेच्या ५ षटकांत विशेषतः रैनाच्या वेगवान फलंदाजीमुळे भारताने ४३ धावा केल्या. परंतु शेवटच्या ५० व्या षटकात भारताने २ गडी गमावून फक्त ४ धावा केल्याने भारताला ५० षटकात फक्त २६० धावा करता आल्या (धावगती ५.२०). म्हणजे ९.४० धावगतीने सुरूवात करून सुद्धा भारताला जेमतेम ५.२० इतकीच धावगती गाठता आली.

जर पाकिस्तानचे सचिनचे झेल न सोडता लवकर बाद केले असते तर भारताला २०० धावांचा टप्पा सुद्धा ओलांडता आला नसता.

सामनावीर खरं तर वहाब रियाझ असायला हवा होता. सचिनची ८५ धावांची खेळी अत्यंत लाजिरवाणी होती.

अभिजीत अवलिया's picture

11 Mar 2017 - 3:42 pm | अभिजीत अवलिया

सामनावीर खरं तर वहाब रियाझ असायला हवा होता. सचिनची ८५ धावांची खेळी अत्यंत लाजिरवाणी होती.
--- सहमत. सचिनला धावा काढण्यासाठी इतके झगडताना कधीही पाहिले न्हवते. पराभूत झाले असले तरी वहाब सामनावीर असायला होता होता कारण त्याने त्या सामन्यात केलेली गोलंदाजी खूपच उत्कृष्ट होती.

diggi12's picture

16 Oct 2021 - 12:44 am | diggi12

मस्त t20 world cup वर पन अशी मालिका येऊ दया