१६ ऑक्टोबर १९८७
गद्दाफी, लाहोर
लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयममध्ये यजमान पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात ग्रूप बी मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा फडशा पाडला होता, पण सेमीफायनल गाठण्याच्या दृष्टीने ही मॅच जिंकणं वेस्ट इंडीजला अत्यावश्यक होतं. १९८४ - ८५ चा मोसमात क्लाईव्ह लॉईड रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीजच्या संघाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आली होती व्हिव्हियन रिचर्ड्सकडे! लॉईडप्रमाणेच वेस्ट इंडीजच्या संघातले अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, जोएल गार्नर हे फास्ट बॉलर्सही रिटायर झालेले होते तर माल्कम मार्शल दुखापतीमुळे वर्ल्डकपमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला होता.
रिचर्ड्सच्या संघात स्वतः रिचर्ड्स, डेस्मंड हेन्स, रिची रिचर्ड्सन, गस लोगी, कार्ल हूपर असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला जेफ दुजाँसारखा विकेटकीपर होता. वेस्ट इंडीजच्या बॉलिंगचा मुख्य भार होता आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये ग्रॅहॅम गूचसारख्या अनुभवी बॅट्समनलाही धडकी भरवणार्या पॅट्रीक पॅटरसनवर. पॅटरसनच्या जोडीला कॉर्टनी वॉल्श, एल्डीन बॅप्टीस्ट, रॉजर हार्पर असे बॉलर्स होते. हेन्सच्या जोडीला फिल सिमन्सला या मॅचमध्ये वन डे मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार मानला जात होता. पाकिस्तानच्या संघात रमिझ राजा, मन्सूर अख्तर, सलिम मलिक, जावेद मियांदाद, एजाझ अहमद असे बॅट्समन आणि अब्दुल कादीर, वासिम अक्रम, तौसिफ अहमद, सलीम जाफर अशा बॉलर्सचा समावेश होता. सलिम युसुफसारखा विकेटकीपर बॅट्समनही पाकिस्तानच्या संघात होता, पण पाकिस्तानचा प्रमुख आधारस्तंभ होता तो कॅप्टन इमरान खान!
रिचर्ड्सने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्याच वन डे मध्ये खेळणार्या फिल सिमन्सने आक्रमक पवित्रा घेत सुरवातीपासूनच फटकेबाजीला सुरवात केली. अनुभवी डेस्मंड हेन्सने स्ट्राईक रोटेट करत त्याला साथ देण्याचा मार्ग पत्करला होता. हेन्स - सिमन्स यांनी २२ ओव्हर्समध्ये ९१ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचल्यावर तौसिफ अहमदचा फुलटॉस फ्लिक करण्याच्या नादात सिमन्सची लिडींग एज लागली आणि तौसफनेच त्याचा कॅच घेतला. वन डे पदार्पणात ५७ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह सिमन्सने ५० रन्स तडकावल्या पण सिमन्सची फटकेबाजी सुरु असताना हेन्सला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. अखेर ८१ बॉल्समध्ये ३७ रन्स काढल्यावर सलिम जाफरला फटकावण्याच्या नादात हेन्स बोल्ड झाला. वेस्ट इंडीज ९७ / २!
रिची रिचर्ड्सन आणि कॅप्टन रिचर्ड्स यांनी २१ रन्स जोडल्यावर जाफरच्या बॉलवर रिचर्ड्सनने मारलेला पिकअप शॉट मिडविकेट बाऊंड्रीवर एजाज अहमदच्या हातात गेला.
रिचर्ड्सन परतल्यावर बॅटींगला आलेल्या गस लोगीलाही जाफरने फ्लिकच्याच ट्रॅपमध्ये अडकवलं. स्क्वेअरलेग अंपायरशेजारी असलेल्या तौसिफ अहमदने आरामात त्याचा कॅच घेतला. वेस्ट इंडीज १२१ / ४!
रिचर्ड्स आणि कार्ल हूपर यांनी वेस्ट इंडीजची इनिंग्ज सावरली. हूपरने कादीरला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. रिचर्ड्सने तौसिफच्या फुलटॉसवर लाँगऑनला सिक्स तडकावली. कोणतीही रिस्क न घेता पाकिस्तानी स्पिनर्सना फटकावत या दोघांनी ४८ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं पाकिस्तानला त्रासदायक ठरणार असं वाटत असतानाच वासिम अक्रमने हूपरला एलबीडब्ल्यू केलं. वेस्ट इंडीज १६९ / ५!
हूपरच्या जागी जेफ दुजाँ बॅटींगला आल्यावर रिचर्ड्सने फटकेबाजीला सुरवात केली. वेस्ट इंडीजला गुंडाळण्याच्या हेतूने बॉलींगला आलेल्या इमरानच्या यॉर्करला त्याने मिडविकेला बाऊंड्री ठोकली. पुढच्याच ओव्हरमध्ये अक्रमचा लेगस्टंपवर पडलेला यॉर्कर रिचर्ड्सने लेगसाईडला सरकत खास रिचर्ड्स स्टाईलमध्ये एक्स्ट्राकव्हर बाऊंड्रीवर तडकावला! पाकिस्तानच्या बॉलर्सची तो चांगलीच धुलाई करणार असं वाटत असतानाच अक्रमप्रमाणेच इमरानला कव्हर्समधून फटकावण्याचा रिचर्ड्सचा प्रयत्नं फसला आणि कव्हर्समध्ये सलिम मलिकने त्याचा कॅच घेतला.
५२ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि तौसिफला मारलेल्या सिक्ससह रिचर्ड्सने ५१ रन्स फटकावल्या.
वेस्ट इंडीज १८४ / ६!
पुढच्याच बॉलवर इमरानचा बॉल फ्लिक करण्याच्या नादात मिडऑनला मन्सूर अख्तरने रॉजर हार्परचा कॅच घेतला!
एल्डीन बॅप्टीस्टने इमरानची हॅटट्रीक होणार नाही याची खबरदारी घेतली. दुजाँ - बॅप्टीस्ट यांनी १२ रन्स जोडल्यावर अक्रमच्या बॉलवर दुजाँ एलबीडब्ल्यू झाला. अक्रमचा यॉर्कर कॉर्टनी वॉल्शच्या बॅटची इनसाईड एज घेऊन बाऊंड्रीपार गेला. इमराननेच वॉल्शला एलबीडब्ल्यू केलं. लास्ट्मन पॅट्रीक पॅटरसन बॅटींगला आल्यावर बॅप्टीस्टने फटकेबाजीला सुरवात केली. इमरानला त्याने स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली, पण इमराननेच त्याला एलबीडब्ल्यू करुन पाकिस्तानची इनिंग्ज संपुष्टात आणली.
४९.३ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीज २१६ मध्ये ऑलआऊट झाले होते!
रमिझ राजा आणि मन्सूर अख्तर यांनी सावध पवित्रा घेत वेस्ट इंडीयन बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं. या दोघांनी ८ ओव्हर्समध्ये २३ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर पॅटरसनने अख्तरला बोल्ड केलं. सलिम मलिकने वॉल्शला बाऊंड्री तडकावत आक्रमक सुरवात केली खरी, पण वॉल्शचाच बॉल फ्लिक करण्याच्या नादात त्याची लिडींग एज लागली आणि मिडऑनला बॅप्टीस्टने त्याचा आरामात कॅच घेतला. पाकिस्तान २८ / २!
मलिक परतल्यावर रमिझ आणि जावेद मियांदाद यांनी आक्रमक फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्स घेण्यावर भर दिला. कोणतीही रिस्क न घेता वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना आरामात खेळून काढत दोघांनी ६४ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं पाकिस्तानला सहज मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच रॉजर हार्परचा बॉल पूल करण्याचा रमिझचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेटला डाईव्ह मारत रिचर्ड्सने त्याचा कॅच घेतला. ८७ बॉल्समध्ये एकमेव बाऊंड्रीसह रमिझने ४२ रन्स काढल्या होत्या. पाकिस्तान ९२ / ३!
रमिझ आऊट झाल्यावर आलेला एजाज अहमद आणि मियांदाद यांनी पाकिस्तानचा स्कोर १०४ पर्यंत नेल्यावर वॉल्शला ड्राईव्ह करण्याच्या नादात एजाजचा ऑफस्टंप उडाला. पण पाकिस्तानला खरा धक्का बसला तो आणखीन ६ रन्सची भर पडल्यावर. कार्ल हूपरला ऑनड्राईव्ह मारण्याच्या नादात मियांदादने त्याच्याच हातात कॅच दिला! ७२ बॉल्समध्ये मियांदादने ३२ रन्स केल्या. पाकिस्तान ११० / ५!
मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या १५ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला १०५ रन्सची आवश्यकता होती!
विकेटकीपर सलिम युसुफने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. हार्पर आणि हूपरनी अचूक बॉलिंग करत रन्स जाणार नाहीत याची काळजी घेतली, पण पॅटरसन - वॉल्श - बॅप्टीस्ट यांना मात्रं युसुफने बाऊंड्री ठोकल्या. युसुफची फटकेबाजी सुरु असताना इमरान चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता. युसुफच्या अनपेक्षित फटकेबाजीमुळे गोंधळलेल्या बाप्टीस्टच्या बॉलवर सिमन्सने मिडऑनला त्याचा कॅच ड्रॉप केला. त्याच ओव्हरमध्ये पुन्हा एकदा युसुफने मारलेला बॉल मिडविकेट बाऊंड्रीवर पॅटरसन आणि हूपरच्या मध्ये पडल्यामुळे तो वाचला. इमरान - युसुफ यांच्या ७३ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये इमरानच्या फक्तं १७ रन्स होत्या! अखेर वॉल्शच्या बॉलवर स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर लोगीने इमरानचा कॅच घेतला. पाकिस्तान १८३ / ६!
इमरान परतल्यावरही युसुफची फटकेबाजी सुरुच होती. युसुफ - वासिम अक्रम यांनी पाकिस्तानचा स्कोर २०० पर्यंत नेल्यावर युसुफने वॉल्शला चक्कं स्वीप मारण्याचा प्रयत्नं केला(!) पण वॉल्शच्या स्लो बॉलमुळे त्याचा हा प्रयत्नं पार फसला आणि स्क्वेअरलेगला हूपरने त्याचा कॅच घेतला. ४९ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री तडकावत युसुफने ५६ रन्स फटकावल्या होत्या. युसुफच्या आक्रमक फटकेबाजीमुळे जवळपास गमावलेल्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या विजयाची आशा निर्माण झाली होती!
शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये पाकिस्तानला मॅच जिंकण्यासाठी १७ रन्सची आवश्यकता होती!
पॅटरसनच्या ४९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अक्रमला काहीच करता आलं नाही..
दुसर्या बॉलवर पॅटरसनला फटकावण्याच्या नादात लाँगऑफ बाऊंड्रीवर रिची रिचर्ड्सनने अक्रमचा कॅच घेतला!
रिचर्डसनने अक्रमचा कॅच घेईपर्यंत क्रॉस झालेल्या कादीरने तिसर्या बॉलला एक रन घेतली.
पॅटरसनचा चौथा बॉल...
तौसिफने पॅटरसनचा बॉल ड्राईव्ह केला आणि तो धावत सुटला...
पॅटरसनने फॉलो थ्रूमध्ये डाईव्ह घेत बॉल अडवला, पण तो त्याच्या पासून दूर गेला...
कव्हर्समध्ये असलेल्या हेन्सने बॉल पिकअप केला...
कादीरच्या परत फिरण्याच्या सूचनेकडे दुर्लक्षं करुन धावत सुटलेल्या तौसिफला धोक्याची जाणिव होताच तो मागे फिरला पण...
हेन्सचा थ्रो कलेक्ट करुन दुजाँने आरामात बेल्स उडवल्या होत्या!
पाकिस्तान २०३ / ९!
तौसिफ आऊट झाल्यावर बॅटींगला आला पाकिस्तानचा शेवटचा बॅट्समन सलिम जाफर!
वर्ल्ड्कपमधल्या सर्वात वेगवान बॉलर असलेल्या पॅटरसनसमोर जाफरचा कितपत निभाव लागेल याबद्दल शंकाच होती...
पण पॅटरसनच्या ओव्हरचे शेवटचे दोन बॉल्स जाफरने खेळून काढले!
शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला मॅच जिंकण्यासाठी १४ रन्सची आवश्यकता होती!
ही ओव्हर टाकण्याची जबाबदारी आली कॉर्टनी वॉशवर!
वॉल्शच्या पहिल्याच बॉलवर कादीरने एक रन काढली...
सलिम जाफर स्ट्राईकवर येताच पाकिस्तानी प्रेक्षक निराश झाले. जाफर वॉल्शइतकाच 'उत्तम' बॅट्समन होता.
...पण वॉल्शचा बॉल कव्हर्समध्ये ढकलून जाफरने धूम ठोकली आणि १ रन काढण्यात तो यशस्वी झाला!
अद्याप ४ बॉल बाकी होते. पाकिस्तानला १२ रन्सची आवश्यकता होती.
वॉल्शचा तिसरा बॉल कादीरने लाँगऑनला तडकावला आणि एक रन पूर्ण केली.
लाँगऑनवरुन आलेला पॅटरसनचा थ्रो कलेक्ट करताना बॉल वॉल्शच्या हातातून सुटला...
कादीर आणि जाफरने या संधीचा फायदा घेत आणखीन एक रन ढापली!
शेवटच्या ३ बॉलमध्ये पाकिस्तानला १० रन्स हव्या होत्या!
वॉल्शच्या ओव्हरचा चौथा बॉल...
कादीर तिन्ही स्टंप्स सोडून लेगसाईडला सरकला...
...आणि वॉल्शच्या अचूक लेंग्थवर पडलेल्या बॉल त्याने जीव खाऊन लाँगऑफला तडकावला...
स्वत: कादीरलाही अपेक्षा नसेल इतका त्याचा शॉट अचूक बसला होता...
बॉल लाँगऑफ बाऊंड्रीपार गेला!
व्हिव्हियन रिचर्ड्सच्या स्टाईलमध्ये कादीरने वॉल्शला सिक्स मारली होती!
२ बॉल ४ रन्स!
वॉल्शचा पाचवा बॉलही कादीरने पुन्हा लेगसाईडला बाहेर जात कव्हर्समध्ये फटकावला..
कव्हर्स बाऊंड्रीवरुन बॅप्टीस्टचा थ्रो येण्यापूर्वी कादीर - जाफर यांनी २ रन्स काढल्या!
शेवटच्या बॉलवर पाकिस्तानला २ रन्सची आवश्यकता होती!
१ रन काढल्यास मॅच टाय झाली असती!
"चाहे कुछ भी हो, भाग!" कादीरने जाफरला बजावलं!
शेवटचा बॉल टाकण्यासाठी वॉल्श रनअप घेऊन क्रीजमध्ये आला...
कादीरच्या सूचनेप्रमाणे जाफर धावत सुटला होता...
वॉल्शने बॉल टाकण्यापूर्वीच...
वॉल्श बॉल टाकण्याऐवजी तिथेच थांबला...हाताची घडी घालून अगदी शांतपणे!
जाफर धडपडत क्रीजमध्ये परतला.
मनात आणलं असतं तर वॉल्श जाफरला रनआऊट करु शकला असता...
क्रिकेटच्या इतिहासातल्या आणखीन एका 'मंकडींग'ची नोंद झाली असती.
पण खिलाडू वृत्तीच्या वॉल्शला ते मंजूर नव्हतं!
सलिम जाफरला केवळ वॉर्निंग देऊन तो पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कच्या दिशेने परतला!
वॉल्शचा शेवटचा बॉल फुलटॉस होता...
कादीरने बॉल थर्डमॅनच्या दिशेने मारला आणि २ रन्स काढल्या...
शेवटच्या बॉलवर १ विकेटने पाकिस्तानने मॅच जिंकली!
वॉल्शच्या खिलाडू वृत्तीचं पत्रकारांनी, खासकरुन पाकिस्तानी वृत्तपत्रांनी खूप कौतुक केलं. इतकंच नव्हे तर खुद्दं झिया-उल-हक यानी वॉल्शला एक उत्तम प्रतिचा गालिचा भेट म्हणून दिला!
सलीम जाफर म्हणतो,
“I was let off with the warning by the Courtney Walsh. We went on to win the match while the defeat cost the West Indies a place in the semi-final. But that was the true spirit of the game.”
पाकिस्तानविरुद्धचा हा पराभव वेस्ट इंडीजसाठी घातक ठरला!
इंग्लंड आणि पाकिस्तानपेक्षा जास्तं चांगला रनरेट असूनही या पराभवामुळे सेमीफायनल गाठण्यात वेस्ट इंडीजला अपयश आलं!
वॉल्शने जाफरला रनआऊट करुन ही मॅच जिंकली असती तर...
पाकिस्तानच्या जोडीला वेस्ट इंडीज सेमीफायनलमध्ये आले असते...
कदाचित भारत - ऑस्ट्रेलिया अशी फायनल झाली असती...
कदाचित भारताने १९८३ प्रमाणेच १९८७ मध्येही वर्ल्डकप जिंकला असता..
परंतु खिलाडू वृत्तीचा आणि Gentlemen’s Game म्हणून ओळखल्या जाणार्या क्रिकेटच्या खेळाचा पराभव झाला असता..
तो झाला नाही हेच योग्यं झालं!
सलिम युसुफला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला तरी या मॅचचा खरा हिरो होता कॉर्टनी वॉल्शच!
प्रतिक्रिया
10 Feb 2017 - 10:15 am | गॅरी ट्रुमन
मस्त. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत खिळवून ठेवलेल्या मॅचमधील ही एक मॅच होती. या मॅचमधील अगदी प्रत्येक बॉल मी बघितलेला होता. पाकिस्तानी क्रिकेटपटू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडत नाहीत आणि जीव तोडून खेळायचे (मॅचफिक्सिंग नावाचा कलंक क्रिकेटला लागायच्या आधीचा हा काळ होता) हे जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर मारलेल्या सिक्समुळे आणि मार्च १९८७ च्या भारताविरूध्दच्या बंगलोर टेस्टमुळे कळलेच होते. या मॅचमुळे त्या समजावर अगदी शिक्कामोर्तब झाले होते. त्यामु़ळेच नंतर पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरूध्दची सेमीफायनल काहीही करून जिंकेल असेच शेवटपर्यंत वाटत होते.
तौसिफ अहमद हा त्या काळातील एक चांगला स्पीनर होता. त्याने खूप विकेट घेतल्या आणि नंतर शेन वॉर्न किंवा अनिल कुंबळेसारख्या उंचीला पोहोचला नाही. पण आयत्या वेळी तो एखादी विकेट काढून पाकिस्तानचे हातातून चाललेल्या सामन्यात नियंत्रण आणून द्यायचा. या सामन्यातही फिल सिमॉन्स चांगला सेट झालेला असताना त्याची विकेट तौसिफनेच घेतली होती. मार्च १९८७ च्या भारताविरूध्दच्या बंगलोर टेस्टमध्ये पहिल्या डावात ५ आणि दुसर्या डावात ४ विकेट्स त्याने घेतल्या होत्या. विशेषतः दुसर्या डावात दिलीप वेंगसरकरला त्याने त्रिफळाचीत केले आणि धोकादायक ठरणार्या रॉजर बिन्नीलाही आयत्या वेळी त्याने आऊट केले होते.
10 Feb 2017 - 10:38 am | गॅरी ट्रुमन
पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत झुंजत राहतो हा माझा विश्वास त्याकाळी दृढमूल झाला होता त्यासाठी आणखी एक कारण होते. या पाकिस्तान विरूध्द वेस्ट इंडिज सामन्याच्या ३-४ दिवस आधी पाकिस्तान विरूध्द इंग्लंड हा सामना रावळपिंडीमध्ये झाला होता. एक वेळ अशी आली होती की माईक गॅटिंग आणि अॅलन लॅम्ब हे दोघे खंदे वीर मैदानात होते. इंग्लंडसाठी विजय पन्नास एक धावा दूर होता आणि तीनच विकेट्स गेलेल्या होत्या. अशावेळी इंग्लंड किती विकेट्स राखून आणि ५० ओव्हरपूर्वी किती आधी जिंकणार हाच प्रश्न होता. पण तरीही पाकिस्तानच्या बॉलर्सनी आशा सोडली नाही. सलीम जाफरने गॅटिंगला आऊट केले आणि त्यानंतर अॅलन लॅम्बही परतला आणि एकेक करून इंग्लंडचे फलंदाज तंबूत परतू लागले. कोणतीही विकेट पडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा जिगर दाखविणारा जल्लोष (आणि ते खेळत असलेला झिम्मा) खरोखरच जबरदस्त होता. शेवटी ही मॅचही पाकिस्तानने जिंकली होती.
थोडे विषयांतर होत आहे पण १९९७ मध्ये शारजात पाकिस्तान विरूध्द झिम्बाब्वे सामन्यातही पाकिस्तानची ७ बाद ४० अशी अवस्था झाली होती. अशावेळी मोईन खानने किल्ला लढविला आणि पाकिस्तानला सर्वबाद होऊ न देता १५० पर्यंत पोहोचवले. आणि त्यानंतर वसिम अक्रम आणि इतरांनी झिंबाब्वेला गुंडाळून तो सामना जिंकला. पाकिस्तान ७ बाद ४० असताना हा सामनाही पाकिस्तान जिंकू शकेल असे फार कोणाला वाटले नसावे.
10 Feb 2017 - 7:23 pm | गामा पैलवान
गॅरी ट्रुमन,
पाकिस्तानी खेळाडू चिवटपणे शेवटपर्यंत लढंत राहतात ही तुमची धारणा बरोबर आहे. इमरानखानाने ही जिद्द निर्माण केली. मात्र त्याच बरोबर त्याने बुचाने चेंडू कुरतडणे इत्यादी अश्लाघ्य कृत्येही केली. अर्थात, प्रस्तुत सामन्यात असं घडलं असेलंच असं खात्रीने सांगता येत नाही.
आ.न.,
-गा.पै.
10 Feb 2017 - 7:37 pm | चौकटराजा
पाकिस्तानचे तळाचे फलंदाज अनेक वेळा खरे योद्धे ठरलेले आहेत.
10 Feb 2017 - 12:42 pm | सिरुसेरि
छान वर्णन