वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
11 Feb 2017 - 9:42 am

३१ ऑक्टोबर १९८७
व्हीसीए, नागपूर

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रूप ए मधली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्या दृष्टीने या मॅचला काहीच अर्थ नव्हता. भारत आणि ऑस्ट्रेलियाने ग्रूप ए मधून सेमीफायनल गाठली होती तर ग्रूप बी मधून पाकिस्तान आणि इंग्लंडने. पाकिस्तानने ग्रूप बी मध्ये पहिला क्रमांक मिळवला असल्याने ग्रूप ए मध्ये दुसर्‍या स्थानावर राहणार्‍या टीमला लाहोरच्या मैदानात पाकिस्तानशी सेमीफायनलमध्ये मुकाबला करावा लागणार होता. याऊलट ग्रूप ए मध्ये पहिलं स्थान मिळवणार्‍या संघाला मुंबईत इंग्लंडशी सेमीफायनल खेळता येणार होती. लाहोरला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापेक्षा मुंबईत इंग्लंडचा सामना करण्याला भारतीय खेळाडूंचं प्राधान्यं होतं, त्यामुळे रन रेटवर ऑस्ट्रेलियाला मागे टाकून ग्रूपमध्ये पहिलं स्थान मिळवण्यासाठी भारताच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवणं महत्वाचं होतं.

जेफ क्रोच्या न्यूझीलंड संघात अनुभवी जॉन राईट, मार्टीन क्रो, केन रदरफोर्ड, स्वतः जेफ क्रो, फिल हॉर्न असे बॅट्समन होते. इयन स्मिथसारखा फटकेबाज विकेटकीपर बॅट्समन न्यूझीलंडकडे होता. न्यूझीलंडच्या बॉलिंगची जबाबदारी मुख्यतः इवान चॅटफिल्ड आणि मार्टीन स्नेडन यांच्यावर होती. त्यांच्या जोडीला विली वॉटसन आणि पहिल्याच वन डे मध्ये खेळणारा डॅनी मॉरीसन हे दोघं होते शिवाय दीपक पटेलसारखा ऑलराऊंडरही न्यूझीलंडच्या संघात होता. अर्थात भारताला न्यूझीलंडचा संघ कितपत टक्कर देऊ शकेल याबद्दल शंकाच होती. कपिल देवच्या भारतीय संघात गावस्कर, श्रीकांत, सिद्धू, वेंगसरकर, अझरुद्दीन, शास्त्री असे बॅट्समन होते. किरण मोरेला दुखापत झाल्याने त्याच्या जागी विकेटकीपर म्हणून चंद्रकांत पंडीतचा संघात समावेश करण्यात आला होता. कपिलच्या जोडीला मनोज प्रभाकर, चेतन शर्मा आणि मणिंदरसिंग असे बॉलर्स होते. अनुभवी रॉजर बिन्नीचा मात्रं अजिबात फॉर्ममध्ये नसल्याने समावेश करण्यात आला नव्हता.

खरंत या मॅचच्या दिवशी गावस्करची प्रकृती बिघडली होती. या मॅचमध्ये आपल्याला खेळवण्यात येऊ नये अशी त्याने सूचना केली होती. गावस्करच्या या सूचनेप्रमाणे त्याला विश्रांती देण्यास कपिलची तयारी होती, पण सिलेक्शन कमिटीचा चेअरमन असलेल्या बापू नाडकर्णीने न्यूझीलंडविरुद्धची ही मॅच महत्वाची असल्याने गावस्करने या मॅचमध्ये खेळलंच पाहीजे असा आग्रह केला! अखेर अंगात ताप असतानाही गावस्करला खेळण्यास होकार द्यावा लागला होता!

जेफ क्रोने टॉस जिंकल्यावर बॅटींगचा निर्णय घेतला. जॉन राईट आणि फिल हॉर्न यांनी सावध पवित्रा घेत ४६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली. कपिल आणि प्रभाकरचे बॉल चांगलेच स्विंग होत असल्याने हॉर्न चाचपडतच होता. अखेर प्रभाकरच्याच इनकटरवर हॉर्नचा मिड्ल स्टंप उडाला. हॉर्न आऊट झाल्यावर आलेल्या मार्टीन क्रोने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. चेतन शर्माला त्याने लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. राईट - मार्टीन क्रो यांनी ३८ रन्स जोडल्यावर अझरुद्दीनचा आऊटस्विंगर ड्राईव्ह करण्याच्या नादात मार्टीन क्रोची एज लागली आणि चंद्रकांत पंडीतने त्याचा कॅच घेतला. न्यूझीलंड ८४ / २!

आणखीन जेमतेम ६ रन्सची भर पडते तोच...

मणिंदरसिंगचा बॉल राईटने ड्राईव्ह केला आणि एक रन पूर्ण केली...
दुसर्‍या रनसाठी राईटने केन रुदरफोर्डला कॉल दिला...
रुदरफोर्डने दुसरी रन घेण्याच्या दृष्टीने दोन पावलं टाकलीही...
पण एक्स्ट्रा कव्हर बाऊंड्रीवर अझरने बॉल पिकअप केलेला पाहून तो थबकला आणि मागे वळून त्याने आपलं क्रीज गाठलं...
रुदरफोर्ड परत फिरलेला पाहून राईटने मागे फिरुन आपलं क्रीज गाठण्याचा प्रयत्नं केला पण...
अझरच्या बाऊंड्रीवरुन आलेल्या थ्रोने स्टंप्सचा अचूक वेध घेतला!
राईट रनआऊट झाला!

५९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह राईटने ३५ रन्स केल्या.
न्यूझीलंड ९० / ३!

राईट आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या कॅप्टन जेफ क्रोने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. शास्त्री - मणिंदरच्या स्पिन बॉलिंगला फटकावून काढण्याचा त्याने मार्ग पत्करला होता. जेफ क्रोची फटकेबाजी सुरु असताना रुदरफोर्डला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. रुदरफोर्ड - जेफ क्रो यांच्या ३२ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये २४ रन्स एकट्या जेफ क्रोच्या होत्या. अखेर मणिंदरसिंगला कट् मारण्याच्या नादात जेफ क्रोची दांडी उडाली. न्यूझीलंड १२२ / ४!

जेफ क्रो परतल्यावर न्यूझीलंडचा कोच ग्लेन टर्नरच्या सूचनेवरुन इयन स्मिथच्या आधी दीपक पटेलला बॅटींगला आला. टर्नरची ही चाल यशस्वी ठरली. पटेलने आक्रमक पवित्रा घेत भारतीय बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. शास्त्रीला कट्ची बाऊंड्री मारल्यावर त्याने मनिंदरला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. पटेलची फटकेबाजी सुरु असताना रुदरफोर्डने केवळ स्ट्राईक रोटेट करत त्याला सपोर्ट देण्याचं धोरण पत्करलं होतं. पटेल - रुदरफोर्ड यांनी ५९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर शास्त्रीला फटकावण्याच्या नादात मिडऑफला कपिलने पटेलचा कॅच घेतला. ५१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह पटेलने ४० रन्स फटकावल्या. न्यूझीलंड १८१ / ५!

पटेल परतल्यावर रुदरफोर्डच्या जोडीला मार्टीन स्नेडन बॅटींगला आला. ४२ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने १८२ / ५ अशी मजल मारली होती. त्यातच इयन स्मिथसारखा आक्रमक बॅट्समन अद्याप बाकी असल्याने न्यूझीलंड २४०-२५० पर्यंत मजल मारेल असा बहुतेकांचा अंदाज होता. नेमक्या याच वेळेस कपिलने चेतन शर्माला बॉलिंगला आणलं. चेतनच्या पहिल्या पाच ओव्हर्समध्ये २८ रन्स फटकावल्या गेल्या होत्या. त्याच्या ऐवजी सुरवातीला अचूक बॉलिंग करणार्‍या मनोज प्रभाकरला बॉलिंगला आणणं जास्तं संयुक्तीक ठरलं असतं असं बहुतेकांचं मत होतं. पण...

चेतनच्या ओव्हरचे पहिले दोन बॉल रुदरफोर्डने खेळून काढले...
तिसर्‍या बॉलवर रुदरफोर्डचा कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला अझरने डाईव्ह मारत अडवल्यामुळे रुदरफोर्डला एकही रन मिळाली नाही...

चेतनचा चौथा बॉल ऑफस्टंपच्या थोडा बाहेर पडला...
इतका वेळ शांतपणे खेळणार्‍या रुदरफोर्डने अ‍ॅक्रॉस द लाईन ऑन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
...आणि अचूक टप्प्यावर पडलेला चेतनचा ऑफकटर रुदरफोर्डच्या बॅट आणि पॅडमधून घुसत मिडलस्टंपवर आदळला!
५४ बॉल्समध्ये १ बाऊंड्रीसह रुदरफोर्डने २६ रन्स काढल्या.
न्यूझीलंड १८२ / ६!

रुदरफोर्डच्या जागी बॅटींगला आला विकेटकीपर इयन स्मिथ!

चेतनचा पाचवा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
रुदरफोर्डला पडलेल्या बॉलप्रमाणेच ऑफकटर...
रुदरफोर्डप्रमाणेच स्मिथनेही अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्नं केला आणि ते देखिल बॅकफूटवर...
स्मिथच्या अपेक्षेपेक्षा लो राहिलेल्या बॉलने स्मिथचा ऑफस्टंप उडवला!
न्यूझीलंड १८२ / ७!

प्रेक्षकांच्या जल्लोषाला उधाण आलं होतं!
चेतन शर्मा आता हॅटट्रीकवर होता!

कपिलशी बराच वेळ सल्लामसलत केल्यावर चेतन अखेर बॉल टाकण्यास तयार झाला.
हॅटट्रीक बॉलचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर होता इवान चॅटफिल्ड!

चेतनचा तो बॉल ऑफस्टंपच्या लाईनवर पडला...
चॅटफिल्डने ऑफला फ्रंटफूटवर येत बॉल लेगला खेळण्याचा प्रयत्नं केला...
गुडलेंग्थवर पडलेला बॉल चॅटफिल्डच्या दोन्ही पायांमधून घुसला...
...आणि चॅटफिल्डचा लेगस्टंप उडाला!

वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यावहिल्या हॅटट्रीकची नोंद झाली!
चेतन शर्माच्या नावावर!
तीनही बॅट्समन बोल्ड झाले होते!
मिडल - ऑफ - लेग तिनही स्टंप उडाले होते!

प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेण्याचं तेवढं बाकी ठेवलं होतं. चेतनच्या नावाचा जयघोष सुरु होता! अवघ्या वर्षभरापूर्वी जावेद मियांदादने शेवटच्या बॉलवर मारलेल्या सिक्समुळे तमाम भारतीयांच्या दृष्टीने व्हिलन ठरलेला चेतन शर्मा आज मात्रं हिरो ठरला होता!

भारतीय बॉलरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेतलेली ही पहिली हॅटट्रीक होती!
(भारतासाठी चेतनव्यतिरिक्त वन डे मध्ये हॅटट्रीक घेणारा एकमेव बॉलर म्हणजे कपिल आणि टेस्टमध्ये हरभजन सिंग आणि इरफान पठाण)

चेतनच्या हॅटट्रीकमुळे न्यूझीलंडची अवस्था झाली १८२ / ८!

मार्टीन स्नेडन आणि विली वॉटसन यांनी सावधपणे खेळत शेवटच्या ७ ओव्हर्समध्ये ३९ रन्सची पार्टनरशीप करुन न्यूझीलंडची इनिंग्ज आटपणार नाही याची खबरदारी घेतली. अखेर शेवटच्या बॉलवर दुसरी रन काढण्याच्या प्रयत्नात स्नेडन रन आऊट झाला तेव्हा ५० ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने २२१ / ९ पर्यंत मजल मारली होती.

सेमीफायनलमध्ये लाहोरला पाकिस्तानशी मुकाबला टाळण्यासाठी भारताला २२२ रन्सचं टार्गेट ४२.२ ओव्हर्समध्ये गाठणं आवश्यक होतं!

या मॅचपूर्वी झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा जास्तं रनरेटची आवशकता असताना गावस्करने ५० रन्स काढण्यासाठी ११४ बॉल्स खर्ची घातले होते. गावस्करच्या या पवित्र्याबद्द्ल नंतर प्रेसकॉन्फरन्स मध्ये बोलताना कपिलने जाहीर नाराजी व्यक्तं केली होती. आता न्यूझीलंडविरुद्ध सुरवातीपासूनच फटकेबाजीची आवश्यकता असल्याने गावस्करच्या ऐवजी श्रीकांतच्या जोडीला नवज्योतसिंग सिद्धूने ओपनिंगला यावं आणि गावस्करने मिडलऑर्डरमध्ये खेळावं अशी कपिलने सूचना केली. गावस्कर आजारी असल्याचंही कारण या मागे होतं...

गावस्करचं माथं भडकलं! संतापाने धुमसत तो म्हणाला,
"If I am batting, I will open!"

श्रीकांतबरोबर गावस्कर बॅटींगला उतरला तो 'तुझ्याआधी मी सेंच्युरी ठोकेन' अशी पैज लावूनच!

चॅटफिल्डच्या पहिल्या ओव्हरमध्ये ९ रन्स निघाल्यावर जेफ क्रोने दुसर्‍या बाजूने बॉलिंगला आणलं वन डे मध्ये पदार्पण करणार्‍या डॅनी मॉरीसनला. आधीच भडकलेल्या गावस्करने त्याला आपल्या सुप्रसिद्ध स्ट्रेट ड्राईव्हचा प्रसाद देत दोन बाऊंड्री तडकावल्या. पण चॅटफिल्डने श्रीकांतला पुढची ओव्हर मेडन टाकल्यावर मॉरीसनच्या दुसर्‍या ओव्हरमध्येही केवळ २ रन्स निघाल्या...

भारताच्या इनिंग्जची पाचवी आणि चॅटफिल्डची तिसरी ओस्नस...

चॅटफिल्डचा पहिलाच बॉल गावस्करने लाँगऑफ बाऊंड्रीपार तडकावला... सिक्स!
दुसरा बॉल चॅटफिल्डच्या डोक्यावरुन प्रेक्षकांमध्ये गेला... सिक्स!
तिसरा बॉल मिडविकेट बाऊंड्रीवर गेला...
चौथा बॉल लाँगऑफ बाऊंड्रीच्या जेमतेम फूटभर आत पडल्यामुळे सिक्स जाण्यापासून वाचला...!
पहिल्या चार बॉलमध्ये चॅटफिल्डची धुलाई केल्यावर गावस्करला बहुतेक त्याची दया आली असावी...
पाचवा बॉल सोडून दिल्यावर शेवटच्या बॉलवर त्याने १ रन काढली!

न्यूझीलंडच काय, ड्रेसिंगरुममध्ये असलेले भारताचे यच्चयावत खेळाडू आ SSS वासून पाहत राहीले..
श्रीकांतकडून अशी फटकेबाजी अपेक्षित होती पण गावस्कर?

चंद्रकांत पंडीत आणि बोट दुखावल्यामुळे मॅचला मुकलेला किरण मोरे ड्रेसिंगरुम सोडून बाऊंड्रीच्या बाहेर फतकल मारून बसले. गावस्करची फटकेबाजी जवळून अनुभवता यावी म्हणून!

श्रीकांत म्हणतो,
"Sunny was furious and he took it out on poor kiwi bowlers. It was unbelievable! I was scared that if he hits one of his straight drives back at me, it would knock me off! He was hitting it so hard that day!"

७ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता ५० / ०! त्यातल्या ३० रन्स गावस्करच्या होत्या!
गावस्कर असा सुटल्यावर श्रीकांत मागे राहणं कसं शक्यं होतं?

धुलाई झालेल्या चॅटफिल्डच्या जागी बॉलिंगला आलेल्या स्नेडनला श्रीकांतने लागोपाठ ३ बाऊंड्री तडकावल्या. मॉरीसन आणि त्याच्यानंतर बॉलिंगला आलेला विली वॉटसन यांनाही त्याने फटकावून काढलं. हादरलेल्या जेफ क्रोने नवव्या ओव्हरमध्ये दीपक पटेलला बॉलिंगला आणलं, पण त्याचा परिणाम उलटाच झाला. श्रीकांतने पटेलला लागोपाठ दोन सिक्स ठोकल्या आणि पुढच्याच बॉलवर रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री! गावस्करच्या आधी त्याने हाफ सेंच्युरी गाठली पण अखेर वॉट्सनला ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात केन रुदरफोर्डने कव्हर्समध्ये डाईव्ह मारत श्रीकांतचा अप्रतिम कॅच घेतला. ५८ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत श्रीकांतने ७५ रन्स झोडपल्या!

श्रीकांत आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर होता २१ ओव्हर्समध्ये १३६ / १!

तिसर्‍या क्रमांकावर नवज्योतसिंग सिद्धूच्या ऐवजी बॅटींगला आलेल्या अझरुद्दीनने गावस्करला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा पवित्रा घेतला. सुरवातीच्या आतषबाजीनंतर श्रीकांतची फटकेबाजी सुरु असताना आरामात स्ट्राईक रोटेट करणार्‍या गावस्करने आता आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. श्रीकांतप्रमाणेच दीपक पटेलला त्याने सिक्स ठोकली. पटेलच्या जागी बॉलिंगला आलेला मॉरीसन आणि वॉटसन दोघांनाही त्याने लागोपाठ बाऊंड्री तडकावल्या. जेफ क्रोची अवस्था अक्षरशः आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली होती. गावस्करसमोर एकही बॉलर टिकत नव्हता!

अखेर मॉरीसनच्या बॉलवर ऑनड्राईव्ह मारत ८५ बॉल्समध्ये गावस्करने सेंच्युरी पूर्ण केली!

गावस्करची सेंच्युरी पूर्ण झाल्यावर अझरुद्दीनने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. अखेर चॅटफिल्डच्या बॉलवर बाऊंड्री मारत अझरनेच मॅच संपवली!
४२.२ ओव्हर्समध्ये २२२ रन्सचं टार्गेट गाठण्याची आवश्यकता असताना ३२.१ ओव्हर्समध्ये भारताने मॅच जिंकली!

८८ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि ३ सिक्ससह १०३ रन्स झोडपून काढत गावस्कर नॉटआऊट राहीला!
वन डे क्रिकेटमधली त्याची ही पहिली आणि एकमेव सेंच्युरी!
१९८३ मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या कपिलच्या १७५ मध्ये वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूने ठोकलेली ही दुसरी सेंच्युरी!
१९७५ च्या फायनलमध्ये क्लाईव्ह लॉईडच्या ८२ बॉल्समधल्या सेंच्युरीनंतर वर्ल्डकपमधली ही दुसरी फास्टेस्ट सेंच्युरी होती!

वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच मॅन ऑफ द मॅच म्हणून गावस्कर आणि चेतन शर्मा दोघांची निवड करण्यात आली!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

11 Feb 2017 - 9:50 am | गॅरी ट्रुमन

अरे वा . मस्तच.

हा सामना अगदीच एकतर्फी झाला होता पण भारताचा दणदणीत विजय झाल्यामुळे चांगलाच लक्षात आहे.

स्पार्टाकसभाऊंची ही लेखमाला मिपावरील क्लासिक लेखमाला होणार यात शंकाच नाही.

सिरुसेरि's picture

11 Feb 2017 - 11:14 am | सिरुसेरि

मस्त आठवण . बहुतेक या एकमेव मॅचमध्ये अझहरने गोलंदाजी केली होती .

गॅरी ट्रुमन's picture

11 Feb 2017 - 5:14 pm | गॅरी ट्रुमन

अझरने रिलायन्स कपच्या इतर काही मॅचमध्येही गोलंदाजी केली होती हे लक्षात आहे. रिलायन्स कपमध्ये एका गटात ४ संघ होते आणि प्रत्येक संघ इतर तीन संघांशी साखळीमध्ये दोनदा खेळला होता. भारताची ऑस्ट्रेलियाविरूध्द पहिली मॅच मद्रासला झाली होती आणि आपला त्यात एका धावेनी पराभव झाला होता हे याच लेखमालेतील अन्य एका लेखात आलेच आहे. तर भारताची ऑस्ट्रेलियाविरूध्द दुसरी मॅच दिल्लीला झाली होती आणि त्या मॅचमध्ये अझरने पहिल्यांदा अर्धशतक ठोकले होते आणि नंतर बॉलिंग करताना ३ विकेट्सही घेतल्या होत्या. इतरही काही मॅचमध्ये अझरने गोलंदाजी केली होती--- भारताने गमावलेल्या रिलायन्स कपच्या मुंबईतील इंग्लंडविरूध्दच्या सेमीफायनलमध्ये सुध्दा त्याने गोलंदाजी केली होती असे लक्षात आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2017 - 4:34 pm | अत्रुप्त आत्मा

व्हॉट ए शॉट !

अभिजीत अवलिया's picture

12 Feb 2017 - 12:54 pm | अभिजीत अवलिया

३२.१ ओव्हर मध्ये २२२ रन्स केल्या भारताने म्हणजे त्या काळात लोक आनंदाने पार वेडे झाले असतील.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 3:52 pm | श्रीगुरुजी

गावसकर तसा फार आक्रमक फलंदाज नसल्याने त्याने खाली खेळावे ही कपिलची सूचना होती. जरी गावसकरने झिंबाब्वेविरूद्ध ११४ चेंडूत फक्त ५० धावा केल्या होत्या, तरी ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने ७२ चेंडूत ६१ धावा करून बर्‍यापैकी वेगवान खेळी केली होती.

शतक पूर्ण करण्याआधी गावसकर ९९ वर नाबाद होता तेव्हा त्याने ७८ चेंडू खेळले होते. विश्वचषक स्पर्धेत ८२ धावात शतक करणार्‍या लॉईडचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी त्याला होती. परंतु त्याने नंतरचे पूर्ण षटक निर्धाव खेळून काढले व त्यानंतर ८५ व्या चेंडूला १ धाव घेऊन शतक पूर्ण केले. त्यामुळे नवीन विक्रम करण्याची संधी गमाविली.

१९७५ मध्ये आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात गावसकर पूर्ण ६० षटके खेळून फक्त नाबाद ३६ धावा करू शकला होता. तेव्हा त्याची धावगती २० पेक्षाही कमी होती. त्याच गावसकरने आपल्या शेवटून दुसर्‍या सामन्यात तब्बल ११७ धावगतीने फक्त ८५ चेंडूत शतक केले होते. त्यावेळी मटामध्ये वि. वि. करमरकर यांनी अत्यंत समर्पक शब्दात लिहिले होते की "मावळतीचा सूर्य बघायला जावे, पण प्रत्यक्षात मध्यान्हीचा तळपता सूर्य दिसावा असा गावसकरचा खेळ होता.".

गॅरी ट्रुमन's picture

13 Feb 2017 - 10:14 am | गॅरी ट्रुमन

या सामन्यासाठी लंचनंतर श्रीकांत आणि गावसकर बॅटिंगसाठी येत असताना अ गटात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी भारताला हे आव्हान ४२.२ ओव्हर्समध्ये गाठणे गरजेचे आहे असे टिव्हीवर दाखवत होते हे आठवते. तसेच श्रीकांत आऊट झाल्यानंतर त्यावेळी सिध्दू बॅटिंगसाठी यायचा. रिलायन्स कपच्या वेळी सिध्दू चांगलाच फॉर्ममध्ये होता तेव्हा श्रीकांत-गावसकरने दिलेल्या चांगल्या सुरवातीनंतर सिध्दू भरपूर फटकेबाजी करेल आणि मॅच बघायला आणखी मजा येईल असे वाटले होते. पण बहुदा गावसकरला शतक ठोकायला मिळावे या उद्देशाने सिध्दूला न पाठवता अझरला पाठविले गेले.

या सामन्याच्या दिवशी सकाळी पेपरमध्ये आले होते की न्यू झीलंडचा कॅप्टन जेफ क्रो ने म्हटले की हा सामना जिंकून ६ पैकी ३ सामने जिंकायचा न्यू झीलंडचा प्रयत्न असेल आणि भारताला हा सामना सोपा जाणार नाही. त्याबद्दल त्याची सामना सुरू होण्यापूर्वी थोडी आणि सामना संपल्यावर भरपूर टर आम्ही मित्रमंडळींनी उडवली होती.