वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
24 Feb 2017 - 8:04 am

२००३ चा वर्ल्डकप हा आफ्रीका खंडातला पहिला वर्ल्ड्कप! अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर १९९१ मध्ये क्रिकेटजगतात परतलेल्या दक्षिण आफ्रीकेला झिंबाब्वे आणि केनिया यांच्याबरोबर या वर्ल्डकपचं यजमानपद देण्यात आलं होतं. हा वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाने रॉबर्ट मुगाबेच्या हुकूमशाही सरकारच्या निषेधार्थ हरारे इथे झिंबाबवेविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यास नकार दिला. इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणावरुन केनियाविरुद्ध नैरोबी इथे खेळण्यास नकार दिला. झिंबाब्वे आणि केनिया या दोन्ही संघांना या मॅचेसमधले पॉईंट्स बहाल करण्यात आले.

वर्ल्डकपला सुरवात झाल्यावर दोनच दिवसांनी सगळ्यांनाच हादरा देणारी एक बातमी आली ती म्हणजे शेन वॉर्नने प्रतिबंध घातलेले ड्रग्ज घेतल्याची! आपल्या सफाईत वॉर्नने आपल्याला आईने दिलेलं औषध घेतल्याचा फुसका दावा केला पण त्यावर कोणीही विश्वास ठेवणं शक्यं नव्हतं. वॉर्नवर १ वर्षासाठी बंदी घालण्यात आली!

*************************************************************************************

९ फेब्रुवारी २००३
न्यूलँड्स, केपटाऊन

वेस्टर्न केप प्रांतातल्या टेबल माऊंटन आणि डेव्हील्स पीक यांच्या पार्श्वभूमीवरच्या केप टाऊनमधल्या न्यूलँड्स मैदानात यजमान दक्षिण आफ्रीका आणि वेस्ट इंडीज यांच्यात पूल बी मधली वर्ल्डकपची पहिली मॅच होणार होती. दक्षिण आफ्रीकन भूमीवर होत असलेला पहिलावहिला वर्ल्डकप आणि त्यातही दक्षिण आफ्रीकेची मॅच असल्याने न्यूलँड्सच्या मैदानावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शॉन पोलॉकच्या दक्षिण आफ्रीकन संघात गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्ज, बोटा डिपनार, जाँटी र्‍होड्स असे बॅट्समन होते. यांच्या जोडीला मार्क बाऊचरसारखा विकेटकीपर बॅट्समनही दक्षिण आफ्रीकेच्या संघात होता. बॉलिंगचा भार मुख्यतः स्वतः कॅप्टन पोलॉक, अ‍ॅलन डोनाल्ड आणि मखाया एन्टीनी यांच्यावर होता. लेफ्ट आर्म स्पिनर निकी बोयेचाही संघात समावेश करण्यात आला होता, पण दक्षिण आफ्रीकेचे खरे आधारस्तंभ होते ते म्हणजे फटकेबाज लान्स क्लूसनर आणि ऑलराऊंडर जॅक कॅलीस! डिपनार आणि एन्टीनीचा अपवाद वगळता सर्व खेळाडू १९९९ च्या वर्ल्डकपमध्येही खेळलेले होते.

कार्ल हूपरच्या वेस्ट इंडीज संघात स्वतः हूपर, अनुभवी ब्रायन लारा, शिवनारायण चँडरपॉल, रामनरेश सरवान, क्रिस गेल, वेव्हल हाईंड्स, रिकार्डो पॉवेल असे बॅट्समन होते. १९८७ च्या वर्ल्डकपनंतर प्रथमच वेस्ट इंडीजचा संघ कर्टली अँब्रोज आणि कॉर्टनी वॉल्श यांच्यापैकी कोणीही संघात नसताना वर्ल्डकपमध्ये उतरत होता. वेस्ट इंडीच्या बॉलिंगची जबाबदारी मुख्यतः मर्व्हन डिलन, पेड्रो कॉलिन्स, व्हॅसबर्ट ड्रेक्स यांच्यावर होती. रिडली जेकब्ससारखा फटकेबाज विकेटकीपर - बॅट्समन वेस्ट इंडीजच्या संघात होता. मात्रं हे सर्व असूनही दक्षिण आफ्रीकेविरुद्ध वेस्ट इंडीजचा कितपत निभाव लागेल याबद्दल शंकाच होती.

कार्ल हूपरने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय वेस्ट इंडीजला महागात पडणार अशी चिन्हं दिसत होती. शॉन पोलॉक आणि मखाया एन्टीनी यांच्या पहिल्या तीन ओव्हर इतक्या अचूक होत्या की क्रिस गेल आणि वेव्हल हाईंड्स यांना एकही रन काढता आली नाही! पहिल्या तीन मेडन ओव्हर्सनंतरही एन्टीनीच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजला पहिल्या २ रन्स मिळाल्या त्या वाईड्सच्या! अखेर ५ व्या ओव्हरमध्ये क्रिस गेलने पहिली रन काढली, पण पोलॉकचा शेवटचा बॉल वेव्हल हाईंड्सच्या बॅटची एज घेऊन मार्क बाऊचरच्या ग्लोव्हजमध्ये गेला. १६ बॉल्स खेळूनही हाईंड्सला एकही रन काढता आली नाही. वेस्ट इंडीज ४ / १!

एन्टीनीच्या पुढच्या ओव्हरमध्ये...
ब्रायन लाराचा स्ट्राईकवर असलेला पहिलाच बॉल...
मिडलस्टंपच्या लाईनवर पडलेला एन्टीनीचा बॉल उसळला...
लाराने डिफेन्सिव पवित्रा घेतला पण सीम झालेल्या बॉलने त्याच्या बॅटची एज घेतली...
दुसर्‍या स्लिपमधल्या जॅक कॅलीसने जीवाच्या आकांताने डाव्या बाजूला डाईव्ह मारली...
लाराच्या सुदैवाने कॅलीसच्या बोटांना जेमतेम स्पर्श करुन बॉल थर्डमॅनच्या दिशेने गेला!

दक्षिण आफ्रीकेच्या अचूक बॉलिंगने वैतागलेल्या क्रिस गेलचा पोलॉकच्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं पार फसला आणि बॉल त्याच्या बॅटची इनसाईड एज घेऊन स्टंपवर गेला. २ रन्स काढण्यासाठी गेलने तब्बल २१ बॉल्स खर्ची घातले होते! तो आऊट झाला तेव्हा वेस्ट इंडीजचा स्कोर होता ७ ओव्हर्समध्ये ७ / २!

गेल परतल्यावर बॅटींगला आलेल्या शिवनारायण चँडरपॉलने सुरवातीला सावधपणे दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढण्याचा निर्णय घेतला. लारा - चँडरपॉल यांनी कोणतीही रिस्क न घेता पोलॉक - एन्टीनी यांच्या सुरवातीच्या ओव्हर्स खेळून काढल्या. पोलॉकच्या ऐवजी अ‍ॅलन डोनाल्ड बॉलिंगला आल्यावर चँडरपॉलने त्याला ३ ओव्हर्समध्ये ३ बाऊंड्री फटकावल्या. एन्टीनीच्या ऐवजी आलेल्या कॅलीसने मात्रं लाराला लागोपाठ दोन मेडन ओव्हर टाकल्या!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इयन चॅपल म्हणाला,
"Someone needs to remind the batsmen that we are playing a one day and not a test match!"

चॅपलच्या या वक्तंव्याला प्रतिसाद म्हणूनच की काय लाराने डोनाल्डला लाँगऑफवरुन दणदणीत सिक्स ठोकली! कॅलिसच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्क्वेअरकट्ची बाऊंड्री तडकावण्यासही लाराने कोणतीही हयगय केली नाही. पण डोनाल्डच्या जागी बॉलिंगला आलेल्या लान्स क्लूसनरने अचूक बॉलिंग करत लारा - चँडरपॉल यांना आक्रमक फटकेबाजीची फारशी संधी दिली नाही. २५ ओव्हर्सनंतर वेस्ट इंडीजचा स्कोर होता ६७ / २!

निकी बोये बॉलिंगला आल्यावर मात्रं लाराने आक्रमक पवित्रा घेत पहिल्याच ओव्हरमध्ये २ बाऊंड्री फटकावल्या. दुसर्‍या ओव्हरमध्ये त्याला स्वीप करण्याचा लाराचा प्रयत्नं फसला पण अंपायर वेंकटराघवनने त्याच्याविरुद्धचं अपिल फेटाळून लावलं. बोयेच्या पुढच्या ओव्हरमध्येही लाराने पुन्हा दोन बाऊंड्री तडकावल्या. लाराची फटकेबाजी सुरु असताना चँडरपॉलने त्याला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला होता. लारा - चँडरपॉल यांनी १०९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर क्लूसनरला कट् मारण्याचा चँडरपॉलचा प्रयत्नं फसला आणि बाऊचरने त्याचा कॅच घेतला. ६० बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह चँडरपॉलने ३४ रन्स काढल्या. तो आऊट झाला तेव्हा ३१ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजचा स्कोर होता ११० / ३!

चँडरपॉल परतल्यावर बॅटींगला आलेल्या कॅप्टन कार्ल हूपरनेही सुरवातीला १-२ रन्स काढत लाराला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. लाराची फटकेबाजी सुरुच होती. एन्टीनीला बाऊंड्री फटकावल्यावर त्याने क्लूसनरला स्क्वेअरकटची बाऊंड्री तडकावली. क्लूसनरचा पुढचा बॉल लेगस्टंपवर पडला आणि लाराने त्याला स्क्वेअरलेगला सिक्स ठोकली! हूपरनेही लाराप्रमाणेच आक्रमक पवित्रा घेत डोनाल्डला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या! लारा - हूपर यांनी १३ ओव्हर्समध्ये ८९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर एन्टीनीला फटकावण्याच्या प्रयत्नात स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या कॅलीसने डाईव्ह मारत हूपरचा कॅच घेतला. ४० बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह हूपरने ४० रन्स फटकावल्या. वेस्ट इंडीज १९८ / ३!

हूपर परतल्यावर बॅटींगला आलेल्या रिकार्डो पॉवेलने पहिल्याच बॉलला लेगग्लान्सची बाऊंड्री मारली. पण एन्टीनीच्या पुढच्याच ओव्हरमध्ये...

मिडलस्टंपवर पडलेला बॉल लाराने मिडविकेटवरुन उचलला...
शेवटच्या क्षणी लाराचा अंदाज चुकल्याने बॉल टॉपएज झाला...
मिडविकेटला असलेल्या पोलॉकने कॅच घेण्यात कोणतीही चूक केली नाही!

१३४ बॉल्समध्ये १२ बाऊंड्री आणि २ सिक्ससह लाराने ११६ रन्स फटकावल्या.
वेस्ट इंडीज २१५ / ५!

लारा परतल्यावर पॉवेल आणि रामनरेश सरवान यांनी आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. लारा आऊट झाल्याच्या पुढच्याच बॉलवर पॉवेलने एन्टीनीला बाऊंड्री तडकावली. पुढच्याच ओव्हरमध्ये...

पोलॉकचा पहिला बॉल ऑफस्टंपवर पडला...
क्रीज सोडून पुढे सरसावलेल्या सरवानने तो मिडविकेटला फटकावला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला...सिक्स!

पोलॉकच्या दुसर्‍या बॉलवर सरवानने एक रन काढल्यावर तिसर्‍या बॉलवर पॉवेलने मिडविकेटलाच बाऊंड्री तडकावली...
पोलॉकचा चौथा बॉल पॉवेलने कव्हर्समधून फटकावला. कॅलीसने डाईव्ह घेत बाऊंड्री अडवल्याने पॉवेलला दोन रन्स मिळाल्या...

पाचवा बॉल लेगस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
पॉवेलने तो पोलॉकच्या डोक्यावरुन उचलला...
बॉल साईटस्क्रीनवर आदळला... सिक्स!

पोलॉकचा शेवटचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
लेगसाईडला सरकत पॉवेलने तो मिडऑफला असलेल्या डिपनारच्या डाव्या बाजूने तडकावला...
बाऊंड्रीवर असलेल्या कॅलीसला यावेळी कोणतीही संधी मिळाली नाही!

पहिल्या ८ ओव्हर्समध्ये २० रन्स देणार्‍या पोलॉकच्या ९ व्या ओव्हरमध्ये २३ रन्स झोडपून काढण्यात आल्या होत्या!

पॉवेल - सरवान यांची फटकेबाजी सुरुच होती. सरवानने कॅलीसला बाऊंड्री फटकावल्यावर पोलॉकच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा बाऊंड्री तडकावली. कॅलीसच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सरवानने स्लो बॉलवर पुढे सरसावत लाँगऑनला सिक्स ठोकली. अखेरच्या बॉलवरही बाऊंड्री तडकावण्यात पॉवेलने कोणतीही हयगय केली नाही. पॉवेलने १८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि १ सिक्ससह ४० तर सरवानने १५ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि २ सिक्ससह ३२ रन्स फटकावल्या! दक्षिण आफ्रीकन बॉलर्सची मनसोक्तं धुलाई करत पॉवेल - रसवान यांनी २८ बॉल्समध्ये ६३ रन्स झोडपून काढल्या!

५० ओव्हर्सनंतर वेस्ट इंडीजचा स्कोर होता २७८ / ५!

दक्षिण आफ्रीकेच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्यांना ४९ ओव्हर्सच बॅटींगला मिळणार होत्या.

गॅरी कर्स्टन आणि हर्शेल गिब्ज यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. मर्व्हन डिलनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कट्ची बाऊंड्री फटकावल्यावर गिब्जने पेड्रो कॉलिन्सच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये हाफव्हॉलीवर कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. गॅरी कर्स्टननेही डिलन आणि कॉलिन्स यांना मिडऑन आणि मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्या. पाचव्या ओव्हरमध्ये डिलनच्या शॉर्टपीच बॉलवर गिब्जने मारलेला पूल सिक्स जाण्यापासून थोडक्यात वाचला. गिब्ज - कर्स्टन यांनी जवळपास प्रत्येक ओव्हरला किमान एक बाऊंड्री फटकावण्याचा सपाटा लावला होता. अखेर ९ व्या ओव्हरमध्ये डिलनच्या आऊटस्विंगरवर गिब्जची एज लागली आणि विकेटकीपर रिडली जेकब्सने डाईव्ह मारत त्याचा कॅच घेतला. दक्षिण आफ्रीका ४६ / १!

गिब्ज आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या बोटा डिपनारने सुरवातीला वेस्ट इंडीयन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. डिलन आणि कॉलिन्सच्या जागी बॉलिंगला आलेला व्हॅसबर्ट ड्रेक्स यांच्या अचूक बॉलिंगमुळे कर्स्टन - डिपनार यांना फटकेबाजी करणं कठीण झालं होतं. पहिल्या १० बॉल्समध्ये एकही रन काढण्यात अपयश आलेल्या डिपनारला लेगग्लान्सची सुदैवी बाऊंड्री मिळाली. कर्स्टनने ड्रेक्सच्या बॉलवर स्क्वेअरलेगला फ्लिकची बाऊंड्री तडकावली, पण पुढच्याच बॉलवर तो बोल्ड होण्यापासून थोडक्यात बचावला. १७ व्या ओव्हरमध्ये...

कार्ल हूपरचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
डिपनारने क्रीजमधून पुढे सरसावत लाँगऑफ बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!
हूपरचा दुसरा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
डिपनार पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावला पण...
हूपरचा हा बॉल अजिबात न वळता डिपनारला चकवून गेला...
विकेटकीपर रिडली जेकब्सने बेल्स उडवण्यात कोणतीही कुचराई केली नाही.
डिपनार स्टंप झाला!
दक्षिण आफ्रीका ७९ / २!

डिपनार परतल्यावर बॅटींगला आलेल्या जॅक कॅलीसने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत वेस्ट इंडीयन बॉलर्सना फटकावून काढण्याचा मार्ग पत्करला. ड्रेक्सला मिडऑफमधून बाऊंड्री मारल्यावर कॅलीसने ड्रेक्सच्याच पुढच्या ओव्हरमध्ये कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. हूपरने ड्रेक्सच्या ऐवजी पेड्रो कॉलिन्सला बॉलिंगला आणलं आणि ही चाल यशस्वी ठरली. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर कॉलिन्सच्या ऑफस्टंपच्या बाहेर पडलेल्या बॉलला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात कॅलिसची एज लागली आणि जेकब्सने डाईव्ह मारत त्याचा अफलातून कॅच घेतला. दक्षिण आफ्रीका १०४ / ३!

कॅलिस आऊट झाल्यावर कर्स्टनने आक्रमक पवित्रा घेत हूपर आणि कॉलिन्स यांना बाऊंड्री तडकावल्या, पण हूपरच्या पुढच्या ओव्हरमध्ये जाँटी र्‍होड्सचा कट् मारण्याचा प्रयत्नं साफ फसला आणि त्याच्या बॅटची एज लागून बॉल स्टंपवर गेला. दक्षिण आफ्रीका ११७ / ४!

र्‍होड्स परतल्यावर बॅटींगला आलेल्या मार्क बाऊचरने थंड डोक्याने १-२ रन्स काढत कर्स्टनला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला, पण लेगस्टंपवर पडलेल्या कॉलिन्सच्या हाफव्हॉलीवर बाऊंड्री तडकावण्याची संधी त्याने सोडली नाही. हूपरने स्वतः ऐवजी बॉलिंगला आणलेल्या क्रिस गेलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये...

गेलचा पाचवा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
क्रीज सोडून पुढे सरसावलेल्या कर्स्टनने तो मिडऑनवरुन उचलला...
बाऊंड्रीवर असलेल्या ड्रेक्सने कॅच घेण्यासाठी आपल्या उजवीकडे धाव घेतली पण...
ड्रेक्सचा पाय घसरला आणि तो कोलमडून खाली पडला...
डेक्स धडपड्ला नसता तर निश्चितच त्याच्या हातात कॅच आला असता...
गॅरी कर्स्टनला सिक्स मिळाली!

गेलचा पुढचा बॉल कर्स्टनने स्वीप केला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर कॉलिन्सने पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्नं केला...
कर्स्टनला पुन्हा फुकटची बाऊंड्री मिळाली!

कॉलिन्सच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या डिलनचा शॉर्टपीच बॉल मिडविकेटला फ्लिक करण्याच्या प्रयत्नात कर्स्टनची लिडींग एज लागली आणि डिलननेच त्याचा कॅच घेतला. ९२ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि गेलला मारलेल्या सुदैवी सिक्ससह कर्स्टनने ६९ रन्स फटकावल्या. पुढच्याच ओव्हरमध्ये गेलला कव्हर्समधून ड्राईव्ह करण्याचा पोलॉकचा प्रयत्नं पार फसला आणि एक्स्ट्रा कव्हरला हूपरने डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम कॅच घेतला. पोलॉक आऊट झाला तेव्हा ३३ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता १६१ / ६!

शेवटच्या १६ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ११८ रन्सची आवश्यकता होती!

रिकार्डो पॉवेलच्या बॉलवर कॉट अँड बोल्ड होण्यापासून थोडक्यात बचावल्यावर बाऊचरने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. पॉवेलला लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्यावर त्याने हूपरला मिडविकेटला सिक्स ठोकली. हूपरच्या पुढच्याच बॉलवर बाऊचरने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावल्यावर हूपरने स्वतःच्या ऐवजी डिलनला बॉलिंगला आणलं, पण बाऊचरवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. गेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्क्वेअरलेगला सिक्स ठोकल्यावर पुढच्याच बॉलला त्याने पुन्हा स्क्वेअरलेगलाच स्वीपची बाऊंड्री फटकावली. पण त्याच ओव्हरमध्ये गेलच्या यॉर्करचा अजिबात अंदाज न आल्याने बाऊचरची दांडी उडाली. ४९ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि २ सिक्ससह बाऊचरने ४९ रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका २०४ / ७!

अद्याप ९ ओव्हर्समध्ये ७४ रन्स बाकी होत्या!

दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने आशेचा एकमेव किरण होता तो म्हणजे क्लूसनर!

क्लूसनरने नेहमीच्या शैलीत वेस्ट इंडीयन बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. डिलनच्या शॉर्टपीच बॉलवर त्याने मिडविकेटवरुन सिक्स ठोकली. निकी बोयेने चाणाक्षपणे क्लूसनरला स्ट्राईक देण्याचा मार्ग पत्करला होता, पण हूपरला कट्ची बाऊंड्री मारण्याची त्याने संधी सोडली नाही.

शेवटच्या ६ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ५४ रन्स हव्या होत्या!

४५ व्या ओव्हरमध्ये....
गेलचा पहिला बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
क्लूसनरने क्रीजमधून पुढे सरसावत तो मिडविकेटवर उचलला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला...सिक्स!

पुढचे दोन बॉल्स क्लूसनरला काहीच करता आलं नाही...
गेलचा पाचवा बॉल पुन्हा लेगस्टंपच्या बाहेर पडला...
क्लूसनरने लेगसाईडला सरसावत तो पुन्हा मिडविकेटवर उचलला...
बॉल पुन्हा मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

गेलचा शेवटचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर फुलटॉस होता...
क्लूसनरने तो स्क्वेअरलेगला उचलला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर पेड्रो कॉलिन्सने त्याचा कॅच घेतला पण...
कॉलिन्सचा पाय बाऊंड्रीच्या रोपवर पडला होता...सिक्स!

हूपरच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बाऊंड्री मारल्यावर गेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये क्लूसनरने पुन्हा मिडविकेटलाच सिक्स ठोकल्यावर मॅच पुन्हा दक्षिण आफ्रीकेच्या आवाक्यात आली होती. हूपरने स्वतःच्या ऐवजी बॉलिंगला आणलेल्या कॉलिन्सने अचूक बॉलिंग करत क्लूसनर - बोये यांना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही.

शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रीकेला ९ रन्सची आवश्यकता होती!

हूपरच्या समोर शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगला कोणाला आणावं हा प्रश्नं होता. डिलन, गेल आणि स्वतः हूपर यांच्या ओव्हर्स संपल्या होत्या. कॉलिन्सने ४८ वी ओव्हर टाकल्यामुळे त्याला शेवटची ओव्हर देणं शक्यंच नव्हतं. हूपरच्या समोर दोनच पर्याय होते - रिकार्डो पॉवेल आणि व्हॅसबर्ट ड्रेक्स. हूपरने बॉल हाती ठेवला ड्रेक्सच्या हाती!

डेक्सच्या पहिल्या बॉलवर बोयेने एक रन काढली...

क्लूसनर स्ट्राईकवर येताच ड्रेक्सने हूपरकडे लाँगऑन - मिडविकेट - स्क्वेअरलेग असा लेगसाईड ट्रॅप लावण्याची मागणी केली.
लारा आणि चँडरपॉलशी चर्चा केल्यावर हूपरने ड्रेक्सच्या सूचनेप्रमाणे लेगसाईड ट्रॅप लावण्याचा निर्णय घेतला...

५ बॉल्स - ८ रन्स!

ड्रेक्सचा दुसरा बॉल यॉर्कर होता...
क्लूसनरला त्यावर काहीच करता आलं नाही.

४ बॉल्स - ८ रन्स!

ड्रेक्सचा तिसरा बॉल अराऊंड द विकेट टाकलेला फुलटॉस होता...
क्लूसनरने तो मिडविकेटला उचलला...
सिक्स जाणार या कल्पनेने सगळ्यांच्या नजरा बाऊंड्रीपार लागल्या होत्या पण...
मिडविकेट बाऊंड्रीवर हूपरने कॅच घेतला...
ड्रेक्सच्या लेग ट्रॅपमध्ये क्लूसनर नेमका सापडला होता!

४८ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि तब्बल ५ सिक्स ठोकत क्लूसनरने ५७ रन्स झोडपल्या.
दक्षिण आफ्रीका १७१ / ८!

दक्षिण आफ्रिकेच्या दुर्दैवाने हूपरने कॅच घेतला तेव्हा बोये आणि क्लूसनर क्रॉस झाले नव्हते...
बोये रन घेण्याच्या हेतूने बॅटींग क्रीजच्या जवळ पोहोचला होता पण...
हूपरने कॅच घेईपर्यंत क्लूसनरने क्रीज सोडलंच नाही!
परिणाम?

२१ रन्सवर बॅटींग करणार्‍या बोयेच्या ऐवजी स्ट्राईकवर होता मखाया एन्टीनी!

३ बॉल्स - ८ रन्स!

ड्रेक्सचा चौथा बॉल बंपर होता...
एन्टीनीला काहीच करता आलं नाही!

२ बॉल्स - ८ रन्स!

ड्रेक्सचा पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
एन्टीनीने लेगस्टंपच्या बाहेर सरकत तो ऑफसाईडला तडकावला...
सर्वांच्या नजरा बाऊंड्रीकडे लागलेल्या असतानाच...
पॉईंट बाऊंड्रीवर रामनरेश सरवानने कॅच घेतला!
दक्षिण आफ्रीका २७१ / ९!

१ बॉल - ८ रन्स!

शेवटचा बॉल टाकण्यापूर्वी हूपर ड्रेक्सला म्हणाला,
"Whatever you do, don’t bowl a no-ball or wide! Let him hit you for a boundary!"

ड्रेक्सचा ऑफस्टंपवर पदलेला बॉल बोयेने स्वीप केला...
बॉल फाईनलेगच्या दिशेने गेला...
एकही वेस्ट इंडीयन खेळाडूने बॉल अडवण्याचा प्रयत्नंही केला नाही!

वेस्ट इंडीजने ३ रन्सनी मॅच जिंकली!

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच ब्रायन लाराची निवड झाली!
१९९६ च्या वर्ल्डकपमधल्या क्वार्टरफायनलनंतर पुन्हा एकदा लाराच्या सेंच्युरीने दक्षिण आफ्रीकेला पराभवाची चव चाखायला लावली होती!

स्लो ओव्हररेटमुळे कमी झालेली एक ओव्हर दक्षिण आफ्रीकेला महागात पडली होती!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

24 Feb 2017 - 9:23 am | अभिजीत अवलिया

क्लुजनर सारखा धोकादायक बॅट्समन मी तरी कधी बघितला नाही. तळाच्या गोलंदाजाना हाताशी घेऊन जवळपास गेलेली मॅच खेचून आणावी क्लूजरनेच. खूप भिती वाटायची त्याची.

मस्त लेखमाला +११११

स्पार्टाकस's picture

25 Feb 2017 - 12:09 am | स्पार्टाकस

क्लूजनर आक्रमक बॅट्समन होता आणि शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये तो अत्यंत धोकादायक होता हे निर्विवाद, पण बॉलर्सना हाताशी धरुन आणि त्यांच्याकडूनही रन्स काढून घेत मॅच जिंकण्यात क्लूजनरचाही गुरु होता तो म्हणजे मायकेल बेव्हन!