१९८३ चा वर्ल्डकप हा पूर्वीच्या दोन्ही वर्ल्डकपच्या तुलनेत अनेक दृष्टींनी वैविध्यपूर्ण होता. १९७९ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ८ टीम्सना दोन ग्रूपमध्ये विभागण्यात आलं होतं, परंतु यावेळी प्रत्येक टीमच्या ग्रूपमधल्या दुसर्या टीमशी २ मॅचेस होत्या. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे एखाद्या टीमला वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. वाईड्स आणि बंपर्सच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याच्या अंपायर्सना सूचना देण्यात आल्या होत्याच, परंतु या वर्ल्डकपमधली सर्वात नाविन्यपूर्ण बाब म्हणजे या वर्ल्डकपपासून ३० यार्डचं सर्कल अस्तित्वात आलं. संपूर्ण मॅचमध्ये फिल्डींग करणार्या संघांनी या सर्कलमध्ये किमान चार फिल्डर्स ठेवणं बंधनकारक होतं.
१५ जून १९८३
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
एजबॅस्टनच्या ग्राऊंडवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रूप ए मधली दुसर्या राऊंडची पहिली मॅच होती. पहिल्या राऊंडमध्ये अॅलन लॅम्बच्या धडाकेबाज सेंच्युरीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडचा १०६ रन्सनी फडशा पाडला होता. त्यामुळे न्यूझीलंडच्या दृष्टीने ही मॅच महत्वपूर्ण होती. पण मॅचपूर्वीच न्यूझीलंडला एक अनपेक्षित धक्का बसला. श्रीलंकेविरुद्धची मॅच जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावणारा अनुभवी जॉन राईट दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला होता! राईटच्या अनुपस्थितीत बॅटींगचा भार होता तो अनुभवी ग्लेन टर्नर, जेरेमी कोनी, कॅप्टन जेफ हॉवर्थ, ब्रूस एडगर आणि जेफ आणि मार्टीन क्रो बंधूंवर. विकेटकीपर इयन स्मिथ आणि रिअर्ड हॅडलीसारखा ऑलराऊंडर न्यूझीलंडच्या टीममध्ये होता. हॅडलीच्या जोडीला लान्स केर्न्स, जॉन ब्रेसवेल, इवान चॅटफिल्ड असे बॉलर्स होते. अॅलन लॅम्बच्या आतषबाजीत १२ ओव्हर्समध्ये तब्बल १०३ रन्स देणार्या मार्टीन स्नेडनला मात्रं वगळण्यात आलं होतं.
बॉब विलीसच्या इंग्लंड संघात ग्रॅहॅम फौलर, क्रिस टावरे (चक्कं), डेव्हीड गावर, माईक गॅटींग, अॅलन लॅम्ब असे एकापेक्षा एक सरस बॅट्समन होतेच, शिवाय बोथमसारखा ऑलराऊंडर होता. विलीस आणि बोथमच्या जोडीला पॉल अॅलट, ग्रॅहॅम डिली, ऑफ स्पिनर व्हिक मार्क्स असे बॉलर्स आणि पुढे अंपायर झालेला विकेटकीपर इयन गूल्ड यांचा समावेश होता.
विलीसने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतल्यावर फौलर आणि टावरे यांनी आपल्या लौकीकाला साजेसा सावध पवित्रा घेत १७ ओव्हर्समध्ये ६३ रन्सची पार्टनरशीप केली. टेस्ट क्रिकेटमध्ये कासव (Tortoise) म्हणून प्रसिद्ध असलेल्या टावरेने इथेही १८ रन्स काढण्यासाठी तासाभरात ४४ बॉल्स खेळून काढले. टावरेची बॅटींग न्यूझीलंडच्या पथ्यावर पडत असतानाच जेरेमी कोनीला फटकावण्याची अचानक त्याला सुरसुरी आली आणि लाँगऑनला लान्स केर्न्सने त्याचा कॅच घेतला! टावरे आऊट झाल्यावर रन रेट वाढवण्याच्या इराद्याने विलीसने बोथमला बॅटींगला पाठवलं, परंतु ही चाल फारशी यशस्वी ठरली नाही. जॉन ब्रेसवेलच्या बॉलवर त्याच्यात हातात कॅच देऊन बोथम आऊट झाला. इंग्लंड ७७ / २!
बोथम आऊट झाल्यावर आलेल्या गावरने मात्रं सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. ब्रेसवेलला त्याने दोन दणदणीत सिक्स ठोकल्या. आतापर्यंत आरामात खेळणार्या फौलरनेही चॅटफिल्डला एकाच ओव्हरमध्ये ३ बाऊंड्री तडकावल्या. फौलर - गावर यांनी ४० रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं न्यूझीलंडची धुलाई करणार अशी चिन्हं दिसत असतानाच चॅटफिल्डच्या पुढच्याच ओव्हरमध्ये फौलरने कव्हरड्राईव्ह मारला तो थेट जेफ क्रोच्या हातात! ११२ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह फौलरने ६९ रन्स फटकावल्या. इंग्लंड ११७ / ३!
फौलरच्या जागी बॅटींगला आलेला आणि पहिल्या मॅचमधला हिरो अॅलन लॅम्ब आणि गावर यांनी २६ रन्स जोडल्यावर लान्स केर्न्सनेला ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं लॅम्बच्या अंगाशी आला आणि जेफ क्रोने दुसरा कॅच घेतला. आणखीन ११ रन्सची भर पडते तोच केर्न्सने गॅटींगचा ऑफस्टंप उडवला! केर्न्सनेच विकेटकीपर इयन गूल्डला एलबीडब्ल्यू केल्यावर १४३ / ३ वरुन इंग्लंडची १६२ / ६ अशी अवस्था झाली.
व्हिक मार्क्स बॅटींगला आल्यावर गावरने अधिकच आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडवर हल्ला चढवला. केर्न्स - चॅटफिल्ड - ब्रेसवेल यांची त्याने पद्धतशीरपणे धुलाई करण्यास सुरवात गेली. गावर - मार्क्स यांच्या ४१ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये मार्क्सच्या फक्तं ५ रन्स होत्या! अखेर केर्न्सच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या रिचर्ड हॅडलीने मार्क्सचा ऑफस्टंप उडवत ही पार्टनरशीप संपुष्टात आणली. इंग्लंड २०३ / ७!
मार्क्स आऊट झाल्यावरही गावरचा आक्रमकपणा यत्किंचितही कमी झाला नाही. मार्क्सच्या जागी बॅटींगला आलेल्या ग्रॅहॅम डिलीबरोबर त्याने ३० रन्स तडकावल्या. गावर एव्हाना ९० च्या पुढे गेला होता. तो आरामात सेंच्युरी ठोकणार अशी चिन्हं दिसत असतानाच...
हॅडलीच्या इनस्विंगरने डिलीचा मिडलस्टंप उडवला!
पुढच्याच बॉलवर विकेटकीपर इयन स्मिथने पॉल अॅलटचा कॅच घेतला!
बॉब विलीसने हॅडलीची हॅटट्रीक पूर्ण होणार नाही याची काळजी घेतली, पण तो फार काळ तग धरु शकला नाही..
चॅटफिल्डच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर गावरने एक रन काढली पण दुसर्याच बॉलवर विलीसला एलबीडब्ल्यू झाला!
९६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि ४ सिक्स तडकावत गावर ९२ रन्स काढून नॉटआऊट राहीला!
२३३ / ७ अशा स्कोरवरुन २३४ मध्ये इंग्लंडची इनिंग्ज आटपली होती. ती देखिल ५५.२ ओव्हर्समध्ये!
२३५ रन्सचं टार्गेट घेऊन बॅटींगला आलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमध्ये हादरवलं ते विलीसने. अनुभवी ग्लेन टर्नर पहिल्याच ओव्हरमध्ये एलबीडब्ल्यू झाला! या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच विलीसच्याच पुढच्या ओव्हरमध्ये विकेटकीपर गूल्डने ब्रूस एडगरचा कॅच घेतल्याने न्यूझीलंडची अवस्था ३ / २ अशी झाली!
कॅप्टन जेफ हॉवर्थ आणि जेफ क्रो यांनी सावध पवित्रा घेत न्यूझीलंडची इनिंग्ज सावरली. या दोघांनी १४ ओव्हर्समध्ये ४४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अॅलटने जेफ क्रोला बोल्ड केलं. जेफ क्रोच्या जागी आलेला मार्टीन क्रो आणि हॉवर्थ यांनीही कोणतीही रिस्क न घेता २८ रन्स जोडल्या, पण न्यूझीलंडची प्रगती धीमेपणानेच सुरु होती. त्यातच व्हिक मार्क्सला फटकावण्याच्या नादात मार्टीन क्रोचा ऑफस्टंप उडाला! न्यूझीलंड ७५ / ४!
मॅच जिंकण्यासाठी न्यूझीलंडला अद्याप १६० रन्सची आवश्यकता होती.
हॉवर्थ आणि अनुभवी जेरेमी कोनी यांनी फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्स काढण्यावर भर दिला. मार्क्स - अॅलट - बोथम यांच्या अचूक बॉलिंगपुढे फटकेबाजी करणं दोघांनाही कठीण जात होतं. पण बोथमच्या ऐवजी डिली बॉलिंगला आल्यावर आक्रमक पवित्रा घेत हॉवर्थने त्याला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. अॅलटच्या पुढच्याच ओव्हरमध्ये हॉवर्थने त्याला मिडविकेटवरुन सिक्स ठोकली. हॉवर्थ - कोनी यांनी ७१ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघे न्यूझीलंडला मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच...
अॅलटचा बॉल हॉवर्थने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
हॉवर्थच्या कॉलला प्रतिसाद देत कोनी क्रीज सोडून रन काढण्यासाठी दोन पावलं पुढे आला..
एव्हाना स्क्वेअरलेगला असलेल्या अॅलन लॅम्बने बॉल पिकअप केला होता..
लॅम्बच्या हातात बॉल गेलेला पाहून कोनीने रन काढण्याचा आपला विचार रद्दं केला आणि मागे फिरुन क्रीज गाठलं!
हॉवर्थ परत फिरला पण तो क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच लॅम्बचा थ्रो कलेक्ट करुन गूल्डने बेल्स उडवल्या!
१०४ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि अॅलटला मारलेल्या सिक्ससह हॉवर्थने ६० रन्स फटकावल्या!
हॉवर्थ परतल्यावर आलेल्या इयन स्मिथने आक्रमक पवित्रा घेत बोथमला कव्हर्समधून बाऊंड्री ठोकली, पण बोथमच्या पुढच्याच बॉलवर पुन्हा ड्राईव्ह मारण्याच्या नादात स्मिथची दांडी उडाली! न्यूझीलंड १५१ / ६!
अद्यापही मॅच जिंकण्यासाठी न्यूझीलंडला ८४ रन्स हव्या होत्या!
इयन स्मिथच्या जागी रिचर्ड हॅडली बॅटींगला आल्यावर कोनीने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. बोथमला त्याने लागोपाठ तीन बाऊंड्री तडकावल्या. हॅडलीनेही कोनीच्या पावलावर पाऊल टाकत अॅलट आणि विलीसला बाऊंड्री ठोकल्या. १६ ओव्हर्समध्ये कोनी - हॅडली यांनी ७१ रन्स फटकावल्या. हे दोघं न्यूझीलंडला २३५ चं टार्गेट गाठून देणार अशी चिन्हं दिसत असतानाच बॉब विलीसने हॅडलीचा लेगस्टंप उडवला. न्यूझीलंड २२१ / ७!
शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये मॅच जिंकण्यासाठी न्यूझीलंडला १४ रन्सची आवश्यकता होती.
कोनी आणि लान्स केर्न्स यांनी १० रन्स तडकावल्या, पण विलीसच्या बॉलवर केर्न्स एलबीडब्ल्यू झाल्यावर पुन्हा एकदा इंग्लंडच्या आशा पल्लवीत झाल्या!
शेवटची ओव्हर सुरु झाली तेव्हा न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी ४ रन्सची आवश्यकता होती.
पहिल्या २ बॉल्समध्ये कोनीने ३ रन्स काढल्यावर दोन्ही संघांचा स्कोर सेम झाला..
पण पुढचे २ बॉल्स ब्रेसवेलला काहीच करता आलं नाही!
पाचव्या बॉलला ब्रेसवेलने कव्हर्समधून बाऊंड्री ठोकली!
९७ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह ६६ रन्स फटकावत जेरेमी कोनी नॉटआऊट राहीला!
६० व्या ओव्हरचा एक बॉल बाकी असताना न्यूझीलंडने मॅच जिंकली!
बॉब विलीस म्हणतो,
"We should have won the match, but just could not get better of Coney. He stood their rock solid and pulled it through for New Zealand!"
प्रतिक्रिया
4 Feb 2017 - 2:42 pm | श्रीगुरुजी
मस्त! जुन्या आठवणी जागृत होताहेत.
१९८३ मधील ऑस्ट्रेलिया व झिंबाब्वे यांच्यातील सामन्याबद्दल पण लिहा. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराजित करून एक प्रचंड मोठा अपसेट नोंदविताना विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली होती. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अंदाजे १५ सामने अपसेट म्हणून ओळखले जातात. त्यात श्रीलंकेने १९७९ मध्ये भारताविरूद्द मिळविलेला विजय, १९८३ मध्ये झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय, १९९६ मध्ये केनयाने विंडीजचा ९६ धावात खुर्दा करून मिळविलेला विजय, २००३ मध्ये केनयाचा श्रीलंकेविरूद्ध व झिंबाब्वेविरूद्ध विजय, २००७ मध्ये बांगलाचा भारत व आफ्रिकेविरूद्ध विजय, २००७ मध्येच आयर्लंडचा पाकड्यांंविरूद्ध विजय, २०११ मध्ये आयर्लंडचाच इंग्लंडविरूद्ध विजय, २०११ मध्येच बांगला इंग्लंडविरूद्ध विजय, १९९९ मध्ये झिंबाब्वेचा भारताविरूद्ध विजय इ. सामन्यांसह २०१५ मधील बांगलादेशाचा इंग्लंडविरूद्ध विजय इ. सामन्यांचा समावेश होतो.
5 Feb 2017 - 7:53 am | स्पार्टाकस
वर्ल्डकपमधल्या जायंट किलर्सबद्दल पुढे-मागे लिहीणार आहेच. इंग्लंड - आयर्लंड मॅच या सिरीजच्या पुढच्या भागात आहे.
11 Feb 2017 - 4:12 pm | पैसा
मस्त!