वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
21 Feb 2017 - 9:12 am

२९ मे १९९९
काऊंटी ग्राऊंड, चेम्सफर्ड

इसेक्स काऊंटीचं माहेरघर असलेल्या चेम्सफर्डच्या मैदानात ग्रूप ए मधली दक्षिण आफ्रीका आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. ग्रूप ए मधून दक्षिण आफ्रीका आणि भारत या दोन संघांचा सुपर सिक्स मधला प्रवेश नक्की झाला होता. पण इंग्लंडच्या सुपर सिक्समधल्या प्रवेशाच्या आशा मात्रं या मॅचवर टिकून होत्या. दक्षिण आफ्रीकेने झिंबाब्वेचा पराभव केल्यास इंग्लंडचा सुपर सिक्समध्ये प्रवेश झाला असता, पण झिंबाब्वेने दक्षिण आफ्रीकेवर मात केल्यास मात्रं झिंबाब्वेने सुपर सिक्स मध्ये प्रवेश केला असता आणि तो देखिल सुपर सिक्समध्ये दाखल होणार्‍या भारत आणि दक्षिण आफ्रीका या दोन्ही संघांचा पराभव केल्याने त्यांच्याविरुद्धचे ४ पॉईंट्स घेऊन! अर्थात झिंबाब्वेचा संघ चांगला असला तरी दक्षिण आफ्रीकेपुढे त्यांचा कितपत निभाव लागेल याबद्दल सर्वांनाच शंका होती.

अ‍ॅलिस्टर कँपबेलच्या झिंबाब्वे संघात स्वतः कँपबेल, ग्रँट आणि अँडी हे फ्लॉवरबंधू, मरे गुडविन, स्ट्युअर्ट कार्लाईल असे बॅट्समन होते. झिंबाब्वेच्या बॉलिंगची मदार मुख्यतः होती ती हीथ स्ट्रीकवर. स्ट्रीकच्या जोडीला भारताविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरचा हिरो हेन्री ओलोंगा होता. या दोघांबरोबरच ऑलराऊंडर गाय व्हिटल आणि नील जॉन्सनचाही झिंबाब्वेच्या संघात समावेश होता. एडो ब्रँडेस आणि पॉल स्ट्रँग यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांच्या ऐवजी गाय व्हिटलचा भाऊ ऑफस्पिनर अँड्र्यू व्हिटल आणि लेगस्पिनर अ‍ॅडम हकलचा झिंबाब्वेच्या संघात समावेश करण्यात आला होता.

हॅन्सी क्रोनिएच्या दक्षिण आफ्रीकन संघात गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्ज, डॅरिल कलिनन, स्वतः क्रोनिए, जाँटी र्‍होड्स असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला मार्क बाऊचरसारखा विकेटकीपर - बॅट्समन दक्षिण आफ्रीकेकडे होता. दक्षिण आफ्रीकेच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अ‍ॅलन डोनाल्डवर होता. त्याच्या जोडीला स्टीव्ह एलवर्दी होता. पण दक्षिण आफ्रीकेची खरी ताकद होती ती म्हणजे कोणालाही हेवा वाटावा असे त्यांचे ऑलराऊंडर्स! अचूक बॉलिंग आणि प्रसंगी फटकेबाज बॅटींगसाठी प्रसिद्ध असलेला शॉन पोलॉक, कोणत्याही क्षणी एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता असलेला 'झुलु' लान्स क्लूसनर आणि या दोघांच्याही वरचढ असलेला जॅक कॅलीस!

अ‍ॅलिस्टर कँपबेलने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. नील जॉन्सनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत दक्षिण आफ्रीकेच्या बॉलर्सना फटकावण्याचा मार्ग पत्करला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये शॉन पोलॉकच्या बॉलवर इनसाईड एज लागून त्याला सुदैवी बाऊंड्री मिळाली, पण त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर त्याने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. जॉन्सनप्र्माणेच ग्रँट फ्लॉवरनेही आक्रमक पवित्रा घेत जॅक कॅलिसच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कव्हरड्राईव्हची बाऊंड्री वसूल केली! पोलॉकने तिसरी ओव्हर मेडन टाकली खरी, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. जवळपास प्रत्येक ओव्हरला किमान एक बाऊंड्री फटकावत जॉन्सनने पोलॉक आणि कॅलिस यांना धारेवर धरलं होतं. बाराव्या ओव्हरमध्ये जॉन्सनने कॅलिसला ३ बाऊंड्री तडकावल्या! जॉन्सनची फटकेबाजी सुरु असताना ग्रँट फ्लॉवरला मात्रं स्ट्राईक रोटेट करणंही कठीण जात होतं. अखेर स्टीव्ह एलवर्दीला कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात ग्रँट फ्लॉवरच्या बॅटची एज लागली आणि पहिल्या स्लिपमध्ये डॅरील कलिननने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे ६५ / १!

ग्रँट फ्लॉवर परतल्यावर बॅटींगला आलेल्या मरे गुडविनने सुरवातीला जॉन्सनला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. जॉन्सनची फटकेबाजी सुरुच होती. डोनाल्डने त्याला मेडन ओव्हर टाकल्यावर त्याने एलवर्दीला दोन बाऊंड्री तडकावल्या. परंतु सुरवातीच्या या फटकेबाजीनंतर मात्रं डोनाल्डने अचूक बॉलिंग करत त्याला जखडून टाकलं. परंतु मरे गुडविनने एलवर्दी आणि डोनाल्डच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या पोलॉकला फटकावण्यास सुरवात केली. जॉन्सन - गुडविन यांनी १७ ओव्हर्समध्ये ६६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर लान्स क्लूसनरला अ‍ॅक्रॉस द लाईन फटकावण्याच्या नादात मिडऑनला गॅरी कर्स्टनने गुडविनचा कॅच घेतला. ४५ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह गुडविनने ३४ रन्स फटकावल्या. ३१ ओव्हर्समध्ये झिंबाब्वेचा स्कोर होता १३१ / २!

गुडविन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या अँडी फ्लॉवरने सुरवातीला १-२ रन्स काढण्यावर भर दिला. हॅन्सी क्रोनिए - क्लूसनर यांच्या बॉलिंगवर तो कोणतीही रिस्क न घेता आरामात खेळत असलेला पाहून क्रोनिएने क्लूसनरच्या ऐवजी डोनाल्डला बॉलिंगला आणलं, पण अँडी फ्लॉवरने डोनाल्डला लाँगऑनवर दणदणीत सिक्स ठोकली! क्रोनिएच्या पुढच्या ओव्हरमध्ये अँडी फ्लॉवरने त्याला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. जॉन्सन - अँडी फ्लॉवर यांनी ३९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर डोनाल्डला पूल करण्याच्या प्रयत्नात जॉन्सनची टॉप एज लागली आणि स्क्वेअरलेगला पोलॉकने त्याचा कॅच घेतला. ११७ बॉल्समध्ये १० बाऊंड्रीसह जॉन्सनने ७६ रन्स फटकावल्या. अँडी फ्लॉवरने डोनाल्डच्या पुढच्याच बॉलवर बाऊंड्री मारली खरी, पण दोन बॉल्सनंतर डोनाल्डच्या बॉलवर कॅप्ट्न अ‍ॅलिस्टर कँपबेल पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. झिंबाब्वे १७५ / ४!

अँडी फ्लॉवर आणि गाय व्हिटल यांनी झिंबाब्वेचा स्कोर १८६ पर्यंत नेल्यावर....

हॅन्सी क्रोनिएचा बॉल अँडी फ्लॉवरने कट् केला आणि एक रन पूर्ण केली...
फ्लॉवरने दुसर्‍या रनसाठी कॉल दिला...
व्हिटलने फ्लॉवरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
पॉईंट बाऊंड्रीवर शॉन पोलॉकने बॉल पिकअप केला...
विकेटकीपर मार्क बाऊचरने पोलॉकचा थ्रो कलेक्ट करुन बेल्स उडवल्या...
फ्लॉवर आणि व्हिटल जेमतेम अर्ध्या पीचवर एकमेकाला क्रॉस झाले होते!

३५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि डोनाल्डला मारलेल्या सिक्ससह २९ रन्स फटकावल्यावर अँडी फ्लॉवर रनआऊट झाला.
झिंबाब्वे १८६ / ५!

अँडी फ्लॉवर परतल्यावर झिंबाब्वेचा रनरेट मंदावला. क्रोनिए - क्लूसनर यांच्या पुढच्या २ ओव्हर्समध्ये फक्तं ५ रन्स निघाल्यावर गाय व्हिटलने क्रोनिएला लाँगऑफ बाऊंड्रीपार सिक्स ठोकली, पण डोनाल्डला कव्हरड्राईव्ह मारण्याचा व्हिटलचा प्रयत्नं साफ फसला आणि कलिननने एक्स्ट्राकव्हरला त्याचा कॅच घेतला. हीथ स्ट्रीकने डोनाल्डला मिडऑफवर बाऊंड्री तडकावली, पण शेवट्च्या ओव्हरमध्ये पोलॉकच्या अचूक बॉलिंगमुळे स्ट्रीक - कार्लाईल यांना फटकेबाजी करणं अशक्यं झालं.

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा झिंबाब्वेचा स्कोर होता २३३ / ६!

दक्षिण आफ्रीकेच्या बॅटींग लाईनअपचा विचार करता २३४ रन्सचं टार्गेट आवाक्यातलं होतं. झिंबाब्वेची इनिंग्ज संपल्यानंतर पावसाची सर आल्यामुळे दक्षिण आफ्रीकेची इनिंग्ज सुरु होण्यास सुमारे पाऊण तास उशीर झाला, पण एकही ओव्हर कमी झाली नव्हती.

दक्षिण आफ्रीकेच्या इनिंग्जचा पहिलाच बॉल...
नील जॉन्सनचा ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडलेला बॉल अचानक उसळला...
गॅरी कर्स्टनने डिफेन्सिव पवित्रा घेतला पण बॉल त्याच्या बॅटच्या हँडलला लागून गलीच्या दिशेने उडाला...
गलीत असलेल्या अँड्र्यू व्हिटलने उजवीकडे डाईव्ह मारत अफलातून कॅच घेतला.
दक्षिण आफ्रीका ० / १!

कर्स्टन पहिल्याच बॉलवर आऊट झाल्यावर पिंच हिटर म्हणून मार्क बाऊचर बॅटींगला आला, पण जॉन्सन - स्ट्रीक यांच्या अचूक बॉलिंगमुळे बाऊचर आणि हर्शेल गिब्ज यांना फटकेबाजी करता येणं कठीण जात होतं. पाचव्या ओव्हरमध्ये बाऊचरने जॉन्सनला बाऊंड्री मारली खरी पण जॉन्सनच्या पुढच्याच ओव्हरमध्ये...

जॉन्सनचा लेगस्टंपच्या लाईनमध्ये पडलेला बॉल बाऊचरने मिडविकेटला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
गिब्जने बाऊचरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण क्रीज सोडून दोन पावलं पुढे आल्यावर तो थबकला...
मिडविकेटला अ‍ॅडम हकलने डावीकडे डाईव्ह मारत बॉल अडवला...
एव्हाना बाऊचर अर्ध्या पीचच्याही पुढे आलेला पाहून गिब्जने पुन्हा रनसाठी धाव घेतली पण...
हकलचा थ्रो कलेक्ट करुन अँडी फ्लॉवरने बेल्स उडवल्या...
गिब्ज क्रीजपासून किमान चार फूट दूर होता!
दक्षिण आफ्रीका २४ / २!

स्ट्रीकच्या पुढच्या ओव्हरमध्ये....
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला पहिलाच बॉल कट् करण्याचा बाऊचरचा प्रयत्नं फसला...
पॉईंटवर ग्रँट फ्लॉवरने आरामात कॅच घेतला पण...
स्ट्रीकचा पाय क्रीजच्या रेषेपुढे पडला होता!
नो बॉल!

बाऊचर आऊट होण्यापासून वाचला खरा पण...
स्ट्रीकच्या ओव्हरचा चौथा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
बाऊचरने लेगसाईडला - अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला...
मिडलस्टंपच्या समोर बॉल त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर डेव्हीड शेपर्डचं बोट वर झालं!
दक्षिण आफ्रीका २५ / ३!

पुढच्या ओव्हरमध्ये...
जॉन्सनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
हा बॉल सोडून दिला असता तर काहीही फरक पडला नसता पण...
जॅक कॅलीसने कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
विकेटकीपर अँडी फ्लॉवरने कॅच घेण्यात बिलकूल हयगय केली नाही!
दक्षिण आफ्रीका २५ / ४!

जॉन्सनचा दुसरा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
हॅन्सी क्रोनिएनेही कलिननप्रमाणेच कव्हरड्राईव्ह मारण्याचा पवित्रा घेतला...
क्रोनिएच्या सुदैवाने दुसरी स्लिप आणि गलिच्या मधून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला...
अर्थात हा कॅच पकडला गेला असता तरी क्रोनिए आऊट झाला नसता कारण जॉन्सनचा तो बॉल नो बॉल होता!

स्ट्रीकच्या पुढच्या ओव्हरमध्ये डॅरील कलिननने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारली पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

जॉन्सनचा बॉल ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
क्रॉनिएला त्याचा अंदाजच आला नाही...
त्याची बॅट खाली येण्यापूर्वीच जॉन्सनचा यॉर्कर ऑफस्टंपवर आदळला!
दक्षिण आफ्रीका ३४ / ५!

स्ट्रीकच्या पुढच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला जाँटी र्‍होड्सने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. र्‍होड्स आणि कलिनन शांत डोक्याने दक्षिण आफ्रीकेला या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा असतानाच...

स्ट्रीकचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला....
र्‍होडसने फ्रंटफूटवर येत बॉल मिडऑनला फ्लिक करण्याचा प्रयत्नं केला पण...
अचूक टप्प्यावर पडलेला बॉल सीम होऊन आत आला आणि मिडलस्टंपसमोर र्‍होड्सच्या पॅडवर लागला...
पुन्हा एकदा डेव्हीड शेपर्डचं बोट वर गेलं!

१२ ओव्हर्समध्ये जॉन्सन आणि स्ट्रीक यांनी दक्षिण आफ्रीकेची ४० / ६ अशी अवस्था करुन टाकली!

र्‍होड्स परतल्यावर बॅटींगला आलेल्या शॉन पोलॉकने डॅरील कलिननबरोबर दक्षिण आफ्रीकेची इनिंग्ज सावरण्यास सुरवात केली. स्ट्रीकच्या जागी बॉलिंगला आलेल्या गाय व्हिटलला मिडविकेटला बाऊंड्री मारल्यावर पोलॉकने पुढच्या ओव्हरमध्ये जॉन्सनला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पोलॉकच्या पावलावर पाऊल टाकत कलिननने लेगस्पिनर अ‍ॅडम हकलला कट्ची बाऊंड्री तडकावली. जॉन्सनच्या ऐवजी ओलोंगाला बॉलिंगला आलेल्या ओलोंगालाही कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारण्याची संधी पोलॉकने सोडली नाही. कलिननने गाय व्हिटलला आणखीन एक बाऊंड्री मारल्यावर कँपबेलने हकलच्या जोडीला ऑफस्पिनर अँड्र्यू व्हिटलला बॉलींगला आणलं. ही चाल चांगलीच यशस्वी ठरली. अँड्र्यू व्हिटलला त्याच्या डोक्यावरुन फटकावण्याचा कलिननचा प्रयत्नं फसला आणि व्हिटलनेच त्याचा अफलातून कॅच घेतला! ६७ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह कलिननने २९ रन्स काढल्या. दक्षिण आफ्रीका १०६ / ७!

शेवटच्या २० ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला १२६ रन्सची आवश्यकता होती!

कलिनन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या लान्स क्लूसनरने सुरवातीला झिंबाब्वेच्या बॉलर्सना सावधपणे खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. हकल आणि अँड्र्यू व्हिटलचे बॉल चांगलेच टर्न होत असल्याने क्लूसनर आणि पोलॉक यांना १-२ रन्स काढणंही कठीणच जात होतं. हकलच्या १० ओव्हर्स पूर्ण झाल्यावर कँपबेलने चाणाक्षपणे बॉलिंगला आणलेल्या ग्रँट फ्लॉवरनेही अचूक बॉलिंग करत पोलॉक आणि क्लूसनरला फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. पोलॉक - क्लूसनर यांनी ४३ रन्सची पार्टनरशीप केली खरी पण त्यासाठी तब्बल ११ ओव्हर्स खर्ची पडल्या होत्या.

अद्याप ९ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ८६ रन्स बाकी होत्या!

४२ व्या ओव्हरमध्ये...
अँड्र्यू व्हिटलचा बॉल पोलॉकने त्याच्या डोक्यावरुन तडकावल...
सिक्स जाणार या अपेक्षेने सगळ्यांच्या नजरा बाऊंड्रीकडे लागलेल्या असतानाच...
लाँगऑफवरुन धावत आलेल्या ओलोंगाने साईटस्क्रीनच्या समोर हवेत डाईव्ह मारली...
... आणि ग्राऊंडला पाय लागताच शरीराचा बॅलन्स सांभाळून बाऊंड्रीला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतली!

८१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह पोलॉकने ५२ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका १४९ / ८!

पुढच्याच ओव्हरमध्ये स्टीव्ह एलवर्दीने स्ट्रीकचा बॉल कव्हर्समध्ये अँड्र्यू व्हिटलच्या हातात ड्राईव्ह केला!
दक्षिण आफ्रीका १५० / ९!

शेवटच्या ७ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ८३ रन्सची आवश्यकता होती!
दक्षिण आफ्रीकेच्या उरल्यासुरल्या सर्व आशा क्लूसनरवर होत्या. त्याच्या जोडीला होता अ‍ॅलन डोनाल्ड!

क्लूसनरसमोर आता फटकेबाजी करण्यापलीकडे मार्गच उरला नव्हता. ४४ व्या ओव्हरमध्ये अँड्र्यू व्हिटलला मिडऑनला बाऊंड्री तडकावल्यावर पुढच्याच बॉलवर क्लूसनरने स्ट्रेट सिक्स ठोकली. पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने गाय व्हिटलला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारली. ओलोंगाच्या ४६ व्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स निघाल्या, पण स्ट्रीकच्या ओव्हरमध्ये क्लूसनरने मिडविकेटला सिक्स ठोकली!

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ४९ रन्स बाकी होत्या!
झिंबाब्वेच्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे आणखीन १५ रन्सच्या आत दक्षिण आफ्रीकेची शेवटची विकेट घेतल्यास झिंबाब्वेचा सुपर सिक्समधला प्रवेश नक्की होता!

४८ व्या ओव्हरमध्ये...
ओलोंगाचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
डोनाल्डने कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
कव्हर्समध्ये डोक्यावरुन बॉल जात असताना हीथ स्ट्रीकने हवेत जंप मारली...
दक्षिण आफ्रीका १८५ ऑल आऊट!

५८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि २ सिक्स तडकावत ५२ रन्स फटकावून क्लूसनर नॉटआऊट राहीला...
झिंबाब्वेने ४८ रन्सने मॅच जिंकून सुपर सिक्समध्ये धडक मारली!
दक्षिण आफ्रीकेवर वन डे मिळवलेला झिंबाब्वेचा हा पहिलावहिला विजय!

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच नील जॉन्सनची निवड झाली!

जॅक कॅलिस म्हणतो,
"Neil was a very good player. On his day, he could be very dangerous & that was his day! Zimbabwe were really good side. We didn’t take them as seriously as we should have and we deservedly lost."

क्लूसनर म्हणतो,
"Jonno was the catalyst of Zimbabwe’s victory. He caught us off guard and got 3 quick wickets. We could never recover from that!"

सुपर सिक्समध्ये न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामध्ये वाहून गेल्यावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानपुढे झिंबाब्वेचा निभाव लागला नाही.
नील जॉन्सनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३२ रन्स फटकावल्या, पण तो झिंबाब्वेचा पराभव टाळू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये एका इनिंग्जमध्ये सर्वात जास्तं रन्स करण्याचा विक्रम नील जॉन्सनच्याच नावावर आहे!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

21 Feb 2017 - 9:33 am | अभिजीत अवलिया

ही मॅच दक्षिण आफ्रिका जाणूनबुजून हरली असे म्हणले जात होते.

गॅरी ट्रुमन's picture

21 Feb 2017 - 9:51 am | गॅरी ट्रुमन

ही मॅच दक्षिण आफ्रिका जाणूनबुजून हरली असे म्हणले जात होते.

हो ज्या पध्दतीने दक्षिण आफ्रिकेचा संघ खेळत होता ते पाहता मलाही असेच वाटले होते.

१९९९ ची फायनलही पाकिस्तानने अशीच सोडली होती असे वाटले होते. अगदीच एकतर्फी मॅच झाली होती ती.

स्पार्टाकस's picture

21 Feb 2017 - 10:03 am | स्पार्टाकस

ही मॅच दक्षिण आफ्रीकेने मुद्दाम हरली असेल असं मला तरी वाटत नाही.

ही मॅच हरल्यामुळे दक्षिण आफ्रीकेला सुपर सिक्समध्ये जाताना भारताविरुद्ध मिळालेले २ पॉईंट्सच कॅरी फॉरवर्ड करता आले. सुपर सिक्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची मॅच हरल्यामुळे दक्षिण आफ्रीका दुसर्‍या स्थानावर राहिली आणि परिणामी त्यांना ऑस्ट्रेलियाशीच ती सुप्रसिद्धं सेमीफायनल खेळावी लागली. ही मॅच जिंकून ४ पॉईंट्ससह दक्षिण आफ्रीका सुपर सिक्समध्ये आले असते तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतरही दक्षिण आफ्रीकेची न्यूझीलंडशी सेमीफायनल झाली असती आणि ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान मॅच फायनल ऐवजी सेमीफायनलला झाली असती.

गणामास्तर's picture

21 Feb 2017 - 10:36 am | गणामास्तर

मस्त चालू आहे मालिका ! आता वाट पाहतोय सेमी फायनल ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका सामन्याची, मनावर कायमचा कोरला गेलेला सामना. .

बापू नारू's picture

21 Feb 2017 - 5:57 pm | बापू नारू

झिंबाब्वे चा संघ त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यावेळी टॉप ला होता . छान टीम होती त्यावेळी.