न्यू यॉर्क : १७ : सेंट्रल पार्क-१

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
16 Nov 2016 - 12:50 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

न्यू यॉर्क शहराची भटकंती करताना दोन-एक तास वेगळे काढून या उद्यानाची फेरी जरूर मारा. जास्त वेळ गाठीला असेल तर या उद्यानाच्या एका टोकाकडून दुसरीकडे जात असताना त्याच्या बाजूला असलेल्या अनेक रेस्तराँना, दुकानांना आणि संग्रहालयांना भेट देत देत आख्खा दिवस सहजपणे मजेत घालविता येईल.

सेंट्रल पार्क हा मॅनहॅटन बेटाच्या मध्यभागी असलेला एक मोठा शहरी (अर्बन) पार्क आहे. एखाद्या महानगरातील काँक्रिट जंगलाच्या मध्यभागी, बिल्डर लॉबीच्या विरोधाला न जुमानता, दाट वृक्षराजीने भरलेले जंगल असावे हे जेवढे आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा जास्त आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य पार्कमध्ये सहसा न आढळणार्‍या अनेक गोष्टी येथे खच्चून भरलेल्या आहेत. उगाच नाही या जागेला भेट देण्यासाठी जगभरातून दरवर्षी ४ कोटीपेक्षा जास्त लोक येतात ! त्याचबरोबर The most filmed location in the world, National Historic Landmark, इत्यादी अनेक लौकिकही या जागेच्या नावावर दाखल आहेत. या स्थळाचे चित्रिकरण ३० पेक्षा जास्त चित्रपट व टीव्ही मालिकांत झाले आहे; पाचपेक्षा जास्त आल्बम्समधल्या गाण्यांत याचा उल्लेख आहे, दोनतीन कांदबर्‍यांत याची पार्श्वभूमी आहे आणि अनेक विख्यात चित्रकारांनी या पार्कमधिल दृश्यांची चित्रे चितारली आहेत.

१८२१ ते १८५५ या कालखंडात वेगाने विस्तारणार्‍या न्यू यॉर्क शहराची लोकसंख्या चौपटीने वाढली. सुरुवातीला मुख्यतः मॅनहॅटनच्या दक्षिण टोकाला असलेली झालेली वस्ती झपाट्याने उत्तरेच्या दिशेने पसरू लागली. शहराच्या गजबटातून काही काळ विसावा मिळावा यासाठी नागरिक शहरातल्या तुरळक मोकळ्या जागा व दफनभूमींचा वापर करत असत. ही परिस्थिती सुधारून लोकांना मनोरंजनासाठी शांत व सुंदर पार्कची गरज आहे ही कल्पना मूळ धरू लागली. बेटावरच्या वस्तीच्या विकासाचा आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) १८११ सालीच तयार झालेला होता. त्याप्रमाणे आखणी करून जमिनीत खुणांचे सर्वेइंग बोल्टही ठोकले गेले होते. पार्कच्या जमिनीत यापैकी काही बोल्ट्स अजूनही सापडतात व त्यांची ऐतिहासिक वस्तूंच्या रूपात जपणूक केली जाते. यावरून मूळ आराखड्यात कोणत्याही मोठ्या पार्कच्या जागेची तरतूद नव्हती हे सिद्ध होते.


कोणत्याही मोठ्या पार्कची व्यवस्था नसलेला १८११ सालचा न्यू यॉर्क शहराचा विकास आराखडा (जालावरून साभार)


सेंट्रल पार्कच्या आवारात १८११ साली सर्वे करून आखणी करताना खडकाळ जमिनीत ठोकलेले असे बोल्ट्स काही ठिकाणी अजूनही दिसतात. त्यांची ऐतिहासिक वस्तू म्हणून जपणूक केली जाते. (जालावरून साभार)

१८४४ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ईव्हिनिंग पोस्ट नियतकालिकाचा संपादक विल्यम ब्रायंट आणि अमेरिकेचा पहिला लॅंडस्केप आर्किटेक्ट अँड्रयू डावनिंग यांनी पॅरिसमधल्या बो द बोलोन (Bois de Boulogne) किंवा लंडनमधल्या हाईंड पार्कप्रमाणे न्यू यॉर्क शहरातही एक मोठा सार्वजनिक पार्क असावा यासाठी जनजागरण सुरू केले. खूप कालाच्या झगड्यानंतर व अनेक अपयशी प्रयत्नांनंतर शासनाने त्यांची मागणी मान्य करून १८५३ मध्ये पार्कची जागा नक्की करून तिच्या खरेदीसाठी $५० लाख मंजूर केले.

फ्रेडरिक लॉ ओम्स्टेड व कॅलवर्ट वॉ नावाच्या प्रसिद्ध वास्तुविशारद व उद्यानविशारदांनी बनवलेल्या "Greensward Plan" नावाच्या आराखड्याने स्पर्धा जिंकली आणि ३१५ हेक्टर आकाराच्या पार्कचा विकास करण्यास १८५७ साली सुरुवात झाली. १८५८ साली पार्कचा दक्षिणेकडील पहिला भाग जनतेसाठी खुला झाला. अमेरिकन सिविल वॉरच्या (१८६१ ते १८६५) दरम्यानही त्याचे काम सुरू होते. इतकेच नव्हे तर या पार्कच्या आकारमानात उत्तर दिशेने वाढ करत करत त्याचे क्षेत्रफळ १८७३ पर्यंत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ३.४१ चौ किमी (३४१ हेक्टर किंवा ८४३ एकर) इतके वाढवले गेले.

साधारणपणे ४ X ०.८ किमी आकाराच्या सेंट्रल पार्कच्या पूर्वपश्चिम सीमा पाचवा ते आठवा अ‍ॅव्हन्यू आणि दक्षिणोत्तर सीमा ५९वा ते ११० वा स्ट्रीट अश्या आहेत. म्हणजेच, हा पार्क मॅनहॅटनच्या एकूण १५३ मध्यवर्ती महागड्या (प्राइम) ब्लॉक्सची जागा व्यापून आहे ! मॅनहॅटन बेटाच्या एकूण ५९.१ चौ किमी क्षेत्रफळाचा ५.८% भाग या एका पार्कने व्यापलेला आहे ! डिसेंबर २००५ मध्ये मिलर सॅम्युअल या नावाजलेल्या मालमत्ता मुल्यमापक संस्थेने केलेल्या अभ्यासात या जागेची किंमत $५२८.८ बिलियन (रु ३ लाख ५४ हजार कोटी) इतकी ठरविण्यात आली होती !! इतक्या मोठ्या जागेच्या प्रशासनासाठी स्वतंत्र नागरी प्रभाग, अँब्युलन्स सेवा व पोलीस चौकी आहेत.

          
पार्कचे मॅनहॅटन बेटावरचे स्थान व आकार दाखवणारा नकाशा (डावीकडे) आणि
पूर्णपणे विकसित सेंट्रल पार्कचा त्याच्या बाजूच्या रस्त्यांसकट नकाशा (दोन्ही नकाशे जालावरून साभार)

बर्‍यावाईट क्लृप्त्या वापरून मोकळ्या जागा गिळंकृत करण्यार्‍या शहरी बांधकाम लॉबीचा अनुभव आपल्याला आहेच. त्यामुळे, वेगाने वाढणार्‍या शहरातला विशाल मध्यवर्ती भाग पार्कसाठी राखून ठेवण्यासाठी नागरिकांना किती मोठा व प्रदीर्घ संघर्ष करावा लागला असेल याची थोडीबहुत कल्पना आपण नक्की करू शकतो.

या विशाल पार्कच्या निर्माणात अनेक अडथळे आले, विकासक आणि प्रशासकांमध्ये अनेक भांडणे झाली, ओम्स्टेडला प्रकल्पातून बाहेर काढले गेले आणि अनेक वादग्रस्त घटना घडल्या. अखेर १८७३ मध्ये त्याचे सर्व काम पुरे झाले.

पार्कच्या अनेक भागात दगडांनी भरलेली किंवा खडकाळ जमीन होती. एकूण एक कोटी गाड्याभर राडारोडा बाहेर काढावा लागला. आराखड्याप्रमाणे झाडाझुडुपांची लागवड करता यावी यासाठी पार्कच्या मूळ ओसाड जमिनीवर न्यू जर्सीतून १४,१०० घन मीटर सुपीक माती आणून पसरली गेली. पार्क सुंदर बनविण्यासाठी १५०० पेक्षा जास्त प्रजातींच्या ४० लाखापेक्षा जास्त झाडे, झुडुपे व फुलझाडांची लागवड केली गेली. हे सर्व काम इतक्या कौशल्याने केलेले आहे की हा पार्क एखाद्या नैसर्गिकरीत्या झाडीने भरलेल्या जंगलाच्या जागेवर बनवला आहे असेच वाटते.

या पार्कच्या कल्पनेमागचे लोक कालमानाप्रमाणे जसजसे जगाचा निरोप घेऊ लागले तसतशी सुरुवातीच्या उत्साहाला ओहोटी लागून पार्क अनावस्थेत जात राहिला. पार्कच्या सौंदर्याच्या ओहोटीला जनतेच्या अनिर्बध वागणुकीने आणि ग्रेट डिप्रेशनमधील आर्थिक मंदीने हातभार लावला. १९३४ मध्ये फिओरेल्लो ला गार्दिया (न्यू यॉर्कच्या ला गार्दिया आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव याच्याच स्मरणार्थ दिलेले आहे) न्यू यॉर्क शहराचा मेयर झाल्यावर मात्र चित्र पालटू लागले. त्याने शहराच्या पाच वेगवेगळ्या पार्कसंबंधीच्या विभागांचे एकत्रीकरण करून रॉबर्ट मोझेस याच्याकडे पार्क्स सुधारण्याची मोहीम एकहाती सोपवली. मोझेसने धडाडीने काम करून एका वर्षात या पार्कमध्ये अनेक पुनर्निर्माणाची कामे केली, पार्कच्या जमिनीवरच्या अनधिकृत झोपड्या उठवल्या, नवीन झाडेझुडुपे लावली, नवीन तलाव निर्माण केले आणि मुख्य म्हणजे मूळ पार्कच्या आराखड्यात नसलेली १९ खेळाची मैदाने, १२ बेसबॉल मैदाने, एक हँडबॉल कोर्ट आणि अनेक हिरवळी बनवून त्याला अधिक लोकाभिमुख बनवले. या कामांसाठी त्याने सरकार व जनता या दोघांकडून पैसे उभे केले.

शंभर वर्षांच्या भरभराटीनंतर १९६०-७० च्या दशकांत या पार्कची परत हेळसांड सुरू झाली. तो दिवसा धुळीचे मैदान आणि रात्री गुंडांचे माहेरघर झाला. ही अनावस्था सहन न झाल्याने नागरिक अनेक संघटनांच्या पुढे आल्या. त्यांनी स्वयंसेवी कामे व पैसा उभारण्याचे कार्यक्रम सुरू केले. त्यांच्यापैकी Central Park Community Fund नावाच्या नागरिक संघटनेने पार्कच्या व्यवस्थापनाचा आराखडा बनवून महानगरपालिकेला त्यानुसार पार्कची व्यवस्थापन प्रणाली बनविणे भाग पाडले. या प्रणालीतील तरतुदींप्रमाणे निवडक नागरिकांचे एक "Board of Guardians" पार्कच्या नवीन योजनांचे आराखडे संमत करणे, संमत आराखड्यांप्रमाणे होणारी कामे आणि रोजचे व्यवस्थापन या सर्वांवर सतत नजर ठेवून असते.


रॉकंफेलर सेंटरच्या निरिक्षणमनोर्‍यावरून दिसणारे काँक्रिट जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सेंट्रल पार्कचे विहंगम दृश्य

नव्वदीच्या दशकापासून नागरिकांच्या देखरेखीमुळे आणि सतत केल्या जाणार्‍या विकासकामांमुळे हा पार्क अधिकाधिक आकर्षक होत आहे आणि त्याने शहरातल्या महत्त्वाच्या आकर्षणांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. इथे आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमुळे त्याला शहराच्या जीवनात एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थान प्राप्त झाले आहे. त्याच्यावरून प्रेरणा घेऊन अमेरिकेत व जगभरही अनेक पार्क्स निर्माण केले गेले आहेत; उदाहरणार्थ : सान फ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट पार्क, तोक्योचा उएनो पार्क, व्हँकुवरचा स्टॅनली पार्क, इ.

अमेरिकेन पार्क्सच्या विकास व व्यवस्थापनामध्ये हा दोन समान दुवे सतत दिसतात. पहिले म्हणजे, पार्कचे विकासक केवळ कंत्राटदारांसारखे दगडमाती झाडापाल्याचे काम करून थांबत नाहीत तर सरकार व जनतेमधला दुवा बनून विकासासाठी पैसा उभा करताना दिसतात. दुसरे म्हणजे सरकार व जनता या दोघांच्या सहकार्याने पार्कचे व्यवस्थापन भविष्याही उत्तम रितीने चालू रहावे यासाठी मनापासून प्रयत्न करताना दिसतात. नागरिकही या कामात रस घेतात व सर्व तर्‍हेचे सक्रिय सहकार्य करायला पुढे असतात. याचा परिणाम, छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या सर्व पार्क्सचे निर्माण, रोजची देखभाल व दीर्घकालासाठी व्यवस्थापन, उत्तम रितीने चालू राहण्यात झाला आहे.

सद्या Central Park Conservancy नावाची ना-नफा संस्था पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप तत्त्वावर सेंट्रल पार्कचे व्यवस्थापन चालवत आहे. या संस्थेचा अध्यक्ष पार्कचा पदसिद्ध कार्यकारी अधिकारी बनतो. या पार्कच्या $४ ते ६.५ कोटी वार्षिक खर्चाचा ८५% हिस्सा ही संस्था उभा करते व पार्कमधले ८० टक्के कर्मचारी स्वतःच्या अधिकारात नेमते. या संस्थेने बनवलेली पार्क व्यवस्थापन प्रणाली इतकी यशस्वी झाली आहे की ती शहरातल्या इतर अनेक पार्क्समध्येही लागू केलेली आहे.

***************

या पार्कचे आजचे झाडी-झुडुपे, तलाव आणि हिरवळींनी भरलेले आकर्षक रूप पाहताना तो मूळच्या खडकाळ, ओसाड जागेवर वसवलेला आहे आणि त्यातले सर्व तलाव मानवनिर्मित आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. येथे पायवाटांची असंख्य जाळी, दोन आईस स्केटिंग रिंक्स (यातल्या एकीचा जुलै व ऑगस्टमध्ये पोहण्याचा तलाव बनतो !), प्राणिसंग्रहालय, फुलझाडांनी भरलेली बाग, अभयारण्य, उघडे प्रेक्षागृह, शेक्सपियरची नाटके सादर करणारे देलाकोर्टे उघडे थिएटर, बेलवेडर किल्ला, स्वीडिश कॉटेज मॅरिओनेट थिएटर, ऐतिहासिक चक्री, इत्यादी अनेक आकर्षणे खच्चून भरलेली आहेत.


सेंट्रल पार्कामधील रस्त्यांची व पायवाटांची जाळी, विविध आकर्षणांची स्थाने व इतर विशेष दाखविणारा नकाशा (सेंट्रल पार्कच्या संस्थळावरून साभार)

चालायची इच्छा नसल्यास या पार्कची सफर तेथे भाड्याने मिळणार्‍या सायकलीने किंवा घोड्याच्या बग्गीतून करता येते. पर्यटन-कालात (उन्हाळ्यात) बग्गीचा पर्याय बराच महाग (दोन-अडीच तासांच्या फेरीला माणशी $५० किंवा जास्त) असू शकतो. मार्गदर्शकासह चालत, सायकलने किंवा बग्गीतून सहल करण्याचा पर्यायही येथे आहे.

हाती भरपूर वेळ असल्याने या विविध आकर्षणांनी भरलेल्या विस्तीर्ण पार्कमध्ये फिरायला संपूर्ण दिवस राखून ठेवला होता. शिवाय, आपल्या मनाप्रमाणे रमत गमत फिरत व आपल्याला मनोरंजक वाटणार्‍या आकर्षणाच्या जागी हवा तेवढा वेळ थांबत पार्क पहायचा असल्यास स्वतःच्या हातात माहितीपत्रक पकडून पार्कच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत चालण्याला पर्याय नाही. ५९व्या स्ट्रीटपासून ११०व्या स्ट्रीटपर्यंत पार्कची लांबी चारएक किमी असली तरी त्यातली सगळी आकर्षणे पहायला आळीपाळीने डावीउजवीकडे वळत वळत बरेच जास्त (सहा ते आठ किमी) अंतर चालायची तयारी असायला लागते. थोडा विचार करून आम्हाला हाच पर्याय उत्तम वाटला.

सकाळी लवकरच घरातून निघून कोलंबस सर्कल सबवे स्टेशन गाठले. जमिनीवर आल्या आल्या एक पोलादी पृथ्वीगोल आणि त्याच्या मागची ट्रंप इंटरनॅशनल हॉटेलची गगनचुंबी इमारत समोर आली. समोरचा रस्ता ओलांडून काही अंतर चालल्यावर पार्कच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशभागात असलेले शिल्पांनी सजवलेले भव्य स्मारक दिसले...

  
पोलादी पृथ्वीगोल व त्याच्या मागचे ट्रंप इंटरनॅशनल हॉटेल आणि दक्षिणेकडील मुख्य प्रवेशभागात असलेले स्मारक


प्रवेशभागात असलेली शिल्पे

"प्रवेशभाग" असे मुद्दाम म्हटले आहे कारण या पार्कला असलेल्या वीस प्रवेशमार्गांवर एकही प्रवेशद्वार (दरवाजा) नाही ! आत शिरल्यावर १५-२० मीटरवर दाट झाडी आणि फुलझाडांच्या मधे असलेले पायवाटांचे जाळे लागले...


सेंट्रल पार्कचे प्रथमदर्शन ०१


सेंट्रल पार्कचे प्रथमदर्शन ०२

पार्कच्या मधून जाणार्‍या डांबरी रस्त्यावरून एखाददुसरी घोड्यांची बग्गी जाताना दिसत होती...


सेंट्रल पार्कामधील बग्गी

मन प्रसन्न करणार्‍या हिरवाईतून काही वेळ चालल्यावर उजवीकडे वळत आम्ही सेंट्रल पार्क प्राणिसंग्रहालयाजवळ पोहोचलो. तेथे असलेल्या सिनेमा थिएटरमध्ये आईस एज या कार्टून चित्रपटाची छोटी 4D आवृत्ती दाखवली जात होती. प्रथम हा एक नवा अनुभव घ्यावा व नंतर प्राणिसंग्रहालय बघावे असे ठरले. तिकिटघराचे आवार एखाद्या बागेला लाजवेल असे होते...


चित्रपटगृहाचे आवार

चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार त्या आवाराशी स्पर्धा करेल असेच सुंदर होते...


चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार

१०-१५ मिनिटांच्या 4D चित्रपटाचा पहिलावाहिला अनुभव घेऊन तेथून बाहेर पडून आम्ही प्राणिसंग्रहालयाकडे निघालो.

सेंट्रल पार्क प्राणिसंग्रहालय

उजव्या बाजूला वळून उत्तरपूर्वेच्या दिशेने काही अंतर चालल्यावर ५व्या अ‍ॅव्हन्यूला लागून असलेले व झाडीत लपलेले प्राणिसंग्रहालय सापडले. पाच एकर क्षेत्रफळावर असलेल्या या संग्रहालयात जगभरातून आणलेल्या १३० पेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांच्या प्रजाती आहेत. त्या जीवांच्या स्थानिक पर्यावरणाला साजेसे हवामान नियंत्रित केलेली, झाडाझुडुपांची लागवड केलेली व जरूर तेथे कृत्रिम पाणीसाठे असलेली दालने आहेत.

    
  
प्राणिसंग्रहालयातले काही वैशिष्ट्यपूर्ण पक्षी

जमिनीवरून चालणार्‍या सगळ्या प्राण्यांचा आज आरामाचा दिवस असावा त्याप्रमाणे त्या सर्वांनी ताणून दिली होती. मात्र पाण्यातल्या प्राण्यांनी चपळाईने पोहण्याचे प्रदर्शन करून त्यांच्या आळसाची कसर भरून काढली होती...

  
  
आरामात पहुडलेले मुंगूस, बर्फाळ प्रदेशातला चित्ता (स्नो लेपर्ड), ग्रिझली बेअर आणि
पाण्यात अथक येरझार्‍या घालणारे पाणमांजर

एका मोठ्या उघड्या तलावात सहा सात समुद्री सिंह (सी लायन) वेगवेगळ्या कसरती करत लोकांचे मनोरंजन करत होते...


कसरती करून लोकांचे मनोरंजन करणारे समुद्री सिंह

संग्रहालयातील एक भाग पाळीव प्राण्यांसाठी राखीव ठेवलेला आहे...

  
  
पाळीव प्राणी

येथे एक छोटेसे मत्स्यालय आहे, पण त्यात फारसे आकर्षक असे काही दिसले नाही. तेथून बाहेर आलो तर समोरच संग्रहालयाचे रेस्तराँ दिसले. त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एक बगिचाच होता...

  
  
संग्रहालयाच्या परिसरातील बगिचा


  
संग्रहालयाच्या परिसरातील आठवणवस्तूंचे दुकान

या संग्रहालयाचा विकास लहान मुले, तरुण आणि कुटुंबे या सर्वांचे सर्वांगीण मनोरंजन आणि ज्ञानवर्धन मनात ठेवून केलेला आहे. हाच उद्येश केंद्रस्थानी ठेवून इथले सर्व ललित व शैक्षणिक कार्यक्रम आखले जातात.

रेस्तराँमध्ये पोटपूजा करून आमची वाटचाल सुरू झाली. पार्कचा आराखडा आणि विकास करणार्‍या तज्ज्ञाचे कसब चालताना जागोजागी दिसत होते. सगळी जमीन सरसकट सपाट न करता तिच्या उंचसखलपणाचा आणि दगडधोंड्यांचा उपयोग करून जागोजागी नैसर्गिक जंगलाचा आभास निर्माण केलेला आहे. त्यामुळे, लगबग-गडबड-गोंधळ चालू असलेले महानगरी रस्ते तेथून अर्ध्या किमीपेक्षा कमी अंतरावर आहेत, हे विसरायला होत होते...

  
पार्कामधील कृत्रिम जंगलाची दोन दृश्ये

एक किलोमीटरपेक्षा कमी रूंदी असल्यामुळे या पार्कमध्ये फिरताना आजूबाजूच्या दाट झाडीतून आकर्षक आकाराच्या व रंगांच्या गगनचुंबी इमारती सतत डोकावताना दिसत होत्या...

  
  
  
झाडीतून डोकावणार्‍या आकर्षक गगनचुंबी इमारती

बर्फावरून बिनचाकांच्या गाड्या ओढत नेणार्‍या कुत्र्यांबद्दल (स्लेड डॉग) आदर दाखवणारे स्मारकशिल्प वाटेतल्या एका खडकावर स्थापित केलेले दिसले. त्या श्वानमुर्तीबरोबर फोटो काढायचा मोह झालाच...


स्लेड डॉग स्मारकशिल्प

या पार्कमध्ये ३६ पूल आहेत. त्यातले काही पाण्याचे तलाव ओलांडण्यासाठी आहेत तर काही रस्ते अथवा पायवाटांच्या वरून जातात. कोणतेही दोन पूल एकसारखे नाहीत. त्यामुळे, काही ना काही वैशिष्ट्य असलेला पूल आपल्याला मधून मधून दिसत राहतो आणि त्याच्या वरून किंवा खालून चालत आपला प्रवास चालू राहतो...


तळभागात तांबड्या विटांची नक्षी असलेला पूल

अमेरिकन पार्कमध्ये पर्यटकांची चित्रे काढणारे किंवा गायन-वादन करणारे कलाकार दिसणे ही नेहमीची गोष्ट आहे...


पर्यटकांची रेखाचित्रे काढणारा कलाकार


गायन-वादन काढणारे कलाकार

मोठमोठी हिरवळ असलेली मैदाने आणि क्रीडांगणे जागोजागी आहेत. त्यांचा पुरेपूर फायदा उठवत सुट्टी (पिकनिक) साजरी करणारे नागरिक व पर्यटक सतत दिसत होते...


जरा पुढे गेल्यावर ध्वजनृत्याचा सराव करणारा एक संघ दिसला...


ध्वजनृत्याचा सराव करणारा संघ

सुट्टी आणि स्वच्छ आकाशाचा फायदा घेत असलेल्या लोकांमुळे पार्कभर उत्सवाचे आणि पिकनिकचे वातावरण होते. तो आनंदोत्सव पाहत पाहत प्रसिद्ध बेथेस्डा टेरेस व कारंज्याकडे निघालो...


बेथेस्डा कारंज्याच्या दिशेने जाताना ०१ : चेरी हिल फाऊंटन


बेथेस्डा कारंज्याच्या दिशेने जाताना ०२ : बो पूल (Bow Bridge)

बेथेस्डा कारंजे

बेथेस्डा कारंजे या पार्कमधील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. या कारंज्याच्या सर्वात वरच्या टोकावर उभ्या असलेल्या स्त्री देवदूताचे आठ फूट उंचीचे कांस्यशिल्प आहे. ख्रिश्चन ग्रंथांतील (गॉस्पल ऑफ जॉन) वर्णनांनुसार बनवलेले हे जलदेवतेचे शिल्प बेथेस्डा तलावातील पाण्याला रोगनिवारक बनण्याचे वरदान देत आहे. तिच्या एका हातात पावित्र्याचे चिन्ह असलेली लिली आहे तर दुसरा हात वरदान देण्याच्या मुद्रेत आहे. देवदूताच्या पायाखालील छत्रीसारख्या आकाराखाली संयम, पावित्र्य, आरोग्य व शांती यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या चार मूर्ती आहेत...


बेथेस्डा कारंजे

कारंज्याच्या एका बाजूला मानवनिर्मित तलाव आहे. तर दुसर्‍या बाजूला दोन स्तरांचा चौथरा आहे. त्याला कारंज्याच्या नावावरून बेथेस्डा टेरेस असे नाव पडले आहे. चौथर्‍याच्या दोन्ही बाजूला वरचा व खालचा स्तर जोडणारे रुंद नक्षीदार जिने आहेत...


बेथेस्डा कारंज्याच्या बाजूने दिसणारा बेथेस्डा चौथरा

वरच्या स्तराखालून पलीकडे जाण्यासाठी एक छोटा भुयारी मार्ग आहे. त्याला नक्षीदार टाईल्सने अलंकृत केले आहे...


बेथेस्डा चौथर्‍याच्या वरच्या स्तराखालून जाणारा अलंकृत भुयारी मार्ग

बेथेस्डा टेरेसच्या वरच्या स्तरावरून मानवनिर्मित तलाव, कारंजे आणि त्याचा परिसर यांचे सुंदर विहंगम पॅनोरामा दिसतो...


बेथेस्डा चौथर्‍याच्या वरच्या स्तरावरून दिसणारे कारंजे व तलावाचे पॅनोरॅमिक दृष्य

बेथेस्डा परिसराचे निरीक्षण करत बसून काही काळ पायांना विश्रांती दिली आणि पार्कच्या मानवनिर्मित जंगलातून पुढची वाटचाल सुरू केली...


तलावात चाललेला जलविहार


पार्कच्या मानवनिर्मित जंगलातून पुढे वाटचाल

(क्रमशः )
===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

16 Nov 2016 - 1:22 am | पद्मावति

आहा! किती सुंदर आणि भव्य आहे. सुंदर वर्णन आणि फोटो.

सध्याच्या मरगळलेल्या येथील वातावरणाला हे फोटो सुखावत आहे. सेंट्रल पार्कची बरीच माहिती मिळाली.
माझी पहिली न्यू यॉर्कची सहल 'कल हो ना हो' या चित्रपटातील लोकेशन्स वर होती. त्यामुळे बेथेस्डा कारंजे बघितले होते पण आता त्याची नीट माहिती कळली.

खटपट्या's picture

16 Nov 2016 - 5:14 am | खटपट्या

खूप छान वर्णन आणि फोटो

पिलीयन रायडर's picture

16 Nov 2016 - 5:49 am | पिलीयन रायडर

अप्रतिमच फोटो आहेत हो काका.. खास करुन "बेथेस्डा चौथर्‍याच्या वरच्या स्तराखालून जाणारा अलंकृत भुयारी मार्ग"!!
रिकामी सापडली ही जागा तुम्हाला? लकी!!

सेंट्रल पार्क ही माझी न्यु यॉर्क मधली सर्वात आवडती जागा आहे. पोराला शाळेत सोडुन एखादं पुस्तक घेऊन जायचं.. मस्त वाचत बसायचं.. कुणी तरी एखादं वाद्य वाजवत असतं.. एकदा सॅक्सोफोन वाजवत होता एक माणुस.. फॉलचे मस्त कलर्स.. पायाखाली सुकलेली पानं.. डोक्यावरची झाडं पिवळी धम्मक! ह्याच्या जवळ कधी घर घेऊन रहाता आलं तर किती मस्त! पण अर्थातच खयाली पुलावच ते!

कॅथेड्रल पार्कवे स्टेशन कडुन आलात तर कॅफे अम्रिता मध्ये ब्लुबेरी पॅनकेक्स खावेत. आणि दोन ब्लॉक चालत जाऊन अ‍ॅमस्टरडॅम एव्हेन्यु वरचं ते कॅथेड्रल पाहुन यावं! अप्रतिमच आहे ते सुद्धा! तिथे फिरताना मात्र खरंच वाटतं की इथे रहाण्यात मजा आहे.. जर्सी सिटीत नाही =))

कॅथेड्रल पार्कवे स्टेशन कडुन आलात तर कॅफे अम्रिता मध्ये ब्लुबेरी पॅनकेक्स खावेत.

चांगलंय का? जाऊन येईन तिकडे एकदा.

आणि दोन ब्लॉक चालत जाऊन अ‍ॅमस्टरडॅम एव्हेन्यु वरचं ते कॅथेड्रल पाहुन यावं! अप्रतिमच आहे ते सुद्धा! तिथे फिरताना मात्र खरंच वाटतं की इथे रहाण्यात मजा आहे.. जर्सी सिटीत नाही

:) कॅथेड्रल सुंदर आहे. तिकडून दोन-तीन ब्लॉक उत्तरेला चालत जाऊन आमचं विद्यापीठ नाही पाहिलं का? आणखी जरा चाललं की रिव्हरसाईड चर्च दिसतं, तेही छान आहे. अमेरिकेतलं सगळ्यात उंच चर्च आहे.
....
सेंट्रल पार्क प्रचंड आहे. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी दिसतं. उन्हाळ्यात हिरवीगार झाडं आणि माणसांनी भरलेलं असतं एकदम.

पिलीयन रायडर's picture

16 Nov 2016 - 7:50 pm | पिलीयन रायडर

नाही ना पाहिली तुमची युनि.

आता नक्की पाहिन, आणि रिव्हरसाईड चर्च सुद्धा!

अम्रिता कॅफे चांगला आहे. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे त्याच्या बद्दल ठाऊक नाही. पण पॅनकेक्स वलाह्गजहब होते!!! ऑम्लेटही चांगलं होतं. नक्की जावं अशी जागा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या युनिव्हर्सिटी जवळचे Cathedral Church of St. John the Divine खास अर्ध्या दिवसाची भेट देऊन फी भरून मार्गदर्शकासह पाहिले आहे. अर्धवट बांधलेले तरीही खूप मोठे व सुंदर आहे. त्यावर या लेखमालेत एक लेख लिहिण्याच मानस आहेच.

पिलीयन रायडर's picture

17 Nov 2016 - 12:28 am | पिलीयन रायडर

हेच ते कॅथेड्रल! आम्हाला अगदी अचानकच सापडलं. खरंच लिहाच ह्यावर. कारण आम्ही गेलो तेव्हा तिथे रविवारची सर्व्हिस चालु होती म्हणुन बराच भाग बंद होता.

मिहिर's picture

18 Nov 2016 - 2:38 am | मिहिर

नक्की लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

आता फॉलमध्ये एवढा सगळा परिसर किती लाल-केशरी-पिवळ्या रंगने सजला असेल याची कल्पनाच किती सुंदर आहे ! तुम्ही तर तो प्रत्यक्ष पाहत आहात !

अहाहा! काय सुंदर पार्क आहे.त्या छोट्या नावा मस्त वाटताहेत.कारंजी,हिरवळ,पूल,शिल्प सगळच मस्त.

प्रचेतस's picture

16 Nov 2016 - 9:01 am | प्रचेतस

अतिशय सुंदर.

काय सुंदर आहे सर्वच.एवढया मोठ्या शहरात जागा गिळंकृत न करता हे नंदनवन बहारदार ठेवणार्यांना दंडवत.

खटपट्या's picture

16 Nov 2016 - 10:18 pm | खटपट्या

नायतर आपले पर्यावरण मंत्री. राणीचा बाग आणि आरे कॉलनी विकायला काढा म्हणत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

तिथले राजकारणी सर्वच बेट काँक्रिट जंगल बनवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी लेखात सुरुवातीच्या नकाश्यात दिलेला डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) बनवलाही होता (पहिले चित्र). लोकांनी संघर्ष करून त्यांना त्यातला मोठा भाग पार्कला ठेवणे भाग पाडले. या संघर्षाच्या खाणाखूणा म्हणून तिथे मिळालेले १८११ साली ठोकलेले काही सर्वे बोल्ट्स तसेच ठेवले आहेत (दुसरे चित्र). अजूनही काही नागरिक पार्कच्या जंगलवजा भागांत अधिक सर्वे बोल्ट्स शोधण्यासाठी मोहिमा काढत असतात !

प्रसाद_१९८२'s picture

17 Nov 2016 - 10:21 am | प्रसाद_१९८२

छान लेख आणि अप्रतिम फोटो.

लोकांनी संघर्ष करून त्यांना त्यातला मोठा भाग पार्कला ठेवणे भाग पाडले.

आपल्या देशातील जनतेला, फुकट आणि कोणताही संघर्ष न करता 'सर्वकाही' हवे असते त्याला कोण काय करणार.

यशोधरा's picture

17 Nov 2016 - 10:27 am | यशोधरा

मस्त! सुरेखच आहे हे पार्क :)

एस's picture

18 Nov 2016 - 7:07 pm | एस

अतिशय सुंदर!

एस's picture

18 Nov 2016 - 7:08 pm | एस

अतिशय सुंदर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 1:17 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !