न्यू यॉर्क : १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
20 Oct 2016 - 3:11 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

विमानवाहू नौका, मोठ्या कालखंडातील अनेक लढाऊ विमाने, स्वनातीत हेरगिरी करणारे विमान, स्वनातीत व्यापारी वाहतूक करणारे विमान, पुनर्वापर होणार्‍या अवकाशयानशृंखलेतील पहिली कडी असणारे अवकाशयान आणि अण्वस्त्रसज्ज क्रूझ क्षेपणास्त्र घेऊन काम केलेली पाणबुडी अशी आजवर केवळ चित्रांत, टीव्ही किंवा चित्रपटगृहांत पाहिलेली आधुनिक जगातील सामर्थ्यवान आश्चर्ये पाहिली होती. आज घरी परतताना मनात एक खास समाधान होते.

संक्षिप्त पार्कायण

न्यू यॉर्क शहरांत अनेक पार्क्स आहेत हे माहीत होते, पण ते इतक्या संखेने असतील, (सेंट्रल पार्कचा अपवाद वगळता) ते इतक्या मोठ्या आकारांचे असतील आणि त्यांची इतक्या उत्तम प्रकारे निगा राखली जात असेल असे वाटले नव्हते. हे पार्क्स पाहिले की आपली "पार्क = फुलझाडे आणि हिरवळ असलेली सार्वजनिक बाग" हे समीकरण चुकीचे आहे हे कळते.

पार्कची अमेरिकन व्याख्या साधारणपणे, "जनतेला मोकळेपणाने मनोरंजनासाठी वापरण्यासाठी राखीव ठेवलेली सार्वजनिक जागा" अशी आहे. पण, ती तिथेच न थांबता, "खेळाची मैदाने, बागबगीचे, हिरवळी, पिकनिक स्पॉट्स, रेस्तराँ, रेस्टरूम्स, इत्यादी उत्तम अवस्थेतल्या सोयींनाही" सामावून घेते. अनेक दशएकरांच्या आकाराच्या मोठ्या पार्क्समध्ये रमत गमत चालण्यासाठी, धावण्यासाठी वा हायकिंग करण्यासाठी खास पायवाटा (ट्रॅक्स) बनवलेल्या असतात. छोटे बगिचे तर सर्वच पार्क्समध्ये असतात, पण काही मोठ्या पार्क्समध्ये विशिष्ट हेतूंनी बनवलेल्या फुलबागा, संग्रहालये व इतर वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणे असतात. नौकानयनाच्या व्यवस्थेसह तलाव व पार्कच्या अंतर्गत रस्त्यांवरून घोड्याच्या बग्गीतून सफर करणे अश्या मनोरंजक व्यवस्थाही काही पार्कमध्ये आहेत.

एकट्या न्यू यॉर्क शहरात २०० पेक्षा मोठे पार्क्स आहेत (त्यांची यादी येथे मिळेल) आणि छोट्या आकाराचे पार्क्स तर दर २००-२५० मीटरवर आहेत. यातल्या बर्‍याच पार्क्सचे क्षेत्रफळ एकरांत नाही तर चौ किमी मध्ये मोजली जाते ! इथला आकाराने सर्वात मोठा पेलहॅम बे पार्क ११.१९ चौ किमी आकाराचा आहे तर दहाव्या क्रमांकाचा २.५८ चौ किमी आकाराचा आहे. काही पार्क्सची जागा म्हणजे शहर वेगाने वाढत असतानाही बांधकामाच्या आक्रमणापासून मुक्त ठेवलेले आणि शतकांपूर्वी असलेली जंगले कायम राखलेले भूभाग आहेत. गर्दीच्या रस्त्यावरच्या एखाद्या पार्कच्या प्रवेशद्वारातून आत शिरावे आणि १५-२० मीटरवर जंगलसदृश्य भागाला सुरुवात व्हावी, असे आश्चर्य बघायला मिळणे इथे सहज शक्य आहे !

या महानगराचे नियोजन करताना इतके मोठे जमिनीचे पट्टे, बिल्डर लॉबीच्या आक्रमणापासून संरक्षित करून, त्याचे उत्तम रितीने विकसन करून, नागरिकांच्या सोयीसुविधा निर्माण करून, त्यांचे दशकानुदशके जतन करून ठेवले आहे, यावर पार्क्स प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसणे कठीण आहे.

शहरांतल्या पार्क्सची देखभाल सरकार, नागरिकांची संघटना किंवा खाजगी संस्था यापैकी कोणीही एक किंवा अनेकजण करू शकतात. बहुतेक सर्व पार्क्सच्या विकासात आणि रोजच्या व्यवस्थापनात त्याच्या परिसरातल्या नागरिक संघटनांचा लक्षणीय सहभाग असतो. पार्कमध्ये सतत बरेच मनोरंजक व समाजोपयोगी कार्यक्रम / प्रकल्प चालू असतात. अश्या कार्यक्रमांमध्ये, उत्साही नागरिकांबरोबरच परिसरातल्या अनुभवी तज्ज्ञांचा सहभाग असल्याचे पार्क्सच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या माहितीपत्रकांवरून सहज कळून येतो. "येत्या रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत बागेतील फुलझाडांची माहिती देण्यासाठी (परिसरांत राहणारा/र्‍या अथवा परिसरांतल्या कॉलेजमध्ये काम करणारा/र्‍या) अमुक अमुक बोटॅनिस्ट येणार आहेत. लहान मुलांसकट सर्व वयांच्या नागरिकांचे स्वागत आहे." किंवा "येत्या शनिवारी संध्याकाळी ६ ते ८ अमुक अमुक कलासंघ पार्कमधील उघड्या मंचावर संगीताचा विनाशुल्क कार्यक्रम सादर करणार आहे. सर्वांचे स्वागत." किंवा योग, चित्रकला, इत्यादी, इत्यादी विनाशुल्क शैक्षणिक व मनोरंजक कार्यक्रमांच्या माहितीपत्रकांनी भरून गेलेला प्रवेशद्वाराजवळचा माहितीफलक पाहणे विरळ नाही. केवळ पार्कसाठी निधी गोळा करणारे कार्यक्रम सशुल्क असतात.

इथल्या पार्क्स किंवा संग्रहालयांत तिकिटाच्या खिडकीवरचे काम करणारे मार्गदर्शक, सुरक्षारक्षक, इत्यादींमध्ये इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप करणारी शाळाकॉलेजातील मुले नेहमी दिसतात. ही कामे ते विनावेतन किंवा जुजुबी वेतनावर करतात. काही ठिकाणावरच्या अश्या कामाचे त्यांना शिक्षणसंस्थेकडून अथवा नोकरीचा अर्ज करताना क्रेडिट मिळू शकते. अश्या रितीने पार्क किंवा इतर सार्वजनिक संस्थांत काम करण्याने तरुणाईत "पडेल ते काम करण्याची तयारी आणि स्वावलंबनाची सवय" रुजते. शहरभर असणार्‍या अनेक ठिकाणी अनेक तरुण/तरुणींना मन लावून असे काम करताना पाहून "हे काम माझ्या लायकीचे नाही" असा दंभ सतत पाहणार्‍या भारतीयाला काहीसा धक्का बसला तर नवल नाही ! गरीब देशाच्या नागरिकापेक्षा श्रीमंत देशातल्या नागरिकाला "श्रमाचे महत्त्व" जास्त चांगले कळले आहे, हा वर वर विरोधाभास वाटत असला तरी ते देशादेशांतील "मानवी स्वभावाचे आणि म्हणूनच प्रगतीतील फरकाचे" गमक आहे असे मला वाटते. असो.

फोर्ट ट्रायॉन पार्क

आम्ही राहत असलेली फोर्ट ट्रायॉन गार्डन्स ही सहकारी गृहसंस्था हडसन हाईट्स या मॅनहॅटन बेटाच्या उत्तर भागात होती. या जागेपासून दोन एक किलोमीटरच्या परिघात फोर्ट ट्रायॉन पार्क (६६.५ एकर किंवा २६.९ हेक्टर) व इनवूड्स पार्क (१९६.४ एकर किंवा ७९.५ हेक्टर) हे दोन मोठे आणि पाच मध्यम ते छोट्या आकाराचे पार्क होते. ही सर्व माहिती मुलाने अमेरिकेत पोचण्यापूर्वी फोनवर सांगितली होती. पण पारक म्हणजे काय याचा खरा अर्थ तेथे राहायला लागल्यावर व त्या पार्क्सना भेटी दिल्यावरच कळला.

यातल्या फोर्ट ट्रायॉन पार्कची हद्द तर आमच्या इमारतीला लागून असलेला बेनेट अ‍ॅव्हन्यूच्या लगेच पलिकडे सुरू होत होती. त्यामुळे, ज्या दिवशी आमचा मोठ्या भटकंतीचा बेत नसे तेव्हा या पार्कमध्ये संध्याकाळची (आणि कधी कधी सकाळीही) रपेट मारणे हा नित्यक्रम झाला होता. या फेरफटक्यांत पार्कच्या अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध खासियतीची आश्चर्यकारक आणि सुखद ओळख झाली. अर्थातच, या पार्कबद्दल खास ममत्व निर्माण झाले. या पार्कमुळे आमचे तेथील वास्तव्य अविस्मरणीय झाले असे म्हटले तर ते योग्यच होईल.

६७ एकर (२७ हेक्टर) क्षेत्रफळाचा हा पार्क मॅनहॅटनच्या उत्तर टोकाजवळ हडसन हाईट्स या नेबरहूडमध्ये आहे. मॅनहॅटन बेटाच्या चिंचोळ्या उत्तर भागात असलेली लांबोळकी टेकडी व तिच्यावर असलेली फोर्ट ट्रायॉन नावाची ऐतिहासिक गढी व आजूबाजूची शेकडो वर्षे वयाच्या जंगलाची जागा मिळेन हा पार्क बनला आहे. याच्या पश्चिम कडेने हडसन नदी वाहते, पूर्वेकडून ब्रॉडवेवरून वाहनांची अथक वाहतूक चालू असते, उत्तरेची हद्द डाइकमन स्ट्रीटने आणि दक्षिणेची हद्द आमच्या इमारतीच्या कडेने जाऊन ब्रॉडवेला मिळणार्‍या १९० व्या स्ट्रीटने आखलेली आहे....


फोर्ट ट्रायॉन पार्कची जागा आणि त्यातील चारचाकींचे, चालण्याचे व धावण्याचे रस्ते (मूळ नकाशे जालावरून साभार)

स्थानिक लेनापे (Lenape) अमेरिकन इंडियन या परिसराला Chquaesgeck या नावाने ओळखत असत. सतराव्या शतकाच्या शेवटी तेथे आलेले डच वसाहतवादी त्याला 'लांगं बेर्घ (Lange Bergh, लांब टेकडी)' असे म्हणत. याच परिसरात अमेरिकन राज्यक्रांतीचे "फोर्ट वॉशिंगटन युद्ध" लढले गेले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या भागात मोठमोठ्या बागायती वाड्या आणि विरळ वस्ती होती. ब्रिटिश साम्राज्यातील न्यू यॉर्क परगण्याचा शेवटचा राज्यपाल (गव्हर्नर) विल्यम ट्रायॉन (१७२९ - १७८८) याचे नाव फोर्ट ट्रायॉनला दिले गेले.

जॉन डी रॉकंफेलर, ज्युनियर (John D. Rockefeller, Jr) या अमेरिकन समाजसेवकाने (philanthropist) १९१७ सालापासून पार्क निर्माण करण्याच्या उद्द्येशाने इथल्या जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. पार्क बनवण्यामध्ये नामांकित असलेल्या कंपनीकडून हा पार्क बनवून घेऊन त्याने तो १९३१ मध्ये शहराला अर्पण केला. त्यानंतरही १९३५ पर्यंत पार्कचे काम चालू होते.

याशिवाय, रॉकंफेलरने प्रसिद्ध शिल्पकार जॉर्ज ग्रे बर्नार्ड याचा मध्ययुगीन युरोपियन कलाकृतींचा संग्रह खरेदी करून तो Metropolitan Museum of Art (Met, मेट) ला दान केला. मेट ने या पार्कमध्ये मध्ययुगीन बांधणीची इमारत बांधून त्यात हा संग्रह जनतेसाठी १९३९ साली खुला केला. हे "मेट क्लॉइस्टर्स" नावाने प्रसिद्ध असलेले संग्रहालय शहरातले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. या पार्कमधले दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे "हिदर गार्डन". या दोन आकर्षणांना आपण नंतर स्वतंत्रपणे भेट देणार आहोत.

या पार्कला अनेक सन्मान मिळालेले आहेत :
१. ऐतिहासिक जागांच्या सरकारी दप्तरांत (National Register of Historic Places) "राष्ट्रीय महत्त्वाची ऐतिहासिक जागा" अशी १९७८ मध्ये नोंदणी.
२. १९८३ सालापासून "न्यू यॉर्क शहरातली निसर्गरम्य जागा (New York City Scenic Landmark)" अशी नोंदणी.
३. न्यू यॉर्क शहरातील सर्वात मोठा खुला (unrestricted access) पार्क.

फोर्ट ट्रायॉन पार्क ट्रस्ट (https://www.forttryonparktrust.org/art-in-the-parks.html) नावाची एक ना-फायदा तत्त्वावर चालवली जाणारी नागरिकांची संस्था या पार्कच्या देखभालीचे व रोजच्या व्यवस्थापनाचे काम करते. तिला या कामात 'न्यू यॉर्क पार्क डिपार्टमेंट' व 'ग्रीनएकर्स फाऊंडेशन' मदत करतात. या संस्था योग, ताई ची, संगीत मैफली (live outdoor concerts), पक्षीनिरीक्षण पदयात्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, इत्यादींचे आयोजन करून पार्कसाठी निधी जमवतात. २०१६ मध्ये हा पार्क ८१ वर्षाचा झाला आहे.

***************

न्यू यॉर्कला पोहोचल्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी काही काम नव्हते म्हणून घराच्या आजूबाजूला चक्कर मारावी म्हणून बाहेर पडलो. बेनेट अ‍ॅव्हन्यूवरून इमारतीला फेरी मारत तीन-चार मिनिटांत तिच्या दुसर्‍या बाजूला पोचलो आणि अचानक रस्त्याच्या पलीकडे ब्रॉडवेला लागून असलेल्या या पार्कचे प्रथमदर्शन झाले...


फोर्ट ट्रायॉन पार्कचे प्रथमदर्शन ०१

  
फोर्ट ट्रायॉन पार्कचे प्रथमदर्शन ०२ व ०३

पार्कमध्ये शिरून दहा मिनिटे चालत राहिल्यावर ध्यानात आले की ही आपल्या कल्पनेतली नेहमीसारखी "बाग" नाही. दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती म्हणून मागे वळून घरी परतताना येथे जरा जास्त वेळ काढून यावे लागेल असाच विचार मनात होता. जेवण वगैरे झाल्यावर जरा आरामात बसून गुगलबाबाला साकडे घातले. पार्कचा आकार आणि त्यातल्या अनेक प्रकारच्या मार्गांची लांबी आणि गुंतागुंत पाहून येथे एक फेरी मारणे पुरे होणार नाही याची खात्री पटली. याशिवाय त्यात अजून दोन महत्त्वाची आकर्षणे असल्याचे समजले. झाले, घराशेजारी असलेल्या या पार्कमध्ये बर्‍याच फेर्‍या होणार यावर शिक्कामोर्तब झाले. दर फेरीत हा पार्क आपल्या पोतडीतून नवनवीन नजारे काढून दाखवत राहिला आणि तेथे परत परत चक्कर मारायला जाणे हे 'व्यायाम' किंवा 'पाय मोकळे करणे' न राहता आनंददायक सहलीसारखे झाले.

या पार्कचा बहुतांशा भाग टेकडीने व्यापलेला आहे. तिच्यात अनेक प्रकारच्या खनिजांच्या मिश्रणांनी बनलेल्या ओबडधोबड प्रस्तरांचे वेडेवाकडे स्तर आहेत. या विविधतेमुळे व गेल्या हिमयुगातील हिमनद्यांनी ओढलेल्या ओरखड्यांमुळे त्या प्रस्तरस्तरांना अनेक तडे जाऊन त्यांचे चित्रविचित्र आकार आणि उंचसखल जागा निर्माण झाल्या आहेत. जंगलाला शक्य तेवढे त्याच्या मूळ स्वरूपात राखल्याने पार्कचा बहुतेक भाग घनदाट झाडी-झुडपांनी भरलेला आहे. जागेच्या मूळ नैसर्गिक व ऐतिहासिक वैशिष्ट्यांना धक्का न लावता, किंबहुना त्यांचे सौंदर्य उठून दिसेल अश्या तर्‍हेने, या पार्कची रचना केलेली आहे.

या पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी रुंद डांबरी रस्त्यापासून ते मातीच्या पायवाटांपर्यंत अनेक प्रकारच्या मार्गांचे जाळे आहे.

मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्ह

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात, १६ नोव्हेंबर १७७६ साली, ४००० ब्रिटिश सैनिकांनी, येथून जवळच असलेल्या फोर्ट वॉशिंग्टनवर हल्ला केला. अमेरिकन सैन्याकडे तुटपुंजे मनुष्यबळ व केवळ दोनच तोफा होत्या. त्यातील एक तोफ चालविणारा मार्गारेटचा नवरा होता. लढाईत तो मृत्युमुखी पडल्यावर मार्गारेटने पुढे होऊन तोफेचा ताबा घेतला. ती लढाई, अर्थातच, ब्रिटिशांनी जिंकली. पण, जबर जखमी झालेल्या मार्गारेटने शौर्याची परिसीमा केली व तिच्या ताब्यातील तोफ सर्वात शेवटपर्यंत धडधडत ठेवली होती. तिच्या या असामान्य शौर्याची खूप प्रशंसा झाली. मार्गारेट कॉर्बिन ही अमेरिकन सैन्याचे निवृत्तिवेतन मिळणारी पहिली स्त्री होती. उत्तर मॅनहॅटनच्या निसर्गरम्य परिसरातल्या वस्तीतून जाणार्‍या व पार्कमधे काही भाग असलेल्या एका डांबरी रस्त्याचे नाव या शूर स्त्रीच्या स्मरणार्थ "मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्ह" असे ठेवलेले आहे. पार्कमधील या रस्त्याचा भाग मुख्यतः Metropolitan Museum of Art च्या The Cloisters ला (मेट क्लॉइस्टर्स संग्रहालयाला) भेट देणार्‍या पर्यटकांच्या बसेस व खाजगी गाड्यांसाठी वापरला जातो.


घनदाट झाडीमधून जाणारा मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्ह

या पार्कच्या रचनेत (लॅंडस्केप) अनेक छोटे छोटे दगडी पूल आहेत... काही मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हवरून जाणार्‍या पायवाटांसाठी बनवलेले आहेत तर काही पायवाटांवरून जाणार्‍या मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हसाठी बनवलेले आहेत. त्यांच्यामुळे येथील फेरफटका अधिकच चित्ताकर्षक होतो...


मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हवरून जाणारा एक पूल


पायवाटेवरून जाणार्‍या मार्गारेट कॉर्बिन ड्राइव्हसाठी बनवलेला एक पूल


पार्कमधील अजून एक पूल

गूगल मॅपची सोय हाताशी नसलेल्या नवख्या माणसाला पार्कमध्ये फेरी मारायला हा रस्ता सर्वोत्तम आहे. कारण दाट झाडीतून जाणार्‍या वळणावळणाच्या डांबरी आणि मातीच्या पायवाटांच्या भुलभुलैयात शिरल्यावर, चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूला आलेला अनुभव आपल्याला येतो ! विशेषतः संध्याकाळच्या फेरीत असे झाले तर, सावल्याच्या लांबीच्या प्रमाणात हृदयाचे ठोके वाढत जातील ! मात्र, हे जंगल "सॅनिटाईज्ड" आहे, येथे कोणतेही हिंस्र प्राणी (माणूस सोडता ! :) ) नाहीत. हा पार्क अधिकृत रित्या "रात्री १ वाजेपर्यंत खुला आहे" अश्या पाट्या असल्या तरी पार्कच्या कोणत्याही प्रवेशमार्गांना दारे दिसली नाही आणि इतक्या वेळा मारलेल्या फेर्‍यांमध्ये पार्कमध्ये एकदाही रखवालदार दिसला नाही. असे असूनही पार्कमधल्या झाडाझुडुपांची, रानटी फुलांची किंवा बागेची एकदाही नासधूस झालेली दिसली नाही, हे विशेष !

पायवाटांचे जाळे

या पार्कमध्ये पायवाटांचे गुंतागुंतीचे जाळे पसरलेले आहे. गूगल मॅप सोबतीला घेऊन, दर वेळेस नवनवीन पायवाटा शोधत या पार्कमधे रपेट मारायला खूप मजा आली. पार्कमधिल सर्व डांबरी पायवाटा चालण्या-धावण्यासाठी सुरक्षित व खड्डे मुक्त होत्या. टेकडीच्या कपारीच्या बाजूने असलेल्या पायवाटांना सुरक्षित दगडी कठडे आहेत. मातीचे रस्ते तुडविण्यात आनंद वाटणार्‍या हायकर्ससाठी डांबरी वाट सोडून जंगलात घुसणारे काही 'हायकर्स डर्ट ट्रॅक' मधून मधून दिसत होते...


पायवाट ०१


पायवाट ०२

  
पायवाटा ०३ व ०४

  
डांबरी पायवाटा ०५ व ०६

  
डांबरी पायवाटा ०७ व ०८

तीव्र उतार असलेल्या पायवाटांवर नागरिकांच्या चालण्याच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी जागोजागी दगडी पायर्‍या आहेत...


पायवाटेवरच्या दगडी पायर्‍या ०१

  
पायवाटांवरच्या दगडी पायर्‍या ०२ व ०३

या पार्कमधील टेकडी मॅनहॅटन बेटाचा सर्वात उंच भूभाग आहे. या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबोळ्या टेकडीच्या पूर्व व पश्चिम बाजूंच्या कड्यांवर कमी अधिक उंचीवर अनेक पायवाटा तयार केलेल्या आहेत. त्यांच्यावरून चालताना एका बाजूला उंच कडा-कपारी आणि दुसर्‍या बाजूला परिसरातले वेगवेगळे मनोहर विहंगम देखावे असतात.

टेकडीवरच्या पूर्वेकडील कड्यांवरच्या रस्त्यांवरून चालताना जंगलाच्या झाडीतून मधून मधून ब्रॉडवे डोकावत राहतो आणि त्याच्या पलीकडे असलेल्या शहरातील इमारतींच्या गर्दीचे विहंगम दर्शन होते...


टेकडीवरच्या पूर्वेकडील रस्त्यावरून पायथ्याशी दिसणारा ब्रॉडवे आणि त्या पलीकडील वस्ती

  
  
टेकडीवरच्या पूर्वेकडील रस्त्यांवरून दिसणारी इमारतींच्या गर्दीची काही दृश्ये

टेकडीच्या पश्चिमेकडील कड्यांवरच्या रस्त्यांवरून हडसन नदीचे विस्तीर्ण पात्र, तिच्यातून मार्गक्रमण करणार्‍या बोटी आणि त्याच्या पलीकडे घनदाट जंगलाने भरलेली न्यू जर्सी राज्याची किनारपट्टी दिसते...


टेकडीवरचा पश्चिमेकडील एक रस्ता व त्याच्या पलीकडील हडसन नदी


एका रम्य संध्याकाळी टेकडीवरच्या पश्चिमेकडील एक रस्त्यावरून दिसलेली हडसन नदी

  
  
  
टेकडीवरच्या पश्चिमेकडील रस्त्यावरून दिसणारी काही दृश्ये

पार्कच्या दक्षिणपश्चिमेकडील रस्त्यावरून मॅनहॅटन व न्यू जर्सीला जोडणार्‍या जॉर्ज वॉशिंगटन पुलाचे मनोहारी दर्शन होते...


पार्कमधून दिसणारा जॉर्ज वॉशिंगटन पूल

पायवाटांवरून जाताना आपल्याला एकाहून एक सरस दृश्ये दिसत राहतात आणि आपल्याला चालण्याचे श्रम विसरायला होते...


पायवाटेवरून जाताना दिसलेले दृश्य ०१


पायवाटेवरून जाताना दिसलेले दृश्य ०२

या अगणित पायवाटांवरच्या निरुद्द्येश भटकंत्यांमध्ये पार्कमधिल अगोदर माहीत नसलेल्या अनेक आकर्षक जागा सापडत राहिल्या. त्यामुळे, फेरफटक्यांची मजा द्विगुणित होत गेली व पार्क परत परत येण्यासाठी सतत खुणावत राहिला. चला तर पार्कमधल्या अजून काही आकर्षणांना आपण भेट देऊया.

लिंडन टेरेस

ज्या गढीवरून या पार्कचे नाव पडले आहे त्या फोर्ट ट्रायॉनचा चौथरा व काही तटबंदी इतकेच अवशेष बाकी राहिले आहेत. त्यांची डागडुजी करून त्याला लिंडन टेरेस हे नाव दिलेले आहे. येथे असलेल्या बाकांवर वसून समोरचा नजारा आरामात पाहता येतो. इथला सूर्यास्त खास असतो. ही जागा सर्वात उंचावर असल्याने येथून हडसन नदी आणि तिच्या पलीकडील किनार्‍यावर असलेला न्यू जर्सीमधील पॅलिसेड्स पार्कचे विनाअडथळा पॅनोरॅमिक दर्शन होते...


लिंडन टेरेस ०१ : प्रवेशद्वार


लिंडन टेरेस ०२


लिंडन टेरेस ०३


लिंडन टेरेस ०४

हिरवळी

या पार्कमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी व आरामासाठी उत्तम निगा राखलेल्या हिरवळी जागोजागी आहेत. याचा उपयोग लोक सुटीच्या दिवशी पिकनिकसाठी, रोज संध्याकाळी मुलांना बरोबर घेऊन फेरफटका मारण्यासाठी किंवा दुपारी मस्तपैकी ताणून देण्यासाठीही करताना दिसत होते...

  
  
पार्कमधील अनेक हिरवळींपैकी काही

पार्कमधली इतर फुलझाडे

खास जागांवर बनवलेल्या गार्डन्सशिवाय या पार्कमध्ये जागोजागी अनेक फुलझाडे आहेत. फिरताना आपल्याला ती सतत दिसत राहतात आणि श्रमपरिहार करत राहतात...

  
  
  
  
  
  
  
  
पार्कमधिल बागांव्यतिरिक्त जागांवर फुललेले फुलोरे

मुक्त श्वानांगण (डॉग रन)

या शहरात, जेथे कुत्रे नेण्यास परवानगी आहे अश्या सर्व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा असणे कायद्याने बंधनकारक आहे; नसल्यास तो गुन्हा होतो. या पार्कमध्ये न्यू यॉर्क शहरातील श्वानांसाठी सर्वात मोठे मुक्त मैदान (डॉग रन) आहे. येथे श्वानमंडळी गळ्यातल्या पट्ट्याशिवाय मोकळेपणाने धावू शकतात व मैदानातील इतर श्वानांबरोबर खेळू शकतात...


मुक्त श्वानांगण (डॉग रन) ०१


मुक्त श्वानांगण (डॉग रन) ०२

रेस्तराँ

पार्कच्या एका निसर्गरम्य भागात घनदाट झाडीमध्ये एक पुरातन इमारत आहे. खूप काळ दुर्लक्षित राहिल्यावर १९९५ मध्ये बेट्टं मिडलर या अमेरिकन विविधगुणी तारकेच्या (गायिका, कवयत्री, अभिनेत्री, चित्रपट निर्माती, इ) पुढाकाराने व नावाने स्थापन केलेल्या Bette Midler's New York Restoration Project (NYRP) या प्रकल्पाअंतर्गत या इमारतीचा जीर्णोद्धार केला गेला. सद्या तेथे Coffeed नावाच्या एका स्थानिक रेस्तराँने आपली शाखा उघडली आहे. हे रेस्तराँ त्याच्या उत्पन्नातील काही भाग पार्कच्या परिसरातील धर्मदाय संस्थांना दान करते.


कॉफीड रेस्तराँ ०१ : प्रांगण

  
कॉफीड रेस्तराँ ०२ : अंतर्भाग (जालावरून साभार)

फोर्ट ट्रायॉन कॉटेज

पार्कच्या दक्षिण टोकाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका सखल भागात असलेली फोर्ट ट्रायॉन कॉटेज ही पुरातन इमारत बराच काळ दुर्लक्षित राहिली होती. नुकताच तिचा जीर्णोद्धार करून तेथे एक छोटे संग्रहालय केले आहे. प्रसंगानुरुप कार्यक्रम करण्यासही या इमारतीचा उपयोग केला जातो.


फोर्ट ट्रायॉन कॉटेज

बिलिंग आर्केड

येथून थोडे पुढे गेले की बिलिंग आर्केड नावाचे ग्रॅनाईटच्या १५.२४ मीटर (५० फूट) उंच कमानी असलेले बांधकाम आहे. पूर्वी येथून नदीशेजारून जाणार्‍या महामार्गाला जोडणारा रस्ता जात असे. आजकाल, आजूबाजूच्या निसर्गाचा देखावा व नदीकिनार्‍यावरच्या महामार्गांवरील वाहतुकीची मजा पाहण्यासाठी पर्यटकांना या जागेचा उपयोग होत आहे...


बिलिंग आर्केड ०१


बिलिंग आर्केड ०२

अ‍ॅन लोफ्टस क्रीडांगण

बहुतेक सगळ्या पार्क्समध्ये क्रीडांगण असते. या पार्कमध्ये एकच नाही तर उत्तर आणि दक्षिण टोकांना प्रत्येकी एक अशी दोन क्रीडांगणे आहेत. त्यापैकी उत्तरेकडील भवय क्रीडांगणाच्या एका भागाचा फोटो...


अ‍ॅन लोफ्टस क्रीडांगण

उघडा रंगमंच

या पार्कच्या उत्तर टोकाला एक मोठा उघडा रंगमंच आहे व तेथे अनेक स्थानिक कलाकारांचे प्रयोग मधून मधून चालू असतात. पार्कसाठी निधी जमविण्यास केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रम बहुतेक विनामूल्य असतात...


फोर्ट ट्रायॉन पार्कमधला उघडा रंगमंच : अमेरिकन स्वातंत्र्यदिवसाच्या (४ जुलै) निमित्ताने चाललेला एक कार्यक्रम

गार्डन्स (बागबगिचे)

या पार्कमध्ये खास प्रकारची फुलझाडे किंवा झाडे लावलेल्या एकूण चार गार्डन्स आहेत :
१. हिदर गार्डन
२. अल्पाईन गार्डन
३. ब्लूम गार्डन
४. विंटर वॉक

इतर ऋतुंमधले फोर्ट ट्रायॉन पार्कचे रुपडे

"न्यू यॉर्क शहरातली निसर्गरम्य जागा" हा पुरस्कार मिळालेली ही जागा आम्हाला उन्हाळ्यात मनसोक्त बघायला, अनुभवायला मिळाली. ही जागा इतर ऋतूंत कशी दिसत असावी याबद्दल उत्सुकता निर्माण झाली तेव्हा थोडेसे जालौत्खनन केल्यावर काही चित्रे मिळाली. त्यातली काही इथे देणे रंजक ठरेल...

  
  
पानगळीच्या ऋतूतला फोर्ट ट्रायॉन पार्क (जालावरून साभार)

  
हिवाळ्यातला फोर्ट ट्रायॉन पार्क (जालावरून साभार)

राहत्या घराशेजारी असलेला हा पार्क म्हणजे न्यू यॉर्क शहराने आम्हाला अनपेक्षितपणे दिलेली भेट होती आणि आम्ही तिचा पुरेपुर उपभोग घेतला ! महानगराच्या भर वस्तीत असे काही अनुभवायला मिळणे केवळ अकल्पनिय होते !

ता क : फोर्ट ट्रायॉन पार्कच्या भूमीवर असल्या तरी "हिदर गार्डन" व "मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय" या दोन जागा आपल्या स्वतःच्या बळावर खास आकर्षणे आहेत. त्यामुळे आपण त्यांना पुढच्या दोन भागांत स्वतंत्रपणे पाहणार आहोत.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

20 Oct 2016 - 3:29 pm | वेल्लाभट

कै भारी आहे हे ! !! !!

मानस्'s picture

20 Oct 2016 - 7:06 pm | मानस्

सुंदर ...काही फोटो (डांबरी पायवाटा ०७ व ०८, पायवाटांवरच्या दगडी पायर्‍या ०२ व ०३, पायवाट ०१) पाहून निगडीच्या दुर्गा टेकडीची आठवण आली :)

खूपच सुंदर आणि अतिशय प्रशस्त आहे.

छान, सुरेख. फोटो लोड व्हायला मात्र खूप वेळ लागतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2016 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो जरा जास्त आहेत, त्यामुळे लेख लोड व्हायला वेळ लागत असणार. पण ही जागा इतकी सुंदर आहे त्यामुळे आणि घराजवळ असल्यामुळे खूप फेर्‍या झाल्या तिथे. तरीही दर वेळेस काहीतरी नवीन बघायला मिळाले. तीन-साडेतीनशे फोटोंमधले लेखात टाकलेले काही निवडताना बर्‍यापैकी तारांबळ झाली होती ! :)

मी तक्रार म्हणून लिहिले नाही काही, नुसते सांगितले. :)
येऊद्या अगदी बैजवार. प्रत्येक वेळी प्रतिसाद द्यायला जमले नाही तरी नियमित वाचत आहे.

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2016 - 6:54 pm | पिलीयन रायडर

फारच भारी प्रकार आहे हा इथे. नुसती पार्क्सच नाहीत तर दोन बिल्डींगच्या मध्ये सुद्धा लहान लहान पार्कस आहेत. म्हणजे अगदी इल्लुशीच जागा पण थोडीशी झाडं, एक लहानसा धबधबा, बसायला बाकडी, एखादं बारिकसं दुकान. दुपारी येईन निवांत बसु शकता. मॅनहॅटनमध्ये तुम्ही आहात आणि वाट भायची वेळ आली तर कधीच तुम्हाला पायर्‍यांवर किंवा बळंच एखाद्या हॉटेलात शिरावं लागणार नाही. २-५ मिनिटावर अशी सुरेखशी जागा असेलच.

आणि हे सोडुन जी भली मोठी पार्क्स आहेत ती भारतीय मनाला सुखद धक्का! मॅनहॅटन मध्ये सेंट्रल्पार्कने किती जागा घेतली आहे पहा. भारतात तिथे नक्की एखादी बिल्डींगची स्किम काढली असती (ट्रम्पचा डोळा होता म्हणे पार्कवर). पण सेंट्रलपार्क काय किंवा प्रॉस्पेक्ट पार्क काय.. शहरात राहुनही जंगलात गेल्याचा अनुभव हवा असेल तर ह्या पार्क्स मध्ये जावे. मस्त खायला न्यायचं बनवुन, सोबत बेडशीट वगैरे.. पथारी पसरायची मस्त झाडाखाली!

काका, फार मस्त मालिका होतेय ही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2016 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मॅनहॅटनचे एक वैशिष्ट्य म्हणजे जवळ जवळ दर २०० मीटरवर मुलांच्या खेळण्याची प्रशस्त व्यवस्था असलेले लहानमोठे पार्क आहेत. भारतीय महानगरांत बिल्डर माफियातील प्रत्येक चौरस फूटाकरिता चालणारी जीवघेणी स्पर्धा पाहण्याची सवय असलेल्या कोणालाही हे आश्चर्यकारकरित्या आनंददायी वाटणे सहाजिक आहे ! हे बघताना आनंदाबरोबर एक वैषम्यही माझ्या मनात सतत दाटून येत होते.

पद्मावति's picture

21 Oct 2016 - 8:04 pm | पद्मावति

फारच मस्तं वर्णन आणि फोटो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Oct 2016 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !