न्यू यॉर्क : २१ : वेस्ट हेवन

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
24 Dec 2016 - 11:22 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

हा अस्सल अमेरिकन भूमीच्या सतत बदलणार्‍या नजार्‍यांचा मनोहारी चित्रपट पाहता पाहता आणि गुगलबाबावर प्रवासाचा मागोवा घेता घेता अडीच-पावणेतीन तास संपून वेस्ट हेवनचा थांबा कधी आला ते कळलेच नाही...

उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचे आठ वाजूनही बर्‍यापैकी उजेड होता. नातेवाइकांच्या घरी पोचून त्यांचा पाहुणचार स्वीकारून बर्‍याच उशीरापर्यंत गप्पा मारत बसलो. नंतर केव्हातरी डोळे जड झाल्यावर झोपेची हाक ऐकायलाच लागली. दुसर्‍या दिवशी आरामात उठून न्याहारी वगैरे करून शहरात फेरफटका मारायला निघालो.

जगप्रसिद्ध येल विद्यापीठामुळे नावाजलेल्या न्यू हेवन या मोठ्या शहराच्या जवळ वसलेले असले तरी वेस्ट हेवन आपले अस्सल अमेरिकनपण राखून आहे. वेस्ट हेवनच्या २८.५ चौ किमी क्षेत्रफळावर साधारणपणे ५५,००० लोकवस्ती आहे. मूळ न्यू हेवन वसाहतीचा भाग म्हणून इथली पहिली घरे १६४८ मध्ये उभी राहिली. १७१९ मध्ये स्वतःचे चर्च मिळाले तरी १८२२ पर्यंत अधिकृतरीत्या ही वस्ती न्यू हेवनचा भाग म्हणूनच ओळखली जात असे. महत्त्वाचे बंदर असल्याने तिला अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात बरेच महत्त्व होते. वरखाली होणाऱ्या युद्धाच्या पारड्याबरोबर या बंदराचा ताबा प्रतिस्पर्धी ब्रिटिश व अमेरिकन सैन्यांच्या हाती आलटून पालटून जात राहिला.

महत्वाचा इतिहास पाठीशी असूनही, या वस्तीला आपले अस्तित्व स्वतंत्र शहराच्या रूपात प्रस्थापित करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. १७८४, १७८६ आणि १७८७ सालांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर १८२२ मध्ये तिला नॉर्थ मिलफर्ड या शेजारच्या वस्तीबरोबर संयुक्तपणे ऑरेंज नावाच्या शहराच्या रूपात ओळखले जाऊ लागले. त्यानंतर १०० वर्षांनी, सन १९२१ मध्ये ऑरेंजपासून वेगळे होऊन, वेस्ट हेवनला स्वतंत्र टाऊनचा दर्जा मिळाला. नंतर, तब्बल चाळीस वर्षांनी १९६१ मध्ये शहराचा दर्जा मिळून तेथे मेयरने चालवलेली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली. यामुळे "कनेटिकटची सर्वात जुनी वस्ती आणि सर्वात नवीन शहर" असा या शहराचा विशेष सांगितला जातो !


वेस्ट हेवन ०१ : शहराचा इतिहास सांगणारी पाटी (जालावरून साभार)


वेस्ट हेवन ०२ : शहराचे विहंगम दर्शन (जालावरून साभार)

पूर्वी चांगले बंदर म्हणून महत्त्व असलेल्या या शहराची अमेरिकन औद्योगिक विकासाच्या पाठीवर भरभराट झाली आणि अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनी तेथे आपले कामकाज विस्तारले. तसेच, अमेरिकेच्या औद्योगिक आणि आर्थिक मंदीच्या काळाचा फटकाही या शहराला बसला आहे. एकेकाळी येथे बायर फार्मास्युटिकल्स, आर्मस्ट्राँग रबर कंपनी, कोलेको, सिकोर्स्की एअरक्राफ्ट, युनायटेड टेक्नॉलॉजीज, इत्यादी महत्त्वाच्या कंपन्या कार्यरत होत्या. आता त्या बंद झाल्या आहेत किंवा इतरत्र गेल्या आहेत. त्यामुळे हे शहर कमी गर्दीचे, आरामात चाललेले व काहीसे झोपाळलेले दिसले. पण तरीही सार्वजनिक जागांतील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सुव्यवस्था समाधानकारक आहे. न्यू यॉर्क शहराच्या गर्दी-गडबडीच्या पार्श्वभूमीवर इथला शांत संथ कारभार स्वागतार्ह वाटला.

शहराचा फेरफटका

दुसर्‍या दिवशी घरातून बाहेर पडल्यावर रहिवासी भागाचे दर्शन सुरू झाले. इथली बहुतेक रहिवासी घरे एक-दोन मजले असलेली, लाकडी व स्वतंत्र हिरवळीचे आवार असलेली आहेत. इथे न्यू यॉर्क शहराप्रमाणे आठ-दहा किंवा जास्त मजली उंच व काँडो (सदनिका) असलेल्या इमारती नाहीत. किंबहुना दोनतीन मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारती अभावानेच दिसतात...


वेस्ट हेवन ०३ : रहिवासी भाग

थोड्याच वेळात आम्ही मेन स्ट्रीट नावाच्या शहरातल्या नावाप्रमाणेच मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या रस्त्यावर पोहोचलो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकाला खेटून दुकाने आहेत. इथल्या बहुतेक इमारती वीट-दगड-सिमेंटच्या पण एक-दोन मजलीच होत्या. विजेच्या तारांचा गुंतावळा पाहून नाही म्हटले तरी मायभूमीची आठवण येऊन शहराशी जवळीक वाटली !...


वेस्ट हेवन ०४ : मेन स्ट्रीट ०१


वेस्ट हेवन ०५ : मेन स्ट्रीट ०२


वेस्ट हेवन ०६ : मेन स्ट्रीट ०३

या रस्त्यावर उगाचच मोठ्याने घरघराट करत शांतता भंग करणारी ही एक अनवट तिचाकी दिसली...


वेस्ट हेवन ०७ : मेन स्ट्रीटवर दिसलेली अनवट तिचाकी

शहर नीट पाहता यावे यासाठी चारचाकी सोडून पायी फेरफटका करायला सुरुवात केली. जराश्या वेळातच भव्य आकारामुळे आणि तांबड्या विटांच्या बांधकामामुळे उठून दिसणारी ही सिटी हॉलची भारदस्त इमारत दिसली...


वेस्ट हेवन ०८ : सिटी हॉल ०१


वेस्ट हेवन ०९ : सिटी हॉल ०२

जरा पुढे गेल्यावर मेन स्ट्रीटवरची दुकानांची गर्दी संपून स्वतंत्र रहिवासी घरांचा भाग सुरू झाला. मधूनच एखादी सदनिका असलेली दोन मजली इमारत, एखादे व्यापारी संकुल किंवा एकांडे दुकान दिसत होते. इतर सर्व पारंपरिक लाकडी बनावटीची रहिवासी घरे दिसत होती...


वेस्ट हेवन १० : पारंपरिक अमेरिकन रहिवासी घरे ०१


वेस्ट हेवन ११ : पारंपरिक अमेरिकन रहिवासी घरे ०२


वेस्ट हेवन १२ : पारंपरिक अमेरिकन रहिवासी घरे ०३


वेस्ट हेवन १३ : रहिवासी भाग

मध्येच एका चर्चच्या टोकदार पांढर्‍याशुभ्र मनोऱ्याने झाडीतून डोके वर काढून लक्ष वेधून घेतले...


वेस्ट हेवन १४ : विटांची रहिवासी इमारत आणि चर्च


वेस्ट हेवन १५ : मेन स्ट्रीटवरच्या एका चौकातील व्यापारी संकुल

बऱ्यापैकी पायपीट करून पोटातल्या कावळ्यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे सुरू केल्यावर पोटपूजा करायला घरी परतलो.

***************

वेस्ट हेवनचा समुद्रकिनारा

समुद्रकिनार्‍यावरचे महत्त्वाचे बंदर असण्याबरोबरच वेस्ट हेवनला मोठ्या लांबीच्या वाळवंटी समुद्रकिनार्‍यांची देणगीही लाभली आहे. सर्व कनेटिकट राज्याच्या सार्वजनिक समुद्रकिनार्‍यांपैकी २५% लांबीचे किनारे या एकाच शहराच्या हद्दीत आहेत. त्यांची एकूण लांबी ५.६ किमी आहे. निसर्गाच्या या देणगीचा स्थानिक नागरिकांसाठी आणि पर्यटनासाठी सुंदर विकास केलेला आहे...


वेस्ट हेवन १६ : वेस्ट हेवनच्या समुद्रकिनार्‍याचा नकाशा (जालावरून साभार)


वेस्ट हेवन १७ : समुद्रकिनार्‍याचे विहंगम दर्शन ०१ (जालावरून साभार)


वेस्ट हेवन १८ : समुद्रकिनार्‍याचे विहंगम दर्शन ०२ (जालावरून साभार)


वेस्ट हेवन १९ : समुद्रकिनार्‍याचे विहंगम दर्शन ०३ (जालावरून साभार)

संध्याकाळी समुद्रावर फेरफटका मारायला गेलो तेव्हा कर्ममधर्मसंयोगाने आमच्या नातेवाइकांचा एक अमेरिकन मित्र त्याची स्पीडबोट धक्क्याला लावत होता. आम्हाला बघून त्याने बोटीतून फेरी मारण्यासाठी आमंत्रण दिले...


वेस्ट हेवन २० : जेटी

अश्या संधीचा अव्हेर करणे शक्यच नव्हते ! मग काय ? वेस्ट हेवन आणि त्याला लागून असलेल्या न्यू हेवनच्या किनारपट्टीचे प्रशांत सागरातून वेगाने पाणी कापत जाण्यार्‍या स्पीडबोटीतून दर्शन झाले...


वेस्ट हेवन २१ : समुद्रकिनार्‍यावरची रहिवासी घरे


वेस्ट हेवन २२ : पूल ०१


वेस्ट हेवन २३ : पूल ०२


वेस्ट हेवन २४ : पुलाखालून जाताना


वेस्ट हेवन २५ : बंदरात उभ्या असलेल्या बोटी आणि किनार्‍यावरच्या इंधन साठवणीच्या टाक्या


वेस्ट हेवन २६ : समुद्रकिनारा

अर्ध्या एक तासांची ही अनपेक्षित जलसफर संपवून आम्ही किनारपट्टीची चक्कर मारायला निघालो. किनारपट्टीवर बनवलेल्या खास डांबरी पायरस्त्यावरून कुटुंबकबिल्यासह संध्याकाळी पायी फिरायला आलेल्यांची आणि व्यायामासाठी धावणार्‍यांची वर्दळ होती...


वेस्ट हेवन २७ : समुद्रकिनारा ०१


वेस्ट हेवन २८ : समुद्रकिनारा ०२

अमेरिकेने केलेल्या अनेक युद्धांत कामी आलेल्या या शहरातील सैनिकांच्या स्मरणार्थ येथे एक स्मारक उभारलेले आहे...


वेस्ट हेवन २९ : युद्धस्मारक

  
वेस्ट हेवन ३० व ३१ : व्हिएतनाम आणि कोरियन युद्ध स्मारकांच्या पाट्या

अमेरिकेने जगभर केलेल्या युद्धांपैकी १५ पेक्षा जास्त युद्धांत या शहरातले नागरिक कामी आले आहेत. त्या प्रत्येक युद्धाच्या नावे एक छोटा स्तंभ या उघड्या स्मारकात उभारलेला आहे...


    
वेस्ट हेवन ३२, ३३ व ३४ : इराक, अफगाणिस्तान आणि क्यूबा युद्धांच्या स्मरणार्थ असलेले छोटे स्तंभ


वेस्ट हेवन ३५ : समुद्रकिनार्‍यावरची सुंदर संध्याकाळ

वेस्ट हेवनमधले अजून काही

उत्पन्नाच्या दृष्टीने जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि वादग्रस्त कारणांसाठी चर्चेत असणार्‍या वॉलमार्ट कंपनीचे एक हायपरमार्केट वेस्ट हेवनमध्ये सन २००० पासून आहे. त्यालाही एक धावती भेट दिली...


वेस्ट हेवन ३६ : वॉलमार्ट हायपरमार्केट ०१


वेस्ट हेवन ३७ : वॉलमार्ट हायपरमार्केट ०२

या अस्सल अमेरिकन परिसरातही आशियाई लोकांनी यशस्वी शिरकाव केलेला आहे. त्यांचे सद्याचे इथले प्रमाण ३% टक्के आहे. त्यात भारतीय लोक लक्षणीय संख्येने आहेत याचे अनेक पुरावे सापडतात. ते कधी "इंडिया एशियन ग्रोसरीज" किंवा "भारत बझार" अश्या नावांच्या दुकानांच्या स्वरूपात दिसतात...


वेस्ट हेवन ३८ : भारत बझार

तर कधी पारंपरिक अमेरिकन धाटणीच्या घरासमोर असलेल्या पारंपरिक मराठी तुळशीवृंदावनाच्या स्वरूपात दिसतात...


वेस्ट हेवन ३९ : वेस्ट हेवनमधील घरासमोरील तुळशीवृंदावन

एकंदरीत, नातेवाइकांच्या प्रेमळ पाहुणचारामुळे आणि पारंपरिक अमेरिकन शहर पहायला मिळाल्यामुळे वेस्ट हेवनची आमची फेरी सुखद आणि चिरस्मरणिय झाली यात वाद नाही.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 Dec 2016 - 11:33 pm | पद्मावति

छान झालाय हा भागही. फोटो मस्तं. तुळशी वृंदावन किती छान दिसतंय.

प्रचेतस's picture

25 Dec 2016 - 10:26 pm | प्रचेतस

छान झालाय हा भाग.

किनारा जरा वेगळाच दिसतोय. भूशिर असल्याने अथांग समुद्र दिसत नाहीये वाटतं.

अजया's picture

26 Dec 2016 - 12:36 pm | अजया

छान भाग हासुध्दा!
तुळशीवृंदावन मस्त.

खटपट्या's picture

29 Dec 2016 - 5:07 am | खटपट्या

छान भाग

या अस्सल अमेरिकन परिसरातही आशियाई लोकांनी यशस्वी शिरकाव केलेला आहे

अमेरीकन लोक चीनी वंशीय लोकांना एशियन संबोधतात आणि भारतीयांना इंडीयन्स...

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2016 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्याची कल्पना आहे, म्हणूनच मी...

त्यांचे सद्याचे इथले प्रमाण ३% टक्के आहे. त्यात भारतीय लोक लक्षणीय संख्येने आहेत याचे अनेक पुरावे सापडतात.

असे लिहिले आहे. न्यू हेवन काऊंटीत (न्यू हेवन, वेस्ट हेवन, इस्ट हेवन, नॉर्थ हेवन, इ) भारतिय लक्षणिय प्रमाणात आहे आणि मुख्य म्हणजे उद्योगधंदे, खाजगी दुकाने, इत्यादीमध्ये आहेत

प्रसन्न३००१'s picture

29 Dec 2016 - 11:28 am | प्रसन्न३००१

भारत बझार हि रिटेल चैन आहे का अमेरिकेत ? कारण असंच भारत बझार स्टोअर मला फ्रीमोंट, कॅलिफोर्निया मध्ये दिसले होते

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2016 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी तेवढा विचार केला नव्हता. पण जालावर पाहिले तर पश्चिम किनार्‍यावरील (बे एरियातील ३ आऊटलेट्स) असलेले भारत बझार आणि कनेटिकटमधले भारत बझार वेगळे आहे असे दिसते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2016 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

सिरुसेरि's picture

30 Dec 2016 - 12:07 pm | सिरुसेरि

सुरेख लेख आणी फोटो