न्यू यॉर्क : ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
17 Feb 2017 - 6:44 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
===============================================================================

...पायांना जरासा आराम मिळाला आणि पोटाचीही सोय झाली तसे मोठ्या उत्साहाने मोहीम परत सुरू केली.

अमेरिकन इंडियन संस्कृतीचे संग्रह मोठ्या प्रमाणात असणे या संग्रहालयात साहजिकच होते. "नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन" बघून झाले होते. "आता इथे काय अधिक पहायला मिळणार ?" असा प्रश्न मनात येणे साहजिक होते. पण त्या विभागात... किंबहुना विभागसंकुलात... शिरल्यावर ती शंका केव्हा कशी उडून गेली हे ध्यानात आले नाही. अजस्त्र अमेरिकन द्वीखंडांमध्ये काही सहस्र वर्षांच्या कालखंडात जन्मलेल्या आणि बहरलेल्या असंख्य प्राचीन अमेरिकन संस्कृतींचा खजिना पाहिल्यावर, त्या संस्कृती त्यांच्या कालखंडासाठी प्रगत होत्या याबद्दल मनात शंकाच राहत नाही. मात्र, तेथील लोक युरोपातून येणार्‍या नवीन आक्रमकांच्या मानाने फारच कमी भांडखोर असल्याने त्यांना नवनवीन, जास्त विध्वंसकारी शस्त्रास्त्रे निर्माण करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे सोने आणि चांदीचा अपरिमित साठा करण्याइतके धातुशास्त्र विकसित झाले असूनही त्यांची शस्त्रे मुख्यतः लाकडी दंडुक्यांच्या पुढे क्वचितच गेली. संस्कृतीच्या इतर विकसित आनंददायी पैलूंच्या मानाने त्यांची शस्त्रे अतिशय कमकुवत होती. अर्थातच, आक्रमकांच्या धातूंच्या तलवारी आणि स्फोटकांचा उपयोग असलेल्या बंदुकांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही यात आश्चर्य नाही... आणि त्याचा त्या संस्कृतींवर काय परिणाम झाला हा इतिहास, आक्रमकांना मानणे कितीही कठीण असला तरी, आतापर्यंत सर्वमान्य झाला आहेच. या पार्श्वभूमीमुळे, अमेरिकन इंडियन संस्कृतींच्या दालनांतून फिरताना, आश्चर्य-आनंद-दु:ख यांची मिश्र भावना मनात सतत एक विचित्र वादळ निर्माण करत राहते.

मेक्सिको आणि मध्य अमेरिका दालन (Hall of Mexico and Central America)

या विभागात मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील कोलंबियनपूर्व (pre-Columbian) कालखंडातील माया, ओल्मेक, अ‍ॅझटेक इत्यादी संस्कृतींमधील अवशेषांचे संग्रह आहेत. या संस्कृतींचा लिखित इतिहास नसल्याने, त्या काळचे जीवन, व्यवहार, रुढी-परंपरा, इत्यादींची कल्पना त्यांच्या सापडलेल्या अवशेषांवरून करावी लागते. या संस्कृतींचे अवशेष मिळणे आणि त्यांचे शास्त्रीय विश्लेषण होणे याची सुरुवात होण्याच्या काळात सन १८९९ मध्ये हा विभाग सुरू झाला. त्यानंतर मिळत जाणार्‍या नवनवीन अवशेषांच्या ठेव्यांबरोबर या विभागाचा आकार वाढत गेला आणि त्याची वारंवार पुनर्रचना होत गेली आहे.

उत्खनन स्थानात मिळालेल्या एका पूर्णरुपातील थडग्याची प्रतिकृती आणि त्यांच्यातील वस्तू असलेला संग्रह या विभागातला एक प्रसिद्ध मानबिंदू आहेत...


मानवी अवशेषांसह थडग्याची प्रतिकृती आणि थडग्यात सापडलेल्या वस्तू


अ‍ॅझटेक सूर्यशिला (Aztec Stone of the Sun)

मेक्सिको सिटीमधील संग्रहालयामध्ये ठेवलेल्या मूळ अ‍ॅझटेक सूर्यशिलेची आणि प्राचीन काळी ती तिच्या मूळ रंगांत कशी दिसत असेल त्याची, अश्या दोन प्रतिकृती येथे आहेत. त्या संस्कृतीतील सूर्यदेव व दिनदर्शिकेसंबंधीच्या अनेक कल्पना चिन्हांच्या रूपाने या शिलेवर कोरलेल्या आहेत. १२ फुट व्यासाच्या या शिलेचे वजन तब्बल २ टन आहे...

  
अ‍ॅझटेक सूर्यशिलेची प्रतिकृती आणि ती प्राचीन काळी मूळ रंगीत स्वरूपात कशी दिसत असेल हे दाखवणारी प्रतिकृती


इतर वस्तू...

  

    
इतर वस्तू


या संस्कृतींनी खनिजांपासून शुद्ध सोने आणि चांदी वेगळे करण्याच्या व त्यापासून वस्तू बनवण्याच्या पद्धती विकसित केल्या होत्या. मुबलक सोने-चांदीचे साठे असलेल्या त्यांच्या संस्कृतीत त्या धातूंना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व नव्हते. परंतू, ते साठे पाहून सोने-चांदीला समृद्धीचे मुख्य परिमाण समजणार्‍या युरोपियन लोकांचा लोभ जागा झाला. अश्या रितीने अमेरिकन इंडियन समुदायांकडे असलेले सोने त्यांच्या संस्कृतींवरील आक्रमण आणि नाशाचे कारण ठरले.


सोन्याच्या वस्तू : आभूषणे, कलात्मक वस्तू आणि रोजच्या वापरातल्या वस्तू


  
टोळीच्या प्रमुखाने वापरायची आभूषणे


अमेझॉनच्या जंगलातील संस्कृतींचे दालन

  
अमेझॉन खोर्‍यातले एक युगुल आणि घरातील नेहमीच्या वापराच्या वस्तू


इतर आकर्षक संग्रह...

  
विणकर स्त्री आणि वैद्यकीय उपचार करणारा 'मेडिसिन मॅन'


  
शिकारीचे शिक्षण आणि जलवाहतूकीची साधने


  
एकत्रित कुटुंबाचे एक मोठे घर आणि सामाजिक समारंभांत वापरायची साधने


पूर्वेकडील जंगलांतील संस्कृतींचे दालन (Hall of Eastern Woodlands Indians)

  

  

  
पूर्वेकडील जंगलांतील संस्कृतींचे संग्रह


पठारांवर राहणार्‍या संस्कृतींचे दालन (Plain Indians)

  

    
पठारांवर राहणार्‍या संस्कृतींमधील व्यक्ती व वस्तू


प्रशांत सागराच्या (पश्चिम) किनार्‍यावरील संस्कृतींचे दालन (Hall of Pacific People)

    

  
प्रशांत सागराच्या (पश्चिम) किनार्‍यावरील संस्कृतींमधील वस्तू


म्युझियमच्या ७७व्या स्ट्रीटवर असलेल्या किल्ल्यासारखे दिसणार्‍या प्रवेशद्वारातून आत शिरल्यास त्याला लागून असलेल्या "ग्रँड गॅलरी"मध्ये अलास्काच्या दक्षिणपूर्वेतल्या हायडा (Haida) भूभागावर राहणार्‍या जमातीची एक पूर्णरुपातील भली मोठी नौका टांगून ठेवलेली आहे...


हायडा (Haida) नौका


अश्मावशेषांची दालने

ही दालने या संग्रहालयातील खास आकर्षण आहे. जगभरातून जमवलेल्या अश्मावशेषांच्या स्थायी संग्रहांनी या संग्रहालयाचा पूर्ण चवथा मजला व्यापलेला आहे. त्यातील तीन डायनॉसॉर जीवाश्मांचा एक विशाल संग्रह मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असल्याचे आपण पाहिले आहेच. असे असूनही इतर अनेक अश्मावशेष साठवणघरांत बंदिस्त आहेत. केवळ थक्क व्हावे इतक्या विविध प्रकारचे इतक्या मोठ्या संखेने असलेले जीवाश्म येथे आहेत. या संग्रहांतील असंख्य पृष्ठवंशिय जीवाश्मांचा अभ्यास (vertebrate paleontology) करणारे बरेच जगन्मान्य संशोधन येथून झाले आहे आणि त्याने पृथ्वीवरच्या जीवनाचा इतिहास नक्की करण्यामध्ये मोलाची मदत केली आहे.

येथिल काही नमुने इतके महाकाय आहेत की त्यांना एका विशाल दालनातही सामावून घेणे शक्य झालेले नाही. असाच एक दालनात उभा राहून त्याच्या दरवाज्यातून डोके बाहेर काढून डोकावणारा डायनॉसॉर अश्मावशेष खालच्या प्रकाशचित्रात दिसेल...

  
दालनाला पुरून उरल्याने दरवाज्यातून बाहेर डोकावणारा डायनॉसॉर अश्मावशेष


  

  

  
इतर विशेष डायनॉसॉर अश्मावशेष संग्रह ०१


  
इतर विशेष डायनॉसॉर अश्मावशेष संग्रह ०२


  

  
अश्मीभूत डायनॉसॉर डोक्यांचे संग्रह


सस्तन प्राणी आणि त्याच्या नष्ट झालेल्या प्रजातींचे अश्मावशेष असलेले दालन

  

  
नष्ट झालेल्या सस्तन प्राण्यांचे अश्मावशेष (वरच्या रांगेतील डावीकडच्या चित्रात मॅमथचा अश्मावशेष आहे)


आपल्या आजूबाजूला राहणारे डायनॉसॉर्स (Dianosaurs among us)

पृथ्वीवरील जीवनाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात अनेक चित्तवेधक घटना आहेत. पण, त्यातली एक फारच रोचक आहे, ती म्हणजे, १७० कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य करून काही कोटी वर्षांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाले असा समज असलेल्या, अनेक टन वजन असलेल्या अजस्त्र डायनॉसॉर्सपैकी काहींचे आजच्या घडीला आपल्या आजूबाजूला असलेल्या शेकडो-हजारो पटींनी लहान आकाराच्या व हवेत सलग अनेक तास मुक्त भरार्‍या घेणार्‍या पक्षांत झालेले रूपांतर !

प्रथमदर्शनी हे मान्य करायला कठीण वाटले तरी, जीवावशेषांच्या संशोधनातून आतापर्यंत मिळालेल्या व सतत पुढे येत असलेल्या नवनवीन सबळ शास्त्रीय पुराव्यांमुळे, प्राचीन डायनॉसॉर्सपासून आधुनिक पक्ष्यांपर्यंतच्या उत्क्रांतीचे दुवे मिळाले/मिळत आहेत. या संबंधातील शास्त्रीय पुराव्यांची मांडणी "Dianosaurs among us" या प्रदर्शनात केलेली आहे. त्यासंबधिचे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१. काही डायनॉसॉर्स घरटी बनवून त्यात अंडी घालत असत आणि आधुनिक पक्षांसारख्या पद्धती वापरून आपल्या पिलांची काळजी घेत असत...


घरट्यात अंडी घालणारे डायनॉसॉर्स


२. अनेक डायनॉसॉर्समध्ये प्राचीन स्वरूपातील पिसे उत्क्रांत झाली होती. त्यांचा उपयोग थंडीपासून संरक्षण, आपल्या जोडीदाराला आकर्षित करणे, उडणे, इत्यादींसाठी होता. त्या पिसांच्या रचनेत उत्क्रांती होत आधुनिक उडणार्‍या पक्षांची पिसे बनली आहेत.

  

  


डायनॉसॉर्समधील पिसांची उत्क्रांती दाखवणारे संग्रह


३. आधुनिक सुधारीत तंत्रज्ञानाने जीवाश्मांची तपासणी करून मिळालेल्या माहितीतून डायनॉसॉर्स आणि आधुनिक पक्ष्यांच्या शरीररचनेतली आणि शरीरकार्यपद्धतीतली अधिकाधिक साम्ये पुढे येत आहेत. उडण्याची क्षमता नसलेल्या काही डायनॉसॉर्समध्येही उडण्यासाठी आवश्यक रचना असलेले मेंदू आणि फुफ्फुसे निर्माण झाली होती. पुढे पक्षी निर्माण होण्याच्या उत्क्रांतीच्या पायर्‍यांमध्ये या फरकांचा उपयोग झाला.

४. पोकळ हाडे, चोच आणि टोकदार नखे ही आधुनिक पक्षांना डायनॉसॉर्सपासून मिळालेली भेट आहे.

या उत्क्रांतीची चित्तवेधक कहाणी खालील व्हिडिओ क्लिपमध्ये पाहता येईल...

फुलपाखरे संवर्धनगृहामधिल (बटरफ्लाय काँझरवेटरी) मधील अनुभव

कीटकांबद्दल आपल्या मनात सर्वसाधारणपणे घृणा असली तरी, त्यांच्या कुटुंबातील फुलपाखरे मात्र त्यातला एक मोठा अपवाद आहे. रंगीबेरंगी चित्ताकर्षक नक्षी अंगावर घेऊन दिमाखाने भिरभिरणारी फुलपाखरे पहायला आवडत नाहीत असा माणूस विरळाच असेल. झुडुपांनी भरलेल्या एका मोठ्या संरक्षित दालनात मुक्तपणे विहरणार्‍या सुमारे ५०० फुलपाखरांमध्ये फिरण्याचा आनंदानुभव हा कार्यक्रम देतो. अर्थातच, हा कार्यक्रम पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आपल्या भोवती रुंजी घालणार्‍या फुलपाखरांची मजा पाहत या फिरताना तेथील या दालनातील माहितीच्या पाट्यांमुळे आपल्याला फुलपाखरांबद्दल बरीच रोचक शास्त्रीय माहितीसुद्धा मिळते.

तेथे काढलेली ही काही प्रकाशचित्रे...

  

  

  
फुलपाखरे संवर्धनगृहातील काही फोटो


आणि ही जालावरून साभार घेतलेली फुलपाखरे संवर्धनगृहाची व्हिडिओ क्लिप...

रोज पृथ्वी व अवकाश केंद्र (Rose Center for Earth and Space)

सन १९३५ सालापासून कार्यरत असलेल्या हेडन तारांगणाला तोडून तेथे १९०० साली "रोज पृथ्वी व अवकाश केंद्र" उघडले गेले. सहा मजले उंचीच्या काचेच्या घन (क्यूब) आकारात तरंगणारा २७ मीटर त्रिज्येचा प्रकाशित गोलाकार दिसावा, अशी त्याची रचना आहे. जेम्स पोल्शेक या त्याच्या वास्तुशिल्पकाराने त्याचे वर्णन "वैश्विक प्रार्थनागृह (cosmic cathedral)" असे केले आहे. या इमारतीची गणना मॅनहॅटनच्या सर्वोत्तम स्थापत्याविष्कारांमध्ये केली जाते. ३०,९८० चौ मी (३३३,५०० चौ फू) आकाराच्या या केंद्रात हेडन तारांगणाबरोबरच उच्च प्रतीचे संशोधन, शिक्षण आणि प्रदर्शनांचे काम करणारे विभाग आहेत. नील दग्रास टायसन (Neil DeGrasse Tyson) हा जगप्रसिद्ध अवकाशशास्त्रज्ञ (अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट) हेडन तारांगणाचा निर्देशक आहे.

हेडन तारांगणामध्ये प्रदर्शित होणार्‍या "डार्क युनिव्हर्स" या कार्यक्रमाला खुद्द नील दग्रास टायसनने आपला आवाज दिला आहे. प्रेक्षकांच्या चारी बाजूला व डोक्यावर असलेल्या तारांगणाच्या अर्धगोलाकार पडद्यावर हा दृकश्राव्य कार्यक्रम प्रदर्शित केला जातो. अनंत विश्वाच्या अभ्यासात आतापर्यंत उघड झालेल्या अनेक नाट्यमय गोष्टी आणि भविष्यात अपेक्षित असलेले शोध यांचा मागोवा, सर्वसामान्य जनतेला समजेल अश्या रोचक व सोप्या शब्दांत, हा कार्यक्रम घेतो. या दरम्यान हा कार्यक्रम प्रेक्षकांना अनेक जगप्रसिद्ध वेधशाळा व हबल सारख्या अवकाशात फिरणार्‍या दुर्बिणींच्या डोळ्यातून विश्वदर्शन घडवतो. गॅलिलिओ नावाच्या उपग्रहाने गुरुग्रहाच्या वातावरणात मारलेला सूर आपले मन थक्क करून जातो. हे सर्व बघत असतानाच हा कार्यक्रम आपल्याला "डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी" यासारख्या किचकट शास्त्रीय संकल्पनांची सहज सोपी ओळख करून देतो.

आपल्या शरीरातले गुप्त विश्व (The Secret World Inside You) प्रदर्शन

या खास प्रदर्शनात, निरोगी मानवी शरीरात अस्तित्वात असणार्‍या सूक्ष्म जीवासंबंधीची माहिती आकर्षक प्रतिकृती, दृकश्वाव्य माध्यमे आणि इंटरअ‍ॅक्टिव खेळांच्या स्वरूपात मांडलेली आहे. रोचक पद्धतीने लहान मुलांचे ज्ञानवर्धन करण्याबरोबरच हे प्रदर्शन मोठ्या माणसांच्या मनातले अनेक गैरसमजही दूर करते.

  

  
"आपल्या शरीरातले गुप्त विश्व" या प्रदर्शनातले काही विभाग


अवनट कारंजे

संग्रहालयात फेरी मारताना खिडकीतून एक अनवट नजारा दिसला. इमारतीला लागून असलेल्या हिरवळीच्या एका भागात काँक्रिटच्या एका मोठ्या सपाटीवर असलेल्या छिद्रांतून अचानक पाण्याचे फवारे उडत-बंद होत होते. तेथे फिरायला आलेली काही मुले समुद्रकिनार्‍यावर आल्याप्रमाणे आपले कपडे उरतवून, पाणी केव्हा व कुठून उडेल याचा अंदाज बांधत, त्याची मजा घेत होते. त्यांच्या बरोबर आलेल्या पालकांपैकी एखाद-दुसरा स्वच्छंदपणे त्यांच्यात सामील होत होता...


अचानक फवारे उडवणार्‍या कारंज्याची मजा लुटणारी बालके आणि पालक


केवळ एका दिवसात हे महासंग्रहालय आणि पाच खास कार्यक्रम पाहण्याचा विक्रम करून तृप्त झालेले मन आणि धावपळ करून थकलेले पाय घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी सबवे पकडायला निघालो.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Feb 2017 - 8:40 am | प्रचेतस

जबरदस्त संग्रहालय आहे हे.
डायनॉसॉर फॉसिल्स उत्तम प्रकारे जतन केलेले आहेत.

अमेरिकेतील प्राचीन संस्कृतीविषयी मात्र नेहमीच विषाद वाटतो. संस्कृती नष्ट करुन त्यांची संग्रहालये मात्र उभारली गेली. अर्थात इथल्या प्राचीन संस्कृती ह्या भारतीय, ग्रीक, पर्शियन, इजिप्शियन, मेसोपोटेमियन संस्कृतींइतक्या प्रगत मात्र अजिबात दिसत नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2017 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

अमेरिकेत गेलेल्या सुरुवातीचे युरोपियन वसाहतवादी कमी आणि आपल्या राजासाठी संपत्ती लुटालूट करून आणणारे जास्त होते. त्यासाठी त्यांनी क्रूरतेची परिसीमा गाठली होती. आपल्या कारवाया युरोपात कळून आपली नाचक्की होऊ नये यासाठी त्यांनी अनेक कपोलकल्पित कथा आणि थियर्‍या पसरवल्या होत्या. उदा. अमेरिकन मूलवासी रानटी, क्रूर, अशिक्षित आणि असंस्कृत आहेत, किंबहुना आदिमानवच आहेत, इ. आपल्या कारवायांचा पुरावा नष्ट करायला त्यांनी प्रचंड नरसंहार आणि उध्वंस केला. गेल्या काही शतकांत या मूल संस्कृतींच्या अवशेषांचे उत्खनन आणि अभ्यास सुरू झाल्यावर अनेक तथ्ये पुढे येऊ लागली आहेत. अर्थात जे पूर्णं किंवा बर्‍याच प्रमाणात नष्ट झाले आहे त्याबद्दल, लेखी पुरावे नसल्याने, केवळ अंदाजच बांधावे लागतात.

अमेरिका खंडात मानवी वस्ती सर्वात शेवटी झाली. भारतीय, ग्रीक, पर्शियन, इजिप्शियन, मेसोपोटेमियन संस्कृती जेव्हा एका जागेवर स्थिरस्थावर झाल्या त्या वेळेस आणि नंतर काही हजार वर्षे हे लोक स्थलांतरांच्या (प्रसरण) अवस्थेतच होते. त्यामुळे, एका जागेवर स्थिर झालेल्या मोठ्या लोकसंखेचा फायदा तुलनेने कमी मिळाला. शिवाय, "आपल्या मालकीच्या भूभागावर स्थिर असून एकमेकाशी सतत भांडत असणारे जनसमुदाय", युरोप इतके जगात इतर ठिकाणी नव्हते. या भांडखोरपणामुळे (इतर सामाजिक-राजकीय-आर्थिक परिणामांबरोबरच) ताकदवान शस्त्रे आणि हुशार रणनीती विकसित करणे ही एक अत्यावश्यक गरज होती. त्याचा उपयोग नंतर वसाहती निर्माण करणे व कमी मनुष्यबळावर तेथील लोकांना ताब्यात ठेवणे किंवा नष्ट करणे यासाठी झाला.

याशिवाय मोठ्या व विकसित संस्कृती निर्माण होण्यासाठी अत्यावश्यक असणार्‍या, (१) माणसाळवण्याजोगी जनावरे (विशेषतः गुरे, घोडे, इ) आणि माणसाळवण्याजोग्या अन्नधान्यांच्या प्रजाती (गहू, तांदूळ, कडधान्ये, इ) या दोन गोष्टी जगभरात केवळ लेव्हांत (भूमध्य समुद्राच्या उत्तर-पूर्व टोकाजवळचा भूभाग) या प्रदेशातच निर्माण झाल्या होत्या किंवा मध्य आशियाई स्टेपेजमधून तेथे पोचल्या. त्यामुळे सुरुवातीच्या मोठ्या व विकसित संस्कृती प्रामुख्याने तेथे निर्माण झाल्या.

यारेड डायमंडने (Jared Diamond) त्याच्या "Guns Germs and Steel" या पुस्तक याबाबतीत सुंदर विश्लेषण केले आहे.

प्रचेतस's picture

19 Feb 2017 - 9:14 am | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद काका.

अमेरिका खंडात मानवी वस्ती सर्वात शेवटी झाली ह्याचे कारण काय असावे? अटलांटिक आणि प्रशांत महासागरांमुळे हा भूभाग अगदी अलीकडेपर्यंत मानवी वस्तीपासून तुटलेलाच राहिला का? जलवाहतुकीची तुलनेने प्रगत साधने विकसित झाल्यानंतरच म्हणजे मानव इकडे येऊ शकला का? पॉलिनेशियन लोकांनी केवळ तराफ्याच्या साहाय्याने समुद्री प्रवास केला असे कुठेतरी वाचले होते.

अमेरीकेत प्रागैतिहासिक वसाहतींचे अवषेश काही सापडतात का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2017 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

आफ्रिकेतील (सद्याच्या इथिओपियात असलेल्या) रिफ्ट व्हॅलीत २ लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेला आधुनिक मानव सुमारे ९०,००० व ८०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात केव्हातरी आफ्रिकेबाहेर बाहेर पडू लागला व प्रथम आशियात आणि नंतर युरोप व अमेरिकेत पसरायला लागला. ही सगळी वाटचाल अंतर (मुख्यतः पायी होत असल्याने), भौगिलीक परिस्थिती (मुख्यतः प्रशांत समुद्राने विभागलेली अशिया व अमेरिकन खंडे) आणि हवामान (हिमयुगे, इ) यांचे अडथळे पार करत त्याला अमेरिका खंडात पोहोचायला ९,००० वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ उगवला. काहींच्या मते हा काळ अगोदरचा असला तरी तो १२,००० वर्षांपुर्वीच्या अगोदर असण्याचे सबळ पुरावे मिळालेले नाहीत. यावेळेपर्यंत युरेशियातील मानव अनेक ठिकाणी स्थायीक होऊन शेती करू लागल्याचे व त्याने (कष्टाची कामे/वाहतूक करण्यासाठी, अन्नासाठी, इ) अनेक प्राण्यांना माणसाळविल्याचे पुरावे आहेत.

अमेरिकेतील मानवांपेक्षा युरेशियातील मानवांना एका जागी स्थिरस्थावर होण्यासाठी काही दशसहस्त्र वर्षे (किंवा दुप्पट-तिप्पट) जास्त वेळ मिळाला. हा महत्वाचा मुद्दा असला तरी त्याबरोबरच, (अ) एका जागी स्थिर झालेल्या वेगवेळ्या मानवी समुदायाचे जमिनीच्या हक्कांसाठी एकमेकाशी संघर्ष होणे आणि त्यामुळे सामरिक शस्त्रे व रणनिती विकसित करण्याची निकड निर्माण होणे आणि (आ) वस्ती केलेल्या भूभागावर, संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक माणसाळवण्याजोग्य प्राणी व वनस्पतींची उपलब्धता, हे दोन मुद्देही तेवढेच महत्वाचे आहेत.

"पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" या मिपावरच्याच माझ्या लेखमालिकेत या मानवी प्रवासाचे मार्ग व कालखंड, आणि ते ठरविण्यासाठी वापरलेल्या सबळ शास्त्रीय पुराव्यांचा उहापोह केला आहे.

मातेकडून मिळणार्‍या मायटॉकाँडियल डिएनएच्या अभ्यासावरून बनवलेला मानवी प्रसरणाराचा एक नकाशा (जालावरून साभार) खाली देत आहे...

नकाशातील वर्तुळांचे/कंसांचे रंग त्या त्या भूभागावर मानव केव्हा पोचला / स्थिरावला याचे (लिजंडमघ्ये विषद केलेले) आकडे (हजार वर्षांच्या परिमाणात) दाखवत आहेत.

त्या काळी जलप्रवास फार विकसित नसल्याने मानवाचा अमेरिकेतील शिरकाव जलप्रवासाने नाही तर (सद्याचा बेरिग सामुद्रधुनीच्या मार्गे) पायी झाला असल्याचेच जास्त पुरावे आहेत. त्याबरोबर जलप्रवासानेही माणूस अमेरिकेत पोचला असे मानणारेही काही दावे आहेतच !

आशियाई व पॉलिनेशियन लोकांच्या प्रशांत महासागरातील जलप्रवासाबद्दलची माहिती "समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास" या माझ्या लेखात आहे. मात्र, याबाबतीत अधिक संशोधन होणे जरूरीचे आहे आणि त्यातल्या काही तथ्यांना अजून सबळ शास्त्रीय पुराव्यांची गरज आहे.

प्रचेतस's picture

19 Feb 2017 - 3:32 pm | प्रचेतस

हे लेख पुर्वीही वाचले होते, ह्या निमित्ताने त्यांची परत उजळणी झाली, काही निसटलेले धागे पुन्हा जुळले गेले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2017 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकेतील प्राचीन संस्कृतीविषयी मात्र नेहमीच विषाद वाटतो. संस्कृती नष्ट करुन त्यांची संग्रहालये मात्र उभारली गेली.

हे खरे आहेच. पण एक गोष्ट नजरेला आणुन देऊ इच्छितो की त्यांच्यात वसाहतवादी अरेरावी आणि विध्वंसक प्रवृत्तीचे लोक होतेच; पण जुन्या संस्कृतीबद्दल कुतुहल असणारे, त्यांची जपणूक करण्यासाठी धडपडणारे, अभ्यासू आणि संशोधक लोकही होते. ते नसते तर जगातल्या सगळ्याच प्राचीन संस्कृतींचे नामोनिशाण उरणे जरासे कठीणच होते...

ग्रीक आणि रोमन संस्कृतींचे उत्खनन, अभ्यास आणि जतन पाश्चिमात्यांनी केले ही वस्तूस्थिती आहे आणि यात फारसे कौतूक करण्याजोगे नाही असेही आपण म्हणू शकतो.

मात्र, दक्षिणपश्चिम आशियातल्याच भारताभिमुखी संस्कृतींचेच नव्हे तर खुद्द भारतातल्या प्राचीन संस्कृतींक ठेव्यांचेही उत्खनन आणि अभ्यास कोणी सुरू केला ?" या प्रश्नाचे उत्तर भारतियांना अभिमानास्पद वाटावे असे खचितच नाही :( ...

नमुन्यादाखल खालील दोनच उदाहरणे बघा :

१. हराप्पा-मोहेंजोदरो: चार्ल्स मॅसनने यांचा पहिला उल्लेख १८४२ मध्ये त्याच्या "Various Journeys in Balochistan, Afghanistan, and the Punjab" या पुस्तकात केला. नंतर १८५६ मध्ये जनरल अलेक्झांडर कनिंघॅम (जो नंतर director general of the archaeological survey of northern India बनला) ने East Indian Railway Company च्या कराची आणि लाहोरला जोडणार्‍या रेल्वे लाईनच्या कामाला भेट देत असताना त्या अवशेषांची नोंद घेतली. तो पर्यंत त्या संस्कृतीच्या अवशेषांतील विटा तोडून त्या बांधकामे व रेल्वेलाईनच्या कामासाठी वापरल्या जात असत ! :( :( आज मोहेंजोदरोबद्दल कळकळीने बोलणार्‍या भारतियांची ही अनास्था ब्रिटीश हस्तक्षेपाने बंद झाली नसती तर आता त्या अवशेषांच्या जागी काय उरले असते ???

२. अजंता आणि वेरूळ: आपण मराठी माणसांचे मानबिंदू असलेली अजंता आणि वेरूळ येथील लेणी सन १८१९ साली शिकारीसाठी जंगलात फिरताना जॉन स्मिथ या ब्रिटिश सैन्यदलातील अधिकार्‍याच्या नजरेस पडली नसती तर ?

भारताचा बराचसा इतिहास इंग्लिशेतर भाषांत नोंदलेला असूनही भारतिय इतिहासाच्या बहुतेक मान्यवर इतिहासकारांचे लेखन गोर्‍या इतिहासकारांचे दाखले दिल्याशिवाय पुरे होत नाही !

या वरच्या गोष्टी स्वतःच्या इतिहासाचा (मुळात तो गोर्‍यांचा इतिहास नव्हताच) अभिमानाचा भाग म्हणून झालेल्या नाहीत तर "शोधलेल्या/सापडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रचंड कुतुहल असणे, त्यांतील गोष्टीचे जतन/संग्रह करणे आणि त्यांची चिकाटीने तपशीलवार नोंद ठेवणे" या विशेष प्रवृत्तीच्या निदर्शक आहेत. अजूनही या गोष्टी अपाश्चिमात्य लोकांत अभावानेच दिसतात... यावर "असे कसे म्हणता येईल ?" असा प्रश्न मनात आला असला तर आपल्या गडकिल्ल्यांची अवस्था नजरेसमोर आणल्यास त्वरीत उत्तर मिळते. भाततातील इतर प्राचीन/ऐतिहासिक ठेव्यांचीही अवस्था स्पृहणिय म्हणण्याइतकी चांगली खचितच नाही.

असो. अजून काय लिहिणे ?!

प्रचेतस's picture

19 Feb 2017 - 3:29 pm | प्रचेतस

सहमत आहे.

दक्षिणपश्चिम आशियातल्याच भारताभिमुखी संस्कृतींचेच नव्हे तर खुद्द भारतातल्या प्राचीन संस्कृतींक ठेव्यांचेही उत्खनन आणि अभ्यास कोणी सुरू केला ?" या प्रश्नाचे उत्तर भारतियांना अभिमानास्पद वाटावे असे खचितच नाही

ह्याचा संबंध कदाचित भारताच्या पारतंत्र्यामुळे असू शकेल. ब्रिटिशांनी ह्याबाबतीत मोलाचे काम केले आहे ह्यात शंका नाहीच.
हल्ली मात्र परिस्थिती बदलतेय. भारताच्या प्राचीन ठेव्याविषयी जागृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

मस्तच दिसतय संग्रहालय.छान माहिती.