न्यू यॉर्क : १५ : हेदर गार्डन

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
27 Oct 2016 - 3:45 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

पार्कमध्ये सकाळी फिरत असताना हा अचानक समोर आलेला अद्भुत खजिना अनुभवता अनुभवता जेवणाची वेळ केव्हाच निघून गेली होती, पण पोटाला त्याची आठवण झाली नव्हती. मन भरल्याची ढेकर देत बाहेर संग्रहालयाच्या पडल्यावर घड्याळाकडे लक्ष गेले आणि पोटात जोरजोरात कावळे कोकलू लागले !

फोर्ट ट्रायॉन पार्कसारख्या सौंदर्यपूर्ण नजार्‍यांकरिता प्रसिद्ध असलेल्या जागेत अंतर्भूत असली तरी ही बाग तिच्या कल्पक व आकर्षक रचनेच्या बळावर एक स्वतंत्र आकर्षण ठरली आहे. न्यू यॉर्कच्या जगप्रसिद्ध सेंट्रल पार्कचा विकास ज्या डिझायनरने केला त्याच्या तेवढ्याच नावाजलेल्या ओम्स्टेड नावाच्या मुलाने फोर्ट ट्रायॉन पार्कच्या मूळ आराखड्यात या तीन एकर क्षेत्रफळाच्या अनवट बागेचा (three-acre jewel) आराखडा तयार केला होता. पार्क व बागेचा एकत्रित विकास करून त्यांचे उद्घाटनही १९३५ साली एकाच वेळी केले गेले. या बागेत मुख्यत्वाने हेदर (heather; Calluna vulgaris) ह्या खुरट्या वनस्पतीच्या अनेक प्रकारांची लागवड केली होती, त्यावरून तिचे "हेदर गार्डन" हे नाव ठेवले गेले.

या बागेसाठी ओम्स्टेडने पार्कच्या दक्षिणेकडील खडकाळ उताराच्या भागाचा कल्पकतेने उपयोग केला. उतारावरच्या दगडधोंड्यांनी भरलेल्या खाचरांत वनस्पतींची अशी लागवड केली आहे की आपण गावाबाहेरच्या एखाद्या टेकडीच्या उतारावर नैसर्गिकपणे वाढलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या व चित्रविचित्र पानाफुलांच्या ताटव्यांतून असलेल्या पायवाटांवरून फिरतो आहोत असा अनुभव येतो. सर्वात उंच भागामध्ये अमेरिकन एल्म वृक्षांनी नटलेली प्रोमोनेड बनवलेली आहे. तेथून बागेच्या विहंगमावलोकनाचा अनुभव घेता येतो. उताराच्या खालच्या टोकाला असलेल्या हडसन नदीच्या पाण्याच्या स्तरापेक्षा प्रोमोनेड १८३ मीटर (६०० फूट) उंचावर आहे, त्यामुळे तेथून व बागेतून फिरताना नदीचे विहंगम दर्शन होते. त्याचप्रमाणे नदीच्या विरुद्ध किनार्‍यावर असलेल्या न्यू जर्सी राज्यातील दाट वृक्षांनी भरलेल्या पॅलिसेड पार्कचेही नयनमनोहर दर्शन तेथून होते.

१९५५ मध्ये या बागेचे नवीनिकरण करणार्‍या डिझायरने झाडीत बरेच बदल करून तिचे मूळ रूप पार बिघडवून टाकले. त्यामुळे १९८४ पर्यंत ती जागा एक बेमुर्वत वाढलेली झाडी असलेली कुरूप जागा झाली होती. १९८५ मध्ये फोर्ट ट्रायॉन पार्क व बागेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पार्कच्या ट्रस्टने ग्रीनएकर फाउंडेशन या धर्मदाय संस्थेच्या मदतीने या बागेला तिचे मूळ वैभव प्राप्त करून देण्याचा प्रकल्प सुरू केला. १९३० च्या दशकातली अनेक सहस्र छायाचित्रे, ९०० रेखाचित्रे आणि २५० पानांची वनस्पतींची यादी वापरून बागेतली घुसखोर झाडी दूर केली गेली व मूळ बागेबरहुकूम पुनर्लागवड केली गेली. काही नवीन सौंदर्यपूर्ण वनस्पतींचीही भर त्यांत घातली गेली. या प्रकल्पांतर्गत या बागेत सुमारे २५०० हेदर, हीथ व ब्रूम प्रकारच्या वनस्पती; १५००० कांदे लागवड करून वाढणार्‍या वनस्पती (bulbs); ५००० बारमाही वनस्पती; ५०० खुरट्या वनस्पती (shrubs); व ५ मोठ्या झाडांची लागवड केली गेली.

युरोपिय व अमेरिकन जमिनींत वाढणार्‍या वनस्पतींची चतुर सरमिसळ असलेली ही बाग वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने अतुलनिय आहे. विचारपूर्वक निवडलेल्या या वनस्पतींमुळे या बागेचा दुहेरी फायदा झाला आहे. वसंत आणि ग्रीष्म ऋतूंच्या सर्व काळांत या बागेत एकामागोमाग एक विविध आकाराचे व रंगाचे फुलोरे उमलत राहतात. त्याचबरोबर पानगळीच्या मोसमात ही बाग चित्ताकर्षक पिवळ्या-नारिंगी-लालभडक रंगांची उधळण करते !

पार्कच्या ट्रस्टने २००९ साली, या बागेच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, नावाजलेल्या उद्यानतज्ञांच्या मदतीने एक प्रकल्प सुरू केला आहे. पुढच्या ७५ वर्षांच्या काळात या बागेचे सौंदर्य उत्तरोत्तर वाढवत नेणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्द्येश आहे.

ही बाग न्यू यॉर्क शहरामधील अनिर्बंध प्रवेश असणारी सर्वात मोठी बाग आणि अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील सर्वात मोठी हेदर व हिथ प्रकारच्या वनस्पतींची बाग आहे.

***************

फोर्ट ट्रायॉन पार्कची माहिती जालावर पाहताना या बागेची माहिती झाली होती. तेव्हा एक दिवस नेहमीच्या प्रवेशद्वारातून पार्कमध्ये न शिरता, सबवेच्या १९० स्ट्रीटच्या स्थानकाकडे जाणार्‍या टेकडीच्या पोटात असलेल्या ७००-८०० मीटर लांब बोगद्यात शिरलो...

  
१९० स्ट्रीट सबवे स्थानकाच्या बोगद्याचे बेनेट स्ट्रीटवरचे द्वार व
सबवे स्थानकाच्या टेकडीवर असलेल्या विरुद्ध दिशेच्या द्वारातून बाहेर आल्यावर दिसणारे वाहतूक वर्तूळ


बोगद्याच्या टोकाला असलेल्या रेल्वेमार्गाकडे जाण्याऐवजी, त्याच्या डावीकडील उद्वाहक वापरून टेकडीवर पोहोचलो. स्टेशनच्या दरवाज्याजवळ असलेल्या एका वाहतूक वर्तुळाला लागून पार्कचे एक प्रवेशद्वार आहे. ते बागेला जवळचे आहे असे जालावर वाचले होते...


वाहतूक वर्तुळाला लागून असलेले फोर्ट ट्रायॉन पार्कचे प्रवेशद्वार


पार्कच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर लगेच बागेचा परिसर सुरू होतो. कोणतेही कुंपण नसलेली ही बाग पार्कमध्ये सहजपणे अंतर्भूत केलेली आहे. आपण बागेत शिरलो आहे हे, छोट्या पायवाटांच्या दोन्ही बाजूला खुरट्या आणि चित्रविचित्र आकाराच्या पानाफुलांनी सजलेल्या वनस्पती दिसू लागल्यावरच, आपल्या ध्यानात येते !

त्यानंतर मात्र, प्रत्येक झाडा-झुडूपाच्या पानाफुलांना निरखून पाहण्यात आपण सहजपणे गढून जातो. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने ही बाग अनमोल आहेच. पण, माझ्यासारख्या केवळ सौदर्यदृष्टीने बागेकडे पाहणार्‍या पर्यटकालाही प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही सुंदर दृश्य वैशिष्ट्य दिसावे, इतका खोलवर विचार ही बाग निर्माण करताना केलेला दिसतो.

या बागेतला प्रत्येक ताटवा, फूल, पान जवळून पाहणे जितके आनंददायक आहेच. पण जरा थबकून, या बागेच्या एकेका भागाचे सर्वसमावेशक दृश्य पाहणे, हा तितकाच किंवा किंचीत जास्तच आनंददायक अनुभव आहे. या अनवट बागेचे सौंदर्य पाहण्याचा अनुभव शब्दांत पकडणे फार कठीण आहे.

बागेत फिरताना दिसलेले काही झाडी-झुडूपे-फुला-पानांचे देखावे व वैशिष्ट्यपूर्ण फुलोर्‍यांचे फोटो पाहून मला काय म्हणायचे आहे याची थोडीफार कल्पना येईल असे वाटते.

बागेतले देखावे


बागेतला देखावा ०१बागेतला देखावा ०२बागेतला देखावा ०३बागेतला देखावा ०४ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)बागेतला देखावा ०५ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)बागेतला देखावा ०६ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)बागेतला देखावा ०७ (वरच्या बाजूला प्रोमोनेड दिसत आहे)बागेतला देखावा ०८बागेतला देखावा ०९बागेतला देखावा १०बागेतला देखावा ११बागेतला देखावा १२बागेतला देखावा १३बागेतला देखावा १४बागेतला देखावा १५बागेतला देखावा १६ : पानगळीच्या मोसमातली हेदर गार्डन (जालावरून साभार)


काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे

  
  
  
  
  
काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०१


    
    
    
  
काही वैशिष्ट्यपूर्ण फुलोरे ०२


लोकोपयोगी कार्यक्रम

या पार्कच्या व बागेच्या व्यवस्थापनात व रोजच्या व्यवहारात आजूबाजूच्या (नेबरहूडमधल्या) नागरिकांचा सक्रिय सहभाग सहभाग असतो. पार्कच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर असलेल्या अनेक माहिती पत्रकांवरून ते सहज कळून येते...


माहिती पत्रकांचा बोर्ड

त्यातल्या या खालील माहितीपत्रकाने विशेष लक्ष वेधून घेतले. विकसित देशांतील नागरिकांत आपला परिसर, आपल्या बागा, आपले पर्यावरण उत्तम स्थितीत व स्वच्छ राखावे याची जी जाणीव दिसते ती तिथल्या सजग नागरीकांनी त्यांच्या तरूण पिढीवर केलेल्या अश्या संस्कारांमुळेच निर्माण झालेली आहे...


उद्यानतज्ञाबरोबर होणार्‍या बागेच्या फेरीची माहिती

ही बाग बघताना मला 'हिमालयातील फुलोंकी घाटी/वादी' आणि 'महाराष्ट्रातले कास पठार' यांची सतत आठवण येत होती. या दोन्ही जागांतील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व फुलझाडे हळू हळू नष्ट होत आहेत अशी हळहळ नेहमी ऐकू येते. त्यांचे अश्या बागेच्या स्वरूपात संरक्षण आणि संवर्धन केले तर काय बहारदार बाग बनेल असे सतत वाटत होते. अश्या जैववैविध्याच्या वारशाचे रक्षण करणार्‍या आणि आपल्या परिसराचे सौंदर्य जतन करणार्‍या सकारात्मक कार्यक्रमांसाठी गैरसरकारी संस्थांनी आणि नागरिकांनी पुढाकार घेतला नाही तर काही वर्षांनी आपण त्या अनमोल ठेव्यांना कायमचे गमावून बसू. दुर्दैवाने असे झाले तर पुढच्या पिढ्यांना ते ठेवे केवळ फोटोंतच बघूनच समाधान मानावे लागेल !

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================