न्यू यॉर्क : ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
17 Sep 2016 - 6:40 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

दिवसभराच्या दगदगीचा थकवा आता जाणवू लागला होता. त्यामुळे पावले आपोआप सबवेच्या दिशेने वळली. जाण्याच्या वाटेवर न्यू यॉर्कच्या दोन मानबिंदूंनी लक्ष वेधले. त्यांना दुरूनच हाय म्हणून पुढे निघालो...

ब्रूकलीन प्रभागात असलेले हे वनस्पतीशास्त्रिय उद्यान न्यू यॉर्क शहरातले एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. मे महिना म्हणजे इथली फुलझाडे बहरण्याचा महिना. अर्थातच, त्याचवेळी आमची त्या उद्यानाची फेरी झाली हा दुग्धशर्करा योग होता. कर्मधर्मसंयोगाने जमून आलेला हा योग किती गोड होता हे तेथे हिंडायला लागल्यावरच नीट ध्यानात आले.

हे अनेक उद्याने मिळून बनलेले एक महाउद्यान आहे. त्यात उघड्या आकाशाखाली विशिष्ट वनस्पतींचे संग्रह असलेली अनेक उद्याने आहेत; स्टाईनहार्ट काँझरवेटरी नावाच्या इमारतीत वेगवेगळ्या हवामानात वाढणार्‍या वनस्पतींची अनेक दालने (climate-themed pavilions) व एक बोन्साय विभाग आहे; आणि त्याचबरोबर जलवनस्पतींचा विभाग, आर्ट गॅलरी, संशोधन विभाग, प्रयोगशाळा असे विभागही आहेत. या उद्यानात वनस्पतींच्या १०, ००० पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी येथे अमेरिका व जगभरातून दरवर्षी ९ लाखापेक्षा जास्त पर्यटक येतात.

२१ हेक्टरांवर (५२ एकरांवर) पसरलेले हे उद्यान १९१० साली जनतेला खुले झाले आहे आणि गेल्या १०० पेक्षा जास्त वर्षांपासून ते केवळ शास्त्रीय जगतातच नाही तर न्यू यॉर्क शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनातही मोलाची भर टाकत आहे. विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना ज्ञानदान करणारे; त्यांना प्रेरित करून पर्यावरणाचा विकास साधणारे आणि परिसराच्या (नेबरहूड) सौंदर्यात भर घालणारे अनेक सामाजिक प्रकल्प या उद्यानाच्या नेतृत्वाखाली सतत चालू असतात...


ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनच्या नेतृत्वाखाली चालणारे काही प्रकल्प (उद्यानाच्या संस्थळावरून साभार)

सद्य हवामानानुसार उद्यानात कोणत्या वनस्पती बहरल्या आहेत आणि कोणते खास कार्यक्रम चालू आहेत हे त्याच्या अधिकृत संस्थळावर (http://www.bbg.org/) व फेसबुक पानावर (https://www.facebook.com/BrooklynBotanic/) सतत प्रसिद्ध केले जाते. स्थानिक लोकांच्या व पर्यटकांच्यासाठी काही खास फायदेशीर योजना असल्यास त्यांची माहितीही तेथे मिळते. उदाहरणार्थ, आता हा लेख लिहिण्याच्या वेळेस (अ) crape-myrtle आणि anemone वनस्पती फुलांनी बहरलेल्या आहेत आणि (आ) दर मंगळवारी उद्यानात मोफत प्रवेश दिला जात आहे, ही माहिती तेथे दिलेली आहे. जेव्हा या उद्यानाला भेट देणार असाल तेव्हा ही दोन संस्थळे नजरेखालून घालणे फायद्याचे होईल.

चला तर मग या मनोहारी उद्यानाची सफर करायला.

प्रवासाची सुरुवात १ मार्गाने करायला सबवेच्या १९१ स्ट्रीट थांब्यात शिरलो. त्या मार्गावर दुरुस्तीचे काम चालू असल्याने तो व पुढचे काही थांबे बंद केले असल्याची सूचना लावलेली दिसली. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवसांना बर्‍याचदा अशी कामे काढली जातात. मात्र, प्रवाशांची अडचण होऊ नये सबवेचे कर्मचारी त्यांना "थांब्याचा विरुद्ध बाजूस असलेल्या निकोलास अव्हेन्यूवर तुम्हाला १६८ स्ट्रीट थांब्याकडे नेणारी बस उभी आहे हे सांगत होते. या निमित्ताने आम्हाला ब्रॉडवेच्या पलीकडचा भाग पहायची अनायासे संधी मिळाली...


निकोलास अव्हेन्यूवरून बसने जाताना ०१


निकोलास अव्हेन्यूवरून बसने जाताना ०२

गंमत म्हणजे या बसला तिकिट नव्हते व १६८ स्ट्रीट थांब्यावर उतरून कोणी सरळ आपल्या गंतव्याकडे चालायला लागले तर त्याची शहानिशा करायला कोणी उभे नव्हते !

१६८ स्ट्रीट थांब्यावर सबवे पकडून, जमिनीच्या पोटातच मधे एकदा सबवे मार्ग बदलून, उद्यानाजवळ पोचेपर्यंत जमिनीखालूनच प्रवास होता. जमिनीवर आलो...


सबवेच्या ब्रूकलीन गार्डन थांब्यावरून जमिनीवर आणणारा जिना

... आणि समोर आली ही ब्रुकलिन संग्रहालयाची इमारत...


ब्रूकलीन संग्रहालय

ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन आणि ब्रूकलीन संग्रहालय एकमेकाला लागून आहेत हे नकाशात पाहिले होते. आतापर्यंत कॉक्रिटच्या जंगलात फिरलो असल्याने आज प्रथम उद्यान पाहून मग संग्रहालय पहावे असे ठरवले होते. पण उद्यान दिसेचना! मग रस्त्यावर उभ्या असलेल्या एका खाण्यापिण्याच्या गाडीवर चौकशी केली. त्याने आम्ही बघत होतो त्याच्या विरुद्ध दिशेला हात दाखवला. चालत दोनएक मिनिटांच्या अंतरावर उद्यानाचे रस्त्यावरच असलेले पण रस्त्यापासून किंचित आत असलेले प्रवेशद्वार दिसले. आजूबाजूच्या वृक्षराजीमुळे संग्रहालयाच्या समोरून ते दिसले नव्हते...


ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन : मुख्य प्रवेशद्वार

तिकिटे घेऊन आत शिरलो आणि लगेच सामोर्‍या आलेल्या या प्रसन्न गुलाबी फुलोर्‍याने स्वागत केले. त्याने जणू उद्यानात डोळ्यांसाठी वाढून ठेवलेल्या मेजवानीची पहिली झलक दाखवली होती...


प्रवेशद्वाराजवळील स्वागत

वनस्पतींचे आणि माझे प्रेम केवळ "डोळे आणि नाकाने आस्वाद घेणारा रसिक" इतपतच सीमित आहे. शिवाय इथे असलेल्या १०,००० वनस्पतींच्या जाती-प्रजाती माहीत असायला वनस्पतिशास्त्राचे उच्च प्रतीचे ज्ञान असायला हवे. त्यामुळे
हे उद्यान आपण शास्त्रीय चर्चा न करता मुख्यतः बागेत फिरण्याचा आनंदानुभव म्हणूनच करणार आहोत.

हे उद्यान बघण्यासाठी पायाना भरपूर व्यायाम करावा लागणार आहे हे त्याचा नकाशा पाहून ध्यानात आले होते ! कमीत कमी श्रमात सर्व उद्यान पहाता यावे यासाठी आमच्या रपेटीचा मार्ग खालील नकाश्यात दाखविल्याप्रमाणे ठरवला होता...


उद्यानातल्या आकर्षणांची स्थाने आणि आमच्या रपेटीचा मार्ग दाखविणारा नकाशा

लेखात चित्रांची संख्या मोठी असल्याने उद्यानातील फुलांची बरीच चित्रे लहान आकारात व कोलाजच्या स्वरूपात टाकली आहेत. त्यातले एखादे चित्र मोठ्या आकारात पहायचे असल्यास त्या चित्रावर राईट क्लिक् करून "open image in new tab" हा पर्याय निवडावा. नवीन उघडल्या गेलेल्या टॅबमध्ये चित्र त्याच्या मूळ मोठ्या आकारात दिसेल.

ओसबोर्न गार्डन

इस्टर्न पार्कवेवर असलेल्या प्रवेशद्वारातून आत शिरल्याने आम्हाला हे ३ एकराचे (१. २ हेक्टर) उद्यान सर्वप्रथम लागले. मागच्या (२० लाख वर्षांपूर्वीच्या) हिमयुगातील हिमनदीच्या जागी आत्ता उरलेल्या १८ प्रस्तरांच्या परिसरात हे उद्यान आहे. इटॅलियन शैलीत विकसित केलेल्या या उद्यानात दगडी कमानी (pergolas), दगडी कारंजे, स्थानिक फुलझाडे, तेथले मूळचे दगडधोंडे, इत्यादींचा कलात्मक उपयोग केलेला आहे. यातल्या दगडी (पेव्ह्ड) मध्यमार्गाच्या दगडांवर बार्बारा स्ट्रायझंड, वूडी अ‍ॅलन, वॉल्ट व्हिटमन, इत्यादी प्रसिद्ध ब्रुकलिनकरांच्या सन्मानार्थ त्यांची नावे कोरलेली आहेत...


ओसबॉर्न उद्यानातील एका कमानीचा काही भाग

स्थानिक परिसरात पूर्वी नैसर्गिकपणे वाढणारी अनेक फुलझाडे विकासाच्या रेट्यामध्ये नष्ट होऊ लागली आहेत. यावर उपाय म्हणून मध्यमार्गाच्या दोन्ही बाजूंना त्यांचे ताटव्यांमध्ये रोपण व संवर्धन करून येथे एक मोठा नैसर्गिक वारसा जतन केलेला आहे. त्या वनस्पतींचे अप्रतिम फुलोरे पाहिले की हे काम करणे किती महत्त्वाचे आणि किती दूरदर्शी आहे हे समजते. मध्यमार्गावरून पुढे पुढे जाताना विविध फुलांचे सौंदर्यपूर्ण ताटवे बागेच्या डाव्या-उजव्या बाजूंना आलटून पालटून खेचून घेत होते...

  
  
  
  
ओसबॉर्न उद्यानातील अप्रतिम स्थानिक रानटी फुलझाडांचे ताटवे

ओसबॉर्न उद्यानाच्या संमोहनातून बाहेर पडून पुढे आल्यावर अजून काय दिसेल असा विचार करत असतानाच त्या उद्यानाशी स्पर्धा करणार्‍या फुलझाडांच्या एका छोट्याश्या जंगलात पाऊल पडले. मंतरलेले चैत्रबन कसे असेल याची झलक देणारा हा भाग होता...


  
  
  
  
  
मंतरलेल्या चैत्रबनात

डावीकडे वळून पुढे जाताना आकर्षक आकाराची आणि रंगाची फुले सतत साथ करतच होती...

  

नंतर आलेल्या उंच बंधार्‍यासारख्या मार्गावरून जाताना उजव्या बाजूला खालच्या जमिनीवर प्रथम क्रॅनफर्ड गुलाबाच्या बागेचे आणि तिला लागून पुढे असलेल्या चेरीच्या झाडांच्या शिस्तबद्ध रांगांचे (चेरी एस्प्लनेड) विहंगम दर्शन होते...


क्रॅनफर्ड गुलाबाची बाग : विहंगम दर्शन


चेरी एस्प्लनेड : विहंगम दर्शन

या रस्त्याच्या शेवटाजवळ डाव्या बाजूला दोन्ही बाजूला गिन्क्गो (ginkgo biloba) नावाच्या झाडांच्या रांगा असलेला "गिन्ग्को अ‍ॅली" नावाचा एक छोटा मार्ग आहे. या झाडांना जिवंत जीवाश्म (living fossils) म्हणतात. कारण, डायनॉसॉर्सच्या काळात अस्तित्वात असलेली ही वनस्पती प्रजाती साडेसहा कोटी वर्षे कीटक, आजार आणि प्रदूषणाला तोंड देत अजूनही यशस्वीपणे तग धरून आहे...


गिन्क्गो अ‍ॅली

येथून उजवीकडे स्टाईनबर्ग व्हिजिटर सेंटरच्या इमारतीचे स्थानिक गवत आणि रानटी फुलझाडांच्या झुडुपांनी झाकलेले छप्पर दिसते. या इमारतीच्या कल्पक रचनेमुळे ऊर्जेची बचत होऊन ती पर्यावरणपूरक झाली आहे. याशिवाय बागेचे लागवडीचे क्षेत्रफळ वाढून गवताच्या व फुलझाडांच्या काही प्रजातींच्या संवर्धनाची सोयही झाली आहे...


स्टाईनबर्ग व्हिजिटर सेंटरचे पर्यावरणपूरक छप्पर

पायर्‍या उतरून खालच्या स्तरावर असलेल्या स्टाईनबर्ग व्हिजिटर सेंटरला धावती भेट देऊन आम्ही पुढे निघालो. वृक्षराजीने भरलेल्या समोरच्या हिरवळीवर काही पर्यटकांचा आनंदोत्सव (पिकनिक) चालला होता...

फुलझाडांचे ताटवे आणि रंगीबेरंगी झाडांची गर्दी रस्ताभर सतत साथ देत होती...

जापनिज हिल अँड पाँड गार्डन

हिरवाई आणि रंगाच्या दंग्यातून पुढे जात असतानाच अचानक "जापनिज हिल अँड पाँड गार्डन" समोर आली...


जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०१

आल्फ्रेड व्हाईट या ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डनच्या एका ट्रस्टीने स्वतःच्या पदरचे $१३,००० खर्चून हे उद्यान बांधून जनतेसाठी १९१४-१५ मध्ये खुले केले. ताकेओ शिओता या नावाजलेल्या जपानी लॅंडस्केप डिझायनरचा मास्टरपीस म्हणून हे उद्यान ओळखले जाते. तीन एकरांवर पसरलेल्या या उद्यानात तलाव, धबधबा, लाकडी पूल, टेकडी, बेट, प्रस्तर, दिवे, निरिक्षणस्थळ, शिंतो मंदिर, तळ्यातले कोई मासे, इत्यादी जपानी बगिच्यांच्या सर्व घटकांची मनोहारी मानवनिर्मित रचना पहायला मिळते. मोक्याच्या जागांवर केलेल्या विविध आकारांच्या आणि रंगांच्या झाडांच्या लागवडी या जागेला एक अनवट मनोहारी रूप दिलेले आहे. तिथल्या लाकडी निरिक्षणस्थळावर खिनभर डोळे मिटून बसल्याशिवाय राहवत नाही. या परिसराला भेट दिल्यावर भारून न जाणारा पर्यटक सापडणे कठीण !


जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०२


जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०३


जापनिज हिल अँड पाँड गार्डन ०४

जपानी बागेतून पाय निघणे कठीण झाले होते. पण घड्याळ्याच्या धावत्या काट्यांकडे पाहून पुढे निघणे भाग पडले. वाटेत लागलेल्या शेक्सयियर गार्डन आणि फ्रॅग्रन्स गार्डनने नवनवीन फुलांचा आश्चर्यकारक नजारा दाखवणे चालूच ठेवले होते..

  
  
  

जसजसे आम्ही काँझरव्हेटरीच्या जवळ येऊ लागलो तसतसा परिसर जास्त जास्त आखीवरेखीव बनत होता. डांबरी रस्त्याऐवजी फरशीचे रस्ते सुरू झाले होते...

वाटेत लागलेल्या तलावांत कमळे आणि सुंदर बदके विहरत होती...


काँझरव्हेटरीजवळ असलेली रेस्तराँ पाहताच दमलेल्या पायांनी आणि भुकेने खवळलेल्या पोटाने जोरदार निदर्शने सुरू केली. अर्थातच त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.

(क्रमशः :)

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

ग्रेट आहे माहिती. फोटूंबद्दल पुन्हा तेच! मस्त...
न्यूयॉर्कसारख्या सिमेंटच्या जंगलात बोटॅनिकल उद्यान, सेंट्रल पार्कसारखे हिरवे प्रकार जतन केलेत याचे कौतुक वाटते.
बोटॅनिकल गार्डनचे प्रवेशद्वार आवडले.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 7:02 pm | संदीप डांगे

वाह! क्या बात है!

खूप छान! काही गोष्टी 'प्रत्यक्ष' पाहण्यातच मजा असते त्यापैकी हे एक!

चित्रगुप्त's picture

17 Sep 2016 - 7:29 pm | चित्रगुप्त

वा. छानच दिसते आहे. इथे खूप जुनाट भव्य वृक्ष आहेत का ? असल्यास त्यांचे फोटो आहेत का ? या निमित्तने आठवले की कलकत्त्याचे बोटॅनिकल गार्डन पण खूप छान असल्याचे आठवते. आता फार वर्षे झाले बघून त्यामुळे तपशील विसरलो आहे.
ब्राँक्स झू पण बघितला असेल ना ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2016 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

जुने फोटो पहिले तर हे उद्यान बर्‍याचश्या उजाड दिसणार्‍या माळरानावर वसवले आहे असे दिसते. त्यामुळे इथला सर्वात जुना वृक्ष १०६ वर्षे वयाचा असावा असा माझा अंदाज आहे. रेडवूड फॉरेस्टसारखे प्रचंड वृक्ष नसले तरी घनदाट रान वाटावे असे काही विभाग इथे आहेत.

ब्रॉक्स उद्यान पण पाहिले. त्याची फेरी नंतरच्या भगात होईलच.

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2016 - 9:30 pm | टवाळ कार्टा

गरेट

खटपट्या's picture

17 Sep 2016 - 10:22 pm | खटपट्या

आहाहा!!!

पिलीयन रायडर's picture

17 Sep 2016 - 10:37 pm | पिलीयन रायडर

मस्तच!!
मी पण जाऊन येते!

सुबोध खरे's picture

18 Sep 2016 - 8:43 am | सुबोध खरे

सुंदर फोटो आणि वर्णन

विवेकपटाईत's picture

18 Sep 2016 - 9:37 am | विवेकपटाईत

डोळे तृप्त झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2016 - 7:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

पद्मावति's picture

19 Sep 2016 - 12:15 am | पद्मावति

मस्तं!

पैसा's picture

26 Oct 2016 - 6:33 pm | पैसा

अफाट सुंदर आहे हे!