न्यू यॉर्क : २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापिठे

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
29 Dec 2016 - 2:21 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

एकंदरीत, नातेवाइकांच्या प्रेमळ पाहुणचारामुळे आणि पारंपरिक अमेरिकन शहर पहायला मिळाल्यामुळे वेस्ट हेवनची आमची फेरी सुखद आणि चिरस्मरणिय झाली यात वाद नाही.

येल विद्यापीठ (Yale University)

वेस्ट हेवन जवळील न्यू हेवन या एका मोठ्या शहरात (साधारण ९ लाख मेट्रोपोलिटन लोकसंख्या) येल विद्यापीठ आहे. अमेरिकेतील "आयव्ही लीग (Ivy League) या संबोधनाने गणल्या जाण्यार्‍या आठ उच्च श्रेणीच्या विद्यापीठांपैकी हे एक आहे. सन १७०१ मध्ये प्रोटेस्टंट चर्चमधिल अधिकारी धर्मगुरुंच्या प्रशिक्षणासाठी कनेटिकटमधिल सेब्रूक कॉलनीमध्ये एका महाविद्यालयाची स्थापना केली गेली. सन १७१६ मध्ये त्याला न्यू हेवनला हलवले गेले व ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या एलिहू येल (Elihu Yale) या नावाच्या गव्हर्नरने केलेल्या भरघोस दानामुळे त्याचे नाव या शिक्षणसंस्थेला दिले गेले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या सुमारास येथे भौतिक शास्त्रांसह इतर विषयांचे शिक्षण सुरू झाले. एकोणिसाव्या शतकात इथे उच्च (मास्टर्स) आणि व्यावसायिक शिक्षणाची भर पडली आणि अमेरिकेतील पहिली पीएचडी डिग्री १८६१ साली येथेच दिली गेली. सन १८८७ साली तिला विद्यापीठाचा दर्जा दिला गेला.

खरे बोलायचे तर, आजच्या घडीला हे केवळ एक विद्यापीठ नसून, जागतिक शिक्षणक्षेत्रातील एक विशाल आणि अग्रगण्य संस्था आहे. हिच्या छत्रछायेखाली १४ विद्यालये; एक कला व शास्त्र महाविद्यालय; १२ व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये; इत्यादी कार्यरत आहेत. विद्यालये व महाविद्यालये आपापले स्वतंत्र अभ्यासक्रम चालवतात व एकूण २००० पेक्षा जास्त पदविका/पदव्या प्रदान करतात. या विद्यापीठात साधारण ५,५०० बॅचलर स्तराचे विद्यार्थी; साधारण ६,९०० उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी; ११८ देशांतून आलेले ४,५०० विद्यार्थी; २८८ वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना; आणि ३५ वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांचे ३५ संघ आहेत. विद्यापीठाच्या सर्व शिक्षणसंस्थांना सेवा पुरविणारे व १.५ कोटीपेक्षा जास्त पुस्तके/मासिके असलेले येल वाचनालय अमेरिकेतील तिसर्‍या क्रमांकाचे आहे.

या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांत अनेक नामवंतांच्या नावांची मोठी जंत्री आहे... त्यात सुमारे ५५ नोबेल सन्मान विजेते, ५ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, १९ सुप्रीम कोर्ट न्यायाधीश, १३ सद्य बिलियनेर्स, अनेक अमेरिकन काँग्रेसमेन्/सिनेटर्स, ५ फील्ड मार्शल्स, ५ फील्ड मेडॅलिस्ट्स (याला गणितातले नोबेल समजले जाते), २४७ र्‍होड स्कॉलर्स, ११९ मार्शल स्कॉलर्स, इत्यादी, इत्यादी, इत्यादी, आहेत. या यादीत बिल आणि हिलरी क्लिंटन, सद्य आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल, पूर्व अमेरिकन प्रेसिडेंट पिता-पुत्र बुश, जॉन केरी, इंद्रा नुयी, मेरीला स्ट्रीप, अशी जगभर माहीत असलेली अनेक नावे आहेत.

सर्वोच्च अधिकार असलेली येल कॉर्पोरेशन (Yale Corporation) या विद्यापीठाच्या सर्व कारभारावर लक्ष ठेवते. या विद्यापीठाच्या अधिकारात न्यू हेवन कँपस; वेस्ट हेवनमधील एक शैक्षणिक व एक अ‍ॅथलेटिक्स कँपस; आणि न्यू इंग्लंड या अमेरिकेच्या उत्तरपूर्वेतील अनेक राज्यांत (कनेटिकट, मेन, मॅसेचुसेट्स, न्यू हँपशायर, र्‍होड आयलँड आणि वरमाँट) पसरलेली जंगले व संरक्षित नैसर्गिक प्रभाग (forest and nature preserves) येतात. या विद्यापीठाच्या मालकीच्या साधनसंपत्तीची २०१५ मध्ये जाहीर केलेली किंमत (endowment) $२५.६ बिलियन (रु१.७५ लाख कोटी) होती !!! या प्रमाणावर येल अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत विद्यापीठ आहे.

येल विद्यापीठ, फार पूर्वीपासून, न्यू हेवन काऊंटीतील सर्वात मोठा जमीनदार (जमीन व इमारतींचा मालक) आहे. याशिवाय, मोठी गंगाजळी बाळगून असल्याने व वाढत्या पसार्‍याची गरज म्हणून, शहरातल्या नागरिकांच्या जमिनी व इमारती विकत घेऊन विद्यापीठ आपल्या मालमत्तेत सतत भर घालत आहे. याचा परिणाम, शहराच्या संस्कृतीवर विद्यापीठाची संस्कृतीचे आक्रमण होण्यात आणि स्थानिक लोकांच्या छोट्या उद्योगधंद्यावर आणि दुकानांवर गदा येण्यात झाला आहे. अर्थातच, याबद्दल स्थानिक जनतेत रोष आहे. त्याशिवाय, अमेरिकेतील विद्यापीठे ना-नफा संस्था समजल्या जात असल्याने त्यांना करमाफी असते. येल विद्यापीठाच्या ताब्यातल्या जमिनी आणि इमारतींवरचा दरवर्षीचा एकूण कर $१०० मिलियन (रु७०० कोटी) च्या घरात जातो. महानगरपालिकेचे इतके मोठे उत्पन्न बुडाल्यामुळे त्या रोषात अजूनच भर पडली आहे. या परिस्थितीमुळे येलला "गरीब शहरातले श्रीमंत विद्यापीठ" असे कुत्सितपणे म्हटले जाते. राज्य सरकारने या करतूटीची भरपाई करण्याचे कबूल केले होते, पण सर्वसाधारण राजकीय प्रघाताप्रमाणे हे आश्वासन पाळले गेलेले नाही. विद्यापीठाच्या हल्लीच्या प्रशासनाने तडजोड म्हणून स्वतःहून दरवर्षी नगरपालिकेला काही रक्कम (गेल्या वर्षी $८.२ मिलियन) देण्याचे कबूल केले आहे. अर्थात, ही रक्कम कराच्या १०% सुद्धा नाही हे वेगळे !

तर अश्या या विद्यापीठाच्या परिसरात फेरी मारण्याचा आणि त्याच्या मालकीच्या संग्रहालयांपैकी "पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" हे नामवंत संग्रहालय पाहण्याचा योग, वेस्ट हेवन शहराच्या फेरीत आला.

विद्यापीठाच्या नीटनेटक्या आणि हिरव्यागार झाडीने भरलेल्या परिसरात फेरी मारत असताना तेथील जुन्या आणि नव्या शैलीतल्या भव्य इमारती लक्ष वेधून घेतात...


येल विद्यापीठ परिसर ०१ : मुख्य प्रवेशद्वार


येल विद्यापीठ परिसर ०२


येल विद्यापीठ परिसर ०३


येल विद्यापीठ परिसर ०४


येल विद्यापीठ परिसर ०५


येल विद्यापीठ परिसर ०६


येल विद्यापीठ परिसर ०७


येल विद्यापीठ परिसर ०८


येल विद्यापीठ परिसर ०९ : व्यवस्थापन महाविद्यालयाची आधुनिक इमारत

येल विद्यापीठाचे "पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी"

या संग्रहालयाची सुरुवात १८व्या शतकात "जगभरातून आणलेल्या कुतूहलपूर्ण, नैसर्गिक व मानवनिर्मित वस्तू" जमविण्याच्या छंदाच्या रूपाने झाली. शिक्षण आणि संशोधनासाठी अश्या वस्तू पद्धतशीरपणे जमा करण्याची आणि मांडणी करण्याची सुरुवात सन १८०२ मध्ये प्रोफेसर बेंजामिन सिलिमान (Benjamin Silliman) यांच्या नेमणुकीने झाली. त्यांनी जमवलेले भूगर्भशात्रिय आणि खनिजशास्त्रिय नमुने हे एक फार मोठे आकर्षण ठरले. सिलिमान यांनी येल विद्यापीठाला शास्त्रीय संशोधनाचे उच्च प्रतीचे केंद्र बनवले. त्या कीर्तीमुळे तिथे आकर्षित झालेल्या ओथ्नील चार्ल्स मार्श (Othniel Charles Marsh) नावाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च जॉर्ज पीबॉडी नावाच्या जागतिक स्तरावर सावकारी करणार्‍या त्याच्या काकाने उचलला होता. जीवनाच्या शेवटच्या काळात पीबॉडीने आपली अफाट संपत्ती अनेक संस्थांत वाटायला सुरुवात केली. त्या देणग्यांच्या यादीत येल विद्यापीठ यावे यासाठी मार्शने केलेल्या प्रयत्नांतून मिळालेल्या $१५०,००० च्या देणगीतून "पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी" जन्माला आले.

मार्शची १८६६ मध्ये "प्रोफेसर ऑफ पॅलिओंटॉलॉजी" अशी नेमणूक झाली. या विषयातल्या प्रोफेसरची ही अमेरिकेतील पहिली व जगातील दुसरी नेमणूक होती. त्याने आपल्या सहकार्‍यांबरोबर पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या अष्मीभूत अवशेषांचा व ठश्यांचा मोठा संग्रह जमवला. त्यातल्या डायनॉसॉर अवशेषांचा संग्रह विशेष समजला जातो. इथल्या वस्तूंची संख्या आणि आकार इतका भव्य झाला की त्यांच्यासाठी जुनी इमारत पाडून खास मोठ्या आकाराच्या व उंचीच्या दालनांची नवीन इमारत बांधावी लागली, ती १९३१ साली पुरी झाली. ती इमारतही अपुरी पडू लागल्याने वाढत्या शैक्षणिक पसार्‍यातल्या अजून दोन इमारती संग्रहालयाला जोडल्या आहेत. त्याही कमी पडल्यामुळे, संग्रहालयातील १.३ कोटीपेक्षा जास्त नमुन्यांपैकी निम्मे अवशेष सामावून घेईल इतके मोठे एक नवीन Environmental Science Center बांधले आहे. याशिवाय, संग्रहालयाचे कर्मचारी, कार्यशाळा, शैक्षणिक वर्गांसाठी व फील्ड स्टेशन यासाठी वेगळ्या इमारती आहेत. हा पसारा अजूनही वाढतच आहे. या वर्षी (२०१६) हे संग्रहालय आपला १५० वा वाढदिवस साजरा करत आहे.

संग्रहालयाच्या आवारात डायनॉसॉर्सच्या (मेसोझोइक) कालखंडात अस्तित्वात असणार्‍या किंवा त्यांचे आजचे वंशज असलेल्या अनेक वनस्पतींची लागवड केलेली आहे.

संग्रहालयाच्या आवारातला हा टायरॅनोसॉरसचा पुतळा आपले स्वागत करतो...


पीबॉडी म्युझियम ०१ : दर्शनी भागातला टायरॅनोसॉरसचा पुतळा


पीबॉडी म्युझियम ०२ : मुख्य प्रवेशद्वार


पीबॉडी म्युझियम ०३ : मुख्य डायनॉसॉरस दालन ०१


पीबॉडी म्युझियम ०४ : मुख्य डायनॉसॉरस दालन ०२


पीबॉडी म्युझियम ०५ : आर्किओप्टेरिस (उडता डायनॉसॉरस) ठसा


पीबॉडी म्युझियम ०६ : डायनॉसॉरस डोक्यांचे जीवाश्म


पीबॉडी म्युझियम ०७ : अजगराचा सापळा


पीबॉडी म्युझियम ०८ : सामुराई सरदार लॉर्ड निशिओचे चिलखत


पीबॉडी म्युझियम ०९ : पेरूमधील माचू पिच्चू येथे उत्खननासाठी केलेल्या तयारीचे कागदपत्र


पीबॉडी म्युझियम १० : पेरूमधील माचू पिच्चू मोहिमेतील टिपणे


पीबॉडी म्युझियम ११ : पेरूमधील माचू पिच्चू मोहिमेत जमवलेले काही अवशेष


पीबॉडी म्युझियम १२ : संग्रहालयातल्या स्वयंसेविका त्यांनी प्रदर्शित केलेला पर्यावरणासंबंधीचा प्रयोग एका किशोरवयीन अथितीला समजावून सांगताना

न्यू हेवन विद्यापीठ

सन १६३८ पासून न्यू हेवन शहरात "न्यू हेवन विद्यापीठ" नावाचे १२२ एकरावर पसरलेले अजून एक खाजगी विद्यापीठ कार्यरत आहे. या विद्यापीठाच्या कनेटिकट व न्यू मेक्सिको या दोन अमेरिकन राज्यांत सहा आणि इटलीमध्ये एक अश्या एकूण सात शाखा (कँपसेस) आहेत. आकाराने येलपेक्षा लहान असले तरी त्याचे अभियांत्रिकी विद्यापीठ "America's Best Colleges" या श्रेणीत गणले जाते. येथे एकूण ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

परतताना या विद्यापीठाच्या परिसरातून चक्कर मारली. त्यावेळची काही चित्रे...


न्यू हेवन विद्यापीठ ०१


न्यू हेवन विद्यापीठ ०२ : न्यायवैद्यकशास्त्र विभाग


न्यू हेवन विद्यापीठ ०३


न्यू हेवन विद्यापीठ ०४


न्यू हेवन विद्यापीठ ०५

विद्यापीठ मोठे असो की लहान, इथे केवळ शिक्षणव्यवस्थेकडेच लक्ष दिले जाते असे नाही तर विद्यापीठाचा परिसरही सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याकडे कसोशीने लक्ष दिले जात असल्याचे सतत दिसून येते.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Dec 2016 - 9:36 pm | यशोधरा

मस्त!

प्रचेतस's picture

30 Dec 2016 - 8:50 am | प्रचेतस

सुंदर इमारती.
पीबॉडी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी खूप भारी. डायनासॉरसचे जीवाश्म जवळून बघताना खूप भारी वाटत असणार. आर्किओप्टेरिएक्सचा अश्मीभूत झालेला ठसा जबरी.

सुबोध खरे's picture

30 Dec 2016 - 9:43 am | सुबोध खरे

आपले सर्वच लेख सुंदर असतात.
एक कुतूहल म्हणून विचारतो आहे. तेथील वैद्यकीय महाविद्यालय पाहिले का? आणि त्याची तुलना आपल्या बी जे शी केल्यास फरक काय जाणवतो? (पायाभूत सुविधा सोडून द्या)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2016 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टरसाहेब, येलची अशी तुलना बीजेशीच नाही तर भारतातील इतर वैद्यकिय शिक्षणसंस्थांबरोबरही करणे जरा कठीणच आहे. वैद्यकीय महाविद्यालयात फेरी मारायला वेळ आणि ओळख दोन्हीही नव्हते, त्यामुळे तेथे जाऊ शकलो नाही. तरीही...

येल शतकाभरापेक्षा जास्त काळासाठी वैद्यकशास्त्र आणि कायदे शिक्षणांत जागतिक स्तरावरची अग्रगण्य संस्था समजली जाते.

अमेरिकेच्या राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले अनेक राजकारणी आणि फेडरल सुप्रीम कोर्टात नावाजलेले अनेक कायदेतज्ञ येलमधून शिकून बाहेर आलेले आहेत.

वैद्यकशास्त्राबद्दल म्हणायचे तर विकिवर ज्यांची चरित्रे लिहिली आहेत असे सुमारे १३५ वैद्यकशास्त्रातले दादा/ताई लोक येलमधून शिकून बाहेर आले आहेत.

https://en.wikipedia.org/wiki/Category:Yale_School_of_Medicine_alumni

येलमध्ये शिकलेले, शिकवणारे किंवा काम करणार्‍यांपैकी ५५ पेक्षा जास्त शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिकाच्या यादीत आहेत (अर्थात असे असूनही याबाबतीत अमेरिकन विद्यापीठांमध्ये येलचा क्रमांक १० वा आहे !).

https://en.wikipedia.org/wiki/List_of_Nobel_laureates_by_university_affi...

यातले वैद्यकिय नोबेल मिळालेले किती याचा नक्की आकडा मला मिळाला नाही.

अप्रतिम लेख काका. प्रचि सुरेख. येल विद्यापीठाच्या जुन्या इमारती व पीबॉडी संग्रहालयाची इमारत विलक्षण सुंदर आहे. इतक्या रम्य परीसरात शिकायला मिळायला हवे असे वाटले.
अवांतरः "प्रोफेसर ऑफ पॅलिओंटॉलॉजी" वाचून रॉस गेलर आठवला. :प

अजया's picture

30 Dec 2016 - 9:59 am | अजया

येलच्या माजी विद्यार्थ्यांची यादी लेकाला वाचुन दाखवली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2016 - 4:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती यादी खूपच त्रोटक आहे. विख्यात येलकरांची यादी इथे मिळेल.

सिरुसेरि's picture

30 Dec 2016 - 12:07 pm | सिरुसेरि

सुरेख लेख आणी फोटो . +१००

पद्मावति's picture

30 Dec 2016 - 7:20 pm | पद्मावति

वाह, मस्त.

मदनबाण's picture

30 Dec 2016 - 8:56 pm | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punk

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2017 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

पैसा's picture

3 Jan 2017 - 9:53 am | पैसा

खूप छान!

छान लेखन. फोटूही नेहमीप्रमाणे छान.