न्यू यॉर्क : १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in लेखमाला
29 Oct 2016 - 12:29 am

===============================================================================

न्यू यॉर्क : ===> १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क १... ===>

===============================================================================

न्यू यॉर्क शहर अनेक जगावेगळ्या गोष्टींनी खच्चून भरलेले आहे. त्यातल्या अनेक गोष्टी जगप्रसिद्धही आहेत. पण, त्या शहराच्या आणि तिथल्या नागरिकांच्या स्वभावाच्या वैशिष्ट्याची चांगली निशाणी कोणती? असे विचारले, तर आज माझ्या डोळ्यासमोर एक तितकीशी प्रसिद्ध नसलेली 'द हाय लाइन' ही जागा येते. न्यू यॉर्क शहराच्या या भेटीअगोदर या जागेचे नावही मला ठाऊक नव्हते. पण हे नवीन आकर्षण वेगाने प्रसिद्ध होत आहे, हे मात्र नक्की. या जागेबद्दल वाचले आणि तिला भेट देऊन ते खरे असल्याची खातरी पटवावी, असे प्रकर्षाने वाटले.

नॅशनल जिओग्राफिक्सने 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन' या शब्दांनी नावाजलेले 'द हाय लाइन' नावाचे हे प्रकरण आहे तरी काय ?

कोणत्याही शहराच्या भरभराटीमुळे आणि वाढीमुळे तेथील अनेक गोष्टी निकामी किंवा अस्थायी होतात व त्या नष्ट केल्या जाऊन त्यांच्या जागी नवीन गोष्टी अस्तित्वात येतात, हा कालचक्राचा सामान्य भाग आहे. हाच नियम पाळत न्यू यॉर्क शहर दशकानुदशके सतत पुनर्निर्मित (रिमॉडेल) होत राहिले आहे... किंबहुना, नवनिर्माण व पुनर्निर्माण हे या शहराच्या रोजच्या जीवनातले अविभाज्य घटक बनलेले आहेत, हे जागोजागी चालू असलेल्या नव्या बांधकामांच्या व जुन्यांच्या नूतनीकरणांच्या (रिनोव्हेशन) प्रकल्पांच्या स्वरूपात या शहरात फिरताना सतत दिसत असते.

'द हाय लाइन' हे उद्यान वरच्या नियमांना काहीसा छेद देऊन विकसित केलेले उद्यान आहे. त्यामुळे, त्याच्यापेक्षा अनेक जास्त मोठी आणि जास्त सुंदर उद्याने असूनही, हे उद्यान शहराचा एक महत्त्वपूर्ण मानबिंदू बनला आहे. 'हे का व कसे झाले?' हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.

इ.स. १८४७ साली दक्षिण मॅनहॅटनमध्ये असलेलया मांसप्रक्रिया (मीटपॅकिंग) करणार्‍या उद्योगधंद्यांचा माल त्यांच्या उत्तरेकडे असलेल्या पश्चिम किनार्‍यावरच्या बंदरावर पोहोचविण्यासाठी एक जमिनीवरचा मालगाडीचा लोहमार्ग (फ्रेट रेल्वे लाइन) बनविला गेला. भरवस्तीतून जाणार्‍या या मार्गावर लोकांच्या सुरक्षिततेसाठी, मालगाडीसमोरून लोकांना हटविण्यासाठी, घोडेस्वार दौडत असत. यांना गमतीने 'वेस्ट साइड काऊबॉईज' असे म्हणत!


द हाय लाइन ०१ : लोहमार्ग अपघातांपासून सुरक्षित ठेवणारा 'वेस्ट साइड काऊबॉय' (जालावरून साभार)

सर्व खबरदारी घेऊनही या लोहमार्गावर इतके अपघात होत असत की त्या मार्गावर असलेल्या १०व्या अ‍ॅव्हन्यूचे नाव 'डेथ अ‍ॅव्हन्यू' असे पडले. सरतेशेवटी हे अपघात टाळण्यासाठी, १९२९ ते १९३४ या कालखंडात, उद्योगधंद्यांच्या जागा आणि साठवणगृहे (वेअरहाउसेस) यांना जोडणारा, २१ किमी लांबीचा, एकूण १०५ स्ट्रीट्सना छेदून जाणारा एक उंचावरचा (एलिव्हेटेड) लोहमार्ग पूर्ण केला गेला. भरवस्तीतून जाणारा हा लोहमार्ग अनेक इमारतींच्या आतून जात असे...


द हाय लाइन ०२ : बेल लॅब्जच्या इमारतीतून जाणारा एलिव्हेटेड लोहमार्ग (जालावरून साभार)

१९५०च्या दशकात मालवाहतुकीसाठी ट्रक्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि लोहमार्ग तोट्यात जाऊ लागला. त्यामुळे १९६०पर्यंत त्याचा दक्षिणेकडील अर्ध्यापेक्षा जास्त भाग मोडीत काढला गेला. त्यानंतर उरलेला मुख्यतः चेलसी नावाच्या विभागातला मार्ग १९८०पर्यंत वापरात होता.

१९८०च्या दशकाच्या मध्यात उरल्यासुरल्या मार्गाचा वापर पूर्णपणे बंद झाला आणि त्याला मोडीत काढून त्याच्या महागड्या जमिनीवर इमारती बांधण्यासाठी बिल्डर लॉबीने जोरदार प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला पीटर ओब्लेट्झ नावाच्या लोहमार्गमित्राच्या (railroad enthusiast) नेतृत्वाखाली चेलसीमधील रहिवाशांनी विरोध करून कोर्टात आव्हान दिले. त्यात त्यांना यश आले. पण लोहमार्गाला परत वापरात आणण्याचे त्यांचे प्रयत्न असफल झाले. १९९१मध्ये त्याचा आणखी एक तुकडा नष्ट केला गेला. पण लोकांच्या विरोधामुळे मोडतोडीचे काम थांबवले गेले. त्यानंरही, या लोहमार्गाला मोडीत काढण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण लोकांच्या सतत विरोधामुळे ते असफल झाले. मजबूत संरचना असलेला हा पोलादी बांधणीचा लोहमार्ग नव्वदीच्या दशकात खंबीरपणे उभा होता, पण दुर्लक्षित झाला होता. त्यामुळे त्याच्यावर रानटी गवताची, झुडपांची आणि छोट्या झाडांची अमर्याद वाढ झाली होती...

    
द हाय लाइन ०३ : दुर्लक्षित झालेल्या लोहमार्गावर उगवलेले रानटी गवत व झाडेझुडपे आणि त्याचा निरस परिसर
(जालावरून साभार)

१९९३मध्ये पॅरिसमध्ये ४.८ कि.मी. लांबीच्या एका एलिव्हेटेड लोहमार्गाचे Promenade plantée (tree-lined walkway) या नावाच्या सार्वजनिक उद्यानात रूपांतर केले गेले. त्यावरून प्रेरणा घेऊन, तसेच उंचावरचे रेखाउद्यान (एलिव्हेटेड लिनिअर पार्क) न्यू यॉर्क शहरात बनवावे, यासाठी १९९९ साली जोशुआ डेव्हिड आणि रॉबर्ट हॅमंड यांच्या नेतृत्वाखाली Friends of the High Line ही संस्था स्थापन केली गेली.

जोएल स्टर्नफेल्ड नावाच्या फोटोग्राफरने या मार्गावर नैसर्गिकपणे वाढलेल्या हिरवाईच्या व झाडाझुडपांच्या फोटोंचा उपयोग करून बनवलेली चित्रमालिका लोकप्रिय झाली. या मालिकेने, या मार्गाचे संवर्धन करून त्याच्यावर पॅरिसच्या धर्तीवरचा प्रकल्प करणे हे एक लोकोपयोगी काम होईल हा विचार अधोरेखित केला. डाएन फ्युर्स्टेनबर्ग नावाच्या एका स्थानिक फॅशन डिझायनरने आपल्या पतीच्या साहाय्याने आपल्या खाजगी स्टुडिओत अनेक कार्यक्रम आयोजित करून या प्रकल्पासाठी देणग्या जमा केल्या.

परिसरातल्या (नेबरहूड) नागरिकांच्या या सर्व प्रयत्नांना यश आले. लोकमताच्या रेट्याला मान देऊन, शहर प्रशासनाला या प्रकल्पाला मान्यता व $५ कोटीची मदत देणे भाग पडले. अशा रितीने हे हवाई रेखाउद्यान बनण्याचा मार्ग खुला झाला...


द हाय लाइन ०४ : लोहमार्ग उद्यानाचा नकाशा (जालावरून साभार)

नागरिकांच्या प्रयत्नांतून आजतागायत या प्रकल्पासाठी एकूण $१५ कोटींपेक्षा जास्त देणग्या जमा केल्या गेल्या आहेत. स्थानिक नागरिकांची तळमळ पाहून जगभरच्या उद्यानतज्ज्ञांनी या अनवट प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे.

२००६च्या जूनमध्ये या अनवट उद्यानाचे काम जोमाने सुरू झाले. पहिला टप्पा २००९मध्ये, दुसरा २०११मध्ये आणि तिसरा २०१४मध्ये जनतेला खुला झाला आहे. आता केवळ छोटीमोठी कामे बाकी आहेत, तीही २०१७पर्यंत पुरी होतील.

हे उद्यान बनवताना डिझायनर्सनी एक जगावेगळी कल्पकता दाखवली. लोहमार्गावर जवळजवळ २५ वर्षे साठलेले गवत आणि इतर चिवट झाडेझुडपे साफ न करता त्यांना शक्य तेवढे त्याच जागेवर ठेवून उद्यानाची मांडणी केली आहे. त्यामुळे उद्यानाला नैसर्गिक स्वरूप तर प्राप्त झाले आहेच, त्याचबरोबर हे उद्यान कमीत कमी खर्चात व श्रमात वर्षभर सुंदर ठेवायला मदत झाली आहे! शिवाय स्थानिक वनस्पतींचे संवर्धन झाले आहे, हा एक महत्त्वाचा फायदा झाला आहेच!

थोडक्यात, 'द हाय लाइन पार्क' हे Friends of the High Line या एका शहरवासीयांच्या संघटनेच्या दोन दशकांच्या अथक प्रयत्नाने (किंबहुना लढ्याने), एका महानगराच्या भरवस्तीत असलेल्या, निकामी झालेल्या २.३३ कि.मी. लांबीच्या एका ऊर्ध्वमार्गी (एलिव्हेटेड) लोहमार्गाचा उपयोग करून विकसित केलेले उद्यान आहे. या उद्यानावर केल्या जाणार्‍या खर्चाचा ९८% वाटा ही संस्था स्वतः उभा करते आणि त्याचे रोजचे व्यवस्थापन चालविते.

चला तर, या अनवट हवाई रेषामार्गी उद्यानाचा (एलिव्हेटेड लिनियर पार्कचा) फेरफटका मारायला...

चेलसी मार्केटच्या जवळचा जिना चढून वर गेलो आणि उजव्या बाजूला हिरवाई आणि फूलझाडांनी दर्शन दिले...


द हाय लाइन ०५ : प्रथमदर्शन

तर डाव्या बाजूला चेलसी मार्केट पॅसेज नावाच्या रुंद जागेत थाटलेल्या मिनी-रेस्तराँने व छोट्या दुकानांनी लक्ष वेधून घेतले...


द हाय लाइन ०६


द हाय लाइन ०७

उद्यानातून जसजसे पुढे जाऊ लागलो, तसतसे आपण जमिनीपासून दहा-पंधरा मीटर्स उंचीवरून जाणार्‍या लोहमार्गावरून चालत आहोत यावर विश्वास ठेवण्यासाठी स्वतःला चिमटा काढायची गरज भासू लागली!...


द हाय लाइन ०८


द हाय लाइन ०९


द हाय लाइन १०


द हाय लाइन ११


द हाय लाइन १२


द हाय लाइन १३


द हाय लाइन १४

जरा पुढे गेल्यावर १०व्या अ‍ॅव्हन्यूवरून जाणार्‍या लोहमार्गाचा काही भाग वापरून बनवलेली एक फारच अनवट छोट्या अँफिथिएटरसारखी रचना दिसली. इथे बसून पर्यटकांना १०व्या अ‍ॅव्हन्यूवरून आपल्या पायांखाली धावणार्‍या रहदारीची मजा पाहता येते...


द हाय लाइन १५

थोडा वेळ ती मजा उपभोगून बागेतून पुढे निघालो. वाटेत केवळ हिरवाई आणि फूलझाडेच नव्हे, तर गमतीदार संदेश असलेल्या पाट्या मनोरंजन करत होत्या...


द हाय लाइन १६


द हाय लाइन १७

आजूबाजूच्या चित्रविचित्र आकर्षक इमारती पाहणे हासुद्धा मनोरंजक विरंगुळा होता...


द हाय लाइन १८


द हाय लाइन १९


द हाय लाइन २०


द हाय लाइन २१

     
द हाय लाइन २२

उद्यानाच्या आजूबाजूच्या असलेल्या परिसरातल्या दुकानांत अथवा रेस्तराँमध्ये जाण्यासाठी ठिकठिकाणी जिने व उद्वाहक आहेत...


द हाय लाइन २३

उद्यानाच्या मधल्या एका रुंद भागात एक चित्रकार बसला होता. तो येणार्‍या-जाणार्‍या कोणाही लहान-मोठ्यांनी त्याचे ब्रश आणि रंग घेऊन मुक्तपणे चित्रे रेखाटावी असे आवाहन करत होता...


द हाय लाइन २४

अनिर्बंध वाढलेल्या गवतातून डोलणारी अनेक प्रकारची स्थानिक फूलझाडे लक्ष वेधून घेत होती...


द हाय लाइन २५


द हाय लाइन २६

     
द हाय लाइन २७

विकासकामामुळे आणि दाट झाडीझुडपांमुळे बहुतेक सगळे रूळ झाकून गेले आहेत. पण, एखाद-दुसर्‍या जागी त्यांचे दर्शन होते...


द हाय लाइन २८


द हाय लाइन २९

मूळ मार्गाच्या चौकटीला धक्का न लावता व कलात्मकतेचा दर्जा राखूनही, भेट देणार्‍या लोकांना हे उद्यान सोईस्कर आणि आनंददायक कसे होईल इकडे लक्ष दिल्याचे जागोजागी दिसत होते. लोकांना आरामात बसण्यासाठी जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची सोय आहे. मनोरंजनासाठी जागेचा उत्तम वापर कसा होईल इकडेही लक्ष दिलेले जागोजागी दिसत होते...


द हाय लाइन ३०


द हाय लाइन ३१


द हाय लाइन ३२


द हाय लाइन ३३


द हाय लाइन ३४

हा दोन-अडीच किलोमीटरचा विस्मयकारी फेरफटका संपून उद्यानाच्या दुसर्‍या टोकाला कधी पोहोचलो, ते समजलेच नाही!


द हाय लाइन ३५

या उद्यानात आयोजित केल्या जाणार्‍या अनेक कार्यक्रमांमुळे हे उद्यान न्यू यॉर्क शहरातील एक 'हॅपनिंग प्लेस' झाले आहे.

या प्रकल्पामुळे त्याच्या परिसराला आणि एकंदर शहराला अनेक महत्त्वाचे फायदे झाले आहेत...

१. मजबूत अवस्थेत असलेला एक ऐतिहासिक लोहमार्ग नष्ट होण्यापासून नुसता वाचला असेच नाही, तर त्याचे रूपांतर शहराचे भूषण ठरलेल्या एका अनवट उद्यानात झाले आहे.

२. हे उद्यान परिसरातल्या लोकांसाठी फायद्याचे ठरले आहेच, त्याबरोबरच हे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण बनले आहे. गेल्या वर्षी या उद्यानाला ५० लाख लोकांनी भेट दिली आणि हा आकडा वाढत आहे.

३. या उद्यानाचे यश पाहून अमेरिकेतील इतर अनेक शहरांत (शिकागो, फिलाडेल्फिया, सेंट लुई, इ.) या प्रकल्पावर बेतलेले 'शहरी पुनर्निमाणाचे (urban regenerationचे)' प्रकल्प सुरू केले गेले आहेत.

४. हे उद्यान खेचत असलेल्या पर्यटकांच्या वर्दळीचा फायदा घेण्यासाठी त्याच्या आजूबाजूला अनेक संग्रहालये, दुकाने, रेस्तराँ, इत्यादी निर्माण केली गेली आहेत. अर्थातच त्याचा परिणाम हा परिसर अधिक आकर्षक आणि अधिक सधन बनण्यात झाला आहे.

५. एक गंमत अशी आहे की, बिल्डर लॉबीचे या लोहमार्गाला नष्ट करण्याचे प्रयत्न फसल्यामुळे, बिल्डर लॉबीलाच मोठा फायदा झाला आहे! हे उद्यान अस्तित्वात येण्यापूर्वी चेलसी या लोहमार्गाच्या आजूबाजूच्या परिसराला अवकळा आली होती. या उद्यानामुळे आज चेलसी हा मॅनहॅटनच्या आकर्षक व महागड्या परिसरांपैकी (नेबरहूड) एक झाला आहे. या परिसरातल्या जागांचे भाव कल्पनेपलीकडे वाढले आहेत. इथल्या सर्वसामान्य सदनिकेची किंमत सहजपणे $६० लाखाच्या (सुमारे ४० कोटी रुपयांच्या) घरात जाते आणि त्यापैकी काही तर $१ कोटींपेक्षा (सुमारे ६७ कोटी रुपयांपेक्षा) जास्त किमतीच्या आहेत. या भरभराटीला 'High Line Effect' असे नाव पडले आहे.

'हाय लाइन इफेक्ट'च्या मागे नागरिकांनी आपला परिसर (नेबरहूड) व आपले शहर अधिक सुखद आणि अधिक सुंदर बनविण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. मुख्य म्हणजे 'सर्व विकास आपले सरकार व प्रशासन आपोआप करेल' असा गोड गैरसमज न करून घेता, 'तसे व्हावे यासाठी नागरिकांची स्वतः काम करण्याची आणि प्रसंगी सरकार-प्रशासनाशी संघर्ष करून त्याला नमविण्याची तयारी' दिसली. यालाच साध्या शब्दांत सहभागी लोकशाही (Participatory Democracy) असे म्हणतात. हाच सहभाग न्यू यॉर्क शहरभर नागरिकांनी चालविलेल्या असंख्य पार्क्सच्या व इतर समाजोपयोगी संस्थांच्या कार्यशैलीत सतत दिसतो. तिथल्या नागरिकांचा हा स्वभावच न्यू यॉर्क शहराच्या दृश्य झगमगाटामागचे व सौंदर्यामागचे इंगित आहे, यात वाद नाही.

यासारख्या जागाच न्यू यॉर्क शहराच्या मोठेपणाची खरी ओळख करून देतात... या जागांच्या मागे जे विचार, जी जीवनप्रणाली लपलेली आहे, तीच इथे जगप्रसिद्ध आकर्षणे इथे निर्माण होण्यामागे आणि ती वर्षानुवर्षे टिकून राहण्यामागे आहे.

न्यू यॉर्क शहराची भटकंती करताना दोन-एक तास वेगळे काढून या उद्यानाची फेरी जरूर मारा. जास्त वेळ गाठीला असेल तर या उद्यानाच्या एका टोकाकडून दुसरीकडे जात असताना त्याच्या बाजूला असलेल्या अनेक रेस्तराँना, दुकानांना आणि संग्रहालयांना भेट देत देत आख्खा दिवस सहजपणे मजेत घालविता येईल.

क्रमश :

===============================================================================

न्यू यॉर्क : ===> १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क १... ===>

===============================================================================

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!

प्रचेतस's picture

30 Oct 2016 - 11:04 am | प्रचेतस

जबरदस्त आहे हे.

जयन्त बा शिम्पि's picture

30 Oct 2016 - 6:31 pm | जयन्त बा शिम्पि

वाचनखुण साठवा कोठे दिसत नाही. कोणी मदत करील काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2016 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही कारणाने सद्या विशेषांकांतील लेखांखाली "वाचनखुण साठवा" हा पर्याय दिसत नाही. ही समस्या मिपातंत्रज्ञांकडे पोचवली आहे.

इशा१२३'s picture

31 Oct 2016 - 9:19 am | इशा१२३

भरपुर फोटोंमुळे मजा आली वाचताना.नेहेमीप्रमाणेच मस्त वर्णन.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2016 - 7:53 pm | अत्रुप्त आत्मा

+१

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:02 pm | पैसा

लै भारी प्रकार आहे हा!

पद्मावति's picture

4 Nov 2016 - 7:34 pm | पद्मावति

वाह! फारच अनोखी जागा. मस्तं.

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2016 - 8:28 pm | पिलीयन रायडर

एक नंबर जागा आहे ही!

काका अगदी न्यु यॉर्कम्ध्ये सफरच घडवुन आणतात!

नूतन सावंत's picture

4 Nov 2016 - 10:36 pm | नूतन सावंत

वा!घरबसल्या न्यूयॉर्कच्या उद्यानात फेरफटका घडवलात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2016 - 1:05 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

निशाचर's picture

7 Nov 2016 - 4:51 am | निशाचर

मस्तंच आहे ही जागा!