===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
१० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
१२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
१५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
१८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
२१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
२४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
२६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
२९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
===============================================================================
या परिसरात, दीड दशकांपूर्वी, शांतताकाळातील जगातील सर्वात मोठा विध्वंस घडला होता यावर विश्वास बसणार नाही इतपत हा परिसर बदललेला आहे.
मॅनहॅटन बेटाच्या दक्षिण टोकावर "न्यू अॅमस्टरडॅम" या नावाने आजच्या न्यू यॉर्क शहराची सुरुवात झाली हे आपल्याला माहीत आहेच. या शहराची उत्तरोत्तर उत्तरेच्या दिशेने वाढ होत राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत ही वाढ आजच्या ४२व्या स्ट्रीटपर्यंत वाढून तो भाग शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनला होता. १९०४ मध्ये न्यू यॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने ४३व्या स्ट्रीट व ब्रॉडवेच्या चौकात पंचवीस मजली "टाईम्स टॉवर" बांधून आपले कार्यालय तेथे हलविले. त्यामुळे त्या इमारतीसमोरील चौकाचे लाँगएकर चौक (Longacre square) हे जुने नाव बदलून "टाईम्स स्क्वेअर" असे ठेवले गेले. न्यू यॉर्क शहराच्या वाढीबरोबरच त्याच्या या सामाजिक-सांस्कृतिक केंद्राचा आकार वाढत राहिला आहे. आजमितीला "टाईम्स स्क्वेअर" म्हणून ओळखल्या जाण्यार्या जागेचा आकार एका चौकाइतपत सीमित न राहता "४०वा ते ५३ वा स्ट्रीट आणि ६वा ते ९वा अव्हेन्यू" या सीमांनी बनलेल्या प्रभागाइतका (नेबरहूड) मोठा झाला आहे...
टाइम्स स्क्वेअर (मूळ नकाशा जालावरून साभार)
या भागाला लाडाने "विश्वाचा केंद्रबिंदू (Center of the Universe)", "जगाचे हृदय (Heart of the World)" आणि "The Great White Way" असेही संबोधले जाते.
१ टाईम्स स्क्वेअर
न्यू यॉर्क टाईम्सने, १ टाईम्स स्क्वेअर या पत्त्यावरच्या, आपल्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन १९०४ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता (New Year's Eve) फटाक्यांची रोषणाई करून केले. १९०६ नंतर सुरक्षेच्या कारणासाठी फटाक्यांची रोषणाई बंद केली गेली. त्याऐवजी १९०७ साली त्या इमारतीवर असलेल्या स्तंभावरील स्फटिकगोल खाली उतरवून नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. हा सर्व सोहळा पाहण्यासाठी जगभरचे जवळ जवळ १० लाख पर्यटक तेथे दरवर्षी ३१ डिसेंबरला गर्दी करतात.
१ टाइम्स स्क्वेअर इमारत : २०१६ या चालू वर्षाच्या आकड्यावर दिसणारा स्फटिकगोल तेथेच दिसणार्या खांबावरून
३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता खाली उतरवला जातो व वर्षभर तेथेच राहतो.
त्याच्यामागे वेळ दाखविणारा इलेक्ट्रॉनिक फलक दिसत आहे.
१ टाईम्स स्क्वेअरवरचा नववर्षस्वागत सोहळा (जालावरून साभार)
उण्यापुर्या दहा वर्षांच्या वापरानंतर टाईम्सने त्याचे मुख्यालय या इमारतीतून "२२९ वेस्ट ४३वा स्ट्रीट" या पत्त्यावर हलविले. असे असले तरी वर्षारंभाच्या स्फटिकगोल उतरवण्याच्या प्रथेमुळे व तिच्या दर्शनी भागावर असलेल्या महाकाय जाहिरातींमुळे या इमारतीचे व तिच्यासमोरच्या चौकाचे महत्त्व कायम राहिले आहे. खालच्या काही मजल्यांवर असलेले औषधाचे दुकान सोडले तर इतर सर्व इमारत हल्ली रिकामी असते. मात्र, जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न ती आर्थिक कमी भरून काढत असल्याने ती इमारत तोडून नवीन काही बांधण्याचा विचार केला गेलेला नाही.
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट
पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ ते १९१८) सुरुवातीपर्यंत टाईम्स स्क्वेअरच्या आजूबाजूला ब्रॉडवेवर नाटकांच्या थिएटर्सची गर्दी झाली आणि तेथे पर्यटकांची वर्दळ वाढू लागली. १९३० च्या दशकातल्या आर्थिक मंदीमुळे त्यातली अनेक रंगमंदिरे बंद पडली आणि अनेकांचा उपयोग स्ट्रीपटीज, पीप शो इत्यादी सवंग गोष्टींसाठी केला जाऊ लागला. दुसर्या महायुद्धानंतर सुधारलेल्या आर्थिक स्थितीने रंगमंदिरांना काही कालासाठी परत ऊर्जितावस्था आली होती. मात्र १९६०च्या दशकाच्या शेवटाला परिस्थिती परत बिघडली आणि हा विभाग अंमली पदार्थ आणि गुन्हेगारीचे माहेरघर बनला.
१९८०च्या दशकात या विभागाच्या पुनर्विकासाचे अनेक मसुदे तयार केले गेले पण जमिनीवरची परिस्थिती तीच राहिली. मात्र त्याच सुमारास वॉल्ट डिस्ने कंपनीने येथे "डिस्ने स्टोअर" सुरू करून पर्यटकांना आकर्षित करणे सुरू केले. त्यामुळे तयार झालेल्या सकारात्मक परिस्थितीमुळे सर्व कुटुंबासह भेट देता येईल असे इतर अनेक व्यवसाय येथे परतले आणि या विभागाचा कायापालट सुरू झाला. या सर्व प्रक्रियेला "डिस्निफिकेशन" असे संबोधले जाते. आता येथे जागतिक कीर्तीची १०० पेक्षा जास्त दुकाने व MTV व ABC यासारख्या मान्यवर माध्यमांची कार्यालये आहेत. १९९०च्या दशकाच्या शेवटापासून हा विभाग पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित आणि आकर्षक झाला आहे. गेली अनेक वर्षे तो केवळ न्यू यॉर्क शहर पर्यटनाच्या केंद्रस्थानीच नाही तर भेट देणार्या पर्यटकसंखेप्रमाणे बनवलेल्या बर्याच जागतीक याद्यांत शीर्षस्थानी आहे.
येथे प्रत्येकी ५०० पेक्षा जास्त आसने असलेली ४० पेक्षा जास्त रंगमंदिरे आहेत. दर रंगमंदिरात एकाच नाटकाचे दर आठवड्याला आठ प्रयोग चालू असतात. त्यातली ५०% तरी नातके पाच-सात वर्षे तर काही १०-१२ वर्षे सतत प्रयोग करणारी आहेत. येथील १९३० च्या दशकातील जुन्या क्लासिकल नाटकांपासून आजच्या जमान्यातील हायटेक नाटकांपर्यंतचे असंख्य प्रकार पहायला जगभरचे पर्यटक आणि दर्दी रसिक वर्षभर गर्दी करतात. या नाटकांच्या जाहिरातींनी सतत झगमगणार्या या विभागाला The Great White Way असेही म्हणतात. या नाटकांची तिकिटे मात्र खिशाला भारी असतात. नावाजलेल्या नाटकाच्या पुढच्या रांगेतील तिकिटाला $२२५ किंवा अधिक मोजावे लागतात. मागच्या खुर्च्यांवर बसण्याची तयारी असली तर जालावरून बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण, तरीही या नाटकांच्या मक्केत काही जगप्रसिद्ध नाटके पुढच्या खुर्चीवरून बघण्याचा आनंद निर्विवादपणे पैसे वसूल करून देणारा अनुभव असतो.
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०१
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०२
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०३
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०४
ब्रॉडवे थिएटर डिस्ट्रिक्ट ०५
महाकाय बिलबोर्ड
नाटक बघण्यासाठी होणार्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी तेथे मोठ्या मोठ्या आकाराच्या जाहिराती (बिलबोर्ड) लावल्या जातात. येथे १९१७ मध्ये पहिली विजेच्या वापराने झगमगणारी जाहिरात लावली गेली. धावत्या अक्षरांच्या विद्युत जाहिरातीची सुरुवात १९२८ साली नवनिर्वाचित अमेरिकन अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्या विजयाच्या बातमीने झाली. त्यात चलतचित्रे असलेल्या अनेक मजली उंचीच्या महाकाय जाहिरातींची भर पडली आहे. या जाहिराती इतके मोठे पर्यटक आकर्षण ठरल्या आहेत की शहराच्या झोनिंग नियमांप्रमाणे या विभागातल्या इमारतींच्या दर्शनी भागावर जाहिराती लावणे कायद्याने आवश्यक केले गेले आहे !
महाकाय बिलबोर्ड आणि धावत्या अक्षरांच्या जाहिराती ०१
महाकाय बिलबोर्ड ०२
महाकाय बिलबोर्ड ०३
महाकाय बिलबोर्ड ०४ (जालावरून साभार)
महाकाय बिलबोर्ड ०५
पादचारी प्लाझा
वाहनांची गर्दी कमी करून तो पायी चालणार्या पर्यटकांसाठी अनुकूल व्हावा यासाठी या भागात २००९ पासून अनेक पुनर्विकास कामे केली गेली आहेत आणि ती अजूनही चालू आहेत. या योजनेअंतर्गत येथे अनेक मोठमोठे वाहनमुक्त प्लाझा (car-free plazas) बनवले आहेत. या प्लाझांमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी सरकारी खर्चाने खुर्च्या बसवल्या आहेत. बरेचसे रेस्तराँ त्यांच्या दर्शनी भागासमोर खुर्च्या व टेबले मांडतात. तेथे बसून पर्यटक खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतात किंवा नुसते आजूबाजूचा नजारा न्याहाळू शकतात. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालवलेला हा प्रकल्प आता कायमस्वरूपी झाला आहे आणि त्यात अजून नवनवे रस्ते सामील केले जात आहेत. यामुळे पर्यटकांच्या सोयीबरोबरच, अपघातांचे प्रमाण कमी होणे, प्रदूषण कमी होणे इत्यादी अनेक फायदे होत आहेत. या प्लाझांवर काही कलाकार त्यांचे कसब दाखवून पर्यटकांचे मनोरंजन करताना दिसतात.
पादचारी प्लाझा ०१
पादचारी प्लाझा ०२
पादचारी प्लाझा ०३
पादचारी प्लाझा ०४
पादचारी प्लाझा ०५
पादचारी प्लाझा ०६
पादचारी प्लाझा ०७ : पादचारी प्लाझावरील खेळ
पादचारी प्लाझा ०८ : स्वातंत्र्यदेवतेचे रूप घेतलेला कलाकार
पादचारी प्लाझा ०९ : रस्त्यावर कसरतींचे कौशल्य सादर करणारे कलाकार
पादचारी प्लाझा १० : पर्यावरणवादी न्यू यॉर्क शहर पर्यटक व नागरिकांच्या वापरासाठी भाड्याने सायकली पुरवते
इतर आकर्षणे
वरच्या गोष्टींशिवाय येथे अनेक आकर्षणे आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची खालीलप्रमाणे आहेत :
१. मादाम तुस्सॉज (Madame Tussauds) या जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाची शाखा.
२. Ripley’s Believe It or Not! हे आश्चर्यकारक गोष्टींचे संग्रहालय.
३. अनेक चलत्चित्र पडदे (स्क्रीन) असलेली चित्रपटगृह संकुले. AMC एंपायर२५ नावाच्या अनेक मजली संकुलात २५ पडदे आहेत.
४. The Ride ही नाटकीय प्रयोग आणि हायटेक सादरीकरण करणार्या कलाकारचमूसह न्यू यॉर्कमध्ये फिरवून आणणारी बसची सफर.
५. न्यू यॉर्क शहर व परिसराचे दर्शन करवणार्या बसच्या बहुतांश सहली टाईम्स स्क्वेअर परिसरातून सुरु होतात.
६. बिटल्स, लेड झेपेलिन, मॅडोना, इत्यादी अनेक प्रसिद्ध मान्यवर तारे-तारकांच्या भेटींचे फोटो व चिन्हे (मेमरोबिलिया) असलेल्या हार्ड रॉक कॅफेसारखी उपाहारगृहे येथे आहेत.
७. असंख्य लहानमोठी रेस्तराँ आणि दुकानांनी हा भाग खच्चून भरलेला आहे.
इथली काही रंगमंदिरे व इतर महत्त्वाच्या आकर्षणांना आपण लेखमालेच्या पुढच्या काही भागांत स्वतंत्रपणे भेट देऊच.
दुकानांचा झगमगाट
मेसीज : जगातले सर्वात मोठे मेगॅस्टोअर
H & M सुपरस्टोअर
रस्त्याच्या बाजूला उभ्या असणार्या खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या सर्व न्यू यॉर्कभर जागोजागी दिसतात आणि त्यावरचे खाणे पर्यटक आणि न्यू यॉर्ककरांचा आवडता छंद आहे
पर्यटकभेटींच्या संख्येप्रमाणे बनवलेल्या यादीत टाईम्स स्क्वेअर अनेक वर्षे सतत वरच्या स्थानावर आहे. दरदिवशी या जागेला साधारणपणे ३,६०,००० पादचारी भेट देतात. मार्च २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या एका वर्षाच्या कालावधीत टाईम्स स्क्वेअरला १२,८७,९४,००० लोकांनी भेट दिली. ही संख्या त्याच कालावधीत जगभरच्या सर्व डिस्ने थीम पार्क्सना भेट दिलेल्या पर्यटकांपेक्षा मोठी होती. फक्त लास वेगास हेच एक पर्यटक आकर्षण याबाबतीत टाईम्स स्क्वेअरच्या पुढे आहे. न्यू यॉर्क शहराच्या पर्यटन उत्पन्नापैकी २२% या एकाच जागेवर मिळते.
फिरत्या गाडीवरचा हॉट डॉग, सँडविच इत्यादी खात खात इथली मजा पाहत फिरणे, दुकानांत शिरून काही खरेदी करणे किंवा फक्त त्यांच्या अनेकमजली काचांच्या भिंतीपलीकडचे वस्तूंच्या सादरीकरणाचे देखावे पाहणे, प्रचंड आकाराच्या बिलबोर्डांवरच्या व्हिडिओ जाहिराती पाहणे, रस्त्यावरच्या कलाकारांच्या करामती पाहणे, चालायचा कंटाळा आला तर मोक्याची खुर्ची पकडून इकडून तिकडे लगबगीने जाणार्या लोकांना न्याहाळणे, असे अनेक प्रकार करत टाईम्स स्क्वेअरवर तासनतास खर्च केले तरी कंटाळा येत नाही.
(क्रमश :)
===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
१० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
१२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
१५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
१८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
२१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
२४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
२६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
२९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
===============================================================================
प्रतिक्रिया
11 Sep 2016 - 1:59 am | अभिजीत अवलिया
टाईम्स स्क्वेअर म्हणजे न्यू यॉर्कचे हृदयच आहे की.
11 Sep 2016 - 2:39 am | पद्मावति
मस्तं!
11 Sep 2016 - 2:39 am | पिलीयन रायडर
काकांच्या लेखातुन आपल्याला टाईम स्केवर बद्दल किती कमी माहिती आहे हे लक्षात आलं!!
टाईम स्क्वेअर म्हणजे अहोरात्र चालु असलेली गणपतीची मिरवणुक! नुसतंच जाऊन बसलं तरी उगाच भारी वाटत रहातं!
जम्बोट्रॉनवर आपण दिसलो आणि त्यात सुद्धा बदामाच्या बरोब्बर मध्ये आलो तर काय आनंद होतो. खरं तर फारच बालीशपणा आहे! हा आहे जंबोट्रोन आणि फक्त ह्याच्या समोर १०० लोक अधाशा सारखे जमले आहेत असं समजा आणि नक्की कुठे उभे राहिलो तर ह्या बदामाच्या आत येऊ ह्याचा विचार करत असतील..
मागच्या वर्षी इथे द फेमस किसिंग सेलरचा २५ फुट पुतळा आणुन ठेवला होता.
अनेक जण ह्याच पोझ मध्ये पुतळ्या समोर फोटो काढुन घेत होते.
अजुनही काही "विभुती" इथे फिरत असतात! आपण नवर्याचे डोळे झाकुन पुढे सरकायचं!!!
उगाच उदास वाटत असलं की जाऊन बसायला फार आवडती जागा आहे ही. इथे डिझ्नेचं अत्यंत सुंदर शोरुम आहे.
मी तिथल्या एस्कलेटरचे शेकडो फोटो काढले होते.सापडले तर नक्की टाकेन. हे काही आंतरजालावरुन
ही जी झाडं दिसत आहेत ना, त्यावर डिझ्नेचे फेमस कॅरेक्टर्स आहेत. आणि टँगल्ड मध्ये जसं दिवे सोडलेले असतात, तसे हे दिवे लावलेत.
शिवाय आता बंद झालेलं टॉईज आर अस हे ही खेळण्यांचे फार मोठे दुकान इथे होतं. (ज्याच्या आत रहाटपाळणा आहे!).
शाकाहारी लोकांना इथे "माओज" नावचा फलाफलचा उत्तम पर्याय आहे. सबवे प्रमाणेच ही एक चेन आहे.
बायकांनो इथे forever 21 चे सुद्धा दुकान आहे जिथे अनेकदा स्वस्तात मस्त गोष्टी मिळुन जातात.
11 Sep 2016 - 2:52 am | अभिजीत अवलिया
अजुनही काही "विभुती" इथे फिरत असतात!
--- माझ्या काही मित्रांनी अशा 'विभुतीं' बरोबर खूप फोटो काढलेत. :)
11 Sep 2016 - 5:07 am | चित्रगुप्त
नेहमीप्रमाणे माहिती आणि फोटोंचा उत्तम खजिना.
गर्दी, झगमगाट, बाजार, शहरातील गदारोळ यापासून दूर शांत एकांतात रमणार्या मला स्वतःला मात्र टाईम्स स्क्वेअर मधे तीनदा जाऊनही (मुलांच्या आग्रहास्तव) त्यात काहीही बघण्यासारखं, रमण्यासारखं वाटलं नाही. वयाचा परिणाम म्हणावं, तर अगदी विशीत सुद्धा मी असाच होतो. पसंद अपनी अपनी.
11 Sep 2016 - 8:37 am | चौकटराजा
कलाकार मा॑णूस प्रथम भेटीत व्हर्सायला जाईल पुढे पॅरिस भेट नशीबात असेल तरच डिस्नेलॅन्डला जाईल. भारतातील कलाकार मनोवृतीची माणसे प्रथम युरोप पहातात मग सिंगापूर बाकी प्रथम सिंगापूर मग युरोप.
@ डॉ साहेब, हा लेख ही नेहमीप्रमाणेच उत्तम ! पादचारी पथात ती होटेलची टेबले कशाला की प्रथम कम्पनी मग राष्ट्र या भांडवल शाही अमेरिकेची ती प्रतिके आहेत ?
11 Sep 2016 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
त्या जागा म्हणजे पूर्वीचे चारचाकीचे रस्ते बंद करून त्यांच्या जागी बनवलेले पादचारी प्लाझा (पेडेस्ट्रियन प्लाझा) आहेत. तेथिल बहुतेक खुर्च्या व टेबले सरकारी खर्चाने पर्यटकांच्या सोयीसाठी ठेवलेली आहेत. त्यांच्या वापराला शुल्क नाही.
त्या प्लाझांना लागून असलेल्या रेस्तराँनाही, सशुल्क परवाना काढून, प्लाझाच्या / फूटपाथच्या ठराविक भागापर्यंत खुर्च्या व टेबले मांडता येतात. मात्र, त्या खुर्च्या-टेबलांचा वापर फक्त आमच्याच गिर्हाइकांनी करावा असा आग्रह कुठेही दिसला नाही. पर्यटक सर्व सरकारी-गैरसरकारी सोयींचा उपयोग खिनभर बूड टेकायला आणि दुसरीकडून आणलेला बर्गर खायला अगदी बिनधास्तपणे करत होते.
11 Sep 2016 - 9:11 pm | अभ्या..
अगदी अगदी, चौराकाका सौ टका सहमत
12 Sep 2016 - 2:14 am | चित्रगुप्त
अहो चौराराव, नुक्ताच फ्लॉरिडातल्या डिस्नेल्यांडास जाऊन आलोय. एकदम फालतू प्रकार वाटला. शंभर डॉलर प्रत्येकी तिकीट, बाकी खाण्यापिण्याचे अर्थातच वेगळे. बरं, मला माझं वय आणि आवडीनिवडी यामुळे तसं वाटलं म्हणाल, तर माझा ३२ वर्षाचा मुलगा सुद्धा वैतागला, आणि पाच वर्षाचा नातू तर कंटाळून झोपीच गेला, त्याला कडेवर घेऊन उन्हातान्हात वणवण करावी लागली. प्रत्येक ठिकाणी (झोपाळे, चक्र्या वगैरे) तासा-तासाभराची रांग. उगाचच जाहिरातबाजी - गवगवा करून लाखो डॉलर्स कमवायचं साधन बनवून ठेवलंय, बळी पडणारे तेरीभी चूप मेरीभी चूप म्हणून उग्गाचच ऑसम वगैरे भंकस मारतात.
आणखी एक ओर्ल्यांडोहून सात तास ड्राईव्ह करून की वेस्ट म्हणून आहे. ते म्हणे अमेरिकेचे सर्वात दक्षिणेचे टोक आहे. असेना का, आपल्याला काय करायचे आहे ते उत्तरेचे टोक असो की दक्षिणेचे. तिथे एका सिमेंटच्या खडकावर लिहिलंय की हे अमेरिकेचं सर्वात दक्षिणेचं टोक आहे. त्या दगडासोबत आपली सेल्फी काढण्यासाठी रांग लावून ताटकळायचे. मग पायपीट करत सनसेट पॉईंट गाठायचा. तिथे सूर्यास्त बघायला हीSSS गर्दी. सूर्य धड दिसतही नव्हता गर्दीतून. सगळा वायझेडपणा. याच्यापेक्षा सुंदर सूर्यास्त तर मी लहानपणी इंदुरात अगदी रोज बघायचो. तोही अगदी पूर्ण एकांतात, रम्य जागी.
मी अगदी तरुणपणीच ठरवलं होतं, की फेमस ठिकाणी जायचंच नाही आपण कधी. भारतात ते पाळत आलो, आता इकडे इकडे मुलांना वाटतं आई-बाबांना हे दाखवावं ते दाखवावं. फुकट दगदग.
11 Sep 2016 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
"पसंद अपनी अपनी." हेच शेवटी १००% खरे असते.
मला हिमालय/आल्पसचा थंड पांढराशुभ्र रिकामा परिसर जेवढा आवडतो तेवढाच रब अल खालीचा उष्ण वाळवंटी रखरखीतपणा आश्चर्यचकीत करतो; एखाद्या पार्कची हिरवाई आणि एकांत जेवढा मोहून टाकतो तेवढीच मजा गडबडगर्दीचा बेशिस्त चौक न्याहाळताना येते; निसर्गाची करामत जेवढी आश्चर्यकारक वाटते तेवढेच कुतुहल संग्रहालयातल्या मानवाच्या करामती पाहताना वाटत असते... किंबहुना सर्व गोष्टींबद्दलचे हेच असीम कुतुहल मला भटकंती करायला भाग पाडते !
11 Sep 2016 - 9:14 pm | अभ्या..
खरं सांगा एक्काकाका, मला काही स्कोप आहे की नै तिकडे? होर्डिंग बिर्डिंगात हो. च्यायला इकडे पॉलिटिक्स मध्ये राळ उडवून कंटाळलो हो, हे कसले भारी कमर्शिअल, एलईडी, अॅनिमेटेड स्क्रीन. जबरदस्त असेल माहोल. माझ्यासारखा एखादा वर बघत चालायचा अन एखाद्या एक्स पुणे हम्रिकनाने "ए हेन्द्र्या समोर बघ, नायतर धडकशील" असा उध्दार करायचा.
11 Sep 2016 - 6:38 pm | प्रचेतस
हा ही भाग छान आणि संगतवार.
न्यू यॉर्क शहराची डिट्टेलवार सफ़र खूप आवडतेय.
11 Sep 2016 - 9:25 pm | सुहास बांदल
एक नंबर मस्त फेर फटका झाला मजा आली.
12 Sep 2016 - 4:24 am | रेवती
आठवणी जाग्या झाल्या. पूर्वी काहीवेळा या भागास भेट दिली होती पण वाहनांच्या गर्दीने त्रासून जायला झाले होते. आता वाहने आणण्यास बंदी घालून एक चांगले काम झाले आहे. पिराशी सहमत. रोजच गणपती विसर्जनाची मिरवणूक असल्यासारखे वाटते.
12 Sep 2016 - 4:50 am | राघवेंद्र
एकदम सुरेख माहिती!!! पुन्हा एकदा जावेसे वाटत आहे.
12 Sep 2016 - 7:27 am | संदीप डांगे
महाराष्ट्रातल्या कुठल्याही यष्टीष्टयांडात असंच वातावरण असतंय, गरीबाचं वायलं, शिरिमंताच वायलं,
बाकी, लेख उत्तम व डॉक्टरसाहेब तुमचा दृष्टिकोन आवडला..
12 Sep 2016 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
महाराष्ट्रातल्या कुठल्याही यष्टीष्टयांडात असंच वातावरण असतंय, गरीबाचं वायलं, शिरिमंताच वायलं
महाराष्ट्रातल्या कुठल्याही यष्टीष्टयांडात उत्तम विकसन-नियोजन करून जगभरचे पर्यटक आकर्षित करून भारताला बिलयनमध्ये डॉलर कमवून दिले तर त्यालाही जरा जास्तच कौतूकाने भेट देऊन त्याच्यावर एक लेख लिहायला केवळ मज्जाच नाही तर सार्थ अभिमानच वाटेल की हो राजे ! :)
वीटेला वीट लावून जगभर सगळीकडेच रोजच काहीना काही "बनवले" जाते. परंतू, अनपेक्षित ठिकाणी (पक्षी : एका शहरातल्या एका चौकाचा परिसर, जश्या जागा जगभर पैशाला पासरीभर आहेत) जगभरच्या लोकांना आकर्षित व चकीत करणारा अनपेक्षित विकास करायला (पक्षी : मातीचे सोने करायला) एका वेगळ्याच स्तराच्या कल्पकतेची, कलात्मकतेची आणि व्यवस्थापनकौशल्याची जरूर असते. अश्या जागेवरच्या वरवरच्या दृश्य यशापेक्षा, मी त्या यशामागच्या (आणि त्या यशाच्या खर्या मालक असणार्या) गोष्टींनी किंचित जास्तच प्रभावित होतो.
एखादी गोष्ट केवळ "कुठल्या दिशेला/जागेवर आहे किंवा कुठल्या दिशेने आली आहे (उदा : पौर्वात्य की पाश्चिमात्य)" किंवा "कोणत्या सोईच्या/गैरसोईच्या देशाने/संस्थेने/कंपनीने/व्यक्तीने बनवली आहे" या प्रश्नांच्या उत्तरांनी प्रभावित होणे मला जमत नाही. त्याऐवजी वास्तवातले सत्य नक्कीच महत्वाचे वाटते. याचा फायदा असा की खुल्या दिलाने चांगल्याला चांगले आणी वाईटाला वाईट म्हणणे कधीच गैरसोईचे होत नाही. :) ;)
13 Sep 2016 - 12:06 am | निशाचर
तुमचा प्रतिसाद खूप आवडला.
14 Sep 2016 - 8:48 am | संदीप डांगे
माझा प्रतिसाद चुकीच्या दृष्टीकोनातून तर नाही ना बघितला डॉक्टरसाहेब? तो फक्त मजेखातर होता.
बाकी काही असो पण एक नक्की खरे आहे: अमेरिकन मार्केटिंग हे जगात भारी व परिणामकारक आहे, ते चिंधीलाही महावस्त्र बोलून विकतात, लोक भुलतात, हे निश्चित कौतुकास्पद आहे.
14 Sep 2016 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
चिंधीलाही महावस्त्र बोलून विकतात, लोक भुलतात
असे सरसकटीकरण करणे पूर्वग्रहदूषित होईल... असे बहुदा आपले अपयश झाकण्यासाठी आणि पर्यायाने ते अपयश भविष्यातही तसेच कायम राहील असा निराशावादी सूर काढण्यासाठी बोलले जाते.
आपले कष्टाने कमावलेले पैसे, कोणत्याच फायद्याविना, "वर्षानुवर्षे" उधळत राहण्याइतके "जगभरचे करोडो लोक (यात सर्व विकसित देशातले लोकही आलेच)" निर्बुद्ध आहेत असा सरसकट समज करून घेण्याऐवजी...
(अ) आपल्या कृती/कलाकृती/उत्पादन/सेवेकडे लोकांनी आकर्षित व्हावे यासाठी कोणी, कोठे, काय केले आहे हे माहित करून घेण्याचा प्रयत्न करणे जास्त समजूतदारपणाचे होईल; आणि
(आ) त्या माहितीचा आपल्या विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार करणे जास्त शहाणपणाचे होईल,
...असे वाटत नाही का ?
****
अवांतर : असे असले तर, नेसले मॅगीच्या चिंधीला केवळ मार्केटिंगच्या जोरावर महावस्त्र म्हणून जगभर विकत आहे असे म्हणायला हरकत नाही ना ? ;) :) (ह घ्या)
14 Sep 2016 - 8:42 pm | चित्रगुप्त
हे बर्याच प्रमाणात खरे आहे, मी हे यासाठी सांगू शकतो की या महावस्त्र म्हणून विकण्याच्या उद्योगात मीही नोकरीखातर सहभागी होतो कित्येक वर्षे. उदाहरणार्थ अमेरिकेतील अत्यंत फडतुस चित्रकार (उदा. अमेरिकन अँबॅसॅडरच्या बायकोची मैत्रीण किंवा कुणा सिनेटर चा नातेवाईक.. यांना अमेरिकेतून भरपूर ग्रांट वगैरेही मिळालेली असायची.) वगैरेंची प्रदर्शने भारतात येत. इकडे मी भारतातील अमेरिकन सरकारचा प्रदर्शन अधिकारी असल्याने ती खरकटी जास्तीत जास्त उदो उदो करून अत्यंत मौल्यवान, कलेला सर्वस्वी नवीन दिशा देणार्या महान कलाकृती म्हणून भारतभर दाखवत फिरायचे माझे काम होते. मला पंचतारांकित हॉटेलात मुक्कम, भरपूर भत्ते, विमानप्रवास वगैरे त्याकाळी एरवी स्वप्नवत वाटणार्या सोयींचा लाभ मिळायचा. (त्या भत्त्यातून पैसे वाचवून मी दिल्लीत घर बांधले)
नंतर काही वर्षे मी स्पॅन मासिकात काम केले. यातही तिकडल्या कोण्या सोम्या गोम्याने इतिहासच पार बदलून टाकणारा काही क्रांतिकारी शोध कसा लावलाय वगैरे बातम्या महाग गुळगुळीत कागदावर छापलेले मासिक फुकट वाटायचे.
आणखी त्यापूर्वी दिल्लीत म्युझियम मधे चित्रकार म्हणून काम करताना अमेरिकेतून एक्स्पर्ट मंडळी येत. त्यांचेशी दोस्ती झाली तर ते जी अंदरकी बात सांगत, त्या गोष्टी बाहेर जो गवगवा केला जतो, त्याहून अगदी वेगळ्या असत. या सर्व अनुभवातून माझ्याकडे वर-वरच्या भपक्याला आणि प्रचाराला भेदून अंतरंगातील वस्तुस्थिती जाणण्याची एक क्षमता विकसित झाली.
14 Sep 2016 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमचा मुद्दा आपल्या जागी अगदी बरोबर आहे. पण तो सर्वसमावेशक नाही.
एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची "खाजगी/सरकारी खर्चाने जाहीरात करून" तिला महत्व देण्याचा प्रयत्न करणे जगभर चालते. हे आपल्या देशाचे/देशातल्या व्यक्तीचे महत्व वाढविण्यासाठी पाश्चिमात्य देश करतात यात संशय नाही. महत्वाच्या रस्त्यांना / पुलांना / सरकारी संस्थांना / सरकारी योजनांना काही ठराविक व्यक्तींची नावे देणे हे सुद्धा याच सदरात येते... आणि या बाबतीत तर भारताचा हात धरणारा देश शोधणे कठीण जाईल.
मात्र, फक्त जाहिरात केली म्हणून एखादे ठिकाण जागतिक पर्यटनात सतत वर राहील आणि तेथे "स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून" पर्यटक जातील असे "वर्षानुवर्षे" होणे शक्य नाही. त्यासाठी काही वेगळ्या प्रकारची, व्यवासायीक का होईना पण, कल्पकता व नियोजन लागते... असे मला वाटते.
12 Sep 2016 - 9:27 am | जयन्त बा शिम्पि
आजच १२/०९/२०१६ च्या ' फ्री प्रेस जर्नल ' मध्ये बातमी वाचली कि, टाईम स्क्वेअर मध्ये एका नाविकाने जिचे चुंबन घेतले होते ती, ग्रेटा फ्राइडमॅन नावाची, स्त्री, न्युमोनिया होवुन, वयाच्या ९२ व्या वर्षी वारली. दुसरे महायुद्ध, १९४५ मध्ये संपल्यानंतर , नाविकाने तीचे चुंबन घेतांनाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यावेळी फार गाजला होता. जापानने शरणागती पत्करल्यानंतर, दुसरे महायुद्ध संपले. त्यावेळी अल्फ्रेड आयसेन्डॅट नावाच्या फोटोग्राफरने १४ ऑगस्ट १९४५ रोजी हा फोटो काढला होता. हा नाविक कोण होता आणि नर्सच्या वेषातील ही स्त्री कोण होती याबद्दल बरेच प्रवाद त्यावेळी निर्माण झाले होते. ' टाईम ' मासिकामध्ये , प्रकाशित झालेल्या ह्या फोटोतील व्यक्ती, आपणच आहोत,असा दावा ११ पुरुषांनी, तर फोटोतील महिला आपणच आहोत असा दावा तीन महिलांनी केला होता. त्या तिघांपैकी ग्रेटा फ्राइडमॅन ही एक होती.तिच्या म्हणण्यानुसार, १९६० पावेतो तिला ह्या फोटोबद्दल काहीच कल्पना नव्हती. १९६० पावेतो तिने हा फोटो पाहिलाच नव्हता. अल्फ्रेड आयसेन्डॅट ने १९६० मध्ये आपला अल्बम प्रकाशित केला, तेंव्हा तिने " टाईम " मासिकाकडे ह्या बाबत कळविले. सदर फोटोतील स्त्री आपणच आहोत, त्यावेळी अंगावर हाच पोषाख घातला होता. नाविक अतिशय ताकदीचा होता आणि त्याने घट्ट पकडून ठेवले होते.चुंबनाबाबत नक्की सांगता येत नाही. कुणीतरी (युद्ध संपल्याचा) आनंद व्यक्त करीत होता, त्यात रोमान्स वगैरे असं काहीही नवह्तं, असं तिचं म्हणणं होतं. ५ जुन १९२४ मध्ये ऑस्ट्रिया येथे तिचा जन्म झाला होता आणि एका डेंटीस्ट कडे ती सर्व्हिस करीत होती, म्हणुन अंगावर नर्सचा पांढरा ड्रेस होता असे तिने लिहिले होते. अल्फ्रेड आयसेन्डॅट ने मात्र फोटोतील सर्वच व्यक्तिंच्या नावांची कधीही नोंद ठेवली नव्हती. तो १९९५ मध्ये मरण पावला.
12 Sep 2016 - 9:42 am | जयन्त बा शिम्पि
उदया आम्ही " टाईम स्क्वेअर " ला व " स्टॅचु ऑफ लिबर्टी " ला भेट देण्यासाठी जाणार आहोतच. आमच्या साठी आज हे फोटो अगोदरच पहावयास मिळाले हे आमचे भाग्य. सुंदर माहिती व एकापेक्षा एक छान छान फोटो. अत्यंत आभारी आहे.
अजुन चार महिने वास्तव्य आहे, तोपर्यंत डॉक्टर साहेब, जे जे पाहातील, तिकडे आम्ही सुद्धा जावून पहाणार आहोत. धन्यवाद डॉक्टर सुहास म्हात्रेजी.
14 Sep 2016 - 1:23 am | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! बरेच दिवस वास्तव्य आहे तुमचे. म्हणजे आमच्यासारखे चवीने न्यू यॉर्क पहायला मिळेल ! तुमच्या उत्तम भटकंतीसाठी शुभेच्छा !
12 Sep 2016 - 5:53 pm | पाटीलभाऊ
मस्त वर्णन आणि फोटो...प्रत्यक्षात टाइम्स स्क्वेअर ला आहे असा वाटतंय..1
12 Sep 2016 - 11:57 pm | निशाचर
टाईम्स स्क्वेअरची मस्त ओळख!
प्रत्येक भागावर प्रतिक्रिया देणं नाही जमलं तरी वाचणार नक्की.
13 Sep 2016 - 11:18 am | वेल्लाभट
अप्रतिम!
14 Sep 2016 - 8:19 am | सुधीर कांदळकर
सिट स्ट्रीटची कल्पना अफलातून आहे. अमेरिकन डोंबारी पण झकास.
धन्यवाद.
24 Mar 2017 - 12:28 pm | जव्हेरगंज
अद्भुत !!!