न्यू यॉर्क : ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
29 Mar 2017 - 10:32 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

मॅनहॅटनच्या गगनचुंबी इमारतींपासून ते क्वीन्समधील हिरळींनी वेढलेली आधुनिक विशाल टाऊनहाऊसेस आणि त्या दोन टोकांच्या मध्ये असलेल्या अनेक शैलीतल्या आधुनिक इमारती या शहरात दाटीवाटीने नांदत आहेत. न्यू यॉर्क शहर तर, सतत कात टाकत नवनवीन रूप धारण करणार्‍या महानगरांच्या यादीत, बहुदा पहिल्या क्रमांकावर असावे. किंबहुना, याच सतत पुनर्निर्माण आणि नवीनिकरण करण्याच्या ध्यासासाठी हे शहर जगप्रसिद्ध आहे. अश्या महानगरांचा जसजसा विकास होत जातो तसतशा त्यांच्या भूमीवरच्या जुन्या काळाच्या साक्षीदार असलेल्या रहिवासी इमारती नष्ट होत जातात. जगातल्या बहुतेक शहरांतील शतकभरापेक्षा जास्त जुन्या रहिवासी इमारती आता केवळ प्रकाशचित्रांच्या रूपानेच शिल्लक उरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, येथे दोन शतकांपेक्षा जास्त जुने खाजगी घर अजूनही अस्तित्वात आहे... आणि मुख्य म्हणजे ते मॅनहॅटनचा उत्तर भाग शेतीवाडीने व्यापलेला ग्रामीण भाग असताना बांधलेले "फार्महाउस" आहे हे कळले तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. जालावरून अधिक माहिती काढली तर असे कळले की, ते फार्महाउस "डिक्मान फार्महाउस म्युझियम" या नावाने जनतेला पाहण्यास खुले आहे. मग तर त्याला भेट देणे अपरिहार्यच झाले !

जर्मनीमधील वेस्टफालिया (Westphalia) येथून विल्यम डाईकमानने १६६१ मध्ये अमेरिकेत स्थलांतर केले. १७४८ मध्ये त्याने मॅनहॅटनच्या पूर्वकिनार्‍यावर हार्लेम नदीकिनारी घर बांधले. अमेरिकन यादवी युद्धात ते नष्ट झाल्याने त्याने, १७८५ साली, त्याच्या २५० एकर शेतीवाडीवर, सद्याच्या जागी, हे फार्महाउस बांधले. हे घर न्यू यॉर्क शहरामधील सर्वात जुनी वास्तू आहे आणि डच वसाहत शैलीत बांधकाम असलेले एकुलते एक घर आहे. डाईकमानच्या मालमत्तेपैकी, ब्रॉडवे आणि २०४वा स्ट्रीट यांच्या चौकाला लागून असलेला, "फार्महाउस आणि त्याच्या आजूबाजूचे काही आवार" इतकाच भाग आता संग्रहालयाच्या रूपाने बाकी राहिला आहे. बाकी इतर सर्व जागा शहरी इमारतींनी गजबजून गेली आहे.

  
  
डिक्मान फार्महाउसची जुनी प्रकाशचित्रे (सन १८७५, १८९०, १८९० व १९३४) (जालावरून साभार)

अनेक डाईकमान पिढ्यांनी वापर केल्यानंतर, हे घर १८६८ मध्ये विकले गेले. नवीन मालकाने ते अनेक दशके भाड्याने देण्यासाठी वापरले. दुर्लक्ष झाल्याने ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ते मोडकळीला आले. ते नष्ट होऊ नये यासाठी डिक्मान कुटुंबातील मेरी आणि फॅनी नावाच्या दोन भगिनींनी त्याची १९१५ मध्ये परत खरेदी केली आणि फॅनीच्या अलेक्झांडर नावाच्या आर्किटेक्ट असलेल्या नवर्‍याच्या मदतीने त्याचा जीर्णोद्धार करून ते १९१६ मध्ये न्यू यॉर्क शहराला दान केले. या इमारतीत डिक्मान कुटुंबाच्या मालकीच्या, डच कोलोनियल जीवनात वापरल्या जाण्यार्‍या, वस्तूंचे संग्रह आहेत.

आम्ही राहत होतो ब्रॉडवे, बेनेट अ‍ॅव्हन्यू आणि १९२व्या रस्त्यांच्या संगमावर. तेव्हा, ब्रॉडवे आणि २०४वा स्ट्रीट यांच्या चौकाला लागून असलेले हे घर, आमच्या संध्याकाळच्या ब्रॉडवेच्या अनेक फेरफटक्यांमध्ये कसे दिसले नाही, असा प्रश्न साहजिकपणे मनात आला. पण, जेव्हा त्या फार्महाउसचा फोटो मी जालावर पाहिला तेव्हा ध्यानात आले की, हे घर आपण बघितले आहे आणि "उंच इमारतींच्या गर्दीत दिसलेले एक जुन्या शैलीतले बसके घर" म्हणून त्याचा फोटोही काढला आहे !...


डिक्मान फार्महाउसचा आजचा अवतार ०१


डिक्मान फार्महाउसचा आजचा अवतार ०२

मूळ घराचा अनेकदा जीर्णोद्धार होत होत या घराचा सद्द्याचा अवतार बनलेला आहे. तरीही त्याच्या मूळ रूपाला फार मोठा धक्का न लावण्याची काळजी घेतलेली आहे. फिल्डस्टोन प्रकारचा दगड, विटा व लाकूड वापरून बांधकाम केलेल्या या इमारतीला पुढे-मागे उतरते छप्पर (gambrel roof) आहे व पुढे-मागे सर्व लांबीभर व्हरांडे आहेत. पावसाचे पाणी व्हरांड्यांत येऊ नये यासाठी छपराला पन्हळी (spring eaves) आहेत. तळघर व दोन मजले असलेल्या या घरात पॅसेजेसनी जोडलेल्या अनेक बसण्याच्या खोल्या (parlors, सिटिंग रूम्स, हॉल) आणि झोपण्याच्या खोल्या आहेत. हिवाळ्यात वापरायचे एक स्वयंपाकगृह (winter kitchen) मुख्य इमारतीत आहे, तर मागच्या परसात, एका स्वतंत्र छोट्या इमारतीत, उन्हाळ्यात वापरायचे दुसरे स्वयंपाकगृह (smokehouse-summer kitchen) आहे.


इमारतीच्या आराखड्याचा उभा काप (व्हर्टिकल सेक्शन)

या संग्रहालयाला १९६७ पासून New York City Landmark व National Historic Landmark असा दर्जा मिळालेला आहे. अनेक टीव्ही मालिकांत याचे चित्रण आलेले आहे.

***************

एका सकाळी न्याहारी आटपून घरापासून चालत १५-२० मिनिटांच्या अंतरावर असलेला हा न्यू यॉर्कचा जिवंत इतिहास पहायला आम्ही निघालो. या संग्रहालयाकडे ब्रॉडवेच्या पदपथावरून जायचे किंवा त्याला लागून असलेल्या फोर्ट ट्रायॉन पार्कमधिल पायवाटेने जायचे असे दोन विकल्प होते. अर्थातच, आम्ही दुसरा मार्ग निवडला. उन्हाळ्याच्या दर आठवड्याला नवनवीन फुलोर्‍यांनी सजणार्‍या त्या पायवाटेने आमचे स्वागत करण्यात या वेळेसही कसर सोडली नव्हती...



  
संग्रहालयाच्या दिशेने नेणार्‍या फोर्ट ट्रायॉन पार्कममधिल पायवाटेवरचे फुलोरे

ब्रॉडवेच्या पदपथाला लागून असलेल्या दहाएक पायर्‍या चढून वर गेल्यावर फार्महाऊसच्या आवारात प्रवेश केला. सर्वात प्रथम पुरुष-दीडपुरूष उंचीची मोहरीची हिरवी-पिवळी लागवड समोर आली...


फार्महाउसच्या पुढच्या आवारातील मोहरीची लागवड

मोहरीच्या लागवडीच्या वाफ्याच्या उजवीकडून, बाजूच्या फुलझाडांनी सुशोभित असलेली विटांची पायवाट आपल्याला घराच्या दर्शनी भागातील पडवीवर नेणार्‍या लाकडी पायर्‍यांकडे घेऊन जाते...

  
विटांची पायवाट आणि फार्महाउसच्या दर्शनी भागातील पडवीवर नेणार्‍या लाकडी पायर्‍या

पायर्‍या चढून वर गेल्यावर आपण लाकडी जमीन असलेल्या पडवीत येतो. पडवीला पुढच्या पायर्‍या सोडून सर्व लांबीभर आणि एका बाजूला पूर्ण कठडा आहे, तर दुसर्‍या बाजूला बागेत उतरून जाण्यासाठी लाकडी पायर्‍या आहेत. इमारतीची पुढची पूर्ण भिंत दगडी आहे. विटांनी बनलेला पृष्ठभाग व दरवाजे-खिडक्या सोडल्या तर इतर इमारतीच्या सर्व बाह्य दगडी आणि लाकडी पृष्ठभागाला पांढरा रंग दिलेला आहे...

  
पुढची पडवी

भरभक्कम लाकडी मुख्य दरवाजा ढकलून आत गेल्यावर पुढच्या-मागच्या पडव्यांना जोडणार्‍या घराच्या पूर्ण लांबीभर असलेल्या पॅसेजमध्ये आपण येतो. तेथे बसलेल्या एका शाळकरी वयाच्या स्वयंसेवक स्वागतिकेने स्वागत करून घराची प्राथमिक ओळख करून दिली आणि आम्हाला तेथे मुक्तपणे फिरून घर बघायला सांगितले.

मुख्य दरवाज्याजवळच असलेले, पॅसेजच्या उजवीकडचे एक दार आपल्याला एका दिवाणखान्यात नेते. तेथे घर उबदार ठेवण्यासाठी थंड प्रदेशात जुन्या काळी वापरली जाणारी चिमणी, भिंतीतील जुनी कपाटे आणि काही लाकडी खुर्च्या होत्या. या दिवाणखान्याचा माहितीसदन असा उपयोग केलेला होता. टेबलांवर अनेक माहिती पत्रके ठेवलेली होती. एका मोठ्या टेबलावर लेगोचे तुकडे वापरून फार्महाउसची प्रतिकृती बनवलेली होती...


पॅसेजच्या उजवीकडील दिवाणखाना ०१


पॅसेजच्या उजवीकडील दिवाणखाना ०२ : फार्महाउसचे मॉडेल

जुन्या डच शैलीतल्या जांभळ्या रंगाच्या सहा टाइल्स मिळून बनवलेली १८१५ सालची दोन चित्रे (Delft tile panel) इथे ठेवलेली आहेत. त्यांच्यामध्ये नेदरलंडमधिल त्या काळाच्या जीवनाचे चित्रण आहे. अश्या चित्रांनी घरे सजवण्याची फॅशन त्या काळच्या सधन लोकांत होती. चित्रांच्या बाजूला शेतीवाडीत उपयोगात आणली जाणारी घोड्यांचे नाल, हुक्स, इत्यादी उपकरणे आहेत...

  
पॅसेजच्या उजवीकडील दिवाणखाना ०३ : डच टाइल्सनी बनवलेली चित्रे आणि शेतकीच्या कामाची उपकरणे

पॅसेजच्या डाव्या बाजूला, पहिल्या दिवाणखान्याच्या विरुद्ध दिशेला अजून एक दिवाणखाना आहे. हा जरा जास्त भारदस्त आहे. चिमणी, जमिनीवरचा रंगीत लोकरीचा गालिचा, काळ्या लॅकरचा लेप असलेल्या बैठकीला गादी लावलेल्या खुर्च्या, दोन लाकडी टेबले, कोपर्‍यात एक मोठे लंबकाचे घड्याळ, खणांची सोय असलेले एक लिखाणकामाचे (रायटिंग) डेस्क, इत्यादी बराच जामानिमा या दिवाणखान्यात बघायला मिळतो. मध्यभागात ठेवलेल्या टेबलावर, जुन्या काळचे एक वर्तमानपत्र (द न्यू यॉर्क कोलंबियन, ऑक्टोबर ८, १८९८ ची आवृत्ती), खेळण्याचे पत्ते आणि काही पत्रके ठेवली होती...


पॅसेजच्या डावीकडील दिवाणखाना ०१


पॅसेजच्या डावीकडील दिवाणखाना ०२

पॅसेजमधून थोडे पुढे गेल्यावर एक छोटेखानी झोपण्याची खोली दिसली. आकार लहान असला तरी आतला बिछाना, खुर्ची, एका गोल टेबलावरची रचना, इत्यादी व्यवस्था सधनता दाखवणारी होती...


तळमजल्यावरील झोपण्याची खोली

पॅसेजच्या भिंतीवरच्या एका काचेच्या कपाटात फार्मवर वापरली गेलेली भांडी व इतर काही गोष्टी होत्या...


फार्मवर वापरली गेलेली भांडी

तळमजला पाहून झाल्यावर पॅसेजला लागून असलेल्या पायर्‍या उतरून गेल्यावर आपण तळघरातल्या थंडीच्या दिवसांत वापरल्या जाणार्‍या स्वयंपाक घरात उतरतो. तेथे भिंतीमधील एका खाचेत, सूप आणि कॅसरोल शिजविण्यासाठी आणि गरम ठेवण्यासाठी, काहीशी बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडी शिजविण्याच्या प्रणाली सारखी, व्यवस्था दिसली !...


तळघरातले थंडीच्या दिवसांत वापरायचे स्वयंपाकघर ०१

ही जागा रोजच्या जेवणात वापरायचे मांस, भाज्या आणि फळफळावळ निवडणे, साठवणे व शिजविणे यासाठी वापरली जात असे. यासाठी डिक्मान कुटुंबाकडे दोन गुलाम असल्याची नोंद तिथल्या माहितीपत्रकात वाचायला मिळाली. त्यासाठी जरूर असणारी डिक्मान कुटुंबाने वापरलेली टेबले, फडताळे, भांडी, तबके, इत्यादी सामग्री तेथे आहे. त्यापैकी छताला टांगलेल्या एका आकर्षक नक्षीदार दिव्याने लक्ष वेधून घेतले...

  
  
  
तळघरातले थंडीच्या दिवसांत वापरायचे स्वयंपाकघर ०२

तळघरातून तळमजल्यावर येऊन मग पहिल्या मजल्यावर जाताना, जिन्याच्या भिंतींवर फार्महाउसचे वेगवेगळ्या कालखंडांत काढलेले फोटो, तेथे वापरल्या गेलेल्या वस्तूंची चित्रे आणि नवनिर्माण करताना त्याच्या परिसरात सापडलेल्या गोष्टींचा एक छोटासा चित्रमय इतिहास बघायला मिळतो. भरतकाम करून काढलेले फार्महाउसचे एक सुंदर चित्रही तेथे आहे...


फार्महाउसचा चित्रमय इतिहास


भरतकाम करून काढलेले फार्महाउसचे चित्र

तिरके छप्पर असल्याने पहिल्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांच्या एका बाजूचे छप्पर तिरके आहे. कोंकणातल्या जुन्या घरांत अश्या तिरक्या छपरांच्या पोटमाळ्यांचा उपयोग आंबे, कांदे, तांदूळ, जुन्या किंवा नेहमीच्या वापरात नसलेल्या वस्तू, इत्यादी साठवून ठेवण्यास केला जातो. इथे मात्र त्यांचा नेहमीच्या वापराच्या, झोपण्याची खोली व बैठकीच्या खोली, यासारखा उपयोग केलेला दिसतो.

झोपायच्या खोलीतले प्रिंटेड कापड वापरून गोधडीसारखे हाताने शिवलेले बेड कव्हर आणि त्या काळाचा चिनी मातीचा टी सेट पाहण्यासारखे होते. तेच, चारखांबी पलंगाच्या, खुर्च्या-टेबलांच्या नजाकतीबद्दल आणि फार्महाउसमधिल स्त्रियांच्या वेशांबद्दल म्हणता येईल. तेथिल वस्तूंवरून, हे कुटुंबप्रमुखाचे मास्टर बेडरूम असल्याचे प्रतीत होत होते...


वरच्या मजल्यावरचे मास्टर बेडरूम ०१

  
  
वरच्या मजल्यावरचे मास्टर बेडरूम ०२

इथल्या बैठकीची खोलीतले फर्निचरही इतर खोल्यांपेक्षा उच्च दर्जाचे आहे...

  
    
वरच्या मजल्यावरची बैठकीची खोली

या फार्महाउसमध्ये आणि शेतीवाडीवर वापरलेल्या अनेक वस्तू वरच्या मजल्यावरच्या पॅसेजमध्ये काचेच्या आवरणात जपून ठेवलेल्या आहेत...

  
वरच्या मजल्यावरच्या पॅसेजमध्ये ठेवलेल्या जुन्या वस्तूंचे संग्रह

परत तळमजल्यावर येऊन पॅसेजमधून इमारतीच्या मागच्या पडवीमध्ये गेल्यावर फार्महाउसचे मागचे आवार दिसते. मध्यम आकाराच्या या आवारात हिरवळ, भाज्या पिकवण्याची जागा (किचन गार्डन) आणि लहान आकाराच्या काही स्वतंत्र इमारती आहेत. त्यापैकी उन्हाळी स्वयंपाकघर एक आहे...


मागच्या पडवीतून दिसणार्‍या मागच्या आवाराचा काही भाग

  
मागच्या आवारातले उन्हाळी स्वयंपाकघर व किचन गार्डन

मागच्या आवारात एक खास इमारत आहे, तिचे नाव आहे हेसियन हट (Hessian Hut). अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामध्ये (१७७५-१७८३), अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध लढण्यासाठी, ब्रिटनने जर्मनीच्या प्रिन्स फ्रेडरिक (दुसरा) बरोबर करार करून ३०,००० जर्मन सैनिक अमेरिकेत आणले. यातल्या बहुतांश सैनिकांची मायभूमी जर्मनीतली हेसन-कासेल (Hessen Kassel) नावाची जागा होती. त्यामुळे, त्या सैनिकांना "हेसियन्स" असे नाव मिळाले. युद्ध संपल्यावर यातले अनेक सैनिक अमेरिकेच्या पेन्सिल्वानिया आणि मेरिलँड या राज्यांत स्थायिक झाले.

युद्धकालात जेव्हा ब्रिटिशांचा न्यू यॉर्कवर ताबा होता तेव्हा त्यांनी डिकमान फार्मपैकी बरीच जमीन ताब्यात घेऊन तेथे यातील काही सैनिकांना राहण्यासाठी साठ छोटी घरे बनविली. त्यांच्या विशिष्ट बांधणीमुळे त्यांना हेसियन हट असे नाव पडले. बराच काळ विस्मृतित गेलेल्या या जागेवर, १९१४ साली रेजिनाल्ड पेलहॅम बोल्टन नावाच्या एका हौशी पुरातत्त्वज्ञाला, हेसियन हट्सचे अवशेष सापडले. १९१५ मध्ये त्याने इथे उत्खनन करून मिळालेले अवशेष वापरून एक पूर्णावस्थेतील हेसियन हट उभी केली.


मागच्या आवारातली हेसियन हट

१९१६ सालापासून जनतेला खुले झालेले डिक्मान फार्महाउस संग्रहालय, त्याच्या परिसरातल्या नागरिकांसाठी वर्षभर सतत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माहितीवर्धक कार्यक्रम आयोजित करत असते. आम्ही मागच्या आवारात फिरत असतानाच, तेथे उभारलेल्या एका तात्पुरत्या तंबूखाली मुलांना चित्रकलेचे धडे देणारे एक छोटे शिबिर सुरू झाले होते...


फार्महाउसच्या मागच्या आवारात तात्पूरता तंबू उभारून चालू असलेले चित्रकला शिबिर


फार्महाउसच्या हिरवळीवर चालू असलेली नागरिकांची एक सभा (जालावरून साभार)

जालावरच्या माहितीत असे सुद्धा कळले की हे संग्रहालय उत्तम अवस्थेत ठेवण्यामागे परिसरातले अनेक तरुण स्वयंसेवक सतत झटत असतात...


स्वयंसेवक संग्रहालयाच्या सफाईचे काम करताना (जालावरून साभार)

शहरांच्या प्रसरणात, आघुनिकीकरणाच्या ओघात आणि आर्थिक समिकरणांच्या शक्तीपुढे, जुन्या ग्रामीण संस्कृतीचे नष्ट होणे, हा जगभर पहायला मिळणारा परिणाम आहे. त्यामुळे, अमेरिकेतील सर्वात मोठ्या महानगराच्या काँक्रिट जंगलात दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास जपत उभ्या असलेल्या या फार्महाउसला भेट देणे हा नक्कीच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक अनुभव होता !

शहराचा वरवरचा आधुनिक, चकचकीत, मोहक मुलामा खरवडून, त्याच्या खालचे असे रोजच्या जीवनातले सत्य बघायला मिळाले की, "तात्पुरते वैयक्तिक हितसंबंध बाजूला सारून, आपला इतिहास आणि आपली खरी ओळख दाखवणार्‍या खाणाखुणा जपण्याची", सधन असलेल्या-नसलेल्या सर्व नागरिकांची हातात हात घालून चाललेली धडपड अचानक समोर येते. एखाद्या जागेचे असे वैशिष्ट्यपूर्ण स्वत्व दाखविणारे रूप पहायला मिळाले की माझा भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Mar 2017 - 3:08 pm | प्रचेतस

हा भागही सुंदर.

एक वेगळेच ठिकाण पाहिल्याचा आनंद.

पद्मावति's picture

30 Mar 2017 - 4:17 pm | पद्मावति

+१
खरय.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2017 - 8:21 pm | पिलीयन रायडर

काकांनी २-३ महिन्यात इतकं काही पाहिलंय जे लोक २-३ वर्ष राहुनही पहात नाहीत! बरं, नुसतं पहाणं नाही तर त्यामागचा इतिहास, त्याची इतर माहिती, फोटो.. सगळं अगदी व्यवस्थित!

हा ही भाग उत्तमच काका!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2017 - 4:17 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

जगप्रवासी's picture

1 Apr 2017 - 11:16 am | जगप्रवासी

तुमच्या भटकंतीचं एक पुस्तक लिहाचं. खूप तपशीलवार असतात तुमचे लेख.

इस्पिकच्या एक्क्याचा डायहार्ड पंखा

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2017 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

तुमच्यासारख्यांना आवडते म्हणूनच लिहायला हुरूप येतो.

पैसा's picture

1 Apr 2017 - 11:54 am | पैसा

आवडले

चौकटराजा's picture

2 Apr 2017 - 5:44 pm | चौकटराजा

कोणत्याही प्रवाशास अनुभवाची भूक असावी लागते. नाहीतर फक्त वाटसरू एवढाच दर्जा त्याला मिळतो. विविध क्षेत्रातील अनुभवांची आवड असणारा प्रवासी भवती असणार्या अनेक गोष्टी कुतुहलाने पहातो. ही द्रुष्टी व वृत्ती असणारे डॉ साहेब मिपावर आहेत हे आपले भाग्यच. न्यूयार्क म्हणजे फक्त मॅनहटन समोरील जेटी व स्कास्क्रेपर्सचे जंगल नव्हे हे शोधून काढणारा भारतीय कोलंबस म्हणजे म्हात्रेजी. लेखातील स्केचेस आवडली. माझ्या आठवणी प्रमाणे भरत कामाच्या माध्यमातून काढलेले एक धबधब्याचे सुरेख चित्र मुंबईच्या संग्रहालयात आहे. त्याची आठवण झाली.

सुर्रेख! इतके तपशीलवार वर्णन आणि प्रचि दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
किती उत्तम रीत्या जपलेय सगळे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2017 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

राघवेंद्र's picture

6 Apr 2017 - 2:32 am | राघवेंद्र

तुमची ट्रिप पाहुन , मी न्यू यॉर्क पासुन खूप दूर राहतो आणि मला न्यू यॉर्क काहीही माहित नाही असे मला सांगावे लागेल