न्यू यॉर्क : ३१ : सेंट बार्टचे चर्च

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
1 Mar 2017 - 12:10 am

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

पाश्चिमात्य देशांची जरा निगुतीने केलेली फेरी तेथील महत्त्वाची धार्मिक-सामाजिक संस्कृतीची प्रतीके असलेली चर्चेस पाहिल्याशिवाय पुरी होत नाही. मुख्यतः धार्मिक उद्येशाने स्थापन केलेली असली तरी बर्‍याच महत्वाच्या पाश्चिमात्य चर्चेसनी स्थानिक सामाजिक-राजकीय-कलाजीवनाच्या विकासात मोठा सहभाग घेतला आहे. त्यामुळे न्यू यॉर्क शहरातली काही चर्चेस आकर्षणांच्या यादीत होतीच. त्यापैकी सेंट बार्टच्या चर्चची, मिपाकर पिलियन रायडर यांच्याबरोबरच्या बोलण्यात, स्तुती ऐकली होती, त्यामुळे त्याचा चर्चच्या यादीत सहाजिकच पहिला क्रमांक आला.

या चर्चचे पूर्ण नाव "St. Bartholomew's Episcopal Church" असे आहे. हे मुळातले Evangelical म्हणजे स्वत:ला कॅथॉलिक समजणार्‍या प्रोटेस्टंट लोकांचे चर्च आहे. या चर्चची इमारत पाहण्यासारखी आहे आणि तेथील रविवारचा प्रार्थनासमारंभ सर्व लोकांसाठी खुला असतो असे कळले होते. त्यामुळे या दुहेरी फायद्याचा लाभ घेण्याच्या उद्येशाने एक रविवार गाठून त्याला भेट दिली.

या चर्चची सुरुवात १८३५ साली सद्याच्या जागेपासून दूर ग्रेट जोन्स स्ट्रीट आणि लाफाएत प्लेस यांच्या चौकातल्या एका छोट्या इमारतीच्या स्वरूपात झाली. मात्र, १९व्या शतकाच्या शेवटच्या भागात अमेरिकेत येणार्‍या स्थलांतरितांच्या लोंढ्यांमधले बरेच जण न्यू यॉर्क शहर आणि परिसरात स्थायिक झाले. हे लोक, साहजिकच, आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते आणि त्यांच्या पहिल्या कठीण काळात या चर्चने त्यांना खूप आधार दिला. या कामामुळे हे चर्च चांगले नावारूपाला येऊन मॅडिसन अ‍ॅव्हन्यू आणि ४४व्या स्ट्रीटच्या चौकात एक भव्य इमारत बांधण्याइतके सधन झाले. या कामात त्याला सधन वँडरबिल्ट कुटुंबाची बरीच मदत झाली.

   
   
सेंट बार्टच्या चर्चच्या इमारतींची १८३५ ते १९७२ या कालखंडामधील स्थित्यंतरे

या काळात चर्चने न्यू यॉर्क शहराच्या संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले होते. लिओपोल्ड स्टॉकोवस्कीला खास युरोपातून बोलवून घेऊन चर्चच्या कॉइरचे निर्देशन त्याच्या हाती सोपविले गेले. पुढे स्टॉकोवस्कीची गणना जगातल्या सर्वोत्तम संगीत मार्गदर्शकांपैकी (one of the world’s greatest conductors) होऊ लागली. या चर्चच्या कलाकारांचे सर्वांना खुले असलेले सार्वजनिक संगीत कार्यक्रम खूप लोकप्रिय आहेत.

काही काळाने इमारत मोडकळीला आल्याने १९१८ मध्ये चर्च परत एकदा हलवून सद्याच्या ५०-५१व्या स्ट्रीटच्या जागी बांधलेल्या नवीन इमारतीत आणले गेले. या रोमनस्क शैलीत बांधलेल्या इमारतीत जुन्या इमारतीचे काही अवशेष सामील केले गेले आहेत. या काळात आर्थिक स्थिती भक्कम असल्याने इमारतीचा बहिर्भाग आणि अंतर्भाग बायझांटाईन (पूर्व रोमन साम्राज्य) शैलीमध्ये सुशोभित केलेला आहे. न्यू यॉर्क शहराच्या वाढत्या पसार्‍याबरोबर इथला बसक्या घरांचा परिसरही बदलून १९२० पर्यंत अपार्टमेंट व ऑफिस बिल्डिंग्जनी गजबजून गेला आणि नंतर १९६० पर्यंत गगनचुंबी व्यापारी इमारतींनी भरून गेला. भरपूर आर्थिक फायद्याच्या वायद्यांवर या चर्चच्या मालकीच्या जागांवर गगनचुंबी इमारती बांधण्याच्या प्रस्तावांची प्रलोभने नाकारत हे चर्चची इमारत मात्र आहे तेथेच उभी आहे.

या इमारतीला १९६७ साली "न्यू यॉर्क सिटी लँडमार्क" आणि ३१ ऑक्टोबर २०१६ ला "नॅशनल हिस्टॉरिक लॅंडमार्क" असे किताब मिळाले आहेत.

चर्चचे रविवारचे कार्यक्रम सकाळी आठ वाजता सुरू होतात असे जालावरून समजले होते. या अगोदर चर्चमधला प्रार्थनेचा कार्यक्रम पाहिला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. तेथे वेळेआधी पोचावे अश्या अंदाजाने घरून लवकरच निघालो. १ सबवेच्या ५० स्ट्रीट थांब्यावर पोहोचून गगनचुंबी इमारतींच्या भाऊगर्दीतून वाट काढत तेथून साधारण १५ मिनिटे दूर असलेल्या चर्चकडे निघालो. वाटेत हे लंबूटांग महाशय आकाशाकडे पाहत काहीतरी शोधत असताना दिसले...

   
गगनचुंबी इमारतींची भाऊगर्दी आणि त्या गर्दीतून आकाशाकडे पाहणार्‍या व्यक्तीचे "लुकिंग अप" नावाचे शिल्प

हे आकाशाकडे पाहणार्‍या व्यक्तीचे "लुकिंग अप" नावाचे शिल्प १०.१५ मीटर (३३.३ फूट) उंच आहे. अल्युमिनियमच्या भांड्यांना चिरडून त्यांचे मोल्ड बनविणे आणि त्यांचा वापर करून स्टीलची शिल्पे बनवण्याचे तंत्र वापरून टॉम फ्रिडमान या शिल्पकाराने बनवलेल्या अनेक शिल्पकृती अमेरिकाभर विखुरल्या आहेत. त्यापैकी ही एक आहे. या अनवट शिल्पकृतीचे कुचमुचलेला, गोंडस, आशावादी (awkward, loveable, hopeful), इत्यादी अनेक विशेषणांनी वर्णन केले जाते.

तेथून थोडे पुढे गेल्यावर आधुनिक गगचुंबी इमारतींच्या गर्दीमध्ये आपल्या शैलीच्या वेगळेपणामुळे नजरेत भरणारी चर्चची इमारत समोर आली. चारी बाजूला वाढलेल्या आधुनिक काँक्रिट जंगलामुळे या चर्चची इमारत जराशी बसकी वाटून झाकोळली जात असली तरी तिच्या प्राचीन शैलीचा भारदस्तपणा लपून राहत नाही...



सेंट बार्टच्या चर्चचे प्रथमदर्शन

चर्चच्या समोरची जागा आणि पदपथ फुलझाडांनी सुशोभित केलेले होते...


चर्चच्या समोरची सजावट

जवळ गेल्यावर इमारतीच्या दर्शनी भिंतीवरची धार्मिक चिन्हे व प्रसंग दर्शविणारी रोमनस्क शैलीतली कलाकुसर स्पष्ट होऊ लागली...


चर्चचा दर्शनी भाग ०१


चर्चचा दर्शनी भाग ०२ : शिल्पपट्टीका

आत शिरल्यावर स्वागतगृहाला ओलांडून पुढे गेल्यावर आपण मुख्य प्रार्थनागृहात प्रवेश करतो. या उंच्यापुर्‍या दालनाच्या स्थापत्याबरोबरच तेथील नीटनेटकेपणा, शिस्तीने रांगेत मांडलेल्या खुर्च्यांची टापटीप आणि काटेकोर स्वच्छता लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही...


मुख्य प्रार्थनागृह

प्रार्थनागृहातील अर्धगोलाकार गर्भगृहातली संगमरवरी वेदी (अल्टार, altar) रेशमी कापडाने सजवलेली होती. बाजूला धार्मिक प्रवचनासाठी माईकसह व्यासपीठ तयार होते आणि त्याच्या बाजूला एक पियानो वादकाच्या प्रतीक्षेत उभा होता. एकंदरीत सर्व तयारी झालेली होती. पण त्यांचा उपयोग करणारे अजून आले नव्हते. त्याचा फायदा घेऊन आम्ही ती सगळी व्यवस्था जवळून निरखून घेतली. अल्टार्सभोवतीच्या उत्तम पॉलिश केलेल्या अर्धगोलाकार संगमरवरी भिंतीवर संगमरवराच्या तुकड्यांच्या कोलाजने नक्षी काढलेली आहे. गर्भगृहाच्या अर्धगोलाकार छतावर संतगणांच्या मध्यभागी येशू ख्रिस्ताचे रंगीत चित्र आहे. गर्भगृहाच्या प्रदर्शनी भागावरच्या अर्धगोलाकार नक्षीदार कमानीमध्ये फुलेपानांच्या नक्षीत मध्येमध्ये धार्मिक चिन्हे आहेत. कमान दोन्ही बाजूंनी सरळसोट खाली उतरताना मात्र तिच्यावर फक्त पानाफुलांची नक्षी आहे. कमानिच्या आतल्या दोन्ही बाजूला रोमन शैलीतले प्रत्येकी तीन सडपातळ गोलाकार खांब (कोलोनेड) आहेत...


अल्टारच्या छतावरची कलाकुसर


अल्टारच्या भिंती व दर्शनी भागावरची कलाकुसर

अल्टारजवळून मागे वळून पाहिले की प्रार्थनागृहाच्या समोरच्या भिंतीची आतली बाजू दिसते. इतर भागांइतकाच हा भागही प्रभावीपणे सजवलेला आहे. एका भव्य कमानीखाली रंगीत काचांच्या नक्षीने सजलेल्या पाच उंच खिडक्या आहेत. त्यांच्याखालील भागात उत्तम पॉलिश केलेल्या सागवानी लाकडावर काढलेल्या नक्षीने सजलेल्या खिडक्यांसारख्या दिसणार्‍या दहा कमानी आहेत. त्यांच्या खालच्या भागात, प्रत्येक बाजूला असलेल्या तीन रोमन स्तंभांच्या (कोलोनेड) मध्यभागात प्रवेशद्वार आहे. आत शिरताना, मध्यभागातील बसण्याची व्यवस्था आणि नाकासमोर असलेल्या गर्भगृहाने लक्ष वेधून घेतल्यामुळे, नजरेला न आलेल्या प्रार्थनागृहाच्या दोन्ही बाजूला असलेल्या कमानी आणि त्यांना तोलून धरल्यासारखे दिसणारे दुहेरी रोमन खांब आहेत. त्या कमानींवरच्या असलेल्या मजल्यावरच्या निरीक्षण गॅलर्‍या आणि गॅलर्‍यांत असलेल्या कमानीही आपले लक्ष वेधून घेतात...


अल्टारजवळून मागे वळून पाहिले की दिसणारी प्रार्थनागृहाच्या समोरच्या भिंतीची आतली बाजू


प्रार्थनागृहाच्या समोरच्या भिंतीवरील आतल्या बाजूने दिसणार्‍या रंगीत काचांच्या खिडक्या


प्रार्थनागृहाच्या घुमटाकारात बसवलेली रंगीत काचांची नक्षी

मुख्य प्रार्थनागृहाच्या बाजूच्या भिंतीतील खिडक्यांमधील, धार्मिक प्रसंग चित्रित करणारी रंगीत काचांची नक्षी, हे अनेक चर्चेसमध्ये दिसणारे वैशिष्ट्य येथेही प्रकर्षाने उठून दिसत होते...

    
  
रंगीत काचांची नक्षी असलेल्या खिडक्या

प्रार्थनागृहातल्या कार्यक्रमाला थोडा वेळ असल्याने प्रार्थनागृहाला लागूनच असलेल्या दालनात असलेले मंदिर (चॅपल) पहायला गेलो. चॅपलच्या भिंतींवरची कलाकुसर पाहण्याजोगी होती. चॅपलचा रस्त्यावर उघडणारा दरवाजा पूर्णपणे तांब्याचा बनवलेला आहे व तो चर्चच्या जुन्या इमारतीच्या बांधकामातून काढून आणलेला आहे. वातावरणाच्या परिणामाने हिरवी पुटे चढलेला तो जुनाट दरवाजा चर्चला प्राचीनतेची झलक देतो...


मंदिर (चॅपल)

   
चॅपलचे गर्भगृह (अल्टार) आणि जुन्या काळच्या इमारतीतून आणलेला तांब्याचा बाह्यदरवाजा

थोड्यावेळाने प्रार्थनागृहात परतलो तेव्हा भाविक जमले होते आणि चर्चचे धर्माधिकारी त्यांच्या जागेवर स्थानापन्न झालेले होते. आमच्या हाती दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे एक धार्मिक प्रवचन झाले. हे एक गंभीर प्रकरण असेल असे वाटले होते. पण, प्रवचन नेहमीच्या वापरातल्या खेळीमेळीच्या भाषेत आणि विनोदी वचनांनी भरलेले होते. त्यातल्या सद्यस्थितीवरच्या आणि विशेषतः राजकारणावरच्या टिप्पणीमुळे श्रोत्यांमध्ये खसखस पिकत होती...

   
धर्माधिकारी : स्थानापन्न व प्रवचन देताना

इतका कार्यक्रम संपल्यावर, आमच्या कुतुहलाचा असलेल्या कोरस (समूह गायनाचा) कार्यक्रमाला वेळ असल्याने आम्ही चर्चमधून बाहेर पडून थोडी फेरी मारून परत आलो. तोपर्यंत जमा झालेली भाविकांची गर्दी तो कार्यक्रम लोकप्रिय असल्याचे दर्शवित होती. कोरस गायनाचा अर्ध्याएक तासाचा मुख्य कार्यक्रम झाल्यावर नंतरच्या धार्मिक गायनात श्रोत्यांनाही सामील करून घेतले गेले. श्रोत्यांना गायनात भाग घेणे सुलभ जावे यासाठी त्यांना कवनांच्या छापील प्रती दिल्या होत्या...


कोरस गायन

एक वेगळाच अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो. पायर्‍या उतरताना चर्चच्या इमारतीला लागून असलेली चर्चची छोटीशी बाग दिसली. त्या इवल्याश्या जागेतही केलेला सौंदर्यपूर्ण बगिचा लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहिला नाही...


  
चर्चची बाग

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2017 - 12:49 am | पिलीयन रायडर

काय आठवण काढलीत! फार फार सुरेख चर्च आहे हे. मी सगळ्यांनाच सांगते, पण तुम्हीच जाऊन पाहुन आलात!!!

मी इथे खास रविवारी होणारा मास चा कार्यक्रम बघायला गेले होते. समर मध्ये इथे ३ महिने दर रविवारी ह्यांचा क्वॉयर गाणी म्हणतो. हे चर्च त्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांचा ऑर्गनही अप्रतिम आहे. आक्खं चर्च त्याने भरुन गेलंय असं वाटतं. त्यांचा संपुर्ण कार्यक्रम मी पाहिला. नंतर ते एक लहानशी फ्री गाईडेड टुरही देतात. त्यात खुप माहिती मिळली. हे माझेही काही फोटो.

1

2

3

4

5

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2017 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो आहेत.

त्या चर्चमध्ये आम्हाला राजेशाही वागणूक मिळाली. तिथल्या एका माणसाने आवर्जून चौकशी केली. भारत बघायची इच्छा आहे असे मनापासून म्हणाला. पहिल्या प्रार्थनेनंतर फोरम नावाचा एक चहापानाचा कार्यक्रम होता. अर्थातच आम्ही स्वतला उपरे समजत असल्याने त्याला जाणार नव्हतो. त्याने आग्रहाने आम्हाला तेथे नेऊन तिथला मेन्यू ("वॉटर मेलन अँड कॉफी", तो असा का हे विचारू नका, आम्हीही त्यांना विचारले नाही :) ) खाऊ-पिऊ घातला. तेथे जमलेल्यांपैकी काहींशी "हे भारतातून आलेत बरे का" अशी ओळखही करून दिली. आम्हीही, तेथे नेहमीच जात असल्यासारखे, पंधरा-वीस मिनीटे गप्पा मारून बाहेर पडलो ! :)

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:00 am | पिलीयन रायडर

गंमत म्हणजे मलाही असाच अनुभव आला. तिथे मला लोकांनी आवर्जुन विचारले की कुठुन आले आहे, चर्च बद्दल कसं कळालं. त्यांना फार कौतुक आहे आवर्जुन येणार्‍याचं असं वाटलं. आम्हाला लेमनेड मिळालं बुवा!!

अनिंद्य's picture

2 Mar 2017 - 3:36 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,
सुंदर फोटोज - मला गर्दी नसलेली चर्चेस आणि शिवालयाचे आकर्षण आहे. कार्यक्रमाच्या आधी मुख्य प्रार्थनागृहाच्या फोटोत चर्चचा अंतर्भाग अगदी शांत-निवांत.
तांब्याचा प्राचीन दरवाजा स्टील्स द शो.

@ पिलीयन रायडर
- तुमचे फोटो देखील सुंदर, खास करून छताचे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2017 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

पद्मावति's picture

3 Mar 2017 - 11:31 pm | पद्मावति

मस्तच.

प्रचेतस's picture

7 Mar 2017 - 6:28 pm | प्रचेतस

हा भागही सुंदर.

चॅपेलमधल्या चित्राभोवतीची सोनेरी प्रभावळ पाहून गोव्याच्या चर्चमधल्या चित्रांची आठवण झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Mar 2017 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

जगप्रवासी's picture

14 Mar 2017 - 6:36 pm | जगप्रवासी

तुमच्या लेखनशैलीमुळे स्वतः फिरत बघत असल्याचा नेहमी फील येतो. सहज दिसणाऱ्या एखाद्या कलाकृतीकडे तुमच्या लेखनशैलीतून बघितल्यावर वेगेळेच वाटते. फोटो सुंदर आलेत