न्यू यॉर्क : ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
10 Oct 2016 - 2:36 am

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

परतीच्या रस्त्यावरही ब्रूकलीनकरांच्या कलासक्तीची अनेक उदाहरणे नजरेस पडत होती...

आज मॅनहॅटन बेटाच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या बंदराच्या ८६ व्या धक्क्यावर असलेले "इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय" नावाचे खास संग्रहालय बघायचे होते. यातली मुख्य आकर्षणे अशी आहेत :

१. USS इंट्रेपिड ही दुसर्‍या महायुद्धात व नंतर कार्यरत असलेली विमानवाहू नौका,
२. लॉकहीड A-12 हे स्वनातीत हेरगिरी विमान (supersonic reconnaissance aeroplane),
३. काँकॉर्ड SST हे ब्रिटिश एअरवेजचे स्वनातीत व्यावसायिक विमान (supersonic commercial aeroplane) ,
४. एन्टरप्राइज अवकाशयान (Space Shuttle Enterprise) आणि
५. USS ग्रोवलर ही पाणबुडी.

या संग्रहालयातले प्रत्येक मुख्य आकर्षण केवळ महत्त्वाचेच नाही तर इतके अजस्त्रही आहे की ते त्यांच्या संग्रहालयातल्या जागेवर आणून ठेवणे आणि ते पर्यटकांना सुरक्षितरीत्या पाहता यावे अशी त्यांची मांडणी करण्यासाठी खास अभियांत्रिकी प्रकल्प करावे लागले आहेत. शिवाय, उघड्या समुद्रात ठेवलेले असल्याने त्यांना क्षती पोहोचू नये यासाठी खास व्यवस्था कराव्या लागल्या आहेत. २०१२ मध्ये "हरिकेन सँडी" नावाच्या महाकाय चक्रीवादळाने न्यू यॉर्क शहर व परिसराला जोरदार झोडपले होते. त्यात या संग्रहालयाचेही खूप नुकसान झाले. त्यानंतर येथे अनेक गोष्टींची डागडुजी करावी लागली आहे व आकर्षणांच्या सुरक्षेत अजून वाढ करण्यात आली आहे.

चला तर भेट द्यायला या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संग्रहालयाला...

नेहमीप्रमाणेच सबवेने निघालो. सबवे थांब्यापासून एक दीड किलोमीटर अंतर जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो. पण, १५-२० मिनिटे झाली तरी बसचा पत्ता नाही असे पाहून, वाटेत दिसणार्‍या दक्षिण मॅनहॅटनच्या भागांचे फोटो काढत, चालत निघालो...


इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०१


इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०२


इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०३

जरा पुढे आल्यावर बस न येण्याचे शक्य असलेले कारण दिसले. एक पर्यटक बसच्या विद्युतप्रणालीत बिघाड होऊन लागलेल्या आगीत तिच्या पुढच्या भागाचे नुकसान झालेले दिसत होते. आम्ही तेथे पोचेपर्यंत आगीच्या बंबांनी त्यांचे काम केले होते. रस्ता वाहतुकीला बंद असला तरी पादचारी जाऊ शकत असल्याने आम्ही पुढे जाऊ शकलो...


इंट्रेपिड संग्रहालयाकडे जाताना दिसलेले दक्षिण मॅनहॅटन ०४ : आग लागलेली बस

USS इंट्रेपिड

थोड्याच वेळात लढाऊ विमानांच्या दर्शनाने संग्रहालय जवळ आल्याची सूचना दिली...


इंट्रेपिड संग्रहालय ०१ : प्रथमदर्शन


इंट्रेपिड संग्रहालय ०२ : मुख्य आकर्षणांची संरचना (जालावरून साभार)

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात, १९४३ साली, हे "एस्सेक्स क्लास" प्रकारचे विमानवाहू जहाज अमेरिकन नौदलासाठी बांधले गेले. याला लाडाने "द फायटिंग I" असेही संबोधत असत. याने प्रशांत महासागरातल्या अनेक मोहिमांत भाग घेतला. दुसरे महायुद्ध संपल्यावर याला प्रथम निवृत्ती देण्यात आली. पण, लवकरच १९५० मध्ये त्याला आक्रमक विमानवाहू नौकेच्या (attack carrier) स्वरूपात परत सेवेत घेण्यात आले. त्यानंतर परत त्याचे स्वरूप बदलून पाणबुडीविरोधक विमानवाहू नौका (antisubmarine carrier) बनवले गेले. या दुसर्‍या अवतारात अटलांटिक महासागरात आणि व्हिएतनाम युद्धात या नौकेने कामगिरी बजावली. तसेच समुद्रात उतरणारी अवकाशयाने व अवकाशवीरांना पाण्यातून उचलण्याचे कार्यही या नौकेवर सोपवलेले होते.

दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात तिच्यावर चार वेगवेगळे जपानी कामिकाझे (आत्मघातकी) हवाई हल्ले, टॉर्पेडोचे हल्ले, इत्यादी अनेक आपत्ती आल्या आणि तिला डागडुजीसाठी खूप वेळ कोरड्या धक्क्यावर (ड्राय डॉकवर) उभे राहणे भाग पडले होते. त्यामुळे "इंट्रेपिड" व "द फायटिंग I" या नावांचा अपभ्रंश करून तिची "डेक्रेपिट (मोडकळीला आलेली)" व "द ड्राय I" या नावाने बरीच कुचेष्टाही केली गेली आहे.

कितीही मोठी असली आणि कितीही महत्त्वाची कामगिरी केली असली तरी प्रत्येक जहाजावर निवृत्तीची वेळ येतेच. इंट्रेपिडचीही १९७४ साली कायम निवृत्ती जाहीर केली गेली. निवृत्ती झाली की सर्वसाधारणपणे जहाजाचे तुकडे करून त्यातील धातू व इतर सामानाचा पुनर्वापर केला जातो. मात्र, झॅकरी फिशर आणि लॅरी फिशर हे बांधकाम व्यावसायिक बंधुद्वय व मायकेल स्टर्न हा वार्ताहर, या तिघांना अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावलेली इंट्रेपिडला भंगारात पाठवणे पसंत नव्हते. त्यांनी १९८२ साली तिचा उपयोग करून इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय (Intrepid Sea, Air & Space Museum) उभारले. १९८६ साली या संग्रहालयाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. सद्या हे संग्रहालय एका विनाफायदा (nonprofit) संस्थेच्या स्वरूपात काम करत असून इतिहासाची जपणूक व प्रसार करतानाच नवीन पिढीमध्ये इतिहास, शास्त्र आणि देशप्रेम वाढावे यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी, येथे वेळोवेळी प्रसंगानुरुप खास प्रदर्शनेही आयोजित केली जातात.

हे संग्रहालय स्वतः फेरी मारून पहायला एक सर्वसामान्य तिकीट असते. इंट्रेपिड व इतर विशेष आकर्षणांच्या खास सहली अधिक मूल्य भरून मार्गदर्शकांबरोबर करता येतात.

या महाकाय जहाजात एकूण ९ मजले आहेत...


USS इंट्रेपिड ०३ : जहाजाची अंतर्गत रचना

गॅलरी डेकवरच्या मुख्य दालनात जहाजाची १:४० परिमाणात बनवलेली हुबेहूब प्रतिकृती ठेवलेली आहे...


USS इंट्रेपिड ०४ : जहाजाची प्रतिमा


USS इंट्रेपिड ०५ : १९६० साली कार्यरत असतानाचे छायाचित्र (जालावरून साभार)

गॅलरी डेकवर या जहाजावर वापरलेली अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स व इतर अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत...

  
  

USS इंट्रेपिड ०६ : विमाने व हेलिकॉप्टर्स


USS इंट्रेपिड ०७ : विमानांना उड्डाण करताना व उतरताना मार्गदर्शन करणारे दिवे व जहाजाचा एक जुना प्रॉपेलर

  
USS इंट्रेपिड ०८ : विमानवेधी तोफ व विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यावर वैमानिकांना वाचवण्यासाठी वापरली जाणारी इजेक्शन सीट्स

याच डेकवर एका भागात या जहाजावर झालेल्या जपानी कामिकाझे (आत्मघाती) हल्ल्यांच्या वेळी केलेले चित्रीकरण वापरून व मशीनने केलेल्या धुराचा वापर करून त्या हल्ल्याच्या वेळेचा थरारक दृकश्राव्य अनुभव पर्यटकांना देणे चालू होते...


USS इंट्रेपिड ०९ : जपानी कामिकाझे (आत्मघाती) हल्ल्यांचा थरारक दृकश्राव्य अनुभव

याच डेकवर या जहाजाने समुद्राच्या पाण्यातून उचलेली मर्क्युरी व जेमिनी अवकाशयाने ठेवलेली आहेत...

   
USS इंट्रेपिड १० : मर्क्युरी अवकाशयान व जेमिनी अवकाशयान

या जहाजाने युद्धकालात बुडविलेल्या शत्रूच्या जहाजांची माहिती देणार्‍या तक्त्यावरून या जहाजाच्या उत्तम कामगिरीची कल्पना येते...


USS इंट्रेपिड ११ : या जहाजाने बुडवलेल्या बोटींची माहिती देणारा तक्ता

खालच्या डेक्सवर जहाजाची इंजिने व त्याच्या कार्यशैलीवर ताबा ठेवणारी विविध दालने (कंट्रोल रूम्स) आहेत...


USS इंट्रेपिड १२ : स्क्वॉड्रन रेडी रूम


USS इंट्रेपिड १३ : एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटर

  
USS इंट्रेपिड १४ : रडार कंट्रोल रूम आणि एअर ऑपरेशन्स रूम

सर्वात वरच्या फ्लाईट डेकवर जाताना एक जहाजवेधी तोफ आणि या जहाजाला विविध कामगिर्‍यांबद्दल मिळालेली पदके (मेडल्स) आपले लक्ष वेधून घेतात...


USS इंट्रेपिड १५ : जहाजवेधी तोफ


USS इंट्रेपिड १६ : इंट्रेपिडला मिळालेली पदके (मेडल्स)

या विमानवाहू नौकेने तिच्या १९४३ ते १९७४ या ३१ वर्षांच्या कार्यकालावधीतील मोहिमांत वापरलेली दोनएक डझन प्रकारची विमाने जीर्णोद्धार करून सर्वात वरच्या फ्लाईट डेकवर मांडून ठेवलेली आहेत. विविध काळातील त्यांच्या मूळ स्वरूपात असलेली लढाऊ विमाने अगदी हाताच्या अंतरावरून पाहण्याचा अनुभव मोठा रोमहर्षक होता...


  
  
  
  
  
  
  
  
  
USS इंट्रेपिड १७ : इंट्रेपिडवर वेगवेगळ्या वेळी वापरली गेलेली लढाऊ विमाने

लॉकहीड A-12

फ्लाईट डेकच्या एका टोकाला CIA साठी हेरगिरी करण्याकरिता बनवलेले "लॉकहीड A-12" हे खास स्वनातीत विमान उभे करून ठेवलेले आहे. हे विमान २४,००० मीटर (८०,००० फूट) उंचीवरून ध्वनीच्या वेगापेक्षा ३.१ जास्त वेगाने (Mach 3.1) उडू शकत असे. या प्रकारच्या एकूण बारा विमानांचा व्हिएतनाम युद्धात, उत्तर कोरियावर हेरगिरी करण्यासाठी व इतर मोहिमांत वापर केला गेला.

हे विमान १९६८ पर्यंत वापरात होते. त्यानंतर त्याच्या सुधारीत आवृत्त्या बनवून त्यांना इंटरसेप्शन, ड्रोन लाँचिंग, फोटोग्राफी व इतर प्रकारच्या हेरगिरीसाठी वापरले गेले आहे. नंतरच्या काळात, उपग्रहांच्या तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे ते हेरगिरीकरिता जास्त सुरक्षित आणि कमी खर्चिक ठरले. अर्थातच, या विमानाची उपयुक्तता कमी होऊन त्याला निवृत्त केले गेले.

याचे शक्तिशाली इंजिन सुरू करण्यासाठी जमिनीवर ठेवलेल्या एका स्वतंत्र बाह्ययंत्रणेची मदत घ्यावी लागत असे...


USS इंट्रेपिड १८ : लॉकहीड A-12 आणि त्याचे इंजिन सुरू करण्यासाठी लागणारी स्वतंत्र बाह्ययंत्रणा

फ्लाईट डेकवर फिरताना आपल्याला दक्षिण मॅनहॅटनमधिल कल्पक बांधणीच्या गगनचुंबी इमारतींचेही दर्शन होते...


USS इंट्रेपिड १९ : फ्लाईट डेकवरून दिसणार्‍या दक्षिण मॅनहॅटनमधील आकर्षक इमारती ०१


USS इंट्रेपिड २० : फ्लाईट डेकवरून दिसणार्‍या दक्षिण मॅनहॅटनमधील आकर्षक इमारती ०२

काय बघू आणि काय नको असे होत असले तरी अजून काँकॉर्ड विमान, एन्टरप्राइज अवकाशयान व USS ग्रोवलर पाणबुडी ही तीन महत्त्वाची आकर्षणे पहायची असल्याने पुढे जाणे भागच होते.

(क्रमशः )

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

10 Oct 2016 - 6:56 am | प्रचेतस

जबरदस्त झालाय हा भाग.
मर्क्युरी आणि जेमिनी ह्या अवकाशकुप्या खास आवडल्या.

विशाखापट्टणमला असंच युद्धनौकेवरील संग्रहालय पाहिलं होतं पण ह्या महासंग्रहालयाच्या तुलनेत ते काहीच नाही.

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2016 - 8:23 am | पिलीयन रायडर

जबरदस्तच आहे हे म्युझियम!!

हा भाग सुद्धा अत्यंत माहितीपुर्ण झालाय काका!

अजया's picture

10 Oct 2016 - 11:02 am | अजया

जबरदस्त आहे हे सर्व.
आपली भंगारात गेलेली विक्रांत आठवलीच :(

रोमहर्षक व थरारक प्रकरण वाटले.

यशोधरा's picture

10 Oct 2016 - 6:10 pm | यशोधरा

आवडला हा भाग.
मलाही विक्रांत आठवली...

पद्मावति's picture

10 Oct 2016 - 7:53 pm | पद्मावति

वाह, मस्तं झालाय हा भाग सुद्धा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Oct 2016 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांना व प्रतिसादकांना धन्यवाद !

@ विक्रांतसंबंधीचे प्रतिसाद : हे संग्रहालय पाहताना आणि हा लेख लिहिताना विक्रांतची सतत आठवण येत होतीच. पण, तो संदर्भ इतका दु:खद आहे की त्याबद्दल लिहावेसे वाटले नाही. इंट्रेपिडच्या बाबतीतही नागरिकांनी खाजगी स्तरावर खर्च करून हे संग्रहालय बनवले व चालवलेले आहे... राजकारण्यांकडून फार कमी अपेक्षा आहेत पण देशाच्या जीवावर श्रीमंत झालेल्या एखाद्या उद्योगाने पुढे येऊन भारताची पहिली विमानवाहू नौका असलेल्या विक्रांतचे स्मारकात रुपांतर करायला पाहिजे होते असेच वाटले होते.