न्यू यॉर्क : २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
4 Feb 2017 - 9:50 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

न्यू जर्सी राज्यातल्या रॉबिन्सव्हिल या गावी १० ऑगस्ट २०१० साली एका मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झाल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. त्या मंदिराची रसभरीत वर्णने आणि आकर्षक प्रकाशचित्रे पाहून त्याला भेट देण्याचे मनात होतेच. न्यू यॉर्कला जरा स्थिरस्थावर झाल्यावर मंदिरापर्यंत कसे जाता येईल यासंबंधी जालावर माहिती काढणे सुरू केले. अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असतात. मात्र, शहरापासून जरा दूर गेले की त्यांची बोंबाबोंब असते. शहराबाहेरच्या प्रवासासाठी एकतर स्वत:ची किंवा भाड्याची (रेंटल) चारचाकी असल्याशिवाय काय खरे नाही. हे धक्कादायक सत्य समोर आले की, कितीही धक्के खात का होईना पण कानाकोपर्‍यापर्यंत परवडणार्‍या दरात घेऊन जाणार्‍या आपल्या एसटी, वडाप, इत्यादी आणि एखाद्या फोनने घरी हजर होणार्‍या खाजगी चारचाक्यांच्या सेवांचे महत्त्व पटते !

मंदिराच्या जास्तीत जास्त जवळ असलेल्या 'नॉर्थ-इस्ट रिजनल रेल्वे'च्या स्टेशनपर्यंत जाणे सहज शक्य होते. मात्र, तेथून पुढे आडजागी असलेल्या या मंदिरापर्यंत नेऊन परत आणणार्‍या खाजगी गाडीची व्यवस्था कशी करायची याचा शोध कठीण झाला होता. तो शोध चालू असतानाच एडिसन, न्यू जर्सीस्थित मिपाकर राघवेंद्र यांचा फोन आला. त्यांनी एडिसन स्टेशनपासून पुढे मंदिराचे दर्शन करवून परत रेल्वे स्टेशनापर्यंत सोडण्याची तयारी दाखवली. एडिसन नॉर्थ-इस्ट रिजनल रेल्वेमार्गावर असल्याने सगळ्या समस्या पटकन सुटल्या. केवळ काही दिवस आधी झालेल्या न्यू जर्सीच्या कट्ट्यात प्रथम ओळख झालेली असताना राघवेंद्र यांनी स्वतःहून दाखवलेल्या या औदार्यामुळे आमची रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर पाहण्याची इच्छा सहज साधून गेली. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच !

स्वामिनारायण पंथ
(या पंथाबद्दल बहुतेक लोकांना फारशी माहिती नसते (मलाही नव्हती), त्यामुळे मी जालोत्खनन करून बाहेर काढलेली ही अल्प ओळख.)
अवतारी पुरुष समजले जाणारे स्वामिनारायण उर्फ सहजानंद स्वामी (३ एप्रिल १७८१ ते १ जून १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामिनारायण पंथाचे संस्थापक समजले जातात. उत्तर प्रदेशातील अयोध्येजवळील छापैया नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. सात वर्षाचे होईपर्यंत त्यांनी वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण आणि महाभारतासह अनेक प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता असे म्हणतात.
आईवडीलांच्या मृत्यूनंतर, वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी, 'नीलकांत वर्णी' हे नाव घेऊन, त्यांनी भारतभर तीर्थयात्राभ्रमण सुरू केले. या भ्रमणात अनेक लोकोपयोगी कामे करत करत ते सन १७९९ मध्ये गुजरातमध्ये पोचले व तेथेच स्थिरावले. तेथे १८०० मध्ये स्वामी रामानंद यांनी त्यांना उद्धव संप्रदायाची दीक्षा देऊन 'सहजानंद स्वामी' असे नाव दिले. स्वामी रामानंद यांनी, आपल्या मृत्यूपूर्वी, सन १८०२ मध्ये, त्यांना उद्धव संप्रदायाचे प्रमुख स्वामी बनवले. सहजानंद स्वामींनी एक मेळावा घेऊन लोकांना 'स्वामीनारायण मंत्र' शिकवला. तेव्हापासून त्यांना स्वामिनारायण या नावाने संबोधले जाऊ लागले आणि उद्धव संप्रदायाला स्वामिनारायण संप्रदाय हे नाव पडले. स्वामिनारायण यांच्या शिष्यांत केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम व पारशी लोकांचाही समावेश आहे. स्वामीनारायण त्यांच्या धार्मिक कामांबरोबरच महिला व दलितांच्या उत्थापनासाठी केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.

हे मंदिर "बोचासंवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेने (Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha)" बांधले आहे व त्याचे पूर्ण नाव "BAPS श्री स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर" असे आहे. याच्या बांधकामाला २०१० मध्ये सुरुवात झाली आणि १० ऑगस्ट २०१४ रोजी ते लोकांसाठी खुले झाले. मंदिराचा मुख्य भाग बांधून झाला असला तरी त्याच्या विशाल परिसराचा विकास करणे अजून चालू आहे. या परिसरात स्वामिनारायण अक्षरधाम महामंदीर नावाचे आध्यात्मिक-सांस्कृतिक केंद्र, निवासाची सोय असलेले अभ्यागत केंद्र आणि भारतीय इतिहास व संस्कृतीसंबंधी स्थायी प्रदर्शन असेल. ही सर्व कामे संपायला अजून काही वर्षे लागतील असा अंदाज आहे.

या संकुलातील मुख्य मंदिराच्या इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे १२,००० चौ फूट (१३३ X ८७ फूट) व उंची ४२ फूट आहे. संपूर्ण इमारत ६८,००० घनफूट इटॅलियन करारा (Italian Carrara) संगमरवराच्या एकूण १३,४९९ तुकड्यांचा वापर करून बांधलेली आहे. मंदिराच्या सर्व पृष्ठभागावर सुंदर कोरीवकाम आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनावर आणि संदेशांवर आधारीत कोरीवकामे आहेत आणि मंदिराच्या ९८ खांबांवर भगवान स्वामीनारायण यांचे शिष्य असलेल्या परमहंसांच्या (spiritual aspirants) जीवनावर आधारीत कोरीवकामे आहेत.

या मंदिरासाठी आवश्यक असणारे कोरीवकाम करण्याचे कसब असलेले कारागीर अमेरिकेत मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे संगमरवराचे तुकडे युरोपातून प्रथम बोटीने भारताच्या किनार्‍यापर्यंत आणि तेथून पुढे ट्रकने राजस्तानमध्ये नेले गेले. तेथे कसबी कारागिरांच्या हाताने त्यांच्यावर कोरीवकामाचे संस्कार केले गेले. राजस्तानातल्या कार्यशालेत त्यांची अमेरिकेतील मंदिरात जशी हवी आहे तशी रचना करून खात्री झाल्यावर स्थापत्यकारांनी बनवलेल्या प्रणालीअंतर्गत त्यांना क्रमांक दिले गेले. कोरीव तुकडे परत वेगळे करून खास वेष्टनांतून बोटीने अमेरिकेला आणले गेले आणि त्यांना दिलेले क्रमांक वापरून मंदिराची रचना केली गेली. अश्या रितीने संगमरवराच्या प्रत्येक तुकड्याने मंदिराच्या बांधणीत उपयोग होईपर्यंत ३४,६०० किमी (२१,५०० मैल) प्रवास केला होता !

इटॅलिअयन संगमरवराशिवाय या मंदिराच्या बांधकामात भारतीय गुलाबी दगड आणि तुर्कस्तानचा चुनखडीचा दगड यांचाही वापर केलेला आहे. मंदिराचे बांधकाम वेद आणि इतर प्राचीन ग्रंथांचा आधार घेऊन शिकारबद्ध शैलीत केलेले आहे. संगमरवरावर हवामानाचा परिणाम न होता त्याचे सुंदर रूप खूप काळ तसेच राहावे यासाठी मंदिराला सर्व बाजूंनी वेढणारा ५५ फूट उंचीचा स्थायी मंडप बनवलेला आहे. या मंदिराच्या बांधणीत कारागीर व स्वयंसेवक मिळून एकंदर ४७ लाख व्यक्ती-तास खर्च झाले आहेत. केवळ मंदिर बांधणीचेच नव्हे तर इथली रोजची कामेही प्रामुख्याने स्वयंसेवकातर्फे केली जातात.

मंदिराचा परिसर हिरवागार, आखीवरेखीव आणि उत्तम निगा राखलेला होता. मंदिराशेजारी असलेल्या एका मानवनिर्मित तलावामुळे त्याला अधिकच शोभा आली होती...


चारचाकी थांब्यातून दिसणारा मंदिराचा मंडप आणि त्याच्या शेजारचा तलाव

मंडपाच्या एका बाजूने त्याच्या दर्शनी भागाकडे नेणारा संगमरवरी कोरीवकामाने सजलेला पडवीवजा मार्ग आहे. त्यावरची कलाकुसर आपल्याला मंदिराच्या सौंदर्याची चुणूक दाखवते...


मंडपाच्या एका भिंतीला लागून असलेला संगमरवरी कोरीवकामाने सजलेला पडवीवजा मार्ग

     
पडवीवजा मार्गाचा संगमरवरी कोरीवकामाने सजलेला अंतर्भाग व मंडपाची बाहेरून दिसणारी विरुद्ध बाजूची भिंत

हा मार्ग संपल्यावर डावीकडे वळून आपण मोरांच्या २३६ शिल्पांनी सजवलेल्या मंडपाच्या मयूरद्वारासमोर येतो. मोरांशिवाय या द्वारात हत्ती, परमहंस आणि भक्तमंडळींची शिल्पेही आहेत...


मयूरद्वार

  
मयूरद्वाराचे जवळून दर्शन : मध्यभाग आणि एक बाजू


मयूरद्वाराचे जवळून दर्शन : मध्यभागाचे शिखर


मयूरद्वाराचे जवळून दर्शन : एक शिल्प व त्याच्या सभोवतालचे कोरीवकाम

मयूरद्वारातून आत गेल्यावर मंडपाने पूर्णपणे आच्छादलेले मुख्य मंदिर समोर येते...


मयूरद्वारातून दिसणारे मंडपाच्या छ्ताखाली सुरक्षित असलेले मुख्य मंदिर

मंडपाच्या छताचा आणि भिंतीचा अंतर्भाग सुंदर कोरीवकामाने भरलेला आहे...


मंडपाच्या छतावरील नक्षी


मंडपाच्या भिंतींच्या अंतर्भागावरील नक्षी

जसजसे आपण मंदिराच्या जवळ जातो तेव्हा त्यावरचे सुंदर कोरीवकाम अधिकाधिक स्पष्ट होत जाते...


मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०१


मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०२ : मध्यभागावरची कलाकुसर जवळून

  
मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०३ : मध्यभागाचे एका बाजूने दर्शन व उजव्या बाजूच्या कलाकुसरीचे जवळून दर्शन


मुख्य मंदिराचा दर्शनी भाग ०४ : मध्यभागावरील शिखराचे एका बाजूने दर्शन


मुख्य मंदिराचा बहिर्भाग व तेथे चालू असलेले काम

या मंदिराच्या भिंती व छताच्या पृष्ठभागांचा प्रत्येक चौरस सेंटीमीटर कसबी कोरीवकामाने सजवलेला आहे. तसेच मंदिरात अनेक हिंदू देवदेवता व स्वामिनारायण पंथाच्या प्रमुख स्वामींच्या अनेक मनोहारी मूर्ती आहेत. मूर्तींना अनेक आकर्षक रंगीत वस्त्राभूषणांनी सजवलेले आहे. मंदिराच्या आत छायाचित्रे काढायला बंदी आहे. त्यामुळे, मंदिराच्या सौंदर्याची कल्पना येण्यासाठी मंदिराच्या संस्थळावरून व जालावरून साभार घेतलेली काही चित्रे खाली देत आहे...

स्वामिनारायण पंथाच्या प्रमुखांच्या व हिंदू देवदेवतांच्या मूर्ती

  
भगवान स्वामीनारायण व अक्षरब्रम्ह गुणातितानंद स्वामी; आणि श्री घनश्याम महाराज


श्री हरिकृष्ण महाराज व श्री राधा-कृष्ण देव


श्री सीता-राम देव, श्री हनुमानजी व श्री लक्षमणजी


श्री शिवपार्वती देव, श्री गणेशजी व श्री कार्तिकेयजी

मंदिराचा अंतर्भाग

  
  
मंदिराचा अंतर्भाग

मंदिराच्या छतावरची नक्षी

  
  
मंदिराच्या छतावरची नक्षी

मंदिरातील नक्षीदार कमानी

  
मंदिराच्या नक्षीदार कमानी

मंदिराच्या भिंतींवरची नक्षी

  

मंदिराच्या भिंतींवरची नक्षी ०१

  
मंदिराच्या भिंतींवरची नक्षी ०२

==============================================================================

अक्षरधाम मंदिराची (यू ट्यूबवरून साभार) चित्रफीत...

==============================================================================

मंदिराशेजारच्या मिठाईच्या दुकानात खास भारतीय मिठाया व चटपटीत पदार्थ होते. अर्थातच, जीभेच्या आग्रहास्तव त्यांची खरेदी झालीच. परतीच्या वाटेत राघवेंद्र यांच्या घराला भेट व त्यांचा पाहुणचार झाला. रेल्वेच्या थांब्याजवळ पटेल ब्रदर्स यांचे दुकान दिसले. तेथे राघवेंद्र यांचा साभार निरोप घेतला आणि दुकानात घुसलो...


पटेल ब्रदर्स, एडिसन, न्यू जर्सी

रेल्वे थांब्यावर आमच्या गाडीची वाट पाहत असताना नॉर्थ-इस्ट करिडॉरवरून वेगाने प्रवास करणारी "असेला एक्सप्रेस" जोमाने धडधडत गेली...


असेला एक्सप्रेस

अमेरिकेतले नावाजलेले हिंदू मंदिर आणि एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचे समाधान मनात घेऊन आम्ही आमची गाडी पकडली आणि घराच्या दिशेने निघालो.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

4 Feb 2017 - 11:50 pm | पद्मावति

सुरेख.

पर्णिका's picture

5 Feb 2017 - 5:03 am | पर्णिका

मस्त... आमच्या गावातील स्वामीनारायण मंदीर, देवदेवतांच्या मूर्ती आणि परिसरही सुरेख आहे. त्यांच्या शॉपमधील पदार्थही खूप आवडतात. :)
>>> या पंथाबद्दल बहुतेक लोकांना फारशी माहिती नसते >>> +१ मलाही प्रथम भेटीत काहीच माहीती नव्हती.

पिलीयन रायडर's picture

5 Feb 2017 - 8:31 am | पिलीयन रायडर

हे मंदिर पहायचे आहेच, पण इथे बहुदा डोसे मिळत नाहीत ना. म्हणुनच ते लिस्टीत मागे पडलंय. जर कॅफेटेरीया चांगला असेल तरच मंदिरात जायचं. ;)

काका, लेख अत्युत्तम! फोटो फारच सुरेख आलेत.

प्रचेतस's picture

5 Feb 2017 - 10:25 am | प्रचेतस

नेत्रदिपक.

कोरीव काम खूपच सुरेख आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2017 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ पर्णिका आणि पिलीयन रायडर :

मंदिराच्या दुकानात खूप प्रकारचे गोड व चटपटीत पदार्थ मिळतात. मात्र डोसा, इडली असे दाक्षिण्यात्य पदार्थ दिसले नाहीत.

हे काही नमुने...

राघवेंद्र's picture

5 Feb 2017 - 7:33 pm | राघवेंद्र

धन्यवाद काका !!!
मस्त आठवण. मिपा कट्टा व आपला घरचा कट्टा मस्त झाला होता.

हिम वर्षाव असताना सुद्धा मंदिराच्या बाहेरची कलाकुसर बघता यावी म्हणून ते एका बॉक्स मध्ये आहे हे मंदिराचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.

अति अवांतर : रॉबिन्सव्हिले टाउनशिप याचे पुर्वीचे नाव वॉशिंग्टन टाउनशिप असे होते. न्यू जर्सी मध्ये अश्या अजुन ५ गावांची नावे वॉशिंग्टन टाउनशिप असल्यामुळे २०११ साली रॉबिन्सव्हिले टाउनशिप असे केले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2017 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सही रे सई's picture

6 Feb 2017 - 8:28 pm | सही रे सई

मस्त मस्त वर्णन. येत्या शनिवारी या मन्दिराला भेट द्यायचा विचार आहे.

आनंदयात्री's picture

6 Feb 2017 - 8:38 pm | आनंदयात्री

मंदिर गेल्या दिवाळीत पाहण्याचा योग्य आला होता. 'देऊळ पाहायला जाऊन काय दिवस घालवायचा' अश्या विचाराने गेलेलो मी ते 'आता दरवेळेस जर्सीला आले कि इथे जायचेच' असा विचार करून परत आलो. शिल्पसमृद्ध देवळं, लेणी पाहणे ही अतिशय आवडीचा गोष्ट असल्याने असावे कदाचित. आजवर भारतातली जी जी शिल्पसमृद्ध देवळं, लेणी पाहिली आहेत ती सगळी तोडफोड करून विद्रुप केलेलीच पहिली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे मंदिर पाहणे हा फारच आनंददायी अनुभव होता. वेरूळ अजिंठ्याच्या स्केलवर हे मंदिर जरी खूप लहान असेल तरी वेरूळ अजिंठा त्यांच्या चांगल्या दिवसात काय असतील याचा अंदाज दोन्ही गोष्टी पाहिलेल्या माणसाला सहज येईल. तिथल्या खांबांवरची कलाकुसर आणि संतांचे शिल्प पाहतांना 'गुजराथ्यांचेच संत कोरले असणार' असा बायस होता, ज्ञानदेवांसारखे मराठी संत आणि ना ऐकलेली दक्षिण भारतीय संतांची शिल्पे पाहून तोही दूर झाला. त्यांनी आजवर केलेल्या खर्चाचे आकडे मोठे आहेत. पण हे मंदिर पुढची हजार टिकण्यासाठी बांधले आहे असे जेव्हा तिथल्या स्वयंसेवकांकडून ऐकले तेव्हा या प्रकल्पाच्या मागच्या व्हिजनचा अंदाज आला. त्यांच्या सगळ्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

प्रचेतस's picture

6 Feb 2017 - 9:59 pm | प्रचेतस

सहमत.
विशेषतः मंदिरातले स्तंभ, मूर्ती आणि छतांवरची नक्षी मध्ययुगीन मंदिर शैलीशी प्रामाणिक राहून कोरलेली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Feb 2017 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

पाश्चिमात्य देशांत सर्वसाधारणपणे दिसणार्‍या मंदिरांमध्ये, हे मंदिर, त्याच्या वेगळेपणाने आणि प्रभावी सादरीकरणाने, नक्कीच उठून दिसते.

छान फोटो आणि वर्णन . मला हे मंदिर फार आवडते . मंदिराच्या मागील दुकानात पापड लोट म्हणून गुजराती पदार्थ मिळतो तो फार आवडला . बाकी मिठाया, लोणची मस्त मिळतात.
मंदिर मध्ये कॅमेरा वापरायला परवानगी नाही मग कसे काय फोटो काढले मूर्तींचे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Feb 2017 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मुख्य मंदिराच्या आतील फोटोंच्या सुरुवातीलाच...
मंदिराच्या आत छायाचित्रे काढायला बंदी आहे. त्यामुळे, मंदिराच्या सौंदर्याची कल्पना येण्यासाठी मंदिराच्या संस्थळावरून व जालावरून साभार घेतलेली काही चित्रे खाली देत आहे...
असं लिहिलं आहे.

किंबहुना, मुख्य मंदिरामध्ये फोटो काढायला आक्षेप घेणार्‍या स्वयंसेवकाला, "या मंदिराच्या आतबाहेरचे असंख्य फोटो जालावर फिरत आहेत, मग इथे फोटो घ्यायला बंदी करून काय साधले जात आहे ?" असे मी विचारले देखील. पण, त्याने "मंदिरके अंदर फोटो नही निकालनेका ये अ‍ॅडमिनका रूल है" असे म्हटल्यावर त्याला बिचार्‍याला पिडण्यात काही अर्थ नव्हता. मी मंदिराच्या आत काढलेला एक फोटो त्याच्या आग्रहावरून त्याच्या समोर डिलिट करून टाकला. मुख्य मंदिराबाहेर फोटो काढायला काहीच आडकाठी नाही.

किती सुंदर मंदिर आहे!देखणे आणि नयनरम्य कोरीवकाम.फोटोही छान आलेत.

जगप्रवासी's picture

9 Feb 2017 - 1:58 pm | जगप्रवासी

आणि काका तुमचे खुप धन्यवाद. तुमच्यामुळे इतक्या सुंदर मंदिराचे दर्शन झाले.

मिसळपावच्या संपादकांचे खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला इतकी छान माहिती नेहमी मिळत राहते.

तुमची लेखनशैली आणि फोटो नेहमीप्रमाणेच उत्तम.

तुमच्या भटकंती लेखाचा पंखा,
जगप्रवासी

पूर्वाविवेक's picture

9 Feb 2017 - 4:36 pm | पूर्वाविवेक

फारच सुरेख वर्णन आणि फोटो !
सगळीच लेखमाला अतिशय छान चालली आहे.

पुष्करिणी's picture

9 Feb 2017 - 5:25 pm | पुष्करिणी

छान ओळख.

लंडनंचं स्वामीनाथ मंदिर सुद्धा सुंदर आणि स्वच्छ आहे. दरवर्षी दिवाळीत आणि निवडणूकांच्या आधी आजी पंतप्रधान / उमेदवार / राजपरिवारातील सदस्य वगैरे तिथे जाउन येतात.

इकडचा त्यांचा स्टाफ मॉरल पॉलिसिंगचा अतिरेक करतो, त्यामुळे मंदिर अतिशय आवडतं असलं तरी एकेदिवशी मी ऑलमोस्ट पोलिसांत तक्रार करावी का या विचारापर्यंत आले होते.

इकडे बायका पुरूषांच्या वेगळ्या रांगा असतात देवळात जायला, न्युयॉर्क मधेही असच आहे का? मुख्य स्वामी मंदिरात असतील तर बायकांना देवळात ( जिथे मूर्ती आहेत तिथे ) प्रवेशच देत नाहीत, कारण स्वामींच सोवळं. मला आलेले काही अनुभव -

मंदिराच्या वेबसाइट्वर कुठेही ड्रेसकोड सांगितलेला नाही, एका दिवाळीत स्लीव्हलेस पंजाबी ड्रेस घालून गेल्यामुळे एका १६-१७ वर्षाच्या स्वयंसेवकानं मला भारतीय संस्कृती आणि माझी नालायकी याबद्दल रांगेत उभ्या असणार्‍या निदान १०० लोकांसमोर मोठ्ठं भाषण दिलं आहे :), आणि घरी जाउन कपडे बदलून या असही सांगितलं आहे. मी तिथे खूप भांडले पण एकही बाई माझ्याबाजूनं बोलली नाही,जेंव्हा मी पोलिसांत तक्रार करायची धमकी दिली तेंव्हा त्यांच्या वरिष्ठानं मध्यस्ती करून मला ओढणीनं माझे दंड झाकून यायची परवानगी !!! दिली. हे सगळे सो कॉल्ड स्वयंसेवक लंडन मधेच जन्मलेले आहेत.

ब्रिटन मधे नळाल येणारं पाणी हे पिण्याचं पाणी असतं ( पिण्यायोग्य ), त्यामुळे कोणत्याही रेस्टॉरंटमधे जर गिर्‍हाइकानं 'टॅप वॉटर' मागितलं तर ते विनामूल्य देणं बंधनकारक आहे. पण मंदिराच्या आवारातील गुजराथी कँटिन मधे जवळ्जवळ २५पौंडांची खाद्यपदार्थांची खरेदी केल्यानंतरही त्यांनी पाणी विकतच घ्यायची सक्ती केली, कायद्या बद्दल सांगितल्यावर 'जिथे तक्रार करायची आहे तिथे करा, आंम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही' या भाषेत उत्तर मिळालं, मॅनेजरकडे तक्रार केल्यावर त्या बाईनेही हेच सौम्य शब्दात सांगितलं. अत्यंत उद्ध्ट लोकं आहेत.

एक दक्षिण भारतीय जोडपं हातात हात घालून राधा-कृष्णाचं भिंतीवर रंगवलेलं चित्र पहाण्यात दंग असताना एक स्वयंसेवक येउन त्यांना माझ्यासमोर असंच भारतीय संस्कृतीचं भाषण अतिशय उद्धट्पणे देउन गेला, ते दोघं बिचारे मान खाली घालून निघून गेले.

मी खूप दर्गे, चर्च, गुरूद्वारं बघीतलेले आहेत पण इतकी उद्धट माणसं कुठेही पाहिलेली नाहीत;

तुमच्या चांगल्या धाग्यावर अवांतर केल्याबद्दल क्षमस्व, पण अगदीच रहावलं नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2017 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

'मुख्य मंदिरात फोटो काढू नये' याशिवाय इतर कोणतेही बंधन रॉबिन्सव्हिल (न्यू जर्सी) च्या मंदिरात दिसले नाही. दुकान/रेस्तराँमध्येही स्मितहास्यासह सेवा होती.

चौकस२१२'s picture

13 Feb 2017 - 3:23 pm | चौकस२१२

वरिल शिर्शकात मझि या बद्दलचि एक हिन्दु मह्नुन भावना दअद्लेलि आहे .. देव्न्गरि जम्त नहिये !

चौकस२१२'s picture

14 Feb 2017 - 9:34 am | चौकस२१२

एक भटकंती प्रिय आणि स्थापत्य शास्त्रात रस असणारी व्यक्ती आणि हिंदू म्हणून या वास्तू बद्दल / त्यांचं निर्मात्यांबद्दल कौतुक मला साहजिक वाटते परंतु २ कटू अनुभव आणि काहि विचार मांडावासा वाटतो ...यात लेखकवर टीका करण्याचा कोणताही हेतू नाही , त्यन्नि भत्कन्ति मह्नुन चन्गल लेख लिहिला आहे .
एक खुंलासा ,एक सर्वसामान्य हिंदू म्हणून हे प्रश्न मनात येतात , मी हिंदुधर्मातील कोणत्याही पंथाला वाहिलेला नाहीये किंबहुना फारसा धार्मिक हि नाही ,
- विचार १: हा पंथ स्वतःला हिंदू म्हणवतो कि नाही? कारण माझ्यासारख्याला हे सर्व म्हणजे "हिंदू धर्माचा वापर करून आपला स्वतः सुभा निर्माण करण्यासारखे) वाटते.. हा पंथ काय किंवा इस्कॉन सारखे काय किंवा सर्व आधुनिक "बाबा / गुरु बिसनेस "वाले काय सरळ स्पष्ट आम्ही हिंदू धर्माचाच प्रसार / जपणूक करतो असे का म्हणत नाहीत? एक बापास पंथीयाला विचारले तर तो म्हणाला .. आम्ही असा कधी विचार केला नाही! मग करा !
विचार २: पाश्चिमात्य जगात पाश्चिमात्य लोक या पंथानंच मूळ सर्वसाधार हिंदू धर्म म्हणून ओळखू लागतील अशी मला काळजी वाटते ... उदाहरण: आता बऱ्याच शहरात हिंदू अससोसिएशन असा सार्वजनिक संस्थांची मंदिरे आहेत त्यात कोणताही पंथ नसतो .. व्यक्तिपूजा नसते... आणि मग हि असली मंदिरे असतात, भव्य , शिस्तबद्ध वैगरे पण येथे व्यक्तिपूजा आणि एकाच पंथाची बांधिलकी असते हे फारसे योग्य चित्र वाटत नाही ...
- अनुभव १>
मी राहत असेलेली शहरात (भारताबाहेर ) त्यावेळी कोणते हि हिंदू मंदिर नव्हते , त्यातल्या त्यात म्हणजे इस्कॉन चा एक गावाबाहेर आश्रम होता, कामाच्या ठिकाणी एक पंजाब मधील माणूस ओळखीचा झाला आणि तो काही कारणाने चिंतेत होता खचलेला होता , माझ्य लक्षात आले कि तो ज्या वडीलधाऱ्या पाश्चिमात्य कुटुंबाचाच उल्लेख करीत होत ते अतिशय कट्टर ख्रिस्ती पंतह्चे ( सर्वसाधारण रोमन कॅथलिक किंवा प्रोटेस्ट नव्हे तर अति कट्टर जेहोवा विटनेस वाले ) अनुयायी होते आणि ते हळू हळू त्याला धर्मांतर कार्याला लावतील कि काय अशी मला शंका अली म्हणून त्याला एका मित्र म्हणून आणि या पासून वाचवण्यासाठी / विरंगुळा मिळावा म्हणून विचारले कि रविवारी आपण इस् कॉन आश्रमात जाऊया का छान आहे जागा आणि सर्वसाधारण मंदिरात जसे प्रसन्न वाटते तसे वाटेल... त्यांनी दिलेल्या उत्तराने मला धक्का बसला : तो म्हणाला "हम नाही जायेंगे क्यू कि हं स्वामी नारायण वाले है ? तो पर्यंत मला हा एक पंथ आहे हे हि माहिती नव्हते... मी म्हणाले अरे स्वामी नारायण काय आणि दुसरं कय मंदिरात तर जातोस ना मग चल तिथे हि राधा कृष्ण येथी हि काय फरक पडतो आपण हिंदू आहोत ना शेवटी... पण तो काही बांधला नाही.. येवडः आंधळे पणा ! प्रथम राग आला मला मग कीव वाटली...अनुभव २: एका तबलजी मित्राने स्थानिक स्वामी नारायण मंदिरातील कार्यक्रमाला बोलावले.. सुदर कार्यक्रम / चोख व्यस्था वैगरे ... चांगले वाटले, त्यावेळी मी स्थानिक महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष होतो त्यामुळे स्वामीनारायण वाले माझ्या बरोबर जरा जास्त आपुलकीने वागत होत ( कारण सेल्फ प्रोमोशन) २ गोष्टी जबरदस्त खटकल्या: स्त्री ला पुढे येऊन काही कार्याला परवानगी नव्हती ... भजन म्हण्य्याची इच्छा होती तिला नाही दिली परवानगी... प्रथम वाटले कि ऐनवेळी विचारले असेल म्हणून नाही म्हणाले असताही.. नंतर कळले कि "नाहीच" का हि स्त्रीला दुय्यम वागणूक? तसेच सभागृहात कुटुंब म्हणून एकत्र नाही बसायचे अगदी नंतरच्या जेवण प्रसादाला सुद्धा! का? दुसरे खटकले कि चिमुकल्यांचे संस्कार वर्ग पण मुलं/ मुली वेगळे ... काय हा मागासलेपणा .. आपण हिंदू पुरोगामी ना.. अरे हो पण विसरलो हे पंथीय स्वतःला कुठे हिंदू समजतात ! असो ... लोकांचं श्रद्धेला हात घातल्या बद्दल क्षमस्व पण शांत पाने विचार करा हे असले कट्टर वाडी विचार आपल्या धर्मात चांगले का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2017 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

राघवेंद्र's picture

20 Feb 2017 - 4:20 am | राघवेंद्र

आजच कळले आहे की पुण्यात नर्हे इथे असेच अक्षरधाम मंदीर उघडले आहे. त्यामुळे लवकरच मिपा कट्टा करा तिथे.